असाच विचार करत असताना तिचं लक्ष आकाशाकडे गेलं. तिकडे पश्चिम क्षितिजाकडून एक प्रकाश येत होता. तो हळूहळू पूर्व क्षितिजाकडे जाणार होता, हाच तो हॅलेचा धूमकेतू होता. आता त्याची परत जाण्याची वेळ होती आणि महत्वाचं म्हणजे आता ज्या विश्वात जो कुणी असेल तो आयुष्यभरासाठी तिथेच अडकून राहणार होता. कारण यानंतर परत हॅलेचा धूमकेतू तब्बल ७५ वर्षानी फेरी मारणार होता. म्हणजे इसवी सन २१३६ मध्ये. तोपर्यंत या आठ जणांपैकी कुणीही जीवंत असण्याची शक्यता अगदीच नगण्य होती. हंसीका शुष्क आणि निर्विकार डोळ्यांनी त्या हॅलेचा धूमकेतूकडे बघत होती.
हंसीकाने हॅलेचा धूमकेतू बघितला आणि जोरात धावायला सुरूवात केली. ती एकामागून एक विश्व पार करू लागली. प्रत्येक विश्वातील ‘मृगजळ’मध्ये जाऊन ती खिडकीतून डोकावून बघत होती. आता धूमकेतू मध्यावर आला होता. फक्त काही मिनिटांत तो नजरेआड होणार होता. त्यामुळे हंसीकाने अजून जोरात पाळायला सुरुवात केली. पण सर्वठिकाणी तिच्या मनासारखं विश्व दिसलं नाही. शेवटी हॅलेचा धूमकेतू नजरेआड होण्याला काही सेकंद बाकी असताना ती एका विश्वात पोहोचली. त्या घरच्या खिडकीतून तिने डोकावून पहिले तर तिला असे दिसले की सर्वजण अगदी आनंदात आहेत. सर्वांच्या एकदम छान हसत खेळत गप्पगोष्टी सुरू आहेत. मुख्य म्हणजे शौनक आणि हंसीका एकमेकांशी अतिशय प्रेमाने बोलत आहेत. काही वेळानंतर त्यांनी सोबत डान्स करायला सुरुवात केली. ते बघत असताना हंसीकाला फार बरं वाटलं. तिने मागे वळून बघितलं, हॅलेचा धूमकेतू आता एखाद्या ठिपक्यासारखा दिसत होता. म्हणजे हंसीका आता कायमस्वरूपी त्याच विश्वात अडकली होती. तिला हे विश्व आवडलं होतं. कारण इथला शौनक तिच्यावर प्रेम करत होता. तिला तिच्या मूळ विश्वातल्या सर्वांची आठवण झाली. ते कुठे आणि कोणत्या विश्वात कशा अवस्थेत असतील? याबद्दल तिला खूप वाईट वाटलं. शेवटी जे झालं त्यावर काहीही उपाय नाही हे तिला चांगलच कळून होतं.
हंसीकाने विचार केला, इथे आधीच एक हंसीका आहे. तिला इथून घालवल्याशिवाय आपल्याला इथे प्रवेश मिळणार नाही. काय करावं? असा विचार ती करू लागली. तोच तिला एक कल्पना सुचली. तिने रस्त्याच्या बाजूला पडलेला एक दगड घेतला आणि समोरच पार्क केलेल्या गाडीच्या काचेवर फेकून मारला. ती अनिची गाडी होती. त्या घरातील सर्वजण कशाचा आवाज झाला? म्हणून बाहेर आले. हंसीका एका भिंतीच्या आडोश्याने बघू लागली. सर्वजण बाहेर निघण्याच्या तयारीत असतानाच ती पटकन किचनच्या खिडकीतून आत घुसली आणि तिने फ्रिजर मधून केटमाईनची बॉटल आणि बाजूलाच असलेलं इंजेक्शन घेतलं आणि परत भिंतीच्या आडोश्याला येऊन उभी राहिली. तोपर्यंत शौनकने हळूच दार उघडलं. सर्वजण हळूहळू त्याच्या मागोमाग जाऊ लागले. आर्याने तर हंसीकाच्या दंडाला घट्ट पकडून ठेवलं होतं. हंसीका त्यांचं बोलणं ऐकत होती. ते शंभर टक्के तसंच होतं जसं आधी तिने अनुभवलं होतं.
“काय वाटतं? कुठून आला असेल तो?”
“नाही, मला नाही माहिती. बावळटा सारखं काहीही विचारू नकोस. शांत रहा थोडावेळ.”
रस्त्यावरील स्ट्रीट लाईटच्या पिवळ्या प्रकाशात सर्वजण घोळक्याने चालले होते. आजूबाजूला नीरव शांतता होती. सर्वांच्या चालण्याचा आवाज मात्र येत होता. जवळच लावलेल्या अनिच्या गाडीजवळ सर्वजण आले. त्याच्या गाडीचा मागचा काच फुटला होता. नव्हे, तो कशाने तरी फोडण्यात आला होता.
“ओह माय गॉड. व्हॉट द फक? ही काच फोडलीये कुणीतरी... कुणी दिसतंय का ?
नाही, कुणीच नाहीये. काल्म डाउन आर्या. एव्रिथिंग विल बी फाइन. सर्वांनी आपआपल्या गाड्या बघा प्लीज.”
सर्वजण आपआपल्या गाड्यांकडे निघाले. हंसीकाची गाडी थोडी दूर होती. पर्समधून गाडीची चावी काढली आणि रिमोटने गाडी अनलॉक केली. गडद अंधारात गाडीचे मागचे लाइट्स चमकले आणि टिपिकल अनलॉकिंगचा आवाज झाला. तिने परत काळोख पास केला आणि तिच्या गाडीजवळ आली. गाडी चहूबाजूंनी न्याहाळली. तिच्या गाडीला काहीही झाले नव्हते. तिने सुटकेच्या निःश्वास सोडला आणि ड्रायव्हर सीट उघडलं. गाडीमधला लाइट सुरू झाला आणि तिने मघाशी डेस्कमध्ये ठेवलेली प्लॅटिनम रिंग काढली. तिला न्याहाळत असतानाच भिंतीच्या आडोश्याला लपलेली हंसीका आली आणि प्लॅटिनम रिंग न्याहाळत असलेल्या हंसीकाच्या दंडात केटमाइनने भरलेले संपूर्ण इंजेक्शन खुपसले.
अचानक झालेल्या हाय लेव्हल ड्र्ग्जच्या मार्यामुळे हंसीका काही क्षणातच बेशुद्ध झाली. हंसीकाने तिला कसेतरी ऊचलले आणि गाडीच्या मागच्या डिक्कीत टाकले. तिला तिथे टाकण्याआधी तिचं मफलर आणि कोट काढून स्वतः परिधान केलं. काही प्रूफ राहिलेत का? हे बघण्यासाठी गाडीभोवती परत एकदा बघितलं. कुठेही काहीही नव्हतं. तिने मागे वळून बघितलं, सर्वजण आपआपल्या गाड्या बघून परत घरात जात होते. शिवाय जाताना अनिच्या गाडीची काच फोडणार्याला शिव्या देत होते.
हंसीका त्यांच्या मागोमाग किचनच्या दाराने घरात घुसली. तिला त्या दाराने आलेलं बघून आर्या म्हणाली, “तू या दाराने का आलीस?”
“ह्या इथून मला हॅलेचा धूमकेतू दिसला. तो बघा अजून थोडासा दिसतोय.” असं बघत तिने बाहेर बोट दाखवलं.
सर्वजण उत्सुकतेने दारात उभे राहिले. हॅलेच्या धूमकेतूने हंसीकाचं विश्वच बदलून टाकल्याने तो धूमकेतू वगैरे बघण्यात तीला काही स्वैरास्य नव्हते. ती सगळ्यात मागे थांबली. सर्वजण तो ठिपका पाहत होते. इतक्यात लाईट गेली. सर्वत्र काळोख पसरला. सर्वात जास्त भीती हंसीकाला वाटली, कारण आता काही तासांपूर्वी घडलेल्या भयंकर घटनेची पुनरावृत्ती होते की काय? असं तिला वाटू लागलं. पण काही सेकंदातच लाईट आली आणि तिचा जीव भांड्यात पडला. तिचं लक्ष बाजूला गेलं तर तिकडे वॉशरूमच्या इथे कुणीतरी सरपटत चालले होते. तिने बघितलं, ती हंसीका होती. तिच्या काळजात धस्स झालं. त्या विश्वातली खरी हंसीका होती ती. घाईघाईत हंसीका गाडी लॉक करण्याचं विसरून गेली होती. सर्वजण अजून हॅलेचा धूमकेतू बघण्यात व्यस्त होते. हंसीका पळतच तिकडे गेली.
तिथं केटमाइनच्या हाय डोसमुळे असह्य नशेत असणारी हंसीका तोंडावर पाणी मारण्याचा प्रयत्न करत होती. हंसीका वॉशरूममध्ये घुसली आणि दार लॉक करून घेतले. आता एकाच वॉशरूम मध्ये दोन हंसीका होत्या. हंसीकाने गुडघ्यावर उभे राहून बेसिनच्या नळातील पाणी तोंडावर मारण्याचा प्रयत्न करत असलेल्या हंसीकाच्या डोक्यात कमोडचे सिंक सर्व शक्तिनिशी मारले. हंसीका बेशुद्ध होऊन खाली पडली. परत दोन तीन वेळ ती सिंक मारून हंसीका शांत झाली. तिला वॉशरूमच्या खिडकीबाहेर टाकले आणि टिश्यू पेपरने रक्ताचे सर्व डाग पुसले.
झालेल्या सर्व प्रकारामुळे तिला खूप ताण आला होता. तिने शांतपणे सर्व प्रकार विसरून जायचे ठरवले. सर्वकाही मिटवले आहे ना, याची खात्री करून तिने एकदा खिडकीबाहेर बघितले. तिथे एक हंसीका शांतपणे पडली होती. तिला बघून हंसीकाला वाईट वाटले. पण हंसीकाला जगायचे असेल तर हंसीकाचे मारणे आवश्यक होते. तिने व्यवस्थित खिडकी बंद केली आणि बाहेर आली.
सर्वजण हॉलमध्ये गप्पा मारत होते. त्यांना बघून हंसीकाने स्मितहास्य केले. तिचे पाय अचानक लटलटू लागले. तिला भोवळ आली आणि काही कळायच्या आत ती खाली कोसळली.....
सकाळी हंसीका उठली तेव्हा हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर होती. हॉलमध्ये कुणीही नव्हते. तिने भिंतीवर टांगलेल्या घड्याळाकडे बघितले. साडे आठ वाजले होते. तिला दुसरी हंसीका आठवली, शिवाय तिला भोवळ आल्यानंतर काय झाले हे आठवत नव्हते. कुणाला काही कळले तर नाही ना? अशी शंका तिला आली. ती घाबरली आणि घराबाहेर जाऊ लागली. ती सोफ्यावरून उठली तोच किचनमधून आर्या बाहेर येत होती. हंसीकाला उठलेलं बघून आर्या स्मितहास्य करत म्हणाली, “आता बरं वाटतंय का? काल चक्क बेशुद्धच झालीस. नंतर काही वेळाने मी इथली नाही, देवा काय हे? माझी माणसं का तोडलीस? असं काहीसं बडबडत होतीस. आता बरंय ना?”
हंसीकाने काहीही न बोलतच फक्त होकारार्थी मान हलवली.
“बरं, तू फ्रेश हो. मी कॉफी बनवते.” असं म्हणून आर्या परत किचनमध्ये गेली.
हंसीका घाबरतच घराबाहेर आली आणि किचनच्या बाहेर बघितलं. तिथं हंसीका नव्हती. ती अजून घाबरली. कावरीबावरी होऊन इकडे तिकडे बघू लागली. तोच तिला शौनक दिसला. तो पार्किंगमध्ये उभा होता. त्याने हात हलवून हंसीकाला बोलावले. त्याचा हसरा आणि नेहमीसारखा आनंदी चेहरा बघून हंसीकाला हायसे वाटले. त्याला, आर्याला आणि इतर कुणालाही काहीही माहिती नाही याची तिला खात्री पटली. तिने स्मितहास्य केले आणि त्याच्याजवळ पार्किंगमध्ये गेली. जवळ जाताच शौनकने हंसीकाच्या डोक्यावरुन हात फिरवला आणि म्हणाला, “आर यू फिलिंग बेटर नाऊ?”
“येस, बट आय नीड सम रेस्ट.” असं म्हणत असतानाच शौनकचा फोन वाजला. त्याने बघितलं, तो हंसीकाचा फोन होता. त्याला आश्चर्य वाटले. कारण हंसीका त्याच्यासमोरच उभी होती. त्याने फोन कट न करताच हंसीकाला विचारले, “तू मला कॉल का करतेयस?”
हे ऐकून सकाळच्या थंडीत हंसीकाला दररून घाम फुटला. तिला कळून चुकले की त्या विश्वातली हंसीका जीवंत आहे आहे आणि तीच शौनकला कॉल करतेय. परत एकदा काही कळायच्या आत हंसीका बेशुद्ध होऊन धडकन खाली कोसळली.