Shevtacha Kshan in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | शेवटचा क्षण - भाग 20

Featured Books
Categories
Share

शेवटचा क्षण - भाग 20

एकदा निशा ताईची मैत्रीण रेणुका ताई बद्दल प्रतिकला कळलं.. रेणुका ताईने तिच्या प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केलं.. रेणुका ताईला प्रतीक आणि गार्गी सुद्धा ओळखत होते.. हे ऐकून तर सगळ्यांना धक्काच बसला.. पण घरच्यांनी नकार दिल्यामुळे तिने अस केलं होतं.. कारण मुलाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती , जात हे सगळं रेणुका ताईच्या घराशी जुळणारं नव्हतं... म्हणून घरच्यांचा नकार होता.. पण रेणुका ताईच्या अशा वागण्यामुळे प्रतिकला त्याच्या घरच्यांची मतं समजली.. ते ही किती कट्टर जातीवादी आहेत हे तेव्हा त्याला त्यांच्या रेणुका ताईबद्दलच्या बोलण्यातून जाणवलं .. त्याच्या डोक्यात नकळत त्याचा आणि गार्गीच विचार आला..आणि त्याच्या मनात एकदम भीती दाटून आली.. 'अजून बराच वेळ आहे या सर्व गोष्टींना तोपर्यंत आपण घरच्यांची समजूत काढू आणि त्यांचे विचार बदलता येतील का ते बघुयात.'.अस म्हणत त्याने त्याच्या मनाला समजावलं..

एके दिवशी रेणुका ताई आणि निशा ताईचं एकमेकींशी फोनवर बोलणं झालं.. रेणुका ताई निशा ताईची खास मैत्रीण असल्यामुळे तिला रेणुकाला भेटवसं वाटत होतं .. ती कशी आहे हे तिला स्वतः जाऊन बघायचं होतं.. तिने प्रतिकला घेतलं आणि घरच्यांना न सांगता रेणुकाला भेटायला निघाली... रेणुकाने सांगितलेल्या पत्त्यावर निशा पोचली.. एक साधं नुसत्या विटांनी कस बस रचलेल्या घराशिवाय तिला तिथं काहीच दिसत नव्हतं.. ती इकडे तिकडे बघून रेणुकाला शोधायचा प्रयत्न करत होती तेवढ्यात त्या समोरच्या घरातून रेणुका हातात भांडी घेऊन बाहेर आली.. तिला बघून निशाला शॉकच बसला.. बंगल्यासारख्या घरात राहून आरामात जगणाऱ्या मुलीची ही अशी अवस्था बघून तीच मन दाटूुन आलं.. तिला आवाज देतंच निशा तिकडे धावतच गेली.. तिला बघून रेणुकालाही खूप आनंद झाला पण दुसऱ्याच क्षणी तो मावळला.. तिला या परिस्थितीत कुणी बघावं अस तिला कधीच वाटत नव्हतं..

रेणुका - निशा तू का आलीस इथे?? मी उगाच माझा पत्ता दिला तुला..

निशा - अग अस काय बोलतेस?? तुला भेटण्याची खूप तीव्र इच्छा झाली म्हणून आले..

रेणुका - हो पण इच्छांवर आवर घालायचा ना निशा.. अस कधीही न सांगता यायचं असत का??

खोटा रागाचा आव आणत रेणुका बोलत होती.. निशाला तीच मन कळत होतं.. प्रतीक थोडं लांबूनच दोघींकडे बघत होता..

निशा - मला माहिती आहे तू का चिढतेय.. मी तुला अस बघू नये अस तुला वाटत होतं म्हणून रागात बोलतेय ना??

रेणुकाच मन निशाने अगदी अचूक जाणलं म्हणून रेणुकाचं रागच नाटक फार काळ टिकू शकलं नाही.. आणि डोळ्यात पाणी आणत दोघी मैत्रिणींनी एकमेकींना कडाडून मिठी मारली..

रेणुका - अग पण सगळे जण माझा राग करतात आणि तू इथे आल्याचं समजलं तर ते तुला बोलतील ग उगाच..

रेणुका डोळे पुसतच बोलली..

निशा - कुणाला काही कळणार नाही आणि मी प्रतीकला घेऊन आली आहे.. बर अस बाहेरच उभं ठेवणार की आत पण बोलावणार आहेस?? खूप साऱ्या गप्पा करायच्या आहेत मला तुझ्याशी..

रेणुका - हो ये ना .. आत ये.. पण माझं हे अस छोटंस झोपड आहे .. तुला चालेल ना.. आणि प्रतीक अग त्याला पण बोलावं ..

निशा - प्रतीक!!!

प्रतिक ही त्याच्या विचारातच निशाताईसोबत आत आला..

निशा - रेणुका जीजू नाहीत का घरी??

रेणुका - नाही ग.. रोज सकाळ झाली की तो जेवण करून कामाच्या शोधासाठी बाहेर पडतो, दिवसभर फिरून फिरून थकून भागून घरी येतो.. पण किती दिवस झाले कुठलं काम मिळत नाही की कुठली नोकरी.. काय बहाणे असतात ना लोकांकडे नकार देण्याचे निशा.. साध्या कारकुणाच्या कामाला यांना पदवी असलेला मुलगा चालत नाही अग.. काहीतरी कारणं देऊन सगळीकडून फक्त नकारच मिळतो.. आणि संध्याकाळी अगदी हताश होऊन तो परततो.. काय करावं काहीच सुचत नाही ग.. घर कस चालवणार पैसे नसले तर?? निदान दोन वेळचं जेवायला मिळेल एवढं तरी मिळायला हवं ना..

निशा - म्हणजे?? रेणुका तू मला सगळं अगदी सविस्तर सांग बरं..

रेणुका - निशा मला आशिष सोबतच लग्न करायचं होतं .. तुला तर माहिती आहे ना आमचं किती प्रेम आहे एकमेकांवर.. माझ्या घरी माझ्या लग्नासाठी मुलं बघायची चर्चा सुरू होती.. म्हणून मग मी आशिष आणि माझ्याबद्दल घरी सांगितलं.. पण त्याची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नाही आमच्या घराला शोभेल अशी नाही आणि त्याची जात पण वेगळी आहे म्हणून त्यांनी मला 'आशिषशी सगळं संबंध तोडून टाकायचे आणि आम्ही म्हणू त्या मुलाशी लग्न करायचं' अशी ताकीद दिली.. एवढंच नाही तर माझं घराबाहेर जाण्यावर आणि फोन वापरण्यावर पण बंधनं घातलीत.. एक दिवस लपून मोठ्या मुश्किलने मी आशिष ला फोन केला आणि घरच्या परिस्थितीबद्दल सगळं सांगितलं.. तेव्हा त्याने मला विचारलं
"तुला काय करायचं आहे?"

मी बोलले

" तुझ्यासोबत राहायचं आहे"..

त्याने पुन्हा विचारलं

"मग आता पुढे काय करायचं?? तू म्हणशील ते करू आपण"

त्याने कुठलीच बळजबरी नाही केली ग माझ्यावर पण मी त्याच्याशिवाय नसती राहू शकले म्हणून मीच त्याला सुचवलं की "आपण पळून जाऊन लग्न करूयात.."

तो म्हंटला मला की

"मला माझ्या घरी सांगायला आणि त्यांना मनवायला थोडा वेळ दे.."

पण अग दुसऱ्या दिवशी मला बघायला एक मुलगा येणार होता आणि माझ्या घरच्यांनी मला त्याच्याच गळ्यात बांधायचा पक्का निर्धार केला होता.. म्हणून मीच म्हणाले की

"आपण आधी लग्न करू मग घरी जाऊ .. एकदा लग्न झालं की मग कोण नकार देऊच शकणार नाही.. "

आणि त्याच दिवशी मी पळून जाण्याचा प्लॅन बनवला.. आम्ही दोघांनीही टेकडीच्या गणेश मंदिरात जाऊन लग्न केलं.. आणि तसच आशिषच्या घरी गेलो पण आम्हाला बघून त्याच्या घरच्यांनी आम्हाला बाहेरच्या बाहेरच हाकलून दिलं.. त्यांनी आमच्या या नात्याला नाही स्वीकारलं, उलट त्यांच्या मुलाशीच नात तोडून टाकलं.. तेव्हा जवळ काहीच नव्हतं.. घरून निघताना थोडे पैसे सोबत आणले होते तेवढंच.. पुढे काहिदिवस दिवसागणिक काम करून पैसे मिळवले आणि त्यात कस बस घर बांधायला समान आणलं आणि तुला विश्वास बसणार नाही निशा हे आम्ही दोघांनीच आमच्या हातानी बांधलं.. तात्पुरतं, छोटासा, राहायला आसरा म्हणून..

निशा - पण रेणुका तू एकदा तुझ्या घरी विचारून बघायचस ना ग? त्यांनी केली असती काही मदत.. आणि लग्न केलं म्हंटल्यावर त्यांनी पण स्वीकारलं असत ना तुमचं नातं..

रेणुका - तुला काय वाटते निशा मी गेली नसेल?? मी गेली होती आशिष नांही म्हणत होता पण मी त्याच ना ऐकता एकटीच गेली होती.. पण मी त्यांची समाजात बदनामी केली, जाती मध्ये नाक कापलं आणि त्यांचा अपमान केला म्हणून त्यांनी मला गेट मधूनच हाकलून लावलं.. "आजपर्यंत आमची सर्वात लाडकी होती पण आता पासून तू आमच्यासाठी मेली" अस बोलून त्यांनी मला काढून दिलं.. त्यांचे शब्द तर इतके जिव्हारी लागले होते माझ्या पण माझीच चूक होती ना मग काय करणार..

हे सगळं बाजूला बसलेला प्रतिकही एकत होता.. तो सारख सारख रेणुका आणि आशिष ची परिस्थितीची तुलना त्याच्या आणि गार्गीसोबत करत होता.. त्याच्या मनात त्यादिवशी दाटून आलेल्या भीतीने पुन्हा डोकं वर काढलं आणि आपलही असच होईल का या विचाराने तो पुरता गळून गेला "आज जी रेणुका ताईची अवस्था आहे तीच उद्या गार्गीची झाली तर .. नाही नाही.. मला तिला अस अजिबात नाही बघवणार.. " या विचारांनी त्याच्या मनात खलबत माजलं होतं..

तो तसाच उठला आणि लगबगीने बाहेर आला तर बाहेर आशिष एक बाजूला बसलेला त्याला दिसला.. त्याच्या डोळे पाणावलेले होते.. त्याला अस पाहून प्रतीक आणखीच गोंधळून गेला.. मोठ्या हिम्मतीने तो आशिष जवळ गेला.. त्याला बघताच आशिष पटकन उठला आणि तोंडावर बोट ठेऊन त्याला शांत राहा म्हणून सांगितलं.. आणि त्याला घरापासून थोडं अंतर लांब घेऊन आला..

प्रतीक - काय झालं?? तुम्ही घरात का नाही आलात?? अस बाहेरच बसून का गोष्टी ऐकत होतात..

आशिष - मी आलो तेव्हा बघितलं की घरात कुणाचा तरी आवाज येतोय.. थोडं डोकावून पाहिल्यावर मला निशा दिसली.. दोघी मैत्रीणचं बोलणं सुरू होतं.. मी घरात आलो असतो तर त्यांनी त्यांचं बोलणं थांबवलं असतं.. प्रतीक लग्नानंतर पहिल्यांदा रेणुका कुणाशी अशी बोलत होती रे, तीच मन मोकळं करत होती.. इतके दिवस सगळं मनातच साठवून ठेवलं होतं तिने, माझ्यापुढे ही कधी काही बोलत नाही मला वाईट वाटेल म्हणून कदाचित.. म्हणून मी बाहेरच थांबलो..

प्रतीक - आशिष दादा.. एक विचारू?

आशिष - विचार ..

प्रतीक - तुही थोडं माझ्यासोबत मोकळेपणाने बोलशील का?? तुला अस होईल याची कल्पना होती का??

आशिष- प्रतीक अरे.. अस सगळं होणार आहे माहिती असतं ना तर मी कधीच रेणुकाशी लगन केलं नसतं, प्रेम खूप आहे रे आमचं आणि एकमेकांना समजूनही घेतो.. मी लग्नाआधी माझ्या वडिलांबरोबर त्यांच्या दुकानावर काम करत होतो त्यामुळे वेगळी नोकरी शोधण्याची मला कधी गरजच वाटली नाही.. पण त्यादिवशी मी रेणुकाशी लग्न केलं आणि घरच्यांनी मला परकं केलं .. मला खरच वाटलं होतं की ते आमचं नात स्वीकारतील, पण इतके दिवस झालेत त्यांना तर माझी आठवणही येत नाही .. असो जाऊ दे.. पण मला खूप वाईट वाटतं प्रतीक, अगदी बंगल्यासारख्या घरात राहणाऱ्या मुलीला माझ्यामुळे हे अस आयुष्य जगावं लागतंय.. आणि मी तरीही इतका हतबल आहे काहीच करू शकत नाहीय.. मी रोज नोकरी बघायची म्हणून निघतो आणि तसाच रिकाम्या हातानी घरी येतो.. जवळ काही पैसे होते आता तर तेही संपत आलेत.. काय करायचं काहीच सुचत नाही.. कधी कधी अस वाटतं उगाच मी रेणुकाशी लग्न केलं.. अरे तिच्या आईवडिलांनी शोधलेल्या मुलाबरोबर तिला असं गरिबीत तर जगावं लागलं नसतं ना..

प्रतीक - आणि मग तुमच्या प्रेमाच काय झालं असतं?

आशिष - प्रेम तर असतच रे.. ते विसरणं अवघड असतं थोडं पण अशक्य नाही ना.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नुसत्या प्रेमाने पोट भरत नाही ना.. काही दिवस माझ्याशिवाय तिला जड गेलं असतं.. पण हळूहळू तीही तिच्या संसारात रुळली असती.. आणि सुखात राहिली असती.. सगळ्याच प्रेमकथा पूर्ण होतात अस नाही ना.. तिला अस बघण्यापेक्षा दुसऱ्या कुणासोबतच पण तिच्या संसारात आनंदी बघितल असतं तर मी नेहमी समाधानीं राहिलो असतो .. तिला आता माझ्याबरोबर या सगळ्या यातना भोगताना बघून माझं मन आतून खूप तुटतं रे.. मला तिला अस पळवून आणल्याचा बरेचदा पच्छताप होतो.. पण मी तिला कधी बोलून नाही दाखवलं हे..

आशिष रडत रडतच हे सगळं प्रतिकला सांगत होता.. प्रतीकने सगळं ऐकलं पण त्याच्या मनाची अवस्था आता आशिष पेक्षाही वाईट होती..

आता दोन्ही मैत्रिनींच बोलून झालं होतं आणि आता निशाला निघाव लागणार होतं... निशाच लक्ष प्रतीक बसला होता तिकडे गेलं तो तिथे नव्हता, बाहेर असेल म्हणून दोघीही बाहेर आल्यात आणि प्रतीक आणि आशिषच बोलणं थांबलं.. आशिष शी अगदी जुजबी बोलून "काही मदत लागली आणि मी करू शकणार असेल तर नक्की सांगा" एवढं बोलून ताई आणि प्रतीक त्यांच्या घराकडे निघाले...

---------------------------------------------------------------

क्रमशः