Ashmand - 1 in Marathi Fiction Stories by Kumar Sonavane books and stories PDF | अष्मांड - भाग १

Featured Books
  • మీ టూ

    “సుకుమారమైన పువ్వుకి కూడా తుమ్మెద బరువు కాదు. మీరు మరీ అంత బ...

  • నెవెర్ జడ్జ్ ఏ Women - 5

    మౌనిక: రష్యా వెళ్లేముందు సార్ నాతో  చాలా మాట్లాడారు.ఒక వైపు...

  • ఆ ఊరి పక్కనే ఒక ఏరు - 23

    ఆ ఊరి పక్కనే ఒక ఏరు (ఏ స్పైసీ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్) శివ...

  • నెవెర్ జడ్జ్ ఏ Women - 4

    సూర్య ఇండియాకి వస్తుంది.తనకి తెలియకుండా కొంతమంది తనని Airpor...

  • మన్మథుడు

    "ఇక చెప్పింది చాల్లే అమ్మాయ్.. నీకు ఎంతవరకు అర్ధమయిందోకాని మ...

Categories
Share

अष्मांड - भाग १

मध्यरात्र उलटून गेली तरी शंकर अजून झोपला नव्हता. खाटेवर उताणा पडून आकाशाकडे एकटक पाहत तो आपल्याच विचारात गुंग होता. आकाशात सर्वत्र पौर्णिमेचे चांदणं विखुरलेलं होतं. वाऱ्याची एक मंद झुळूक वातावरण उल्हसीत करत होती. प्रत्येक झुळूक हवेतला गारवा आणखीनच वाढवत होती. नेहमी उकाड्याने हैराण करणारी रात्र आज मात्र मनमोहक सौंदर्याने नटली होती. पण शंकर ते सौंदर्य अनुभवण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हता. किंबहुना वातावरणातला बदल त्याच्या लक्षातसुद्धा आला नव्हता.


आजूबाजूचा परिसर त्या मनमोहक गारव्यात चिंब न्हात असताना शंकरच्या डोक्यात मात्र विचारांचा भडका उडाला होता. अश्या अनेक रात्री त्याने विचारात जागवल्या होत्या. आजही ते धाडस करायला तो धजावत नव्हता. बायको मुलांची काळजी त्याला सतावत होती. पण त्यांच्याच सुखी भवितव्यासाठी हे पाऊल उचलायला तो भाग पडत होता. वादळात अडकलेल्या नावेसारखं त्याचं मन विचारांच्या लाटेवर हिंदोळे खात होते. जणू उंच उंच लाटा त्याला उचलून खाली आपटत होत्या.


रात्र सरल तशी विचारांची आगही वाढतच गेली आणि वाढता वाढता ती एवढी वाढली कि आता त्याच्या देहाचीच ती राख करेल असं त्याला वाटू लागले. काही केल्या आज त्याला याचा सोक्षमोक्ष लावायचा होता. त्याने डोळे घट्ट मिटून घेतले, हाताच्या मुठी आवळल्या, एक दीर्घ श्वास घेतला आणि एकदम बिछान्यात उठून बसत तो ओरडला, "उद्याच .... हो उद्याच.... मग जे होतील ते होईल." त्याचबरोबर गडगडाटी आवाज झाला आणि लख्खकन एक वीज त्याच्या डोळ्यासमोर चमकली जणू देवानेच त्याला कौल दिला. "का हि चेतावणी तर नसेल?" त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पण लगेच त्याने तो विचार झटकून टाकला. त्याचा निर्णय पक्का होता.

पण तो निर्णय किती धोकादायक आहे याची त्याला कल्पना होती अजूनही त्याचे शरीर थरथरत होते. वातावरणात इतका थंडावा असतानाही त्याला घाम फुटला होता. त्याने सभोवार नजर फिरवली. वातावरणात झालेला बदल आता कुठे त्याच्या लक्षात आला. इतक्यात आणखीन एक वीज कडाडली आणि पावसाचे टपोरे टपोरे थेंब त्याच्या उघड्या पिळदार शरीरावर आदळू लागले. "वळवाचा पाऊस!" तो उद्गारला आणि खाली उतरून खाटेवरचं अंथरून गोळा करू लागला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान तरळत होते. अनेक दिवस भीजत ठेवलेल्या घोंगड्याचा आज त्याने निकाल लावला होता.
पावसाने जोर धरला आणि चार महिने कडक तापलेली ती जमीन त्या वर्षावाने मोहरून गेली. सगळीकडे एक मंद धुंद सुगंध पसरला होता.
एका हातात पांघरून घेत शंकरने दारावर थाप टाकली. "शांता ..... शांता ....". त्याच्या बायकोने दार उघडले आणि तो आत गेला.

-o-

"का हो? न जेवताच एवढ्या घाईने कुठे निघालात?" शांत नवऱ्याची गडबड बघून म्हणाली.
"मी आलोच. काम आहे थोडं. तू जेऊन घे. मला वेळ लागेल." खुंट्यावरच उपरणं खांद्यावर टाकत शंकर म्हणाला.
"आणि आज तरी मोहनला शाळेत पाठव, दोन दिवस झाले घरातच बसून आहे तो." चपला पायात सरकवत दराबाहेरून तो ओरडला.
"तुम्हीच नेलं होतं ना त्याला मासेमारी शिकवायला...... सवय नव्हती आणि पडला आजारी. नाहीतरी शाळेचा गणवेष नाहीये त्याच्याकडे, जुना फाटलाय आणि नवीन शिवायला तुम्ही पैसे देत नाही. सारखा भुणभुण करतो माझ्यामागं कपड्यांसाठी, फाटकी कपडे घालून किती दिवस जायचं त्याने."
शांताच्या या अनपेक्षित हल्याने शंकर थोडा वरमला आणि "बरं बरं ठीक आहे.... बघू नंतर." असं म्हणत झपाझपा पावलं टाकत तो निघून गेला.

शांता आणि शंकर यांचा एकुलता एक मुलगा मोहन. दिसायला बापासारखाच उभट चेहरा, लांब शिडशिडीत नाक, भरदार शरीरयष्टी, जाड - राठ भुवया आणि तेल लावल्यासारखा तुकतुकीत अंग. समुद्र किनाऱ्याचं गाव, त्यात उष्मा भयंकर आणि दमट वातावरण त्यामुळे 'सावडी' गावातले सगळेच गावकरी रंगाने कमी अधिक प्रमाणात एकसारखेच दिसायचे काळपट. मोहनही तसाच पण त्यातल्या त्यात थोडा उजळ. रंगाने तो आईवर गेला होता. पण बापाच्या अंगाला येणार माशांचा तेलकट वास कधी त्याच्या अंगाला शिवला नाही. शांताने तो कधी शिवूच दिला नाही.

आपल्या मुलाने शिकून मोठा व्हावं आणि सुखात राहावं हीच तिची इच्छा, शंकरलाही तसच वाटायचं. आपल्या मुलाने आपल्या सारखं या मासेमारीच्या व्यवसायात पडू नये म्हणून त्याने मोहनला जवळच्याच शहरात एक चांगल्या प्रथितयश शाळेत शिक्षणासाठी पाठवले होते. त्यांची फी परवडत नसून सुध्दा.
मोहनही तसाच हुशार होता. परिस्थिती नसतानाही आईवडील आपल्याला असं शिक्षण देतायत याची त्याला जाणीव होती. तोही मन लावून अभ्यास करायचा. नुकताच तो दहावीत गेला होता.

रोज दूर शाळेत जाणं आणी घरी अभ्यास यामुळं त्याचा मासेमारीशी कधी संबंधच नव्हता आला. मासेमारीच्या आपल्या पिढीजात व्यवसायाबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती. काहीही झाले तरी त्याला आपल्या धंद्याची थोडी तरी जाण असावी म्हणून शंकर त्याला सुट्टीत चार - पाच दिवस समुद्रावर घेऊन गेला. पण ते मासे, त्यांचा वास, समुद्राचं पाणी यात राहून तो आजारी पडला.

क्रमशः