Shevtacha Kshan in Marathi Fiction Stories by Pradnya Narkhede books and stories PDF | शेवटचा क्षण - भाग 14

Featured Books
Categories
Share

शेवटचा क्षण - भाग 14


गार्गी - माझा साखरपुडा झाला ते तुला सहन झालं नव्हतं ना??

यावर प्रतीकच उत्तर..

प्रतीक - हो हेच कारण आहे गार्गी... मी तुला स्वतःहून माझ्यापासून लांब जायला भाग पाडलं त्याला ही कारण होतं.. तू किती मला पुन्हा आपल्या प्रेमाची जाणीव करुन द्यायचा प्रयत्न करत होती ते मला कळत होतं ग पण मी मुद्दामच तुझ्याशी अस वागत राहिलो.. कारण तूला वाटावं की आता माझं तुझं प्रेमाच नात संपलं.. आणि मग तू मला सोडून तुझ्या लायकीच्या मुलाशी लग्न करायला तयार होशील.. तुझ्या साखरपुड्याच्या दिवशी तू गौरवला अंगठी घातली नंतर तुम्ही एकांतात बोलत होतात नंतर तुझ्या लग्नाचा मुहूर्त निघाला या सगळ्या गोष्टी माझ्या मनाला कुठेतरी खूप त्रास देत होत्या ग.. कार्यक्रम होई पर्यंत मी स्वतःला कसबस सांभाळलं.. पण... नंतर मात्र त्यादिवशी मला तुला गमवल्याची तीव्र वेदना मनात दाटून आली.. मी माझ्या खोलीत झोपायच्या निमित्ताने गेलो आणि बाहेर आलोच नाही.. आता सर्व संपलं तू कुण्या दुसऱ्याची होणार या विचाराने मला खूप खूप यातना दिल्यात.. डोळे तर कधी झरझर वाहायला लागले मलाही कळलं नाही.. मी स्वतःला पुन्हा समजावण्याचा खूप प्रयत्न केला की मला हेच तर हवं होतं आता तसच झालय ती आनंदात असल्यावर मला का त्रास होतोय.. पण नाही समजावू शकलो मनाला ते काही ऐकण्याच्या तयारीतच नव्हतं.. उशीत तोंड खुपसून अगदी हमसून हमसून रडलो मी त्यारात्री.. कुणाला मी काही सांगूंही शकत नव्हतो.. मन मोकळं कुणाकडे करणार?? शेवटी उशीनेच माझे सारे अश्रु गिळलेत... किती तरी वेळ मी नुसता रडतच होतो.. झोप तर गेलीच होती.. पण सकाळी प्रियाने दार वाजवून वाजवून आवाज दिलेत.. तेव्हा जाग आली.. डोकं जड झालं होतं खूप दुखत होतं.. मला रात्री नेमकं काय झालं मला कळलंच नाही.. कदाचित काही न खाल्ल्यामुळे आणि अति रडल्यामुळे मला ग्लानी आली होती.. सकाळी उठलो तेव्हा घड्याळात सकाळचे 10:30 वाजले होते.. प्रियाने लिंबू पाणी दिलं.. तेव्हा जरा बरं वाटलं.. पण मी अस वागून कसं चालेल म्हणून मी स्वतःला सावरलं.. तेव्हा खूप मोठ्या मानसिक तणावाखालून मी जात होतो.. माझ्या मनात सारखे माझे माझ्याशीच भांडणं सुरू असायचे.. कोण काय बोलताय माझं लक्षच नसायचं.. वरून शांत दिसत असलो तरी आत जे वादळ गर्जत होतं ते कुणाला बोलून दाखवू शकत नव्हतो.. अमित आणि प्रियाला माझ्या वागण्यातील बदल लगेच लक्षात आला.. त्यांनी खूप प्रयत्न केला मला विचारण्याचा की काय झालंय.. पण मी त्यांना काहीच सांगू शकलो नाही ग.. काय सांगणार होतो मी की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तुला गमवल्याच दुःख मला त्रास देत आहे.. ते तुलाही ओळखतात आणि मलाही उगाच जज करणे किंवा तूझ्या माझ्याबाबतीत काही विचार केला असता त्यांनी आणि तसाही सांगून काय होणार होत आणि त्यांची चिंता मला वाढवायची नव्हती.. आणि हे तर मी तुझ्यापासूनही लपवल होत मग त्यांना कस सांगू.. तरी पण माझी अवस्था अशी असल्यामुळे ते रोज मला भेटायला यायचे मस्ती, मजा, गंमती करून मला खुलवण्याचा प्रयत्न करायचे.. मी मात्र माझ्याशीच झडगडत राहायचो.. खूप वाईट होते ते दिवस.. कस असत ना गार्गी कुणी विश्वासघात केला तर आपण त्याला दोष देऊन मोकळं तरी होतो पण इथे तर मीच माझ्या मनाचा विश्वासघात केला होता.. मग मला सावरायला वेळ लागणारच होता ना.. पण म्हणतात ना वेळ हे सर्व वेदनांवरच औषध असतं मलाही थोड्याफार प्रमाणात तीच मात्रा लागू झाली आणि दुसरी म्हणजे मैत्रीची मात्रा पण कामी आली... आपले मित्रमंडळ आणि प्रिया आणि अमितच्या सहवासाने हळुहळु स्वतःला सावरलं.. कारण माझ्या वागण्यामुळे घरच्यांनाही वाईट वाटत होतं..म्हणून मग पुन्हा पूर्वीसारखा राहण्याचा प्रयत्न करु लागलो.. दिवसभर जसा काय मी आनंदाचा मुखवटा घेऊन फिरायचो आणि रात्र झाली की तुझ्या आठवणीत किती तरी वेळ डोळे गळत राहायचे..

एवढं सगळं लिहून त्याने गार्गीला पाठवलं.. लिहिता लिहिता पुन्हा त्याच त्याच्या भावना दाटून आल्या होत्या आणि त्यांच्या काहूराने तो पुन्हा अश्रू गाळत बसला होता..

एवढा मोठा मेसेज बघून गार्गीला कळलं की याला इतका वेळ का लागला ते.. पण एवढं लिहीत बसण्यापेक्षा फोनवर बोलायचं ना..

गार्गी - प्रतीक मी मेसेज वाचते..भरपूर मोठं लिहिलंय थोडा वेळ लागेल... तू थांब कुठे जावू नकोस.... एवढं लिहीत बसण्यापेक्षा फोनवर बोलला असता ना मला ..

प्रतीक - गार्गी मी फोनवर तुझ्याशी बोलु नाही शकत ग.. माझ्या तोंडातून साधा ब्र ही निघणार नाही, आणि म्हणूनच एवढं लिहीत बसलो.. एका पत्रासारखं..

गार्गी - बोलू शकणार नाही म्हणजे?? रात्र झालीय आणि तुझे रूममेट्स झोपले म्हणून का??

प्रतीक - नाही ग.. तुझ्या शी बोलताना आवाज कातर झाला असता माझा, मन भरून आलं असत सारखं आणि मग पुढे काहीच बोलावलं गेलं नसतं मला .. एवढं लिहिताना पण डोळ्यांना धारा लागल्यात बघ...

प्रतिकने उत्तर दिलं पण तोपर्यंत गार्गी त्याचा मेसेज वाचू लागली होती... ती जसजसा मेसेज वाचत होती तिचे भाव बदलत होते.. तिचा संशय खरा ठरला होता.. त्याचा मेसेज वाचताना तो तिच्याबाबत किती हळवा आहे हे तिला प्रकर्षाने कळलं.. पण तरीही त्याने असं का केलं?? हे मात्र स्पष्ट कळलं नाही.. त्याची झालेली अवस्था पाहून तर तिच्या डोळ्यांच्या पापण्या काठोकाठ भरल्या होत्या.. आपण सहन केला त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रतिकला त्रास झाला हे तिला कळलं.. तशी तीही खूप हळवी झाली कधी तिच्या रोखलेल्या अश्रूंनी नकळत पापण्यांची किनार ओलांडली तिलाही कळले नाही.. तो मेसेज वाचून थोडावेळ ती शांतच बसली.. मग स्वतःला थोडं सावरून त्याला पुन्हा मेसेज केला..

गार्गी - का?? प्रतीक .. का ??? असं का केलंस रे?? आणि तुला एकदाही माझ्याशी सगळं सविस्तर बोलावसं वाटलं नाही?? सगळं तू स्वतःच ठरवून मोकळा झालास?? अस कस तुझं प्रेम होतं रे ज्याने आपल्या दोघांना वेगळं केलं???

गार्गीच्या आरोप करणं साहजिक होतं आणि अस होईलच हे ही प्रतीक जाणून होता.. तिच्या मेसेज वर त्याने तिची समजूत काढण्यासाठी उत्तर दिलं..

प्रतीक - अग गार्गी तूच विचार कर ना.. मी कधीची नोकरी शोधतोय पण अजून पर्यंत मिळाली नाही d.ed झाल्यापासून सरकारी शाळेत नोकरीची स्वप्न बघतोय.. पण सरकारच्या जागा रिक्त होतच नाहीत .. मागे PET आली ती पण चांगली दिली पण तरी सरकारचे उपकार काही झाले नाही.. पुढे मी b.ed पण केलं.. मास्टर्स पण झालं.. तरी कुठे काही होत नाहीये... शेवटी स्पर्धा परीक्षा देऊन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि आता या स्पर्धा परीक्षा मी कधी पास होईल मलाही माहीत नाही... कधी माझं नशीब उघडेल आणि मला नोकरी मिळेल माहीत नाही.. त्याला किती वर्षं आणखी लागतील देवच जाणे.. अश्या अनिश्चित भविष्यामध्ये मी तुला माझं कसं बनवून घेणार होतो ग? आयुष्य सोबत जगायला प्रेम गरजेचं असतं पण तेवढच पुरेसं नसत ना.. तुला एक चांगलं आयुष्य जगायला देता येणार नसेल तर नुसतं प्रेम काय कामाचं?? आणि तुला मी सोडून दुसरा कुणी भरपूर प्रेम आणि चांगलं आयुष्य जगायला देऊ शकत असेल तर त्यात मी का माझ्या प्रेमाची आडकाठी टाकू?? मला तु माझी असण्यापेक्षा सुखी आणि आनंदी असणं जास्त महत्वाचं होतं.. तुझ्याच साठी अस केलं ग मी.. आणि नोकरी लागल्याशिवाय तुझ्या घरच्यांनी तुझा हात माझ्या हातात दिलाच नसता.. तसही आपलं नात आपल्या घरच्यांनी मान्य केलं असत पण की नाही ही पण शंका होतीच...

गार्गी - अरे पण आपण समजावलं असतं ना रे घरच्यांना .. आणि मी थांबलेच असते रे तुला नोकरी मिळेपर्यंत .. आपण थोडं उशिरा लग्न केलं असतं.. तुझ्यासाठी तर मी आयुष्यभर वाट बघितली असती रे प्रतीक..

प्रतीक - मला माहिती होतं की तुला माझं प्रेम कळल्यावर तू माझ्यासाठी थांबायची जिद्द करशील आणि उगाच तुझ्या आई बाबांचं मन दुखवशील... त्यांना पण त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी काळजी आहे ना.. आणि बघ ना त्यांनी किती चांगला मुलगा शोधला आहे तुझ्यासाठी.. मी गौरवला भेटलो आहे खूप खूप चांगला आहे गार्गी तो आणि तुझ्यावर खूप प्रेम करतो.. मला खूप समाधान वाटत या गोष्टीच की ज्यासाठी मी तुझ्यापुढे कठोर वागलो ते साध्य झालं.. खूप चांगला मुलगा तुझ्या आयुष्यात आला.. जर माझं प्रेम आहे तुझ्यावर हे तुला महिती असतं तर तू गौरवला कधीच तुझ्या आयुष्यात येऊ दिल नसतं.. गौरवच काय पण कुणालाच येऊ दिलं नसतं .. तुला आठवते रोहित नावाचा मुलगा.. गीतच्या लग्नात त्याने तुला बघितलं आणि तूला मागणी घातली होती .. आणि तू फक्त माझ्यावरच्या प्रेमासाठी त्याला नकार दिला होतास.. असच तू कायम माझ्यासाठी थांबून राहीली असती.. म्हणून मी कठोर वागलो.. गार्गी मला माफ कर ग मी तुला खूप hurt केलंय.. पण त्यापेक्षा जास्त hurt मी पण झालोय ग..

गार्गी - माफी काय मागतोय वेड्या.. तू म्हणतो तस गौरव खरच खूप चांगला आहे.. खूप समजून घेतो मला आणि खूप प्रेमही करतो माझ्यावर.. पण तुझ्यासाठी वाईट वाटतं.. मी तर पुढे चालू लागली होती रे.. पण आज वाटतंय उगाच पुढे आली.. तुला थोडा आणखी वेळ दिला असता तर..

प्रतीक - नाही गार्गी अस अजिबात विचार करू नको प्लीज..

गार्गी - हम्म .. बरं माझं झालं विचारून... आता तू मला काय सांगणार होता?

प्रतीक - हो सांगतो.. तुझ्या रिसेप्सनच्या दिवशी तू खूप खूप सुंदर दिसत होती... अगदी परीच.. तुला आणि गौरवला सोबत बघितल्यावर मला सारख मनात वाटत होतं.. काश गौरवच्या जागी मी असतो.. तू माझी असती.. तो दिवस ही माझ्या साठी पचवणं खूप जड होता.. मी घरी गेल्यावर तसाच पुन्हा रडलो होतो जसा तुझ्या साखरपुड्याच्या दिवशी रडलो.. पण या सर्वांना आता काय अर्थ आहे.. मी अगदी सहज मला सांगावस वाटलं म्हणून सांगितलं गार्गी तू यावर जास्त विचार करू नकोस..

गार्गी - प्रतीक तुला एवढा त्रास झाला माझ्या साखरपुड्यानंतर .. तर तुला एकदा पण वाटलं नाही का रे की मला भेटावं माझ्याशी बोलावं.. तुझ्या भावना तू मला सांगू शकला असतास ना .. तेव्हा तरी तुला थोडं मोकळं वाटलं असतं..

प्रतीक - खरं सांगू का गार्गी.. खूपदा वाटलं खरंच खूपदा तुला भेटावंस वाटलं, लग्नानंतर काय होईल माहीत नाही पण त्या आधी एकदा तरी तुला भेटून छान गप्पा माराव्या आणि दोघांनीही बोलून मोकळं व्हावं अस खूपदा वाटलं.. पण मला भीती वाटत होती.. जर तू गौरव मध्ये गुंतत चालली असशील तर उगाच मी मधात तुला माझी आठवण करून दिली तर तू डिस्टर्ब होशील म्हणून मी तुला भेटलो नाही.. पण तुझी जास्त आठवण आली की मी तुझ्या कॉलेज मध्ये यायचो तुला दुरूनच डोळेेभरून बघायचो आणि परत निघून जायचो..

गार्गी - काssय?? तू माझ्या कॉलेज पर्यंत येऊनही मला कधी भेटला नाहीस.?? प्रतीक का रे अस केलंस रे तू का?? तुला माहितीय माझं लग्न व्ह्यायांच्या आधी मला किती वाटायचं की फक्त एकदा तरी प्रतिकला एकांतात भेटावं.. ते जुने दिवस पुन्हा एकदा जगावेत.. पण तू तयार होणार नाहीस किंवा तुला ते सगळं नको आहे म्हणून मी नेहमी स्वतःला समजावत राहिले.. आणि आज हे सगळं अस कळतंय मला.. प्रतीक... एकदा तरी बोलला असता ना रे..

गार्गी आता अखंड रडत होती तीच हृदय आक्रोश करत होतं, ज्या भावना तिने मनाच्या कोपऱ्यात बंद करून ठेवल्या होत्या त्या आज बाहेर आल्यात आणि तिला पुन्हा सतावू लागल्या होत्या.. ज्यांना ती विसरली अस तिला वाटलं त्या फक्त एक झापड खाली झाकलेल्या असल्याचं तिला जाणवलं.. तीच मन आक्रंदत होत .. घळाघळा अश्रू वाहत होते.. पुन्हा प्रतिकच्या त्या भावनांमध्ये ती पूर्वीसारखीच हळवी झाली होती..

प्रतीक - गार्गी मला माफ कर ग.. तुझ्यासमोर मी माझ्या आसवांना रोखू शकलो नसतो ग , माझा बांध तुटला असता.. आणि माझा रडका चेहरा तुला दाखवायचा नव्हता मला.. तुझ्या मनाची घालमेल मला वाढवायची नव्हती ग..

प्रतिकला कळलं होतं की गार्गी रडते आहे.. मेसेज वर बोलत असताना सुद्धा त्यांना एकमवकांची परिस्थिती समजत होती...

प्रतीक - गार्गी , ऐक ना.. प्लीज रडू नको ना ग.. मला खूप वाईट वाटतंय ग.. खरं तर हे मी तुला कधीच सांगणार नव्हतो पण आज तुही विषय काढला आणि मलाही स्वतःला आवरता आलं नाही..

गार्गी - आज तरी रडू दे प्रतीक.. रडण्याशिवाय दुसरं काही नाहीय माझ्या हातात.. आज मला आनंद होतोय का दुःख कळत नाहीय.. तुला मी अजूनही आवडते हा विचार मला सुखावतो आणि तू माझा नाही, आपल्यात आलेला हा कायमचा विरह हे सगळं या सुखापेक्षा खूप जास्त त्रास दायक आहे.. आणि मला काय सांगतोय.. तुझं रडणं थांबावं ना आधी तू..

डोळे पूसतच गार्गी लिहीत होती.. भरल्या डोळ्यांनी स्पष्ट दिसत ही नव्हतं तिला..

प्रतीक - मी रडतोय तुला कस कळलं..

गार्गी - जस तुला कळलं की मी रडतेय.. प्रतीक बघ ना आपली मन अजून पण जुळलेली आहे.. फक्त आपल्या आयुष्याचा धागा मात्र वेगळा झाला..

प्रतीक - हम्म.. मला माफ केलंस ना गार्गी.. माझ्यावर रुसू नको ग..

गार्गी - तुझ्यावर नाही रुसता येत मला प्रतीक.. मी केलं तुला माफ..

तिला सावरण्याचा दृष्टीने आता प्रतीक बोलू लागला..

प्रतीक - थँक्स गार्गी.. आणि सोड आता ते सगळं.. या सर्व गोष्टींना काहीच अर्थ नाहीय.. आपलं आयुष्य बदललं आहे त्यात आता या साऱ्या गोष्टींना कुठेच जागा नाहीयेे.. आपण आज बोललो आणि मोकळं झालो, आता यापुढे कुठला संकोच मनात राहणार नाही..

गार्गी - संकोच???

प्रतीक - हो अग ... मी माझ्या मनातल्या भावनांमुळे की काय तुला बोलायला संकोचायचो.. पण आता आज खूप मोकळ वाटतंय मला..

गार्गी - हम्म.. तू म्हणतो ते बरोबरच आहे.. या सर्व गोष्टी निरार्थकच आहेत आता.. पण एक सांगू तुझ्यावरच्या प्रेमाला मी कधीच विसरू शकणार नाही.. याचा अर्थ असा नाही की मी ते दाखवत राहील .. अजिबात नाही.. ते माझ्या मनीचं गुपित राहील कायम..

प्रतीक - हो नक्कीच.. माझंही तसच असेल .. असो.. 😊 सावरलीस ना आता??

दोघही रडून रडून मोकळे झाले आणि गत काळातून वास्तवात आले.. दोघांनीही एकमेकांना सावरलं..

गार्गी - हो .. मी ठीक आहे.. जे हातात नाही त्याचा पच्छताप तरी कशाला करायचा.. पण एक मागू का तुला प्रतीक??

प्रतीक - काय?? माग ना..

गार्गी - मला एकदा भेटशील का एकट्यात??

प्रतीक - नको गार्गी, मला माहित नाही तुझ्या पुढे येऊन मी काय करेल माझा सय्यम नाही राहणार..

गार्गी - सय्यम नाही राहणार म्हणजे??

प्रतीक - अग माझ्या भावना मला आवरता नाही येणार.. तुला बघून मला रडायला वगैरे आलं तर.. त्यापेक्षा नको ना अस काही..

गार्गी - ठीक आहे .. जाऊ दे जशी तुझी इच्छा.. मित्र बनून तर असशील ना माझ्यासोबत?? माझ्याशी बोलाशील ना आता यापुढे??

प्रतीक - हो .. नक्कीच.. 😊 आपण भेटूयात पण काही दिवस आणखी जाऊ दे.. आजच एवढं सगळं बोललो ना आपण त्यामुळे मनाचा तळ ढवळून निघाला आहे..

गार्गी - चालेल..😊

प्रतीक - काय ग.. किती वेळापासून बोलतोय आज आपण वेळेचं भानच नाही.. गौरव झोपलाय का??

गार्गी - हो .. अरे आजकाल ऑफिसमध्ये काम वाढलय ना , थकून जातो दिवसभर त्यामुळे लगेच झोप लागते त्याला..

प्रतीक - अच्छा.. एक विचारू??

गार्गी- विचार..

प्रतीक - तू गौरव मध्ये गुंतलीय ना??

प्रतिकला गार्गीच्या मनातलं जाणून घ्यायचं होत.. तिने गौरव मध्ये गुंतून आपलं आयुष्य आणि संसार सुखाचा करावा अस त्याला वाटत होतं.. आणि त्याला हेही जाणून घ्यायचं होत की आपल्यावरच्या प्रेम भावानेमुळे ही त्याच्या प्रेमाची प्रतारणा तर करत नाही ना.. ?? त्याला हिने मनापासून स्वीकारलंय ना??

गार्गी - अस का विचारतोयस??

प्रतीक - अग सहजच.. जाऊ दे नको सांगू काही हरकत नाही.. मी तर आपलं असाच काही पण..

गार्गी - हो प्रतीक मी गौरव वर प्रेम करायला लागली आहे.. तो आहेच असा ना की मलाही कळलं नाही कधी मी त्याची झाले.. आणि हो तुझ्या मनात कुठलीच अपराधी भावना नको ठेऊस.. मी आपल्या प्रेमाची झळ गौरवला आणि त्याच्या प्रेमाला कधीच लागू देणार नाही.. त्यामुळे तू निश्चिन्त रहा..

प्रतीक - कसं ओळखतेस ग तू माझ्या मनातलं.. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला नेहमीच माहीत होतं ना..

गार्गी - हो पण तुझं वागणं मला नेहमी संभ्रमात टाकायचं .. म्हणूनच मी तुला जाणीव करून द्यायचा प्रयत्न करत असे पण तू होता की.. असो जाऊ दे नको ते विषय परत..

प्रतीक - हम्म.. आणि आता बराच उशीर झालाय चला झोपुयात..

गार्गी - हो चल.. बाय .. गुड नाईट..

प्रतीक - बाय.. गुड नाईट.. 😊

आज प्रतिकला गार्गीशी बोलून खूप मोकळं वाटत होतं.. त्याच्या मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटलं होतं आणि आज शांत झोपही लागली.. इतक्या दिवसांपासून जी त्याची रात्रीची झोप उडाली होती ती त्याला मिळाली..

पण त्याने ते सारं ओझं गार्गीला दिलं हे त्याच्या लक्षातच आलं नाही..

गार्गी गौरव जवळ जाऊन झोपली.. नेहमीप्रमाणे त्याने आताही तिला कुशीत घेतले.. पण ती मात्र वेगळ्याच विचारात होती.. नेहमी आपलीशी वाटणाऱ्या या कुशीत आज तीच काही हरवलंय अस उगाच तिला वाटून गेलं.. रडून रडुन थकल्यामुळे गार्गीला पण झोप लागली ..

-----------------------------------------------------------------


क्रमशः