दुसर्या रियालिटीमध्ये पोहोचलेली फक्त हंसीकाच नव्हती. तिच्यासोबत सारंग, शौनक आणि रचनासुद्धा होते. कारण जेव्हा ते निळ्या ग्लोस्टिक्स घेऊन बाहेर गेले होते तेव्हा सरांगला अनिचं घर दिसलं होतं आणि तिथून बाहेर आल्यावर लाल ग्लोस्टिक्स असलेले तेच त्यांना रस्त्याच्या पलीकडे दिसले होते. हे जेव्हा जिवाच्या आकांताने पळत आले तेव्हा परत एकदा त्या भयाण काळोखातून पास झाले होते आणि जेव्हा ते घरी आले तेव्हा हे घर दुसर्या रियालिटी मधलं होतं.
शौनक, आर्या, नीलिमा, हंसीका आणि रचना हे किचनमध्ये होते. सारंग ब्लॅकमेलिंग नोट पाठवायला म्हणून दुसर्या घरात गेला होता. सर्वांना असं गुंतलेलं बघून अनि आणि सक्षम हळूच हॉलमध्ये येतात. अनि किचन आणि हॉलच्या मध्ये असलेला पडदा हळूच ओढून घेतो. दोघं मिळून डायनिंग टेबलवर असलेले ग्लोस्टिक्सचे बॉक्स बघतात आणि एकदम हळू आवाजात कुजबुजू लागतात.
“कोणता बॉक्स ओपन आहे?” सक्षम
“निळा. लाल बॉक्स अजून उघडलासुद्धा नाहीये.” अनि दबक्या आवाजात म्हणाला. त्यांनी हातात असलेल्या लाल ग्लोस्टिक्स खिशात ठेवल्या आणि दोन निळ्या ग्लोस्टिक्स हातात घेतल्या.
“आता काय करायचं?” सक्षम घाईत म्हणाला.
“म्हणजे काय? शक्य तितक्या लवकर निघायला हवं.” अनि म्हणाला.
“चल, लवकर कर. तू पुस्तक घे आणि मी बॉक्स घेतो.” सक्षम अनिला घाई करत म्हणाला. अनिने पुस्तक हातात घेतले. सक्षमने सर्व फोटो आणि रुबिक्स क्युब एका बॉक्स मध्ये ठेवण्यासाठी म्हणून ते सामान गोळा केले आणि इतक्यातच हॉलचा दरवाजा उघडतो आणि सारंग आत आला. त्याला बघून दोघांची भंबेरी उडते.
सक्षम त्याला घाबरा होऊन विचारतो, “तू कुठे गेला होतास?”
सारंग थोडा गुंगीत सल्यासारखा वाटत होता. तो सक्षमच्या प्रश्नाचं उत्तर न देता हॉलच्या एका बाजूला असलेल्या वाईनशेल्फ कडे वळला आणि म्हणाला, “आय नीड ड्रिंक.”
तो शेल्फमधून वाईन बॉटल काढणार तितक्यात तिला शॉनका आडवा होतो आणि म्हणतो, “तू कुठे गेला होतास?”
“अरे मी त्या घरात गेलो होतो. मी तुला सांगितलं नव्हतं का?” सारंग डोळे चोळत म्हणाला.
“मग काय झालं तिथं?” शौनक भितियुक्त उत्सुकतेत उच्चारला.
“मी दरवाज्याखालून ते पत्र टाकलं. मी पुस्तक बघितलं. मी अनिच्या गाडीतून ते पुस्तक काढण्यासाठी त्याच्या गाडीची मागची खिडकी फोडली आणि पुस्तक घेतलं. नाही, नाही, मी तसं नाही केलं. मी फक्त पत्र टाकलं आणि अं... आणि त्यांची रिअॅक्शन बघण्यासाठी थांबलो.” सारंग नशेत काय बडबडत होता हे त्याचे त्यालाच समाजात नव्हते.
“पण तू फक्त पाच मिनिटांसाठी गेला होतास मित्रा आणि तू तब्बल पाऊण तासाने परत आलायेस.” शौनक सारंगच्या डोक्यात प्रकाश पडण्याच्या प्रयत्नात म्हणाला.
“नाही, वेड्यासारखं बडबडू नकोस. बाजूला हो.” सारंग काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला वाईन तेवढी हवी होती.
“सारंग, नको. असं नको करूस.” शौनक सारंगला आवरण्याचा प्रयत्न करत होता.
त्या दोघंच असं बोलणं सुरू असताना इकडे हॉलच्या दुसर्या बाजूला असलेल्या डायनिंग टेबलवरचे पुस्तक आणि बॉक्स घेऊन अनि आणि सक्षम थोडासाही आवाज न करता हळूच हॉलच्या दरवाज्यातून बाहेर निसटले. ते दोघं निसटल्याचं कुणाच्याही लक्षात आलं नाही. तेवढ्यात सारंग वाईन बॉटल घेऊन डायनिंग टेबलकडे आला आणि त्याच वेळी किचनमधून हंसीका, रचना, आर्या आणि नीलिमा बाहेर आले.
सारंगच्या हातात वाईन बॉटल बघून रचना म्हणाली, “सारंग प्लीज आता नको.”
“व्हाय नॉट नाऊ हनी? व्हाऽऽय नॉऽऽट नाऽऽऊ?” असं म्हणत त्याने बॉटल ओपन करून ग्लासमध्ये वाईन ओतायला सुरुवातसुद्धा केली.
आर्याने सर्वत्र बघितले. तिला अनि आणि सक्षम दिसले नाहीत. ती म्हणली, “अनि आणि सक्षम कुठं आहेत?”
“ते जाऊ द्या. सर्वांत महत्वाचं, बॉक्स कुठे आहे?” शौनकने विचारलं.
“ओह माय गॉड. त्यांनी बॉक्स घेतला वाटतं. पुस्तक कुठे आहे?” हंसीकाने थोड्या घाबर्या आवाजात विचारलं.
“आपलं काहीही न करण्याचं ठरलं असताना ते बॉक्स परत करायला का गेले?” रचना म्हणाली.
“ते म्हणाले होते, जर बॉक्स परत त्या घरात ठेवला तर सर्व पहिल्यासारखं होईल. तुम्हाला आठवत नाहीये का?” आर्याने स्पष्टीकरण दिले.
“ते तसं म्हणाले होते. पण पुस्तकाबाबत आपण काहीच बोललो नव्हतो. त्यांनी पुस्तक का घेतलं?” हंसीकाने परत मूळ मुद्द्याला हात घातला.
“एक मिनिट. सगळ्यात आधी अनि आणि सक्षम बाहेर गेले. नंतर परत आले तेव्हा म्हणाले की आम्ही काहीतरी पहिलं आणि थोडं विचित्र वागू लागले. बरोबर ना?” शौनक म्हणाला.
“नाही, तुम्हीसुद्धा बाहेर गेला होतात, त्याबद्दल बोला काहीतरी.” आर्या मध्येच बोलली.
“मी त्यांना शोधून येतो.” शौनक म्हणाला.
“नाही, मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये.” हंसीका जोरात ओरडली आणि दरवाज्यासमोर जाऊन उभो राहिली. तिचा असा अवतार बघून शौनक शांत झाला आणि त्याने बाहेर जाण्याचा विचार सोडून दिला.
“काय सुरू आहे हे? काहीतरी करा नाहीतर मला हार्ट अटॅक येईल.” दोन्ही हातांनी डोकं गच्च धरत आर्या म्हणाली.
“आपल्याला हेसुद्धा माहिती नाही की बॉक्स घेऊन गेलेले अनि आणि सक्षम याच घराचे आहेत का? त्यांनी काहीच क्लू सोडले नाहीत.” हंसीका तावातावाने म्हणाली.
“एक मिनिट, जर त्यांच्याकडे क्लू असू शकतात तर आपल्याकडे नक्कीच असतील. आपण सर्वांचे फोटो एकत्र करू म्हणजे आपल्यासाठी ती एक खूण म्हणून कामात येईल.” आर्या म्हणाली.
“सारंग प्लीज सांग, तुझ्याकडे आपले फोटोज आहेत का? कारण त्या बॉक्स मधले फोटो हे आपल्या मागच्या पार्टीचे होते आणि ते तूच काढले होते. ती वाईन बाजूला ठेव आणि प्लीज एकदा तरी बघ.” हंसीका पोटतिडकीने म्हणाली.
“मला अजून एक वाईन बॉटल हवी,” असं म्हणा सारंग उठला आणि शेल्फकडे गेला. हंसीका हताश होऊन सारंगच्या खुर्चीवर विचार करत बसली. तिकडे आर्या आणि नीलिमा किचनमध्ये वाईन ग्लास स्वच्छ करत होत्या. जे फुटलेले नव्हते.
सारंग परत आला तेव्हा त्याच्या एका हातात एक नवीन वाईन बॉटल आणि दुसर्या हातात एक पाऊच होतं. त्याने ते पाऊच हंसीका समोर ठेवला आणि तिच्या बाजूच्या खुर्चीवर बसून वाईन ग्लास मध्ये ओतू लागला. हंसीकाने सारंगकडे बघितलं, त्याने वाईन घेतेस का? असं खुणेनेच विचारलं. हंसीकाने नकारर्थी मान डोलवत पाऊच उघडलं. त्यात त्यांचे मागच्या वर्षीच्या पार्टीचे फोटो होते. मागच्या वर्षी सरांग आला नसल्याने त्याला हंसीकाने हे पाऊच गिफ्ट म्हणून दिले होते. आता तेच गिफ्ट एका वेगळ्या आणि विचित्र कामासाठी वापरत येणार होते. त्यात सारंगचा फोटो नव्हता. ती एकामागून एक फोटो बघू लागली. मागच्या वर्षी केलेल्या पार्टीच्या आठवणींमध्ये हरवून जाऊ लागली. काही वेळ ती तशीच त्या फोटोंकडे बघत बसली. मग एक उसासा देत ती सर्वांचा एकेक फोटो निवडू लागली. तिचा आणि शौनकचा असा सेपरेट फोटो नव्हता. त्यामुळे त्यांचा एक फोटो तिने कापून टाकण्याचा विचार केला.
तोपर्यंत इकडे किचन आणि बेडरूमच्या पॅसेजमध्ये रचना आणि शौनक यांच्या रोमांटिक गप्पा सुरू होत्या. त्या गप्पांची थोडीफार कुजबूज हंसीका आणि सारंगला ऐकू येत होती. सारंग थोडाफार नशेत असल्याने त्याकडे दुर्लक्ष करत होता आणि हंसीका मात्र फोटो आणि कात्री हातात तशीच ठेऊन ती कुजबूज ऐकण्याचा प्रयत्न करत होती. ती कुजबूज तिला ऐकू येत नसली तरी काही अशी होती,
“हाय शौनक, कशा सुरू आहेत गोष्टी?” रचना शौनकच्या जवळ जात म्हणाली.
“आयुष्य फार बदलून गेलंय आणि मी भूतकाळातील गोष्टींमध्ये फार जात नाही. वर्तमान आणि भविष्याच्या विचार करण्यात इतका वेळ जातो की इच्छा असूनही मागे वळून बघता येत नाही.” शौनक तिला थोडं मागे सारत म्हणाला.