Suvarnamati - 16 in Marathi Fiction Stories by Mrs. Mrinmayee Shirgaonkar books and stories PDF | सुवर्णमती - 16

Featured Books
Categories
Share

सुवर्णमती - 16

16

दुसऱ्या दिवशी चंद्रनाग प्रभातीच लॉर्डला भेटण्यास गेला. प्राथमिक बोलाचालीनंतर, रीतसर, जेनचा हात त्याने मागितला. यावर लॉर्ड कार्टन, प्रथम प्रचंड चकित झाले आणि आणि बघताबघता त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्यांनी जेनला बोलावणे पाठवले. आणि लगेच निघण्याचा आदेश दिला. चंद्रनागास काही उत्तर देण्याची तसदीही न घेता ते आतील दालनात निघून गेले.

सुवर्णमतीस हे कळताच ती सूर्यनागाकडे आली, आणि झालेला सर्व प्रकार तिने कथन करून आपणास ताबडतोब तिथे जायला हवे असे सुचवले. पुढे काहीच न बोलता दोघेही लगबगीने लॉर्ड कार्टनच्या कक्षाजवळ पोहोचली. भेटीसाठी आपण आल्याची वर्दी दिली. लॉर्ड कार्टनने त्यांना आत बोलावले आणि आपण लगेचच जेनसह कूच करीत असल्याचे सांगितले. सूर्यनाग काही बोलणार, तेवढ्यात सुवर्णमती चट्कन पुढे झाली आणि म्हणाली , "माय लॉर्ड, जेन माझी अत्यंत चांगली मैत्रीण आहे, आणि तिचे हित हे माझ्यासाठी प्रथमस्थानी आहे. माझे देवरजी चंद्रनाग, तिच्यावर जीवापाड प्रेम करतात आणि तीही त्यांच्यात मनाने गुंतली आहे. तुमचा यांच्या विवाहास विरोध असणं अगदी साहाजिकच आहे. दोन अगदी भिन्न संस्कृती आहेत आपल्या. भिन्न धर्मही. शिवाय विलायती लोकांच्या दृष्टीने आम्ही देसी, म्हणजेच मागासलेले वाटणंही शक्य आहे.

पण आता दुसऱ्या बाजूने विचार करूया. जेन, न-कळत्या वयापासून या देसी लोकांबरोबरच लहानाची मोठी झालीय. आता आपण विलायतेत तिचा विवाह करू पाहाल, तर तिला तिथे, आपली मुळे रुजवणं किती कठीण जाईल याचा विचार आपण केलेला दिसत नाही. शिवाय तिथे तिला राजघराणे नक्कीच मिळणार नाही."

लॉर्ड कार्टन नी अत्यंत रागाने सुवर्णमतीकडे पाहिले. पण आता थांबून चालणार नव्हते. ती पुढे म्हणाली, "शिवाय तिला तुमच्यापासून दूर राहावे लागेल ते निराळेच. दुसरा मार्ग, आपण तिचा विवाह इथल्याच एखाद्या फौजी अधिकाऱ्याशी करून द्याल. ती एका फौजी राहुटीतून दुसऱ्या फौजी राहुटीत फिरत राहील. असे जीवन तिच्या वाट्याला येईल, ज्याचा तिला मनस्वी तिटकारा आहे.”

आता लॉर्ड कार्टन पेटून गेले. ही कालची पोर त्याना कैचीत पकडू पाहत होती. सीमा ओलांडली होती तिने. आणि अत्यंत भडकलेल्या कार्टनने वर्मी घाव घातला. "कुंवारी, आणि म्हणून तुम्ही चाहता की जो तुमचा देवर, तुमच्या प्रेमात पागल आहे, मोठ्या भावाशी जिचा विवाह ठरला असताना, तिला चोरून भेटण्यास तिच्या नगरीस जातो, तिथे तुम्ही दोघे रासलिला रचता, परत येऊन तू मोठ्या भावाशी विवाह रचतेस, हे असंच सर्व, आता सुरळीत सुरू राहावे, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकता यावी, म्हणून माझ्या साध्या सरळ कन्येला फशी पाडायचा डाव रचतेस?"

ते सूर्यनागाकडे आणि चंद्रनागाकडे पाहून, अत्यंत कुत्सित विखारी हसले. सगळेच उठून उभे राहिले. चंद्रनाग सरळ कार्टनच्या दिशेने प्रचंड रागात निघाला. सूर्यनागाने त्याला मागूनच थोपवले. सुवर्णमतीचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता. तिने क्षणभर डोळे मिटले. तिच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे, एकदमच मिळाली होती तिला. सगळाच उलगडा झाला होता. तिचे अवसान गळाले. कोणत्याही क्षणी आता ती कोलमडून पडली असती. सूर्यनागाचे लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेले. मागून येऊन त्याने तिला आधार दिला.

आश्चर्यचकित मनाने त्याने नोंद केली, सुवर्णमतीकडे नुसतीच माहिती नव्हती. ती कशी, कुठे, केव्हा, आणि किती वापरायची, या चाणाक्षतेची देणगी तिला होती. आणि सगळ्यात महत्वाचे, हे सर्व वापरण्याचा निर्भीडपणा तिच्याकडे होता. पण लॉर्ड कार्टन ने तिच्या वर्मी घाव घातला होता. आता तिला आधाराची गरज होती. तिचे कमकुवत होणे फार घातक ठरले असते.

मग सूर्यनाग अत्यंत शांत पण निश्चयी स्वरात बोलू लागला. “लॉर्ड कार्टन, आपल्याला माहिती देणारे, आपले खबरे, हेर, बरीच माहिती आपल्याला देतात. पण त्याची योग्य अयोग्यता आपल्यालाच तपासून पाहावी लागते. आपणास फारच अर्धवट आणि चुकीची माहिती मिळाली आहे.

केवळ आपण आमचे पाहुणे आहात, व जेनचे वडील आहात, म्हणून आम्ही शांत राहातो आहोत. अन्यथा आमच्या पत्नीबद्दल, बंधूंबद्दल, असे दुरोद्गार काढणाऱ्याची आम्ही कधीच गय केली नसती.

आता माझ्या पत्नीने जे मुद्दे सांगितले ते नीट विचार केलात तर तुम्हाला पटतीलच. पण एक महत्वाचा मुद्दा तुमच्या कसा लक्षात नाही आलेला, याचे मला आश्चर्य वाटत आहे. मागील बंडाळीत विलायती अधिकाऱ्यांच्या स्त्रियांची झालेली होरपळ आणि फरपट आपण नक्कीच विसरला नसाल. उद्या काही कठीण परिस्थिती निर्माण झालीच तर जेन आमच्या राज्याइतकी सुरक्षित इतर कोठेच नसेल. तुमच्या फौजा तिला हात लावणार नाहीत आणि आमच्या फौजाही स्वत:च्या राणीच्या केसालाही धक्का लावणार नाहीत. शिवाय आम्ही सगळे तिच्या सुरक्षिततेसाठी जान पणाला लावू.”

सुवर्णमती आता सावरली होती. ती म्हणाली, "मगाशी आपण जे आरोप माझ्यावर केलेत, त्याविषयी तुम्ही जेनशी बोलावे. तिला सर्व सत्य परिस्थिती माहित आहे. पण एक नक्की सांगू शकते, माझ्या देवरजींबरोबर जेनच्या विवाहास मान्यता द्याल, तर आजपर्यंत ती मातेच्या प्रेमापासून वंचित राहिली ते तिला मिळेल. कुटुंबकबिला मिळेल. मला माहीत आहे मी लहान तोंडी मोठा घास घेतला. पण आपण आमच्या बोलण्याचा शांतपणे विचार करावा. आमचे म्हणणे आपणास निश्चितच पटेल. आम्ही सर्वजण आपल्या निरोपाची वाट पाहू.” एवढे बोलून त्यांनी लॉर्डची रजा घेतली.

तिथून बाहेर पडताक्षणी मात्र, ती सरळ आपल्या कक्षातील लहान दालनात गेली आणि तिने दरवाजा आतून बंद केला. डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

इकडे लॉर्ड कार्टन पेचात सापडले. त्यांना सूर्यनाग आणि सुवर्णमतीचे बोलणे पटले होते. परंतु तिचा इतका भयंकर अपमान केल्यानंतर, आता प्रस्तावाचा स्वीकार करणे कठीण होऊन बसले.

त्यांनी जेनला जवळ बोलावले. तिच्याजवळ मनातली खळबळ व्यक्त केली. तिची इच्छा विचारली. तिने, चंद्रनागाशी विवाह करण्याची, तिची मनापासून इच्छा असल्याचे सांगितले. वनमंदिरी घडलेला प्रकार, त्यानंतरचा चंद्रनागाचा झालेला गैरसमज, हे सर्व त्या दोघांनीही आपल्याला पूर्ण विश्वासात घेऊन सांगितले आहे असेही ती म्हणाली. वर सुवर्णमती फार निराळी आहे, ती तुम्हास नक्कीच माफ करेल अशी ग्वाही दिली.

लॉर्ड कार्टन सर्वांच्या भेटीस आले. सुवर्णमतीची, चंद्रनागाची आणि सूर्यनागाची मनापासून माफी मागितली. विवाहास आपली संमत्ती शेषनागास सांगितली.

लवकरच विवाहाची तारीख ठरवू असे म्हणून लॉर्ड कार्टन जेनसह निघून गेले.

सर्वत्र आनंदी आनंद झाला. एक नवे पर्व शेषनगरीत सुरू होणार असे बोलले जाऊ लागले. प्रजेमध्ये अधिक सुरक्षिततेची भावना पसरली. नव्या दुल्हनने हे घडवून आणले असे सर्व जण बोलू लागले. शेषनाग आणि राणीसरकारांना बहुला कुठे ठेवू नि कुठे नको असे झाले.

बहू मात्र काही कारणाने उदास दिसत होती. शेवटी दोघांनी, जवळ बसवून तिला कारण विचारले. सूर्यनागही उपस्थित होते. मात्यापित्याच्या प्रेमाने, सासससुरजीनी उदासीचे कारण विचारताच सुवर्णमतीच्या डोळ्याला धारा लागल्या.

‘काय सांगू यांना? ज्याला समजू लागल्यापासून आपल्या जोडीदाराच्या रूपात पाहिले, तो मिळावा म्हणून प्रयत्न केले, तोच माझा पती माझा अत्यंत टोकाचा तिरस्कार करतो. त्या आगीत मी रात्रंदिवस जळत आहे. कसे सांगावे?’ तिला कधी नव्हे इतके असहाय्य वाटले त्याक्षणी.

शेवटी म्हणाली, “जन्मल्यापासून मातापित्याशिवाय कधीच राहिले नाही. त्यांची फार आठवण येते आहे.”

“बस इतकेच ना?” दोघेही राजाराणी हसू लागले. “बेटा या सगळ्या धामधुमीत पगफेऱ्याना जाताच नाही आलेलं तुला. तर आपण लवकरच व्यवस्था करू. तुझ्या पिताजींचा निरोपही आला आहे. जाऊन ये माहेरी.”

नेहमीची औपचारिकता बाजूला ठेवून राजाजींनी लेकीप्रमाणे एकेरीत उल्लेखले आणि तिला अधिकच रडू येऊ लागले. राणीसरकारांनी मग जवळ घेऊन थोपटले, तेव्हा जरा शांत झाली सुवर्णमती.