१७) गडाविषयी काकांचं मनोगत...
त्या दिवशी पेरजागडावरून येताना बऱ्याच काही शंका मनात धरून मी आलो होतो.ते सुन्न जंगल,आणि ते भयानक वातावरण,आणि ते छम छम् तर माझ्यासाठी एक कोडंच होतं.घरी परतल्यावर सगळ्यांनीच तसं माझी खुशहाली विचारली...काय मग?कसा वाटला पेरजागड? मी म्हटलं... बरंच आहे...
कारण थकून असल्यामुळे मी फार तर बोलूच शकणार नव्हतो.पण गावात कसं असतं, गप्पांचा विषय चालू करण्यासाठी एखादं विषय लागतो.कदाचित घरी येता येता पेरजागड हाच एक विषय झाला होता.अलीकडे घडलेल्या बऱ्याच गोष्टी याच्या त्याच्या मुखातून बरेचदा ऐकत होतो.
काही दिवसांपूर्वी म्हणे ट्रॅक्टर उलटली होती.ज्यामुळे बऱ्याच प्रमाणात जीवितहानी आली होती.त्याचे कारण चालकांनी बऱ्याच प्रमाणात दारूचे सेवन केले होते आणि काही स्त्रिया मासिक पाळीवर असताना सुद्धा तिथे आलेल्या होत्या.त्यामुळे नको ते घडले आणि इतक्या प्रमाणात जीवितहानी झाली.
मघापासून मी डोळे जरी का मिटून असलो तरी त्यांचं बोलणं मात्र अगदी टक लावून बघत होतो.आणि त्यांचं बोलणं ऐकल्यामुळे माझ्या माझ्या मनात बऱ्यापैकी एक प्रकारचं सात्विक न्यूनगंड निर्माण झालं होतं.कारण आत्तापर्यंत जे अनुभवलं होतं ते सगळं अस्तित्वाच्या पलीकडचं होतं.ज्याची दैनंदिन व्यवहारात कसलीच नोंद नाही.आणि माझ्यासाठी तर हे नवीन नव्हतंच.पण ज्या गोष्टीसाठी मी इथे आलो होतो ते मात्र आता कुतूहल राहिलं नव्हतं.आता तो माझ्या जगण्या मरण्याचा एक साधन झाला होता.
आता प्रत्येक ओढ पेरजागडविषयी गोष्टी जाणून घेण्यात कायम ओढत होती.आणि त्या प्रत्येक गोष्टी जाणून घेणे मला तितक्याच गरजेच्या होत्या.आणि बऱ्याचदा मी अनुभवल्यामुळे ते सत्य आहे की असत्य आहे यांत वाद घालण्याचा प्रश्नच येत नव्हता.नजरेसमोर एखादं वृत्त घडले की त्यात तथ्य पथ्य असतातच.आणि ते कथन करणारा सुद्धा तितक्याच नवलाईने ते सांगत असतो.
त्यांच्या गप्पा ऐकून मला कित्येकदा वाटलं की त्यांना विचारावं म्हणून.पण शेवटी अव्हेरले स्वतःला.उगाच पुन्हा त्यांना चघळायला विषय नको म्हणून गप्प झालो.एकतर मी तिथे नवीन होतो आणि मला वाटते की स्त्रियांत गप्पा मारण्याचं काम हे पुरुषाचे कधीच नव्हे.त्या सायंकाळी थंडी जरा जास्तच जाणवत होती.त्यामुळे आल्या आल्याच भर थंडीत हात पाय धुवून मी शेकोटीपाशी जाऊन बसलो होतो.त्यांना कळू नये म्हणून उगाच मोबाईल मध्ये काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होतो.
पेरजागडविषयी बऱ्याच प्रमाणात व्हिडिओ होते. गूगलवर सुद्धा त्याबद्दल काही माहिती होती.पण त्यावर हिरवळीने माखलेले निसर्ग आणि त्यातील काही गमती जमती इतकीच माहिती होती.मुळात त्या गडाला सात बहिणीचे गड म्हणून का संबोधले जाते?त्या सात बहिणी कोण होत्या?सगळ्यात आधी या गडाबद्दल कुणाला माहीत झाले?या प्रश्नांची उत्तरे मात्र कुणाकडेच नव्हती.आणि तसं कुणी दाखवलं पण नव्हतं.फक्त ते एक श्रद्धास्थान आहे म्हणून ज्याने त्याने त्याची नोंद केली होती.आणि मला ते सगळे जाणायचे होते.
त्या दिवशी जेवण केल्यावर असेच आम्ही बसलो होतो.मी काकांना विचारलं...
"काका ह्या गडाला सात बहिणींचं गड का म्हणतात?नेमक्या ह्या सात बहिणी होत्या तरी कोण?"
"आता त्याबद्दल फारसं मलाही माहित नाही पण माझे बाबा सांगायचे की त्या नवतळा येथील माना जातीच्या मुली आहेत.त्यात प्रत्येकाची प्रतीक्रिया वेगवेगळी.कुणी म्हणतात की त्यांना वडिलांनी जंगलात हरवलं तर कुणी म्हणतात त्या स्वतः निघून आल्या होत्या.त्यामुळे खरं काय ते मलाही माहित नाही.पण त्यांचं तिथे वास्तव्य असल्यामुळेच त्या गडाला सात बहिणींचं गड म्हणून सगळे ओळखू लागले.
पण सगळ्यात आधी त्याचा शोध कुणी लावला?म्हणजे कुणी ते स्थळ बघितले?कारण ते गावापासून इतक्या दूर त्या जंगलात वसलेलं आहे.साधारण माणसाची तर हिम्मत पण होत नाही तिथे जायची.
आमच्या बघण्यात पूर्वी तिथे टोंगरे महाराज राहायचे.तेच त्या गडावर राहायचे.ते त्या हिंस्त्र श्र्वापदांत कशा पद्धतीने असायचे त्यांचं त्यांना ठावूक.पण ते म्हणायचे की त्या गडात जिथे बहिणींचं छोटंसं मंदिर आहे.तिथून गडाच्या आत जाण्यासाठी एक रस्ता आहे.आणि आतमध्ये जिथे बहिणी असायच्या तिथे सात खोल्या आहेत.ज्यात दिवसभर आणि रात्रभर पण प्रकाश असतो.
"तुम्ही बघितले काय?"
नाही मी तेव्हा लहान होतो. टोंगरे बुवा म्हणजे अगदीच कृश होते.ते अगदी सहज त्या दगडांच्या कप्प्यात सामावून जायचे.आणि कदाचित तिथे राहून तितके सत्व पण त्यांच्या जवळ असतीलच.आणि शुरुवातीला फार क्वचितच लोकांना पण ते दिसायचे.त्यामुळे त्यांचा शोध लावणे हे योग्य आहे असे समजून गावकऱ्यांनी त्यांना शोधून काढले.त्या वेळेस ते मौन स्थितीत होते.त्यामुळे काही बोलू शकले नाहीत.
"मग काय झालं?"
शेवटी बोललेच ते...मग त्यांनी स्थळाबद्दल आणि त्या सात बहिणीच्या गडाबद्दल लोकांना सांगून प्रेरित केले.त्या भयाण जंगलात राहणे हे साधारण माणसाचे काम नाही, असे समजून त्यांना भेटायला पण दुरदुरून लोक येऊ लागले.देणगीदार झाले,ट्रस्ट स्थापन झाले,लोकांच्या श्रद्धा वाढल्या आणि कालांतराने यात्रेकरू पण वाढले.
"अच्छा... असं आहे...पण मग आता ते कुठे असतात?कारण गडावर तर कुणीच नसतं...?"
"बघ पवन... चांगलं तसच वाईट पण असतं.सत्ता नेहमी स्वार्थामुळे पालटत असते.एखादी संस्था बनवताना जो विचार मनात घोंगावत असतो.संस्था बनल्यावर तोच विचार बदलत जातो. राजकारणाचे काही आमिष असल्यामुळे काही प्रमाणात वादविवाद आणि ताणतणाव झाले.त्याअर्थी असल्या जागेत असे सात्विक मनुष्य फार काळ थांबत नाही.त्यांची जायची तर इच्छा नव्हतीच पण पोलिस रिपोर्ट वगैरे झाली आणि पोलिसांनी गाडीत घालून त्यांना त्यांच्या मूळ गावी घेऊन गेले.
"अच्छा...म्हणजे ज्यांनी या गडाचा शोध घेतला...ज्यांनी इथले महत्त्व लोकांना पटवून सांगितले.शेवटी त्यांनाच इथून जावे लागले."
ह्म्म....आहेत अजून काही तशी लोकं, पण काही त्यांचा वारसा जपणारे पण आहेत.आणि आता तर नावापुरताच ट्रस्ट स्थापित झालंय.कारण हे छोटंसं गाव असलं तरी राजकारण मात्र चांगल्या पद्धतीने गाजवणारे गाव आहे.
"आणि हो काका...उद्या माणूस बघुन देणार म्हणाले ना... जंगल फिरवण्यासाठी..."
"हो उद्या सकाळीच त्याची भेट घालवतो तुला..."
जसं गडाविषयी मी बऱ्याच प्रमाणात ऐकलं होतं, तसेच त्या टोंगरे महाराजाविषयी सुद्धा मी बऱ्याच गावकऱ्यांकडून ऐकलं होतं.आणि आता तर काकाने पण बरंच काही सांगितलं होतं.तिथून निघताना मला न राहवून त्यांची भेट घ्यायची मनापासून आतुरता झाली होती.त्यामुळे त्यांचं वारसान जपणाऱ्या एका शिष्याकरवी मी त्यांचा पत्ता घेतला आणि त्यांच्या भेटीला निघालो.
रामगिरी पर्वताच्या पायथ्याशी एका आश्रमात त्यांनी देवदूताची कामगिरी हेरली होती.अगदी दुरूनच मनातल्या कल्पनेने मी त्यांची कलाकृती ओळखली.कृश शरीर,डोळ्यामध्ये असलेले एक अलवकिक तेज,ओघात एकही दंत शिल्लक नव्हता पण तरीही आवाजाची कठोरता शिगेला जात होती. फारसं काही त्यांच्याद्वारे माहीत नाही झालं, पण अशा बऱ्याचशा गोष्टीचं समाधान त्यांनी मला दिलं होतं.आणि मला पाहिजे त्या माहितीसाठी त्यांच्या एका शिष्याचा पत्ता दिला.
लोकांनी सांगितल्याप्रमाणे टोंगरे महाराज खरंच एक कलाकार माणूस होते.आज त्यांचं वय शतक ओलांडून सातवा वर्ष पूर्ण करतोय.तरीही आवाजात तीच जरब होती.हेच त्यांच्याविषयी फार महत्त्वाची बाब होती.प्राणायाम,बद्ध पद्मासन,मौनव्रत अगदी प्रामुख्याने ते करत असत.त्यामुळे शरीराची रचना तशी त्यांनी अगदी तंतोतंत ठेवली होती.आजही भुकेवर त्यांची इतकी जरब होती की सकाळच्या प्लेटभर नाश्त्यावर ते अख्खं दिवस रात्र काढत होते.
त्यांनी सांगितले की १९१४ चा त्यांचा जन्म. कुमारवस्थेत त्यांनी जंगल तुडवण चालू केलं होतं.रानोमाळ हिंडता फिरता ते पेरजागडावर आले.तिथं त्यांना तपश्चर्या करण्यासाठी फार चांगल्या प्रमाणात स्थान मिळालं.अगदी अठरा महिने सतरा दिवस विना अन्न पाण्याने ते त्या पेरजागडावर राहिले.त्यांनी तिथलं सत्व अंगाशी बाळगलं.हर एक गुंफा,हर एक जंगलाची बाजू त्यांचा अभ्यास केला.
तिथे असलेल्या वास्तव्याची लोकांना जाण करून दिली.ते गड मायाळू आहे अशा पद्धतीने त्यांनी त्या गडाला सात बहिणीचे नाव दिले.त्या गडाविषयी त्यांनी एक महत्व सांगितलं होतं,जे आजही मला आठवते.ते गड माया लावते.कारण ज्या विचारांती आपण त्या गडावर पाऊल ठेवतो तेव्हा त्या विचारांना ते गड एकप्रकारे उत्साह देते.नवचैतन्य प्रदान करते.माया अजूनही तिथे जिवंत आहे याचं सत्य उदाहरण मी टोंगरे महाराजाकडून ऐकलं होतं. तसं आणखी मला बरेच काही त्यांना विचारायचं होतं पण वयाच्या बऱ्याच उतारामुळे त्यांना बहिरेपण आले होते.ज्यामुळे प्रत्येक वाक्य बोलताना त्यांच्या कानाला ऐकु जाईल अशा उंच स्वरूपात बोलावे लागायचे.त्यामुळे काही बोलायचे मी टाळून टाकले.
त्यांचे काही अनुभव पण मला ऐकायला मिळाले.त्यांनी ज्या शिष्याचा मला पत्ता दिला होता.त्यांची भेट घेतल्यानंतर मला कळलं की डब्बल सीट महाराजांना सायकलवर घेऊन जाताना कसे कसे डोंगर चढ चढल्या जायचे.पण थकवा अजिबात यायचा नाही.त्यामुळे टोंगरे महाराजांपासून सात बहिणींच्या गडाची उत्पत्ती झाली असे म्हणता येईल.निदान त्या वेळेस तरी मला असे वाटले होते.पण ज्या गोष्टींची मला गरज होती ती अद्याप त्यांच्याकडून मला मिळाली नव्हती.कदाचित चार चौघांच्या वास्तव्यात त्यांनी सांगायचं टाळलं मला असेही म्हणता येईल.
महाराजांनी ज्या सात खोल्यांचा उल्लेख केला होता.ते एकमेव असे इसम होते ज्यांनी आत प्रवेश केला होता.कारण कालांतराने बारीक दगडांचे तुकडे टाकून ती खिंडच बंद करून घेतली होती.महाराजांवर माझा विश्वास नाही अश्यातला काहीही भाग नव्हता.पण त्यांनी टाळलं यासाठी म्हटलं की अजूनही बऱ्याचशा गोष्टी होत्या जा त्यांनी मला सांगितलेल्या नव्हत्या.आणि कालांतराने त्या दुसऱ्याकडून मला माहित झाल्या होत्या.कारण जेव्हा मी त्यांना माझं समाधान मागायला लागलो होतो तर त्यांनी मला पेरजागडावर जाण्यास सांगितलं होतं.
त्यांनी ज्या शिष्याचा मला पत्ता दिला होता.शुरुवातीच्या काळात तीच लोक ट्रस्टचे सदस्य, अध्यक्ष होते.त्यामुळे प्रत्येकाला स्वतःची एक ईर्षा एक अभिमान होता असं म्हणण्यास काही कारण नाही.कारण त्या वेळेस श्रम दानाने झालेली बरेचशी कामे आज पैशानेसुद्धा चांगल्या प्रमाणात होत नव्हती.ते नंतर मला कळलं.असे बरेच जण गावोगावी असणारे सहकार्य करायला तत्पर होते.पण प्रत्येकाला दिसणारा पैसा मनात वेगळे भाव निर्माण करतो त्यापद्धतीने वादविवाद झाले.आणि त्यामुळे बऱ्याच लोकांनी तिथून माघार घेतला.ज्यामुळे सत्वाच्या जागेवर अहिंसा नांदू लागली.
आत्ताही जणू फारसा बदल झाला आहे असे नाही.कारण टोंगरे महाराज त्या गडाची शान होते.आणि ते गेल्यानंतर गड निकामा झाल्यासारखं झालं होतं.आजही ट्रस्ट आहे.नवीन अध्यक्ष,सदस्य बऱ्याच प्रमाणात येतात जातात.पण आज तो गड फक्त गड म्हणूनच आहे.जवळपास फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी याचा फायदा घेत संपूर्ण गडच आपल्या ताब्यात घेतला.ज्यामुळे अशा पद्धतीने कित्येकांच्या श्रद्धेची लख्तरं उडून गेली आहेत.
माझ्यामते जगातील सत्व नाहीसे कधीच झाले नाही आहे.दगडाला शेंदूर माखला की देवपण येतो असे बरेच लोक म्हणतात.पण जर मनामध्ये श्रद्धा असेल,आस्था असेल,विश्वास असेल,एकाग्रता असेल,सहनशीलता असेल तर त्याला सत्व अगदी कुठेही मिळते.पण आजच्या युगात अध्यात्मच नामशेष झालय.त्यात विज्ञानाने त्याची जागा घेतली आहे. त्यामुळं परानोर्मल अक्टीव्हींटी सारखे विचार जागे होतात.जग तेव्हाही चालत होतं आणि आत्ताही चालत आहे पण जगण्यात इतका बदल घडलाय की जगणारा स्वतःचेच आयुष्य कमी करून जगतोय.ज्यात त्याची स्वतःची चुकी आहे हे तो कदापि मान्य करणार नाही. असो ओघात आलं म्हणून लिहून टाकलं.
हे एक खरं आहे की विज्ञानाचा आधार घेणारीही बरीच मंडळी आहे.आणि या जगात नास्तिकांची काही कमी नाही. शोधलं तर देवपण मिळतो असे म्हणतात.पण त्या देवाला शोधणारे मात्र खूप कमी असतात. सोनापुर हे एक छोटंसं गाव आहे.पण जितकं छोटं आहे तितकंच चतुर आहे.राजकारणातला एक ठोकळा आहे हे मी मागेच सांगितलं आहे.पण गाव म्हटलं की वाईट आणि चांगली सत्ता असतेच.ज्या पक्षाचा माणूस वाईट असतो आपण त्या पक्षालाच शिवीगाळ करतो पण सांगायचं राहिलं तर पक्ष कोणताच वाईट नसतो.त्या पक्षात कार्यरत असणारेच पक्षाचं नाव घेऊन आणा भाकी करीत असतात.
ज्यावेळेस मी सोनापुरात दाखिल झालो होतो.त्याच्या काही वर्षा अगोदर एक सरपंच होता.ज्याच्या बऱ्याच तक्रारी असायच्या.आणि कित्येकांचं खाल्लं घेतलं अशातला भाग होता.त्यामुळे गावकऱ्यांनी त्याला पदावरून निलंबित केले.आणि याच कारणामुळे बऱ्याच प्रमाणात तो गावकऱ्यांवर डीवचला होता.मग त्यासाठी त्याने राजकारणात प्रवेश घेतला.आणि गावातील बऱ्याच काही योजनांचा तुटवडा करू लागला.त्यामुळे सगळे त्याला पिसू म्हणायचे. पीसू म्हणजे ढेकूण...पिसाट सुटलेला.असे गावकरी आवर्जून म्हणायचे.आणि म्हणून गावात दोन पार्ट्यांची विभागणी झाली.
असे बरेच प्रकार होते ज्यात वाद व्हायचे.म्हणजे एक गाव दोन तुकडे अशा संदर्भात असलेले ते गाव.ज्या पक्षातला पाहुणा त्याच पक्षातल्या घरी जाईल.अशी कडक सुनावणी बाजी व्हायची.खरतर या बाबतीत मलाही काही माहीत नव्हते.पण जसजसं गावात मी जुनाट होऊ लागलो होतो.त्या पद्धतीने लोक मला ओळखू लागले होते.
पेरजागडावरून आल्यावर काकांशी जे बोललं होतं, ते बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं.पण ते तिथले मूळ रहिवासी आहेत आणि त्यांना काही वेगळं माहीत असेल म्हणून मी त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच दिवशी वाटेत एक प्रवासी भेटला होता.अपक्ष असल्यामुळे त्याने जरा लांबूनच माझ्याशी बोलणे केले होते.सत्वावर तर त्याचाही विश्वास नव्हता.पण जेव्हढा हा सात बहिणीचा गढ आहे.त्यावर त्याने एक कल्पना मात्र मांडून दाखवली...
त्याचं म्हणणं असं होतं की,कोलंबसने जसं अमेरिकेचा शोध लावला तसेच टोंगरे महाराजांनी या गडाचा शोध लावला.त्या काळी जंगलात जाऊन राहणे हे साधारण माणसाचे काम नव्हते.पण महाराज ठेंगणे आणि कृश असल्यामुळे कुठल्याही दगडांच्या गुन्फेमध्ये जाऊन लपत असत.कारण त्यांना समोर घडणाऱ्या भविष्याची माहिती होती.की काय कार्य केल्याने त्यांचं नाव जगाला कळेल?अशा तऱ्हेने त्यांनी बराच अभ्यास केला. गडाबद्दल एक खोटी रचना तडजोड केली.आणि त्यांच्या वास्तव्याला लोकांनी मान्यता दिल्यामुळे ती कल्पना लाखोंच्या मनात सत्यात उतरली.निसर्गाची देण असलेल्या त्या गडाला बऱ्यापैकी त्यांनी वारसान दिला.
मी बऱ्याच पद्धतीने त्याला विचारलं की असं वाटण्यामागे तुझा काही हेतू आहे की तू फक्त तुझे विचार मांडतोयस?यावर त्याला निरुत्तर होताना मला कळून आलं होतं की आता अपक्षाकडे बोलायला काहीच उरलं नाही.कारण त्याचा राग मला जास्त प्रमाणावर टोंगरे महाराजांकडे वळताना दिसला.तो माणूस आपल्या अस्खलित बोलण्याने कित्येक लोकांना मंत्रमुग्ध करून टाकायचा.गडाची शुरुवात,लोकांचा विश्वास,त्यांचं श्रमदान अशा बऱ्याच गोष्टी त्याने केल्या.पण इथली देणगी खावून बसायचा असे त्याचे मत होते.
त्याच्या त्या बोलण्यावरून समजत होते की टोंगरे महाराजांविषयी त्याच्या मनात काय प्रतिक्रिया आहे ते.कारण जे महाराज इतके दिवस विना अन्न पाण्याने,विना सहकार्याने,विना आधाराने राहिले.त्यांना आता पैशाची गरज पडली.ते स्वार्थी झाले.खरतर ही एक विचार करण्याची गोष्ट होती.हे एक मात्र खरं होतं की सात बहिणीचे जे नाव त्या गडाला दिले होते ते काल्पनिक असू शकते,मात्र या बाबतीत विचार करायला काहीच हरकत नव्हती.
कारण दोनदा त्या गडावर जाऊन सुद्धा मला काहीच मिळाले नव्हते.फक्त तो अभास ज्यांचं ऐकण्याशिवाय काहीच अस्तित्व नव्हतं.ते मात्र एक कोडं होतं.पण मी निश्चय केला होता की त्या गडाचं काय रहस्य आहे हे मी जाणणारच? त्यासाठी मला कुठेही जावं लागेल तरी चालेल पण मी त्याचा शोध करीनच!!!