मोहन नुकताच शाळेतून घरी आला होता. हात पाय धुता धुता त्याने बापाला विचारले, " आज नाही गेलात तुम्ही?"
मान वर न करताच शंकर फक्त "हं " म्हणाला. कसल्यातरी जुनाट लालसर कागदात, जो कधी काली पांढरा असावा, त्यात डोकं खुपसून तो बसला होता.
"कसलं खुळ लागलयं कुणास ठाऊक ? दुपारपासनं त्यात डोकं घालून बसलेत." शांता वैतागुन बडबडत होती. नेहमी कामावर जाणारा माणूस आज घरीच बसला त्यामुळे आजचा रोजगार बुडाला, तेवढेच शे - दोनशे रुपये रोजचे मिळतात तर आज ते पण नाही.
शंकरकडं त्याच्या वडिलोपार्जित एक नाव होती. तिच्यावरच तो आणखी दोन साथीदारांसोबत मासेमारी करत. पण तीही आता मोडकळीस आली होती. तसेच कसेतरी तिच्यावर तो दिवस काढत होता. संध्याकाळी शहरातल्या मच्छिबाजारात जाऊन तो पकडलेले मासे विकायचा.
तसा तिथल्या माशांना प्रचंड भाव मिळत. लाल 'गाव्ह्णी ' माशांवर तर व्यापारी तुटून पडत, ते मासे थेट परदेशात पाठवले जायचे. त्यामुळे बोलीत त्यांना भरपूर रक्कम मिळायची. पण 'गाव्हणी' मासे पकडायचे म्हणजे खोल समुद्रात जावं लागायचं आणि त्यासाठी खास मासेमारीसाठी असलेली आधुनिक बोट लागायची. मग अशा नाव भरून माशांना हजारांपासून ते अगदी लाखात बोली लागायच्या.
शंकर साठी अशी बोट विकत घेणं म्हणजे स्वप्नंच होतं. तसे शंकरचे वडील चांगले धनाढ्य व्यक्ती होते. आजच्यासारख्या आधुनिक नसल्या तरी स्वतःच्या मालकीच्या दोन नावा होत्या त्यांच्याकडे त्यावेळेस मासेमारी खोल समुद्रात होत नव्हती, ती जवळच्याच एका बेटावर होत होती.
पण सगळे दिवस एकसारखेच राहत नाहीत. घटनांमागून घटना घडत गेल्या एक एक नवीन आपत्तीने त्यांना वेढले आणि होत्याचं नव्हतं झालं. बाप मरताना शंकरला विरासतीत मिळाली ती म्हणजे एक नाव, एक घर आणि त्या घराएवढंच डोक्यावर कर्जाचं ओझं.
"कसला नकाशा आहे?" भूतकाळात हरवलेल्या आपल्या बापाला मोहनने विचारले. ते ऐकून शंकर भानावर आला आणि "काही नाही" म्हणत त्याने तो नकाशा गुंडाळून ठेवला.
"उद्या आणि परवा आम्हाला सुट्टी आहे." मोहन आईला सांगत होता. ते ऐकून शंकरचे डोळे चमकले. "चला, एका दृष्टीने चांगली गोष्ट झाली. मला तेवढीच मदत" त्याने मनात विचार केला.
"बरं मग दोन दिवस चाल तू माझ्याबरोबर" शंकर मोहनला म्हणाला. याबरोबर शांताने रागाने त्याच्याकडे पहिले. पण तिला दुर्लक्षित करत तो मोहनकडेच पाहत राहिला. मोहनही लगेचच हो म्हणाला त्यामुळे शांताला गप्प राहण्याशिवाय पर्यायच नव्हता.
"ठीक आहे. उद्या सकाळी लवकर निघू." शंकर मनातून खूप खुश होता. 'एकापेक्षा दोघे केव्हाही चांगलेच'. "आणि उद्या आम्ही उशिरा येऊ. थोडं लांब जाणार आहे."
"पण आधीच ती नाव मोडकळीस आलीये आणि त्यात ....." शांता ने प्रश्न उपस्थित केलाच होता कि तिला तोडत शंकर म्हणाला," मी एक मोटार बोट भाड्याने घेतली आहे. ४-५ दिवसांसाठी ..... तू काळजी नको करुस." अचानक मागे वळत तो म्हणाल," आणि हा उद्या काहीतरी न्याहारी बांधून दे दोघांसाठी"
"बरं " शांता बसक्या आवाजात म्हणाली. कितीही राग लाल तरी तिला आपल्या पतीवर पूर्ण विश्वास होता. तो जे काही करेल ते आपल्या भल्यासाठीच करेल याची तिला खात्री होती. म्हणून तिने अधिक चौकशी न करता लगेच होकार दिला.
सकाळी सकाळी दोघंही घराबाहेर पडले. सोबत आवश्यक असणारी सगळी सामग्री त्यांनी घेतली होती. एक छोटी काळ्या रंगाची लोखंडी पेटी, एक जाड दोरखंड आणि दोन सामानानं गच्चं भरलेल्या पिशव्या. एवढा सगळं सरंजाम त्यांच्याबरोबर होता.
समुद्र किनाऱ्याला धक्याला लागून अनेक बोटी लाटांवर वर खाली डोलत आपापल्या मालकांची वाट पाहत उभ्या होत्या. शिकारी पूर्वी आरामात पहुडलेल्या वाघिणींसारख्या. धक्क्यावर बरीच गर्दी होती. अनेक लोक इकडून तिकडे घाई घाईत जात होते. काही आपली नाव पाण्यात उतरवायची तयारी करत होते.
क्रमश: