I met Savarkar! in Marathi Spiritual Stories by Amrut Dabir books and stories PDF | मला सावरकर भेटले !

Featured Books
Categories
Share

मला सावरकर भेटले !

आज-काल कोरोना हा विषाणू संपूर्ण जगात थैमान घालतो आहे. अरे अरे, माझे कीती तरी मित्र आयुष्याचा ऐन उष:कालात या विषाणूला बळी पडले! मृत्युमुखी पडलेल्या लोकांची आकडेवारी ऐकली तरी अंगावर काटा येतो. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या लोकांचे किती हाल होत असतील ते त्या मुरलीधरलाच ठाऊक! 'लौकडाऊन' मुळे किती तरी लोक मानसिक आजारांच्या मगरमिठीत खेचले गेले! असा सगळा विचार करत रस्त्यावरून चालत असतांनाच मला निरंजन दिसला! ही त्याची नेहमीची कामावरून घरी येण्याची वेळ. अगदी अलौकिक व्यक्तिमत्त्व, कर्तव्यनिष्ठ सुकुशल डॉक्टर म्हणून लोकांमध्ये सुप्रसिद्ध असलेला निरंजन हा माझा बालमित्र. नेहमी कामावरून येतांना तेच तेज, तेच हसू आणि तीच धीरगंभीर देहबोली! आज न रहावता मी त्याला भेटलो आणि विचारलंच, "तुझ्या आजूबाजूला एवढा सगळा गोंधळ, संकट आणि ताण असतांना तू एवढा शांत कसा? स्वतःचा सख्खा भाऊ या महामारीत स्वर्गवासी झाला तरी तू आपला तोल कसा बिघडू दिला नाहीस? तुझ्या या स्थितप्रज्ञ अवस्थेची प्रेरणा तरी कोण?"

माझे प्रश्न ऐकून तो तेजस्वी पणे हसला माझ्या खांद्यावर हात ठेऊन म्हणाला, "या सगळया दुर्गम अवस्थेत मला प्रेरणा देणारी व्यक्ती एकच.... तात्याराव!"

"तात्याराव" हा शब्द ऐकताच माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले! "अनादि मी अनंत मी अवध्य मी भला" ही कविता ऐकू येऊ लागली, डोळ्यांसमोर मला उसळत्या समुद्राच्या लाटा, विजांचा कडकडाट आणि गंभीरपणे मधोमध कोट, धोतर, काळी टोपी परिधान केलेले, हातात घेतलेली छत्री जमिनीला टेकवून एकाद्या अभेद्य अजेय पर्वता सारखे उभे असलेले सावरकर दिसले!

परत भानावर आलो तेव्हा निरंजन म्हणाला, "हेच तेज जे तू आत्ता अनुभवलंस तेच मला बळ देत. ऐक मी अजून व्यवस्थित सांगतो तुला, आज आपल्यासाठी स्वतःच घरदार सोडून अहोरात्र कष्ट करणाऱ्या डॉक्टरांकडे, अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांकडे बघून त्या क्रांतीकारकांचीच आठवण येते. आपले दुःख मागे सारुन समाजाच्या दुःखांना आपलंसं करून घेणे आणि आपल्या आधी इतरांच्या सुखाचा विचार करणे, अरे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेला खरा कर्मयोग तो हाच! परिस्थिती खरच खूप बिकट आहे, पण हार मानून कसं चालेल? शत्रू समोर कधीच पराभव न स्वीकारण हे मी तात्यारावांकडूनच शिकलो. तात्यारावांना अंदमानच्या काळकोठडीत काय कमी त्रास सहन करावा लागला? विचार जरी केला तरी अंगावर सर्रकन काटा येतो! अंगाखांद्यांवर लोखंडी बेड्या, जेवायला दोन वेळचं अन्न नाही. मानसिक छळांसोबत काथ्या कुटणे, कोलू ओढणे आणि अनेक शारीरिक त्रास त्यांना सहन करावे लागले. आपली परिस्थिती त्याहून बरीच यात तिळमात्र ही शंका नाही! तरी आपण शुल्लक कारण देत दुःखी होत बसतो.

आपण काही कुणावर उपकार करतोय अशी भावना त्या त्यागमूर्तींच्या मनात कधीच आली नाही उलट, "माझे भाग्य थोर म्हणून अशी सेवा करण्याची संधी मला मिळाली." अस ते म्हणत. अरे कारागृहाच्या चार भिंतीतलं अत्यंत अमानुष वातावरण असतानाही काळकोठडीत सावरकरांनी आपल्या नखांनी भिंत कोरून 'कमला' सारखं उत्कृष्ठ महाकाव्य लिहिलं आणि ते अंदमानला पुरुन उरले! महीने-महीने तो दुष्ट बैरी सावरकरांना काळकोठडीत एकांतवासात डांबायचा आणि सावरकर त्या अवस्थेत ही पुर्ण अंधारात असतांना सुद्धा आपल्या अंतरी असलेल्या तेजोमय आत्मतत्वावर ध्यान धरून निर्विकल्प स्थितीत मग्न राहायचे! आपण घरच्या घरी सगळ्या सुखसोयींमध्ये गादीवर लोळून नैराश्याच्या गोष्टी करतो याची खंत वाटते! अरे कोरोनाशी लढायच आहे, कोरोना झालेल्या माणसांशी नाही! जेवढी प्राण्यांना ही वाईट वागणूक देत नाही तेवढी कइक लोक या आजारी लोकांना देताय! पुण्यात ही प्लेगची महामारी आली होती त्यात स्वतःचे वडील स्वर्गवासी झाले असुन सुद्धा त्या वीर विनायकाने आजारी कष्टी लोकांची मदत केली! या देशासाठी सावरकरांनी संपूर्ण आयुष्य समर्पण केलं आणि स्वातंत्रत्तर काळात दंग्यांमध्ये त्यांच्या याच देशबांधवांनी त्यांच्या भावाचा बळी घेतला, परंतु त्या सगळ्यांना माफ करत "अमर होय ती वंशलता, निर्वंश जिचा देशाकरिता,
दिगंती पसरे सुगंधिता, लोकहित परिमलाची" आपल्या या उद्गारशी ते एकनिष्ठ राहिले! बऱ्याच लोकांना आपण करत असलेल्या कामांची कोणी दखल घेत नाही असं वाटत आणि ते थयथयाट करतात! सावरकरांनी आयुष्यभर निष्काम कर्मयोग निभावला, कोणत्याच गोष्टीची अपेक्षा बाळगली नाही अरे तात्यारावांना उपेक्षेच्या अंधारात उभं करण्याचा, त्याचं योगदान कमी लेखण्याचा खूप लोकांनी प्रयत्न केला पण त्या मूढमतींना हे ठाऊक नाही की तळहाताने सूर्य झाकता येत नाही! अध्यात्म आणि संसार दोन नसून त्यात अद्वैत आहे. "देशसेवा हीच देवसेवा आहे!" असा दैदीप्यमान मंत्र जगाला त्यांनी दिला. "मोक्ष-मुक्ति हीं तुझींच रूपें तुलाच वेदांतीं, स्वतन्त्रते भगवती योगिजन परब्रह्म वदती" या दोन ओळींमध्ये पूर्ण भगवद्गीतेच सार तात्यांनी सांगितल! अशा या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आपण वंशज! आपल्याला कसली आली भीति कोरोनाची?

निरंजनच हे सगळ बोलण ऐकून मी निःशब्द झालो होतो! डोळ्यातुन अश्रुधारा वाहत होत्या, सर्वांगावर रोमांच उभे राहिले होते, हळुवार येणारी वाऱ्याची झुळुक, पलीकडे मंदिरातून येणार घंटानाद, मावळणाऱ्या सूर्याची किरणे आणि तांबूस भासणाऱ्या आकाशामुळे सर्व वातावरण दिव्यरूप झाल होत. जस दिव्याच्या प्रकाशाने अंधाराच साम्राज्य संपूष्टात येत तसच माझ्या मनातुन सर्व चिंता नाश पावली होती! मग नव्या उत्साहाने आणि उमेदीने मी निरंजनला म्हणालो, "आपण येईल त्या परिस्थितीचा अगदी धैर्याने सामना करू. अरे जसे सावरकरांनी सागराला अगस्ती ऋषींचा धाक दाखवला, तसाच आपणही या महामारीला त्या विष्णुरूपी धन्वंतरिचा धाक दाखवू! आता आपल्या देशबांधवांना या संकटातून सोडवण्यासाठी आपण प्रत्येकाने एक निश्चय केला पाहिजे की, "प्राण गमवावे लागले तरी बेहत्तर! पण आपल्या मातृभुमिची या संकटातुन मुक्तता होण्यासाठी मारिता मारिता मरेतो झुंजेन!"

"मारिता मारिता मरेतो झुंजेन"