Suvarnamati - 11 in Marathi Fiction Stories by Mrs. Mrinmayee Shirgaonkar books and stories PDF | सुवर्णमती - 11

Featured Books
  • అరె ఏమైందీ? - 16

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 2

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • అరె ఏమైందీ? - 15

    అరె ఏమైందీ? హాట్ హాట్ రొమాంటిక్ థ్రిల్లర్ కొట్ర శివ రామ కృష్...

  • నిరుపమ - 1

    నిరుపమ (కొన్నిరహస్యాలు ఎప్పటికీ రహస్యాలుగానే ఉండిపోతే మంచిది...

  • ధర్మ -వీర - 5

    వీర ఒక్కసారిగా వెనక్కి తిరిగి చూస్తాడు, చూసి "వీడా, వీడికి ఎ...

Categories
Share

सुवर्णमती - 11

11

शेषनगरीही नव्या बहूच्या स्वागतासाठी सजली होती. गुढ्या, तोरणे, कारंजी आणि खास शेषनगरीचे वैशिष्ट्य असलेल्या मोठमोठ्या गालिचांच्या रांगोळ्या. इथली भव्यता निराळीच होती. ‘आपल्या महालास लाजवतील, अशा भव्य, इथल्या दरबाऱ्यांच्या कोठ्याच आहेत.’ सुवर्णमतीच्या मनी आले.

राजमहाल दुरूनच दिसू लागला. रात्रीच्या काळोखात त्यावर केलेली रोषणाई पाहून डोळे दिपून जात होते.

रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभे राहून, नगरवासी जयजयकारात नव्या बहूचे स्वागत करत होते. सगळीकडे जल्लोष सुरू होता.

महालात पोहोचताच नव्या बहूस प्रथेप्रमाणे कुंकुमजलात पाऊले बुडवून आत येण्यास राणीसरकारांनी सुचवले. तसेच तळहात कुंकुमजलात बुडवून तिच्यासाठी राखून ठेवलेल्या भिंतीवरील कोनाड्यात उमटवण्यात आले. आता एकच कोनाडा रिता उरला, चंद्रनागाच्या बहूचा!

नंतर थोडेसे जलपान झाले आणि दुल्हादुल्हनला त्यांच्या कक्षापर्यंत मोठ्या जेठ,जेठाणींनी रीतीप्रमाणे पोहचवावे असे सांगण्यात आले. जेठ,जेठाणी हसत हसत उठले. जेठजींनी सूर्यनागाचा हात धरून ठेवला. जेठाणी सौमित्रा सुवर्णमतीस घेऊन कक्षात गेली. तिला जेठाणीने खास मऊसूत मखमली वस्त्रे लेवविली. नाजूक आभूषणे दिली. मग खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था आहे की नाही हे पाहून, तिने श्रृंगारलेल्या पलंगावर तिला बसवले. मग मोठा घूँघट तिच्या चेहऱ्यावरून ओढून घेतला. आज घूँघट उठलाच पाहिजे, नाहीतर अपशकून होतो असे हसतहसत सांगून बाहेर पडली.

सौमित्रा खाली आल्यावर, शंखनागा ने सूर्यनागास हातास धरून वर नेले आणि त्याच्या कक्षात नेऊन सोडले. बाहेरून दार बंद करून तो हसतहसत निघून गेला.

सूर्यनाग सजवलेल्या पलंगाजवळ आला. काही क्षण तेथेच उभा राहिला आणि पाठ वळवून निघून जाऊ लागला. सुवर्णमतीच्या तोंडून आश्चर्याने उद्गार निघाले, "कुंवरजी?"

तो जागीच थांबला. तिच्याकडे पाठ करून. काहीच बोलला नाही. काही क्षण असेच अवघडलेल्या शांततेत गेले.

मग सुवर्णमती अडखळत म्हणाली, "जेठाणीजी सांगून गेल्या, घूँघट आज नाही उठला तर अपशकून होतो."

सूर्यनाग सावकाश मागे वळला. तिच्याजवळ आला. घूँघट झट्क्याने चेहऱ्यावरून ओढून मागे टाकला. सुवर्णमतीने नजर उचलून पाहिले. सूर्यनागाची नजर तिच्यावर खिळली होती. प्रचंड विखारी तिरस्कार त्या नजरेत भरला होता. सुवर्णमती पार अंतर्बाह्य हादरून गेली. काही बोलण्यासाठी तिचे ओठ हलले पण शब्द बाहेर पडलेच नाहीत. काही क्षणात एक अत्यंत विषारी हास्य, तिच्या चेहऱ्यावर फेकून, सावकाश वळून, सूर्यनाग कक्षालाच लागून असलेल्या, दुसऱ्या दालनात निघून गेला आणि त्याने दार लावून घेतले.

एखादी विखारी, तिरस्कारपूर्ण नजर काही वेळेस मोठ्यातल्यामोठ्या आघातापेक्षाही बरीच पडझड करून जाते. जेव्हा हे अनपेक्षितपणे घडते, तेव्हा तर, हा आघात फारच भयंकर असतो. सुवर्णमतीला हा धक्का एवढा मोठा होता की, काही काळ तिला समजलेच नाही की नक्की काय घडले. आश्चर्य, अपमान, अवहेलना, दु:ख, पराभव, या सर्व भावनांच्या कल्लोळात, ती किती तरी वेळ तशीच बसून राहिली. हळूहळू अश्रू गालांवर ओघळू लागले.

बराच वेळ असाच गेल्यावर, मग सावकाश उठली. आतल्या बाजूला जलकुंड होते. सावकाश वस्त्रे उतरवून ती जलकुंडात शिरली. तिच्या मनीची आग आता ते जलकुंड तरी कसे विझवणार?

मग तिच्या मनात विचारचक्र सुरू झाले. चूक आपलीच आहे. आपण इतर सर्व गोष्टींची परिपूर्ण योजना आखत गेलो. या नातेसंबंधाविषयी पण विचार जरूरीचा होता. जो आपण कधी केलाच नाही. विवाहविधी म्हणजे विवाह नव्हे, हे आपणास कसे उमगले नाही? आपल्या मनी त्यांच्याविषयी प्रीत आहे, म्हणजे त्यांच्याही मनी असेलच, असे आपण गृहीत धरले. एवढा माझ्याबद्दल तिरस्कार कुवरांच्या मनात का आणि कधी निर्माण झाला असेल? आणि आपल्या ते लक्षातही येऊ नये? एवढ्या कशा गाफिल राहिलो आपण? तिला त्या दिवशीची, गंगानगरीतील रात्रीची, कुवरांची आणि तिची भेट आठवली. किती आस्थेने बोलले ते आपल्याशी. नंतर मात्र विवाहाच्या विधींशिवाय तशी आपली भेटच नाही झाली. मग मधल्या काळात असे काय घडले असावे?

सुवर्णमतीची मती चालेनाशी झाली. बऱ्याच वेळाने ती पाण्यातून बाहेर आली, वस्त्रे परिधान करून पलंगावर येऊन बसली. आता पुढे काय हा प्रश्न तिच्या मनात घोंघावू लागला. बराच काळ ती या प्रश्नाशी झुंजत होती.

मग तिने जाणीवपूर्वक स्वत: आणि कुंवर यांना मनावेगळे केले. तिची, ही जूनी सवय. एखादी गोष्ट फारच मनात घोंघावू लागली आणि त्यातून पुढचा मार्ग दिसत नसेल, तेव्हा त्या मुद्दयाला पूर्ण मनावेगळे करावे, इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, नवे आराखडे बनवावेत. काही काळाने पुन्हा नव्याने जुन्या प्रश्नांना तपासून पहावे. बऱ्याचदा त्याचे उत्तर आसपासच सापडे.

तिरस्कार वाटूनही, कुंवर लग्नवेदीवर उभे राहिले होते याचाच अर्थ राज्यहित त्यांच्याही मनी प्रथमस्थानी होते. आणि या एकाच गोष्टीवर तिने लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले. एकदा निर्णय झाल्यावर ती शांतपणे झोपून गेली.

सूर्यनागाने मात्र रात्र तळमळत काढली. एकीकडे सुवर्णमतीला दिलेला हा कडवा आघात त्यांस सुखावत होता तर दुसरीकडे त्यावेळची तिची दु:खाश्चर्याने स्तिमित नजर आठवून, प्रथमच तो स्वत:च्या विचारांबाबत साशंक झाला होता. ‘सुवर्णमती आम्हा दोघांना खेळवण्याच्या दृष्टीने, आणि राज्यमोहाने इथे माझ्याशी विवाह करून आली असेल तर आज तिच्या डोळ्यात दु:ख का दिसावे? राग, संताप, उद्रेक का नव्हता? ते नाटक असेल, तर, ही एक महान अभिनेत्रीच असली पाहिजे.’

त्यांच्या सुहागरात्रीच्या कल्पनेने चंद्रनागानेही रात्र तळमळत काढली.