Reunion Part 12 in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पुनर्भेट भाग १२

Featured Books
Categories
Share

पुनर्भेट भाग १२

पुनर्भेट भाग ११

आणि मग चार पाच दिवसातच काकांनी दवाखान्यात प्राण सोडला .
शेवटपर्यंत ते शुद्धीवर मात्र आलेच नाहीत .
त्यांच्याशी कोणाचेच बोलणे होऊ शकले नाही .
काकुने तर रडून नुसता गोंधळ घातला होता .
काकु आणि मेघनाकडे लक्ष देता देता रमाला स्वतःचे दुख्ख: मनातच दाबायला लागत होते .
रमाने आता तिच्या घरचे बांधुन ठेवलेले सर्व सामान काकांच्या घरी आणले
आणि घरमालकांना उरलेले पैसे देऊन ते घर सोडले .
काय काय स्वप्ने पाहिली होती या घरात प्रवेश करताना आणि काय होऊन बसले होते .
घर सोडताना रमाचा जीव तीळतीळ तुटत होता .
त्यानंतरची वर्षे रमासाठी खुप कठीण होती .
काकु दिवसेदिवस खंगत चालली होती
काकांच्या नंतर जणु ती या आयुष्यातून निवृत्तच झाली होती .
काकुच्या अशा अवस्थेमुळे रमाला नोकरी करणे कठीण झाले
कारण मेघनाला तिच्यावर सोपवताच येत नव्हते .
मात्र मेघनाला खेळताना पाहून काकुच्या चेहेऱ्यावर जो आनंद दिसत असे
तितका रमासाठी खुप होता .
आईच्या जागी असलेल्या काकुला आनंदी बघणे इतकेच रमाला हवे होते .
या परिस्थितीत रमाने नोकरी सोडुन दिली.
मिळालेले थोडे पैसे बँकेत ठेवून घर चालवू लागली .
तसे थोडेफार तिच्या वडिलांचे पैसे पण अजुन होते काकांच्या खात्यावर
ते क्लेम करून तिने ताब्यात घेतले .
या सर्व खटपटीत मोहन भावासारखा तिच्या पाठीशी होता .
सतीशचा पत्ता अजूनही लागला नव्हताच .
हळूहळू पोलिसांनी ती केस बंद करून टाकली
आणि सतीशच्या परतीची आशा होती तीही बंद झाली .
एक दीड वर्ष कसेतरी पार पडले आणि काकुला कर्करोगाचे निदान झाले .
बऱ्याच तपासण्या झाल्या .
नंतर केमोथेरपी चालू झाली .
काकुला ते सर्व अजिबात सहन होत नव्हते .
या वृद्ध अवस्थेत तिला होणाऱ्या यातना रमालाही बघवत नव्हत्या .
एक वर्षभराच्या इतक्या सगळ्या उपचारानंतर ती आता तर पूर्ण थकली होती .
आता तर तिची जगण्याची इच्छा पण जवळ जवळ संपली होती .
तिच्या डोळ्यात जणु ज्योतीच राहिली नव्हती.
अखेर सहा महिन्यानंतर तिचा मृत्यू झाला .
रमा अखेर पूर्णपणे पोरकी झाली होती .
पण रडण्यासाठी अक्षरशः तिच्या डोळ्यात अश्रूच शिल्लक नव्हते .
मोहन सुद्धा हे सगळे पहाताना चक्रावून गेला होता .
या सगळ्या चारपाच वर्षाच्या रमाच्या आयुष्यातील घटनांचा तोच तर साक्षीदार होता .
काय काय भोगले होते रमाने या काळात !!!
रमाच्या पुढे तर संकटांची मालिकाच लागली होती.

मेघना पण आता चार साडेचार वर्षाची होती .
तिने तिच्या आजी आबांच्या सोबत तिचे बालपण घालवले होते त्यामुळे
ती पण सारखी आजी आबांचे नाव काढत असे .
एक मात्र विशेष होते कसे कोण जाणे पण तिने बाबाचे नावच घ्यायचे बंद केले होते .
मोहनला मात्र ती मामा म्हणत असे ..खुप लाडकी होती त्याची ती!
घरी आला की आधी तिला जवळ घेतल्याशिवाय तो कोणाशीच बोलत नसे
काकुंचे दिवसकार्य संपले आता पुढे कसे कसे काय करावे लागेल
याचा रमा विचार करीत होती .
कारण काकुच्या या दुर्धर आजारपणात अफाट पैसा खर्च झाला होता .
जवळची सगळीच्या सगळी पुंजी संपली होती .
आत्ता तर साधी नोकरी पण नव्हती ..भविष्याचा विचार तर दूरचा होता .
मेघना हळूहळू मोठी होत होती .
कसे काय सगळ निभवायचे ..
पण तिला काय ठाऊक होते की अजुन एक संकट तिच्यापुढे आ वासून उभे होते .
वाड्याचे मालक,काकांचे मित्र कधीच निवर्तले होते .
आता कारभार त्यांच्या मुलाकडे होता .
तो रमाला भेटायला आला आणि त्याने रमाला घर सोडायची विनंती केली.
त्याच्या म्हणण्याप्रमाणे वडिलांचे मित्र आणि एक वृद्ध दाम्पत्य
म्हणून त्याने काकांना नाममात्र भाड्यात वाड्यात ठेवले होते .
आता काकाकाकु दोघेही हयात नव्हते आणि रमाचा या जागेवर काहीच हक्क नव्हता
यापुढे त्याला जास्ती नुकसान झेपणार नव्हते .
शिवाय त्याला आता वाड्याची दुरुस्ती करून नुतनीकरण करायचे होते.
अशा परिस्थितीत तो सर्वच भाडेकरूंना नोटीस देणार होता.
रमाला त्याने आठ दिवसात घर खाली करायला सांगितले .
आता हे ऐकुन तर रमाच्या पायाखालची जमीनच सरकली.
दुसऱ्याच दिवशी तिने फोन करून मोहनला बोलावून घेतले.
मोहनला पाहिले की मेघना मात्र खुष होत असे .
घरात काय घडतेय ते तिला दिसत होते .
पण तिच्या बालमनाला याचे आकलन होत नव्हते.
आधी आबा आणि आता आजी बाप्पाकडे गेली असे आई मात्र तिला सांगत असे .
मोहनमामा मात्र आला की तिचे विश्व बदलुन जात असे .
नेहेमीप्रमाणे मोहनने तिच्यासाठी आणलेला खाऊ तिच्या ताब्यात दिला .
आणि तिच्याशी खेळत खेळत रमाला काय झाले ते विचारले
रमाचे सगळे त्याने ऐकुन घेतले व नेहेमीप्रमाणे तिला धीर दिला .
आणि या गोष्टीवर काय मार्ग काढता येईल ते उद्या सांगेन असे बोलून तो निघून गेला.
दोन तीन दिवस त्याचा काहीच पत्ता नव्हता .
रमा बेचैन होती ,घर सोडायची मुदत जवळ आली होती .
सारखा सारखा मोहनला फोन करणे पण तिला अप्रशस्त वाटत होते .
तिसऱ्या दिवशी मात्र तो सकाळीच आला .
आणि त्याने रमाला तिचे सर्व सामान बांधायला सांगितले .
पुण्याजवळच्या एका लहान उपनगरात त्याने तिच्यासाठी घर आणि काम पाहिले होते .
त्याच्या एका मित्राचे मेडिकल दुकान होते .
तिथे रमाला हिशोब पहायची नोकरी मिळत होती .
शिवाय त्याच्याच वाड्यात दोन रिकाम्या खोल्याही तिला भाड्याने द्यायला तो तयार होता .
मित्र भला होता ..अनेक वर्षांची त्यांची मैत्री होती .
मोहनचा त्याच्यावर विश्वास होता .
त्यानेही मित्रप्रेमाखातर हे सारे करायची तयारी दाखवली होती .
हे ऐकुन रमाचा जीव भांड्यात पडला..
मनोमन तिने देवाला नमस्कार केला .
“मोहन तुमचे हे उपकार कधी फिटतील माझ्याकडून ..
असे म्हणून तिने डोळ्यात पाणी काढले ..
“वहिनी भाऊ म्हणता न मला ..मग इतके तर मला करायलाच हवे”
मी सुद्धा दोन दिवस रजा घेतली आहे .
तुम्हा दोघींची नीट व्यवस्था लावूनच मी परत येईन “
आवरायचे फारसे काही नव्हतेच त्या छोट्या घरात
दुपारपर्यंत वाड्यातील सर्वांचा निरोप घेऊन घरमालकांना किल्ली देऊन रमा बाहेर पडली .
वाड्यात मेघनाने खुप दोस्त मंडळी जोडली होती .
सर्वांना वाईट वाटले ..पण मेघना मात्र नव्या गावी जायचे म्हणून जाम खुष होती .
पुण्यातल्या त्या उपनगरात पोचल्यावर आणि मोहनच्या मित्राला भेटल्यावर
रमा खरोखर आश्वस्त झाली .
मोहनच्या मित्राने त्यांना लागलीच आपल्या घरीच जेवायला नेले .
त्याच्या घरची सर्वचजण खुप चांगली होती .
सर्वांनी मोहनला आश्वासन दिले की ते रमाची आणि मेघनाची चांगली काळजी घेतील .
एका मोठ्या वाड्यात दोन लहान खोल्या होत्या .
वाडा मोठा आणि गजबजलेला होता .
वाड्यातल्या वास्तव्याची त्या दोघींना सवय होतीच .
तशात मोहनच्या मित्राने दोघींविषयी सर्व कल्पना दिली असल्याने
सर्वांनी अगदी प्रेमाने दोघींचे स्वागत केले .
मेघनाला सुद्धा भरपूर मित्रमैत्रिणी मिळाल्या .
वाड्यातील एका आजींकडे मेघनाला ठेऊन रमा कामाला जाऊ लागली .
दोन दिवसांनी त्यांचा निरोप घेऊन मोहन परत गेला .
काही लागले तर फोन करा असे सांगुन आणि शिवाय मित्राला पुन्हा पुन्हा
दोघींवर लक्ष ठेवायला सांगुन तो जड मनाने गेला होता .
तो जाताना दोघींचेही डोळे पाणावले होते .
मेघनाने तर तिच्या दर वाढदिवसाला त्याने यायला हवे असे प्रोमीस घेतले त्याच्याकडून.
आता सगळे सुरळीत होईल अशी खात्री देऊन तो गेला .
आणि आता रमाच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु झाला

क्रमशः