Ardhantar - 7 in Marathi Moral Stories by अनु... books and stories PDF | अधांतर - ७

Featured Books
Categories
Share

अधांतर - ७

अधांतर-७

सच्चा दिल ही जाने,
सादगी की अहमियत
ठगणे वाला क्या जाने,
प्यार की मासुमियत


श्रीकृष्ण म्हणतात," शौर्याने जेंव्हा तुम्ही प्रेम मिळवता तेंव्हा ते त्या प्रेमाच अपहरण असतं आणि जेंव्हा प्रेमाने शौर्य मिळवता तेंव्हा ते खरं जिंकणं असतं..." खर आहे....चालकीने तुम्ही थोड्या वेळासाठी कोणाला आकर्षित करू शकता, फार फार तर मोहात पाडू शकता, परंतु कोणाला आपल्या प्रेमात पाडण्यासाठी तुम्हाला सहज आणि सरळ राहावं लागतं...काय म्हणतात ते 'डाऊन टू अर्थ' अगदी तसचं....पण आजकाल प्रत्येक मुलाला हे वाटतं की जर तो चांगला कमवणारा असेल, मोठ्या पदावर काम करणारा असेल, त्याच्याकडे चांगली धन संपत्ति असेल तर त्याला कोणतीही मुलगी मिळू शकते किंवा तो मिळवू शकतो...थोड्या बहोत प्रमाणात मुलींच्या बाबतीत ही तेच आहे, त्यांना वाटतं जर त्यांच्याकडे सौंदर्यासोबत बुद्धिमत्ता असेल तर त्यांना लग्नाच्या बाजारात कोणीही नाकारू शकत नाही...आपला समाजही ही भावना दृढ करत जातो, आणि यातून सुरू होतो जुगार...लग्नाचा जुगार...या जुगारात हेच पाहिलं जातं की मुलगा किंवा मुलीचं 'सोशल स्टेटस' काय आहे..मुलींच्या बाबतीत या जुगारात बहुतांश आईवडील हेच पाहतात की मुलगा किती शिकलेला आहे, किती चांगली त्याची नोकरी आहे, त्याच्याकडे किती मोठा 'बँक बेलन्स' आहे... या सगळ्या बाबी 'जोड्या स्वर्गात बनतात' ही गोष्ट फोल ठरवतात कारण याच गोष्टींना प्राथमिक रित्या प्राधान्य दिलं जात...पण काय याच गोष्टी महत्त्वाच्या असल्या पाहिजे लग्नासाठी?? माहीत नाही....असं वाटतं ते पुर्णतः चुकीचंही नाही पण ते सर्वस्वी बरोबर ही आहे हे कोणतेच पालक छातीठोकपणे सांगू शकत नाही...

माझ्यासाठी पण हाच विचार केला असावा माझ्या घरच्यांनी कदाचित....आपल्या मुलीच भविष्य सुखी असावं हा विचार चुकीचा नाही पण फक्त जर अश्या मापदंडात ते भविष्य आकाराला येत असेल तर ते बरोबर नाही...बहुतांश पालकांना वाटत की त्यांच्या मुलांचं भविष्य खूप सुखी असावं त्यासाठी ते आपल्या मुलांना प्रत्येक संकटांपासून वाचवतात, प्रत्येक अडचणींपासून लांब ठेवतात पण काय खरंच अस केल्याने ते मुलांचं भविष्य घडवत असतात?? अजिबात नाही, उलट ते मुलांना कमकुवत बनवत असतात...जर मुलांच्या भविष्याला खरच आकार द्यायचा असेल तर त्यांना संकटांपासून वाचवण्यापेक्षा त्यांचा सामना करायला शिकवलं गेलं पाहिजे...

माझं पण संगोपन याचप्रकारे झालं, आणि त्यात एक मुलगी म्हणून तर अगदी शिस्तबद्ध (जे मुलींसाठी असते फक्त) वातावरणात वाढली मी...वयात आल्यापासून कुठे एकटी गेली असेल हे मला तरी अजून आठवत नाही...कुठे ही ने-आन करण्यासाठी भाऊ किंवा बाबा हमखास सोबत असायचे, कधी चुकून मैत्रिणींसोबत बाहेर गेली अन घरी यायला थोडा जरी उशीर झाला तरी माझा प्रश्नांचा तास सुरू व्हायचा... एखादा मुलगा माझा मित्र असेल हे मला आठवत नाही, विक्रम तेवढा (फक्त) ओळखीचा होता...अभ्यासात आधीपासूनच मी खूप हुशार, सतत नवीन काहीतरी शिकण्याची आवड मला...बाहेर जावं, सगळ्यांच नावलौकिक व्हावं अस काहीतरी करावं हे नेहमी वाटायचं... पण बाहेरचं विश्व मुलींसाठी चांगलं नाही म्हणून कधी मला कुठे जाऊच दिल्या गेलं नाही...ते बरोबर ही असेल माझ्या काळजीच्या दृष्टीने, पण मला अस वाटत मला फक्त नाण्याची एकच बाजू दाखवण्यात आली...जग कोणावरही विश्वास ठेवण्यासारखं नाही हे तर सांगितल्या गेलं मला, पण या वाईट गोष्टींचा प्रतिकार, आणि वेळ प्रसंगी सामना करण्याची ताकत माझ्यात आहे याची जाणीव ना मी करून घेतली ना मला कोणी करवून दिली...यामुळे मला असं वाटत गेलं की असंच असावं मुलींचं आयुष्य कदाचित, म्हणून खूप काही करण्याची ईच्छा असूनही मी कोणत्या गोष्टीसाठी हट्ट केलाच नाही.....

पण आज जेंव्हा विक्रमने मला लग्नाची मागणी घातली कुठेतरी सुप्त मनातून आवाज आला की स्वतःच अस्तित्व निर्माण करायला पाहिजे....मला कॅफेतून तातडीने घरी निघावं वाटत होतं पण आज अचानक समोर आलेल्या परिस्थितीमुळे मल दोन किलोमीटर अंतर कापण्याचा ही आत्मविश्वास राहिला नव्हता, मला मात्र मी कधी एकदा घर गाठते आणि आई बाबांना बोलते अस झालं होतं...

"मी घरी सोडतो तुला, तुझ्या घरी माहीत आहे तू माझ्याबरोबर आली आहेस ते, त्यामुळे तू माझी जबाबदारी आहेस..."
विक्रम बोलला आणि नाईलाजास्तव मला त्याच्या बरोबर जावं लागलं...
आणि काय बोलला तो त्याची जबाबदारी... हं.. जबाबदारीच्या नावाखाली मला त्याने सोन्याचा पिंजरा दिला, वरवर पाहता मला त्या सोन्याची चकाकी खूपच मोहित करून गेली पण आतमध्ये शिरल्यावर कळलं की माझे तर होते नव्हते तेही पंख छाटून टाकले आहेत....

आम्ही घरी पोहोचल्यावर मी कधी बोलते अस झालं होतं पण आई बाबा विक्रमच्या आदर सत्कारात मग्न होते, थोड्या वेळाने विक्रम निघून गेला...माझे संयम ही सुटले आणि मी बोलली,
"बाबा..मला न विचारता एवढा मोठा निर्णय माझ्या बाबतीत का घेतला तुम्ही..?"
मी पहिल्यांदा बाबांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते, बाबांना ते रुचल नाही,

"आमच्यापेक्षा जास्त कळत का तुला? आणि तुला काय विचारायचं, तुझ्यासाठी कधी चुकीचे निर्णय घेतले का आम्ही? आज एवढी मोठी झाली तू की आम्हाला प्रश्न विचारायला लागली"

"तस नाही बाबा, पण हे लग्न आहे, आणि माझ अजून शिक्षण पूर्ण झालं नाही, मला पण काहीतरी करायचं आहे बाबा, त्यासाठी वेळ हवा मला...आणि विक्रमला मी ओळखते तरी किती? खूप घाईत होत आहे असं मला वाटते.."

"शिक्षण घेऊन कोणती कलेक्टर होऊन जाणार आहे तू? नावाला पदवी पाहिजे ना तुला, ती लग्नानंतर ही मिळून जाईल...आणि विक्रमला किती वर्षे पाहत आलो आहे मी, एवढा अधिकारी झाला आहे, कोणीही मिळू शकते त्याला पण त्याने तुला मागणी घातली आहे, नशीब चांगलं समज तुझं...आता यावर मला एक शब्दही बोलायचा नाही, पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे...लागा तयारीला..."

बाबांच्या सर्वोच्च न्यायालयात माझा निर्णय लागला होता...त्यांचे उद्देश माझ्या भविष्यासाठी चुकीचे कधीच नव्हते पण त्यांचे काही निर्णय चुकीचे ही असू शकतात हे त्यांना मान्य नव्हतं....काय बोलले बाबा, शिक्षण घेऊन मी काय कलेक्टर होईल का?? आता त्यांना कळलंच असेल मी काय झाली आहे, पण दाखवणार नाहीत..कदाचित ही संधी मला आधी दिली असती तर आज चित्र वेगळं असतं....
---------------------------------------------------------------
मनात तर खूप वादळ उठत होते, मनाची चलबिचल काही केल्या थांबत नव्हती, फार अशांत मनाने बाबांचा निर्णय मान्य केला होता...पण एक मन सांगत होत, विक्रमला लहानपणापासून पाहत आली आहे मी, त्याच कर्तृत्व मला सांगत होत की बाबांची निवड चुकीची नाही...त्यामुळे मी पण निमूटपणे ते मान्य केलं...

विक्रमला ट्रेनिंग साठी निघायचं होत त्यामुळे साखरपुडा लवकर करायचा ठरला, मोजून पाच सहा दिवस होते हातात...माझी नाराजी असली तरी आई बाबांच्या चेहऱ्यावरच आनंद पाहून मला समाधान मिळत होत...एवढा कमी वेळ होता तरिही कोणत्याच प्रकारची कमी या साखरपुढ्यात राहू नये म्हणून बाबा खर्चाचा काही विचारच करत नव्हते...पण मला मात्र ते खर्च माझ्या वरच ओझं वाटत होतं... मुलीच्या लग्नावेळी तिच्या घरच्यांवर जितकं दडपण असत त्यापेक्षा जास्त त्या मुलीवर असत...आपल्या कडे विनाकारण लग्नकार्यात ऐपतीपेक्षा जास्त खर्च केला जातो... आता त्याची कारण भरपूर असतात, एक तर मुलगा चांगला (म्हणजे चांगल्या घरातला, चांगला कमवणारा एवढंच) म्हणून त्याच्या घरच्याप्रमाणे प्रमाणे खर्च होतो आणि दुसरी गोष्ट समाजाला आणि नातेवाईकांना दाखवण्यासाठी... मला मात्र ते अजीबातही पटत नव्हतं, पण ते पटवून घ्यावं लागतं होतं....

बघता बघता साखरपुड्याचा दिवस उजाडला... विक्रमच्या घरच्यांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळी सोय बाबांने केली होती...मी एक दोन वेळेस बाबांना अवास्तव खर्च टाळण्यासाठी बोलली ही पण त्यांना वाटायचं की मला समज नाही, त्यांच्याप्रमाणे नाते संबंध बनताना एकमेकांची मन सांभाळावी लागतात, पण इथे तर मला हे दिसत होतं की बाबा फक्त त्यांच्या मनाचा विचार करत आहेत...

साखरपुडा झाला आणि माझ्या घरच्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही...त्यादिवशी माझ्या आयुष्यातला एवढा मोठा क्षण होता पण मी माझ्या मनातून आनंद का निघत नव्हता काय माहीत...एकदा सगळ्यांवर नजत टाकली, खूप खुश होते सगळे, मला वाटलं कदाचित हे सगळं खूप लवकर होत आहे त्यामुळे मला स्वीकार करायला जड जात आहे....एक नजर विक्रमवर टाकली तर त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता...त्याला पाहतांना हे जाणवलं की काय कमी आहे विक्रममध्ये जे मला त्याचा स्वीकार करताना एवढं जड जात आहे? ओळखीतला आहे, देखणा आहे, एवढा अधिकारी आहे, आणि माझ्या शिक्षणात ही काही अडचण निर्माण नाही करत आहे...प्रत्येक मुलीला हेच तर पाहिजे असतं...'परफेक्ट मॅरेज मटेरियल'...विक्रमला जाणवलं माझं त्याला बघणं, मी लगेच नजर चोरली, अशी स्पंदने मी पहिल्यांदाच अनुभवत होती... काहीवेळाने विक्रमने माझ्या मोबाईल वर मेसेज केला, त्याला मला भेटायचं होत, त्यामुळे तो मला बाहेर बोलवत होता...

"काय झालं? तु खुश नाहीस का?"
मी बाहेर गेल्यावर विक्रमचा मला प्रश्न...

"नाही, अस काही नाही..." मी नजर चोरत बोलली,

"नैना, मला माहित आहे तुला हे सगळं खूप घाईत झल्यासारखं वाटत असेल, पण विश्वास ठेव माझ्यावर, तुला जस पाहिजे तस तुझं आयुष्य जगता येईल, माझी कोणतीच बंधन नसतील तुला..तू तुझ्या मनातलं काहीही कधीही सांगू शकते मला, कोणत्याच प्रकारचा तिढा मनात नको आणुस, सांग मला काय प्रॉब्लेम आहे.."
माझा हात हातात घेत विक्रम बोलला...कॅफेमध्ये भेटलेला विक्रम आणि हा विक्रम खूप वेगळे होते...आता ज्या प्रकारे विक्रम मला आश्वस्त करत होता मला वाटत होतं मी चुकीचा विचार केला त्याच्याबद्दल, मला वाटत होतं सांगावं त्याला माझी चलबिचल...

"विक्रम, मला बोलायचं आहे तुमच्याशी...म्हणजे मला हे सगळं मान्य आहे, पण मला अजून शिकायचं आहे, जॉब करायचा आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे...आणि मला..."
माझं बोलणं पूर्ण व्हायचा आतच विक्रम बोलला,

"बस एवढंच ना?? त्यात काय एवढा विचार करायचा, मी बोललो ना तुला, दोन वर्षे माझं ट्रेनिंग आहे तोपर्यंत आपण लग्न करणार नाही, मग यावेळेत तुझी पदवी पूर्ण होऊन जाईल...आणि त्यांनंतर तुला जे करायचं ते कर मग...माझी काहीच अडचण नाही.."

विक्रम अस बोलल्यावर माझा आत्मविश्वास वाढला, माझा त्याच्यावरचा विश्वास दृढ झाला होता कदाचीत, मी त्याला साखरपुड्याच्या खर्चाविषयी, बाबांच्या आर्थिक ओढतांनी विषयी पण सांगितलं, त्यावर त्याने मला वचन दिलं की लग्नात ही वेळ येणार नाही...माझा विक्रमवरचा विश्वास आणि आदर दोन्ही वाढला...मला खात्री पटली की माझ्या मनाची अवस्था केवळ माझे भ्रम होते...विक्रमपेक्षा चांगला जोडीदार मला भेटनारच नाही हे मी माझ्या मनाला पटवून दिलं....मला अंदाज आला होता की माझं भविष्य विक्रमसोबत नक्कीच चांगलं असेल...

पण अंदाजावरून स्वप्नांचं घर बांधणं बरोबर आहे का? आणि अस स्वप्न ज्यावर आपलं सगळं आयुष्य अवलंबून आहे...पण मी तर ते धाडस केलं होतं, कारण माझ्या घरच्यांना तर 'परफेक्ट मॅरेज मटेरिअल' भेटल होत ना...भौतिक सुखं जास्त महत्त्वाचे वाटतात आपल्याला आजकाल आणि त्याचाच विचार करून लग्नगाठ बांधली जाते...पण हे खूप उशिराने कळतं की पैसा सगळं काही देऊ शकतो पण सुख तेवढं देऊ शकत नाही, आणि सुख असत कश्यात...तर ते असतं समाधानात...समाधान केंव्हा असत जेंव्हा नात्यात बांधल्या गेलेल्या दोन लोकांना एकमेकांविषयी आदर असतो...मी विक्रमचा खूप आदर केला, त्याला खूप मान दिला आणि एवढा मान दिला की पदोपदी तो मला अपमानित करत असूनही त्याचा विरोध करू शकली नाही...

-------------------------------------------------------------
क्रमशः