Beauty in Marathi Women Focused by लता books and stories PDF | सौंदर्य

Featured Books
Categories
Share

सौंदर्य

आजची पार्टी खासच झाली म्हणायची आणि सक्सेसही. सगळ्या पार्टीचं आकर्षण मीच तर होते. ज्या उद्देशाने पार्टी ठेवली होती तो उद्देश सक्सेस झाला की किती बरं वाटतं जीवाला.पार्टीतले सगळे लोक माझ्याकडेच तर बघत होते अगदी पार्टी संपेपर्यंत. काहीजण तर मुद्दाम येऊन सेकहॅडही करत होते.त्यांच्या डोळ्यात मला माझ्याविषयीच आकर्षण दिसत होतं.चाळीसी ओलांडलेली असूनही आपल्या सौंदर्याने लोकांना झुलवत ठेवण्यात औरच मजा असते,एक वेगळीच नशा असते. किती मूर्ख असतात नाही लोक एखादी सुंदर स्त्री दिसली की लगेच तडफडतात तिला भेटायला.म्हणूनच तर सेकहॅड करताना त्यांच्या नजरा माझा चेहराच न्याहाळत होत्या आणि काही जणांनी तर किती स्तुती केली माझी.काहिजनांनकडे तर माझ्या सौंदर्याचे वर्णन करायला शब्दच नव्हते म्हणे.

अशा किती पार्ट्या झाल्या असतील आतापर्यंत? कोणी मोजमाप ठेवलंय?आपल्या सौंदर्याच्या प्रदर्शना करताच तर असतात सगळ्या पार्ट्या.कोणी कोणी तर उधळी बाईही म्हणतात त्यासाठी मला.पण मला त्याची पर्वा नाही.आपलं सौंदर्य घरात थोडेच कोणी येऊन पाहणार आहे. त्यासाठी आशा पार्ट्या करणं,दुस-यांच्या पार्ट्यांना जाणं हे होणारच की.ह्या सौंदर्याच्या जोरावरच तर इथपर्यंत आलोतं आपण. मिस रती सरोदेच्या रती अग्निहोत्री झालोत.

"सरोदे" किती टिपिकल मध्यमवर्गीय आडनाव ना?छी ते मला कधीच आवडलं नाही.कोणी सरोदे अशी हाक मारली की अंगावर काटा उभा राहायचा.असा राग यायचा त्यांचा. पण इलाज नव्हता. आई वडील कोण असावेत? हे आपल्याला थोडचं ठरवता येतं. तेव्हाच ठरवलं लग्न करणार तर भरभक्कम पैसा आणि आडनाव आसना-या मानसाशीचं

तसा माझा जन्म साधारण कुटुंबातलाच. वडील कुठल्याशा सरकारी ऑफिसमध्ये कारकून आणि आई गृहिणी. मी सगळ्यात मोठी.माझ्यानंतर दोन भाऊ आणि दोन बहिणी.एकूण सात जणांचे कुटुंब. खाणारे सात आणि कमावणारे एकटे.त्यामुळे नीट खायला मिळायचे सुद्धा वांधे. तिथे मोज म्हणजे हा प्रकार कुठून येणार?एका कारकुनाला असून असून पगार असणार तो कितीसा? पण एक होतं देवाने मला भरभरून सौंदर्य दिलं होतं. अगदी मोकळ्या हाताने माझ्यावर सौंदर्याचा वर्षाव केला होता. माझ्या चारही भांवंडांपेक्षा मी खूप सुंदर होते आणि अगदी पाचव्या सहाव्या वर्षापासूनच मला त्याचा खूप अभिमान वाटायचा. घरातच नाही तर आमच्या अख्ख्या चाळीत माझ्याएवढं सुंदर कोणीच नव्हतं. त्यामुळे माझ्यावर नेहमीच कौतुकाचा वर्षाव व्हायचा. पुढे पुढे मला माझ्या सौंदर्याचा गर्व वाटायला लागला.आणि त्यात काही वावगं नसावं असं मला वाटतं.

अगदी शाळेत सातवी आठवीत असतानाही मी माझ्या सौंदर्याच्या जोरावर माझा होमवर्कही मुलांकडून करून घ्यायची.मी त्यांच्याशी बोलणे त्यांना गर्वाचे वाटायचे.त्याचा मला फायदा व्हायचा. त्यावरून मुली मला नावे ठेवायच्या पण आपल्या गुणांचा वापर करून काही मिळवण्यात कुठली आली चोर? तसाही मला अभ्यासात काहीही इंटरेस्ट नव्हता.पास होण्यापुरता जेमतेम अभ्यास मी करायची. त्यावरच मी दहावी काढली होती. माझ्या सौंदर्यावरच मी सर्व मिळवणार असं ठरवलेलंच होतं. वडिलांची गरिबी मला कधीच पटायची नाही.

कॉलेजमध्ये गेल्यावर माझ्या सौंदर्यावर भाळून माझ्या मागे लागणाऱ्यापैकी त्यातल्या त्यात एका श्रीमंत मजनूला मी पकडले होते.त्याच्याजवळून पैसा उकळून मी माझ्या पार्लरच्या गरजा भागवायची,महागडे ड्रेस विकत घ्यायची. माझं असं वागणं माझ्या आईवडिलांना कधीच आवडायचं नाही.आमच्यात ब-याच वेळा खटके उडायचे पण माझ्या सौंदर्याचा उपयोग करून मी मला हवं ते सगळं काही जिंकणार होत. एक मात्र होतं मी माझ्याशी त्यांना कधीच सलगी करू दिली नाही.मी सोबत असणचं त्यांना अभिमान चं वाटायचं.त्यात माझा काहिही दोष नव्हता आणि सगळ्या कॉलेजमध्ये सुंदर असल्याचा अभिमान मला होता.

बी.एच्या दुस-या वर्षाला असताना आमच्या कॉलेजमध्ये मिस सौंदर्यवती स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.अर्थात त्यात पहिली येण्याचा मान मीचं पटकावला होता.त्यावेळी या स्पर्धेचे आयोजक अतूल अग्निहोत्री आमचा सत्कार करण्यासाठी आले होते.तिथे आमची ओळख झाली. गडगंज श्रीमंत व्यक्तिमत्व.ती ओळख वाढवायची असे मी ठरवले आणि त्यांना या नं त्या कारणाने भेटायला जाऊ लागले. सुरुवातीला ते जेवढ्यास तेवढेच वागायचे पण मी जरा जास्त ओळख वाढवल्यावर ते माझ्याशी मोकळेपणाने वागू लागले.माझ्या सौंदर्याच्या जोरावर मी त्यांना आपलसं केलं. त्यांचं पहिलं लग्न झालेलं असतानाही ते माझ्याशी लग्न करायला तयार झाले आणि माझ्या सौंदर्याचा खूप मोठा विजय झाला. माझ्या सौंदर्याचा उपयोग करून मला जे हवं ते मी आज मिळवले होते.ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे होते. निदान दहा-बारा वर्षांचं तरी अंतर असावं आमच्यात. हा माझा निर्धार माझ्या घरी कळल्यावर आई-वडीलांनी सगळं घर डोक्यावर घेतले.बाकीच्या भावंडांच काय? हा प्रश्न त्यांनी मला विचारला पण त्याच्याशी मला काहीही देणं घेणं नव्हतं.या गरिबीतून मला बाहेर पडायचं होत आणि मि.अग्निहोत्रीशी लग्न हा त्यातला सोपा मार्ग होता. त्यांच्या वयाशी किंवा त्यांच्या पहिल्या लग्नाशी मला काहीही देणे घेणे नव्हतं. मला हवा होता तो पैसा.आणि त्यांना पार्टीत मिरवण्यासाठी हवे होते ते माझे सौंदर्य. त्यांच्या घरिही हे कळल्यावर खुप मोठा स्फोट झाला. तिरिही आम्ही दोघांनी लग्न केलेच.
आता माझे नाव टिपिकल "सरोदे" न राहता मिसेस रती अग्निहोत्री असे झाले होते. मि.अग्निहोत्रीने मला एक खूप सुंदर बंगला घेऊन दिला होता. माझ्या दिमतीला अनेक नोकर- चाकर, घोड्या -गाड्या दिले होते. मि. अग्निहोत्री मला अनेक पार्ट्यांना घेऊन जायचे. तिथेही माझ्या सौंदर्याचीच चर्चा असायची.आता मला परदेश वा-या करणे, सौंदर्य टिकवण्यासाठी परदेशातील मोठमोठ्या डॉक्टरांच्या भेटीगाठी घेणे.एवढेचं कामे असायची. माझ्या सौंदर्याच्या अशाचं चर्चा व्हाव्यात म्हणून मी मि. अग्निहोत्रीना ना
ऑफिसमध्ये महिन्यातून एक तरी पार्टी अरेंज करायला लावायची.यात त्यांचा खुप पैसा खर्च व्हायचा पण माझ्या हट्टापुढे त्यांचे काहीही चालयचे नाही.
काही वर्षांनंतर या पर्ट्यांच्या खर्चाला कंटाळून मिस्टर अग्निहोत्रीच्या पहिल्या बायकोने एकतर तिला सोडा किंवा मला घटस्फोट द्या असे पर्याय त्यांच्यापुढे ठेवले. तेव्हा मीचं त्यांच्याकडून घटस्फोट घेऊन अर्धी प्रोपर्टी माझ्या नावावर करायला लावली.त्यामूळे आता मीचं माझ्या प्रॉपर्टीचे सगळे व्यवहार बघते आणि सौंदर्य दाखवण्यासाठी पार्ट्याही देते.
लोकं खुष होऊन माझ्या सौंदर्याची स्तुती करतात आणि माझे पार्टीचे पैसे फिटून जातात.आणखी काय पाहीजे होते मला श्रीमंती.जी मी आज मिळवली. वेगवेगळ्या पार्ट्यातून मी माझी स्तूती पदरात टाकून घेते .माझ्या हातात असते तर जुन्या राज्यांप्रमाणे माझी स्तुती करायला काही भाटही ठेवले असते मी पण ते या काळात शक्य नाहीं. म्हणून मग या पार्ट्या.
माझ्या आईवडिलांना हे सर्व पटलं नसल्यामुळे त्यांनी माझ्याशी तेव्हाच संबंध तोडून टाकले पण मला त्याची कधीच खंत वाटली नाही कारण मी माझ्या सौंदर्याच्या जोरावर पैसा पैसा मिळवला होता आणि चाळीसी नंतरही
मी ते अबाधीत ठेवले होते.

लता ठोंबरे भुसारे