मासिक पाळी खरंच पुरुषांपासुन लपायलाच हवी का???
आजही मुलीला मासिक पाळी आल्यानंतर काही परिस्थिती नजरेत आहेत. पहिल्यांदा जेव्हा मुलीला पाळी येते तेव्हा आजही त्या मुलीला मासिक पाळी आल्यानंतर काळजी कशी घ्यायची हे सांगितले जात नाही तर ही गोष्ट कोणाला सांगु नको किंवा वडिलांना आणि भावाला हे सांगायचं नाही हा..असे सांगुन मुलीला धिर न देता किंवा समजून न घेता,.नकळत आई किंवा आजीच्या बोलण्यातून तिला घाबरवले जाते... पण आजच्या या युगात तरी असे सांगणे मला योग्य वाटत नाही. काही घरात तर मुलीला जेव्हा त्यावेळी स्वतःच्या संरक्षणासाठी सँनीटरी पँडची गरज लागते, तेव्हा वडील बाहेर बाजारात असुनही त्यांना न सांगता स्वतः आई काहीतरी कारण सांंगुन घरातुन बाहेर पडते.. पण हे सर्व का आणि कशासाठी??? मासिक पाळी या बद्दल वडील किंवा भाऊ यांना का समजु नये??? मासिक पाळी स्त्रियांचा आजार आहे का??? मग का असं लपवायचं??? खरंच तुम्हाला वाटते पुरुषांना पाळीबद्दल माहितीच नाही ??
आपण बघितले तर आज टीव्हीवर दिवसातुन ब-याचदा सँनीटरी पँडच्या जाहिराती दाखवल्या जातात मग ते पुरुष बघतातच ना??? पंधरा सोळा वर्षांच्या मुलांनाही विज्ञानात हा भाग शिकवला जातो. म्हणून पुरुषांपासून मासिक पाळी लपवायला हवी असे मला वाटत नाही. आज जर घरात पोट दुखत आहे म्हणून झोपलेली मुलगी दिसली तर वडील काळजी ने विचारणारचं बाळा काय होतंय ?? मग त्यावेळी तुम्हाला यातलं काही समजत नाही म्हणून वडीलांना आईने हाकलनं म्हणजे चुकीच आहे, तिथेच जर त्यांना मुलगी का झोपले हे व्यवस्थित सांगितले तर ते नक्कीच मुलीची काळजी घेतील. मासिक पाळी मुळेच एक स्त्री आई बनु शकते मग त्यासाठी का लाजायचं???.
.प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील पाळी एक महत्त्वाची घटना असते. सर्व अवयवांचे काम व्यवस्थित चालू असल्याची ती पावतीच आहे. मग तीच पावती का लपवायची ??? मुलगी शाळेत त्याच विषयाचा अभ्यास करते पण पाळी आल्यानंतर जेव्हा तीला त्रास होतो तेव्हा ती मुलगी तोच विषय शिकवणा-या शिक्षकाकडे सुट्टी घेण्यासाठी लाजुन इतर कारणं देऊन सुट्टी घेते. मग असे का??? तर आईने इथे मुलीला व्यवस्थित समजावून सांगायला हवे. नक्कीच वडिलांसारखे शिक्षक आणि भाऊ ही समजुन घेतील. जो उत्साह काही मुलांना त्यांच्या स्वतःच्या बाबतीत नसतो त्यापेक्षा जास्त उत्साह त्यांना मुलींबद्दलच्या गोष्टी जाणून घेण्यात असतो. ज्या मुलांना प्रेयसी असते ब-याचदा त्यांना याबद्दल कल्पना असते.. आता कल्पना असते म्हणजे त्या मुलांसोबत त्यांच्या मैत्रिणी सर्वच शेअर करत असतात म्हणुन ते मनसोक्त त्या विषयावर बोलतात. कधी कधी काही भावंडांमध्येही सामंजस्यपणा असतो, त्यांच्या कुटुंबात सर्वच विषयांवर स्पष्ट बोलले जात असावे म्हणुन ते बहिणीसोबत मासिक पाळी बद्दल समजुन आणि काळजीपूर्वक बोलत असणार. बघा ना ज्या घरात खुलेपणाने बोलले जाते त्यांना पाळी या विषयाची लाज वाटत नसावी. जी अजुनही काही घरांमध्ये वाटते. आत्ता सध्या मासिक पाळी या विषयावर बर्यापैकी तरुण वयातील पिढी बोलत असावी, एकमेकांचे मत शेअर करत असावी..
पण खरी गरज त्या लोकांना आहे ते गैरसमजुतीतून पुरुषांपासून मासिक पाळी विषय लपवतात. घरांमध्ये मुलींना, शाळेत विद्यार्थिनींना समजुन घेतले जाऊ शकते, जेव्हा त्या मुली, विद्यार्थीनी स्वतःहुन न लाजता होणारा त्रास किंवा असलेली अडचण बोलुन दाखवु शकतात. आजही मासिक पाळी आणि अंधश्रद्धा यांचा काही घरांमध्ये संबंध आहे. विश्वास आहे. एखाद्या मुलीला जर आईच नसेल तर मग त्या मुलीची पुर्णच जबाबदारी तिचे वडील घेत असतात. त्या मुलीला मग कोण सांगणार पाळीबद्दल वडिलांना सांगु नको, तेव्हा तर त्या मुलीसमोर फक्त वडिलच असतात, तिची सर्वच जबाबदारी ते घेत असतात. म्हणुन मासिक पाळी पुरुषांपासून लपायलाच हवी असे मला तरी वाटत नाही.
--- सौ.वृषाली गायकवाड, जाधव.