तिने घाबरून शौनकची मिठी सोडली आणि त्याच्याकडे एकदम भेदरलेल्या नजरेने बघू लागली. त्याच्या चेहर्यावर प्रश्नार्थक भाव तसेच होते. हंसीका केव्हाचं काय बडबडतेय असं त्याला वाटत होतं. हंसीका घाबरत उच्चारली, “तू... तुझ्याकडे असलेली ग्लोस्टिक दाखव.”
त्याने खिशातून त्याची हिरव्या रंगाची ग्लोस्टिक काढली आणि हंसीका समोर धरली. ती ग्लोस्टिक बघून हंसीका खूप घाबरली. तिचे पाय लटलटू लागले. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. तिला कळून चुकलं की ती जेव्हा गाडीकडे आली तेव्हा ज्या काळोखातून म्हणजे डार्क झोन मधून आली होती, तो समांतर विश्वात जाण्याचा रस्ता होता आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यातलं कुणीही म्हणत होतं की ते एका काळोखातून गेले तोच हा समांतर विश्वात जाण्याचा रास्ता होता. म्हणजे ज्यांनी ज्यांनी हा काळोख पार केला होता. ते त्यांचं विश्व म्हणजे रियालिटी सोडून दुसर्याच विश्वात आले होते. ज्या डी – कोहेरन्स मुळे ते आणि आपण सर्वजण आपआपल्या विश्वात आहोत त्याचा धूमकेतू मुळे इफेक्ट जाणवत नव्हता आणि नेमकं याच वेळी हे लोकं घराबाहेर निघून आपापलं विश्व सोडून दुसर्याच विश्वात जात होते.
हंसीका तिच्या समोर उभ्या असलेल्या शौनककडे घाबरी होत बघत होती. तिने तिच्याकडील निळ्या रंगाची ग्लोस्टिक दाखवली आणि हळूच थरथरत्या पायांनी दोन पावलं मागे सरकली. मोठा श्वास घेतला आणि मागे वळून पळत सुटली. ती परत एकदा काळोखातून पास झाली आणि ‘मृगजळ’ नावच्या घरात दाखल झाली. घरात शिरण्याच्या आधी तिने मागे वळून बघितलं पण काळ्या कभिन्न काळोखाशिवाय तिला काहीच दिसलं नाही.
ती घरात गेली तेव्हासुद्धा लाइट गेलेलीच होती. डायनिंग टेबलवर कॅन्डल्स जळत होत्या. सर्वजण डायनिंग टेबलच्या भोवती उभे होते. अनिच्या गाडीची काच कुणी आणि का फोडली? या विषयावर सर्वांचा परिसंवाद सुरू होता. तिथलं वातावरण बघून हंसीकाला हायसं वाटलं कारण ती परत तिच्या विश्वात आणि तिच्याच घरात आली होती. समोर असलेल्या शौनकला बघताच ती त्याला बिलगली. शौनकल वाटलं की, होतं असलेल्या विचित्र प्रकारांमुळे ती घाबरली असावी. तो तिला थोपटत राहिला. आपण आधीच्याच घरात आलो आहोत का? हे तपासण्यासाठी हंसीकाने तिचा हात शौनक समोर धरला आणि त्याला रिंग दाखवली, त्याने भुवया ऊंचवून स्मितहास्य केलं. हंसीकाला त्यातल्या त्यात बरं वाटलं.
त्यांचा परिसंवाद आणि थोडाफार मधून मधून वाद सुरूच होता. इतक्यात दारावर जोरात टक टक झालं. जवळपास सर्वांच्याच काळजात धस्स झालं. सारंग दरवाज्याकडे जायला वळला. तोच त्याला रचनाने आवरलं. पण त्याने बाहेर जात नसल्याचं सांगितलं आणि दाराजवळ जाऊन पडदा तेवढा ओढला. दाराच्या बाहेर काळोख होता. तिथंच त्याला दोन आकृत्या उभ्या दिसल्या. तीनच्या हातात निळ्या रंगाच्या ग्लोस्टिक्स होत्या. तो दरवाजा उघडणार इतक्यात आर्याने त्याला टोकलं पण त्याने निळ्या ग्लोस्टिक्स बघितल्या असल्याचं सांगितलं आणि दार उघडलं. ते सक्षम आणि अनि होते.
ते दोघं हसतच घरात आले. सक्षमच्या हातात पुस्तक होते. ते त्याने डायनिंग टेबलवर ठेवलं. तिकडे कुणाचंच लक्ष नव्हतं.
मग सर्वांनी मिळून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला आणि संमिश्र आवाजात काही असं ऐकू आलं, “तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही कुठे होतात? काय झालं होतं तिकडे? काय झालं प्लीज सांगाल का आम्हाला?”
“आम्ही एक फोन कॉल करायला गेलो आणि आम्ही जेव्हा त्या घरच्या खिडकीतून पहिलं तेव्हा, हे सर्वच. मी ते बघत असताना पडलो आणि हे बघा माझ्या डोक्याला लागलं. जे आता माझ्या डोळ्यांसमोर आहे तेच मी बघत होतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे….”
“एक मिनिट थांबा… तुम्ही आधीही आला होतात आणि हीच गोष्ट आम्हाला सांगितली होती. परत परत तीच गोष्ट आम्हाला का संगत आहात? पण तुम्ही आलात तेव्हा तुमच्या हातात बॉक्स होता ना?” रचना म्हणाली.
“वेट…, व्हॉट?” अनि आश्चर्यचकित होऊन म्हणाला.
“हो, कारण अनि जेव्हा परत आला होता तेव्हा त्याच्या डोक्यावरच्या जखमेवर बांडेज लावलं होतं.” आर्या म्हणाली.
“पण ते बांडेज नव्हतं.” नीलिमा बांडेज कडे बोट दाखवत म्हणाली.
“काय म्हणायचं आहे तुला?” आर्या डोळे मोठे करत म्हणाली.
“अरे बाबांनो, मी जे बांडेज लावलं होतं ते रेग्युलर होतं आणि आता जे लावलं आहे ते कापडी बांडेज आहे.” नीलिमाने स्पष्टीकरण दिले.
“एक मिनिट थांब, इथे सक्षम आणि अनि होते का?” हंसीकाने विचारले.
“हो, होते आणि तुम्ही पुस्तक घेऊन गायब झाला होतात.” आर्या टेबलाकडे बोट दाखवत म्हणाली.
“तुम्ही बॉक्स घेऊन गेला होतात आणि आम्हाला काहीच कल्पना नव्हती तुम्ही कुठे गेलात ते.” रचना त्यांच्याकडे बघत म्हणाली.
“आम्ही त्या घरात गेलो होतो जिथे सर्वांकडे लाल रंगाच्या ग्लोस्टिक्स होत्या.” सक्षम म्हणाला. त्याने आणि अनिने मिळून एकाच वेळी खिशातल्या लाल रंगाच्या ग्लोस्टिक्स काढल्या आणि सर्वांसमोर धरल्या आणि म्हणाला, “हे बघा. आम्ही ह्या लाल ग्लोस्टिक्स त्या घरातल्या बॉक्स मधून घेतल्या. बघा, तुमचा विश्वास नसेल तर तो डायनिंग टेबलवर ठेवलेला बॉक्स बघा. तो अजून सीलबंद आहे.” सक्षम बंद असलेल्या लाल रंगाच्या ग्लोस्टिकच्या बॉक्सकडे हात दाखवत म्हणाला.
सर्वांनी त्या बॉक्सकडे बघितलं आणि सुटकेचा निःश्वास सोडला.
“मित्रांनो, जर ते इथून गेले होते तर ते इथेच आलेत. ते बरोबर घरात आलेत.” शौनक अनि आणि सक्षमला मिठी मारत म्हणाला आणि पुटपुटला, “वेलकम बॅक गाईज...”
“मग तिथला सारंग कसं आहे? काय म्हणतो तो?” सारंग नशेत बडबडला.
“तो... तो तुझ्याच चिंतेत आहे. जसा तू इथे आहेस.” अनिने डोळे मिचकावत म्हटले.
“अच्छा, म्हणजे ते तुम्ही आहात तर, मेसेज चिकटवून गेलेले.” हंसीका म्हणाली
“नाही, मी कोणताच मेसेज वगैरे लिहिला नाही किंवा काही बाहेर घेऊन गेलेलो नाही. आमच्याकडे दोन मेसेजेस होते. एक जो मी लिहिला होता आणि दूसरा दारावर लावलेला.” अनि म्हणाला.
“आणि आमच्याकडेसुद्धा. आमच्याकडे सुद्धा दोन मेसेज आहेत. एक अनिने लिहिलेला आणि दूसरा दारावरचा.” एकसारखा मेसेज असलेले ते एकमेकांचे ड्यूप्लिकेट कागद अनि आणि सक्षमला दाखवत हंसीका म्हणाली.
“जर ह्या अनिने मेसेज लिहिला नाही; त्या दुसर्या अनिने दारावर येऊन चिकटवला नाही तर मग दारावर मेसेज चिकटवून कोण जातयं?” हंसीकाने प्रश्न उपस्थित केला.
“क्वांटम डी - कोहेरन्स स्पष्ट करतं की दोन वेगवेगळी आऊटकम्स येऊ शकतात. ज्यांच्या विश्वात एकमेकांशी काहीही संबंध नसतो.” रचना म्हणाली.
“म्हणजे एक मेसेज कमीत कमी चार वेळेस लिहिला गेलाय तर....” शौनकने त्याचं मत मांडलं.
“म्हणजे एकूण किती अनि आणि सक्षम रस्त्यावर फिरताहेत?” शौनकचं बोलणं मध्येच तोडत हंसीका जोरात म्हणाली.
“ओके, आपण काहीही करण्याच्या आधी आपण आपापली घरं ओळखण्यासाठी कोणतातरी उपाय सुचवा.” रचना म्हणाली.
“नाही, तसं काहीही करू नका. फक्त घरात शांतपणे बसून रहा.” हंसीका म्हणाली.
“नको. तसं नको करायला. इथे उपस्थित असलेले सर्वजण आपल्याच विश्वातले आहोत का हेसुद्धा आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे घरात राहणं हे रियालीस्टिक नाही वाटत.” आर्या म्हणाली.
“आपल्याला काहीतरी असा मार्कर हवा ज्याने आपण ह्या घरवर काहीतरी खूण करू शकू.” शौनक म्हणाला.
“नाही, आपण जो विचार करतोय तोच आणि तसाच विचार बाकीचे आपण करत असू. आपण जर मार्करने घराला ओळख दिली तर असे असंख्य सारख्या रंगाचे घरं मार्क होतील.” सक्षम म्हणाला.
“आपल्याला काहीतरी वेगळं आणि युनिक करायला हवं.” अनि म्हणाला.
“हां... आपण एक करू शकतो. आपण लुडो खेळताना जे फासे वापरतो ते वापरुयात. म्हणजे प्रत्येकाचा फसा वेगळा पडेल आणि सारखा पडला तरी आपण तो कुठेतरी लिहू. आर्या फासे आणतेस प्लीज?” सक्षम म्हणाला.