नेहमीप्रमाणे आजही उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या होत्या आणि या सुट्यांमध्ये सगळे नेहमी एकत्र येऊन काहीतरी खेळ खेळायचे, काही जुने काही नवे.. दिवसभर घरगुती खेळ आणि संध्याकाळ झाली की मैदानी खेळ..
असच दुपारच्या वेळी गार्गी संदेश कडे गेली आणि सगळ्यांना खेळायला बोलावलं.. पल्लवी, अमित ,विवेक ,सोनू, प्रिया, गीत, प्राची पण प्रतीक आला नव्हता.. गार्गीने अमितला विचारलं
गार्गी - प्रतीक कुठंय??
अमित - तू जाते का त्याला बोलवायला, मी आवाज दिला पण तो नाही म्हंटला.. काय झालं काय माहिती..
गार्गी - नको मी नाही जात, जाऊ दे... त्याला वाटलं तर येईल नंतर..
अमित - हम्म, जाऊ दे .. चला आपण खेळ सुरू करू..
गार्गीला प्रतिकशिवाय करमतच नव्हतं, त्याच हसणं, हसवण , गंभीर परिस्थिती झाली की उगाच काहीतरी जोक करून वातावरण हलकं करणं, बाकीच्यापेक्षा तिला त्याची उणीव प्रकर्षाने जाणवू लागली.. थोडावेळ खेळून तीही उठली आणि मला झोप येत आहे बहाणा करून निघाली.. प्रतीक का आला नाही आज हा विचार तिच्या मनात आला आणि घरी न जाता प्रतीक कडे गेली..
गार्गी - प्रतीक!! प्रतीक...
दरवाजा फक्त लोटलेला होता.. ती दरवाज्याला लोटून आवाज देत देतच आत शिरलीे.. समोर प्रतीक एकटाच विडिओ गेम खेळत होता..
"प्रतीक तू का रे आला नाही आज खेळायला??"
प्रतीकने त्याचा खेळ थांबवला आणि तिच्याशी बोलू लागला.. ती आल्याचा त्याला खूप आनंद झाला होता.. कारण जी ओढ गार्गीला प्रतिकबद्दल जाणवायची तीच ओढ प्रतिक ही गार्गी साठी अनुभवत होता.. मी का नाही आलो हे विचारायला आणखी कुणी नाही पण गार्गी येईल आणि तिने यावं असं त्याला मनातून वाटत होतं.. आणि तसचं झालं, ती आली आणि तिला बघून त्याचा चेहरा खुलला.. एकटेपणामुळे कंटाळलेल्या त्याला गार्गीच्या येण्याने आनंद झाला होता..
प्रतीक - अग घरी कुणीच नाहीय आई बाबा बाहेर गेलेत आणि घर सोडून जाऊ नको म्हणून सांगितलं.. आता तुमची खेळी नेमकी आज तिकडे रंगली मग उगाच तुम्हाला इकडे तिकडे कशाला करायला लावायचं म्हणून मग मी नाही आलो.. पण तू कशी आली?? संपला का तुमचा खेळ??
गार्गी - अरे संपला नाही अजून खेळताहेत सगळे.. आज माहिती नाही मला ना खेळण्यात मजाच येत नव्हती म्हणून मग मी उठून आले.. बरं थांब एक मिनिट मी बोलावते सगळ्यांना.. तू अस आधी सांगितलं असत तर आधीच आले असते ना सगळे..
अस म्हणत गार्गी दरवाजाकडे वळली तोच प्रतिकने मागून आवाज देऊन तिला थांबवले..
प्रतीक - गार्गी थांब... अग असू दे ना खेळू दे तिकडे सगळ्यांना.. तू आलीच तर आपण दोघे इकडे काही नवीन खेळूयात.. चालेल का??
दोघचं एकटे गार्गीच्याही मनात फुलपाखरं उडलीत.. पण तसा कुठलाच भाव चेहऱ्यावर ना दाखवता..
गार्गी - ठीक आहे.. चालेल.. पण दोघांमध्ये काय खेळणार??
प्रतीक - अ.. अ.. बुद्धिबळ खेळायचा?? तुला आवडतो ना खूप !!!
गार्गी -हो चालेल.. एरवी आपण इतके सगळे असल्यामुळे हा दोन जणांचा खेळ आपल्याला तसाही खूप कमीच खेळायला मिळतो, आज आपण दोघांचं आहोत तर खेळूयात बुद्धीबळ..
ती बोलत होती तेवढया वेळात त्याने खेळ आणला..
प्रतीक - ठीक आहे.. चल नुसतं बोलत बसू नको, खेळ मांडायला मला मदत कर..
दोघांनीही पटापट खेळ रचला..
गार्गी - ए.. माझ्या पांढऱ्या, तुझ्या काळ्या..
प्रतीक - तू नेहमीच पांढऱ्या घेतेस हं..
गार्गी - हो मग मला आवडतं पहिली खेळी खेळायला आणि तुला हव्या असतील तर हा खेळ जिंकून पुढच्या खेळला तू पांढऱ्या घे.. पण जिंकला तरच मिळतील हा..
प्रतीक - तू कसली बदमाश आहे ना.. चल ठीक आहे.. नेहमीच तू जिंकतेस.. आज मी जिंकणार आहे..
गार्गी मोठ्याने हसली आणि खेळू लागली.. खेळ सुरू झाला.. आधी प्याद्यांनी आगेकूच केली, पुढे हळूहळू सैन्य बाहेर निघाली.. काही प्याद्या गार्गीच्या मारल्या गेल्यात काही प्याद्या आणि सैन्य प्रतीकच गेलं.. थोडं सैन्य कमी झालं आणि खेळ सुटसुटीत वाटू लागला.. त्यांचा खेळ आणि सोबत गमती जमती सुरुच होत्या.. बऱ्याच हत्ती, उंट, वजीराच्या उभ्या आडव्या खेळीनंतर ते एक चालीवर अडकलेत.. गार्गीची खेळी होती..
वजीराच्या मागे आडव्या रेषेत गार्गीचा राजा आणि वजीराच्या तिरप्या रेषेत प्रतिकचा राजा पण त्याच्या पुढे एक हत्ती, आणि एक घोडा होता.. प्रतिकचा तर वजीर केव्हाच गार्गीने मारला होता.. गार्गीने बराच वेळ विचार करून वजीराच्या आडव्या रेषेत दोन घर पुढे तिचा घोडा आणला.. तो घोडा प्रतीच्या हत्तीच्या सरळ रेषेत होता.. प्रतिकने कुठलाच विचार न करता सरळ त्या घोड्याला हत्तीने उडवलं.. आणि घोड्याच्या मागवर तिरपी उभी आलेल्या प्यादीने पण तीच काम चोख बजावलं आणि प्रतिकचा हत्ती घेतला.. पुढे प्रतीक पुन्हा खेळायचं म्हणून काहीतरी खेळला.. नंतर गार्गी ने प्रतिकचा घोडा घेऊन त्याच्या राजाला चेकमेट केला.. आणि प्रतीक आजही गार्गीसोबत हरला..
गार्गी बुद्धिबळ मध्ये खूपच निपुण होती.. तिला या खेळात तरी सहसा कुणी हरवू शकत नसे..
आता शेवटची चाल म्हणजे गार्गी प्रतीकचा राजा उचलून तिचा वजीर तिथे ठेवणार , गार्गीने तिचा वजीर उचलला आणि प्रतिकच्या राजा जवळ नवतच होती की प्रतिकने तिचा हात पकडला.. त्याच्या अचानक झालेल्या स्पर्शाने ती एकदम शहारली.. आणि प्रतिककडे बघू लागली.. प्रतिकही एकटक तिच्याच कडे बघत होता.. तिच्या डोळ्यात खोलवर नजर रूतवून तिच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत होता.. त्याच्या अशा बघण्याने ती मात्र बावरली.. लगेच नजर वळवून इकडे तिकडे बघू लागली.. पण प्रतीक अजूनही तिच्याकडेच बघत होता.. तिच्या हातातला वजीर तर केव्हाच गळून पडला , ती त्याच्या हातातून हात काढून घेण्याचा प्रयत्न करत होती पण प्रतिकने तो आणखीच घट्ट पकडला.. तिने त्याच्याकडे बघून त्याला हळूच हाक मारली..
गार्गी - प्रतीक!!!
तसा तो भानावर आला आणि त्याने पटकन गार्गीच हात सोडला.. डोळे उघड लाव करत.. इकडे तिकडे बघत अडखळतच बोलला
प्रतीक - अ.. अ.. ते सॉरी, अ.. सॉरी ..
त्याच्या अशा वागण्याने गार्गीच्या हृदयाची धडधड एकदम वाढली होती पण तरी स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा ती प्रयत्न करत होती.. स्वतःला शांत करण्यासाठी तिने प्रतिकला पाणी मागितलं.. प्रतिक ही पटकन उठून तिच्यासाठी पाणी आणायला गेला.. पाणी आणताना स्वतःच्याच विचारात तो हरवला..
---------------------------------------
क्रमशः