Reunion Part 11 in Marathi Short Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | पुनर्भेट भाग ११

Featured Books
Categories
Share

पुनर्भेट भाग ११

पुनर्भेट भाग १०

रमाला मनातून खात्री होती की ऑफिसमधले पैसे घेऊन

सतीश ते त्या गुंड लोकांना परत करायला गेला असणार .

पण ती माणसे कोठे होती तेही तिला माहित नव्हते .

आणि मुळात ही जुगारात पैसे हरल्याची आणि गुंडांच्या धमकीची गोष्ट

तर फक्त तिलाच माहित होती.
दिवस कठीण झाले होते .
असाच आणखी एक महिना गेला .
आता एकूण दोन महिने झाले होते तरीही काहीच पत्ता नव्हता .
आणि एके दिवशी संध्याकाळी रमा ऑफिसमधून परत येताच
घराचे मालक भाडे मागायला दारात आले .
भाडे थकीत झाले होते .
कसेतरी इकडचे तिकडचे पैसे गोळा करून तिने थकीत पैसे
मालकांच्या हातात ठेवले .
ते घेऊन मालकांनी तिला सांगितले की हे घर सतीशला त्यांनी काही काळासाठीच दिले होते .
आता ती मुदत संपत आली आहे.
शिवाय त्यांना आता जास्ती भाडे देणारा भाडेकरू हवा होता .
तेव्हा तिनेच महिन्याभरात हे घर खाली केले तर बरे होईल
असे त्यांनी रमाला सुचवले .
हे ऐकुन रमाच्या पायाखालची जमीन सरकली .
घरमालक गेल्यावर तिने दार बंद करून घेतले
आणि ओक्साबोक्शी रडु लागली .
आता हे घरच सोडायला लागले तर काय करणार होती ती ?
छोटया मेघनाला घेउन कोठे जाणार होती ती ?
आणि सतीशचा पत्ताच जर लागला नाही तर काय होईल
या विचाराने तिच्या पोटात खड्डा पडला .
ती रात्र डोळ्याला डोळा नाही लागला तिच्या .
आता यामध्ये मोहनचा काही सल्ला घ्यावा असे वाटत होते .
त्याच्याशिवाय आधार वाटावा असे कोणीच नव्हते तिच्यापाशी आता .
आणि यातुन काय मार्ग काढायचा हे तोच सांगेल अशी तिला खात्री होती .
दुसऱ्या दिवशी ऑफिसला पोचल्यावर तिने मोहनला फोन केला .
त्याला भेटायची इच्छा सांगितली.
त्याने संध्याकाळी तिला भेटायचे कबुल केले .
संध्याकाळी नेहेमीच्या हॉटेलमध्ये ती दोघे गेली .
काल घडलेला सर्व प्रकार रमाने मोहनच्या कानावर घातला .
हे ऐकुन मोहनने तिला विचारले
“तुम्ही एव्हढ्या का घाबरला आहात .
मोहन येईल की परत .
मागे पण दोन तीन वेळेस असाच गायब झाला होता तेव्हा परतला होताच की .
आताही येईल कदाचित परत .
तोपर्यंत ज्यादा भाडे देऊन का राहत नाही
हवे तर मी मदत करेन थोडी पैशाची ..”
हे ऐकुन रमाच्या डोळ्यात पाणी आले .
आता मात्र खरी गोष्ट मोहनला सांगायची वेळ आली होती .
मग तिने मागच्या वेळचे सतीशचे गायब होणे
त्यानंतर गुंड लोक घरी येणे
त्यांच्याकडून सतीशच्या हारण्या विषयी समजणे
त्यांची धमकी ,सतीशचे घाबरून जाणे
त्या लोकांनी परतफेडी साठी दिलेला पंधरा दिवसाचा अवधी ..
हे सारे विस्ताराने सतीशला सांगितले
व ते पैसे परत करण्यासाठीच सतीशने पैशाचा अपहार केला असावा
अशी शंकाही बोलून दाखवली .
हे सर्व ऐकल्यावर मात्र मोहन विचारात पडला .
“आता सतीश जरी परत आला तरी नोकरीत ठेवून घेतील का याची शाश्वती नाही
शिवाय ही जुगाराची त्याची सवय पण सुटणे थोडे अशक्यच आहे
अशा परिस्थितीत मात्र तुम्ही आता ते घर सोडुन
काकांकडेच राहायला जाणे योग्य ठरेल .
तुमची आर्थिक परिस्थिती विचारात घेता आणि मेघनाच्या पालनपोषणाचा मुद्दा लक्षात
घेता तुम्हाला काकांचा आधार घ्यायलाच हवा .”
आता मेघनाने त्याला सांगितले की अद्याप तिने
सतीशच्या या सर्व गोष्टींविषयी काकांना अंधारातच ठेवले आहे .
त्यांना कदाचित हे सगळे सहन होणे अशक्य आहे
म्हणूनच तिने ते लपवले होते .
मोहन म्हणाला आता त्याला काही इलाज नाही .
हे सगळे सांगावेच लागेल .
मग काय आता जे घडेल त्यासाठी रमाने मनाची तयारी ठेवावी .
मोहनचा सल्ला योग्य होता ....
वेळकाळ पाहून हे सर्व काकांना सांगायचे रमाने पक्के केले .
आणखी पंधरा वीस दिवसात हे घर सोडायचे होते .
त्य दृष्टीने तिने दुसऱ्या दिवशी पासून हळूहळू आवराआवरी सुरु केली .
तसे घर दोन खोल्याचेच होते .
थोडीफार भांडीकुंडी मेघनाची खेळणी इतकेच होते .
टीवी ,बेड व इतर फर्निचर मालकांचे होते असे मालकांनीच सांगितले होते .
त्यात आजकाल रमा तर काकांकडेच असायची घरी फक्त झोपेपुरती येत असे .
थोडेफार सामान, धान्य,किराणा ,मेघनाची खेळणी हे आवरून तिने एकेक पिशव्या बांधुन
ठेवायला सुरवात केली .
पुढील आठवड्यात मात्र काकांना सांगायलाच हवे होते .
रविवारी काकांकडे जेवण झाल्यावर मेघना आणि काकू खेळत होत्या
रमाने विषय काढला ..
“काका किती दिवस झाले सतीशचा काहीच पत्ता लागत नाहीय ..
काय करावे समजेना झालेय “
“पोरी पोलीस शोधात आहेत त्याच्या
शोध लागला की सांगतील न ,तु काय काळजी करतेस?
आम्ही आहोतच ,आमच्याकडे तुम्ही दोघी सुरक्षित आहात की
तसेच काही वाटत असेल तर थोडे दिवस इथे राहा
झोपायला पण नको जाउस तिकडे ..
सतीश आला की मग जा ..”
काकांचे बोलणे ऐकुन रमाच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली
“काका खरेच आता कायमचे तुमच्याकडेच राहायला यायची वेळ येणार आहे “
“म्हणजे ?“
काकांनी तिच्याकडे नजर उचलुन पाहिले ..
आणि रमा हमसून हमसून रडू लागली ..
तिला रडताना पाहतच काकु चटकन पुढे आली
आणि तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाली ..
“काय झाले ग रडायला ...
मग मात्र तिने त्या दोघांना सर्व सांगितले ..
सतीशचे मानसिक रुग्ण असणे ..
त्यावरची औषधे चालू असणे .
त्याचे दारूचे व्यसन त्यापायी होणारी मारझोड
नंतर समजलेले जुगाराचे व्यसन
त्यापायी हरलेले पैसे नेण्यासाठी घरी आलेले आणि त्याला धमकी देणारे गुंड
ऑफिसच्या पैशाचा अपहार करुन पळून गेलेला सतीश .
शिवाय घर भाड्याचे असणे ..
सोन्याचे समजलेले दागिने खोटे असणे ..
सतत दांडी मारल्याने पगार तर नव्हताच वर मित्रांची देणी असणे
आजपर्यंतचे सगळे सगळे ती भडभडा बोलत गेली ..
काका आणि काकु हे सारे ऐकुन थक्क झाली
काय बोलावे ते त्या दोघा वृद्धांना समजेना ..
तिने सांगुन टाकले की ती तिचे घर सोडणार आहे
आणि तिचे सामानसुमान घेऊन इकडेच राहायला येते आहे .
काका तर हे सगळे ऐकुन सुन्नच झाले होते .
काही बोलावे अशी आता त्यांची परिस्थितीच नव्हती ..
काकु मात्र आपले अश्रू आवरत रमाला म्हणाली ..
“रमें तु केव्हाही इथे येऊ शकतेस ,,अग तुझेच घर आहे हे .
रमाने रडता रडता वर पाहिले तर काय ..
काका उशीवरून एका कडेला कलंडले होते ..
आणि त्यांचे डोळे मिटलेले होते.
रमा उठली आणि त्यांना हलवून पाहु लागली पण ते उठेनात
ते बेशुद्ध्द झाले होते .
तिने फोन करून तत्काळ डॉक्टरना फोन केला .
काकु पण घाबरून गेली होती .
डॉक्टर आले पण काकांची तब्येत पाहून त्यांनी काकांना ताबडतोब दवाखान्यात
दाखल करायचा सल्ला दिला
आणि अम्बुलंस बोलावून घेतली .
त्यानंतरचे दिवस खुपच कठीण होते.
काकांनी या सगळ्या गोष्टींचा धसका घेतला होता .
ते डोळेच उघडायला तयार नव्हते ..
खाणे पिणे बोलणे तर लांबच ..
सलाईन वरच ठेवले होते त्यांना
काकांची अवस्था पाहून काकु पण घाबरली होती .
रमाने तर रजाच काढली होती .
मात्र फोन करून तिने ही सगळी अवस्था मोहनला सांगितली .
तो मात्र ताबडतोब मदतीला धावून आला
मेघनाला सांभाळणे काकूला धीर देणे ,दवाखान्याच्या फेऱ्या
औषधांची व्यवस्था करणे,या सगळ्यात मोहनची मदत होती.
त्याचा भक्कम आधार होता रमाला
काकांच्या काळजीने काकुने पण जवळ जवळ अन्न त्यागल्या सारखे केले होते.
दुध चहा कॉफी एवढेच घेत होती .

क्रमशः