Tu Hi re majha Mitwa - 5 in Marathi Love Stories by Harshada books and stories PDF | तू_ही_रे_माझा_मितवा... - 5

Featured Books
Categories
Share

तू_ही_रे_माझा_मितवा... - 5





लॅचचा जरासा आवाज झाला. अभय रुममध्ये आला तेव्हा अंधार होता.सवयीने त्याचा हात भिंतीवर चाचपडला आणि त्याने बटन दाबलं.प्रकाश पसरला तसं त्याने समोर पाहिलं रायटिंग टेबलवर डोकं ठेवून वेद झोपला होता.शेजारी लॅपटॉप आणि बियरच्या दोन रिकाम्या बॉटल.

‘ ये रायटर..उठं’

त्याच्या खांद्याला धरून गदागदा हलवत अभय म्हणाला.

“ये...भाव काय विषय आहे...हळू की जरा” डोळे उघडायचा प्रयत्न करत वेद म्हणाला.

“साल्या दोन बॉटल उडवल्या तू? तुला माहितीय ना बियरसारखा छपरी आयटम पण चढतो तुला...कशाला रिस्क घेतो..काय आज एकदम ‘दारू पीके शायरी’ वैगरे मूड आहे का ?” फ्रेश होत अभय म्हणाला.

“अभ्या...साल्या तुझी सेकंड शिफ्ट म्हणजे माझ्या डोक्याला त्रास असतो...मस्त झोपलो होतो..without any tension.. उठवायलाच हवं होतं का?”
जडावलेल्या आवाजात वेद म्हणाला.

“ये लेखणी बोल काय झालंय?” फ्रेश होऊन त्याच्या शेजारी खुर्ची ओढून ऐसपैस बसत,सिगरेटचा एक कडक दम ओढत तो म्हणाला.

“कुठे काय...यार सगळा गुंता होऊन बसलाय..Complete chaos …! जे हवंय ते एकदम जवळ आहे..जे अगदी जवळ आहे त्याला मला जे हवंय ते नकोय...आणि जे हवंय त्याला जवळ असलेले नकोय कदाचित...कळतंय न तुला मला काय म्हणायचं...”

खुर्चीला मागे मान टेकवून दोन्ही हात पसरवत तो म्हणाला.
त्याला उठवून त्याच्या बेडवर बसवत अभय म्हणाला-
“हे बघ लेखणी ,माझ्या प्रोडक्शनच्या जॉब मध्ये हे असं हवंय,जवळ आहे ह्याला काही महत्व नाहीये,दिवसभर समोर आपली काँट्रॅक्टची पोरं,अवजड मशीन्स..पण तू आता आहेसच अश्या प्रोफेशनमध्ये जिथे आजूबाजूला जाम हिरवळ आहे मग कर की ऐश..कश्याला कन्फ्युजन हवंय काय न जवळ काय...”

बेडवर मागे धाडकन पडत हरवल्यासारखा तो म्हणाला-
“नाही यार अभ्या तुला नाही कळणार...ती सतत समोर असायला हवी असं वाटतं,हसते तेव्हा जेवढी गोड दिसते त्यापेक्षा जास्त, खूप जास्त गोड रागात दिसते.तु म्हटलास आता मला छपरी बियर पण चढते..खरं सांगू विषय तिच्या डोळ्यांचा असेल तर मला कॉफीसुध्दा चढते.”

“च्यायला..रायटर म्हणजे प्रेमात पडलाय सांग ना सरळ...आणि तिचं काय? तिला काय वाटतं?!”

“तिचं माहित नाही रे...किती जण प्रेमात असतील तिच्या,एक दोन आशिक आवारा तर ऑफिसमध्येच आहे.आता कुठे बोलणं सुरु झालं होतं त्यात लगेच गैरसमज.”

“एक काम कर प्रो तर मार पुढंच पुढे...”

“प्रो?...नाही!!!..तिलाही माझ्याबाबतीत असं काहीसं वाटत असेल तर तिने बोलावं मी नाही..”
आवाज अजूनही जडावलेलाच होता.

“वेडायस का जरा?खरंच चढलीय तुला. कुठली मुलगी पुढाकार घेते रे?”

थोडंस उठून बसायचं प्रयत्न करत वेद म्हणाला-“घेते ना..ज्या मुलीचा प्रेम हा विषय ऑप्शनला नसतो आणि जिच्यामध्ये प्रेम निभवायची हिम्मत असते ना ती नक्की पुढाकार घेते. नाहीतर मुलींचा काय भरवसा..प्रत्यक्ष जेव्हा कमिटमेंट,लग्न हा विषय निघतो तेव्हा मात्र त्यांना जात,पोटजात,आठवते, फॅमिली बॅकग्राऊंड आठवतं,आई वडिलांची इज्जत का सवाल,लहान भावा-बहिणीच भविष्य सगळं एकदम आठवतं..मग नाही म्हणायला काहीही कारण चालतं,म्हणजे त्या अगदीच म्हणून शकतात की मी असं लव्ह मॅरेज केलं तर काकीच्या माहेरी काय वाटेल किंवा शेजारच्या काकांच्या टॉमीला तू आवडत नाही हे सुद्धा कारण समोरून येऊ शकतं you never know…!”

त्याला परत बेडवर आडवं पाडत,झोपवून अभय म्हणाला-“बास्स वेद..काय बडबडतोय..झोप आता सकाळी बोलू..ok ?

“हो सकाळी बोलूच पण तू लक्षात ठेव....कधीही मुलीकडून पहिलं I love you यायला पाहिजे.काय लक्षात ठेवशील....”

“झोप वेद...तूच लक्षात ठेव म्हणजे मिळवलं...”

बऱ्याच वेळ असंबद्ध बडबड करत तो झोपूनही गेला.

******************************

“यार आता मी काय केलं,माझ्यावर का चिडतेय तू?” नेलपेंट लावायचं थांबवत तनुने ऋतूला विचारलं.

“काय केलं? काय म्हटली होतीस गं तू,खूप जेन्यून वाटतो तो..प्युअर,..वार्म.हो ना..” तिच्या हातून नेलपेंटची बॉटल ओढत ऋतू म्हणाली.

“कोण तो ?त्याला काही नाव? काय झालंय..नंतर सांगते,निवांत सांगते म्हणून पार झोपायची वेळ आली तरी सांगत नाहीये पण चिडचिड मात्र करतेय” बेडशीट सारखं करत,हसू दाबत प्रिया म्हणाली.

“तो च तो मिस्टर वेद इनामदार..” उगाचच गालावर चढलेली लाली लपवता येत नसल्याने चिडायचं नाटक करत ऋतू म्हणाली.

तिला बळेच बेडवर बसवत तनु म्हणाली-“ काय झालंय बोल..हे वेद पुराण रोजचं झालंय आता,काही खरं नाही..”

“ये काय यार...तने तू सनीबद्दल भरभरून बोलायची तेव्हा मी ऐकायचे ना रात्र रात्र ” ती गाल फुगवून म्हटली.

“मग आम्ही प्रेमात होतो आणि आहोत...म्हणजे तुझंही तसंच काहीसं आहे का?”

तिला उशी मारत ऋतू म्हणाली-“ ये यार असं नाही काही म्हटले मी..”

त्यांची बाचाबाची सोडवत प्रिया म्हणाली-“तने प्लीज नको ग त्रास देऊ तिला..किती खेचशील, तू बोल ग ऋत्या काय झालं..”

तिने जरा मुसमुसतच पण थोडक्यात सगळं सांगितलं आणि प्रियाच्या कुशीत शिरून ती रडायला लागली.

“ये वेडाबाई,असं रडायचं का?ती मुलगी मूर्ख आहे आणि वेदने क्लियर केलंच ना बाकीचं सगळं मग जाऊदे” हलकेच तिच्या केसांवरून हात फिरवत ती म्हणाली.

“क्लियर केलं काय क्लियर केलं मूर्खांनो..आडून आडून चक्क ’तू मला आवडते’ असं काहीस म्हणून गेला तो..I think he loves you!!” तनु डोळे मिचकावत म्हणाली.

“असं काही नाहीये”

“तो म्हणाला ना मैत्रीच्या पलीकडे ही काही गोष्टी असतात...त्या पलीकडच्या गोष्टी म्हणजे काय?” तनु ने तिची बाजू मांडली.

“मैत्रीच्या पलीकडे म्हटलंय त्याने म्हणजे प्रेमाच्या अलीकडे ही असूच शकतं ना..आणि वेळ आली कमिटमेंट,लग्न ह्या गोष्टी आल्या की मग त्यांना ही मधली स्पेस आठवते.All boys are same !” नाकावर राग आणत ती म्हणाली.

“तुझे डोळे बोलतात त्याच्याशी असंही म्हटला ना तो....त्याचा अर्थ काय मग?” तनु पण जिद्दीला पेटली.

“माझे डोळे बोलतात पण त्याच्या डोळ्याचं काय? ते तर नाही ना सांगितलं, तो फक्त मला वाचतोय...”

“मग तूही वाच ना त्याचे डोळे...बघ काय म्हणतात ते....आणि मान्य कर तुला तो आवडतो ते..किंवा प्रेमात आहेस ते!” ऋतूला खांद्याने जरा रेटा देत मिश्किलपणे ती म्हणाली.

“अजिबात नाही हा तनु, मी का स्वतःहून मान्य करायचं अगोदरच?त्याच्या आणि रेवामध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा मला माहित नाही.”

“आणि त्यांच्यात तसं काही नसेल आणि त्याने तुला प्रपोज केलं तर....?” प्रिया न राहवून म्हणाली.

“तरीही माझं उत्तर तेच असणार आहे..” ऋतू उसनं अवसान आणत म्हणाली.

“काय्य” दोघीही एकदम म्हणाल्या.

“Sorry….!!अजून काय...!” ती बेफिकारीने म्हणाली आणि बेडवर गेली.

तिचे दोन्ही गाल ओढत तनु म्हणाली.. “कुणाला वेड्यात काढते आहेस..आम्हाला की स्वतःला?..सरळ सरळ दिसंतय त्याच्या प्रेमात आहेस ते...तूच ना ती काही दिवसांपूर्वी प्रेम,लग्न बिग नो नो फॉर मी म्हणणारी?...आलं की नाही तुझं प्रेम तुला शोधत?..वेद बरोबर म्हणाला..तू कितीही लपवलं तरी तुझे डोळे खूप बडबड करतात.”

“असं काही नाहीये,चला मला झोप येतेय...” म्हणून बोलणं अर्धवट ठेवून तिने अंगावरून पांघरून घेतलं.

रात्रीच्या शांततेत आवाज न करता डोळे भरून वाहत होते...कुणाची तरी अनिवार ओढ वाटत असूनही त्या ओढीला प्रेम हे नाव द्यायला हिम्मत मात्र होत नव्हती.

*********************

“So guys this is all about the our new project, other minute Details are already discussed department wise. I wish good luck to our creative team as they have only two days to submit the script. So by the next week will finalize everything about the project and it will be presented. All The best”

जवळपास दोन तास चालेलेली नव्या प्रॉजेक्टची मिटिंग टीमलीडर ने क्लोज केली. शहरापासून थोडं दूर असणाऱ्या “The incognito resort”साठी ब्रांडीग आणि मार्केटिंग असा नवा प्रोजेक्ट होता.नवीन लोकांसाठी तर खूप मोठी संधी होती स्वतःला सिद्ध करण्याची,कंपनीत नाव करण्याची,प्रत्येक department मधून बेस्ट प्रपोजल पुढं जाणार होतं.

मिटिंग झाल्यावर सगळे आपापल्या जागेकडे निघाले होते तसं रेवाने वेदला थांबवलं आणि ते सोबत गप्पा मारत पुढे निघाले.

“वेद....i am really very sorry कालसाठी,चिडले होते रे मी.माझ्या एकाही मेसेजचा रिप्लाय तू काल-आज दिला नाही.किती वेळा सॉरी म्हणू?” तिने वेद्कडे त्रासिक नजरेने पाहिलं.

“अगं रेवू मी खरंच अजून सगळे मेसेजेस बघितले ही नाहीये आणि रागावलो देखील नाहीये..” तो सहजतेने म्हणाला.

“मग रात्री कॉल सुद्धा उचलला नाहीस ते?” ती लाडीकपणे म्हणाली.

“ते ते ...रात्री जरा कामात होतो,थोडा प्रॉब्लेम झालेला.” त्याने वेळ मारून नेली.

“ओके..आता ह्या प्रोजेक्टसाठी खूप छान स्क्रिप्ट तयार कर,तुझीच स्क्रिप्ट सिलेक्ट व्हायला हवी .मग मी त्यावर बेस्ट प्रेसेंटेशन करेन.” अगदी आनंदाने ती म्हणाली.

तो पाठमोरा होता,मागून ऋतू येत असलेली पाहून तिने पटकन वेदचा हात हातात घेतला.

“all the best Ved…” वेद जरासा चपापला...थोडंस साशंक हसला.

“थँक्स, चल बोलू नंतर, वेळ खूप कमी आहे...back to work..” हलकेच हात सोडवून घेत तो म्हणाला आणि मागे वळला.समोरून ऋतू येत होती,मिडनाईट ब्लू कोर्ड ट्राउजर,जॅकेट आत ब्लॅक टी...कालच्या त्या पहिल्या वहिल्या गोड संवादानंतर तो तिला इतकं जवळून बघत होता.आतून एक गोड फिलिंग थेट ओठांपर्यंत हलकंस स्माईल बनून आली.त्या थोड्या स्माईलने ही दोन्ही गालांवरच्या खळ्या त्याच्या हलक्या स्टबल बियर्डच्या वर उजळून निघाल्या.रेवाच्या हातात हात घालून वेद उभा होता एवढं ही कारण पुरे होतं ऋतूच्या नाराजीला,त्याच्या शेजारून निघून जातांना मात्र क्षणभर नजरानजर करायचा मोह तिला ही आवरता आला नाही. गोड धडधड तर होत होतीच पण ती चेहऱ्यावर दिसणार नाही आणि गालांवर लाली बनून उमटणार नाही याची काळजी घेत तिने लागलीच नजर चोरली आणि निघून गेली.
क्षणभर वेद ऋतुजासाठी थबकला हे पाहून अजूनही तिथेच उभ्या असलेल्या रेवाचा राग मात्र पुन्हा उफाळून आला.

पुढचे काही दिवस प्रॉजेक्टच्या दृष्टीने,करियरच्या दृष्टीने खूप महत्वाचे होते,सर्वांना आपलं बेस्ट देऊन ह्या प्रोजेक्टचा हिस्सा व्हायचं होतं. Incognito रेसोर्टची थीम “कपल्स” असल्यामुळे वेदने स्वतःला आणि ऋतूला डोळ्यासमोर ठेवून दोन दिवसात अशी काही स्क्रिप्ट तयार केली की जी रिजेक्ट होणं शक्य नव्हतं आणि झालं ही तसंच.

...मनातलं असं कागदावर उतरल्यावर सगळ्यांच्या मनाला भिडणारच होतं.

Officially वेदची स्क्रिप्ट सर्वांना आवडली होती.त्याच्या स्क्रिप्टचा मेजर पार्ट सिलेक्ट झाला होता आणि एका सिनियर रायटरचा थोडा पार्ट मिळून नवीन स्क्रिप्ट तयार होणार होती. स्क्रिप्ट रीडिंग सेशनमध्ये ऋतू इतकी गुंगली होती की मिटिंग संपली तरी तिच्या मनात वेद्च्या स्क्रिप्टच्या बॅकड्रॉपमध्ये शेवटी असणाऱ्या काही ओळी अजूनही कानात रुंजी घालत होत्या.

तुझ्या अवकाशातून तुला चोरून ...दूर कुठतरी दूर..तू न मी !
फक्त दोन क्षणांचा विसावा ,नजरेत विरघळलेली नजर, जिथे फक्त तू न मी !
ऐक ना...ओढून घेऊ हा चमचमत्या पाण्याचा पडदा...धुंद एकांत आणि चिंब भिजलेलो तू न मी...!

वेद्च्या स्क्रिप्टची प्रत्येक ओळ न ओळ स्टोरीबोर्डमध्ये जिवंत करायची आणि ह्या प्रोजेक्टचा हिस्सा व्हायचं, ह्या मनस्वी निर्धारानेच ती उठली. हसून सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारणारया वेद्कडे ती भारावल्यासारखी बघतच राहली,अगदी डोळे भरून..एक क्षण मनात आलं...........

अत्तारासारखं उडून जावं आत्ता ह्या क्षणी आणि सुगंध म्हणून व्यापून इथं राहावं, फक्त तू न मी..!!!

ती जरा दचकली,भानावर आली ते समोर एकदम तिचं लक्ष वेधण्यासाठी आरुषने वाजवलेल्या चुटकी ने.

“ओह्ह सर...हाय..” ती गोंधळून म्हणाली.

“हेल्लो ऋतुजा...See your strong competitor got selected in project, now it’s your turn , I really wanted you in this project. You have that guts and spark आता प्रेसेंटेशनची तयारी जोरदार सुरु करायची.काही मदत लागली तर मी आहेच,all the very best” त्याने wish करायला हात तिच्या समोर धरला.तिने नाखुशीने हात मिळवला.
काही क्षण त्याने तिचा हात सोडला नाही.वेद आता रेवा आणि जयशी बोलत होता.वेदचं ही लक्ष तिच्या नकळत तिच्यावर होतं.
ऋतूने अनाहूतपणे त्याच्याकडे बघितल्यावर त्याच्या नजरेची धार तिला जाणवली.तिने yes ok thank you अशी जुजबी उत्तर देत त्याला टाळलं. चर्चा करत, पुढचे प्लान ठरवत हळूहळू सगळे आपापल्या जागेकडे निघाली.
ऋतूने एकदा येऊन आपल्याला at least congrats म्हणावं एवढी रुखरुख त्याला लागून राहिली तर रेवा आणि जय तिथे असतांना त्याचाकडे जायलाच नको म्हणून ती त्याला टाळत त्याच्या समोरून निघून गेली.

“बघ इतके ही मॅनर्स नाहीये त्या ओव्हरस्मार्ट मुलीत की ज्याने एवढी मदत केली होती त्याच्या आनंदात त्याला विश तर करावं...मला तर वाटतं वेद तू सिलेक्ट झाला ह्यावर ही ती जळत असणार...मूर्ख” रेवा कुत्सितपणे म्हणाली.

“ जाऊदे ....लक्ष नको देऊ,तुझा विषय नाहीये तो” गोड हसत वेद म्हणाला,थोडंस दोघांना पुढच्या प्रेसेंटेशनवर कुठल्या गोष्टीवर फोकस करायचा ह्याच्या टिप्स दिल्यावर तिघे आपआपल्या जागेकडे निघाले.

ऋतूजा खरं तरं अजूनही वेदच्या त्या चार ओळींमध्येच अडकलेली होती आणि त्यातूनच तिने तिच्या स्टोरी बोर्डचा आराखडा तयार केला..त्यावरचं ती आता मेहनत घेणार होती.पुढचे काही दिवस कुणालाच साधं टी सेक्शनला जायचा ही वेळ मिळत नव्हता.
काहीही करून प्रोजेक्ट मिळवायचाच हे स्पिरीट घेऊन सगळे काम करत होते.

********

फायनल टीम सिलेक्शनच्या मिटींगच वातावरण बरंच टेन्स होतं.सगळे सिनियर्स सवयीप्रमाणे रिलॅक्स होते पण जुनिअर्सची चलबिचल लक्षात येण्याजोगी होती.एक एक सेक्शन announce होतं होता. जयचा एक बीट बजेट सेक्शनमध्ये सिलेक्ट झाला होता.रेवा आणि वेद कमालीचे खुश झाले. स्टोरीबोर्ड प्रेसेंटेशन सिलेक्शनकडे बऱ्याच जणांचं लक्ष होतं.
रेवाला तिच्या सिलेक्शनपेक्षा ऋतूचं रिजेक्शन महत्वाचं होतं आणि त्यातंच announcement झाली..प्रेसेंटेशन एका सिनियरचं सिलेक्ट झालं होतं.ऋतूचा चेहरा पडला.तिला वेदसोबत हा पहिला प्रोजेक्ट करायचाच होता.टाळ्या थांबल्यावर इन्चार्ज म्हणाला-
“wait wait…there will be one more member in this project…we come across one presentation which was really nice, fresh, crispy.. but yes there is lack of experience but for three important bits we are including Miss. Rutuja Mohite.”

स्वतःशी नाराज असलेली ऋतू स्वतःचं नाव ऐकताच दचकली.तिच्यासाठी वाजणाऱ्या टाळ्या पाहून तिला आतुन आतून खूप भरून येत होतं. तिने वेद्कडे बघितलं,हाताने स्माईलचा इशारा देत त्यानेही टाळ्या वाजवल्या. दोन लोकं मात्र मनापासून दुःखी झाली होती ते म्हणजे रेवा आणि जय.

“आरुषने इन्चार्जला पटवलं असेल हिला घ्यायला नक्कीच” असा खवचट टोमणा तिने मारला. वेदने तिच्या ह्या कमेंटवर नाराजी दर्शवली पण तोंड वेंगाडत ती निघून गेली.
सिलेक्ट झालेल्या टीमच्या आनंदातच आलेला दिवस संपला.

**********

टीमचे पुढचे ५/६ दिवस डॉक्युमेंटेशन, अपलोडिंग, फॉर्माटिंग, एडिटिंग यातच जाणार होते.टीम सिलेक्शन होऊन दोन दिवस झाले होते.लंचब्रेकला रेवा आणि जयच होते,वेद आज on duty मिटींगला होता आणि अजून परतलेला नव्हता.

“रेवा एकदम अगरबत्ती गोष्ट झालीयं...तू तर आनंदाने उडशील...” जेवण सुरु करत जय म्हणाला.

“अगरबत्ती?काय झालं.. ?” तिने गोंधळून विचारलं.

“अरे बाबा.. म्हणजे विना जाळ,विना आग...सुमडीत फक्त सुवास एकदम अगरबत्ती टाईप्स गोष्ट.” तो हसत म्हणाला.

“ये शीsssss काय रे जोक करतोस जय...” तिला हसू आवरत नव्हतं.

“अग त्या ऋतूला कसं expose करतो बघ वेदसमोर..! आपल्या वेदला आजकाल खूप पुळका येतोय असं मला वाटतंय..तर ती मुलगी कशी आहे ते मी त्याला दाखवून देणार..भक्कम प्रूफ आहे आपल्याकडे.फक्त आता विचारू नको काम झाल्यावर सांगेन. आता बघ च तू..”

“काय ...”

“अरे तू साक्षात बघ......!! आता ओन्ली राडा राडा शनिवार वाडा........”
हवेत तलवार फिरवल्या सारखं करत तो म्हणाला.
त्याच्या ह्या आवेशावर कितीतरी वेळ जेवायचं विसरून रेवा खळखळून हसत होती.तिला खूप दिवसांनी असं हसतांना बघून जय सुद्धा समाधानाने हसला.

**********

“जय अगदी लवकर बोल काय सांगायचं होतं तुला. केव्हांचे मेसेज टाकतोय भेटायचं बोलायचं..” त्याच दिवशी पार्किंगमध्ये वेद आणि जय बोलत उभे होते.

“हो सांगतो...धीर धर...मला सांग मागे रेवावर चिडला होतास ना की त्या अप्सरेला एकटं सोडलं म्हणून..आता सांगू तुझी ती अप्सरा ऑफिस सुटल्यावर लगेच घरी जात नाहीये तर ८ वाजता इथून निघतेय आणि एक अजून आनंदाची गोष्ट म्हणजे साक्षात आरुषही सकाळी फोनवर सांगत होता कुणाला गेला की त्याला घरी जायला ११ वाजत आहे सध्या.आता बोल..विचार कर काय कनेक्शन असेल!!” तो जिंकल्याच्या अविर्भावात म्हणाला.

त्याच्या ह्या बोलण्याने मात्र वेद चिडला त्याची कॉलर गच्च धरून तो म्हणाला-
“ये साक्षात...खुन्नससाठी मुलीच्या कॅरेक्टरवर पण घसरायला लागला का...एक शब्दसुद्धा तिच्यासाठी वेडावाकडा काढायचा नाही.”

कुत्सितपणे हसत त्याचे हात कॉलरवरून काढत जय म्हणाला –
“ भावा...मी गृहीत धरलं होतं तुझी हीच reaction येणार..पण तुला साक्षात्कार घडणं गरजेचं आहे तेव्हा आजही थांब..आरुष अजूनही आहे वर ..ती बघ तिची प्लेझर ..आता ८ वाजता बघ बरोबर बाहेर पडेल...ओके भेटू उद्या तीर्थप्रसादाला वेळेवर डोळे उघडले तर..”

वेद्ला गोंधळात टाकून तो निघून गेला. जय आपल्याशी असं खोटं बोलणं शक्य नाही म्हणून तो विचारात पडला..इतक्या मोठ्या बिजनेस सेंटरमध्ये तिला शोधणं ही शक्य नव्हतं.तो समोरच्या टपरीजवळ गाडीवर बसून राहींला.वेळ अगदी धीम्या गतीने सरकत आहे असं त्याला राहून राहून वाटत होतं,तिला फोन करावा का? मेसेज करावा का...मनात आलेले कितीतरी विचार तो उडवून लावत होता. आठ वाजले तरी तिचा पत्ता नव्हता. जरावेळाने मात्र त्याला ती दिसली.तिने स्कार्फ गुंडाळला,हेल्मेट घातलं आणि ती निघूनही गेली.त्याने पाहिलं फोरव्हीलर पार्किंगमध्ये आरुष ची गाडी अजूनही होती. जय ने डोक्यात सोडलेला संशयाचा किडा मिनटागणिक वाढत होता.त्याने रागातच गाडी सुरु केली आणि तो निघाला.

***********
आज प्रोजेक्ट मिटींगमध्ये वेदचं लक्ष लागत नव्हतं, सारखा विचार करून पुरेशी झोप ही झालेली नव्हती.आज ती अगदी नक्षत्रासारखी दिसत असली तरी तिच्याकडे पाहून त्याला संताप येत होता.त्याच्या चेहर्यावरची नाराजी ती वाचू शकत होती.त्यामुळे तिची सुद्धा तगमग होतं होती.जय हे पाहून मनोमन सुखावला होता.केव्हा एकदा रेवाला हे सगळं ब्रीफ करतो असं त्याला झालं.

प्रोजेक्टच्या पहिल्या फेजसाठी दोन दिवस ऑनसाईट जावं लागणार होतं,त्यासाठी मिटिंगनंतर लगेच प्लानिंग इन्चार्जकडे डेटा अपडेशन करायचं होतं.ऋतुजा डेटा अपडेट करत असतांना वेद तिथे पोहचला.
समोर बसलेल्या इन्चार्ज सायलीला तो म्हणाला-
“सायली क्रियेटीव्ह टीम मधून एक कुणीही असलं तरी चालेल ना?..मला नाही जायचंय,म्हणजे तशी गरज नाहीये.”

शेजारी सिस्टमसमोर असलेल्या ऋतू मात्र हवालदिल झाली होती. तिने जरा नजर वर करून त्याच्याकडे पाहिलं,त्याच्या चेहऱ्यावर सगळा संताप एकवटला होता.एक शब्द ही न बोलता काही दिवसांपासून चालू असलेलं हे आंबटगोड शीत युद्ध आज अगदी तिखट झालं होतं.”
कुठल्यातरी कारणाने हा भयंकर चिडला आहे हे मात्र तिने ओळखलं.वेद सोबत नसणार ह्या विचारानेच ती अस्वस्थ झाली.
त्याचं पूर्ण म्हणणं ऐकून घेत सायली म्हणाली-

“ठीक आहे तसा मेल मला तुझ्या टीम लीडर कडून येऊ दे मग मी डीलीट करते तुझं स्टेटस,ओके”

“ओके, येईल मेल तुला. थँक्स” तो तिरमिरीत निघून गेला.

दिवसभर कामात दोघांचंही लक्ष नव्हतं,आज खुश तर रेवा आणि जय होते.जयने सगळा प्रसंग मस्त रंगवून सांगितला आणि जय ऑनसाईट जाणार नसल्याचं सांगितल्यावर तर रेवाला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या.

ऑफिसनंतर कुणाशीही न बोलता तो सरळ पार्किंगला गेला,खरंतर त्याला खुठेतरी एकांतात जाऊन मोठ्यानं रडावसं वाटत होतं..सारखा विचार करून अजून संताप वाढत होता. त्याने जरा गाडी वळवली तसं दुसऱ्या गेटच्या वॉचमन सोबत बोलतांना ऋतुजा दिसली. तिने पर्समधून काही पैसे काढले आणि बळेच वॉचमनच्या हातात कोंबले आजू थोडं काही बोलून ती निघून गेली. आता त्याचा पार अगदी चढला,त्याने गाडी दुसऱ्या गेटल आणली अगदी वॉचमन समोर लावली आणि त्याची कॉलर पकडली
.
“चल बोल पटकन...साल्या कसले पैसे घेतो रे तू पोरींकडून? तोंड बंद ठेवायचे का?..काय चालूये बऱ्याबोलाने सांग...नाहीतर...”

त्याचा उगारलेला हात व्यायामाने घोटीव झालेला बलदंड हात पाहून तो दबकला.

“साहेब सांगतो पण कंपलेंट तेवढी करू नका..” विनंती करत तो म्हणाला.

“ये साल्या बोल पटकन.....चल” वैतागत तो म्हणाला.

“साहेब माझा पोरगं आहे पाचवीत,त्याला घेऊन येत असतो मी,गाड्या पुसायला तेवढीच वर कमाई होते,त्या दिवशी ऋतू मॅडमच्या गाडीवर अभ्यास करत बसलेलं, हुशार आहे तो,मॅडम बोलली त्याच्याशी,त्याने सांगितलं इथे गाड्या पुसतो म्हणून आणि माझा पोरगा आहे म्हणून. कुठलीतरी परीक्षा देतोय त्याचा अभ्यास करत होता.ऋतू मॅडम म्हणाल्या असा नाही करत त्या परीक्षेचा अभ्यास उद्या पुस्तकं घेऊन ये मी सांगते तुला. इथंच आपलं पहिल्या मजल्यावरच्या मागल्या बाकड्यावर दोन तीन दिवस अभ्यास घेतला त्याचा,आज त्याच वाढदिवस म्हणून त्याला नव्या ड्रेससाठी पैसे दिले,परीक्षेला नवा ड्रेस घालून जा म्हणून...मी नाही हो मागितले साहेब,माझी कम्प्लेन करू नका.”

केसांमधून हात फिरवत,गालात हसत त्याने,वॉलेटमधून काही पैसे काढून त्याचा हातात देत म्हणाला-माझ्याकडून सुद्धा ड्रेस घे त्याला...”

घाईघाईत त्याने सायलीला मेल केला-“I am in for onsite, will update the data by night”

उद्या जयला काय सुनवायचं ह्याचा विचार आणि स्वतःच्या विचारांची कीव करतच तो घरी गेला.

************

“बेन्देवाडी” असा जुनाट,मळकट हिरवट बोर्ड पाहून गाडी आत वळली.

नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ,लहान मोठ्या टेकड्या, छोटे मोठे झरे,अंगाला झोंबेल आणि ज्याचा वासच पावसाळी आहे असा ओलेता वारा...ऋतूला तर हे सगळं किती डोळ्यात साठवू असं झालेलं.वेद येणार नाही म्हणून नाराजीने ती कंपनीपासून गाडीत बसली खरी पण कश्यातच रस वाटत नव्हता.गाडी निघणार तसं कुणाचा तरी फोन वाजला आणि त्याने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली.अगदी धावतच येऊन तो गाडीत बसला.त्याने डोळ्यांनीच जणू तिला गच्च मिठी मारली.तिलाही त्याची कॉलर घट्ट पकडून विचारावं वाटलं-“का त्रास देतो रे?”,

ती फक्त हसली..कारण बोलणार तर कुणीच नव्हतं!

प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली तेव्हा मात्र ऑफिसमध्ये बसून प्रेसेंटेशन बनवणं आणि ते प्रॅक्टिकल इम्प्लिमेंट करणं किती अवघड आहे हे पहिल्या दोन तीन तासातच टीम मधल्या जुनियर्सला कळून आलं.

वेद्च्या स्क्रिप्टमधल्या शेवटच्या काही ओळींचा अक्चुअल स्टोरी बोर्ड बनवायची वेळ आली.लोकल गाईडने त्यांना ठरल्याप्रमाणे धबधब्याकडे आणले.
पार उंचावरून कोसळणारं शुभ्र फेसाळ पाणी..त्या पाण्याच्या पडद्यामागे असलेला मोठा बोगदा..आणि वातावरण व्यापणारा कोसळत्या पाण्याचा आवाज,पाण्याचा थंडगार स्पर्श..आणि आज अगदी सरप्राईज गिफ्ट सारखा समोर आलेला ‘वेद’ तिला हे सगळं स्वप्नवत वाटतं होतं,तर ह्या वातावरणाची भूल पडून,
किती टोकाचा विचार करतो आपण हिच्या बाबतीत,हे असं का होतं..ह्या गर्तेत सापडलेला तो ..हळूहळू हरवत चालले होते थोडे त्या वातावरणात थोडे एकमेकांच्या विचारात.

वेद्च्या स्क्रिप्टसाठी अपेक्षित असलेला परिणाम साधला जात नव्हता, धबधब्याच्या मागच्या बोगद्याच्या एका बाजूला असलेल्या दगडावर उभं राहून एकमेकांच्या डोक्याला डोकं टेकवून उभं राहायचं होतं त्यानंतर ते दोघं ब्लर होतील आणि पाण्याच्या एक झिरमिळीत पडदा प्रॉमिनंट होईल.
प्रोडक्शन मधले जे दोन हा सीन करायला गेले त्यांची उंची जुळत नव्हती,वेगवेगळे अंगल,जागा बदलवून पाहिलं पण हवं ते मिळतं नव्हतं.जेवायची वेळ ही झाली होती. वैतागून हे सगळं पुन्हा ब्रेक नंतर करूया म्हणून ते रिसोर्टकडे निघाले. आपल्याला पाहिजे ते का मिळत नाहीये म्हणून ऋतू एकटीच बाजूने त्या बोगद्याकडे निघाली.

शूजची लेस व्यवस्थित करत असलेल्या वेदला ती तिकडे जातांना दिसली.तो न राहवून ओरडला-

“ ऋतुजा,मागे फिर..निसरडी जागा आहे..नंतर बघू काय ते, चल,सगळे गेलेत पुढे”

“तू जा मला प्रॉपर अँगल हवाय तो नेमका कुठे मिळेल हे समजत नाही तोपर्यंत मी येणार नाही.”

बोगद्याच्या मध्यभागी पोहचल्यावर, ओरडून ती म्हणाली.
डोक्याला हात मारत तो तिच्या मागे गेला.

ती एवढी स्क्रिप्टमध्ये गुंगली होती की तो मागे उभा आहे हे ही तिला कळलं नाही.ती स्वतःशीच काही आखाडे मांडत,बोलत होती आणि मागे वळून एकदम त्यालाच धडकली.
त्याने तिला खांद्याला धरून सांभाळलं आणि सरळ उभं केलं न म्हणाला-
“निघूया?”

तो आताही अगदी समोर होता..त्याच्या केसांवर उडालेले बारीक बारीक पाण्याचे तुषार, हलक्याश्या स्माईलला उगाच गार्निश करत पडलेल्या खळ्या..आता मात्र ती सावरू शकली नाही,अनिमिषपणे त्याच्या त्या खळ्यांत सावकाश हरवत गेली.

तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला-

“निघायचं ना ? काय प्रॉब्लेम ये ?”

“डिंपल”

“काय्य?काय प्रॉब्लेम आहे म्हटलीस?” तो अविश्वासाने जरा हसून म्हणाला.

“डिंपल”

त्याच्या डोळ्यात आरपार बघत ती म्हणाली. तिने अजूनही त्याच्या चेहऱ्यावरून नजर हटवली नव्हती.

त्याने बोटाने त्याच्या गालांवरच्या खळीकडे इशारा करत हळूच विचारलं-

“डिंपल?”

अजूनही त्याच गुंगीत तिने मान होकारार्थी मान डोलावली,आता ह्या क्षणी तिला ,त्याला ओरडून सांगावस वाटत होतं…

”हो तुझे हे डिंपल माझा प्रॉब्लेम आहे,they are illegal…,त्यांचा कॉपीराईट मीच घेणार”

पण क्षणभरच आणि एकदम भानावर आली हृदयाची धडधड समोर ऐकू येईल एवढी वाढली होती ती चाचरत म्हणाली..

“I…I mean dimple…डिंपल कपाडिया.!! येस….तिचा एक सीन आहे असा धबधब्या जवळचा तो आठवतेय मी...असं म्हणायचं होतं मला.”

तिची झालेली ही गोड फजिती पाहून त्याला अजूनच हसू आलं.तो किंचित पुढे आला. कालपर्यंत दूर वाटणारा आज तो अगदी जवळ होता अगदी श्वासाच्या अंतरावर.....

क्रमशः

©हर्षदा

कळावे,
लोभ असावा.(आणि तो कमेंट मधून दिसावा 😂😂😂)