Shevtacha Kshan in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | शेवटचा क्षण - भाग 24

Featured Books
Categories
Share

शेवटचा क्षण - भाग 24



गार्गीने जेवण केलेलं नव्हतं म्हणून गौरवाने स्वतःच तिला भरवलं.. थोडावेळ tv बघून दोघेही झोपी गेले आज गार्गीला खूप मोकळं वाटत होतं त्यामुळे गौरवच्या कुशीत तीला लगेच शांत झोप लागली पण आज गौरव मात्र जागी होता..त्याला प्रतीकच बोलणं आठवत होतं..


आज तो गार्गीला न सांगता ऑफीसमधून लवकर निघून परस्पर प्रतिकला भेटायला गेला होता.. त्याच्या मनातल्या शंकांचे निरसन करण्यासाठी आणि आणखी काही प्रश्न त्याला प्रत्यक्षात विचारण्यासाठी..लग्नात ओळख झालीच होती प्रतिकची आणि गौरवची तशी.. ते दोघेही एका हॉटेलमध्ये कॉफी प्यायला भेटले.. गौरवने गार्गीबद्दल महत्वाचं बोलायचं आहे असं म्हंटल्यामुळे प्रतीक सगळं सोडून आधीच दिलेल्या पत्त्यावर येऊन गौरवची वाट बघत होता.. 5 मिनिटं झाले असतील तेवढ्यात गौरवही तिथे आला..

गौरव - हॅलो, प्रतीक.. लवकर आलास, सॉरी तुला माझी वाट बघावी लागली..

प्रतीक - ठीक आहे रे काही हरकत नाही.. तू डायरेक्ट आलास का ऑफिस मधून??

गौरव - हो अरे.. गार्गीला सांगितलं नाहीय मी तुला भेटणार आहे ते..

प्रतीक - काय झालं?? काय महत्वाचं बोलायचं होतं ??

गौरव - हो, बोलायचंच आहे पण आधी काहीतरी मागऊयात, नाहीतर हे आपल्याला इथे अस बसू देणार नाहीत..

थोडं हसूनच गौरव बोलला..

प्रतीक - मला साधी कॉफी..

गौरव - ओके.. आलोच

गौरवने दोघनसाठीही साधी कॉफीची ऑर्डर दिली.. कॉफी यायला वेळ होता तोपर्यंत गौरवने प्रतिकची जुजबी चौकशी करून घेतली.. म्हणजे तो सद्धे काय करतो?? पुढे काय करायचं विचार आहे?? लग्न कधी करणार आहे?? वगैरे अस बरच काही.. प्रतिकनेही त्याची प्रामाणिक उत्तरं दिलीत.. बोलता बोलता गौरवने त्याचा फोनही बंद केला कारण कुणाचा फोन आला तर त्यांचं बोलणं मधातच अर्धवट राहायला नको म्हणून..

कॉफी आली.. दोघांनीही आपले कप घेत एक एक घोट घेतला आणि त्याबरोबरच गौरवने आता मुद्द्याला हात घातला..

गौरव - प्रतीक , तुला मला काही विचारायचं होतं?? आशा आहे तू सगळं खरं सांगशील..

प्रतीक - नक्कीच!! विचार ..

गौरव - मला गार्गीने तुझ्या आणि तिच्या नात्याबद्दल सगळं सांगितलं.. तुमचं एकमेकांवर खूप प्रेम होत पण काही कारणास्तव तू तिला तुझ्यापासून वेगळं केलंस.. तू तिच्या सुखासाठी तिला दूर केलंस.. वगैरे सगळंच.. तुमचं एकमेकांवर किती प्रेम होतं तेही सगळं काही तिने सांगितलं..

प्रतीक - ओहह.. तिने सांगितलं म्हणजे काहीतरी विचार करूनच सांगितलं असणार.. मग?? माझ्याकडून काय जाणून घ्यायचं आहे तुला??

गौरव - तिच्या बोलण्यातून मला वाटलं की ती आजही तुझ्यावर प्रेम करते, मला तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, तुझ्या मनात तिच्याबद्दल काय भावना आहेत??

प्रतीक - गौरव , अरे कुणी आपल्या बायकोच्या जुन्या प्रियकराला अस विचारतं का??

गौरव - हो मी विचारतो.. मला खर खर सांग प्रतीक , तुला ती आजही आवडते का??

प्रतीक - मी माझ्या भावना सांगुन काय होणार आहे गौरव?? तीच लग्न झालंय तुझ्याशी..

गौरव - ते सगळं विसर ..थोडावेळासाठी मी तिचा नवरा आहे हे ही विसर आणि मला सांग.. तू आजही प्रेम करतो का तिच्यावर??

प्रतीक - गौरव , ती माझं पाहिलं आणि आतापर्यंतच एकमेव प्रेम आहे .. मधात किती काळ आम्ही बोलत नव्हतो तरीही तिच्याबद्दलच्या माझ्या मनातल्या भावना मिटल्या नाहीत आणि त्या कधी मिटणारही नाहीत.. पण माझ्या या भावना तुमच्या दोघांमध्ये कधीच येणार नाहीत याची मी तुला शाश्वती देतो..

गौरव - प्रतीक तुला नोकरी असती तर गार्गीला तू तुझी बनवलं असतं का??

प्रतीक - जे शक्य झालंच नाही त्या जर तर च्या गोष्टी का करायच्या आपण गौरव!!.. तू भूतकाळातल्या गोष्टी का घेऊन बसला आहेस.. अरे तुझं नशीब किती चांगलं आहे की तुला तुझ प्रेम, तुझी गार्गी मिळाली.. मग या निरर्थक गोष्टीचा तपास काढायचा प्रयत्न का करतोय तू??

गौरव - जे शक्य झालं नाही आणि भूतकाळात मोडलं, बरच काही चुकीचं घडलं, दोन प्रेम करणारी मने परिस्थितीमुळे दुरावलीत.. मी प्रयत्न करू पाहतोय जे चुकीचं घडलं ते दुरुस्त करता येईल का??

प्रतीक - काssय? म्हणजे??

गौरव - प्रतीक , मला वाटतं गार्गीच प्रेम तू आहेस मी नाही माझ्या याबरोबर ती फक्त एक तडजोड किंवा कर्तव्य म्हणून राहतेय की काय... म्हणून तीच प्रेम तिला परत करता येईल का हा प्रयत्न करतोय मी..

प्रतीक - वेडा आहेस का तू गौरव?? काय बोलतोयस?? अरे ती तुझ्या बरोबर खूप सुखात आहे.. तू तिच्याशी बोलला का?? नक्कीच नसशील बोलला.. कारण बोलला असतास तर आज हे अस माझ्याकडे बोललाच नसता.. तुला अस का वाटत ती तुझ्याबरोबर राहून तडजोड करतेय.. अरे तस काहीच नाहीय मी खात्रीने सांगू शकतो.. गौरव मी तीच पाहिलं प्रेम आहे पण मीच तीच प्रेम आहे असं नाहीये.. अरे ती तुझ्यासुद्धा प्रेमात पडलीय.. ती खूप आनंदी आहे तुझ्यासोबत.. तू तिच्याशी बोल एकदा.. ती पूर्णपणे तुझ्यात गुंतली आहे.. आणि हो परत माझ्याकडे येण्याचा निर्णय ती कधीच मान्य करू शकत नाही.. मी तिला चांगलं ओळखतो..

गौरव - त्यादिवशी तुझ्या आठवणींनी ती किती विचलित झाली होती हे तुला नाही माहिती पण मी तिला बघितलं तेव्हा , एवढंच नाही तर तुझ्या केवळ आठवणी मात्र नी तिला चक्क ताप भरून आला.. तीच अंग तापाने फणफणत होतं त्यादिवशी.. तूच सांग याचा काय अर्थ होतो??

प्रतीक - गौरव माझं ऐकशील का?? तू तुझ्या मनाचे अर्थ काढू नकोस , एकदा तिच्याशी सविस्तर नीट बोल.. तिची परिस्थिती आणि तीच मन हे तीच सांगू शकेल तुला.. आणि तिच्याशी बोलल्यावर मला खात्री आहे तू जे हे सगळे गैरसमज करून घेतले आहेत ते नक्की दूर होतील.. अस कुणी इतक्या टोकाची भूमिका घेत का रे? तू तर इतका समजदार आहेस ना.. अस कसं वागू शकतोस.. आणि हो गार्गी आणि मी आता फक्त चांगले मित्र असू त्यापलीकडे काहीच नाही.. आयुष्यात असे बरेच प्रसंग येतील की आम्ही एकमेकांच्या समोर येऊच, कितीही म्हंटल तरी ते आम्हाला टाळता येणार नाही, कारण आम्ही ज्या लोकांमध्ये वाढलो जे लहानपणापासून आमचे मित्र राहिले आहेत ते अजूनही आहेत आमचा ग्रुप तर तु तुमच्या लग्नात बघितलाच असेल.. तेव्हा कुठल्या कार्यात किंवा कुठल्या कार्यक्रमाला आमचा सामना होणारच अगदी.. कधीच एकमेकांशी भेटायच नाही, बोलावायचं नाही असं आम्हाला शक्य होणार नाही.. त्यामुळे माझी विनंती आहे की त्यावेळी आम्ही आमच्या मित्रांच्या ग्रुप मध्ये फक्त मित्र असू अशावेळी तू कधी तिच्यावर शंका घेऊ नकोस.. माझी आणखी एक विनंती आहे.. गौरव गार्गी खूप चांगली आणि विश्वासू मुलगी आहे तू या भूतकाळातल्या निरर्थक गोष्टींमुळे तिच्यावर असा अविश्वास दाखवून तिला दुखवू नकोस प्लीज.. तिने तुला आमच्या बद्दल सांगितलं याचा अर्थ नक्कीच तू समजून घेशील या भल्या मोठ्या विश्वासाखातरच सांगितलं असावं.. माझ्या आठवणींनी ती काही वेळेपूर्ती सैरभैर झाली असेल मान्य आहे मला, अरे जुन्या आठवणी निघाल्या की कुणीही त्यात थोडावेळासाठी रमतचं ना.. याचा अर्थ असा नाही की त्या विश्वात आपल्याला जगायचं असतं.. विश्वास ठेव गौरव ती फक्त तुझी आहे.. फक्त तुझी.. आणि हो तू बोलला ना तू तिला सांगून नाही आला तर आपण भेटलो हे तिला कळू देऊ नकोस प्लीज .. या गोष्टीचं तिला खूप जास्त दुःख होईल.. अ.. ( थोडं थांबून) आणखी काही विचारायचं आहे का?

गौरवने फक्त एकदा त्याच्या बोलक्या डोळ्यांत बघितलं.. त्यात सच्चेपणा त्याला दिसला.. तो काहीच बोलला नाही..

प्रतीक - मला वाटतं तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिली आहे.. माझ्या क्लास ची वेळ होतेय मी निघू का?? आणि हो तू गार्गीशी बोलून घे रे एकदा खरंच.. चल येतो मी.. भेटू नंतर पण अस नाही हं .. पुढच्यावेळी गार्गीही तुझ्या सोबत असायला हवी.. चलो, बाय.. येतो मी..

अस म्हणत हॅन्डशेक करून, थोडं स्मित करतच तो निघून गेला.. पण नंतर ही तीथेच बसून विचार करत करत गौरवने आणखी 2 कॉफी संपवल्या..




गार्गीच्या चेहऱ्याकडे बघत तो विचार करू लागला किती निरागस आणि सरळ आहे ही... प्रतिकही किती अचूक ओळखतो हिला.. त्याला हिच्या भावना कळल्या पण मी नाही समजू शकलो.. खरच काय वेड्यासारखं मी करायला जात होतो.. जाऊ दे आता नको तो विचार पुन्हा म्हणून त्याने गार्गीला आणखी जवळ घेतलं आणि तिला मिठी मारून झोपी गेला...


----------------------------------------------------------
क्रमशः