Goes Shattered ... - 10 - The Last Part in Marathi Fiction Stories by parashuram mali books and stories PDF | दुभंगून जाता जाता... - 10 - अंतिम भाग

Featured Books
Categories
Share

दुभंगून जाता जाता... - 10 - अंतिम भाग

10

आजवर घडलेल्या घटना – प्रसंगांनी मी मजबूत झालो होतो. मी जिद्द सोडली नव्हती. मला पुन्हा संघर्षाला सज्ज व्हायचं होतं. मी डॉ. केसरकर सर आणि सुलभा ताईंचा निरोप घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो.

डॉ. केसरकर सरांना आणि सुलभाताईंना मी नमस्कार केला. आणि म्हणालो...

आजवर आपण मला सांभाळलं आई – वडिलांचं प्रेम दिलं. आपण मला खूप मदत केली. आपले उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. मी कायमच आपल्या ऋणात राहीन.

यावर केसरकर सर म्हणाले...

एका बाजूला तुम्ही आम्हांला आई – वडील मानत असताना, कोणत्या ऋणाची आणि उपकाराची भाषा बोलताय...?

तुम्ही कुठंही जाणार नाही. तुमच्या राहण्या – जेवणाची सोय आम्ही आमच्या विद्यार्थी वसतीगृहात करत आहोत. तुमची दुसरीकडे जोपर्यंत काही व्यवस्था होत नाही तोपर्यंत तुम्ही इथं राहू शकता.

माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी केसरकर सरांचे आणि सुलभा ताईंचे आभार मानले.

वसतीगृहातील मुलांचा काळजीवाहक म्हणून मी सेवा बजावू लागलो. एकदा असेच पुस्तक वाचत बसलो असताना केसरकर सरांनी मला त्यांच्या ऑफीसमध्ये भेटायला येण्याचा निरोप दिला. मी ताबडतोब सरांना भेटायला गेलो. सर मला म्हणाले...

सर, तुम्ही सेट, नेट, पी.एच.डी. आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास का करत नाही...? यावर मी फक्त मान हलवली... त्यावर केसरकर सर पुन्हा मला म्हणाले...

आपलं कोकणातलं निसर्गरम्य वातावरण आणि हा परिसर तुम्हांला अभ्यासाला योग्य आहे. या मिळालेल्या वेळेचा आणि चांगल्या वातावरणाचा फायदा घ्या. हवी तर आम्ही तुम्हांला आणखी मदत करू. आणखी काही मदत लागत असल्यास जरूर सांगा. पण हे थोडंस मनावर घ्या.

यावर मी म्हणालो... हो सर मी नक्की मनावर घेईन.

खरं तर हे सर्व मी अगोदरच मनावर घेऊन करायला हवं होतं. अजूनही वेळ गेलेली नव्हती. मी सेट,नेट चा मन लावून अभ्यास करू लागलो. एकसारखी वर्षभर मी मेहनत घेतली आणि पहील्याचं प्रयत्नात मी नेट झालो. माझ्यापेक्षा केसरकर सरांचा आणि सुलभा ताईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. महीन्याभरातच पुण्याच्या टिळक महाविद्यालयातून मुलाखतीसाठीचे पत्र आले. मुलाखत यशस्वी झाली आणि मी मराठी विषयाचा प्राध्यापक या पदावर रुजू झालो.

मी प्रोफेसर व्हावं हे आजोबांचं स्वप्न होतं. ते आज पूर्ण झालं होतं पण दुर्देवाने हे सगळं पहायला आज ते या जगात नव्हते. आजवरचा सगळा संघर्ष डोळ्यासमोर दिसत होता. यावेळी मी खूप भावूक झालो होतो. मला उभं करणाऱ्या माझ्या पंखांना बळ देणाऱ्या प्रत्येकाची आठवण येत होती. आता कोकण सोडावे लागणार होते. माझं नियुक्ती पत्र घेऊन मी पुण्यातून रत्नागिरीत आलो. रत्नागिरीत जाताच केसरकर सरांनी आणि सुलभा ताईंनी मला जवळ घेतलं. सर्वांचेच डोळे पाणावलेले होते. तुला डॉ. झालेलं म्हणजेच तुझी पी.एच.डी. झालेली मला पहायचं आहे. हे माझं स्वप्न आहे असे केसरकर सर मला म्हणाले. मी पी.एड. पूर्ण करण्याचा शब्द सरांना दिला. त्या दिवशी एक रात्र थांबून माझं सर्व सामान, कपडे बଁगेत भरले. सगळी आवराआवर झाल्यावर सर्वांच्या भेटीगाठी घेतल्या. आणि भल्या पहाटे जड अंत:करणाने मी सर्वांचा निरोप घेतला.

आता मला पी.एच.डी. करण्याचे वेध लागले होते. सरांचे स्वप्न मला पूर्ण करायचे होते. आता माझ्यापुढे भरारी घेण्यासाठी मोकळं, खुलं आकाश होतं. आता नोकरीतून चार पैसे मिळत होते. पुण्यामध्ये १ बी.एच.के. घर भाड्यानं घेतले. डॉ. दिक्षीत सर आणि डॉ. शुभांगी शास्त्री मଁडमांनी माझ्या लग्नासाठी एक स्थळ आणलं. पहील्या भेटीतच मुलगी आवडली. लग्न साधेपणानेच पार पडलं असलं तरी आजवरच्या माझ्या खडतर प्रवासाचे साक्षीदार आणि साथीदार माझ्या लग्नाला आवर्जून उपस्थित होते. याचा मला मनस्वी आनंद वाटला. संसार सुरु झाला. पी.एच.डी. साठीची प्रवेश परीक्षा दिली. प्रवेश परीक्षा पास झालो आणि पी.एच.डी. चा मार्ग मोकळा झाला. या सगळ्या गोष्टी करत असताना माझ्या बालसंकुल, बालगृह, बालसुधारगृह, महीला सुधारगृह यांच्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ मला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याचंदरम्यानच्या काळात माझी राज्याच्या समाजकल्याण विभागांतर्गत बालगृह सुधारक समितीवर निवड झाली.

या निवडीने या मुलं-मुली, महिलांसाठी काम करण्यासाठी एक दिशा मिळाली. वेगवेगळ्या राज्यातील बालगृहांमधील समस्या, प्रश्न जाणून घेण्याच्या अनुषंगाने आमची त्री-स्तरीय समिती स्थापन करण्यात आली. वेगवेगळ्या राज्यांतील बालगृहातील मुला – मुलींच्या समस्या जाणून घेताना, या मुला-मुलींच्या अनेक समस्या प्रकर्षाने दिसून आल्या. ज्या मी बालगृहात राहत असताना अनुभवल्या होत्या. त्या समस्या इतक्या वर्षानंतरही तशाच होत्या. एका बाजूला कॉलेजमधील अद्यापन सुरु असताना दुसऱ्या बाजूला पी.एच.डी. पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली होती. आता लग्नाला चार वर्षे झाली होती. या काळांमध्ये दोन मुलांचा बाप म्हणून मिरवू लागलो. मुलगा अविनाश आणि मुलगी आसावरी माझ्या आयुष्यात आले. घराचं गोकुळ झालं आणि आनंदाला पारावार उरला नाही. आज आई-बाबा असते तर किती बरं झालं असतं असं सातत्याने वाटत रहायचं कारण माझी मुलं आजी – आजोबांच्या मायेला आणि प्रेमाला पोरकी झाली होती. त्यांना आजीच्या गोष्टी ऐकायला मिळणार नव्हत्या तर आजोबांचा घोडा करून घरभर फिरायला मिळणार नव्हतं.

एकदाची माझी पी.एच.डी. पूर्ण झाली. त्याचंवर्षी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी राज्यसरकारकडून माझी नियुक्ती झाली. या दरम्यानच्या काळात माझं कार्य अधिक जोमाने सुरु झाले. ज्या बालसंकुलमध्ये मी लहानाचा मोठा झालो होतो.त्या बालसंकुलच्या कार्यकारणीवर माझी नियुक्ती झाली. राज्याचा बालगृह, मध्यवर्ती कारागृह, महीला सुधारगृहांचा शासकीय प्रतिनिधी म्हणून माझी नियुक्ती झाली. ही सर्व मानाची पदे पदरात पडत असताना. महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील बालगृह, सुधारगृह, महीला सुधारगृह, महीला बालगृह, मध्यवर्ती कारागृहे यांचा कायापालट करण्याची संधी मला मिळाली. याचा मला मनस्वी आनंद आहे.

याचाच एक भाग म्हणून,अनेक मान सन्मान, पुरस्कारांचा मी मानकरी ठरलो. पण या सगळ्या मान – सन्मान आणि पुरस्कारांपेक्षा वंचितांच्या गालावर मी हास्य फुलवू शकलो. याचा मला जास्त आनंद वाटत होता. पडद्यामागे राहून काम करण्यात मला धन्यता वाटत होती. या सगळ्या कार्याची दखल घेऊन नंतरच्या काळात केंद्र सरकारने बालगृह, सुधारगृह, महीला सुधारगृह, महीला बालगृह, मध्यवर्ती कारागृहे यांचा अभ्यास करण्यासाठी विविध देशांमध्ये नियोजित दौरा आखण्यात आला. या दौऱ्यामध्ये माझी नियुक्ती करण्यात आली. अमेरिका, इटली, जर्मनी, फ्रांस, रशिया, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इंग्लंड या देशामध्ये जाऊन भारतातील बालगृह, सुधारगृहांची परिस्थिती आणि इतर देशातील स्थिती यांचा अभ्यास करता आला. विविध देशातील विविध कल्पना आपल्या देशांमध्ये आणण्यात आणि त्या अंमलात आणण्यात काही प्रमाणात यश मिळाल्याचे मला समाधान आहे.

आता भाड्याच्या घरातून नवीन स्वतःच्या घरात आलो आहे. प्राचार्य पदावरही रुजू झालो आहे. अविनाशने नुकतेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. तर आसावरी फଁशन डिझाईनमध्ये आपले नशीब आजमावत आहे. दोघेही आपल्या क्षेत्रात यशस्वी होत असताना अविनाशने आपली सोयरिक त्याच्याबरोबरच वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या प्रज्ञाशी जुळविलेली आहे. दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकतील. माझी पत्नी आरती आता सासूच्या आणि मी सासऱ्याच्या भूमिकेत प्रवेश करत असताना आरतीला आजी होण्याची खूपच घाई झाली आहे. आता पुन्हा एकदा भूतकाळामध्ये डोकावून पाहताना मी अस्वस्थ होतो. त्या सर्वांना आठवतो ज्यांनी मला उभं केलं. नुसतेच उभे केलं नाही तर परिस्थितीशी लढण्या - झगडण्यासाठी सज्ज केलं.

नुकतेच पुण्यामध्ये गरीब, वंचित मुलां-मुलींच्या निवासासाठीच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी एकत्र येऊन ही वास्तू उभारण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. आता अशीच वसतिगृहे महाराष्ट्रभर उभी करायची आहेत. समाजाच्या पुढाकाराने. फक्त गरज आहे सढळ हातांची आणि समाजातील प्रत्येक घटकाची.

ही संकल्पना महाराष्ट्रापुरतीच मर्यादित न ठेवता देशाच्या अनेक राज्यांमध्ये मला राबवायची आहे. कारण आज या नव्या पिढीला, वंचित घटकाला उच्च शिक्षण घेण्यासाठी खरी गरज आहे ती राहण्या-जेवणाची सोय असलेल्या वसतीगृहांची. वंचितांच्या न्याय – हक्कासाठी लढत असताना अनेक संकल्पना, कल्पना मनात रुंजी घालत आहेत. अजून खूप काही करायचं बाकी आहे.

नवजात बालके, मुली, महिला, पाय घसरलेल्या महिला, अनौरस बालके, निराधार मुली, महिला, विधवा महिला, परितक्त्या यांच्यासाठी सावली आणि आधार ही दोन केंद्रे स्थापन करण्यात आली असून, या दोन वास्तूही लवकरच पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर आहेत. नजीकच्या काळात ही संकल्पना सर्वव्यापी देशभर घेऊन जाण्याचा संकल्प आहे. या दृष्टीने त्यांच्या भविष्याचा पाया भक्कम करण्याचा आणि या उपेक्षित घटकाला स्वाभिमानाने जगता यावे यासाठीचा हा प्रयत्न...

सगळं काही संपलेलं असताना जागवतो आणि जगवतो तो चांगुलपणा. चांगुलपणावरचा विश्वास अजूनही दृढ आहे...

उद्याचा सूर्य उगवेल फक्त आमच्यासाठी

दिशा उजळून टाकण्यासाठी

उज्वल भवितव्याचं बीज पेरण्यासाठी

-------------------------------