सक्षम आणि शौनक एकाच कंपनीत कामाला होते. सक्षम आणि आर्याचं लव्ह मॅरेज असतं. सक्षमला आर्या त्यांच्या एका नातेवाईकांच्या लग्नात दिसलेली असते आणि तिथून त्यांची लव्हस्टोरी सुरू होते. मग बर्याच वेळा घरच्यांना समजवल्यावर यांच्या लग्नाला होकार मिळून ते आता सुखाने नांदत असतात. आर्या एक निष्णात फार्मसीस्ट होती. ती ‘वर्ल्ड फार्मा टूडे’ नावाच्या मॅगझीन मध्ये लिहायची. त्याचप्रमाणे तिचा ड्रग्जवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास होता. सक्षम आणि आर्याचा कोरेगांव पार्कला एक छान बंगला होता. आजची पार्टी तिथेच होती. “मृगजळ”मध्ये.
हंसीका येण्याआधी तिथे नीलिमा आणि अनि पोहोचले होते. अनिचा रियल इस्टेटचा बिझनेस होता. त्याचा बिझनेस असल्यामुळे वेळेच्या बाबतीत तो अगदी फ्लेक्सिबल होता. केव्हाही आणि कुठेही बोलावलं तरी हजर असायचा. अनि हा एक बिनधास्त स्वरूपाचा मनुष्य होता. रॉयल स्वभावाचा म्हणतात तसा काहीतरी. त्याची मैत्रीण नीलिमा ही एक मेडिकल स्टुडंट होती. ती आता एम. एस. च्या फायनल इयरला होती. तिचं शिक्षण पूर्ण झाल्यावर अनि आणि नीलिमा लग्न करणार होते. अनि आणि नीलिमा सोबतच आले होते आणि आर्याला स्वैपकात मदत करत होते. सोबतच त्यांच्या गप्पा सुरू होत्या.
“नीलिमा, तुला माहितीये का आज हंसीका येणार आहे?” आर्याने ओव्हनमधला केक काढत विचारलं.
“हंसीका... अं... कोण गं?” निलीमाने प्रश्नार्थक नजरेने आर्याला विचारलं.
“अगं असं काय करतेस, शौनकची लीव्ह इन पार्टनर. तुला गूढ आणि रहस्यमय वाटणारी स्त्री.” बोलताना अचानक आर्याचे डोळे मोठे झाले.
“अच्छा, ती होय. मी विसरलेच होते. मी तिला हंसीका असं कधी म्हणतच नाही. मी तिला ‘आचार्य’ म्हणते. मस्त जुन्या काळातले कामं करणारी मॉडर्न स्त्री” असं म्हणत निलीमाने तिच्या फोनमध्ये आचार्य नवाने सेव्ह केलेला हंसीकाचा नंबर दाखवला आणि हसू लागली.
“तुला ती गूढ आणि रहस्यमय का वाटते?” आर्याने विचारलं.
“ती अॅस्ट्रोलॉजिस्ट वगैरे आहे गं आणि अजून काहीतरी आहे ना...” नीलिमा बोलताना अडखळली.
“न्यूमरोलॉजिस्ट. न्यूमरोलॉजिस्ट. आहे ती अंकशस्त्र अवगत आहे तिला.” अनिने निलीमला मदत केली.
“हां, तेच न्यूमरोलॉजिस्ट.” नीलिमा आठवल्यागत चेहरा करून उच्चारली.
त्यांचं बोलणं सुरू असतानाच दारावर बेल वाजली. अनिने दरवाजा उघडला. समोर हंसीका होती. थोडी वैतागलेली दिसत होती. सोबत तिच्या चेहर्यावर उशिरा पोहोचल्याने आपराधिपणाची एक छटासुद्धा होती.
“हे, हाय हंसीका. हाऊ आर यू? आफ्टर लॉन्ग टाइम हां.” अनिने हसतच स्वागत केले.
“आय एम फाइन. व्हाट्स अप?” हंसीका म्हणाली. इतक्यात कोण आहे बघण्यासाठी आर्या आली आणि तिनेपण जुबाबी चौकशी केली.
हंसीका किचनमध्ये आली आणि मदत करू लागली. मग परत गप्पा सुरू झाल्या.
“मला जास्त उशीर झाला का?” हंसीका अपारधिपणाच्या स्वरात म्हणाली.
“नो, नो, नॉट अॅट ऑल... डोन्ट वरी. अगं माहितीये सायंकाळी ट्राफिक असतं. सक्षम आणि शौनक येतीलच इतक्यात. सक्षमचा फोन आला होता.” आर्या म्हणाली.
“अच्छा. सारंग आणि रचनाचं काय? म्हणजे काही कॉन्टॅक्ट झाला का? मी करणार होते फोन, पण हे बघा काय झालं अचानक.” आपला फुटलेला मोबाइल सर्वांना दाखवत हंसीका नाराजीने उच्चारली.
सर्वजण तिच्या हातातल्या फुटलेल्या स्क्रिनच्या फोनकडे बघत होते. “ओह माय गॉड... कुठं आपटलास? आणि एवढा संताप चांगला नाही आरोग्याला.” अनि तिची खेचण्याच्या उद्देशाने म्हणाला.
“शट अप अनि. आय एम सीरियस. मी ट्राफिकमध्ये अडकली होते तेव्हा शौनकशी बोलत होते आणि अचानक आवाज कट झाला. स्पीकरफोन ऑन करण्यासाठी मी फोन हातात घेतला तेव्हा माझा फोन या अवस्थेत आढळला.” हंसीका तावातावाने बोलत होती.
तिला असं अचानक चिडलेलं पाहून नीलिमा तिला समजावत म्हणाली, “चिल आचार्य. आम्हाला काहीच कल्पना नव्हती की असं काही झालं असेल. कारण बघताक्षणी कुणीही सांगू शकेल की हा फोन पडल्यामुळे असा झालाय. शांत हो.”
“रचना आणि सारंग आतापर्यंत यायला हवे होते.” नीलिमा म्हणाली.
“रचनासुद्धा आहे का?” हंसीका थोड्या हळू स्वरात म्हणाली. रचनाचं नाव ऐकताच हंसीका थोडी नाराज झाली होती. हंसीकाच्या नाराज होण्यालासुद्धा एक कारण होते. कॉलेजला असताना रचना आणि शौनकचं अफेयर होतं. आता त्यांच्यात काही नसलं तरी हंसीका थोडी इनसिक्युयर वाटत होती. तिचं इनसिक्युयर होणं साहजिक होतं.
मग काही वेळ शांततेत गेला. आर्या आणि नीलिमा मिळून पास्ता बनवू लागले. हंसीका वाईन ग्लास स्वच्छ करू लागली आणि अनि केक डेकोरेट करू लागला. परत सर्वांच्या गप्पा सुरू झाल्या. हंसीका थोडी अस्वस्थ वाटत होती. चेहर्यावरून ती थोडी नॉर्मल दिसत असली तरी तिच्या मनात असंख्य प्रश्नांनी काहूर मजले होते. एकाएकी फोनचं खराब होणं तिला खटकत होतं आणि रचनाचं येणं. फोनच्या बाबतीत तिच्या मनात शंका होती की हा कदाचित हॅलेच्या धूमकेतूचा परिणाम असावा. पण ती गप्पच राहिली. यथावकाश पास्ता झाला. केक डेकोरेशन पण केव्हाच झालं होतं. अनिने हॉलमध्ये असलेल्या डायनिंग टेबलवर केक ठेऊन वाईन ग्लास पुसायला सुरुवात केली होती. सौम्य गप्पा सुरू होत्या.
किचनच्या खिडकीत असलेलं छोटंसं बोन्सायचं रोप हातात घेत नीलिमा आर्याला म्हणाली, “वॉव, धिस इज क्यूट.”
निलीमाला स्मितहास्यानेच थॅंक्स म्हणत आर्याने फ्रिजर मधून एक इक छोटीशी बाटली काढली. इंजेक्शन देताना डॉक्टर ज्या बाटलीतून औषध काढतात तशी काहीशी होती. बाटली सर्वांना दाखवत ती म्हणाली, “एनी बडी वॉन्ट धिस? स्पेशली यू हंसीका?”
“काय आहे ते?” अनिने उत्सुकतापूर्वक स्वरात विचारलं.
“केटामाइन.” आर्याने एका शब्दात उत्तर दिले.
“म्हणजे?” अनिने परत विचारलं. त्याची उत्सुकता आता तणाली जात होती.
“जस्ट अ हाय ग्रेड फार्मा, नथींग मच दॅन दॅट. हंसीका जर तुला काही वेळ रीलॅक्स व्हायचं असेल तर तू घेऊ शकतेस.” आर्या सौम्यपणे बोलली.
ते काहीतरी वेगळं असावं असा विचार करत हंसीका त्या बाटलीकडे बघत होती. निलीमच्या चेहर्यावर उत्सुकता तणाली जात होती, ती मेडिकल स्टुडंट असल्यामुळे तिला माहिती असण्याची शक्यता होती, त्यामुळे ती उत्साही दिसत होती आणि अनि संभ्रमावस्थेत होता. ते विचार करत होते आणि आर्या आळीपाळीने त्यांच्याकडे आणि बाटलीकडे बघत होती. इतक्यात दारावरची बेल वाजली आणि सर्वांची तंद्री भंग पावली. अनि आणि हंसीका हॉलमध्ये गेले. किचनमध्ये आर्या आणि नीलिमा ह्या दोघंच होत्या. अनिने दार उघडलं. समोर शौनक आणि सक्षम उभे होते. त्या दोघांना बघून अनिला खूप आनंद झाला. त्याने आळीपाळीने दोघांची गळाभेट घेतली आणि गप्पा सुरू झाल्या.
“यू नो मॅन, धिस कॉर्पोरेट जॉब्स अँड ऑल इज व्हेरी बोरिंग.” सक्षम वैतागून संगत होता.
“येस, आय नो. दॅट्स व्हाय आय एम डूइंग बिझनेस नो?” अनि शौनक आणि सक्षमची मजा घेत म्हणाला. परत एकदा गप्पा सुरू झाल्या. नीलिमाला सारंग आणि रचनाची आठवण झाली. तिने सक्षमला याबद्दल विचारलं तेव्हा तो म्हणाला, “ते पंधरा मिनिटांत पोहोचतील. मला रचनाचा कॉल आला होता.” सर्वजण निश्चिंत झाले आणि मग मागील आठवणींना उजाळा मिळू लागला. सारंग मुंबईला एका आयटी कंपनीत कामाला होता आणि त्याची मैत्रीण रचना त्याच्यासोबतच कामाला होती. आधी त्याची कॉलेजमधली मैत्रीण नंतर कलीग असलेली रचना आता त्याची प्रेयसी झाली होती. ते दोघं तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
हंसीका काहीतरी कामासाठी किचनमध्ये गेली तेव्हा तिच्या मागे शौनकसुद्धा तिच्या मागोमाग आला आणि तिला मागून विळखा घालत म्हटला, “सॉरी हंसीका. मी आजपण उशीर केला. मीटिंग सुरू होती, बॉस सोडतच नव्हता अगं.”
“ठीक आहे रे, मला माहितीये. पण मी कुठं काय बोलले.” हंसीका शौनकचा विळखा सोडत म्हणाली.
“मग मघाशी फोन कट केलास ते?” शौनकने विचारलं.