My mind thinks in Marathi Comedy stories by लता books and stories PDF | मन चिंती ते.....

Featured Books
Categories
Share

मन चिंती ते.....

मार्चमध्ये कोरोना आला आणि लाॅकडाऊन सुरू झाले. तेव्हापासून आम्ही सगळे घरीचं अडकलो होतो.ते बंद दार आणि वर्क फार्म होम करून जीव मेतकुटीस आला होता. घरात बायको,मी आणि मुलगा तिघंच त्यामूळे एकमेकांचे तेचं ते चेहरे पाहून सहाजिकच कंटाळाही आला होता.ना कोणी घरी येणार ना कोणी बाहेर जाणार.घर म्हणजे एक जेल वाटायला लागली होती.सगळं घरीचं आॅर्डर.भाज्या, कांदे, बटाटे,इतर वानसामान घरपोचं.दुध घरपोच.दार उघडून कधी शेजारच्यांना दारातूनच बोललो तरी घरी तासन् तास येऊन गप्पा मारणारे शेजारीही आता एखादा शब्द बोलूनच दार बंद करून घेऊ लागले होते.मुलगा बिचारा घरात एकटाच किती खेळणार ?तोही आता आताशा सारखा चिडचिड करु लागला होता.त्यामूळे मिसेस ही कंटाळत होती.युवराजे तिसरीतचं असल्यामूळे आॅनलाईन बिनलाईन एवढं काही खास चालायचं नाही.मग काय टिव्ही पहाणे आणि बोरं होतयं म्हणून आमच्या मागे टुमणे लावणे एवढेचं त्याचे खेळ.बाकी सगळा सावळा गोंधळ.बायकोही बिचारी ना beauty parlour ना काही खरेदी.फक्त घरकाम आणि घरकाम यात वैतागून लाल पिवळी झाली होती.घरात घरकामाला बाई नसल्यामूळे सगळं काम एकटीलाचं करावं लागतं होतं.तेही एक दुःख मनात सलतं होतं आणि नवरा काहीच काम करत नाही याची चिडचिडही. त्यामुळे रागराग करून आणि चिडचिड करून तीचं वजनही जास्त वाढलं होतं.या कोरोणाच्या काळात माझा नवरा कसा बिनकामी आहे आणि मीच कशी कामाची हे तिने सगळीकडे फोन करून वारंवार सांगितले होते.त्यामूळे माझ्या सासुने "काय जावईबापू घरीच तर बसून आहात करा की माझ्या लेकीला जरा मदत.तुमचं काही मास कमी होणार नाही."असे टोमणे ब-याच वेळा मारले होते. मेव्हण्यानेही एक-दोन वेळा धमकीवजा इशारा देऊन बहिणीला मदत करण्याविषयी सांगितले होते पण आता मेहूणा काही आपल्या घरी येऊ शकत नाही. याची खात्री असल्यामुळे माझ्यावर त्याच्या या धमकीचा कसलाच परिणाम होत नव्हता.माझ्यावर धमकीचा कुठलाच परिणाम न झाल्यामूळे बायकोची चिडचिड आणखीनच वाढली होती आणि वजनही.त्यातच मी आॅफीसच्या कामात ऑनलाइन बिझी असल्यामूळे मुलगा तिलाचं जास्त पिडतं असे आणि ती मला.
सांगायचं तात्पर्य एवढेच की आम्ही सगळे कोरोणाच्या काळात घरात बसून कंटाळुन गेलो होतो.गणपती आणि दिवाळसणालाही घरी गेले नसल्यामूळे आणि आत्ता लाॅकडावून थोडे शिथिल झाल्यामूळे बायकोने कुठे तरी थोडे फिरून येऊ या किंवा माझ्या माहेरी जाऊया असा धोशा लावला होता. तिला जा म्हणालं तर ती मला एकट्याला इथे सोडून जायला तयार होईना."मी इथे नसल्यावर तुम्ही इथे काय गुण उधळाल ते सांगता येत नाही."असे तीचे मत पडले आणि मी बायकोच्या माहेरी जाणं म्हणजे सासू आणि मेव्हण्याच्या तोंडी जाणं होतं.ते मला मान्य नसल्यामूळे आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जायचे असे ठरवले.एक दोन मित्रांना फिरायला जाण्याविषयी विचारले तर त्यांच्या बायकाच माहेरी गेल्या असल्यामूळे ते आपले जीवन हवे तसे आणि स्वच्छदी जगण्याचा आनंद घेत होते.आम्हा पामराच्या नशिबी मात्र असले जीवन नव्हते. मागच्या जन्मीचे पाप दुसरं काय?मग कुठे जायचं ते ठरवा आपण जाऊ या.असे फर्मान मी घरात सोडले.तसे महाराणी आणि युवराज आनंदाने उड्या मारायला लागले.कुठे जायचे ?यावर बरेचं डिस्कशन झाल्यावर कोकणात कुठेतरी समुद्रकिनारी जाऊन राहूया असे ठरले आणि जोरात तयारी सुरू झाली.बायको "आता माझा नवरा किती गुणी आणि कामाचा आहे" हे वारंवार फोनवर सांगायला लागली होती. त्यामुळे सासूबाई आणि मेव्हणे सुद्धा आमच्यावर खुश होते.माझा जावई फारच गुणाचा आहे असे त्यांनी फोनवर ब-याचं जनांना सांगितलेले आणि माझा जाहीर सत्कार केलेला मला स्वप्नात दिसत होता त्यामुळे आत्ता बायकोला कुठेतरी घेऊन जावेच लागणार होते.
त्यामुळे दोन-तीन दिवस मस्त समुद्रकिनारी एजॉय करायचे, समुद्रात मनसोक्त पोहायचे,फ्रेश व्हायचे आणि परत येऊन उत्साहाने कामाला लागायचे असे आम्ही ठरवले आणि आमची गाडी कोकणाच्या दिशेने भरधाव निघाली. पण हायवे लागताच आम्हाला अचानकपणे ट्रॅफिक लागली. वाहणे एका ठिकाणीच ठप्प झाली.गोगलगायही लवकर पोहचेल अशी स्थिती निर्माण झाली.रात्रीपर्यंत रत्नागिरीला पोहोचू असे काही वाटत नव्हते.आता काय करायचे?हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला.रस्त्याने अनोळखी ठिकाणी मुक्काम करणे योग्य वाटत नव्हते.कोकणात ओळखीचे असे कोणी नव्हते ज्यांच्याकडे आम्हाला एक रात्र घालवता येईल.दोन तीन तासांच्या ट्रॅफिकच्या वैतागातून सुटका होईपर्यंत रात्रीचे आठ वाजत आले होते.इथून पुढे रात्रीच्या दहा वाजेपर्यंत जास्तीत जास्त प्रवास शक्य होता. आम्ही रत्नागिरीला पोहोचण्यासाठी आणखी चार ते पाच तास लागणार होते.त्यातच कोकणातील वळणदार आणि चौफेर झाडीचे आनोळखी रस्ते. सोबत कोणी नसल्यामुळे अनोळखी ठिकाणी मुक्काम करणे ही एक रिस्क वाटत होती.मनात विचारांचा गोंधळ सुरू असतानाच माझ्या कंपनीतल्या एका कलिगचे गाव इकडेच कुठेतरी आहे.हे आठवले आणि त्याला फोन करून त्यांच्या गावाविषयी विचारायचे असे ठरवले.कंपनीतल्या कलिगाला फोन लावल्यावर त्याचे घर याचं परिसरात असल्याचे त्याने सांगितले व आम्हाला सगळे डिटेल्स पाठवून त्याने आमच्या राहण्याची व्यवस्था केली.
त्याच्या घरी पोहोचायला आम्हाला रात्रीचे अकरा वाजले.गावच्या घरी त्याचे आई-वडील आणि एक नौकर राहत होते.घर कोकणातल्या सारखे झाडांनी वेढलेले होते. सुंदर असा परिसर,पोफळी नारळाच्या बागा,रंगीबेरंगी फुलांची रोपे मनाला प्रफुल्लित करत होते.कलिग्जच्या म्हणजेच रुपेशच्या आईवडिलांनी आमचे हसतमुखाने स्वागत केले.कोकणी पद्धतीचे जेवनही अतिशय सुंदर झाले होते.गप्पा मारत मारत आमचे जेवण आटोपले. त्यांनी आम्हाला झोपण्यासाठी एक रूम दिली.रूमच्या मागच्या बाजूनेही एक दरवाजा होता आणि अतिशय सुंदर अशी फुलबाग तिथे फुलली होती.कंपनीचे काही मॅसेज आहेत का ?हे फोन मध्ये पाहत पाहत मी दारात फे-या मारायला सुरुवात केली.सोबत मुलगाही होता.बायको मात्र रूपेशच्या आई-वडीलांशी गप्पा मारन्यात रमली होती. काही वेळ मॅसेज तपासून व फेऱ्या मारून झाल्यावर मिही आत आलो.परत काही वेळ रुपेश च्या आईवडिलांशी गप्पा मारल्या आणि झोपायच्या खोलीत आलो.रूममध्ये आल्यावर बायकोने "मुलगा कुठे आहे?" असे मला विचारले. तिला मी मुलाला रूम मध्ये झोपवले असावे असे वाटत होते.मुलगा माझ्यासोबत बाहेर फेर्‍या मारत होता हे मी फोनच्या नादात चक्क विसरून गेलो होतो आणि तसाचं आतापर्यंत गप्पा मारत बसलो होतो.खोलीत मुलगा नाही म्हणल्यावर आमची धावपळ सुरू झाली.रुपेश च्या आई-वडिलांना समजल्यावर ते ही आमच्या मदतीला आले. रात्रीचे एक वाजता मुलगा कुठे गेला असेल? हे आम्हाला समजत नव्हते. घराच्या पूर्ण बाजूने आम्ही त्याला शोधले.
पण मुलगा कुठेही दिसत नव्हता.आमच्या आवाजलाही प्रतिसाद देत नव्हता.आम्ही सगळेजण आता जाम घाबरलो होतो.रुपेशचे आई वडील आम्हाला धीर देत असले तरीही ते ही घाबरलेले होते.बायकोचे रडणे आणि माझ्यावर ओरडणे सुरूच होते.मी असा निष्काळजीपणा कसा करू शकतो? याचा माझा मलाच राग येत होता.एक तास होऊनही मुलगा सापडत नाही म्हटल्यावर मनात नाही नाही त्या शंका यायला लागल्या.हा परिसर काही त्याच्या ओळखीचा नव्हता.मग तो गेला कुठे?त्यांच्या नोकरांनी ही घरा शेजारचा पूर्ण परिसर पिंजून काढला होता.पण मुलाचा काही थांगपत्ता लागत नव्हता.माझ्या शरीराला दरदरून घाम फुटला होता आणि बायकोला तर चक्कर यायला लागली होती.अनोळखी ठिकाणी मुलगा कोठे गेला असेल काही समजत नव्हते.रुपेशचे आई वडील ही बर्फासारखे थिजून गेले होते.त्यांच्या मनात वेगळीच शंका डोकावून जात होती.गप्पा मारताना आम्ही भुतांविषयीच्या ब-याचं गप्पा मारल्या होत्या.तसा काही प्रकार तर नसावा अशी शंका त्यांच्या मनात येत होती.माझं एक मन नको म्हणत असताना दुस-या मनाने हिय्या करून विहीरीतही डोकावून पाहिले होते.आता शेवटचा उपाय गावातले रस्ते शोधणे हाच राहिला होता.म्हणून गाडीची चावी घेऊन आम्ही गाडीकडे निघालो.तर गाडीतील लाईट सुरू असल्याचे दिसले. गाडीची चावी तर माझ्याकडे होती.मग गाडीतील लाईट चालू कसे?आता आम्हाला खूप भीती वाटायला लागली होती.रुपेशच्या नोकराणी तर देवाचे नाव घ्यायला सुरुवात केली.गाडीत मुलगा तर नसेल? की दुसरेच काही?आता आमच्या कुणाचेच मन थाऱ्यावर नव्हते. गाडीच्या जवळ जाऊन तर पहावे लागणार होते.पण धाडस काही होत नव्हते.तेवढ्यातचं रूपेशचा नौकर म्हणाला"पाहुण्यांनू नका जाऊस तिकडं, काय माहित काय हाय त्यो?भूत बित तर नसावं?अशी चावी तुमच्याकडे असतानाव गाडी उघडलीच कशी? त्यानच पोरसनी उचलून नसलं नवं नेलं?
"काही काय बोलतोस रे गण्या? त्यांना घाबरवतोस कशाला?"रुपेशचे आई वडील म्हणाले.
"नाय बा मी नाय घाबरत.तेवं राम्याचं सांगत होता त्याला त्यादिवशी इकडं भूत दिसलं म्हणून. म्हणून आपलं बोल्लो लई वकाट असतं ते. त्यादिवशी त्या राक्याचे पोराले आसाच उचलून नेला नव्ह.म्हणून मनतू"
"अरे गण्या गाढवा जरा तोंड बंद ठेवतोस का? रुपेशच्या वडिलांनी गण्याला दरडावले. तसा तो शांत बसला
आता मात्र पाचावर धारण वळली. मुलगा गेला कुठे? काहीच समजत नव्हते. गाडी जवळ जायचेही धाडस होत नव्हते. अंगाला दरदरून घाम फुटला.पाय थरथरायला लागले. चूक माझ्याकडून झाली असल्यामुळे बायकोला बोलायला रान मोकळे पडले होते.तिने तेवढ्या रात्री फोन लावून "माझा नवरा काहीच कामाचा नाही, त्यांच्यामुळे आपला पिंट्या हरवला" असे आपल्या आईला सांगितले होते. त्यामुळे सासुबाईचे आणि मेव्हण्याचे धमकीचे फोन यायला लागले होते. ते वेगळेच.मी बायको आणि सासर यांच्या तावडीत आडकित्यातल्या सुपारीप्रमाने सापडलो होतो. आता ते दोघे एवढ्या रात्री इकडे यायला निघाले होते. त्यामुळे आता माझेचं भूत होते की काय असे मला वाटू लागले. त्यांच्यापेक्षा गाडीतले भूत बरे म्हणून मी आता गाडीकडे जायचे ठरवले व रामरक्षा म्हणत म्हणत गाडी जवळ जाऊन गाडीच्या आत डोकावून पाहिले.तर काय? बापरे! मी बघतच राहिलो. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता.मी वळून मागे पाहिले तर ते सर्वजण जागेवरच उभे होते. एकही जन पुढे यायला तयार नव्हता.पण मी मात्र गाडीचा दरवाजा उघडून गाडीत बसलो आणि शांतपणे झोपलेल्या मुलाला पाहू लागलो.तो समोरच्या सिटवर शांतपणे झोपला होता. इकडे काहिही धोका नाही अशी खात्री झाल्यावर ते सगळे जण गाडीजवळ आले.मी पूर्ण गाडी चेक केली. तर गाडीची चावी गाडीला लावलेली होती. मग माझ्याकडची ही चावी कुठली ?म्हणून मी खिशात हात घालून माझ्याजवळची चावी बाहेर काढली.तर ती घराची चावी होती. आता हे सगळे माझ्या बायकोला समजले आणि तिने तो पूर्ण वृत्तांत तिच्या आईला परत फोन करून सांगितला.तसं मेव्हन्याने "आता भावजीचं काही खरं नाही" असं म्हणत गाडीची स्पीड आणखी वाढवली असं"माझ्या बायकोने मला सांगितले. सगळ्यांनी एकदाचा मोकळा श्वास सोडला. नक्की काय घडले? हे आताच त्या मुलाला विचारणे शक्य नव्हते. म्हणून सकाळपर्यंत वाट पाहायची असे ठरवले आणि त्याला घेऊन आम्ही सगळेजण गाडी व्यवस्थित बंद करून, चावी सोबत घेऊन झोपायला गेलो.
रात्रभर मला काही झोप लागली नाही."मेव्हण्याची गाडी तिकडेच बंद पडावी किंवा पमचर व्हावी." अशी प्रार्थना मी देवाजवळ करत होतो.
सकाळी उठल्यावर सगळ्यांनी मुलाला काल तू गाडीत कसा? याचा व्रुतांत विचारला. तेव्हा त्याने जे सांगितले ते असे." रात्री आम्ही बाहेर फिरत असताना त्याला फिरून फिरून कंटाळा आल्यामुळे त्याने आपण गाडीत बसूयात का?"असे मला विचारले. मी कामात दंग असल्या मूळे मानेनेच त्याला "हो" असे सांगितले आणि तो चावी घेऊन, गाडी उघडून गाडीत बसला. मी मात्र कामात असल्यामूळे हे सर्व विसरून गेलो.तो बिचारा दिवसभराच्या प्रवासाने थकलेला असल्यामूळे तिथेच झोपी गेला आणि हा सर्व प्रकार घडला. आम्हा सगळ्यांचे हसून हसून पोट दुखायला लागले.रात्री आपण वेड्यासारखे काय काय विचार केले? याचे हसू यायला लागले. मला मात्र इथून निघायची घाई झाली होती. ती दोन्ही भुतं इथं पोहोचायच्या आत मला इथून सटकायचे होते.म्हणून मी बायकोचा फोन स्विच ऑफ करून लपून ठेवला आणि रुपेशच्या आई वडिलांचे आभार मानून पुढच्या प्रवासाला निघालो.

लता ठोंबरे भुसारे