Chourang in Marathi Book Reviews by Sanjay Yerne books and stories PDF | चौरंग (डॉ. राजन जयस्वाल यांचे समग्र चारोळी काव्य)

Featured Books
Categories
Share

चौरंग (डॉ. राजन जयस्वाल यांचे समग्र चारोळी काव्य)

डॉ. राजन जयस्वाल यांचे समग्र चारोळी काव्य

चौरंग

संपादन / समीक्षा

संजय येरणे.

चौरंग - डॉ. राजन जयस्वाल यांचे समग्र चारोळी काव्य

संपादन /समीक्षा - संजय येरणे.

हक्क- संजय वि. येरणे

मू.पो. तह. नागभीड, जि. चंद्रपूर.

पिन - ४४१२०५

संपर्क- ९४०४१२१०९८

sanjayyerne100@gmail.com

सदर ग्रंथ डॉ. राजन जयस्वाल. नागभीड, साहित्यिक यांच्या

अनुमतीने संपादित केला असून या ग्रंथातील चारोळी व समीक्षा

वापरासाठी हक्क सुरक्षित आहेत.

संपादकीय.... चारोळी काव्य आवृत्ती निमित्त्याने

प्रा. डॉ. राजन जयस्वाल हे विदर्भातील पहिले चारोळीकार तथा झाडीबोली भाषेला राजमान्यता मिळवून देणारे एक साहित्य विचारप्रवर्तक आहेत हे सर्वश्रुत आहेच. सरांचा आणि माझा परिचय अगदी अलिकडचाच. परंतु त्याचं सपूर्ण साहित्य मी वारंवार वाचलेलं आहे. त्यात अगदी तल्लीन होऊन जीवन साधर्म्य शोधण्याचा प्रयत्न करायचा. त्यातूनच त्यांच्या साहित्यावर भरभरुन लिहावं हे मनातल्या मनात राहायचं. अचानक एके दिवशी मी सरांकडे त्यांची ‘मिस्किली व चऊक’ या चारोळी संग्रहाची प्रत मागायला गेलो. सर मला ती अभ्यासात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून द्याल काय? सर नाही म्हणणार तर नव्हतेच. परंतु या संग्रहाच्या एक-एक प्रती तरी सरांकडे असायला पाहिजे ना! सरांनी त्यांचं अख्ख वाचनालय धुंडाळलं, इतरानांही कॉल केलेत. परंतु ह्रया प्रती दुर्मिळ झाल्यात. सरांच्या सततच्या साहित्य लेखन संपर्कामुळे सरांच्या साहित्यप्रतीच त्यांच्याजवळ शिल्लक नाहीत. माझं मन हिरमुसलं. परंतु लगेच सर म्हणाले, अरे! ह्या आवृत्तीच संपल्यात फार अडचण येते. तुझ्या भरारी प्रकाशनवतीने काढून टाक दुसरी आवृत्ती. सरांनी सहज म्हटलं मी ‘मिस्किली’ची दुसरी आवृत्ती काढण्याचं काम सुरू केलं होतं. ते पूर्णत्वासही आलं आणि एकाएकी सुचलं सरांना अशा एकूण किती पुस्तकाच्या आवृत्या काढाव्या लागणार? तेव्हा सरांना म्हटलं, सर आपले चौकार, चौरस, चऊक, चौफेर तथा चोपाट, मिस्किली भाग १ व २ असे अनेक चारोळी संग्रह आहेत. ह्या सगळयाच आवृत्त्या एकत्रित केल्यात आणि एकच पुनःप्रकाशित व अप्रकाशित सर्व चारोळी संग्रहाची आवृत्ती काढली तर! सरांना ही कल्पना अगदी छान आवडली. यात नावीन्यता असल्याने सरांचा होकार व माझे कार्य सुरु झाले.

सरांच्या चारोळी संग्रहाच्या सर्व प्रती इकडून-तिकडून मिळवल्यात आणि मग एक भला मोठा चारोळी संग्रह साकार झाला. या ग्रंथालाही ‘च’ संप्रदायातील नाव द्यायचं ठरलं. सरांनी ‘चतुरंग’ हे नाव सुचवलं. आणि मी ‘चौरंग’ हे नाव ठरवलं. सरांनी पुढे मी म्हटल्याप्रमाणे ‘चौरंग’ नाव कायम केलं. तद्वतच या पूर्व प्रकाशित चारोळी संग्रहातील रिपीट झालेल्या चारोळी काढून टाकण्यात आल्यात व काही अप्रकाशित नवीन मिस्किली स्वरुपाच्या व इतरही चारोळीची यात भर घालण्यात आली आणि ही ‘चौरंग’ ची आवृत्ती आणि त्याची जन्मकथा ......

ही आवृत्ती प्रकाशित झाल्यामुळे सरांची समग्र चारोळी एकत्र रुपाने सर्वांना अभ्यासायला व संग्रही ठेवायला मिळेल. सरांची सर्व चारोळी संग्रह जवळ बाळगण्यापेक्षा व दुर्मिळ संग्रहाला मुकले असतांना ह्या समग्र चारोळी मुळे रसिक वाचकांना फार मोठा आनंदच होणार आहे. एवढे मात्र खरे! कारण मलाही ह्रा जन्मगाथेतून व छोट्याशा संपादकीय प्रकाशकीय भूमिकेतून फार-फार आनंदच प्राप्त झाला आहे. सरांच्या साहित्य कार्य कर्तृत्वात रामाने सेतू पूल बांधतांना हनुमंताच्या मदतीस धावणारी चिमुकली खार आपल्या अंगाला रेती घालून सेतूपुलावर टाकण्याचा हा अल्पसा प्रयत्न तसेच माझे हे सरांचे ‘चौरंग’ साकारण्याचे अल्पसे प्रयत्न होय.

‘मी माझा’ चंद्रशेखर गोखले यांचा महाराष्ट्रातील पहिला चारोळी संग्रह १९९२ मध्ये प्रकाशित झाला तदनंतर विदर्भातील सर्वप्रथम १९९५ मध्ये डॉ. राजन जयस्वाल सरांनी ‘चौकार’ हा संग्रह प्रकाशित केला. त्यामुळे ते विदर्भातील पहिले चारोळीकार ठरतात. त्यानंतर त्यांचे चौफेर, चौसर, चऊक, चौपाट, मिस्किली असे संग्रह समोर आलेत.

चार ओळीची अक्षराचे बंधन नसणारी, चटकन आकलन होणारी, कमी शब्दात विस्तृत आशय देणारी, आजच्या धकाधकीच्या काळात भावनांची व विचारांची संक्षेपाने आशयगर्भ अभिव्यक्ती निर्माण करणारी लघू काव्यप्रकारकृती म्हणजेच चारेाळी होय.

सरांची चारोळी व त्यावरील समीक्षा बघू जाता यातून या साहित्यप्रकारावर आजतागायत प्रतिथयश साहित्यिकांनी टीका केली व उपेक्षित राहिलेला असा हा काव्यप्रकार होय. परंतु विदर्भात डॉ. राजन जयस्वाल व ना.गो.थुटे या कवींनी या काव्यप्रकाराचे जोरदार समर्थन केले. आज या काव्यप्रकाराची वाहवा केली जाते. यात निश्चितच डॉ. जयस्वाल सरांचा भरीव असा प्रथमदर्शनी वाटा आहे. तद्वतच त्यांनी या प्रकारात ‘मिस्किली’ हे चारोळीचा आकृतीबंध असलेलं हास्यात्मक, व्यंगात्मक, उपहासात्मक, मिस्किल हसू देणारं, मनोरंजनात्मक, स्वगत स्नेहाळ अभिव्यक्ती, नाट्यपूर्ण संवादगर्भतेची लय असलेला वेगळाच थाट, रंग व ढंगाची एक स्वतंत्र पेशकश मिस्किली स्वरुपाने केली ही हास्यप्रवृत्तीच्या मिश्रणाचे रसायन देणारी सरांची नावीन्यपूर्ण प्रयोगशील चारोळी होय.

सरांची चारोळी ही मराठी, गुजराती अनुवाद स्वरुप तसेच झाडीबोली भाषेत अनुवाद स्वरुप असे सुद्धा नावीन्यपूर्ण प्रयोग साकारुन चारोळीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत जागतिक दर्जा प्राप्त करून दिला. हे विशेष होय.

अभंग, ओवी, शेर, शायरी, हायकू, संवादीनी, चारेाळी, छंदात्मक कविता तथा मुक्तछंदात्मक काव्य, पोवाडे, लावणी, भूपाळी, रूबाई, दशपदी, सुनित, गझल, विडंबन काव्य असे अनेक काव्यप्रकार काळाच्या ओघात लोकमान्य झालेत. आज नवोदत्तरी साहित्यप्रांतात चारोळी प्रकाराची व्याप्ती तरुणाईपासून सर्वांनाच भावणारी. मनपटलावर छाप देणारी, क्षणभरात विचारगर्थता देत दंग करणारी, प्रबोधनात्मक दृष्टया मार्मिक कधीही, कुठेही, कशाचीही, सहज बैठकीत, कार्यक्रमात व्यत्यय न आणता टाळ्या घेऊन येणारी सर्वांना हवीहवीशी या चारोळी प्रकारातील ही समग्र संकलित पेशकश सरांची त्यातील अनुभवांती आपल्या चिंतनासाठी.

एकंदरीत ‘चारोळी’ हा काव्यप्रकारला खुलवणारा, फुलवणारा व रचना प्रकाराला राजमान्यता, राष्ट्रमान्यता प्राप्त करून देणारे कवी अर्थात डॉ. राजन जयस्वाल होत. त्यामुळे त्यांना धन्यवाद देत या समग्रतेला आस्वादक भूमिकेतून बघावयास पुढे जावूया....

सरांच्या या चारोळी काव्यावर अनेक मान्यवरांनी लेखी व तोंडी स्वरूपात भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. प्रसंगी त्यांचाही असा संकलित ग्रंथ प्रकाशन होवू शकतो परंतु हे कार्य सुरू असतांनाच मी संजय येरणे यांनी अभ्यासात्मक व संशोधनात्मक हेतूने ‘डॉ. राजन जयस्वाल यांच्या कवितेची समीक्षा काव्यफुलांचे अंतरंग’ हा समीक्षा ग्रंथ लिहून पूर्ण केला व तो सरांच्या ६२ व्या वाढदिवस प्रसंगी दि. १४ सप्टेंबर २०१६ ला प्रकाशित झाला आहे. सर त्याच महिन्यात कॉलेजातील प्राध्यापक मराठी विभाग पदावरून सेवानिवृत्त झाले होते हे विशेष. अशा व्यस्त कार्यामुळे मात्र या ‘चौरंग’चे प्रकाशन लांबवर गेले. मात्र यातील चारोळी काव्य विभाग द्वारा सदर चारोळी कवितेची काही प्रमाणात समीक्षा करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. रसिक वाचकांच्या मागणीनुसार चारोळ्यांची अशी समग्रता पुनरावृत्ती करीत काढणे ही रसिकांच्या प्रेमाची पावतीच आहे. ‘चौरंग’ रूपाने येणारे चारोळी काव्याचा आस्वाद एकत्रित पणे घेऊया.

समीक्षक -

संजय येरणे. नागभीड.

९४०४१२१०९८

डॉ. राजन जयस्वाल यांची चारोळी -

डॉ. राजन जयस्वाल सरांचा साहित्य प्रवास १९८८ पासून सुरू झालेला असून १९९५ मध्ये राजन जयस्वालांचा ‘चौकार’ हा सर्वप्रथम चारोळीसंग्रह लाखे प्रकाशन, नागपूर द्वारा दाखल झाला. अल्पकाळातच त्यांची चारोळी कविता साहित्यमूल्यांच्या दृष्टिकोनातून मान्य पावली. रसिकांनी, वाचकांनी, समीक्षकांनी भरभरून दाद दिली आहे.

जयस्वाल सर हे हिंदी भाषिक असून त्यांची मराठी भाषा काव्यनिर्मिती, व्यासंग, संवाद, प्रकटीकरण, भाषणे ही विलोभनीय वाटणारी, मनाला चमत्कारीकता प्रदान करणारी, यावर खूप काही बोललं जाते. त्यांच्या साहित्य वाड्.मयाचा ठसा जिल्ह्यातच नव्हे तर सर्वांग साहित्यसृष्टीला आधारस्तंभ म्हणून समोर आला आहे. त्यांच्या आजतागायत प्रकाशित चारोळी साहित्याची यादी पुढीलप्रमाणे.

प्रकाशित चारोळी काव्य :

१) चौकार, वर्ष १९९५, लाखे प्रकाशन, नागपूर.

२) चौफेर, वर्ष १९९६, समता प्रकाशन, नागपूर.

३) चौसर, वर्ष १९९८, आकांक्षा प्रकाशन, नागपूर.

४) चऊक, (झाडीबोली) वर्ष २०००, झाडीबोली साहित्य परिषद, साकोली.

५)चौपाट, (गुजराती) वर्ष २००२, गुजरात पुस्तकालय, वडोदरा.

६) मिस्किली, भाग १ व २ वर्ष २००९, रचना प्रकाशन, नागपूर.

याप्रमाणे जयस्वाल सरांचे चारोळी काव्यसंग्रह प्रकाशित झालेले असून चारोळी कविता, झाडीबोली कविता यात त्यांचा हातखंडा बघून आपल्या मनभावनांना दिलासा मिळून वाचक तृप्तता अनुभवास मिळते. त्यांची चारोळी ओठावर रूळतांना मार्मिक काव्यार्थ सहज मनाला अर्थानुभव देणारी वाटतो, तर केव्हा भावनातिरेकाने आशय लक्षात घेऊन स्वत:ला हरवून घ्यावं लागते, नव्हे घेतोच आणि अलगद वाटतं ही माझ्या हद्याकुरांतील संवेदना, माझ्याही प्राक्तनातील दशेचा अंश, काळजाला मोहरवून घ्यावं अगदी कळा यावी, नव्हे ती काळीजकळाच वाटते आहे. माझी, आपली, आमची, सर्वांची..... होय ती काळीजकळाच....

चारोळीवर बोलू काही !

१) चौकार :

‘चौकार’ हा ७८ चारोळीचा समावेश असलेला प्रथम चारोळी संग्रह आहे. १९९५ सालात चारोळी हा काव्यप्रकार तसा साहित्यप्रकारात नवखा होता. चार ओळीची ही अर्थपूर्ण कविता सर्वांनाच भावली. सरांची चारोळी ही विचारपीठावर, बैठकीत तर कधी अनेक घटना प्रसंगावर मुखोद्गत होत गेलेली.

यात वेदना, मानवी जीवन, शिक्षण, शेती, राष्ट्रभावना, निसर्ग इत्यादी अंगाने उकल करीत मनातील भाव टिपलेला दिसून येतो. यातून मानवी वृत्ती, प्रवृत्तीवर विडंबन होतं. एवढच नव्हे तर नव्या सृजनशील आचार विचारांची निर्मिती अप्रत्यक्षपणे करणारा काव्यसंग्रह म्हणून दखल घेणे महत्त्वाचे वाटते.

शेतीचे शिक्षण देता देता

त्यांनी शिक्षणाचीच शेती केली

मातीचे शिक्षण दूर राहिले

त्यांनी शिक्षणाचीच माती केली (पृ.५)

स्वातंत्र्यानंतर राष्ट्रविकासात शेती विकास महत्त्वाचा होता. परंतु स्वत:ची घटना, लोकशाही मूल्ये असूनही राजकीय व्यापार हा व्यवसाय वृद्धींगत झाला. त्यातून स्वार्थी पोटभरू दुकानदाऱ्या निर्माण झाल्यात. समाजाच्या निकडीची गरज लक्षात घेऊन उज्ज्वल भवितव्य घडवण्याकरिता, सर्व व्यक्तिमत्त्व म. फुलेंच्या शिक्षणाला कवटाळून घेऊ लागलेत. शिक्षण ही काळाची गरज सर्वांना ज्ञात झाली. परंतु शिक्षणातील या प्रचार प्रसारात शेतीचे शिक्षण देतांना खरेच शिक्षण हे मातीमोल झालं आहे याची जाणीव २० वर्षानंतर आमच्या सुशिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षित तरूणाईला जाणवते, एवढच नव्हे तर ते चौका-चौकात शिक्षणाच्या बाजारीकरणाविषयी विद्रोहात्मक बोलतात. हीच तर खरी हृदयाची संवेदना आहे.

जयस्वाल सरांची चारोळी ही अशी जीवनातील मर्म वेदनावर भाष्य करणारी असली तरी त्यांच्या प्रत्येक ओळीतील काव्यातून त्यांच्या कवितेचा गर्भितार्थ जाणवल्या वाचून राहात नाही. जे दिसतं, जे भावतं, मनाला रूचतं, पटतं यावरच भाष्य करायचं, काव्य निर्मायचं परंतु त्यांच्या कवितेत त्यांनी कुणाचीही तमा बाळगली नाही. व्यवस्थेशी तडजोड केली नाही. यामुळेच त्यांच्या चारोळीचा गंध हा आगळा वेगळा साज चढवून आलेला आहे. कविमनाचा तरल आविष्कार यातून दिसून येतो.

‘चौकार’ हा चारोळी काव्यसंग्रह प्रकारात्मक दृष्टया नवखा असतांनाही काव्यसंग्रहास कुणाचीही प्रस्तावना नाही हे विशेष. यात निसर्ग प्रतिमांची रेलचेल भरली आहे. एवढच नव्हे तर शब्दाची उकल करण्यास्तव संदर्भीय प्रतिशब्दांची मांडणी उदाहरण दाखले देवून गणित, भाषा विषय मांडावेत त्याप्रमाणेच चारोळी काव्यार्थ मांडल्याचे दिसून येते.

रस्ता कुठेच संपत नाही

चालत असतो आपण

रस्ता चुकला म्हणतो तरी

चुकत असतो आपण (पृ.१६)

दैनंदिन जीवन जगत असतांना आपण जे बोलतो ते कितपत चुकीचं असतं, त्याचा सारासार विचार न करता फक्त अर्थ लक्षात घेवून पुढे जातो. यावरील मार्मिक उदा. आपल्या जीवन जगण्यात अनेक अडथळे येतात, त्यांना आपण मार्गी लावत असतोच. तेव्हा न थांबता रस्ता कुठेही संपणार नाही अनंत वाटेला वाटा जुळतच जाणार किंवा निर्माण कराव्या लागणार आहेत हा आशावाद. आपलीच चूक असते त्यातूनच समस्या निर्माण होत असते. ही भूमिका आपण मान्य करायला हवी. मात्र आज बहुताऊंशी समाजात ही भूमिका मान्य न करताच दुसऱ्यावर दोषाचे खापर फोडणे हा प्रकार दिसून येतो. अशा अनेक अर्थानुभवाने चारोळीकडे बघितले तर एक सृजनशीलत्व, मनोरंजन काव्यआस्वाद हा निराळाच भासतो. कृष्णधुंद, कृष्णानंद, अशा नवख्या शब्दांची मांडणी, कठपुतळ्यांचे स्वप्न, छिनालांची सहानुभूती, हिरवे आभाळ अशा प्रतिकात्मक काव्यशैलीचा साज असलेल्या कवितेत काळीजगंध बरसू लागल्यास त्यामध्ये न्हाऊन निघणे कुणाला आवडणार नाही?

जळायचे तर ज्योतीसारखे

पतंगाचे जळणे बरे नाही

बाकी मला एक पटते

कुणाला जाळणे बरे नाही (पृ.१०)

असे सुभाषित काव्य आपल्यास प्रबोधनाची कास देते. एवढेच नव्हे तर जीवनातील स्वभावाची तुलना, अभ्यास स्वत:ची स्वत:सच करायला भाग पाडते. अशा चारोळी काव्याची रचना सर्वप्रथम विदर्भात झाडीबोली प्रदेशात करण्याचा मान त्यानांच मिळतो. यापूर्वी अशी रचना झाल्याचे दिसून येत नाही.

‘चौकार’ ची भाषाशैली अगदी सहज ओघाने व नेहमीच्या वापरात येणाऱ्या शब्दांनी झाली असून यात उपहासात्मक चित्रणांचेही दर्शन होते.

उधार उसनवार मागत नाही

म्हणून घरोबा केला

तर बायकोच पळवून

त्याने शेजारधर्म पाळला (पृ.२२)

जीवनातील असे मार्मिक सत्य व त्यातील स्वरूपाचे वास्तव दर्शन देणारी ही ‘चौकार’ रूपी कविता अगदी क्रिकेट खेळातील चौकाराचा आनंद देणारीच आहे. मनाला गुदगुल्या करीत हर्षोल्लास करणारी आहे.

२) चौफेर :

‘चौफेर’ हा डॉ. राजन जयस्वालांचा ऑक्टो. १९९६ मध्ये जागतिक मराठी परिषद जेरूसलेम (ईस्त्राईल) या ठिकाणी समता प्रकाशन, नागपूर द्वारा प्रकाशित झालेला ७८ चारोळीचा संग्रह होय.

कवीने स्वीकारलेला चारोळी प्रकार हा त्यांना फारच भावलेला जरी असला तरी कवीचा या प्रकाराशी निगडीत सामाजिक अभ्यास, वाड्.मय साहित्य अभ्यास व त्यातून त्यांची तंत्र प्रकारानुरूप मांडणी ही महत्त्वाची आहे. कवी निसर्ग व समाजातील मानवी संवेदना यांनाच आपल्या अभिव्यक्तीचं केंद्र बनवितो आहे. त्यामुळेच त्यांची चारोळी ही आमची चारोळी या स्वरूपात पोहचते. ती मनाच्या कोपऱ्यात वारंवार रूंजन घालते. जीवनातील दैनंदिन प्रसंगालाही विनोदाची बहर देत उपरोधिकपणे बोचते. शब्दांचा अर्क उगाळून प्राशन करावा तशी ही चारोळी मन, मेंदू, मस्तकात थैमान घालते. जणू नित्यनेमाने फुलणाऱ्या बहराची व त्यातील नावीन्याची गोडीच असा शब्दभास देणारी ही चारोळी होय.

गांधी गेले गोळी झेलून

उरले सगळे संधीसाधू

बुडाखाली सत्तामत्ता

उबवित बसले भ्याडभोंदू (चा. क्रं. १२)

सामाजिक विवंचना, व्यथा आणि मानवी थोर व्यक्तित्वांच्या स्वार्थापोटी राजकीय जाहीर लिलाव होतांना कवी अंतर्मुख होऊन सामाजिक स्थिती व त्यातील वैचारिक जाणिवेचा परामर्श घेतो. महात्म्यांच्या नावावर राजकारण करणेच नव्हे तर त्यातील संधीसाधूपणा ओळखण्यास भाग पाडणं, सत्तेचा हव्यास महात्म्यांच्या नावांनी पूर्ण करणं अशा भ्याडभोंदू राजकीय बुवा, बापूपासून आता सावध होण्याची वेळ आलेली आहे.

गांधीच्या अमरत्वाला बदनाम करणारे षडयंत्र, त्यांच्या विचारात पसरवली जाणारी दुफळी एवढच नव्हे तर त्यांच्या मारेकऱ्याला दिला जाणारा आदर सन्मान हे बघू जाता कवी खिन्न होतो. शिवाजी आणि अफजलखान, गांधी आणि गोडसे या महात्मा थोर विरूद्ध गुंड-षंढ प्रवृत्तीचा निर्णायक बोलबाला व्हायलाच हवा, त्याचं राजकारण होऊच नये आणि होतं ते सारं स्वार्थी राजकारण असते हे आपण जाणून घ्यायलाच हवं. कवीचा दूरदृष्टीपणा हा सखोल चिंतनाचा व त्यातील खोल आशयगर्भ अर्थाभिव्यक्तीचा भाग त्यांच्या चारोळीतून स्पष्ट नजरेत येतो. तेव्हा ही चारोळी आमची होते. त्यातून प्रबोधन नव्हे तर एल्गार पेरायला भाग पाडते.

‘चौफेर’ अर्थात मानवी दृष्टिकोनाचा चारही दिशांना होणारा हा डोळस प्रवास होय. निसर्ग प्रतिमांचा उपयोग, त्यातील प्रगल्भ प्रतिभांचा वास्तववादी जीवनाशी धीरगंभीर, चिंतनशील तर हसतखेळत प्रसवणारा आशावाद हेच या संग्रहाचे वैशिष्टय आहे. कवीचे ध्येय हे त्यातील शब्दानुभूती व त्यातील अर्थाभिव्यक्ती स्वरूप बोलके आहे.

कविता ही पूजली जावूच नये तर त्यातील आशय पूजल्या जावा. कवी आपल्या कवितेला यामुळेच बळ देऊन मोठे करतो आहे. हे त्या शब्द व अर्थाचे मोठेपण त्यांच्या वाड्.मयाला, त्यांच्या नावाला सहज बळ देत मोठे करते आहे.

दैनंदिन जीवनातील प्रसंग, घटना, बोलीभाषा, शैली विचार, आचरण यातूनच त्यांची चारोळी वाट देते. ती वाट मात्र चाळणीतून चहा गाळावं अगदी अशीच दिसून येते.

इथे सर्वांना वाटतो

प्रत्येक जण शहाणा

वेडेपण लपवण्याचा

बरा असतो बहाणा (चा. क्रं.२०)

आपल्या स्वभावाची पारख स्वत:च करावी, त्यातूनच उत्कृष्ट स्वभावशैलीचं सामर्थ्य आपणास सहज सापडेल. प्रस्तुत चारोळीतून आचरण प्रवृत्तीवर हलकासा उपहास नोंदवित मानवी प्राण्यातील स्वभावात मुरलेला अंतर्गत वेडेपणा अप्रत्यक्षरित्या शोधण्याचे जणू तंत्रच यातून दिलेले आहे.

आकाश, आभाळ, चांदणं, ग्रहण, सूर्य, चंद्र, क्षितिज, सावली, ऊन, अंधार, रात्र, दिवस, पाऊस, लता, वेली, पक्षी, माणूस, स्वभाव, जगणं, वागणं, मरणं, संत, देव, भक्ती, सेवा, मैत्री, शत्रृत्व, पाप, पुण्य, बुद्धत्व, दगड, माती, नाती, अशा सहज व दैनंदिन शब्दवलयात गुंफलेली ही चारोळी मात्र सहजच विचार करावयास प्रेरित करते. वारंवार वाचलं तरी पुन्हा-पुन्हा खोल अर्थात गुंतून चार ओळीतून चारशे ओळीचा अर्थ उकलण्यास भाग पाडते यातच कवींच्या चारोळीचे श्रेष्ठत्व आपणास दिसून येते.

एकंदरीत कवीचा चौफेर चारोळी प्रवास हा समाजकेंद्रित जीवनाचा आधारस्तंभ आहे असेच दिसून येते. त्यातूनच कवितेला नवे स्थान मिळते. विचारांची परिपक्व मांडणी हेच यातील यशाचे तंत्र आहे.

देवघरातला दिवा

देवापुढे जळतो

तुळशीपुढचा दिवा

अंगणाला उजळतो (चा. क्रं. ७०)

कवीची अशी ही कविता वाचनालयाची शोभा वाढवणारी नाही तर समाज व व्यक्तीच्या समोर सदैव प्रकटन होत राष्ट्रीय मूल्याला प्रबोधन विचार प्रदान करणारी एक विस्तीर्ण आशयाची..............

३) चौसर :

डॉ. जयस्वालांचा ‘चौसर’ हा १९९८ साली प्रकाशित झालेला तिसरा काव्यसंग्रह चारोळी काव्यप्रकारातील आहे. यात एकूण १५० रचनांचा समावेश आहे.

प्रकाशक अरूणा सबाने म्हणतात, ‘चारोळी हा काव्यप्रकार आशयसापेक्ष आहे की आकृतीसापेक्ष या प्रश्नांचे उत्तर देणे तसे कठीण आहे. छोटया आकृतीत मोठा आशय बसणे, मोठ्या आशयाची चार ओळीत विभागणी करणे या काव्यप्रकारात अलीकडे होत आहे. अर्थातच लोकप्रियतेच्या लाटेने हा वैगुण्याचा गाळ काव्याच्या किनाऱ्यावर आणून टाकला आहे.’

एकंदरीत सरांची कविता ही चारोळीच्या आकृतीबंधातून प्रकटली असून एक आशयसापेक्षपणा त्यातून सिद्ध होतो. एवढच नव्हे तर अनुभवांचे अर्थ शोधण्यास भाग पाडते.

‘चौसर’ हा अगदी जिवलगाशी प्रेमाने स्पर्धा मांडणारा एक डाव असतो. कवितेच्या रूपाने जयस्वाल सरांनी मांडलेला हा जीवनकाव्याचा डाव आहे.

डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे यांनी प्रस्तावनेत कबूलही केलं आहे. ‘एका बाजूला दबून राहिलेला उन्माद आणि दुसऱ्या बाजूला संस्कृतीचे पावित्र्य अशा भोवऱ्यात जयस्वालांचे मन गुंतत गेलेले आढळून येते. वस्तुत: पावित्र्याच्या जाणिवेनेच उन्मादाला रोखून ठेवलेले आहे. तरी हे थंड बंड कधी भडका उडवतील याची शास्वती देता येत नाही.’

चार ओळींचा चौसराचा डाव कट्यावरून, संमेलनातून, कॉलेज कॅम्पास मध्ये, पारावरून, टपरीवरून, मित्रचौकटीमध्ये, विरंगुळा, करमणूक, एकाकी बैठक, चिंतनात अशा अनेक ठिकाणी याचमुळे रमतांना दिसतो आहे. एवढी जनप्रियता ह्या चारोळीची झाली आहे.

चौसराचं ‘चौपाट’ व ‘चऊक’ हे ‘च’ च्या मालिकेतील अनुक्रमे गुजराती, झाडीबोली अनुवाद काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत.

वेलकम म्हणालो

एकदा मी मृत्यूला

वेट प्लिज म्हणतो

तेव्हापासून तो मला (पृ.३६)

अशी गंभीर मनाची भावानुकूल अवस्था मांडणारी, गर्भगळीत करणारी कविता आहे. पावित्र्य आणि उन्माद ह्यांचाच हा चौसर आहे.

शत्रूचीही दाद द्यायला

शत्रू असावा असा दिलदार

प्रहारातही असते सौंदर्य

असं मानते माझी तलवार (पृ. २७)

बुद्ध हसला

जग शांत शांत झाले

बुद्धामागे जग पुन्हा

युद्ध युद्ध झाले (पृ.१९)

सल्ला मागणारा खरंतर

सल्ला मागतच नसतो

सुचविलेल्या विकल्पाला

तुमचा दुजोरा हवा असतो. (पृ. ३५)

वरील चारोळीत प्रत्येक शब्द व्रतस्थपणे भारावलेला आहे. शब्दांच्या समर्पणाची उंची कवितेत पदोपदी दिसून येते. तरल व तेजस्वी संदेश देत त्यांची कविता ऋचा बनल्याचे दिसून येते. प्रसिद्ध साहित्यिक श्रीधर शनवारे सरांचीही प्रस्तावना नव्या आवृत्तीच्या निमित्त्याने काव्य-काव्य करून जाते. “राजन सर हे मनातून जातीचे कवी आहेत. ते कुठले भाषिक यापेक्षा मराठी भाषा व शब्दप्रभूत्वाशी त्याचं नातं अतूट आहे. म्हणूनच त्यांनी चारेाळी या काव्यप्रकारालाच नाव मिळवून दिलं आहे.”

‘चौसर’ मध्ये जीवनव्यथा, निसर्गनियम, माणुसकीतील जपणूक, राजकीय चिंतन, प्रेमभाव असे अनेक प्रसंग साकार झालेले आहेत.

शेत पिकली

पोरं शिकली

लग्नाच्या बाजारात

दोन्ही विकली (पृ. ४५)

ही समाजव्यवस्थेतील व्यथा काळजाचा ठोकाच चुकविते. एवढंच नव्हे तर शेती आणि शिक्षण यातील साम्यस्थळे ही जीवनातील अंतरंगात डोकावत चिंतन मनन करायला भाग पाडते. निसर्गाचा आस्वाद घेत माणुसकीची व्यथा व वेदना सांगते.

झाडं बिचारी खुळी असतात

आभाळाला पाऊस मागतात

आकाशाचे ऊन झेलत

तोडणाऱ्याला सावली देतात (पृ. ४७)

झाडांचं आणि माणुसकीचं मर्म चारोळीरूपी व्यक्तिमत्त्वात बाणल्यास एक उत्तुंग आदर्श विचारांची झाल्लर वा किनार मिळेल अशी त्यांची कविता आशावाद व्यक्त करते.

जयस्वाल सर मनोगतात म्हणतात. ‘मनात गलबलून आले तेव्हा कवितेने मला आधार दिला. माझ्या आत्मप्रगटीकरणाची ती सहज माध्यम झाली. शब्द जगवणे आणि जुळवणे या छंदात कधी शब्दच अंकुरले ते मनोवस्थेचे प्रतिध्वनी बनले. तेव्हा चारोळी हा निर्मितीचा आकृतीबंध म्हणून स्वीकारला की अर्थनादातल्या शब्दसौदर्याला चपखल बसविण्याची, फ्रेम बिघडू न देता काळजी घ्यावी लागते.’ असा संदेशही ते मांडतात. एकंदरीत काव्य करतानांच काव्याच्या तंत्राचा प्रसार करून जनसामान्याच्या हृदयात ठाण मांडून बसायला भाग पाडणारी ही त्यांची विलोभनीय विचारशील कविता आहे.

४) चऊक :

‘चऊक’ हा डॉ. राजन जयस्वालांचा झाडीबोली भाषेतील पहिला चववरी संग्रह, जाने. २००० मध्ये सातवे झाडीबोली साहित्य संमेलन, जांभळी सडक येथे झाडीबोली साहित्य परिषद, साकोली द्वारा प्रकाशित झाला. सदर संग्रहाचे प्रकाशन राम महाजन यांनी केले. प्रस्तुत चारोळी संग्रहाला डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांची प्रस्तावना लाभलेली आहे. ‘चऊक’ या संग्रहातील त्यांचे बलस्थान त्यांनी व्यक्त केलेल्या विचारामध्ये, कल्पनामध्ये आणि प्रतिमामध्ये आहे.’ असे ते म्हणतात.

‘चऊक’ अर्थात रांगोळी, शब्दांची रांगोळी म्हणजेच कविता, टिंब, रेषा, आशय, लय, शब्द, प्रास, रंग यांचे तोल आणि ताल झेलत पेलत सिद्ध होते ती शब्दांची कविता ‘ चऊक’ होय.

कवी हे प्रमाणभाषेत साहित्य निर्मिती करतानांच, आपल्या गावातील परिसरातील मूळ ग्रामीण भाषा ही झाडीबोली भाषा आहे. या भाषेला मातीचा गंध आहे. डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी झाडीबोलीला आज भाषाशास्त्रात, मराठीची बोली म्हणून वऱ्हाडी, अहिराणी यागत पक्कं स्थान साहित्य चळवळीतून अथक परिश्रम व संस्काराने मिळवून दिले. तेव्हा त्यांच्यासोबत डॉ. जयस्वाल हा कवीमनाचा माणूस खंबीरपणे उभा होतो. ते स्वत:साठी नाही तर आपल्या परिसरातील बोलीसाठी, त्यांचं झिजणं, साहित्यरूपी जगणं व त्यातून प्राप्त झालेल्या फळांची फलपूर्ती म्हणजेच हा ‘चऊक’ चारोळी संग्रह होय.

पिकासाठी मोर मरते

कस्तुरीसाठी हरनी मरते

दातासाठी हत्ती मरते

पर मानोस काहालं मरते (चा. क्रं. ४१)

कवी आपल्या बोलीभाषेतील शब्दांचा तरंग वाचक रसिकांच्या मनावर पेरतो, तेव्हा अगदी मन भाव-विभोर होते. त्यांची शब्दजाणीव व भावना क्षणभर वाचताक्षणीच आपल्या काळजाचे ठोके थांबवतात असं वाटतं. पण असं काही होत नाही, माणूस थांबत नाही तर क्षणभर मन थांबतं आणि पुढे चारोळी वाचण्याऐवजी त्याच चारोळीचा सैरभर मनाने अर्थ उगाळत बसतो. चंदनाचा गंध उगाळावं अगदी तशीच ही चारोळी. प्राणी, पशू, पक्षी, किटकाचं मरण तरी पुढं कामी येते पण माणसाच्या मरणाचं काय? तेव्हा आपण आपलं जीवन हे मरणानंतरही कीर्तीवंत व्हावं, प्रेरणादायी व्हावं, या जगाला समाजाला स्मृती प्रदान करून जावं असा अप्रत्यक्षरित्या विचार, कल्पना व प्रतिमांचा नजराणा ते देतात.

झाडीबोलीतील शब्द व त्याचा अर्थ आता नव्या पिढीला प्रमाणभाषेच्या शैक्षणिक प्रसारामुळे उमगू शकत नाही. पुढे ही बोली लुप्त होणार ही भीती होती, नव्हे असं घडणारच होतं. परंतु झाडीबोली अशा संग्रहामुळं पुढेही इतिहासात अमर राहिल. एवढंच नव्हे तर आता तिला राजमान्यता लाभल्याने ती बोलायला कमीपणाचेही वाटणार नाही. अभ्यासक्रमात, जीवनात, घटना प्रसंगात, साहित्यात ती अगदी नटून-थटून मधुराईने ती आपल्या समोर आहे. त्यात आता उलट माधुर्य वाढलेले आहे.

झाडी बोल माजा

तूच मालं देवा

अरताचा तूच राजा

सबदई तूच देवा (चा. क्रं. ११८)

बोलीविषयी असा कृतार्थपणा बाळगणारा कवी मराठी भाषिक नसतांनाही नितांत श्रद्धा आत्मियता बाळगून त्यातील चळवळीचा पाईक होते. तेव्हा या बोलीभाषेत जगणाऱ्या प्रत्येक मानवाला यातून शिकण्यासारखं बरेच काही मिळेल.

ग्रामीण माणूस व त्यांचे जीवन या चक्रव्यूहातील प्रतिबिंबीत आरसा म्हणजेच ‘चऊक’ होय. ही रांगोळी आपल्या अंगणात सदैव रेखाटल्या जावी, आनंदाचा पळस आणि त्यातील पळसफुले सणावारालाच नव्हे तर जीवनातील प्रत्येक क्षणात फुलतच राहावे हा कवीचा वास्तववादी दृष्टिकोन यात आढळून येतो.

निरक्षर मानवांच्याही संवेदना या चारोळी रूपाने जागृत व्हाव्यात याकरिताच ही ‘चऊक’ रूपी चववरी त्यातील शब्दभाव, प्रतिमा यातील माधुर्य हे अंत:करणाला गहिवरणारे, समाजाच्या सांस्कृतिकरणात, रममाण होणारी ही समाजकेंद्रित चववरी, मनाच्या भावविचाराला चालना देणारी ही चववरी, थेंब थेंब पाण्याचा तलाव व्हावा तसा शब्दा-शब्दाचा शब्दसागर म्हणजेच ‘चऊक’ होय. बोलीतून प्रकटलेल्या जीवनाचा तालस्वर वैचारिकतेच्या कवचकुंडलात गुंतलेला ललित गाभा सदैव गुणगुणत राहावा ही तल्लीनता देणारी चववरी ‘चऊक’ च्या रूपाने कविच्या काव्यशैली व त्यातील ध्येयवादाची प्रखर जाणीव देणारा हा संग्रह होय.

५) चौपाट :

डॉ. राजन जयस्वाल यांचा ‘चौपाट’ हा गुजराती भाषेत अनुवादीत चारोळीसंग्रह २००२ मध्ये डॉ. प्रदीप पंडया व डॉ. वनीता ठाकूर यांनी संपादित केला आहे.

‘चौपाट’ हा संग्रह डॉ. जयस्वालांची यापूर्वी प्रकाशित ‘चौकार, चौसर, चौफेर’ या संग्रहातील ६३ चारोळीचा गुजराती अनुवाद आहे.

कवीची चारोळी ही विदर्भातील पहिली चारोळी असल्याचे जसे आपण बघतो त्याचप्रमाणे कवीची चारोळी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवर सर्वप्रथम प्रकाशित झाल्याचे बघावयास मिळते. गुजरात राज्यात गुजरातीत अनुवादीत होणारा हा सर्वप्रथम चारोळी संग्रह आहे. यामुळे कवीची चारोळी ही राष्ट्रीय देखील स्तरावर मान्यता पावलेली आहे असे म्हटले पाहिजे. तद्वतच ‘चौफेर’ हा चारोळी संग्रह जेरूसलेम (ईस्त्राईल) येथे जागतिक मराठी परिषदेत प्रकाशित झालेला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवलेला हा संग्रह आहे.

डॉ. हरिश्चंद्र बोरकर म्हणतात, ‘काही कवी फार भाग्यवान असतात. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या अशा भाग्यवान कवीमध्ये राजन जयस्वालांचा समावेश करावा लागेल.’ (प्रस्तावना पृ.५ वरून. )

उपरोक्त संदर्भान्वये डॉ. जयस्वाल हे भाग्यवान कवी असल्याचा उजाळा मिळत असला तरीपण त्यांची चारोळी ही साहित्यमूल्यांच्या दृष्टीने सशक्त आशयाची मांडणी असलेली असल्यामुळेच त्यांच्या चारोळी ह्या मराठीच्या बाहेर पडून अनुवादीत झाली वा विदेशात पोहचली आहे हे आवर्जून लक्षात घ्यायला हवे.

कवीला लाभलेले यश व त्यांच्या चारोळीने गाठलेले शिखर बघू जाता कवीच्या एका चारोळीचा आस्वाद घेऊया.....

तुझ्या डोळ्यात

आभाळ गहाण

तू महान

तुझे आभाळ महान (पृ.४५)

सरांची चारोळीही अशीच महान...........

६) मिस्किली भाग १ व २ :

‘मिस्किली’ हा चारोळी संग्रह पॉकेटसाईज आकारात रचना प्रकाशन, नागपूर द्वारा २४ ऑक्टो. २००९ रोजी प्रकाशित झाला. यात भाग १ मध्ये ५७ व भाग २ मध्ये ५५ चारोळीचा समावेश आहे.

कवी हे उत्तम चारोळीकार असून त्यांनी साहित्यप्रांतात या काव्यप्रकाराचे स्थान प्रस्थापित करतांनाच प्रमाणभाषा, बोलीभाषा यासोबतच वात्रटिका जातीची मिस्किलपणे मानवाला हसू आणणारी ही सदोदीत आनंद देणारी चारोळी या अर्थाने ‘मिस्किली’ हा संग्रह नावीन्यता व प्रयोगशीलता घेऊन साकार झालेला आहे.

नवरदेव पहिला हार घालतो

आणि जन्मभर हार मानतो

तो इतरांसाठी ठरतो बैलोबा

मात्र तिच्यासाठी कामधेनू बनतो (पृ.४९)

कवी सदर चारोळीतून जीवनातील घटना, प्रसंग, प्रवृत्ती, व्यक्तीवर आगळेवेगळे खोडसर भाष्य मोजक्या काव्य नाट्य पूर्ण शब्दांतून मिस्किलपणे व्यक्त करतो. त्यामुळेच ही मिस्किली ठरते आहे. यात उपहास, विडंबन, वास्तव यांचा संमिश्र संगम व्यक्त होतो आहे.

लग्नात हार घालणे म्हणजेच जन्मभर हार मानणे होय. परंतु ही कृती इतरांच्या वक्तव्यानुरूप बैलोबा अर्थात सांगकाम्या स्वरूपाची असली तरी तो गाई प्रमाणे कामधेनू आपल्या पत्नीसाठी बनतो आहे. वास्तववादी वात्रटिका म्हणून याकडे आपण बघू शकतो. प्रवृत्तीच्या, स्वभावधर्माच्या मार्मिक बाबींवर बोट ठेवणे त्यातून जीवनातील उगाळले जाणारे दोष दूर सारणे हाच मिस्किल हेतू चारोळीचा होय.

आकृतीबंध चारोळीचा असला तरी आशयबंध मात्र हास्यप्रकृतीचे रसायन म्हणजेच ही मिस्किली निखळ, निकोप, निरामय हसू आणणारी रचना म्हणून याकडे बघावे लागते.

आम्ही देशाला लुटतो

तुम्ही परस्परांना लुटा

आम्ही ‘ जेब भरो’ करतो

तुम्ही ‘ जेल भरो’ करा ( पृ.१४)

भारतीय राजकीय व्यवस्था ही अत्यंत भ्रष्टाचारी झालेली आहे. विकासाच्या नावावर होणारी लुटालुट प्रासंगिक चिड व संताप व्यक्त करते आणि हे संताप सामान्य व्यक्ती व राजकीय व्यक्ती यातून कसे वेगवेगळ्या प्रकारचे दर्शन देते याचे मार्मिक व्यंग सदर चारोळीतून प्रकटते तेव्हा हसू उमलल्या शिवाय राहात नाही. व्यवस्था व त्यातील प्रवृत्तीवर चिमटे ओढणे, चपराख मारणे, कोपरखळी करणे म्हणजेच मिस्किलपणे चारोळीतून साधलेला संवाद आहे.

कवी मिस्किलीच्या रूपाने एक गोळीबंध रचना साकार करतात. त्यामुळेच त्यांची चारोळी ही एकदम मनात घुसते. कवी म्हणतात त्याप्रमाणे, ‘ही मिस्किली कोणत्याही समीक्षकीय विश्लेषणाला मौताज नसते. एखाद्या स्नेहळ मित्राने खांद्यावर हात ठेऊन बोलावे तशी ही वाचकांशी बोलते.’

कवीची ही चारोळी रचना म्हणूनच वेगळ्या थाटाची, रंगाची व ढंगाची आहे. संप काळात प्राध्यापकांचा जो रिकामटवळा क्षण असतो त्या क्षणानांच अर्पण झालेली ही मिस्किली म्हणजे शासन आणि नोकरशहा यातील संघर्षावर मिस्किलपणे केलेली टिप्पणी होय.

मिस्किलीचे विषय मोठे गमतीदार दैनंदिन जीवन प्रसंगातले आहेत. चारोळी वाचताक्षणीच जाणवते की, अशा प्रसंगातून चारोळीची निर्मिती होऊ शकते हे आपल्याला कसं कळत नाही. त्यामुळेच कवीची कल्पना किती बोलकी आहे याची जाणीव होते.

महिलांचा उद्धार, रूसणं-फुगणं, परीक्षा, बेटिंग, पती-पत्नी, राजकारण, भाषण, सण, उत्सव, धर्म, महात्मे, पार्टी, कार्टी, प्रेम, निसर्ग अशा विविधांगी बाबी, जीवनातील बोधतत्त्वे परिदान करण्याचे कार्य करते.

शाळेत तो चुकला की,

मास्तर त्याचा नेहमी कोंबडा करायचा

त्याला मग ‘बर्डफ्ल्यू’ झाला

मास्तर आता तशी चूक नाही करायचा (पृ.५३)

आनंददायी शिक्षणातील उपहासाचे प्रतिबिंब सदर चारोळीतून व्यक्त होते. कवीची कविता जेवढी धीरगंभीर, विचारशील, चिंतनशील मांडणीची तेवढीच मिस्किलपणे आनंदोत्सव देणारी, हर्ष करणारी, मनाला गुदगुदल्या करणारी आहे.

रस्ता कुठेच जात नाही

जात असतो आपण

रस्ता चुकला म्हणतो तरी

चुकत असतो आपण (पृ. ८९)

मानवी जीवनातील स्वभावाचं दर्शन व त्यांच्या मनातील दिशादर्शन यावर काळाने मात करावी. एवढं जरी घडलं तर कदाचित आपण आपल्यासाठीच शुद्ध निकोप जीवन तरंग स्वीकारलेलं व्यक्तिमत्त्व ठरलेले असू हा आशावाद कवीच्या कल्पनेतून विशद होतो.

म्हणूनच कवीच्या ‘चौकार, चौफेर, चौरस, व चऊक’ या काव्यातील रचनापेक्षा ‘मिस्किलीचे’ स्वरूप व वैशिष्टये हे जीवनातील स्वभावाला नैतिकतेची कसोटी प्रदान करणारे आहे. त्या दृष्टीने या रचनाप्रकाराचे महत्त्व ओळखून रसिक वाचक दृष्टीने याकडे बघावे लागते तेव्हा ही चारेाळी सर्वांगीण प्रभूत्व ल्यालेली आहे असा भास होतो.

डॉ. जयस्वालांच्या चारोळी काव्यप्रकाराविषयी :

डॉ. जयस्वालांचा १९९५ मध्ये सर्वप्रथम ‘चौकार’ हा चारोळी काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि विदर्भातील पहिले चारोळीकार ठरले.

काव्यप्रांतात चारोळी हा काव्यप्रकार रूढ झाला तो नवोदत्तरी साहित्यप्रकार म्हणूनच या नवख्या साहित्य प्रकाराचे स्वागत तरूणाईने मात्र जोमानेच केलेले दिसून येते. परंतु जनमान्य साहित्यिकांनी सर्वप्रथम या साहित्य प्रकारावर टीका केल्याचेच दिसून येते. फ. मु. शिंदे व आनंद यादव सारख्या प्रख्यात साहित्यिकांनी या चारोळी प्रकाराला अमान्यताच दिली आहे. एवढच नव्हे तर काही प्रसंगी समीक्षण दृष्टीने अनेकांनी यावर टर उडवित भाष्य केलेले आहे. चारोळीकार ना. गो. थुटे यांनी याबाबत स्वअनुभवातून अनुभवलेली टीका बघूया....

‘माझ्याही अनुभवात चारोळी प्रकाराला इतर काव्यप्रकारातच बसवणारी काही मंडळी आढळली. चारोळी नसून ही आरोळी आहे. अभंगातील एक चरण म्हणजे चारोळी नाही काय? महादेवाची गाणी ह्यातील एक चरण म्हणजे चारोळी नाही काय? चारोळी काही नवीन प्रकार नाही. काहींनी हा काव्यप्रकार चारोळी असेल तर निबोंळी, आरोळी असे नाव देऊनही काव्यप्रकार करता येईल अशीही बतावणी केली आहे.’ (संदर्भ- ना. गो. थुटे यांच्या चारोळी कवितेची समीक्षा, ले. संजय येरणे.)

साहित्यप्रांतात अभंग, पोवाडे, शाहिरी, काव्य, लावणी, भूपाळी, भारूड, चौपदी, कणिका, वात्रटिका, हायकू, रूबाई, दशपदी, सुनित, गझल, विंडबनकाव्य, चारोळी, संवादिनी असे अनेक प्रकार लोक रसिकांनी आवर्जून वाढविलेले असल्याचे दिसून येते. काही काव्यप्रकार काळाच्या ओघात मागे राहिलेत. छंदातून मुक्तछंदात विहार करणाऱ्या कविता हे आजचे उदा. समजून घेता येईल.

चारोळी रचना प्रकाराचा पूर्व इतिहास :

चारोळी या रचना प्रकारचे श्रेय प्र. के. अत्रे यांनाच जाते. प्र. के. अत्रे यांचेपूर्वी पंडित सप्रे आणि शं. गो. साठे यांनीही चारोळी कविता लिहिली तरीपण चारोळीच्या आकृतीबंधाची जाण त्यांना होती असे दिसून येत नाही.

प्र. के. अत्रे यांच्या ‘झेंडूची फुले’ १९५२ पृ. १२४ वर चारोळ्या असे शीर्षक देऊन त्याखाली नवकाव्य हे उपशीर्षक नोंदवून चारोळी लिहिलेली आहे.

काल होती परकरी

घेत होती वरकरी

आज जाता परकरी

झाली पळे दुरी दुरी!

एकंदरीत चारोळी हा काव्यप्रकार व चारोळी हा शब्द प्र. के. अत्रे यांनी प्रथम वापरल्याचे दिसून येते. परंतु १९५० ते १९९० च्या दशकामध्ये या शब्दाकडे व काव्यप्रकाराकडे दुर्लक्ष झालेले होते अथवा रसिकांना चारोळी काव्यप्रकार भावला नव्हता असे दिसून येते. मात्र या काव्यप्रकाराचा जनमान्य प्रवास १९९२ पासून सुरू होऊन अनेक नामवंत कवी व नवोदितांनीही वाढविला. आज घडीला अनेक संग्रह प्रकाशित झालेले आहेत. तरीपण डॉ. जयस्वालांची चारोळी ही या काव्यप्रकाराला सर्वप्रथम रूढ करणारी व श्रेय देणारी ठरली आहे.

१९९० नंतरच्या चार ओळीच्या वैशिष्ट्य पूर्ण मराठी काव्यरचनेला चारोळी नाव रूढ झाले आहे. हे नामकरण ‘ कानोकानी’ या महाराष्ट्र टाईम्सच्या ‘ कलंदर’ या सदरकाराने केले आहे, असे मोनिका गजेंद्रगडकर म्हणतात. (लोकप्रभा २८ जुलै १९९५ पृ.५४) तरीपण ‘चारोळी’ हा शब्द प्रथम प्र. के. अत्रे यांनी दिलेला आहे हे प्रथम लक्षात घ्यावे लागेल.

उपरोक्त चारोळी काव्य निर्मिती बघू जाता महाराष्ट्रात सर्वप्रथम चंद्रशेखर गोखले यांनी ‘ मी माझा’ हा स्वतंत्र चारोळी संग्रह १९९२ मध्ये प्रकाशित केला व त्यानंतर यातूनच गांभीर्य व काव्यमय रूप चारोळीला मिळाले असल्याचे दिसून येते.

चारोळी म्हणजे काय ?

चार ओळीची रूबाई, पाच ओळीची कणिका, दोन ओळीचे दोहे, तीन ओळीचे हायकू, या काव्य प्रकाराप्रमाणेच चार ओळीचा काव्यप्रकार चारोळी अलीकडे लोकप्रिय झाल्याचे दिसून येते.

परंतु रूबाया मध्येही चार ओळी व चारोळी या रचना प्रकारातही चार ओळी आहेत. तरीपण या दोन्ही प्रकारात रचना साम्य भिन्न असून आकृतीबंध हा वेगळा असल्याचे दिसून येते.

रूबाईचा आकृतीबंध :

यामध्ये चार ओळी असून पहिल्या व दुसऱ्या ओळीत तसेच चौथ्या ओळीत यमक साधल्या जाते. त्यांची जाती ‘भूपती किंवा लिलारती’ असणे हे या रूबायाचे बाह्य स्वरूप होय. जीवनविषयक तात्विक विचार चमत्कृतीपूर्ण शब्दांमध्ये मांडणे हे अंतरंगविषयक वैशिष्ट्य होय. फारसीतील उमर खैय्यामच्या रूबाया जगप्रसिद्ध आहेत. क्रांती कवी जोश मलीहाबादी यांचीही रूबाई अर्थपूर्ण व अनेक वेळा कलाटणी देणारी आहे.

व्याख्या : ‘प्रीती, भक्ती, आसक्ती, विरक्ती, बेहोशी, जागृती, अन् आभाळभर अनुभूतीची नेमक्या चार ओळीतून होणारी स्वयंपूर्ण सुसंगत आल्हाददायक चमत्कृतीपूर्ण अभिव्यक्ती म्हणजेच रूबाई होय.’

रूबाई हा स्वयंपूर्ण काव्यप्रकार मूळ पारसी भाषेतील उमर खय्यामच्या रूबायाचं भाषांतर करून माधव ज्युलियनने मराठीत रूढ केला. फक्त चार ओळीत आकर्षक भाषाशैली आणि बेमालूम धक्कातंत्राचा सफाईदारपणे वापर करून कठीणातला कठीण विषय रूबाईत मांडला जाणे असा हा कठीण काव्यप्रकार होय. रूबाया प्रकारातील ज्ञानेश वाकुडकरांची एक रूबाई बघा ...

मनाचे मनाशी जरी युद्ध आहे

तरीही झऱ्यासारखा शुद्ध आहे

तुला पाहिजे तू तसा घे

कधी कृष्ण आहे कधी बुद्ध आहे

चारोळीचा आकृतीबंध :

‘चारोळी काव्यप्रकार रूबाई पेक्षा निराळा आहे. शेराच्या जवळपास जाण्याचा आभास निर्माण करणारी परंतु प्रत्यक्षात अंतर राखून असलेली स्वयंपूर्ण, सरळ, साधी आणि स्पष्ट अभिव्यक्ती असलेली चार ओळीची लघुत्तम कविता म्हणजेच चारेाळी होय.’

हिंदीमध्ये ‘चार लाईना’ म्हणून हा काव्यप्रकार ओळखला जातो. तद्वतच या काव्यप्रकाराला ‘चतुष्पदी’ असेही म्हटल्या गेले आहे. झाडीबोलीत ‘चववरी’ असे नामकरण करण्यात आले आहे. इंग्रजीतील couplet या काव्यप्रकाराशी रचनासाम्य असल्याचेही दर्शविल्या गेले आहे.

‘सामान्यत: दोन ओळीचे दोन तुकडे करून त्याच्या चार ओळी करायच्या आणि त्यातून तयार होणाऱ्या छोटेखानी कवितेला चारोळी म्हणायचं. या चार ओळी पैकी दोन ओळीत चमत्कृतीपूर्ण कलाटणी दिली जाते. यामुळे प्रतिपाद्य विषयाचा विकास साधून दुसरी बाजू रसिकांच्या मनात खिळून असते. गझलेतील द्विपदीशी साधर्म्य साधणारी ही रचना पद्धती आहे.’(अर्वाचीन मराठी काव्यदर्शन डॉ. अक्षयकुमार काळे पृ. ७६०)

चार ओळीचा शेर टाईप वाटणारी रचना, शब्द संख्येचे फारसे बंधन नसणे, कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करणे, बोली भाषेचा वापर, वाचक रसिकांच्या भावनांना हात घालण्याचे सामर्थ्य संवादात्मक शैली, चार ओळीत संपूर्ण अनुभव किंवा त्या अनुभवाचं एखादं रूप वा छटा व्यक्त करणारी ही रचना सुभाषित वजा सुद्धा वाटते असे चारोळी रचना प्रकाराच्या आकृती संदर्भात ना. गो. थुटे या चारोळीकारांनी म्हटले आहे. (मुलाखत - डॉ. चंद्रशेखर नगराळे)

‘एखादा भावणारा विषय, प्रचलित शब्दप्रयोग, संवादात्मक नेटकी बांधणी, ध्वन्यानुकारी आशय आणि वाचकांशी साक्षात संवाद साधण्याची क्षमता असलेला चार ओळीचा एक रचनाप्रकार हा चारोळीचा आकृतीबंध असतो. चारोळी स्वतंत्र असते. प्रत्येक चारोळीचा अर्थ त्या त्या चारोळीपुरता स्वतंत्र असतो. एखादा सुत्ररूप विचार मानवी भावनांची क्षणचित्रे असेच चारोळीचे स्वरूप असते.’ (चारोळी एक काव्यप्रकार, लेखक मदन कुलकर्णी, तरूण भारत, समीक्षा लेख, रविवार, दि. १६.१२.२००१)

एकंदरीत चार ओळीचा, अक्षराचे बंधन नसणारा, चटकन आकलन होणारा, आजच्या धकाधकीच्या काळात भावनांची व विचारांची संक्षेपाने आशयगर्भ अभिव्यक्ती करणारा असा हा लघू काव्यप्रकार आहे.

उदाहरणादाखल ज्ञानेश वाकूडकरांची एक चारोळी बघूया.....

जेवढया आपल्या भेटी पडल्या

तेवढयाच पडल्या गाठी

सवड असल्यास उकलून बघ

फक्त तुझ्यासाठी

परत उदा. दाखल डॉ. राजन जयस्वालांची चारोळी बघूया......

जे पदर धरून मोठे होतात

ते पदर सोडून कसे राहणार?

जे पदरमोड करून मोठे होतात

ते कुणापुढे का पदर पसरणार? (मिस्किली, पृ. १०९)

याप्रकारे चारोळीचा आकृतीबंध बघू जाता, डॉ. राजन जयस्वालांनी हा काव्यप्रकार गंभीरपणे, समर्थपणे, मिस्किलपणे हाताळला व विदर्भातच नव्हे तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकाराला जनमान्य करण्याचं श्रेय त्यांना जाते. जीवनाचे विविध संदर्भ, निरीक्षण, बोलीभाषेचे सखोल निरीक्षण, घटना व प्रसंगाची मांडणी स्वचिंतन व अभ्यासात्मक, संशोधनात्मक वैचारिकतेचे फलित म्हणजेच त्यांची चारोळी व या चारोळीला नवा आयाम मिळवून देणारे हे चारोळीकार सम्राट राजन होत.

त्यांच्या चारोळीतून मानवी जीवन, घटना, प्रसंग, निसर्ग, प्रेम, वात्सल्य, सुख, दु:ख, मानवी जीवनाची घालमेल, काळभान, सामाजिक जाणीव व चिंतन व्यक्त होऊन हद्यात ठाण मांडून असते.

२) भाषाशैली :

डॉ. राजन जयस्वालांचे साहित्य व त्यातील काव्यप्रकार यातील भाषाशैली ही प्रामुख्याने दोन प्रकारात विभागणी करणारी आहे. कवी अनेक विचारपीठावरून तथा अन्य वक्तव्यावरून म्हणतात, ‘माझी मातृभाषा मराठी नाही तशी हिंदी देखील नाही पण हिंदीला जवळची मात्र आहे. हे मात्र खरे आहे. तथापि मी जन्मलो तेव्हापासून माझा संबंध येथील स्थानिक बोलीशी आला. ती बोलीच माझी मायबोली आहे. याची जाणीव मला लहानपणापासून व्हायला लागली. पण ही बोली कोणती हे मात्र मला कळले नव्हते.’ ( संदर्भ -आदवा, प्रस्तावना पृ. ३ )

उपरोक्त बाबीवरून लक्षात घेता येते की, कवी हे मराठी भाषिक नाहीत. तरीपण त्यांचे मराठी साहित्य निर्मिती, मराठीचे प्राध्यापक, तद्वतच समीक्षक अशा विविधांगी मराठी भाषेच्या भूमिकेतील प्रावीण्यता बघू जाता त्यांनी मराठी भाषेत केलेला अभ्यास व त्यातील फलनिष्पतीचे स्वरूप हे मराठी भाषा बोलणाऱ्यांना व साहित्यिक निर्मिकांनाही लाजवणारी ठरेल.

प्रमाणभाषा व झाडीबोलीभाषा या दोन्ही प्रकारात त्यांची चारोळी विभागलेली आहे.

काव्यभाषा :

भाषा हे मानवांच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे, आपली स्थानिक झाडीबोली भाषा व प्रमाण मराठी भाषा यात शाब्दिक स्वरूपाने फरक जाणवतो, शैक्षणिक प्रवाहातील, पुस्तक स्वरूपातील भाषा ही प्रमाणभाषा म्हणून गणली जाते तर स्थानिक बोलीत व्यक्तिपरत्वे बोलण्यात आलेला फरक यामुळे बोलीभाषा ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. जसे - महाराष्ट्रात मराठी भाषेसोबत कोकणी, अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी, नागपुरी, झाडीबोली अशा बोली प्रसिद्ध आहेत. डॉ. राजन जयस्वाल यांनी झाडीबोली भाषा व प्रमाणभाषा या दोन्हीत काव्यनिर्मिती केलेली आहे.

वऱ्हाडी भाषेला साहित्य निर्मितीनेच समृद्ध स्थान निर्माण करून दिले. त्याचप्रमाणे पूर्वविदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यातील बोलीभाषा ही झाडीबोली होय. या बोलीभाषेचा विकास व त्यातील जाणिवा डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या भाषाविषयक अभ्यास व संशोधनाचे दीर्घ प्रयत्नातून मराठी भाषेतील झाडीबोली भाषा असे स्थान पक्के झालेले आहे. झाडीबोली ही चळवळ होऊन यातून सर्वांगीण प्रकारात हळूहळू साहित्य निर्मिती वाढतच गेली. आणि यात डॉ. राजन जयस्वाल हे कवी प्रामुख्याने अग्रणीय ठरले. जयस्वालांचे ‘चऊक’ हा चारोळी काव्यसंग्रह ‘आदवा व माजी तुतारी’ हे दोन काव्यसंग्रह झाडीबोली भाषेत प्रकाशित झालेले आहेत.

झाडी बोल माजा

तूच मालं देवा

अरताचा तूच राजा

सबदई तूच देवा (चऊक, चा. क्रं. ११८)

उपरोक्त झाडीबोलीतील चववरी ‘ बोलविता धनी वेगळाची’ अशी श्रद्धा जोपासत झाडीबोली विषयी कृतार्थ कृतज्ञता व्यक्त करणारी भावना आहे.

उत्खननाच्या अवशेषात

संस्कृतीचा दरवळ

गगनचुंबी इमारतीत

अमानुष दरवळ (चौफेर,चा. क्रं. २१)

उपरोक्त प्रमाणभाषेतील चारोळी व बोलीभाषेतील चारोळीचे सूक्ष्म अवलोकन केले असता भाषेचा संदर्भ व लेखन कौशल्य याची जाणीव होते. सामाजिक संस्कृतीच्या पाळेमुळ्यांचा शोध हा आजच्या सुसंस्कृ त व्यक्तित्वाच्या अमानुषतेला आधारस्तंभ व्हावा असे कवीचे समाजचिंतन भाषाशैलीच्या सौंदर्यातच नव्हे तर एकंदरीत माणुसकी तत्त्वज्ञानाच्या कक्षा वृंद्धिगत करणारे आहे.

चारोळी आणि चववरी हे भाषा साधर्म्य साधत पर्यायी वापरात येणारे शब्द होत. परंतु बोलीतील महिमार्थ हा बोलीभाषेचे महत्त्व वाढवीत बोली भाषिकांच्या जीवनशैलीला नवे आचरण मूल्य देणारा बळकट धागा असतो.

ग्यानबाना चालवलन दिवाल

मुहूनस्यानी तो डगर संत झाला

आमी घरादारालं चालवतून बारमास

तेतीच आमचा अंत झाला (चऊक, चा. क्रं.१७)

वरील झाडीबोली भाषेतील चारोळीत रसिकमग्न होतांना जाणवते की, ग्यानबा-ज्ञानेश्वर, चालवलन-चालवने, दिवाल-भिंत, डगर-मोठा, बारमास- वर्षभर, तेतीच-तिथे, याप्रमाणे झाडीबोलीतील शब्द प्रमाण भाषेत याप्रमाणे बदलले असल्याचे आढळून येते.

यावरून पूर्वविदर्भातील गावखेडयात बोलली जाणारी ही लयदार सर्वांगसुंदर नित्यवापराची बोली असून त्यातून समर्थपणे साहित्य निर्माण होतं व त्यातील चववरी काव्यप्रकार हा वाचनास, ऐकण्यास सर्वांना आपलासा वाटतो आकलन सुलभ होतो असेच दिसून येते.

शैली विशेष :

डॉ. राजन जयस्वाल यांची काव्य भाषाशैली वरवर अत्यंत साधी सोपी वाटली तरी प्रकृतीने ती अत्यंत प्रगल्भ आहे. भावसमृद्ध करणारी आहे. सामाजिक नियमित वापरातील शब्दातून आविष्कृत होणारी त्यांची कविता आशयघन बनत जाते. आस्वादकाला ती चंदनाचा गंध उगाळावा तशी वारंवार चिंतन मननातून शब्दगंध दरळवून देणारी आहे. कधी कधी ती सहज उमगत नाही. त्यांची कविता गुढतेचे लय स्वीकारत आलेली आहे. तर त्यांची शैली ही रसिकमनाला चकीत करणारीही असल्याचे आढळते.

डॉ. पी विठ्ठल, ‘संमिश्र भाववृत्तीची कविता; एका फुलाची बाग’ या समीक्षणात्मक लेखात म्हणतात, ‘आशय आणि विषयाची एकात्म भावना प्रभाविपणे मांडण्याचा कवीचा प्रयत्न सर्वच कवितेत दिसतो.

बोथट माझ्या तलवारीला धार लावून झाली

तू सांग आता वार कुणावर करू ?

अशी टोकदार भाषा वापरणारा कवी.......

जीवाशिवाची चैतन्यदायी | निरूप भेट घडू दे |

जीवनानंद मिळू दे | केवलानंद मिळू दे |

अशी आत्मिक भाषा करणारा कवी......

एकीकडे विद्रोहाची भाषा तर दुसरीकडे अत्यंत हळवी आणि भावनेच्या पातळीवर व्यापक मानवीकरण करणारी भाषा अशा दुहित वाचक सापडतो.’ (एका फुलाच्या बागेचा दरवळ, संपादन- नरेंद्र आरेकर. पृ. ८)

अर्थात कवी सामाजिक, तात्विक विचार संपन्न भाषाशैलीत व्यक्त होतांना त्यांची लेखणी ही कधी टोकदार तर कधी हळवी व्यापक अशी आहे. त्यांची शैली चिंतनशील, गहिरी, परतत्त्वाचा स्पर्श करणारी भावगर्भ असून वाचकाला भूरळ घालणारी आहे. निश्चितच त्यांचे काव्य जनमान्य होण्यास भाषाशैली ही कसदार असल्याचेच प्रतीक होय.

बोलीभाषेचा वापर :

त्यांच्या कवितेत प्रामुख्याने झाडीबोलीचा वापर झालेला आहे. बोलीभाषेतील शब्दकळा श्रेष्ठ काव्याला जन्म देतात. प्रसिद्ध ‘इलियट’ कवी म्हणतात, ‘श्रेष्ठ कविता बोलीभाषेशी जवळीक साधणारी असते.’ डॉ. जयस्वाल हे बोलीभाषेत समाज मांडत व्यक्तिपरत्वे ते त्यांची भाषा वापरतात. झाडीबोलीतील आज दुर्मिळ वापरात नसलेले शब्द पुन्हा रूढ व प्रचलित करण्यास त्यांची कविता ही अमूल्य ठेवा होते.

झिमूर-झिमूर पानी-पावसाची रिमझिम, कहालं-कशाला, घरोबा-जवळीक, तलासून-शोधून, वाराधून-वादळ, सिक्सन-शिक्षण, असे अनेक शब्द बोलीभाषेत काव्यपंक्तीत ठाण मांडून बसलेले दिसतात.

व्यक्तिमत्त्वातील प्रबळ आत्मविश्वास, वाणीतील मार्दव, विचारातील प्रामाणिक तळमळ आणि सचोटी, कोंदणात फिट बसलेल्या माणिक मोत्याप्रमाणे न चमकणारी पण रसिक मनाला भूरळ घालणारी ही भाषाशैली वैशिष्ट्यपूर्ण काव्याची मालिका स्वरूपाने त्यांच्या सर्व काव्यसंग्रहातून बहरत समोर आल्याचे दिसून येते. यामुळेच त्यांची शैली अधिक काळ स्मरणात राहणारी आहे.

काव्य म्हणजे -

इवल्याशा सानुल्याचे

सोनसळी हसणे असते

धुंद बहरल्या फुलातील

सुगंध कण टिपणे असते. (तरंग-अंतरंग, पृ. ४१ )

जीवनाचे व्यापक तत्त्वज्ञान व्यक्त करणारी त्यांची काव्य भाषाशैली ही क्षणोक्षणी सर्व संग्रहात अनेक स्तरानुरूप दिसून येते.

सौंदर्यवादी कविता :

‘डॉ. जयस्वालांच्या कवितेचे अनेकविध वौशिष्टये आहेत. त्यात विलक्षणता, हळूवारता, भडकपणापासून दूर, प्रामाणिक अनुभवांचे पारदर्शक रंग, गोड हुरहुर, स्वप्नाळू वृत्ती, गूढरम्यतेची ओढ, प्रेमाचे अंत:सौंदर्य अशी सारी सौंदर्यवादी काव्याची लक्षणे स्पष्ट करत हळुच वेदनेची लकेर घेऊन चिवटपणे जगण्याची एक नवी उमेद त्यांच्या कवितातून आविष्कृत झाली आहे.’ (डॉ. सुदर्शन दिवसे. सौंदर्यासक्त मनाची कविता, एका फुलाच्या बागेचा दरवळ पृ. २९)

डॉ. जयस्वालांची कविता शब्दबद्ध होतांना ती काव्यात्मकता धारण करते यामुळेच त्यांच्या काव्यातील सौंदर्याची आरास ही वेधक असल्याचे दिसून येते. यात डोळसपणे पाहणे अगत्याचे आहे. जयस्वालांच्या काव्यात शब्दसौंदर्याची मांडणी, भावसौंदर्याची तरलता, विचारसौंदर्याचे प्रकटन, कल्पनासौंदर्याचा आविष्कार आणि त्यातील तत्त्वदृष्टी यामुळे नित्य स्मरणात राहण्यासारख्या आहेत.

कुठल्याही वाड्.मयीन परंपरेशी नाते न सांगता स्वतंत्रपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपुर उपयोग करणारे आणि दाहक वास्तवतेशी नाते जोडणारे, वेचक- वेधक शब्दांचा समर्पक उपयोग करणारे, समाजाशी समरस झालेले, अनुभवविश्वाची समृद्धी ज्यांचेकडे आहे असे अनोखे कवी जयस्वाल होत. जनसामान्याच्या भावभावना, यातना, वेदना ते सहजगत्या शब्दबद्ध करतात. त्यातून सौंदर्याचे शास्त्र काव्यात्म रूप घेऊन प्रकट होते.

भावसौंदर्य :

मुठीत धरलं तरी

पाणी नाही थांबत

नाक पुसलं तरी

सर्दी नाही बसत

जयस्वालांचे भावसौंदर्य निसर्ग, ममता, समाज, चिंतन या कोंदणातील उत्कट अभिव्यक्ती असल्याचे क्षणोक्षणी जाणवते. भावनांचा समर्थ आणि सुंदर आविष्कार काव्यात पदोपदी दाटून येतो. काव्य प्रसवतांना होणारे समृद्ध चिंतन ही कवीची अधोरेखित होणारी महत्त्वाची दुसरी बाजू आहे. कवीच्या मनातील अथांग सागरागत विचारशैली सरळमनाने न घेता रसिक यात दुसऱ्या बाजूने जेव्हा विचार करतो तेव्हा कवीची कविता ही झऱ्यासारखी वाटते. झऱ्याचं उगम स्थान शोधनं महत्त्वाचं असतं, खळाळणारा झरा तर मनमोहकच पण त्याचं अंतर्गत न समोर आलेलं स्वरूपही तेवढंच मनमोहक.... अगदी याच झऱ्याची जन्मगाथा हीच कवीच्या कवितेची त्यातील सौंदर्याची रसिकगाथा आहे.

विचारसौंदर्य :

सून पोरी, तू बाक्की दिसतेस

लगन मांडवात पूजा करावाच्या भारी

सून पोरी तू उम्मसच बाक्की दिसतेस

हुंडयासाठी मरावाच्या भारी (चऊक, चा. क्रं.६२ )

कवीचा आधुनिक दृष्टिकोन आणि त्यातील वास्तव चित्रण कवीच्या कवितेलाच उठावदार बनविते. सामाजिक, तात्विक विचारशैली ही काव्याची धार बनून समोर येते. रचनाशैली तील आशयाची सखोल विचारपातळी त्यांच्या कवितेतील विचारसौंदर्याला वारंवार बहरविते. एकंदरीत समाजातील प्रत्येक घटना, प्रसंग व व्यक्तित्वाच्या संवेदनांना प्रकट करणाऱ्या कवितेचा ढंग हा विचार सौंदर्याचा गाभा असल्याचे दिसून येते.

शब्दसौंदर्य :

संत श्वासाचे प्रबंध

पंत शब्दांचे महंत

तंत इष्काचे निबंध

आम्हा आपलीच खंत (चौसर, पृ. ८)

कवीचं मन हे क्षणोक्षणी शब्दांत गुंजणारं, शब्दाचा खेळ काव्यात उतरवणारा कवी शब्दपांथस्थ आहे. शब्दसौंदर्याची व्रतस्थ कलोपासना सकल हद्यी रसिकतेचा प्रत्यय आणून देते आणि या शब्द गुंफेतील वैचारिक तोरणमाळ ही स्फूर्ती निर्माण करते. कवी प्रत्येक ओळीत शब्दसौंदर्याचा आस्वाद देतो. मराठी भाषातंत्रात उर्दू, हिंदी शब्दांचा वापर त्यांच्या उपरोक्त काव्यातील शब्दसौंदर्याची उत्तम मेजवाणीच वाटते. शब्दाला सौंदर्याचे लेणे चढवून काव्याला रसिकाग्न करणारा कवी अगदी सहज भावातून व्यक्त झाल्याचे दिसून येते.

कल्पनासौंदर्य :

कवीची कल्पनाशक्ती ही नामानिराळी आहे. क्षितिजाच्या पलीकडील दृष्टी चे मर्मवेध घेणारा किंवा जीवनाच्या पलीकडील समृद्ध जीवनशैलीचे अनुबंध तपासणारा शोधक वृत्तीचा चिकित्सक कवी व त्यांची काव्यशैली होय. सामाजिक वृत्ती-प्रवृत्तीचे अनितीमान बोलके स्वरूप उपरोक्त काव्यसंदर्भांकीत आशयातून कल्पना सौंदर्याची शाश्वत दिशा प्राप्त करून देते. पुढे जाणाऱ्यांचे पाय ओढणे, आल्या गेल्याला लाथा हाणण्यात व्यस्त, कर्ण कर्कश चुगल्या ऐकण्यात आणि बघू नये ते सारे बघण्यात गुंतलेले मानवी अवयव बघून कवीचे मन चिंतनात्मक होवून ईश्वराला तिसऱ्या अवयवाचे दान मागते. यापलीकडील आशयार्थ पाहू जाता कवीची कल्पनाशक्ती सामाजिक चिंतनातून मानवी वृत्ती प्रवृत्तीला यथायोग्य आचरणशील घडवण्यास्तव केलेला जागर आहे असेच दिसून येते.

कुणीतरी सांगितले असेल

फुलामध्ये सुगंध असतो

प्रत्येक पाकळी खुडून खुडून

तो सुगंध शोधत असतो (चौसर, पृ. २५)

परीसस्पर्शाने सोनं व्हावं ही कल्पना काल्पनिक आहे. त्यातील मनभावना ही प्रांज्वल इच्छाशक्ती चे द्योतक ठरते. अलगद कवीची कल्पनाशक्ती ही परीसस्पर्शाला शोधणारी आहे. ‘आपलं आहे आपल्यापाशी’ हे जीवनाचं सूत्र. हे ज्ञान आपण न ओळखू शकल्याने मूर्खपणाने जीवन जगतो आहोत. आपल्या समोर फुलगंध असतांना पाकळी खुडून सुगंध शोधणारं वेडं मन परंतु या पाकळीतून मिळणारा गुलकंद वा अत्तररूपी सुवास हे शोधकतेचे मार्ग होत. कवीची कल्पनासौंदर्य कविता ही तरल मनाला शेाधकता देणारी आहे. विचारांचा दर्प वारंवार उगाळायला लावून कवीचे काव्य निव्वळ कल्पनेची भरारी मारणारे नव्हे तर या भरारीला कीर्तीवंत स्वरूप, सन्मान मिळवून देणारे आहे. जीवनाशयाने ओतप्रोत भरलेले हे कल्पनासौंदर्य व त्यातील उत्कट तरलता डॉ. जयस्वालांच्या काव्याशिवाय अन्य कुठे विरळतेने मिळाली तर नवलच!

कवीची चारोळी व कवितासंग्रहात भावसौंदर्य, विचारसौंदर्य, शब्दसौंदर्य, कल्पनासौंदर्य अशा सौंदर्याची मांडणी आहे.

सौंदर्याचे स्वरूप जितके आकर्षक, मोहक, तरल मनात भरणारे अर्थात मनदृष्टीनुरूप आवडणारे असेल तर ती व्यक्ती आपल्याला प्रिय असते, आवडतेच. त्याचप्रमाणे साहित्यातही आहे. कवीची कविता सौंदर्यभावनांचे कल्लोळ माजवणारी नक्कीच आहे. भावसौंदर्यातून भावनेचे प्रयोजन आहे. त्यातून वैचारिक सामर्थ्याची पेरणी होते. विचारसौंदर्यातून नकळत नव्या सृजनशीलतेची जाणीव होते तर शब्दसौंदर्यातून आत्मिक समाधान प्राप्त होते आणि कल्पनासौंदर्याच्या सामर्थ्याने अतिमानस शक्तीचा आविष्कार करण्याचे प्रयोजन निर्माण होते.

अशाप्रकारे जयस्वालांच्या काव्यातील सौंदर्यभाव अनेक प्रकारे उलगडतांना, साहित्यमूल्यांच्या दृष्टीने परिपूर्ण असलेला सौंदर्यभाव जीवन समूहाला सक्षम करणारा, जाणिवा पेरणारा आहे असेच दिसून येते.

ज्योत जळते - समई तापते

फुलं फुलतात - पानं बहरतात

उदबत्ती जळते - राख उरते

चिता जळतात - चिंता उरतात (चौकार, पृ.७१)

उपरोक्त चारोळीत अर्थानुकूल शब्दांची मांडणी कवीने केलेली आहे. ज्योत जळते या शब्दाने समई तापणे, पेटणे, जळणे असेच भाव अस्पष्ट मनात तरंगतात. अर्थात एखाद्या शब्दाने अनेकांगी पद्धतीने शब्दाचे सौंदर्य बहरून येते याची जाणीव होते. अशाप्रकारे अनेक कवितेतील शब्दसौंदर्य आपण बघू शकतो. फुलं फुलणे, पान बहरणे, उदबत्ती जळणे-राख उरणे, चिता जळणे आणि अखेर चिंतेचे उरणे....

उपरोक्त चारोळीतून व्यक्त झालेली मानसिक भावशक्ती मन मेंदूला विचाराचे कोंदण देते. गळा भरून यावा यागत यातील शब्दाने मन सैरभर भरून येते. जीवनाच्या चिंतनात आपले अप्रकट मन शब्दसौंदर्याच्या समृद्ध जाणिवा शोधत जाते. त्यामुळे त्यांची चारोळी व इतर कविता ह्या हव्याहव्याश्या वाटतात. हेच कवीच्या शब्दसौंदर्याचे सामर्थ्य होय.

नवरदेव पहिला हार घालतो

आणि जन्मभर हार मानतो

तो इतरांसाठी ठरतो बैलोबा

मात्र तिच्यासाठी कामधेनू बनतो (मिस्किली, पृ. ४९ )

मोगऱ्याच्या करीना

फुलावाच्या भारी नाई लाजावा

रूसली करी दिसली एकांदी

तरी तिलं नाई हासावा (चऊक, चा. क्रं. ९०)

काव्याचे मूल्यमापन जीवनसापेक्ष शब्दांच्या सौंदर्यभावात दडलेले असते. उपरोक्त मिस्किलीत हार-फुलांची माळ, हार-पराजय अशा शब्दांची अर्थाभिव्यक्ती तद्वतच ‘बैलोबा आणि कामधेनू’ या शब्द वापरामुळे नवरदेवाच्या जीवनाचे सूक्ष्म चिंतनात्मक विचारपैलू नव्या अस्तित्व वादाची मांडणी करतात. एकंदरीत शब्दसामर्थ्याचे सौंदर्य यामुळे कवीच्या कवितांचा दर्जा वाढलेला दिसून येतो.

झाडीबोलीभाषेचे भाषिक सौंदर्य हे लयबद्ध जीवनाला सुरेल संगीत प्रधान करणारे आहे असेच वाटते. ही गावबोली, प्रादेशिक बोली व त्यातील शब्द हे वेगळ्याच रंगाचे, ढंगाचे नवा साज घेऊन साहित्यात अवतरलेले आहेत.

करीना-कळी, लाजावा-लाजणे, एकादी-एखादी, हासावा-हासणे या शब्दातून नावीन्यपूर्ण भाषेची लयलूट बघावयास मिळते. ‘चऊक’ यात झाडीबोलीतील शब्दसौंदर्याचा आस्वाद हा मराठी प्रदेशाला, भाषिकाला त्या प्रादेशिक जीवनाचे वास्तव स्वरूप निर्माण करून देतात. यामुळेच कवितांचे श्रवण व रसग्रहणाची पातळी मोहक मधुर होते.

बायको आली तीर्थयात्रा करून

तिने माझ्यासाठी आणला दासबोध

खरं तर याची गरजच काय होती

दास बनून तिचा ऐकतच होतो बोध (मिस्किली, पृ. ५२ )

वरील चारोळीतून प्रेमाची अनुभूती निर्माण होते. पहिल्या दोन ओळीतून कल्पना चमत्कृती निर्माण होते. उत्तम कल्पनासौंदर्य व भावसौंदर्याची मांडणी असलेली ही मिस्किली आहे. दुसरी ओळ व चौथी ओळ यातील संमिश्रभाव हास्यात्मक, विनोदात्मक संसारशैलीचे उत्कट भाविष्करण दाखविते.

डॉ. राजन जयस्वालांच्या बहुतांश चारोळी व काव्यातील ओळीमध्ये सौंदर्याची चपखल मांडणी झाल्याचे दिसून येते. म्हणून जयस्वाल हे सौंदर्यवादी कवी, चारोळीकार असून जनमाणसात त्यांची कविता लोकप्रिय होण्याचे हेही कारण दिसून येते. तद्वतच सौंदर्यवादी काव्याचे प्रयोजन त्यांच्या कवितांचे महात्म्य दर्शविते.

डॉ. राजन जयस्वाल आपल्या काव्यात पौराणिक व ऐतिहासिक संदर्भाचा वारंवार उल्लेख करून रूढी परंपरा व त्यातून पुढे जाणारे जीवन संदर्भ अत्यंत साध्या सरल काव्यात्मकतेने मांडतात. तेव्हा कवीच्या अशा संदर्भातून त्यांची कविता आशयगर्भी होते. मनात खोलवर रूजायला सहज सोपी जाते.

बुद्ध हसला

जग शांत शांत झाले

बुद्धामागे जग पुन्हा

युद्ध युद्ध झाले (चौफेर, चा. क्रं. १७)

ज्ञानदेवांनी चालविली भिंत

ते ठरले मोठे संत

आम्ही अवघे घर चालवतो

आणि करत बसतो खंत (चौकार, पृ. २३)

लग्नानंतर तो म्हणायचा

‘ ताजमहल बनवायचा आहे,

पण सालं आपलं नशीब

मुमताज मरत नाही.’

तिनं लक्समन रेषा वरांडलन

मुहून काना सीता हरन झाला

नसं जेती लक्समन रेस्या

तेती बाईचा जिना हराम झाला

(चऊक, चा. क्रं. १३)

उपरोक्त वरील चौफेर पृ. १७ मधील चारोळीत बुद्ध आणि त्यांच्या शांतीकरूणेच्या सम्यक अष्टांग मार्गाचा प्रवास त्यांच्या नंतर क्रांतीप्रवण मार्गाने सुरू झाल्याचे वास्तवचित्रण अशा ऐतिहासिक संदर्भातून व्यक्त होते.

उपरोक्त चौकार पृ. २३ मध्ये ज्ञानदेवाचे भिंत चालवण्याचे कृतीकार्य फारमोठया संतकार्याची महती वाटत असतांनाही आपण आपले कुटुंब, घर चालवण्याची खंत करीत बसतो. अशा विडंबनात्मक काव्यओळीत येणारे पौराणिक संदर्भ संतसाहित्याचे दाखले हे कवीच्या कवितेला निश्चित परिणामकारकता देऊन जातात.

मुमताज आणि शहाजहान यांच्या प्रीतीचा आविष्कार रूपी ताजमहल आजच्या तरूणाईच्या प्रीतीच्या आलेखात शोधण्याचे मार्ग कवी देऊन जातो. अशा ऐतिहासिक संदर्भाचा दाखला आजच्या संसार वेलीवर किती उपकारक की हास्यकारक ठरतो व त्यातून कुठले मर्म व बोध मिळते हे वाचक रसिकांनी ठरविणे अगत्याचे ठरेल.

चऊक पृ. १३ मध्ये सीतेचे हरण हे लक्ष्मण रेषा ओलांडल्यामुळे झाल्याचा दाखला देत वर्तमान युगातील स्त्री समस्या, प्रश्न व जीवन यातील दु:खे जीवनाचे रडगाणे आज प्रतिकात्मक लक्ष्मण रेषा नसल्याचे अर्थात बंधनात्मक स्वरूप नसल्याचे उदाहरण नाही काय?

कवीची दृष्टी ही संदर्भ, उदाहरण, दाखल्यासह काव्यवेल बहरवण्याची आहे. कारण वर्गात प्राध्यापक म्हणून शिकवत असतांना एखादा पाठ त्यातील आशय देऊन अनेक उदाहरणे देऊन समाजावून देण्याची ही पद्धत त्यांच्या काव्यातही नकळत आली. प्राध्यापकीय अनुभव हेच या पौराणिक व ऐतिहासिक संदर्भाला खुलवणारे ठरले व त्यातून काव्यात्मक गोडी वाढल्याचे दिसून येत आहे.

जीवनातील आशयाचे विविध पदर साकारणाऱ्या त्यांच्या काव्यओळीत अशाप्रकारे अनंत पौराणिक संदर्भ दिसून येतात. त्यातील संवादात्मक भूमिका, प्रतिकात्मकता लक्षणीय स्वरूपाची आहे. एकलव्य, द्रोणाचार्य, बुद्ध, ज्ञानदेव, राम, सीता, लक्ष्मण, ताजमहल, मुमताज, राधा, कृष्ण, बळीराजा, वामन, महादेव याप्रकारे प्राचीन महाकाव्ये साहित्य व त्यातील प्रस्तुत कथानक व पात्रांचा सर्वच संग्रहात कल्पनाशक्तीने उपयोग केल्याचे आढळून येते.

एकंदरीतही संदर्भवृत्ती काव्याच्या आशयाचे अर्थ परिणामकारकपणे साधणारी, अनुभव व चिंतन देणारी सहज प्रवृत्ती आहे. प्रेम, जीवन त्यातील भावभावना, समाजातील घटना प्रसंग यातील वास्तव, सुख-दु:ख यांचे चित्रण यात प्रतिनिधित्व करीत तुलनात्मक मनाचे विषण्ण भाव गडद होण्यास्तव झालेले कवीचे चिंतनभाव होय. वाचकांना मोहित होण्यास्तव व त्यातील आस्वादकता अनुभवण्यास्तव सदर उदाहरण पुरेसे असून आपणही आपल्या अभ्यासात्मक मांडणीतून, आस्वादक भूमिकेतून असे अनेक उदाहरण मिळवावेत. त्यामुळे कवीच्या कवितेचा कैफ व त्यातील धुंदी रसिकमग्न होण्यास मदत मिळेल असा विश्वास वाटतो.

प्रतीके :

प्रा. डॉ. श्रद्धा थोरात ‘ एका फुलाची बाग’ एक रसग्रहण या लेखात म्हणतात, ‘कवीचे मूल्यमापन होते ते पूर्वसूरीपेक्षा, समकालिनापेक्षा काय वेगळं लेणं काव्याला चढवलं या आधारावर, कविता बोलते ती प्रतिमा, प्रतीक, प्राक्कथा या माध्यमातून, प्रतीक समाजमान्य असतात.’ (एका फुलाच्या बागेचा दरवळ, पृ.१)

डॉ. राजन जयस्वाल यांच्या काव्यसंग्रहात अनेक समाजमान्य प्रतिकात्मक शब्दाची लयलुट आहे. या शब्दांना कवी एका नव्या कोनातून बघतो. त्यातून वाचक सुखावतो, दर्जा व काव्याचे आयुष्य उंचावलेले असल्याचे दिसून येते.

चौकार :

कृष्णधुंद, हिजडयाचे पराक्रम, बरबटलेले रस्ते, मंतरलेले चैत्रबन, लक्ष्मणरेषा, दु:खाचे श्वापद, दिशाहीन प्रवास, संस्कृतीचे मणिहार, सामान्यांचा प्रताप, पुण्याचे पायस, प्रकाशवेधी, भुकेकंगाल लोक, घोषणांचे नगारे, सुग्रण घरटे याप्रकारे...

चौसर :

कृपेची चुंबळ, मुखवटयांच्या गाठीभेटी, विदेही चाकोरी, चिता चंदनाची, श्रृंगारवेल, मरणबावरी, सप्तपदी, गुदगुल्या, दु:खाचे श्वापद, पांथस्थाचे रस्ते, कठपुतळ्यांचे स्वप्न.

चऊक :

सिंड्रीची हाजी, डोऱ्यामंदी कुसीर, फिफुलीवानी जरावा, खंडावाचा मंतर, बिहिकुडा मानोस, खोडबावलीचा सपन, मर्जीची चुंबर, कामाच्या बाता, घुबडायची वरात, हिडहिडया वान्या जिनगानीवर.

चौफेर :

शब्द रानभर, रानभूली, अमानुष वरदळ, अव्दैताचा वारा, इष्काचे निबंध, ग्रहणमुक्त.

मिस्किली :

मौनाचे महात्म्य, वक्तृत्वाची किमया, वीरांचे आभूषण, धांगडधिंगा, इंद्रधनूष्यातील आठवा रंग, रूईचे फुल.

उपहास :

बुद्धी, विवेक, संयम हे व्यक्तिमत्वाचे पैलू होत. कवी अत्यंत आदराने आत्मविश्वासाने काव्यात भावनांचे रेखीव चित्रण करीत मानवी जीवन संवेदना प्रकट करतो. मानवी जीवन व तत्त्वज्ञानाची अंतरंगात जाणीव निर्माण झाली की, मानवांच्या मनाच्या भावनांचा कल्लोळ होतो. त्यात प्रामाणिकता सत्य स्वरूपाचे मिश्रण सभोवताली विषयातून चांगले वाईट बारकाईने शोधणे, वाईट किंवा समाजमनाला अप्रिय असलेलं, घातक असलेलं दृश्य वारंवार चिंतनात येते आणि संताप निर्माण होतो. पुढे हाच संताप काव्याच्या स्वरूपातून मार्मिक पद्धतीने चित्रित होत त्या त्या संदर्भातील उणिवा, दोष उगाळतो. भ्रष्ट चित्रणातून दूर हाकलण्यास्तव लेखणीतून एल्गार पेरतो. डॉ. राजन जयस्वालांच्या व्यक्तित्वातून याच पद्धतीने उपहास आणि उपरोध आला असावा असे मनोमन वाटते. कारण समाजातील मानवी जगण्यातील वास्तव अनेक कवितातून त्यांनी मांडलेले आहे.

डॉ. गंगाधर पानतावणे म्हणतात, ‘उपरोधतेचे शस्त्र हे अधिक धारदार असते. परंतु उपरोधगर्भतेला सूक्ष्म निरीक्षणाची ऊब असावी लागते. ही नसेल तर उपरोध विद्रूप होण्याची शक्यता असते.’ ( ना. गो. थुटे यांची कविता, समीक्षा डॉ.चंद्राकांत नगराळे, पृ. ७०)

डॉ. राजन जयस्वाल यांना सूक्ष्म निरीक्षणाची सवय असल्याने त्यांनी मांडलेली उपरोधिकता अधिक रोचक व आकर्षक झाल्याचे दिसून येते.

एकच चप्पल हरवली तरी

चपला दोन घ्यावा लागतात

फाईल टेबलावर असली तरी

लिफाफे खालून द्यावे लागतात

(मिस्किली, पृ. ५१)

कवीने अनुभवाचे अनेक उन्हाळे, पावसाळे पाहिलेले आहेत. त्यातील चप्पल हरवण्याचं उदाहरण असो की कार्यालयातील कामाचं स्वरूप, टेबलाखालून देणगी दिल्याशिवाय कुठलेही काम पूर्णत्वास जाणे शक्यच नाही. उपरोक्त चारोळीतून कवी मिस्किलपणे विनोदगर्भता साकारीत अशा प्रवृत्तीवर विडंबन निर्माण करीत प्रबोधन साकारतात.

विजया मारोतकर ह्या कवयित्री म्हणतात, ‘अनेकदा जगतांना दाहक अनुभव येतात. ते काळाच्या ऐरणीवर पारखतांना काव्याच्या धुंदीत जगणाऱ्या कवीचा प्रांजळ कळवळा कवितेतून व्यक्त झाला नाही तर नवलच! डॉ. जयस्वाल यांच्या कवितेतून आलेला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्यातील सर्जनशीलता दर्शवून जातो.’ (एका फुलाच्या बागेचा दरवळ, पृ. २३)

कवीच्या कवितेतील वैशिष्ट्य म्हणजे समाजातील व मानवी जगण्यातील वास्तव ते सहजपणे उपहासात्मक दर्शवितात. हाच त्यांच्यातील दृष्टिकोन सर्जनशीलतेचे मापदंड बनून समोर येते. जाहिराती देऊन माणुसकी, प्रेम आपण विकत मिळवू शकत नाही. असाही बोध अप्रत्यक्षरित्या आपणास कवी देऊन जातो आहे.

बदलत्या मानवी मूल्यांची व घसरत्या नीतीमत्तेची जाणीव करून देणे हेच कवीचे उद्दिष्ट्य उपरोधिकतेतून व्यक्त होतांना दिसते.

उधार उसनवार मागत नाही

म्हणून घरोबा केला

तर बायकोच पळवून

त्याने शेजारधर्म पाळला (चौकार, पृ.२२)

मैत्रीतील व नातेसंबंधातील अशा अनेक तऱ्हा, फसवणूक ही इथली नीतीव्यवस्थाच झाली आहे. कवीची दृष्टी ही मानवतेचे सहद्य नाते व त्यातून होणारे जीवनविषयक जगण्यातील कारण व त्यातून निर्माण होणारी कटुता यातील वास्तव अधोरेखित करते. बायकोच पळवून शेजारधर्म पाळणारे ही जीवनविषयक प्रतिमा उच्चकोटीचा रसास्वाद व मार्मिक उपरोध दर्शविते.

काव्यातील रसास्वाद मानवी वृत्तीचा उपहास मांडतात, कवीची भाषाशैली टोकदार, कधी मवाळ तर केव्हा मिस्किलपणे जीवनातील अनेक प्रसंगावर, बाबींवर सूक्ष्मनिरीक्षण दृष्टिवेध देऊन जाते. कवीचा काव्यजागर कवितेतील चांगुलपणा व मानवतावादी मूलमंत्र यासाठीचा आहे.

कवीने आपल्या सर्वच संग्रहात अनेक विषयावर उपहास मांडलेला आहे. शिक्षण, राजकीय, समाज, संस्कृती आणि त्यातील केंद्रबिंदू मानव व त्यांच्या नैतिक आचरणाचा उत्तरोत्तर प्रती विकासाचा ठेवा स्वीकारायला भाग पाडणे हेच कवीचे साहित्यातील समाजकार्य होय. कवीच्या कवितातील अदृष्यभाव आकलन करणे त्या भावभावनांचा कल्लोळ होऊन चिंतन होणे काळाची गरज आहे.

जयस्वाल यांच्या चारोळीवर खूप काही लिहिता येईल, बोलता येईल. सरांची चारोळी ही मार्मिक आहे म्हणूनच ती जगमान्य ठरली यामुळेच सर्व संग्रहातील चारोळीचे एकत्रीकरण करून समग्र रूपाने ती आपण रसास्वाद करावी यास्तव आपणासमोर समग्र चारोळीचे संपादन ठेवतो आहे.

चला तर आस्वाद घेवूया......

डॉ. जयस्वाल यांची समग्र चारोळी :

महिलाच देशाचा उद्धार करतील

महिलांचा उध्दार कोण करतील?

करतील, ते काहीही करतील

पण देशाचा उद्धार मात्र महिलाच करतील

बिघडली अन् झाली चालू

ती नार होती

सुधारली अन् झाली चालू

ती कार होती

तिने पसारा पसरवला तरी

त्याला तो सुंदर पिसारा वाटायचा

ती रुसली तरी तो रडायला

तिला तो अगदी बिचारा वाटायचा

‘बेटी,

‘पुढील परीक्षेत ९०% मिळायला पाहिजे’

‘नाही बाबा मी १००% मिळवून दाखवीन’

‘गंभीर गोष्टीची चेष्टा नाही करायची’

‘चेष्टेला तर मी चेष्टेनेच उत्तर देईन’

‘मे आय कम इन सर’ विचारुन

आलो होतो तुमच्या तबेल्यात

आता आम्ही धावतो रेसकोर्सवर

तुम्ही सट्टा लावता बैलाच्या पटात

तुमच्याकडे झाडं

का नाही वाढत?

आमच्याकडे वाढायचं काम

बायकोकडे असतं!

पती हा परमेश्वर असतो

यावर तिचा आता विश्वास आहे

अक्षम्य गुन्ह्यालाही क्षमा करणे

केवळ परमेश्वरालाच शक्य आहे

योगासनाने, प्राणायमाने,

काही लोक दीर्घायुषी होतात

योगायोगाने, यमाच्या दुर्लक्षाने

काही लोक दीर्घायुषी होतात

निवडणूक प्रचाराचा शुभारंभ

नारळ फोडून दगडावर

नंतर प्रत्येक भाषणाचा जोर

खापर फोडून विरोधकावर

१०

अपुले नाते युगायुगाचे

तुम्ही विठ्ठल, आम्ही बडवे

तुमचे हात कटीवर, आमचे मोकळे

तुम्ही सांभाळा, आम्ही उडवे

११

‘मौनाचे महात्म्य’ या विषयावरचे

त्यांचे भाषण चांगले रंगते

‘वक्तृत्वाची किमया’ या विषयासाठी मात्र

श्रोत्यांची वाणवा जाणवते

१२

संकट म्हणजे वाशिंग मशिन

ते घासतात, फिरतात, पिरगळतात

त्यातून बाहेर निघणारे मात्र

अधिक उजळ होऊन निघतात

१३

कुणीतरी विजेचा शोधच

जर लावला नसता

तर मेणबत्ती पेटवून

टी. व्ही. पाहिला असता

१४

बौद्धिक आरोग्यासाठी वाचणं आवश्यक

शारीरिक आरोग्यासाठी खेळणं आवश्यक

मानसिक आरोग्यासाठी झोपणं आवश्यक

म्हणून तर काम करणं केवळ आवश्यक

१५

क्षमा महान, क्षमा करणारे महान

क्षमावीरांचे आभुषण आहे

क्षमेची त्यांना संधी मिळावी म्हणून

आम्ही गुन्हे करणे आवश्यक आहे.

१६

ती लाडात म्हणाली, ‘प्रिय सख्या

आज कार मी चालवते, चालेल?’

‘आपण दवाखान्यात, गाडी गॅरेजात

उद्या दोघेही वर्तमानपत्रात, चालेल?’

१७

‘तारण’ ठेवले पतिदेवाला तर

कवडीही कुणी देणार नाही

‘पती हाच बहुमोल दागिना’ यावर

आता बायका विश्वास ठेवणार नाही

१८

अलिकडे ते देवळात

कधी कधी जातात

जातांना अनवानी

परततांना बुटात येतात

१९

‘उत्सवात आमचे म्हातारपण

हरवून जाते’

हे गणेशोत्सवाचा धांगडधिंगा

पाहून खरे वाटते

२०

इजिप्शियन लोकात पिरॅमिडमध्ये

डॅडीच्या प्रेताचीही ममी करतात

भारतीय लोकसभेत खासदारांना

चूप करणाऱ्याला स्पीकर म्हणतात

२१

नवरदेव पहिला हार घालतो

आणि जन्मभर हार मानतो

तो इतरांसाठी ठरतो बैलोबा

मात्र तिच्यासाठी कामधेनू बनतो

२२

चौकाराचा चेंडू

मला फार-फार आवडतो

घरंगळतांनाही तो

धरतीचे चुंबन घेत असतो

२३

मस्जिद पाडल्याने अल्ला मरत नाही

पाडणाऱ्यांची ताकत दिसते

मंदिर उभारल्याने देव तरत नाही

उभारणाऱ्यांची शान वाढते

२४

साप मुंगसाची लढाई

गारुडी तो दाखवत नाही

त्याने ताबीज काढले की

तिथे गर्दी थांबत नाही

२५

मी झोपाळू आहे असे

तुम्हाला उगाच वाटत असते

भविष्यासाठी स्वप्न पाहणे आवश्यक

स्वप्नांसाठी झोपणे आवश्यक असते

२६

परोपकारी जीवन जगलो

पण चिता चंदनाची होत नाही

इमान धरम विकून जगलो

तर चंदनाची चिंता राहात नाही

२७

दुर्बलांना हिडिसफिडिस करतात

ते समर्थ नसतात

आपला पोकळपणा झाकण्यासाठी

ते रुबाब दाखवतात

२८

तुझ्या माझ्या ओसाड आयुष्यात

ना कुणी मित्र ना कुणी सखी

मग तू भेटलीस अचानक

आता तू सुखी अन् मी दु:खी

२९

ज्याची तलवार दुधारी

तो शूर असेल - नसेलही

पण ज्याचे मन दुधारी

तो दगाबाज असेल - असेलच

३०

पर्यावरणासाठी झाडे लावा

झाडे जगवा

अनावरणासाठी पुतळे बसवा

बुरखे टरकवा

३१

शाळा सुटली, पाटी फुटली

गुरुजी तुमची नोकरी टिकली

तुमच्या पाटीवर नवा वेतन आयोग

आमची बेकारीची हौस फिटली

३२

कुरवाळण्यासाठी एखादे दु:ख

त्यांना सतत हवे असते

कर्जमाफी होणारच असल्याने

त्यांना नवे कर्ज हवे असते

३३

शेतीचे शिक्षण देता घेता

त्यांनी शिक्षणाचीच शेती केली

मातीचे शिक्षण दूर राहिले

त्यांनी शिक्षणाचीच माती केली

३४

संताचा अनुताप

अभंगांना जन्म देतो

सामान्यांचा प्रताप

अपत्यांना जन्म देतो

३५

निसर्गाने निरुपयोगी असे

काहीच बनवले नाही

ते तुझ्याकडे पाहिल्यावर

मुळीच खरे वाटत नाही

३६

त्यांच्या प्रामाणिकपणाची अजब तऱ्हा

ते खोटेही बोलतात प्रामाणिकपणे

इमानदारी इमानाने तर काय नवल

ते बेईमानीही करतात प्रामाणिकपणे

३७

आजी आजोबा सोबत

तरुण नात येत आहे

जणू विझलेल्या मेणबत्यांसह

सुगंधी अगरबत्ती येत आहे

३८

त्यांनाही करीन सलाम

जे मला करायचे मुजरे

नापाक झाले इमाम

तर हाजीने बनायचे हुजरे

३९

ज्ञानदेवांनी चालवली भिंत

ते ठरले मोठे संत

आम्ही अवघे घर चालवतो

आणि करीत बसतो खंत

४०

आमच्या पायात रुतायला

वाटेवर काटे टपून

वाटचाल करतांना आम्ही

पाऊल ठेवतो लपवून

४१

रस्ता कुठेच जात नाही

जात असतो आपण

रस्ता चुकला म्हणतो तरी

चुकत असतो आपण

४२

गेला तो गांधी महात्मा होता

उरले ते सगळे संधी साधू

मेला तो जवाहर पंडित होता

उरले ते सगळे भ्याड भोंदू

४३

तुझे मन लहान, घर लहान

कसे समजून घ्यावे ऐसपैस

कितीही जपून चालले तरी

डोक्याला छप्पर लागे ठसा ठस

४४

त्यांना कुणीतरी सांगितले - जीवनाचे सूत्र

व्यापच माणसाला, व्यापक करतात

तेव्हापासून ते गर्दीत जाऊन उभे राहतात

गर्दीलाच आपला व्याप समजतात

४५

उधार उसनवार मागत नाही

म्हणून घरोबा केला

तर बायकोच पळवून

त्याने शेजारधर्म पाळला

४६

तुझी मला कधीच आठवण येणार नाही

कारण मी कधी तुला विसरलेलोच नसेन

तू मात्र मध्येमध्ये माझी आठवण करीत जा

नाहीतर मी ‘माजी’ प्रियकर झालेलो असेन

४७

त्यांची कल्पकता इतकी अनावर की,

ते इंद्रधनुष्यात आठवा रंग भरतात

त्यांना नावीन्याची इतकी ओढ की,

ते लग्नाच्या पंगतीत मुरमुऱ्याचे लाडू वाढतात

४८

जातांना नेत्यामागे मोर्च्यात

आम्ही होतो मुर्दाबाद करीत

परततांना होतो प्रेतयात्रेत

नेते होते वाटाघाटी करीत

४९

तुझी किंमत केवळ शून्य

असं तुला उगीच वाटते

माझ्या बाजूला येवून बस

माझी किंमत दसपट वाढते

५०

स्वत:च्या आणि साळीच्या लग्नाची

तुलना करुन दु:खी होतात

म्हणून गणिताच्या पेपरात गुरुजी

शुध्द लेखनाचे गुण कापतात

५१

पतंग हाती लागत नाही

तर मंजा लुटू पाहतात

मंजा हाती लागत नाही

तर पतंग फाडायला धावतात

५२

हातभट्टीवर धाड, वाघाने मारली बकरी

तर त्यांची धुळवड चंगळ असते

जेरबंद वाघिणीसाठी सरकारी मटन

फॉरेस्टरच्या घरी शिजत असते

५३

सल्ला मागणारा खरं तर

सल्ला मागतच नसतो

त्याने सुचविलेल्या विकल्पाला

तुमचा दुजोरा हवा असतो

५४

माझी वाईट सवय आहे

उसने पैसे घेऊन विसरायची

देवा, त्यांनाही अशी सवय लाव

मला पैसे देऊन विसरायची

५५

दोन्ही हाताने टाळी वाजवून

करण्यापेक्षा देवळात आरती

एका हाताने मदत करुन

मिळते मनाला अधिक शांती

५६

जिंकणारा म्हणतो -

‘कठीण प्रयत्नाशिवाय शक्यचनाही’

हरणारा म्हणतो -

‘कठीण प्रयत्नानेही शक्यच नाही’

५७

तो कळवळून म्हणाला प्रेयसीला -

‘दिल्या घरी तू सुखी रहा’

ती म्हणाली, ‘तू असं कसं बोलू शकतोस?

नंतरही तू मात्र कान्टॅक्ट मध्ये रहा.’

५८

सामूहिक लग्नसोहळ्यात ते

दरवर्षी बोहल्यावर दिसले

प्रत्येकदा नवरी बदलली तरी

त्यांनी आपले स्थान कायम ठेवले

५९

कर्ज काढून त्याने घेतली कार

हप्ते न भरल्याने कार घेऊन गेले

त्याला पश्चाताप फार झाला की,

लग्नासाठी आपण कर्ज कां नाही घेतले?

६०

माझ्याशी वैर करणाऱ्यांवर

मी मात्र प्रेम करीत राहीन

देवा तू त्यांच्यावर कोपू नकोस

नाहीतर माझ्यावर नाव येईल

६१

तुम्ही प्रेम विकत घेऊ शकत नाही

हे जरी खरे आहे

तरी सर्व खर्च मात्र प्रेमापोटीच करतो

हे मात्र खरे आहे

६२

‘निरपेक्ष मैत्रीची अपेक्षा

मी कधीचा ठेवत नाही’

‘तुला भक्ती आणि मैत्रीतला

फरक कसा कळत नाही’

६३

वाटले तुझ्या ओठांना

घ्यावे ओठांनी चुंबुन

तूर्त विचार बदलला

तुझे वाहते नाक बघून

६४

आज परमेश्वर उद्या परमेश्वर

तिन्ही त्रिकाळ परमेश्वरच परमेश्वर

बुडवायला थोडे उधार घ्यावे तर

तिथेही आज नगद कल उधार

६५

त्यांचा आमचा वाडा

अगदी सेम टू सेम

आमच्या दारावर पाटी- ‘शुभ लाभ’

त्यांच्या- ‘कुत्र्यापासून सावधान’

६६

रिमझिम रिमझिम बरसत्या पाऊसधारात

‘मस्त मस्त भिजावेसे- गावेसे वाटते

भिजतांना-गातांना कुणीतरी सोबत हवे’

‘पावसाळयात प्रत्येक बेडकाला असेच वाटते’

६७

तुझा त्या हसण्याचा गडगडाट

अजून कानात घुसतो आहे

तुला होकार दिला लग्नासाठी

त्यानंतर मी हसणेच विसरतो आहे

६८

बायको खूश राहावी नेहमी म्हणून

तो न केलेल्या चुकाही कबूल करतो

पुढे पुढे दोघांनाही तशी सवय लागते

तिला मूल होतं, हा बाप झाल्याचे कबूल करतो.

६९

एकदा तुला डोळे भरुन एकटक पाहिले

आता तसे पाहण्याची हिंमत होत नाही

नेत्रतज्ञ म्हणाले, ‘नंबर खूपच वाढला.’

वारंवार नवा चष्मा मला परवडत नाही.

७०

आम्ही देशाला लुटतो

तुम्ही परस्परांना लुटा

आम्ही ‘जेब भरो’ करतो

तुम्ही ‘जेल भरो’ करा

७१

चुका करण्याचा प्रश्न नाही

कधी नाही केले कोणतेच काम

त्यांचा सातबारा कोरा म्हणून

करा स्वच्छ चारित्र्याचा सन्मान

७२

रंगीबेरंगी कपडे एकत्र धुऊ नये

कपडे आपसात रंग बदलतात

रंग बदललेले कपडे घालून ते

फॅशन शो मध्ये रंग उधळतात

७३

दिल्लीत बसले मनमोहन तरी

देशाची परिस्थिती केविलवाणी

दिल्लीत बसली सेानिया तरी

देशा हाती कथलाचा वाडा नाही

७४

पोरावर १०० टक्के करतेस प्रेम

सुनेचा मात्र दुस्वास करतेस

चांगली आई असून सुध्दा

सासू म्हणून उवाच ठरतेस

७५

काहूर ठेवशील डोक्यात तर

खाल्लं अन्न अंगाला लागत नाही

ऊतू गेलेलं दूध पिऊन

शेगडी धष्टपुष्ट कधी होत नाही

७६

अक्कलदाढ आली आता

मास्तर संस्कार पुरे करा

आम्ही आमचे बघून घेऊ

तुम्ही पगारासाठी संप करा

७७

बफेमध्ये जेवतांना ते उभ्याने

प्लेटभोवती पाणी फिरवतात

बियर सोबत पार्ले बिस्किट आणि

पुरणपोळी सोबत कैरी खातात

७८

नको करु पाण्यात चिखल

कुणीतरी हे पाणी पिणार आहे

जीवन स्वच्छ राहू दे, तुला पाहून

कुणीतरी जीवन जगणार आहे

७९

कामचुकार चतुर माणसं

बहिरेपणाचं सोंग घेतात

ज्यांना कमी दिसतं ते

नको ते डोळे फाडून बघतात

८०

दुर्बल - आळशी मनात

शक्तिशाली विचार कसे येणार?

आजीबाईच्या बटव्यात

‘एड्स’ चे औषध कसे सापडणार?

८१

अजून तू मुलींनाच

हसून करतोस विश

त्यापेक्षा डासांना कर

जे तुला करतात किस

८२

परवा स्वप्नात दिसले

तू रथात अन् मी तुझा सारथी

असं एकदा तरी घडावं म्हणून

रोज करतो मी देवाची आरती

८३

मुठीत धरलं तरी

पाणी नाही थांबत

नाक पुसलं तरी

सर्दी नाही बसत

८४

तुझ्यापेक्षा बायकोच्या प्रेमाचा

हक्क मी अधिक मानतो

हे तुझ्या रुसण्याचे कारण नको

आयुष्यातही मी प्रेाटोकॉल पाळतो

८५

खाल्ल्या मिठाला नाही जागले

हरामखोर, नमकहराम

आधी मिठात होते भेसळ

मग निष्ठा होते नमक हराम

८६

दवा-दारुच्या ओव्हर डोजमुळे

कधी रिअॅक्शन होते

रिअॅक्शनसाठी पुन्हा, दवादारु घ्या

त्वरित अॅक्शन होते

८७

तुझ्यासारखी मैत्रीण असते

हिऱ्यासारखी मोलाची

फक्त तोंड लावायचे नाही

नाहीतर जीव घ्यायची

८८

श्रध्दांजलीत त्याच्या दानीपणाचे

वक्ता खूपच गुणगान करतो

मोबदल्यात घेतलेले कर्ज

अॅडव्हान्स पेमेंट समजतो

८९

तुझ्या डोळ्यांना कमळ म्हटले तर

तू घडयाळ पाहतेस,

पंजा हलवत सायकलने निघून जातेस

पक्की राजकारणी आहेस

९०

निसर्गापासून दूर जाऊन

प्रगती होणार नाही

जी झाली तिला प्रगती म्हणायला

आपली हरकत नाही

९१

श्रध्दांजलीच्या भाषणात ते नेहमीच

इतके स्तुतीपर बोलतात

की जमलेल्यापैकी कुणी त्यांना

स्वत:साठी बुक करुन घेतात

९२

लग्न एक अशी भानगड आहे

की ती दोघांची एकदम होते

त्यातला एक असतो नवरदेव

दुसरी व्यक्ती शांत असते

९३

माझ्याकडे पाहून हसतेस तू

मला जिंकल्यासारखे वाटते

तुझ्याकडे पाहून कुणी हसलं तर

ज्युनिअरने रॅगिंग केल्यासारखे वाटते

९४

ती आली आयुष्यात

मिळाले प्रमोशन

ती गेली तणतणत

मिळाले डिप्रेशन

९५

‘प्रत्येंक नागरिकाने लागू असलेला कर

कर्तव्य बुध्दीने भरणे आवश्यक आहे.’

असे मास्तर म्हणताच, अधिकारी म्हणाले-

‘नगदीने भरणे आवश्यक आहे.’

९६

तू खोटं खोटच सांगितलस

तुझं माझ्यावर प्रेम असल्याचं

तरी मी इतका मोहरुन गेलो

खरंच नाही वाटत प्रेम नसल्याचं

९७

दारु पिल्यावर सर्व खरं बोलायची सवय

म्हणून त्याचा पाचदा घटस्फोट झाला

तरी सवय काही केल्या जात नाही

आता त्याने लग्नच न करण्याचा निर्धार केला

९८

कुणाबद्दलही पूर्वग्रह दुषित मत कधीच त्याचे नसते

तो सगळ्यांचा सारखाच नेहमीच द्वेष करतो

कुणी नमस्कार केला, तरी त्याला नाना शंका

माझं तुमच्याकडे लक्ष नाही, असे मुद्दाम दाखवतो

९९

आरशातले तुझे प्रतिबिंब पाहून

आकाशातले, चंद्रबिंब बिचारे लाजले

त्याचे वाढणे कलेकलेने, तुझे किलोकिलोने

एका वेळेस एकच चढा ‘वजनयंत्र’ म्हणाले.

१००

पहिला नातू झाला की,

माणूस होतो आजोबा - हर्ष भारी

दुसरा नातू झाला की,

माणूस होतो निवाडा – अधिकारी

१०१

देवळातल्या दानपेटीतून

त्यांने पैसे काढले, धन समजून

देवानेही त्याला माफ केले

कापून घेतले ॠण समजून

१०२

प्राजक्ताप्रमाणे तुझे नित्य उमलणे, बरहणे

निर्माल्य झाले तरी दरवळत राहणे

त्यापेक्षा तू रुईचे फूल हो, हनुमानाप्रमाणे

शनिवारी मलाही भेटत राहणे

१०३

त्यांच्या घरी असं काही महाभारत घडलं

कारण तो बायकोचा वाढदिवस विसरला

त्याच तारखेला दर महिन्यात त्याने मग

वर्षभर तिचा वाढदिवस साजरा केला

१०४

झोपण्यासाठी गोळ्यांची गरज

उठण्याला गजराची गरज

शांती - विश्रांती पराधीन तर

अशा जगण्याची काय गरज

१०५

तुझ्यासोबत संसार करतांना

तुझा बाहेरख्यालीपणा खपवून घेईन

घरापर्यंत हाकबोंब आणू नको

तुला दुसरा नवरा मानून घेईन

१०६

वाईट लोकांशी चांगलं वागतांना

त्याला फार वाईट वाटतं

मधुमेहींना साखर वाटणे

त्याच्या फार जिवावर येतं

१०७

एकच चप्पल हरवली तरी

चपला दोन घ्याव्या लागतात

फाईल टेबलवर असली तरी

लिफापे खालून द्यावे लागतात

१०८

बायको आली तीर्थयात्रा करुन

तिने माझ्यासाठी आणला ‘दासबोध’

खरं तर याची गरज काय होती?

दास बनून तिचा ऐकतच होतो ‘बोध’

१०९

पाणी कितीही उकळलं-उकळलं

आटून जाईल तरी येणार नाही साय

बजेट कितीही मांडा - भांडा संसदेत

आत्महत्या शेतकऱ्यांच्या थांबणार नाय

११०

रागात तप्त असला तेव्हा

कोणताही निर्णय घेऊ नका

चैनीत गाफिल असता तेव्हा

कोणतेही वचन देऊ नका

१११

शाळेत तो चुकला की

मास्तर त्याचा नेहमी कोंबडा करायचा

त्याला मग बर्डफल्यू झाला

मास्तर आता तशी चूक नाही करायचा

११२

आयुष्यातील प्रत्येकच वळण

त्यांना विशेष अवघड असतात

इतके की ते आडवे होतात

कारण ते सरळमार्गी असतात

११३

उत्तेजक पदार्थापासून दूर रहा

डॉक्टरांनी बजावले तिला

तिने खूप विचार केला आणि

नवऱ्याला घटस्फोट दिला

११४

सकाळी पायावर डोकं ठेवणारे

दुपारी डोक्यावर चढु लागले

रात्री शांत झोपेसाठी मला

अवेळी शीर्षासन करावे लागले

११५

त्यांना नियमांचे महत्त्व कळले

ते नियमावर बोट ठेवायचे

ह्यांना बोटांचे महत्त्व कळले

हे बोटावर नियम नाचवायचे

११६

जो चोच देतो, तो घासही देतो

इतकेच, बाकी सारे आम्हीच करतो

चमचा स्वत:च मिळवावा लागतो

घास स्वत:च गिळावा लागतो.

११७

गरम मसाल्याचे पदार्थ

थंड प्रदेशात पिकतात

शांत मायबापाच्या पोटी

जसे आतंकवादी निपजतात

११८

श्रमावर बोलतील ते श्रम करतील

यावर मात्र भरोसा नसतो

श्रम परिहाराच्या कार्यक्रमावर मात्र

त्यांच्यावर फार भर असतो

११९

त्याच त्या चुका आयुष्यभर

करीत राहणे हा गुन्हा

चेहऱ्यावर धूळ तरी

आरसा पुसणे पुनःपुन्हा

१२०

‘नेहमीच तू घडयाळ

कां घेतेस इतके महागडे?’

‘माझ्या जीवनात वेळेला

खूप किंमत आहे ना गडे!’

१२१

आमच्या पाहुणचारावर

खूश सगळीच मंडळी

दुपारी पुरणाची पोळी

रात्री मटनाची नळी

१२२

छोटू हाताची नखं खायचा

त्याला रामदेव बाबांनी धडे दिले

आता छोटूची प्रगती झाली

पायाची नखं खाणंही जमले

१२३

पोटात कावळे ओरडले की,

मी अस्वस्थ होतो

पोटात कोंबडे कोंबले की

मी सुस्त होतो

१२४

तिला जेवण हवे

पीसफुल

त्याला जेवण हवे

पीसेस फुल

१२५

खूप विचार करुन

ते उस्फुर्त प्रतिक्रिया देतात

सारं उजाड झाल्यावर

ते शर्थीचे प्रयत्न करतात

१२६

‘पाणी उकळून प्या, जंतू मरुन जातात,’

वर्गात विज्ञानाचे शिक्षक सांगतात.

गणू पुटपुटला – ‘जंतू मरतात पण

त्यांची प्रेतं त्याच पाण्यात राहतात.’

१२७

निरोप समारंभात प्राचार्य म्हणाले -

‘भविष्यात असं अढळ स्थान मिळवा की,

गळ्यात हार पडेल, टाळ्या मिळतील.’

गणू पुटपुटला – ‘लग्न करा म्हणा की,’

१२८

जेवढयाचा तिचा मेमरीकार्ड

तेवढयाचा तुझा हॅण्डसेट

लाईन माराले जाशील तं

गॅरांटीने होईल इनसल्ट

१२९

आमची सामाजिक नीती भेदभाव

आमची राजकीय नीती घुमजाव

आम्ही बदलत राहू घरठाव

तरी आमचे वाढते भाव

१३०

लाच लाचारी

हीच चाकोरी

लागते कडवट

कष्टाची भाकरी

१३१

‘गाडीचा ब्रेक खराब

तरी एवढया वेगात?’

‘अपघातापूर्वी घरी

जायला हवे सुरक्षित’

१३२

लग्नानंतर त्याने बायकोचे नांव

‘करोड’ ठेवले, म्हणून तो करोडपती

बरे झाले त्याने बायकोचे नांव

‘राष्ट्र’ नाही ठेवले, नाही तर तो ‘राष्ट्रपती’

१३३

मला ‘टूर प्रोग्राम’ ठरविणे

फार सोपे जाते

केव्हा जायचे ते बॉस ठरवितो

कुठे जायचे ते मिसेस ठरवते.

१३४

‘तिने तुला फूल दिले तर

डोक्याला कशी जखम?’

‘गच्चीवरुन माझ्यावर तिने

फूल फेकले कुंडी सकट’

१३५

मी जिंकलो तर

विचारु नका कुणामुळे

मी हरलो तर

सांगेनच कुणामुळे

१३६

अपचनाचा त्रास सुरु झाला की,

मी उपोषण मंडपात जाऊन बसतो

माझे पोट दुरुस्त होते

आणि त्यांनाही पाठिंबा मिळतो

१३७

सूर्य उगवतो रोज तरी

कोंबडे आता आरवत नाही

ध्वनीप्रदूषण विरोधी प्रचार

इतका प्रभावी ठरेल, असे वाटले नाही

१३८

तुझी आठवण यायला

निमित्ताची गरज काय

तुझी जागा घेणारी

अजून भेटायची हाय

१३९

‘गुरुजी, झाडं रस्त्याच्या

दोन्ही बाजूलाच कां लावतात?’

‘मूर्खा! कारण झाडं रस्त्याच्या

मध्ये लावायची नसतात.’

१४०

‘मी नाही जाणार कॉलेजात उद्यापासून

रस्त्यात मुलं मला छेडतात.’ - तरुणी

‘खोटं! मी त्याच रस्त्याने जाते

४० वर्षापासून मला कुणी नाही छेडत.’ – आई

१४१

वर्तमानपत्रात मरणाची बातमी -

‘दोन्ही पायांनी डोहाची

खोली मोजण्याच्या प्रयत्नात

शहीद झाले गुरुजी’

१४२

आळस आणि कष्ट यापैकी

आळस मला आवडतो

कष्टाचे फळ उशिरा मिळते

आळस लगेच फळ देतो

१४३

नवऱ्यांने अधिक कमाई करावी

म्हणून ती भरपूर खर्च करते

नवरा कमावता थकतो

नाईलाजाने तिची उधारी वाढते

१४४

‘मेलोतरी तरी मूला विसणार नाही’

असं तो मला नेहमीच म्हणायचा

मी पैसे परत केल्याशिवाय

तो अजिबात नाही मरायचा

१४५

‘आमदार - खासदारांसाठी

एस. टी. बसमध्ये राखीव जागा’

यापेक्षा मोठा विनोद नाही

खरंच एस. टी. ची कित्ती कित्ती मजा

१४६

कॉफी पाहून लिहिता आले नाही

मला परीक्षेत कोणतेच उत्तर

इनव्हिजिलेटर माझ्यापाशीच रेंगाळायचा

मी लावले होते उत्तम अत्तर

१४७

डोंगरावरच्या विस्तवाने

घरातली खिचडी शिजत नाही

काचकुयरीला मलम लावून

आपली खुजली थांबत नाही

१४८

तिने माझ्याशी लग्नाचा निर्णय घेतला

अन् माझे निर्णय घेणेच बंद झाले

पुढे तिला पश्चातापच झाला तरी

म्हणते, ‘पदरी पडले पवित्र झाले.’

१४९

ताजमहालच्या टॅक्सची नोटीस

शहाजहानला मिळाली

तो वैतागला - पागल झाला

त्याने आत्महत्याच केली

१५०

त्याच त्या चुका आयुष्यभर

करीत राहणे हा गुन्हा

चेहऱ्यावर धूळ तरी

आरसा पुसणे पुनःपुन्हा

१५१

जे पदर धरुन मोठे होतात

ते पदर सोडून कसे राहणार

जे पदरमोड करुन मोठे होतात

ते कुणापुढे कां पदर पसरणार!

१५२

दुसऱ्यावर हसण्याची मजा घेण्यात

मात्र स्वत:वर हसणे विसरलात

तुम्हाला स्वत:वर हसता येत नाही

म्हणून तर लोक तुम्हाला हसतात

१५३

‘बचेंगे तो और भी लढेंगे’ म्हणणारे

मरतही नाहीत अन् लढतही नाहीत

लढाई हरण्याची खात्री असूनही

ते अहिंसावादी कां होत नाहीत?

१५४

माझ्यावर बेगडी प्रेम करणाऱ्यांपासून

देवा ! माझं रक्षण कर

माझ्या शत्रूंचा समाचार घेण्यास

मी एकटा पुरे आहे बरं!

१५५

अलीकडे इतक्या भिंती

कां वाढल्या घराघरात?

घरात राहूनही

घर घर मनामनात

१५६

मित्रांनी छळल्याच्या कथा

हेच माझे आत्मचरित्र

पुढच्या जन्मात तरी देवा

देऊ नकोस असे मित्र

१५७

ज्यांनी ईद साजरी केली

त्यांनी काल पाहिला आकाशात चंद्र

आम्ही ईद कशी करणार?

काल कुठे पाहिला तुझा मुखचंद्र!

१५८

संस्थांची होतात संस्थानं

खुर्च्यांची होतात सिंहासन

तेव्हा विचार होतात दफन

त्यांना मिळत नाही कफन

१५९

‘मैत्रीमध्ये देणेघेणे नकोस

मैत्रीच्या नावावर तो व्यवहार होतो’

हे तुझं मत ऐकून मैत्री तोडावी वाटते

बुडवण्यासाठी हक्काचा तोच माझा मित्र असतो

१६०

डोळियाच्या कडा ओल्या

अश्रू झाला कृष्णधुंद

स्थिरावल्या वृत्ती साऱ्या

नेत्री गात्री कृष्णानंद

१६१

छिनालांची सहानुभूती

हीच त्याची मिळकत

हिजड्यांच्या पराक्रमाची

हीच असते करामत

१६२

डोळ्यांना काजळ लावून

अश्रू काळे करता येतात

चुरूचुरू लागले तरी

डोळे चोळायचे नसतात

१६३

धुक्यात हरवली वाट

माझे मन अनवाणी

वाटेत गवसले गाव

माझे मन समाधानी

१६४

जिच्या पायाला मेंदी रंगते

तिने चालू नये अनवाणी

मेंदीच्या नक्षीला भुलतात रस्ते

पाऊले करतात मनमानी

१६५

तू सेवा करु नकोस

माझ्या तब्येतीन मरु दे मला

सेवेची सवय झाली तर

मेल्याचा पश्चाताप होईल मला

१६६

जळायचे तर ज्योतीसारखं

पतंगाचे जळणे बरे नाही

बाकी मला एक पटते

कुणाला जाळणे बरे नाही

१६७

त्या वाकलेल्या बाया, धानाच्या शेतात

करताहेत रोवणी

उपडलेला पऱ्हां लावतांना

त्या सांगताहेत गाणी

१६८

तळपाणी हितगुज करावे

असे रस्तेच हरवले आहेत

निमित्त पादत्राणाचे आहे

रस्तेच बरबटले आहेत

१६९

एक भूकंप व्हावा असा

भुईसपाट व्हाव्या जातीभेदाच्या भिंती

एक वादळ यावे असे

भ्रष्टाचाराची व्हावी मूठमाती

१७०

मंतरलेल्या चैत्रबनात

सूर माझा हरवला

अनुभवाच्या अरण्यात

सूर गळा गवसला

१७१

दूर दूर त्या तिथे

संशय बनेल काळोख

चंद्र जरी हसला

तरी पटणार नाही ओळख

१७२

रस्ता कुठेच संपत नाही

चालत असतो आपण

रस्ता चुकला म्हणतो तरी

चुकत असतो आपण

१७३

तुझी स्मृती उजाळून

देह जाळत बसतो मी

राखेबद्दल विचारु नकोस

राख फासून हसतो मी

१७४

जखमेस फुंकर

सांगे जरा बचके

दु:खाचे श्वापद

तोडी जीवाचे लचके

१७५

तू हसतेस उपहासाने

माझा दिशाहीन प्रवास बघून

दोन तट दूर उभे

नदी गेली पुढे निघून

१७६

जशी येतेस

तशीच जातेस

मला काय तू

साधू समजतेस!

१७७

त्याने दु:ख दिले नाही

की समजावे तो झोपलाय

आपले दु:ख संपले

की समजावे डाव संपलाय

१७८

त्याने दु:ख दिले

म्हणून तक्रार

त्यानेच धैर्य दिले

म्हणून आभार

१७९

शस्त्र ज्यांचे शास्त्र असते

ते सदा आक्रमण करतात

शास्त्र ज्यांचे शस्त्र असते

ते सदा संक्रमण करतात

१८०

उठता बसता हरीनाम

पुण्य मिळवायचा मंत्र

साहेबांचे करा घरकाम

प्रमोशन मिळवायचे तंत्र

१८१

निसर्गच तो

पहा किती उदार

दुष्काळापासून वाचलो

तर भूकंप करणार

१८२

तिच्या पायात नाही चाळ

चालतांना मात्र वाजतात घुंगरू

त्याच्या बोलण्यात नाही ताल

भाषणात मात्र वाजतात डमरू

१८३

जे हात हिसकावतात भाकर

ते श्वापदांचे अवतार असतात

जे भुकेल्याला देतात भाकर

ते संस्कृतीचे मणिहार असतात

१८४

ते उजाड करतात

माणुसकी उसवून जाते

जे उजेड देतात

माणुसकी उपकृत होते

१८५

पश्चातापात आग असते

आग नंतर राख होते

समाधानात धन्यता असते

धन्यता नंतर ध्यान होते

१८६

जे बदला घेतात

ते बदलत नसतात

जे बदलून टाकतात

ते बहादूर असतात

१८७

‘वेलकम’ म्हणालो

एकदा मृत्युला

‘वेट प्लिज’ म्हणतो

तेव्हापासून मला

१८८

एकाने तोडायचे

दुसऱ्याने जोडायचे

पापभिरु माणसांनी याला

तडजोड म्हणायचे

१८९

शंख-शिंपल्यांना किनाऱ्यावर

सोडायला लाटा येतात

हे शंख-शिंपले समुद्राची

नाकारलेली मुलं असतात

१९०

देव आहे देव्हाऱ्यात तोवर

करुन घ्यावी भक्ती

कापूर जळत आहे तोवर

ओवाळून घ्यावी आरती

१९१

जीवनाच्या मूल्यापुढे

जीवाची किंमत काहीच नाही

मृत्यूच्या मंत्रापुढे

मरणाचे तंत्र काहीच नाही

१९२

तुझ्या डोळ्यात

आभाळ गहाण

तू महान

तुझे आभाळ महान

१९३

पापातून पापाकडे

होई पापाचा प्रवास

प्रेम कळे तुझ्यामुळे

प्रेम पुण्याचे पायस

१९४

शेळयामेंढ्यांचे असू देत

सिंहाचे कळप नसतात

जाई चमेली सजू देत

गुलाबाचे गजरे नसतात

१९५

मर्दाचा पोवाडा ऐकून

जी जी शुरांनीच म्हणावे

नामर्दाना स्फुरण आलेच तर

त्यांनी हॉजी हॉजी म्हणावे

१९६

पापाच्या कल्पनेने

प्रेम मलूल करु नकोस

गाजर आणि केशर

एकाच भावात विकू नकोस

१९७

कठपुतळ्यांचे स्वप्न स्वीकारीत

मनपाखरु उडून जाईल

तळहातावरील या रेषांचे

पाहता पाहता स्वस्तिक होईल

१९८

यशाच्या क्षणी बेसावध असणे

अपयशाचा शाप असतो

दूरचा शत्रू टिपून मारतांना

घरभेदी बळावत असतो

१९९

पिसांसाठी मोर मारतात

कस्तुरीसाठी हरीण मारतात

दातांसाठी हत्ती मारतात

कशासाठी माणसं मारतात?

२००

मरण यावे म्हणून

शरण जायचे नसते

सरण रचले तरी

रण सोडायचे नसते

२०१

झोका जातो उंच-उंच

तुझ्या सोबत झुलतांना

वाट जाते दूर-दूर

तुझ्याशिवाय फिरतांना

२०२

नकाशाची दिशा बदलली की

पांथस्थांचे रस्ते चुकतात

पांथस्थ उपाशी निजला की

दिशांना गीत सुचतात

२०३

सूर्यफूलांचे मळे फुलवायला

प्रकाश वेधी व्हावे लागते

हिरवे आभाळ हाती धरायला

रानपाखरु व्हावे लागते

२०४

बगळ्यांची रांग उडे

उंच उंच अवकाशात

मन झेलते सावली

उतरणीच्या प्रकाशात

२०५

बरसण्याच्या प्रत्येक वेळी

तिचे आभाळ फितूर झाले

देव-दैव प्रत्येक वेळी

तिच्या परीक्षेला आतूर झाले

२०६

पानोपानी ऊन झेलत

ते झाड देई सावली

मनोमनी सल झेलत

मर्दपणे जगली माऊली

२०७

काजवे असतात स्वयंप्रकाशी

उजेड पाडतात स्वत:पुरता

तो मेला - गाव झाले सुने

माणूस नव्हता सरणापूरता

२०८

आश्वासनांचे ढिगारे

भुकेकंगाल लोक

घोषणांचे नगारे

लोकशाही झाली फोक

२०९

प्रकाशणारी ज्योत दिसते

दिसते वात जळणारी

सरणारे तेल दिसते

न दिसते समई तापणारी

२१०

देवघरातला दिवा

देवापुरताच असतो

तुळशीजवळचा दिवा

अंगण अजळून देतो

२११

जुनी पत्र चाळतांना

आठवणी हिरवळल्या तुझ्या

मृत्यूपत्रात लिहून ठेवीन

या पत्रांना सरणात रचा माझ्या

२१२

हुतात्म्यांचे आत्मे रडतात

या देशाचा लिलाव करा

जे राष्ट्रप्रेमासाठी जगतात

आधी त्यांना हद्दपार करा

२१३

नदीत सोडलेला दिवा

आता मात्र विझणार आहे

वारा संपत राहील

तरी तेल संपणार आहे

२१४

ज्योत जळते - समई तापते

फुलं फुलतात - पानं बहरतात

उदबत्ती जळते - राख उरते

चिता जळतात - चिंता उरतात

२१५

मनातले चांदणे

गेले आकाशात

आकाशाची वीज

आली संसारात

२१६

पाऊसधारा झेलण्यासाठी

मी हिरवा अंकुर झालो

वादळवारा पेलण्यासाठी

मी सुगरण घरटे झालो

२१७

धुवांधार पावसात

तुझे हट्ट वाहून जातात

माझे कोरडे आंगण

तुझी रांगोळी जपून ठेवतात

२१८

शत्रुचीही दाद द्यायला

शत्रू असावा तसा दिलदार

प्रहारातही असते सौंदर्य

असं मानते माझी तलवार

२१९

सूनबाई तू अतिशय सुंदर दिसतेस

मंगळागौरी उजवतांना

सूनबाई तू भयंकर दिसतेस

हुंडयासाठी जळतांना

२२०

ज्यांची निष्ठा अल्पायुषी

ते मनाने बुटके असतात

बुटक्यांच्याही सावली लांब पडते

तेव्हा सूर्यास्त होत असतो

२२१

जीवाचे रान केले,

रानात जीव रमत नाही

जीव रानभर करुन घ्यावा

तर तुझे माझे जमत नाही

२२२

आकाशात तारा निखळतांना पाहून

काय मागायचं तेच विसरुन जातो

माझं असं कां होतं, कळत नाही

मग मीही तिळतिळ तुटू लागतो

२२३

डोळ्यातली आसवं लपवून

ओठांना हसत ठेवायचं

तुझ्यावर प्रेम करुन सुध्दा

तुझ्यापासूनच लपवायचं?

२२४

किती काळ प्रेम करणार?

जशी तळहातावरची रेषा!

मध्येच तो उठून गेला की

कळू लागते रेषेची भाषा

२२५

आल्या पावसाच्या धारा

अंगा झोंबणारा वारा

माझ्या जगण्याचा सहारा

तुझ्या आठवणीचा झरा

२२६

वाहनं विसरलेल्या डबक्यांना

आता प्रवाहाची स्वप्नं पडतात

काळीज कुपीतल्या अत्तराला

आता सुगंधाचे पंख फुटतात

२२७

कोण देऊ शकेल तुला

जिविताचा विश्वास

स्वप्नांचा चक्काचूर करुन

कसा घेतोस श्वास!

२२८

उन्हात उघडयावर रखडणे

फारच असते जीवघेणे

यावर उपाय एकच

झाडांची सावली होणे

२२९

बघ तुला कळते का

रंगाची सुगंधी कहाणी

गंधात उधळलेली माझी

फुलपाखरांची गाणी

२३०

मनातल्या रानात तू

वणवा नकोस पेटवू

माझ्या अश्रूंनी त्याची

तहान कशी भागवू

२३१

माझे प्रेम तुझ्या नजरेत

माझे प्रेम तुझ्या हरण्यात

माझे प्रेम तुला जपण्यात

तुझे जगणे, माझ्या प्रेमात

२३२

महागाईने आणला

जगण्याचा कंटाळा

जीवाची काहिली

जीवनाचा उन्हाळा

२३३

तिचा हात धरुन डोंगर चढलो

तुझ्यामुळे मी आज डोंगर जिंकला

डोंगर नाही आत्मविश्वास

आता तो डोंगरापेक्षा मोठा झाला

२३४

हळूच प्रकाशात जाते

मी तुझीच प्रेमकविता

वाहून चिरंतर होते

ही जीवनदायी सरिता

२३५

सर्वत्र बाजारु फुलांची दलांली

दिसत नाही सुगंधी मोगरा

जिकडे-तिकडे सदाफुली

सदाफुलीचा होत नाही गजरा

२३६

वेळीच नकार देता येत नाही

मग होकाराच्या पुरात वाहून जातात

होकाराची होलपट स्वीकारुन

नकाराचा किनारा शोधत जगतात

२३७

ओंजळीत चाफयाची फुलं घेऊन

फिरणाऱ्या कलंदराला सलाम

पाडयापाडयावर पायघडया घालून

तुझे रसिक झाले गुलाम

२३८

तुमच्या सुखाला पारावार नाही

आमच्या आनंदाला सीमा नाही

अफाट दु:खाच्या छाताडावर

आता विषवृक्षांची छाया नाही

२३९

शस्त्राने जग जिंकता येते

माणूस नाही

शास्त्राने जग जिंकता येते

आणि माणूसही

२४०

मी तुझीच आहे’ तुझीच राहीन

असे तुझे कोवळे आश्वासन

असा कोरडा लळा लाऊन

कठीण केलंस जगणं-मरणं

२४१

डोळे-कान उघडे, तोंड बंद

प्रसन्न ठेवा मन

चुका आणि शिका

तुम्ही दिली शिकवण

२४२

विकाराच्या बाजारातही

मन:शांतीचे मंदिर उभारू

सुखदु:ख सहज स्वीकारू

अन् समर्पणाची कास धरू

२४३

विश्वास, वचन, नाते आणि मन

तुटले तरी आक्रोश करीत नाही

हा मौनपणे दिलेला शाप असतो

उद्ध्वस्त होण्यास आता पर्याय नाही

२४४

संस्काराच्या दुष्काळाने

मानवतेचे कुपोषण होणार

मानवताच मेली तर

माणूस अमानुष होणार

२४५

यशा मागे धावणे म्हणजे

स्वत:ची धरू पाहणे सावली

प्रयत्न करा भरपूर, मग मागे येते

यश, जशी आपली सावली

२४६

आत्मविश्वास

आत्म्याची ज्योत आहे

विश्वासघात

प्रेमाचे थडगे आहे

२४७

एक मार्ग तरी असेल असा

जो तुझ्याकडे मला आणू शकेल

सुंदर मार्गाचे मला आकर्षण नाही

जर तो तुझ्याकडे येणारा नसेल

२४८

ते माझ्या रुपाला हसतात

याचा मला आनंद आहे

मी त्यांच्या हसण्याला कारण झालो

हे मला देवाचे देणे आहे

२४९

कायदे उत्तम, कायदे करणारे उत्तम

कायदे साधे, सरळ, टोकदार असतात

अमलबजावणी करणारे मुद्दाम

कायदे क्लिष्ट आणि बोथट करतात

२५०

प्रार्थना आणि प्रयत्नाने

लाभणारे समाधान

असते यशाची चाहूल

पुरस्काराचे आवतन

२५१

तुमच्या गरिबीचे आम्ही

दु:ख का करायचे?

वाईट वाटते, गरिबी हटवायला

तुम्हीच उदास असल्याचे

२५२

पश्चातापाचा क्षण

निरागसतेची सुरुवात असते

की, निरागसाला पश्चाताप

न होणे स्वाभाविक असते

२५३

विश्वास सरला की,

प्रेम थबकते

जिद्द संपली की,

जीवन थांबते

२५४

किनाऱ्यावरील झाडांना

नदी कधी विसरत नसते

निमित्त पुराचे असले तरी

त्यांना बिलगायची संधी असते

२५५

कदाचित माझ्या आसवांशी

त्याचे काही नाते असते

रखरखत्या उन्हात

जे उमलते फूल असते

२५६

माझ्यामुळे कुणाच्याही डोळ्यात

नाही आली कधी आसवं

माझ्यासाठी तिच्या डोळ्यात

येतात कधी कधी आसवं

२५७

ते भितात चर्चेला

आणि भितभितच चर्चा करतात

भीती त्यांना त्यांच्या पापांची

भित भितच पापं कबूल करतात

२५८

भित्या पाठी ब्रम्हराक्षस

हे त्यालाही ठाऊक आहे

पाप करतांना स्वत:च ब्रम्हराक्षस

तरी आता ब्रम्हराक्षसालाच भित आहे

२५९

भिणे हा त्यांचा स्वभावधर्म

भ्याडपणा त्यांच्या रक्तात आहे

तुम्ही त्यांना खुशाल सांगा

भिऊ नकोस मी पाठीशी आहे

२६०

माझा मित्र माझं खूप डोकं खातो

एक विचारलं तर भलतच सांगतो

तरी मी त्याला कां सहन करतो

प्रत्येक दु:खात, तोच बंदा सोबत असतो

२६१

तुझ्यासारखा मित्र

सुखाचा साक्षीदार

दु:खाचा भागीदार

मैत्रीचा साक्षात्कार

२६२

खरं तर तुझी मैत्री

मधाळ झुळूक वाऱ्यांची

रंगती कुपी पाऱ्यांची

मनोमन जपायची

२६३

आता कमलपत्रांवरचे पाणी निखळत नाही

कोरडया जमिनीलाही भेगा पडत नाही

हा तुझ्या मैत्रीचा चमत्कार आहे मित्रा

अन्य काही इतक्यात घडलेले नाही

२६४

मैत्रीचे दान मागायला, मी ओंजळ पुढे केली

तू दिलेस इंद्रधनुष्यी रंग, पारिजातकाचा वास

वादळवाऱ्यात हे कधीतरी उडून जाईल

पुन्हा-पुन्हा मोहरून यायला, मला तू हवास

२६५

ऊन ऊन झेलत

एक झाड देई सावली

संकटाशी झुंज देत

ती मर्दपणे जगली

२६६

दिवा सोडला नदीत

गेला पाण्याने वाहून

तुळशीचा दिवा बाई

गेला वाऱ्याने विझून

२६७

वृंदावनीच्या निरांजनाने

अंगणी उजळावी भक्ती

अंगणातल्या त्या भक्तीने

मनात उमलावी प्रीती

२६८

तसबीरीवरुन मोरपीस फिरविले

तरी तुला गुदगुल्या होतात म्हणे

आभाळी इंद्रधनुष्य पाहिले

तरी तुझे पंख झेपावतात म्हणे

२६९

तो आणि ती

त्यांचा एकांत

एकाचा अंत

बाकी शांत शांत

२७०

तिची आपली आगळीच तऱ्हा

पावसात बसून रडायची

गढूळलेल्या पाऊस पाण्यात

अश्रू शोधित हिंडायची

२७१

तू अबोल

तुझे शब्द रातभर

तू रानभर

फुलपाखरं गावभर

२७२

तुझ्या प्रेमाला मी नाही पात्र

नसू दे

तुझ्या प्रेमाला इतरही अपात्र

असू दे

२७३

तुझी कागदाची नाव

अवतीभवती माझे मन

बुडतांना प्रवाहात

किनाऱ्यांचे खिन्न मन

२७४

गांधी गेले गोळी झेलून

उरले सगळे संधीसाधू

बुडाखाली सत्तामत्ता

उबवित बसले भ्याडभोंदू

२७५

तुझ्या हुंदकी वणवा

मी आगीची डहाळी

मेघ रुपेरी कडांचे

होते कोणे एके काळी

२७६

तुझे डोळे वादळ पिऊन

मला जवळ ओढणारे

ओठ माझे स्तब्ध अबोल

फुलण्याआधी मिटणारे

२७७

बुद्ध हसला

जग शांत शांत झाले

बुद्धामागे जग पुन्हा

युध्द युध्द झाले

२७८

मशिदीत नाही अल्ला

पाडणाऱ्यांचा उगीच गिल्ला

मंदिरात नाही राम

साऱ्यांची झोप हराम

२७९

तरंगाची लपाछपी

वल्यांचे लपंडाव

मैत्रीत दगाबाजी

सराईत आवडाव

२८०

तरुणपणीचा आपला फोटो

म्हातारपणी पहावा

आपलं वय किती हरवलं

याचा शोध घ्यावा

२८१

उत्खननाच्या अवशेषात

संस्कृतीचा दरवळ

गगनचुंबी इमारतीत

अमानुष वर्दळ

२८२

कुणाचे हे पाप अन्

वासनेची काहिली

प्रेम हरेकांचे

स्वप्न होते सावली

२८३

इथे सर्वांना वाटतो

प्रत्येक जन शहाणा

वेडेपणा लपवण्याचा

बरा असतो बहाणा

२८४

देऊ नको प्रेमात

पाप वासनेला थारा

प्रेम जीवाचा विस्तार

तिथे अदैवताचा वारा

२८५

पाऊलांना शोधत

रस्ते व्याकुळलेले

पाऊले - सप्तपदी चालणारे

पाऊले - मेंदी लावलेले

२८६

पाप आणि प्रेमात

भेसळ करु नकोस

पाप - नसलेला वास

प्रेम - जीवनाचा श्वास

२८७

जंगल कसे हादरुन जाते

वाघाची ऐकून डरकाळी

मोहरलेल्या हिरव्यापानी

कोकीळ पक्षी कुरवाळी

२८८

ज्यांना स्वप्नांचे आकाश

त्यांना नको ती भूपाळी

पक्षी झोपडी शेजारी

रोज गातात सकाळी

२८९

मी झाले देवनवरी

धरतीचा पाट, आकाश अंतरपाट

मी झाले मरण बावरी

माझ्या कपाळी कुंकू लावते पहाट

२९०

रस्ता कुठेच नेत नाही

आपणच चालत असतो

रस्ता चुकला, कसे म्हणता!

आपणच तर हरवत असतो

२९१

ढगाआड चंद्रकोर

तुझा स्पर्श गं लाजरा

अन् अंगणी कोवळे

शांत आठव किनारा

२९२

तू सेवा करु नकोस

तब्येतीनं मरु दे!

शपथ सेवा साथीची

इथे तरी सरु दे!

२९३

आपण करतो ते इष्क

दुसरे करतात ते लफडं

आपण करतो तत्त्वचर्चा

दुसरे करतात आरडाओरड

२९४

तिची हस्तीदंती भेट

वाळवी कुरतडते हळूहळू

मनातले तिचे अस्तित्व

कातळ पांघरते हळूहळू

२९५

केविलवाण्या या जगण्यावर

शतदा रडून घ्यावे

रडता, रडता या जगण्यावर

एकदा थुंकून घ्यावे

२९६

खडकांशी झुंज घ्यायला

लाटा धावत येतात

किनारा गवसला की

लाटा गहिवरुन जातात

२९७

खडकावर आदळतात

म्हणून लाटा फुटत नसतात

किनाऱ्याला बिलगताच

त्या सैर-भर होत असतात

२९८

फुटण्यासाठी जन्म घेणे

हे लाटेचे ललाट असते

उजेडाची लाट आणते

तिचे नाव पहाट असते

२९९

मनावर कर्तव्याचा पोशाख

उतरवायचा नसतो

देहाशीच कर्तव्य असेल तर

पोशाखच नको असतो

३००

मोर पिसांचे पंख लावून

येणाऱ्या संधीची वाट पाहिली

तिच्याकडे जाणारी वाट काटेरी

तिने दिलेले यश मखमली

३०१

ग्रहणाने सूर्य उजळतो

ढगांना हेच भूषण

ग्रहणाला सूर्य घाबरतो

सूर्याला तेच दूषण

३०२

माझ्या डबक्यात प्रतिबिंब

तुझ्या आकाशाचे

तुझ्या आकाशात इंद्रधनु

माझ्या स्वप्न फुलांचे

३०३

निशिगंधाच्या कळीने

उमलतांना लाजू नये

रुसली कळी दिसली

तरी तिला हसू नये

३०४

पारध्याचे पाय वाजताच

ससे झाडीत बसतात लपून

पारध्याने चालावे झपाझप

झुडपाने ससे ठेवावे जपून

३०५

सूर्याच्या सत्काराला

अंधाराने जाऊ नये

शेतकऱ्याच्या स्वप्नात

दुष्काळाने येऊ नये

३०६

मला वाटतो हेवा

मित्रा तुझ्या भाग्याचा

माझ्या सारखा मित्र

तुला मिळावा कायमचा

३०७

कथा सांगणारी आजी

पाहता-पाहता कथा झाली

कथा ऐकता ऐकता

वेल फुलून लता झाली

३०८

मध्यान्हीचा सूर्य

गेला आडोशाला

दिवाभितांची वरात

निघे प्रवासाला

३०९

पैठणीला सुगंध

हरवलेल्या वैभवाचा

सुगंधाचा आठव

हरवलेल्या यौवनाचा

३१०

त्याला दिलेला शब्द

मी प्राणपणाने पाळतो

काम झाल्यावर मात्र तो

मला शिताफिने टाळतो

३११

समाजसेवा करता करता

अंगी मुरला सेवाभाव

बिना मेवा नाही सेवा

संचारला दुजाभाव

३१२

संत श्वासाचे प्रबंध

पंत शब्दाचे महंत

तंत इष्काचे निबंध

आम्हा आपलीच खंत

३१३

पाळेमूळे खोलवर नसतात

त्यांचे झेपावणे खरे नाही

तुझे उन्मळून पडणे

म्हणून नवलाचे वाटत नाही

३१४

चौकाराचा चेंडू

मला फार फार आवडतो

घरंगळला नाही तो

धरतीचे चुंबन घेत असतो

३१५

या देशात त्यांचे स्वप्न

जिकडे-तिकडे कमळ उगवावेत

कमळ चिखलात उगवतात

म्हणून सर्वत्र ते चिखल करताहेत

३१६

मतलबी माणसे कसे

महंतांना देतात शिव्या

संताच्या आसवांचे ठसे

जपून ठेवतात ओव्या

३१७

चंद्राला ग्रहण लागले म्हणून

चांदण्यांनी आसू टाळू नये

ग्रहण मुक्त चंद्रावर

पुन्हा त्यांनी भाळू नये

३१८

मुखवटयांच्या गाठीभेटी

माणुसकी हरवलेली

मरणाच्या वाटाघाटी

आत्मियता करपलेली

३१९

सावलीत बिलगायची

सवय तुझी जुनी

बिलगलेली सावली

अजून माझ्या मनी

३२०

माझे क्षितिज पहा कसे

आकाश पांघरुन उभे राहते

तुझे क्षितीज असे कसे

समुद्र पसरुन पळून जाते

३२१

जुन्या जखमांना जोपासणे

माणसे तपासण्याचा प्रकार असतो

हलकट माणसे जोपासणे

जखमा जमवण्याचा शौक ठरतो

३२२

ज्यांना लागते उचकी

त्यांनाच लागते ठेच

जीवन मार्गातील दगड

आठवण ठेवून वेच

३२३

विश्वासाने मान ठेवावी असे

हरवत आहेत खांदे

मेल्यावर तर मिळू द्या

विश्वासाचे चार खांदे

३२४

तुझ्या कृपेची चुंबळ दे

मग पेलता येईल आकाश

थकणे – भागणे, तडफडणे

तरी एकच तू विश्वास

३२५

पोळणे म्हणजे जळणे नव्हे

ते तिला आता कळते

उसवलेल्या संसारातही

आता ती बरी रमते

३२६

कमी करता येत नाही

तुझ्या डोक्यावरचं ओझं

चुंबळ तरी बनू शकलो

हेच भाग्य माझं

३२७

आकाश पेलताना

तुझा आठव यावा

चांदणं झेलताना

का विसर पडावा?

३२८

आपले अधिकार तपासून घे

नाहीतर महागात पडेल बोल

झेपावण्याआधी अंदाज घे

पाळंमुळं किती खोल

३२९

अहंतेचा रथ माझा

तुझी विदेही चाकोरी

थांग अथांग होतांना

लाटा लहरी नाकारी

३३०

अंधाराचे नक्षत्रांशी

कसे असावे नाते?

सैरभैर पानगळीने

मन माझे झुरते

३३१

ओंजळ रिती असते

त्यांनी अर्ध्य देऊ नये

कपाळी मळवट नाही

तिने वाण घेऊ नये

३३२

एकदा पाऊसधारांना म्हणालो

छत्री घ्या घरी जाताना

तेव्हापासून छत्री उघडली

की पाऊसधारा रुसून जातात

३३३

आकाशात उंच उडतो पतंग

उडवणारा मात्र दिसत नाही

पतंगाला दिशा देतो वारा

उडवणाऱ्याला हे कळत नाही

३३४

आकाशीचे इंद्रधनुष्य

माझ्या मनाची अमृतवेल

आकाशीचे तारकाकुंज

तुझ्या रुपाची श्रुंगारवेल

३३५

फुटण्यासाटी जन्म घेणे

हे लाटेचे ललाट असते

उजेडाची लाट आणते

तिचे नाव पहाट असते

३३६

खडकांशी झुंज द्यायला

लाटा धावत येतात

किनारा गवसला की,

लाटा गहिवरुन जातात

३३७

खडकाला आदळतात

म्हणून लाटा फुटत नसतात

किनाऱ्याला बिलगताच

त्या सैरभैर होत असतात

३३८

आभाळातले आकाश

त्याची सावली काळीनिळी

म्हाताऱ्या फुलपाखराच्या

ओल्या पंखात काजळी

३३९

बोलविता तू तरी

धन्य माझी वैखरी

आसऱ्याचा तू धनी

शब्द माझा श्रीहरी

३४०

आषाढ धारेत

विरघळले ऊन

चंदेरी रुपात

सुखावले मन

३४१

आमराई लेकुरवाळी

हसे डुले डहाळीत

गर्भ रेशमी संध्येची

सांज झाली निळाईत

३४२

आग लागली गावाला

घर सांभाळ म्हणावे

रानभुली पाखरांना

घरटे शोधुनिया द्यावे

३४३

कशी देवाजीने केली

अशी तुझी माझी दैना

गेला जीव गोंधळून

नाही जगायचे पुन्हा

३४४

रिमझिमला पाऊस

इंद्रधनूत रमला

काळया धरतीसंगे

हिरव्या स्वप्नात दंगला

३४५

पाप यंत्र वासनेचे

प्रगटण्यास आतूर

प्रेम तंत्र जीवनाचे

सदा शांत निरंतर

३४६

झाले स्वप्न माझे कान्हा

रात्र राधेची हसली

यमुनेच्या डोहातले

झाले तरंग मुरली

३४७

कुणीतरी सांगितले असेल

फुलामध्ये सुगंध असतो

प्रत्येक पाकळी खुडून खुडून

तो सुगंध शोधत असतो

३४८

गणपतीचे विसर्जन झाले

उंदिराने देव्हारे सजवले

अन् दूध पितांना मांजराने

डोळे मिटणे बंद केले

३४९

अवघी काही वर्ष उरलीत मला

इतके बदनाम व्हायला

या दुनियेला लागतील

शतके मला विसरायला

३५०

सूनबाई तू अतिशय सुंदर दिसतेस

मंगळागौरी उजवताना

सूनबाई तू भयंकर सुंदर दिसतेस

हुंडयासाठी जळताना

३५१

असे काही घडते आणि

ठिणगी होते डोंब

तसेच काही घडते म्हणून

धुसपूस होते बोंब

३५२

जुनी पत्रे चाळतांना

आठवणी हिरवळल्या तुझ्या

मृत्यूपत्रात लिहून ठेवीन

पत्र सरणात रचा माझ्या

३५३

असलेली लक्ष्मणरेषा ओलांडली

सीतेचे हरण झाले

नसलेली लक्ष्मणरेषा सांभाळत

तिचे जिणे हराम झाले

३५४

जमतेस फुंकर

सांगे – ‘जरा बचके’

दु:खाचे श्वापद

तोडी जिवाचे लचके

३५५

जीवनाच्या मूल्यांपुढे

जीवाची किंमत काहीच नाही

मृत्यूच्या मंत्रापुढे

मरणाचे तंत्र काहीच नाही

३५६

वनवासी प्रभू रामचंद्राला

सीतेची तरी सोबत होती

मी बिचारा लक्ष्मण

ऊर्मिला दारातच उभी

३५७

आमच्यातच वाढाल

तर आकाशाला भिडाल

आम्हालाही विसराल

तर वादळात कोसळाल

३५८

नात्यांना जवळून बघायचे नसते

डोंगर दुरुनच साजरे दिसतात

कर्तव्य करुन विसरुन जायचे

आठवणारेच बिचारे दु:खी होतात

३५९

शेतं पिकली

पोरं शिकली

लग्नाच्या बाजारात

दोन्ही विकली

३६०

जे तेरवीत भरपूर जेवले

थोडेसे ते दु:खी होते

माणूस इतका मोठा तरी

३६१

पडू दे प्रकाश तुझ्या चंद्राचा

माझ्या दुधात थोडा तरी

क्षण तो माझा भाग्याचा

तिच माझी कोजागिरी

३६२

खडीसाखरेचे तुझे पाय

तू चालू नकोस पाण्यातून

पाय धुण्यासाठी माग

ताजे अश्रू डोळयांतून

३६३

निसर्गाशी टक्कर द्या

लोटांगण घेत जगू नका

तुम्ही व्हा हो वृक्ष आता

लता वेली राहू नका

३६४

झाडं बिचारी खुळी असतात

आभाळाला पाऊस मागतात

आकाशाचे ऊन झेलत

तोडणाऱ्याला सावली देतात

३६५

कापूर आरती घेतांना

जे हात शेकून घेतात

तीर्थ, प्रसाद घेताना

ते हात काळे असतात

३६६

आता नको गडे पुसू

जुन्या कवितांचे मूळ

नको उकरुन काढू

माझ्या जखमांचे कुळ

३६७

तुमच्या प्रेमापुढे छोटे

कुण्या देवाचे देऊळ

तुमच्या कृपेमुळे फिटे

सारे अजिंठा वेरुळ

३६८

निजवला तान्हा

कसा चोरु पान्हा

चोळी ओली पुन्हा

असा गरिबाचा गुन्हा

३६९

त्याच्या घरचा दिवा विझला

तरी अंधार कळला नाही

उजेडाची गाणी गात

तो काळोख घालवत नाही

३७०

आभाळीचा पाऊस थांबला

तरी राहते पान पान थेंबत

कूस उजवली सुनेची

तरी सासुरवास नाही थांबत

३७१

दु:खाच्या सरी बरसल्या

आता पावसाची सिसारी येते

शिवारात पाऊस पाहिला

तरी जीव ओलेचिंब होते

३७२

धुक्यात हरवली वाट

माझे मन अनवाणी

वाटेत गवसले गाव

माझे मन समाधानी

३७३

नव्या युगाची शक्ती

मला अशी गवसणार आहे

हे विश्वाचे आंगण मला

नाचायला खुणावत आहे

३७४

साधनाच बनते साध्य

येते तेव्हा त्याचीच नशा

झिंग येते साधकाला

साधनेचा होतो सर्वनाश

३७५

नात्यांना जवळून बघायचे नसते

डोंगर दुरुनच साजरे दिसतात

कर्तव्य करून विसरून जायचे

आठवणारेच दु:खी होतात

झाडीबोली चारोळी काव्य

३७६

डोराभर पानी आला

किस्ना धून पान्यामंदी

कस्या वासना पराल्या

गवडनी अंदीमंदी

३७७

सिंड्रीची हाजी हाजी

हेच त्याची कमाई

दावते बायल्या मर्दानकी

अना बायकोलं मनं, ‘बाई’

३७८

वावर-सेत सिकवता सिकवता

त्यायना स्याड्याचीच कास्तकारी केला

सिक्सन मातीचा देना दूर रायला

त्यायना सिक्सनाचीच माती केला

३७९

काजर लावून डोऱ्यालं

आसवा का-या करावा

गेला डोऱ्यामंदी कुसीर तरी

डोरं नाई कुस्करावा

३८०

जिच्या पायालं मयदी

तिना बोंगड्या पायाना चालावा नाई

मयदी रस्त्यालं चकवते

पाय करतेत मस्तीत घाई

३८१

तू माजी सेवा करुस नोको

आपखुसीना मरु दे मालं

मालं आदत पलली तं

मरावाचा पस्तावा काहालं?

३८२

जरावा जे जोतीच्या वानी

फिपुलीवानी जरावा नाई

बाकी, माजा मन्ना असा

का कोनालं जारावा नाई

३८३

बागल्या बायका वावरामंदी

करतेत पातीत रोवना

उपल्ला परा रोवत रोवत

मन्तेत मनमाने गाना

३८४

बुहूस्याक दूर तेती

खूपच रायेल अंदार

चांदा हासलाई जरी

वरक नाई होनार

३८५

रस्ता कोटीच नाई जा

आपूनच जात रायतून

रस्ता चुकला मनतून पर

रस्ता आपूनच चुकतून

३८६

तुजी याद हरदम येते

जारत रायते वक्तलं

तिची राक लाख मोलाची

तेच लावता मी आंगालं

३८७

दुकालं फूक मारुन

पिरवसं हरु हरु

दुकाऊमनाचा जनावर

लोंदा तोडते वगारु

३८८

तिना लक्समन रेस्या वरांडलन

मुहून काना सीता-हरन झाला

नसं जेती लक्समन रेस्या

तेती बाईचा जिना हराम झाला

३८९

तुलं माजा हासा येते

भुल्ल्या भटकल्या जिवा

दोन दल्ल्या दूर दूर

नंदी गेली कोन्या गावा?

३९०

असीच येतेस

असीच जातेस

तू काऊन मालं

सादू समजतेस?

३९१

मी उदार उस्ना मांगा नाई

मुहून माज्यासंगा घरोबा केलास

माजीच बायको नेलास चोरुन

तू किती बरा उपकार केलास?

३९२

ग्यानबाना चालवलन दिवाल

मुहूनस्यानी तो डगर संत झाला

आमी घरादारालं चालवतून बारमास

तेतीच आमचा अंत झाला

३९३

त्याना दूक नाई देलन

का तो झोपला समजावा

येकांदी का दूक दूर झाला

तं समजा, मी गेलू देवाजीच्या गावा

३९४

त्याना दूक देलन

मुहून बोंबाबोंब

त्यानाच सोसावाची हिंमत देलन

मुहून जाऊन झोंब

३९५

उठता बसता हरिनामा मंज्या

पाप खंडावाचा मंतर

सायबाचा करा घरकाम

मंज्या बडती भेटावाचा तंतर

३९६

तिच्या पायात नसत पयरपट्टया

पर चालावाच्या भारी वाजते घुंगरु

त्याच्या बोलन्यामंदी नसं ताल

पर तो बोलते तं वाजते डमरु

३९७

जो हात हिसकते भाकर

तो जनावराचा हात हो

जो हात भुकेल्यालं देते भाकर

तो देवाजीचा हात हो

३९८

पस्तावा केला का आग येते

ते आग मंग राक बनते

समाधानामंदी सूक रायते

सुकामंदी स्यांती भेटते

३९९

जे बदला घेतेत

ते बदलत नाई

जे बदलून टाकतेत

तेच खरं बाहाद्दूर भाई

४००

येवा माहाराज, मनलू

मी येकगन येमालं

घडीभर ठयेर, मनलन

तईपासून त्याना मालं

४०१

वनवासी रामालं

सीतंच तरी सात होती

मी बिचारा लक्सुमन

माजी उर्मिला दरवाज्यामंदीच उबी होती

४०२

संताचा संताप

अभंगाला जलम देते

आमचातुमचा संताप

पोरायलं जलम देते

४०३

येक तोडते

दिसरा जोडते

बिहिकुडा मानोस यालं

जोडजंतर मनते

४०४

संकाना सिपायलं लाटा

समुंदराच्या बाहारा फेकतेत

मुहून संक ना सिपा समुंदराचं

लावारीस पोरा होत, मनतेत

४०५

देव आये देवघरामंदी तवरीक

करुन घेवा भक्ती

कापूर जरत रायला तवरीक

ओवारुन घेवा आरती

४०६

कोनी सल्ला मांगं नाई

गल्ल्यासाठी सारी बोंब

त्याच्या पाप-पुनासाठी

लावत रायतेत लाडीचोंब

४०७

जित्या जिवाचा मोल

जीवनापुढा काई नसं

मरनाच्या मंतरादून

मरावाचा तंतर काई नसं

४०८

तुज्या डो-यामंदी

अबार गाहान

तू माहान

तुजा अबार माहान

४०९

पापाकडून पापाकर

होते पापाची राहाट

पिरम समजला तुज्याकडून

पिरम पुनाची पाहाट

४१०

गाई बयलाचा गोहोन रायते

वागा सिवाचा कोच्चा?

जाई-चमेली मटकते

गजरा गुलाबाचा कोच्चा?

४११

पोवाडा आयकून मर्दाचा

जी, जी मर्दाना मनावा

नामर्दालं जोर आला तं

त्याना हाजी हाजी करावा

४१२

पापाची याद करुन

पिरम वांजला करुस नोको

वांग्यालं ना गोबीलं

येक्या मोलाना मेजूस नोको

४१३

लोडबावलीचा सपन घेऊन

मनातला पाकरु उडून जायेल

हातावरच्या रेस्याईचा

पायता पायता जारा होयेल

४१४

नेत्याच्या मांगं मोर्च्यामंदी

‘मुर्दाबाद’ आमी मनत होतून

वापेस येवाच्या भारी

नेतं होतं मस्त ढोसून

४१५

जिकावाच्या येरा मस्तीत रायना मंज्या

हारावाचा सराप रायते

दिसरा वैरी बान मारते तं

घरचा भेद्या सरप रायते

४१६

पिकासाटी मोर मरते

कस्तुरीसाटी हरनी मरते

दातासाटी हत्ती मरते

पर मानोस काहालं मरते?

४१७

सरप अना मुंगसाची लडाई

गारवडी काई दावं नाई

त्याना ताईत काहाल्लन का

भीड मात्रम तेती राये नाई

४१८

झोका जाते ऊचच ऊच

झुल्यासंगा झुलावाच्या भारी

रस्ता जाते दूरच दूर

तुज्याबिगर फिरावाच्या भारी

४१९

मरन येवाचा आये मुहून

सरन काई जावाचा नाई

सरन रेचलन तरी

रनातुनाल परावाचा नाई

४२०

नकास्याची दिशा बदल्ली का

फिरस्ती रस्ता चुकते

फिरस्ती उपासी निजला तं

दिस्याइलं गाना सुसते

४२१

सूर्याफुलाचा वावर पिकवालं

सोता उजेड होवा लागते

हिरवा अबार पांगरावालं

सोता रानचा पाकरु होवा लागते

४२२

ढोकऱ्यायची मार फुल्ली

अबारामंदी ऊचच ऊच

मन झेलते सावली

उजेडाचा धरुन डूच

४२३

तपन झेलून पानोपानी

झाड सावली देते

सल झेलून मनामंदी

मावली मर्दावानी जगते

४२४

उजेड पाडते आगेटा

सोताचा सोतालं

मेला गेला गाव सुना

मानोस नोहोता सरनालं

४२५

उजेड चोवते जोतीचा

वात दिसते जरती

तेल सरते, तो दिसते

दिवनाल दिसते का तपती?

४२६

देवघरातला दिवा

देवासाठी जरते

तुरसीजवरचा दिवा मात्रम

पुरा आंगन उजरुन टाकते

४२७

जुनी चिट्टी वाचून

याद झाली हिवरी

हरेक माजी चिट्टी होयेल

सरनाची नवरी

४२८

नंदीमंदी दिवा सोल्ला

आता तो बारल

वारा जरी स्यांत रायेल

तरी तेल मात्रम सरल

४२९

कमजोराल हिडीस फिडीस करतेत

तो काई मनं नाई

जो दाकवते वारलाच टेस

त्याच्या कोट्यामंदी गाहान गाई

४३०

जोत जरते, दिवनाल तपते

फुला फुलतेत, पाना झडतेत

उदबत्ती जरते, राक रायते

सरन जरते, का रायते?

४३१

मनातल्या चालन्या

अबारामंदी गेल्या

अबारातल्या चालन्या

जमिनीवर आल्या

४३२

पान्याच्या धारा झेलावासाठी

मी हिरवा कोंब झालू

धुंदवारा झेलावासाठी

तिरसिमनीचा गोदा झालू

४३३

असाच काई घडते

अना तिडका होते डोंब

तसाच काई घडते मुहून

कानकून होते बोंब

४३४

धो-धो पडत्या पान्यामंदी

तुजी टेर वाहून जाते

माजा वारला आंगन

तुजा चऊक झाकून ठेवते

४३५

तुजी किंमत बिलकूल नसं

असा तुलं फालतून वाटते

माज्या बाजूलं येऊन बस

मंज्या माजी किंमत दाहापटीना वाहाडते

४३६

वयऱ्यालई वा, वा मनावालं

तसा दिलदार वयरी पायजे

मरनाराच्याई मुकामंदी रायते राम

मानोस तसा जयरी पायजे

४३७

सून पोरी, तू बाक्की दिसतेस

लगन मांडवात पुंजा करावाच्या भारी

सून पोरी, तू उम्मसच बाक्की दिसतेस

हुंड्यासाठी मरावाच्या भारी

४३८

ज्याचा इस्वाज कम दिसाचा

मनाना तो ठुबरा रायते

पर ठुब-याचीई सावली लंबी पडते

जवा दिवस बुडावालं रायते

४३९

उलूस साल पुरतील मालं

इतला बदलाम होवालं

अना हजार वर्सा लागतील

दुनियेलं हा इसरावालं

४४०

तुज्या डोईवरचा वजा

मालं कमी करता ये नाई

होता माज्या नसिबामंदी

मुहून चुंबर तुजी झालू, बाई

४४१

तुज्या मर्जीची चुंबर दे

मालं अबार पेलावालं

ठकला भागला कोटून आलू तं

तूच येकला इसांब्यालं

४४२

मान ठेवावा इस्वाजाना

दिसं नाई असा खांदा

मेल्यावर तरी देजा

मालं इस्वाजाना खांदा

४४३

त्यायलंच लागते ठेस

ज्यायलं लागते वचकी

गिट्टी यादीना येच

जिनगानीच्या रस्त्यावरची

४४४

जुन्या दुकालं पिरवसना

मंज्या मानसा पारकावाचा धंदा

हलकट मानसाच्या संगतीत रायना

मंज्या दूक देवाचा धंदा

४४५

सावलीलं कवटारावाची

सवक माजी जुनी

सावलीना कसा कवटारलंन

आजूक माज्या मनी?

४४६

मतलबी आसवा कसं

दिसऱ्यालं गारी देतेत?

संताचं आसवा कसं

लुकवून वोव्या ठेवतेत?

४४७

चंद्रालं गिरान लागला मुहूनस्यांनी

आसवा नाई गारावा

गिरान सुटल्यावर मात्रम

अनकीन नाई त्याच्यावर भाडावा

४४८

अबार पेलावाच्या भारी

मालं तुजी याद येते

चालन्या सिपावाच्या भारी

तुजी हेतू काहून भुलते?

४४९

मी तुज्या गुनावर भुल्लू

अना तुज्या अवगुनालंई पेाटी धरलू

बिना कामाच्या बाता खपालन्यात

माजी पुरी जिनगी दवल्लू

४५०

सोताची लायकी पाऊन घे

नाई तं माहागात पडल बोल

वार करावाच्या आंदी अजमावून पाय

तुजं मुरा आयेत किती खोल?

४५१

मीपनाचा वारा मालं

तू तं अवलिया पुरा

भरला हेल झलकं नाई

अर्दा हेल झलकते बरा

४५२

अंदाराचा नक्तरायसिनाल

काहाचा रायते नाता?

पाना झडतेत भरोभरो

अना मी तुज्यासाठी झुरता

४५३

आंजूर रिती रायते ज्याची

त्याना देवालं पानी पाहावा नाई

कपारी मरवट नसं जिच्या

तिना वान घेवा नाई

४५४

ज्याचं मुरा खोल नसत

त्याना आंगालं आनावा नाई

तुजा वाराधुंदीना खाल्या पडना

मुहून मालं नवलाचा वाट नाई

४५५

त्यालं देला सबद

मालं बानी वाटते

काम झाल्यावर मात्रम

तो मालं टालते

४५६

समाजसेवा करता करता

आंगामंदी मुरला सेवाभाव

बिना मेवा कोच्ची सेवा?

जिकडं तिकडं दुजाभाव

४५७

येकगन मी पान्याच्या धारायलं मनलू

घरी जावाच्या भारी घ्या सत्ता

तईपासून मी सत्ता उगल्लू का

पान्याचा बिलकूल नाई राये पत्ता

४५८

मालं वाटते हेटा

संगी, तुज्या नसिबाचा

माज्यावानी संगी

तुलं भेटला हरदमाचा

४५९

माहातन्याचा सूर्या

गेला आता बुडून

घुबडायची वरात

हिटल आता चडून

४६०

सूर्याच्या आदव्यालं

अंदाराना नाई जावा

कास्तकाराच्या सप्नामंदी

अकालाना नाई येवा

४६१

कता सांगता सांगता आजी माजी

आकरी सोता कता झाली

कता आयेकता आयेकता

येल फुलून लता झाली

४६२

पारद्यानं पा वाजलं का

ससं बसतेत लुकून झुडपामंदी

पारद्याना चालावा गदोगदो

झुडपायना ससं ठेवावा गोद्यामंदी

४६३

लोकायवर मी बुहू उपकार केलू

पर चंदनाची चिता भेटावाची नाई

लाज सरम इकून खाल्लू तं

चंदनाची चिता झाल्याबिगर राये नाई

४६४

गिरानाना सूर्या उजरते

तो ढगायलं मोट्टा मान

गिरानालं सूर्या सोता बिहिते

त्याचा तोच तं हो दुस्मान

४६५

मोंग-याच्या करीना

फुलावाच्या भारी नाई लाजावा

रुसली करी दिसली एकांदी

तरी तिलं नाई हासावा

४६६

मोराचं पिका लावून

आवडाव वाट पायलू

तिच्याकर जाती वाटी काट्यायची

तिची मुलाम जीत डोरा भरुन पायलू

४६७

अबारामंदी उडते पतंग ऊचच ऊच

उडंवनार मात्रम दिसं नाई

पतंगालं क्या क्या नेते वारा

उडवना-यालं मात्रम हा समजं नाई

४६८

इकरावासाठी जलम घेना

हे लाटायची मांगनी हो

जई उजेडाची लाट येते

तिचा नाव पाहाट हो

४६९

खडकाच्या संगा झगडावालं

लाट धावत येते

दल्लीवर गेली रे गेली

का मात्रम लाट लडते

४७०

खडकावर आदडते

मुहून लाट फुटं नाई

दल्लीवर आली मंज्या

ते कसी भकरा होते, नाई?

४७१

हिडहिडवान्या जिनगीवर

सेंबर गनी लडून घेवा

लडता लडता या जिनगीवर

येकगन तरी चुकून देवा

४७२

आपून करतून तो पिरम

दिसरं करतेत तो लपडा

आपून करतून त्या गोस्टी

दिसरं करतेत तो कोहोकाडा

४७३

अबारातला अबार

त्याची सावली कारीनिरी

बुडग्या फिफुल्यायच्या

वल्या पिकामंदी काजरी

४७४

जंगल कसा दनानून जाते

वागाची डकार आयकून?

बारेजल्या हिव-या पानामंदी

कसी कोयार गेली दचकून?

४७५

ज्यायले सपन आभाराचा

त्यायलं कहाचा उना?

त्यायच्या खोपरी जवर पाखरा रोज

मंतेत सकारीच गाणा

४७६

पायाइलं तलासत

रस्त लडकुंडीतलं आलं

पा चालतील नवरीचं

पा मेंदी लावलं

४७७

अकाडाच्या धारमदी

इरली तपन

चांदीच्या रुपामंदी

निवला मन

४७८

फोटोवरता तुज्या मोराचा पिक फिरवला

तरी तुलं गुदगुल्या होतेत काना

अबारामंदी सूर्यबान पायला

का तुजं पिका उलसारतेत काना

४७९

दिवा सोल्ला नदीत

गेला पाण्यात निजून

तुरशिचा दिवा बाई

गेला वाऱ्यानं इजून

४८०

बिंद्राबनाच्या टवरीना

आंगणात भक्ती उजरली

आंगणातल्या त्या भक्तीना

मनामदी पीरती उंगवली

४८१

तू मुक्ती

पर तुजा बोल रानभर

तूई रानभर

अना फिपुल्याई गावभर

४८२

आग लागली गावालं

घर संबाल मनावा

भुल्ल्या भटक्या पाकराइलं

गोदा दाकवून देवा

४८३

तुजी कागदाची डोंगी

भोवतालं माजा मन

उब्या धारमंदी बुडून

दोनई दल्ल्या उदासून

४८४

जवानीतला आपला फोटो

बुडपनामंदी इसून पाहावा

अना आपली वया किती दवल्ली

याचा पत्ता लावावा

४८५

येती सप्पच मनतेत,

मीच मोटा स्याहाना

आपला पागलपन लुकवाचा

तोच रायते बाहाना

४८६

पतंग हाती लागली नाई

तं मंज्या लुटावालं पायतेत

मंज्या हाती नाई लागला

तं पतंग फाडावालं पायतेत

४८७

कशी देवानं केलन

माझी तुझी हालत?

गेला जीव इटून

नाही आता बोलत

४८८

झिमूर झिमूर पाणी

सूर्याबानामदी रमला

काऱ्या धरती संगा

हिवऱ्या सपनामदी गमल्ला

४८९

तिची आपली अल्लगच रीत

पडल्या पाण्यामदी बसून लडावाची

अना मंग डवऱ्या पाण्यामंदी

आसवा तलासत हिंडावाची

४९०

त्यायलही करीन रामराम

ते करत हेातं माले मुजरा

लया गेली इमानदारी

भगताच्या मनगटाले गजरा

४९१

अबारातला सूर्याबान

माझ्या मनातला खेल

अबारातल्या चालण्याइचा पुंजा

तुज्या रुपाची येल

४९२

ढगांमंगा चंद्राची कोर

तूजी संगत लाजरी

कोवरी तपन आंगणी

याद येते साजरी

४९३

झाडीचा बोल माजा

तूच मालं देवा

अरताचा तूच राजा

सबदई तूच देवा

४९४

मी झालू नवरी

धरतीचा पिडा, अबाराचा ठाट

मी झालू बावरी

भरल्या दुपारी कुकू लावते पाहाट

४९५

कोनाचा पाप?

कोनाची सावली

पिरम येक्या घडीचा

लडते येक मावली

४९६

जरावा जे जोतीच्या वानी

फिपुलीवानी जरावा नाई

बाकी, माजा मन्ना असा

का कोनालं जारावा नाई

४९७

बागल्या बायका वावरामंदी

करतेत पातीत रोवना

उपल्ला परा रोवत रोवत

मन्तेत मनमाने गाना

४९८

बुहूस्याक दूर तेती

खूपच रायेल अंदार

चांदा हासलाई जरी

वरक नाई होनार

४९९

रस्ता कोटीच नाई जा

आपूनच जात रायतून

रस्ता चुकला मनतून पर

रस्ता आपूनच चुकतून

५००

लग्नानंतर तो म्हणायचा

‘ ताजमहल बनवायचा आहे,

पण सालं आपलं नशीब

मुमताज मरत नाही.’

डॉ. राजन जयस्वाल यांचे समग्र चारोळी काव्य ‘चौरंग’ संपादन-संजय येरणे

संजय येरणे यांचा साहित्यविषयक परिचय

नाव : संजय विस्तारी येरणे.

पत्ता : ‘येणू भिकाजी’ सदन, वार्ड नं. ६, शिवाजी चौक,

मु. पो. तह. नागभीड. जि. चंद्रपूर. पिन ४४१२०५

संपर्क – ९४०४१२१०९८ sanjayyerne100@gmail.com

शिक्षण : एम. ए. (मराठी, समाज, डॉ.आंबेडकर थॉटस्) डी. एड, डी. एस. एम.

जन्म : १९ नोव्हेंबर १९७६

व्यवसाय : प्राथमिक शिक्षक, नागभीड. जि. चंद्रपूर

साहित्यविशेष कार्य:

१) लेखक, कथाकार, कादंबरीकार, कवी, संपादक, प्रकाशक, वक्ता म्हणून परिचित.

२) अनेक वाड्.मयीन नियतकालिकांतून, वृत्तपत्रातून लेख, कथा, कविता, ललित लेखन, स्फुट लेखन प्रसिद्ध.

३) संस्थापक-अध्यक्ष: भरारी साहित्य शिक्षण कला सेवा संस्था.

४) ‘मी संताजी बोलतोय’ व ‘संताजीची सावली यमुना’ या एकपात्री प्रयोगाचे लेखन व आयोजन, सादरीकरण.

५) भरारी साहित्य संघ, ज. तु. साहित्य परिषद चंद्रपूर, अंकुर साहित्य संघ जिल्हासचिव चंद्रपूर, विदर्भ साहित्य संघ शाखा नागभीड, द्वारा साहित्य कार्य व अनेक संस्था व संघटनांचा पदाधिकारी. समाजसेवा, बहुजन चळवळीचे कार्य, साहित्यसंमेलन आयोजन, कवीसंमेलन आयोजन, नवोदितांना साहित्य मार्गदर्शन, शैक्षणिक चळवळ व संघटनात्मक कार्य, अनेक संमेलनात कविता वाचन, कथा सादरीकरण, शैक्षणिक मार्गदर्शन व प्रबोधन.

६) विद्यार्थ्यांकरिता प्रयोगात्मक ‘इंग्रजी रिडींग पॅटर्न’ ची निर्मिती व पुस्तक रूपाने प्रकाशन करून अनेक शाळात इंग्रजी कमी वेळात व कमी श्रमात वाचता येणे याविषयी प्रात्यक्षिक सादर व व्याख्यान मार्गदर्शन करणे.

७) विविध विषयावर व्याख्याता म्हणून सादरीकरण.

पुरस्कार :

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड, विशेष राष्ट्रीय पुरस्कार २०१८, विदर्भ युवा गौरव सन्मान, शिक्षण गौरव सन्मान, कर्मवीर भाऊराव पाटील सन्मान, अंतरंग सन्मान, म. फुले राज्यस्तरीय शिक्षक सन्मान, बौद्धसमाज पंचकमेटी सन्मान, सर्वज्ञ साहित्यरत्न पुरस्कार, विविध साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक संस्थाकडून सन्मानित.

अन्य विशेष पुरस्कार:

१) ‘डफरं’ या कथासंग्रहास स्व. वसंतराव दांदळे स्मृती राज्यस्तरीय मराठी वाड्.मय पुरस्कार २०१५ डॉ. विठ्ठल वाघ यांचे हस्ते साद बहुद्देशीय संस्था, अकोला द्वारा दि. २० डिसेंबर २०१५ ला प्राप्त.

२) ‘डफरं’ कथासंग्रह व ‘सूडाचा प्रवास’ वैचारिक ग्रंथास राज्यपुरस्कार अंकुर साहित्य संघ, महाराष्ट्र द्वारा ५५ वे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन अकोला येथे डॉ. फुला बागूल संमेलनाध्यक्ष यांचे हस्ते प्राप्त. दि. २८ ऑगष्ट २०१६.

३) ‘ना. गो. थुटे यांच्या चारोळी कवितेची समीक्षा’ या समीक्षाग्रंथास तिसरे राज्यस्तरीय रसिकराज मराठी साहित्य संमेलन नागपूर. श्री विश्वास पाटील संमेलनाध्यक्ष यांचे हस्ते पुरस्कार प्राप्त. दि. २० मार्च २०१६.

४) कथास्पर्धेत प्रथम पुरस्कार अंकुर साहित्य संघ गडचिरोली द्वारा दि. १२ मार्च २०१६

५) जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा पुरस्कार २०१४ नक्षत्राचं देणं काव्यमंच पुणे, जिल्हा शाखा चंद्रपूर द्वारा दि.२३ ऑगष्ट २०१४.

६) राजेश्वरजी बोढे स्मृती साहित्य साधना जिल्हा पुरस्कार, राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती चंद्रपूर द्वारा कढोली, पिंपळगाव येथे प्रदान. १० जानेवारी २०१६.

७) विदर्भ तेली समाज महासंघ शाखा नवखळा, येथे दि. ८ डिसेंबर २०१६ ला ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ या कादंबरीचे प्रकाशन तथा शाखा नवखळा वतीने समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. डॉ. क्रिष्णा देव्हारे यांचे वतीने.

८) दि. ११ डिसेंबर २०१६ ला विदर्भ तेली समाज महासंघ शाखा नागभीड, द्वारा समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले. प्रा. रमेश पिसे यांचे हस्ते. तथा येरडेंल तेली समाज ब्रम्हपुरीच्या वतीने दि. १८ डिसेंबर २०१६ ला सन्मान. दि. २५ डिसेंबर ला विदर्भ तेली समाज शाखा, ब्रम्हपुरी द्वारा सन्मान करण्यात आले. तसेच निवाडा साप्ताहिक द्वारा अतिथी संपादक म्हणून प्रशस्तीपत्र तसेच तळोधी (बा). ब्रम्हपुरी, भिसी, नेरी येथे समाजसन्मान प्राप्त.

९) वस्ताद लहूजी साळवे ट्रस्ट गुंधा. जि. बुलढाणा द्वारा ‘डफरं’ या कथासंग्रहास राज्यपुरस्कार दि. २७ नोव्हेंबर २०१६.

१०) दुसरे अभंग साहित्य संमेलन राजुरा द्वारा प्रशस्तीपत्र दि. १८ डिसेंबर २०१६.

११) द. सा. बोरकर स्मृती साहित्य पुरस्कार ‘काव्यफुलाचे अंतरंग’ या समीक्षाग्रंथास २४ वे झाडीबोली साहित्यसंमेलन राका पळसगाव जि. गोंदिया येथे.

१२) ७ वे ग्रामीण मराठी साहित्य व लोककला संमेलन सावरला येथे दि. १ एप्रिल २०१६ ला मराठी वाड्.मय पुरस्कार ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ या कादंबरीला.

१३) मनापासून मनापर्यंत या कथास्पर्धेत राज्यस्तरीय पुरस्कार ‘सेवाव्रती’ या कथेला. ‘डफरं’ कथासंग्रहात समावेशित कथा. दि. २८ मार्च २०१७.

१४) रसिकराज साहित्य सांस्कृतिक संस्था नागपूर द्वारा रसिकराज उत्कृष्ट मराठी वाड्.मय पुरस्कार ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ या कादंबरीस प्राप्त. २९ नोव्हेंबर २०१७.

१५) महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चिमूर द्वारा संताजी मराठी वाड्.मय पुरस्कार ‘संताजी जगनाडे यांची सावली यमुना’ व ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ या कादंबरीस संयुक्त प्राप्त. २१ जानेवारी २०१८.

१६) ‘संताजी जगनाडे महाराजांची सावली यमुना’ व ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ या कादंबरीची संयुक्त नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली असून जगनाडे दांपत्यांच्या जीवनावरील पहिलीच कादंबरी अशी नोंद अर्थात राष्ट्रीय विक्रम कविता सागर साहित्य अकादमी जयसिंगपूर, कोल्हापूर संपादक सुनील दादा पाटील यांच्या महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने घेवून विशेष राष्ट्रीय पुरस्कार २०१८ ला सन्मानित केले आहे. दि. १ मे २०१८.

१७) बलराम शेतकरी बचत गट व हनुमान मंदिर अभ्यास वर्ग नवखळा तह. नागभीड द्वारा संताजी मराठी वाड्.मय पुरस्कार ‘संताजी जगनाडे यांची सावली यमुना’ व ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ या कादंबरीस व साहित्य कार्यास प्रदान करण्यात आला. संयोजक डॉ. श्रीकृष्ण देव्हारे यांच्या वतीने, दि. २४जून २०१८.

१८) संताजी कर्मचारी स्नेहमिलन सोहळा, अहेरी आलापल्ली द्वारा सन्मान. दि. २१ फेब्रुवारी २०२०.

१९) मातृभारती ई पोर्टल संस्थेद्वारा रिडर चॉईस अवार्ड २०१९.

संजय येरणे यांचे प्रकाशित साहित्य

कादंबरी :

१) ‘संताजी जगनाडे एक योद्धा’ भरारी प्रकाशन, नागभीड, डिसे. २०१६.

२) ‘बयरी’ ई-साहित्य प्रकाशन, मुंबई, जाने, २०१७.

३) ‘यमुना’ भरारी प्रकाशन, नागभीड, डिसे. २०१७.

४) ‘वॉरीयर्स’ इंग्रजी ई-आवृत्ती प्रकाशित, डिसे.२०१९

कथासंग्रह :

१) ‘डफरं’ मायबोली प्रकाशन, मुंबई, डिसे. २०१४.

२) कथासंग्रह : ‘डमरू’ ई–साहित्य प्रकाशन, मुंबई, जाने. २०१८.

बालकथासंग्रह :

१) ‘एक आहे अनिकेत’ (मराठी) भरारी प्रकाशन, नागभीड, फेब्रु. २०११.

२) ‘अनिकेत’ (इंग्रजी आवृत्ती तथा ई आवृत्ती.) भरारी प्रकाशन, नागभीड, फेब्रु. २०११.

वैचारिक ग्रंथ :

१) ‘सूडाचा प्रवास’ भरारी प्रकाशन, नागभीड डिसें.२०१४.

२) ‘कथाविचार’ भरारी प्रकाशन, नागभीड, डिसे.२०१८.

शैक्षणिक :

१) ‘संजय येरणे इंग्लिश रिडींग पॅटर्न’ भरारी प्रकाशन, नागभीड जून २०१६.

कवितासंग्रह :

१) ‘काटेरी निवडुंग’ (चारोळी) भरारी प्रकाशन, नागभीड, जाने.२००८.

२) ‘जागल’ भरारी प्रकाशन, नागभीड फेब्रु. २०११.

३) ‘सत्यान्वेषी माणूस’ ई साहित्य प्रकाशन, डिसे. २०२०.

समीक्षाग्रंथ :

१) ‘ना. गो. थुटे यांच्या चारोळी कवितेची समीक्षा’ श्रेयस प्रकाशन, हिंगणघाट, मे २०१५.

२) ‘काव्यफुलांचे अंतरंग’ डॉ. राजन जयस्वाल यांची कविता, भरारी प्रकाशन, नागभीड.सप्टे, २०१५.

३) ‘मधुघट’ मधुकर गराटे यांची कविता, चपराक प्रकाशन, पुणे डिसे. २०२०.

४) ‘चौरंग’ डॉ. राजन जयस्वाल यांची चारोळी व समीक्षा, ई साहित्य, डिसे.२०२०.

काव्यसंपादन :

१) ‘अंगार’- भरारी प्रकाशन, नागभीड, ऑक्टो.२०१२.

२) ‘उधाण’- भरारी प्रकाशन, नागभीड, ऑक्टो.२०१२.

३) ‘आरसा’- भरारी प्रकाशन, नागभीड, एप्रिल.२०१४.

४) ‘घाण्याचे अभंग’- ‘संताजी जगनाडे महाराज’ भरारी प्रकाशन, नागभीड. डिसे.२०१६.

संजय येरणे यांच्या साहित्यावरील समीक्षा

१) ‘सर्वस्पर्शी प्रतिभावंत’ लेखक समीक्षक पुनाराम निकुरे, क्रिस्टल प्रकाशन पुणे व ई-साहित्य पोर्टल, जाने. २०२१.