Ardhantar - 8 in Marathi Moral Stories by अनु... books and stories PDF | अधांतर - ८

Featured Books
Categories
Share

अधांतर - ८

चेहरे के रंग से अगर,
इंसांन पहचान लेते।
उम्मीद की कश्ती,
कही डुबने ना देते।

आपल्याला आयुष्यात माणसं कशी जोडायची हे जास्त शिकवल्या जातं, पण माणसं ओळखायची कशी हे तर आपण आपल्याला आलेल्या अनुभवावरून शिकतो...पण जर माणसं ओळखायला शिकलो असतो तर वाईट परिस्थितीतुन गेलो ही नसतो, आणि वाईट परिस्तिथी अनुभवली नसती तर आयुष्य आपल्याला काय देतंय हे कळाल नसतं...कसा आहे ना मनुष्य स्वभाव पण! ज्याच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतो तोच सगळ्यात जास्त बेजबाबदार पणे वागतो आपल्यासोबत...ज्याला जास्त जीव लावतो तोच आपली पर्वा करत नाही, आणि तीच व्यक्ती आपला जास्त अपेक्षाभंग करते...की असं म्हणायचं, आपण तसे अधिकार देतो त्या व्यक्तीला आपल्याला दुखवायला....असंही असेल कदाचित...पण जर कोणी आपल्याला इतकं महत्त्व देत असेल तर त्याच मन दुःखवनं खरच इतकं सोप्प असते का? हो...ज्या लोकांना मन नसतं त्यांच्यासाठी हे नक्कीच सोप्प असतं...कस आहे, वाईट वेळ तर निघूनच जाते कशीतरी पण जाता जाता चांगल्या चांगल्या लोकांचे खरे चेहरे दाखवून जाते, त्यामुळे कोणाचं मन दुखवताना हा विचार नक्की करावा की आज जी वेळ दुसऱ्यावर आहे, उद्या ती आपल्यावरही येऊ शकते....पण दुर्दैवाने हा विचार विक्रमने त्यावेळी केला नसावा आणि आज तो या यातना भोगत असेल....

माझा आणि विक्रमचा विचार केला तर असं वाटते आयुष्य हे कादंबरी सारखंच असते, त्यात जर एक पानावर सुख असेल तर दुसऱ्या पानावर दुःख ही असेलच...कादंबऱ्या काल्पनिक असतात असं म्हणतात, मग आयुष्यात ही असंच काहीसं होत असतं, ज्या गोष्टींची कधी कल्पनाच केलेली नसते त्याच गोष्टी समोर येतात, आणि ही कादंबरी वस्ताविकतेच रूप घेते...मी तरी कुठे कल्पना केली होती ज्या विक्रमला फक्त एक मित्र मानत होती तो माझ्या आयुष्याचा जोडीदार होईल, ज्या विक्रमला मी 'परफेक्ट' मानायची तो मात्र माझ्यात एवढे दोष काढेल...माणूस अनुभवाने शिकतो म्हणतात पण अनुभव येतो कुठून? माझ्या मते अनुभव फक्त एक चुकीच्या घेतलेल्या निर्णयातून येतो...एक चुकीचा निर्णय खूप गुंता करत जातो, आपण तो सोडवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी नवीन गाठ पडत जाते...आणि एक वेळ अशी येते की तो गुंता तर काही सुटत नाही पण धागा मात्र तुटतो...माझ्या आणि विक्रमच्या मधात ही असंच झालं आणि मग मला कळून चुकलं की ही गाठ तोडल्याशिवाय सुटणारी नाही...

साखरपुडा तर झाला, सगळं काही आनंदी आनंद गडे होतं, विक्रमच्या बोलण्याने मनाला थोडा धीर ही मिळाला होता पण एक हुरहूर होतीच, मात्र मी त्याकडे दुर्लक्ष केलं... साखरपुडा झाल्यावर दोन दिवसांनी विक्रम ट्रेनिंग साठी नाशिकला निघणार होता, जायच्या आधी मला भेटायला घरी आला तो...आधी घरी आल्यावर मला चोरून चोरून पाहणारा विक्रम आज सरळ माझ्या रूम मध्ये आला, मला मात्र त्याच हे वागणं पटलं नाही,

"हे काय विक्रम, तुम्ही अस सरळ आतमध्ये का आले, आई बाबा घरीच आहेत, कस वाटेल त्यांना, तुम्ही बाहेर जा, मी येते..."

"त्यात काय वाटणार आहे, होणारा नवरा आहे मी, आणि या घरचा जावई, त्यामुळे हक्क आहे माझा..."

"हो ते ठीक आहे, पण असं बर नाही वाटत, बाबा खूप स्ट्रिक्ट आहेत माझे, त्यांना आवडणार नाही, रागावतील आपल्याला..."

"तुला रागावतील ते ठीक आहे पण माझा काय संबंध?"

"अरे, तुम्ही पण त्यांच्या मुलासारखेच आहेत ना, मग चूक केल्यावर रागावणार नाहीत का? दादाला तर अजूनही रागावतात खूप, तुम्हाला ही घाबरून राहायला पाहिजे..."
मी मिश्कीलपणे बोलून गेली, पण विक्रमचे हावभाव बदलले आणि तो रूम मधून बाहेर जायला निघाला, जाता जाता माझ्यावर एक कटाक्ष टाकत बोलला,

"हे बघ नैना, तुझ्या भावाला रागवत असतील ते ठीक आहे, पण मी जावई आहे घरचा, त्यामुळे असे फालतू गोष्टी मी ऐकून घेणारा नाही..." विक्रम रागात होता..
"...आणि हो, अजून एक गोष्ट तुझ्या बाबांना जर जावयाचा मानपान करता येत नसेल तर त्यांना शिकून घ्यावं म्हणा, नाहीतर पोरीला घरातच बसवायला सांग..."
रूमचा दरवाजा जोरात आपटत विक्रम निघून गेला, पण त्याचं हे वागणं माझ्यासाठी खूप प्रश्न निर्माण करून गेले...काल मला समजून घेणारा विक्रम आणि आज अशी मग्रुरी दाखवून गेलेला विक्रम, काय खरं, काय खोटं काही कळत नव्हतं...विक्रमने एकतर एवढा विश्वास निर्माण केला होता बाबांच्या मनात की मी ही गोष्ट सांगितली असती तरी त्यांनी चूक माझ्यातच काढली असती, त्यामुळे मी काही न बोलायचंच ठरवलं...

ज्या दिवशी विक्रमला निघायचं होत त्यादिवशी आईबाबा आणि मी त्याच्या घरी गेलो, तो ज्याप्रमाणे बोलून गेला माझी अजिबात ही इच्छा नव्हती तिथे जायची पण माझा नाईलाज झाला होता...घरी पोहोचल्यावर विक्रमच्या आईबाबांनी चांगलं स्वागत केलं, मी त्यांना नमस्कार केला, विक्रमही तिथेच होता पण तो साधा बोलला ही नाही बाबांना, नमस्कार तर दूरच...सगळ्यांच्या गप्पा सुरु झाल्या पण माझं मन काही तिथे रमेना, त्यासाठी कारण हे होतं की विक्रमची वागणूक...बाबा त्याला किती बोलण्याचा प्रयत्न करत होते पण तो मात्र काहीच बोलत नव्हता आणि थोड्यावेळाने लगेच उठून निघून गेला त्याच्या रूममध्ये...बाबांच्या चेहऱ्यावरून कळत होतं की त्यांना वाईट वाटलं आहे पण ते दाखवत नव्हते, मला ही काही बरं वाटत नव्हतं...सगळ्यांच्या गप्पा सुरु होत्या त्यामुळे विक्रमच्या आईने मला त्याच्यासाठी चहा घेऊन जायला सांगितलं, आणि मलाही ते मान्य कराव लागलं...मी त्याच्यासाठी चहा घेऊन गेली रूममध्ये पण तो पॅकिंग करण्यात बिझी होता त्यामुळे मी त्याला आवाज दिला,
"विक्रम...विक्रम...चहा घेऊन आली आहे तुमच्यासाठी..."
मी असं बोलल्यावर त्याने रागाने माझ्याकडे पाहिलं आणि माझ्याजवळ येऊन उभा राहिला..त्याचा राग मला स्पष्ट दिसत होता पण त्या रागाचं नेमकं कारण मला कळत नव्हतं,

"काय बोललीस??? पुन्हा बोल..."

"मी...मी...ते..चहा..."

"ते दिसत आहे मला, त्याआधी काय बोलली..."

"क्क्याय...काही नाही..."

"काय काही नाही....साखरपुडा झाल्यापासून पाहत आहे, सारखं विक्रम, विक्रम...होणाऱ्या नवऱ्याचं नाव घ्यायला लाज नाही वाटली तुला...कशी वाटणार लाज???संस्कारच नाहीत ना...तुझ्या आईबाबांनी साध्या साध्या गोष्टी नाही शिकवल्या तुला..."

त्याचे शब्द मला बाणासारखे टोचले, तो मला काही बोलला असता तर कदाचीत मला जास्त काही वाटलं नसत पब त्याने माझ्या घरच्यांवर वार केला होता आणि तो मला असहनीय वाटत होता, माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि त्यात त्याचा आवाज एवढा मोठा होता की भीतीने माझ्या हातून चहाचा ट्रे हातातून निसटला आणि आमचे आईवडील धावत आले काय झालं हे पाहायला...माझी अवस्था पाहून बाबांनी विचारलं काय झालं तर त्यावर माझ्या आधी विक्रमने प्रतिक्रिया अशी दिली,

"हे बघा बाबा तुमच्या मुलीला काहीच कळत नाही कुठे कस वागायचं, तुमच्या घरी मुलींना शिकवल्या जात नाही का की नवऱ्याचा मान कसा करायला पाहिजे, लग्नाला वेळ आहे म्हणून सांगतो आहे त्या वेळेत शिकवा तिला काही, मी DySP आहे होणारा, माझा मान तिला राखता येत नसेल तर ठेवा तिला आयुष्यभर तुमच्या घरीच..." आणि अस बोलून तो रागारागात निघून गेला...बाबांना खूप वाईट वाटलं पण ते तिथे काही बोलू शकले नाही, विक्रमची वागणूक सावरासावर करण्यासाठी त्याचे आईवडिल बोलले की तो तापट आहे, रागात काहीही बोलून जातो, लग्नानंतर बदलून जाईल तो...पण माझ्या दुर्दैवाने अस काहीही झालं नाही, जर मी त्याला तेंव्हाच सडेतोड ऊत्तर दिलं असत तर बऱ्याच गोष्टी रोखता आल्या असत्या मला...प्रत्येक वेळी उलट उत्तर देणं चुकीचं आहे पण प्रत्येक वेळी ऐकून घेणं ही चुकीचंच आहे, त्यामुळे कधी कधी स्वतःच अस्तित्व आहे हे सिद्ध करण्यासाठी समोरच्याला त्याच्या भाषेत उत्तर देणं ही गरजेचं होऊन जातं...ही गोष्ट मला खुप उशिरा कळाली...पण त्यावेळी बाबांना हेच वाटलं की माझ्या छोट्याश्या चुकीमुळे त्यांना विक्रम आणि त्याच्या घरच्यांसमोर मान खाली घालावी लागली...

एखाद्या व्यक्तीला कस ओळखावं? तर तो समोरच्याला कस वागणूक देतो त्यावरून... विक्रमला ओळखण्यासाठी असे बरेच प्रसंग येऊन गेले पण मी त्याकडे दुर्लक्ष केले...हां, आईला एक दोनदा सांगायचा प्रयत्न केला तर उत्तर मिळालं की तो तापसी स्वभावाचा असेल तर आपण शांत राहावं...होणारा नवरा आहे त्याला उलटून बोलू नये, त्याचा आदर करावा, आणि लग्नानंतर बदलतात पुरुष, मुलीच्या जातीने संयमी राहावं, जबाबदारी ने वागावं...बाबांनाही हेच वाटायचं की माझं लग्न होणार आहे थोड्या दिवसांत तरी मला जबाबदारीने वागता येत नाही...हो, बरोबर.. मुलीच्या जातीने संयमी राहावं....पण जर तो संयम तिच्या जीवावर उठत असेल तर काय करावं हे नाही सांगत कोणी आणि यामुळेच जेंव्हा त्या संयमाचा अंत होतो तेंव्हा एकतर संसार तुटतो किंवा ती मुलगी अस्तित्व हरवून बसते...माझ्याबाबतीत दोन्हीही झालं होतं..पण आयुष्याने मला दुसरी संधी दिली होती स्वतःला सिद्ध करण्याची...प्रत्येकाला ही दुसरी संधी मिळेलच अस नाही ना...

आणि काय म्हणतात, लग्नानंतर पुरुष बदलतात, त्यांना जबाबदारी ची जाणीव होते, ते संयमी बनतात...मग जर पुरुषांना लग्नानंतरच जबाबदार बनण्याची संधी मिळते तर मुलींना का मिळत नाही? का मुलींना वयात आल्यापासूनच तिला काय करावं, कस राहावं हे शिकवल्या जातं? आणि जर मुलींना हे सगळं ज्ञान देणं संस्काराचा भाग आहे तर हे संस्कार मुलांसाठी का नाही लागू होत...की त्यांना मुलगा असण्याची सवलत असते ती? आणि ह्या सगळ्या सवलती देऊन लग्नानंतर मुलगा सुधरून जाईल अशी धारणा का असते?...लग्न हे काय 'ट्रायल अँड एरर सिस्टिम' नाही की सुधारला तर ठीक नाहीतर सोडून द्यावं किंवा बदलून घ्यावं...मुलांना सुधारण्याची जबाबदारी मुलीची नाही, मुलांना आणि मुलींना सारखी वागणुक देणं ही पालकांची जबाबदारी आहे...

-----------------------------------------------------------------
विक्रम ट्रेनिंगला निघून गेला आणि मी माझ्या कॉलेज आणि अभ्यासात हे विसरून जायची की काही दिवसांनी माझं लग्न होणार आहे, खर तर विसरायची नाही पण तो विचार मी मनात आणायची नाही...विक्रम खूप व्यस्त झाला होता त्यामुळे खूप कमी वेळा त्याचे फोन यायचे मला, आणि मी सुध्दा स्वतःहून त्याला बोलण्याचे प्रयत्न केले नाही...विक्रमचं फेज-1 च ट्रेनिंग संपलं होतं त्यामुळे काही दिवसांची सुट्टी भेटली होती त्याला...एका दिवशी त्याने मला फोन करून तयार राहायला सांगितलं, त्याच्या मित्राच्या लग्नाला जायचं होतं.... लग्न नागपुरात होतं त्यामुळे बाबांनी मला पाठवलं विक्रमसोबत.. खुप दिवसांनी माझी आणि विक्रमची भेट होत होती, तो जायच्या आधी जो काही प्रसंग घडला होता त्यामुळे मला विक्रमसोबत कसं वागावं याची भीतीच वाटत होती...त्यामुळे मी त्याच्यासोबत जायला तर निघाली पण गाडीत एक शब्दही त्याला बोलली नाही, भयाण शांतता होती आमच्या मधात..,
"काय झालं? एवढ्या दिवसांनी भेटलो आहे आपण काही बोलायचं नाही आहे का?" विक्रमने गाडी थांबवली आणि मला विचारलं,

"काही नाही, बोलत तर आहे ना..." मी त्याच्याकडे न बघताच उत्तर दिलं,
"नाही...तू बोलत नाही आहेस, मी जे प्रश्न विचारत आहे त्याच फक्त मान हलवून उत्तर देत आहेस..अशी तर नव्हती तू लहानपणी, तुझ्या मावशीकडे यायची तेंव्हा किती बडबड करायचीस.. खूप बदलल्यासारखी वाटत आहेस..."

"लहानपणी तुम्ही पण तर असे नव्हते ना, तुम्हीही फार बदलले.."
मी नकळत बोलून गेली,

"ओहह, आता लक्षात आलं, मागे जे काही झालं त्यामुळे अजूनही रागवली आहेस...हे बघ नैना, आपण लहानपणापासून जरी एकमेकांना ओळखत असू तरी आता तू माझी होणारी बायको आहेस, आणि जर तुझे कुठे चुकत असेल तर मी तुला समज द्यायलाच पाहिजे ना, आणि चुकीच काय बोललो मी? तुला नाही वाटत का तू तुझ्या नवऱ्याचा मान राखावा?"

"हो ते बरोबर आहे, पण तुम्ही ती गोष्ट प्रेमानेही सांगू शकले असते, माझा राग बाबांवर का काढला..."

"हे बघ मला राग जरा जास्तच येतो, त्यामुळे तूच सांभाळायचं आता मला...त्यासाठी बोलतो ना मला जे आवडत नाही ते तू करू नकोस..."

"हम्मम...आणि माझ्या आवडीनिवडी त्याच काय??"

"हो बाई ठीक आहे, आपण एकमेकांच्या आवडीनिवडी जपू..ठीक आहे, आता मूड चांगला कर, एक तर मी आधीच खूप दिवसांनी तुला पाहत आहे, जरा चेहरा खुललेला ठेव, मलाही बरं वाटेल.."

विक्रम अस बोलल्यावर मलाही ठीक बर वाटल, मी पण विचार केला की रागीट स्वभाव जरी असला विक्रमचा तरी राग शांत झाल्यावर तो मला समजून तरी घेतो आहे, त्यामुळे त्याला जे आवडत नाही ते मी करायचंच नाही..मी जर त्याच्या गोष्टी जपल्या तर तो माझाही विचार करेल, माझ्याही गोष्टींना प्राधान्य देईल आणि त्यामुळे जस विक्रम बोलेल तस मी वागायचं ठरवलं, त्याला जस आवडेल तस मी राहायचा विचार केला, पण माझा हा बदल माझं अस्तित्व हरवण्यासाठी खूप जबाबदार ठरला...

मी आणि विक्रम लग्नाच्या ठिकाणी पोहोचलो, विक्रमचे सगळे मित्र त्यांच्या परिवारासोबत तिथे होते, पण माझ्यासाठी ते सगळे अनोळखी होते, आणि त्यामुळे मला खूप अवघडल्यासारखे होत होते, आणि त्यात माझा स्वभाव असा की अनोळखी लोकांसोबत बोलायला मला थोडा वेळ लागतो...विक्रमने माझी ओळख करून दिली सगळ्यांसोबात, आणि तोही होताच त्यामुळे थोड बरं वाटलं...तिथे कोणीही मला असं भासवू दिल नाही की मी पहिल्यांदा भेटत आहे, त्यामुळे मी सुद्धा खुलली त्यांच्यात...

विक्रमच्या मित्रांनी त्याला आमच्या भेटीबद्दल, आमचं लग्न कस जुळलं याबद्दल विचारलं, तो ही आनंदाने सगळं सांगत होता...त्याची फेज-१ ची ट्रेनिंग किती छान झाली आणि त्यात तो किती सरस होता हे ऐकून मलाही खूप अभिमान वाटत होता त्याचा...कोणीतरी मला माझ्या शिक्षणाबद्दल आणि माझ्या करिअर बद्दल विचारलं तर मी पण मोकळेपणाने सांगितलं की मी सुद्धा पदवी पूर्ण करून विक्रमसारखं काहीतरी बनेल...आणि मी हे बोलताच विक्रम हसायला लागला, मला बोलला,

"नैना, तू ना फक्त शिक्षण पूर्ण कर आणि मला सांभाळ, तेच खूप झालं तुझ्यासाठी, तुझ्यासारख्या रडक्या मुली कुठे प्रशासन सांभाळतील, तू माझं घर सांभाळलं तरी भरपूर आहे माझ्यासाठी.."

"का? मी ठरवलं तर मी ही करू शकते ना, जर घर सांभाळू शकते तर प्रशासन सांभाळणे ही शिकूनच जाईल..."

"वा.. मानलं पाहिजे हां वहिनी तुम्हाला, विक्रमला बरोबर उत्तर देता येत तुम्हाला...शेरास सव्वाशेर भेटतेच हे नक्की.." विक्रमचा एक मित्र हसत हसत बोलला... पण हा मजाक मात्र विक्रमच्या जिव्हारी लागला, त्याला ते रुचल नाही, तो बोलला,

"काही सव्वाशेर नाही ती, एकदा लग्न होऊ दे तिला कशी गाय बनवून ठेवतो मी ते बघा मग...चला उशीर होतोय आम्हाला निघतो आम्ही.. "

आम्ही निघालो तिथून पण मला खूप अपमानीत झाल्यासारख वाटलं, राहून राहून माझ्या मनात एकच प्रश्न येत होता की माझी काय किंमत आहे विक्रमच्या नजरेत, त्याला जस हवं तसं मी वागायला तयार आहे तरी माझी एक अपेक्षा त्याने ऐकूनही घेऊ नये का? खरच हे लग्न करणं इतकं महत्त्वाच आहे का माझ्यासाठी? याच विचारात आम्ही घरी कधी पोहोचलो कळलं नाही, मी गाडीतून उतरणार तर विक्रमने माझा हात पकडला आणि मला थांबवलं, मला बोलला,
"हे बघ नैना, आज पहिल्यांदा मी तुला कुठे घेऊन गेलो होतो त्यामुळे माफ करतो, पण यानंतर माझ्या उत्तरास उत्तर देऊन तू माझ्यापेक्षा वरचढ आहेस हे दाखवून देण्याची अजिबात हिम्मत करायची नाही, मी जस सांगेल तस तुला वागावं लागेल, आणि हो..माझ्याशी लग्न करून तुला कोणतीच कमतरता भासणार नाही त्यामुळे तुला पैसे कमवायची चिंता करायची गरज नाही...हे शिकायचं आहे, नोकरी करायची आहे हे सगळे भूत आताच डोक्यातून काढून फेक..."

विक्रम कितीही हुशार असला तरी त्याचा हा अहंकार मला सहन होत नव्हता, राग खूप येत होता त्याचा पण जर मी काही बोलली असती तर त्याच्या रागाचा ज्वालामुखी माझ्यावर आणि माझ्या घरच्यांवर फुटला असता त्यामुळे मी गप्प राहणं पसंत केलं...पण त्याप्रसंगानंतर माझ्यावरच दडपण अजूनच वाढलं, जेंव्हा जेंव्हा विक्रम मला भेटायचा, बोलायचा किंवा त्याच्या घरचे मला भेटायचे, पोटात भीतीचा गोळा निर्माण व्हायचा...लग्न ठरवताना सगळे सूचना द्यायला तयार होतात मुलींना की तिने सासरी कस वागावं किंवा कस नाही पण तिच्या मनाची घालमेल मात्र कोणीच समजून घेत नाही... आपलं घर सोडून दुसऱ्या घरी जाणं आणि तेही आयुष्यभरासाठी हे वाटतं तितकं सोप्प नसतं, पण मुलींना लहानपणापासूनच तयार केलं जातं, त्यांची ही मानसिकता बनवून दिली जाते की ती परक्याचं धन आहे...आणि यामुळेच मी बाबांना काही बोलायची हिम्मत केली नाही किंवा विक्रमला उत्तर देण्याची हिम्मत केली नाही, पण माझं गप्प राहणं माझ्यासाठी किती चुकीचं आहे हे मला लग्नानंतर कळाल....
--------------------------------------------------------------

क्रमशः