Suvarnamati - 4 in Marathi Fiction Stories by Mrs. Mrinmayee Shirgaonkar books and stories PDF | सुवर्णमती - 4

Featured Books
  • क्या लड़की होना गुनाह है

    आज की कहानी उन सभी लड़कियों के लिए जो अपने परिवार के बीच होत...

  • Black Queen ( A Mysterious Girl )

    Rathore's club ( काल्पनिक नाम )यह एक बहुत बड़ा क्लब था ज...

  • Revenge Love - Part 1

    जय द्वारिकाधिश..जय श्री कृष्ण.. जय भोलेनाथ...... ॐ नमः शिवाय...

  • My Devil Hubby Rebirth Love - 48

    अब आगे थोड़ी देर बाद डॉक्टर का केबिनरूही और रुद्रा डॉक्टर के...

  • जिंदगी

    खुद के एहसासों को कुछ इस तरह बिखेरना चाहती हूमैं रहूं तुझमें...

Categories
Share

सुवर्णमती - 4

4

खाशा स्वाऱ्या वेशीनजीक येऊन पोहोचल्या आहेत आणि लवकरच महालापर्यंत पोहोचतील अशी दिवाणजींची वर्दी घेऊन खास दूत पोहोचला आणि एकच गडबड उडाली. महालातील सर्व दीप प्रज्वलित करून, झुंबरे वर चढवली गेली. वादक, गायक, आपापल्या नियोजित जागी स्थानापन्न झाले. दशसुवासिनी औक्षणासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ सज्ज झाल्या. मुख्य प्रवेश द्वारापासून महालापर्यंत पसरलेल्या पायघड्यांच्या बाजूने उभारलेल्या उंचवट्यांवर, सेविका, सुगंधित पुष्पांची, गुलाबजलांची पात्रे घेऊन, खाशा पाहुण्यांवर हलकेच वृष्टी करण्यासाठी जय्यत तयारीत उभ्या राहिल्या. फळे, पेय, मिष्टपदार्थांची तबके, श्वेत जाळीदार वस्त्रांनी झाकून तयार ठेवण्यात आली. विलायती पद्धतीप्रमाणे चहापानाचीही व्यवस्था चोख ठेवण्यात आली. खुद्द राजे आणि राणीसरकार मुख्य दरवाजाजवळच्या दालनात स्वागतासाठी जाऊन थांबले.

सुवर्णमतीसदेखील सेविका सांगावा घेऊन गेली. तिच्या जमलेल्या सख्यांमधे एकच उत्साहाची लाट पसरली. त्या सुवर्णमतीस अदबीनेच का होईना, पण छेडू लागल्या. सुवर्णमतीच्या मंद स्मितहास्यामागे तिच्या मनात नक्की काय चालले आहे याची जराही कल्पना तिच्या सख्यांना येणे शक्य नव्हते! त्यांची ती कुवतही नव्हती.

आतून ती स्तब्ध होती. कोणताही महत्वाचा क्षण हा तिच्यासाठी एक प्रकारचे ध्यान असे. मग आंतरिक स्तब्धतेत तिने ठरवलेल्या मार्गानेच घटना घडत जाताना पाहणे, ही पराकोटीची आनंददायी गोष्ट असायची तिच्यासाठी.

आजही तसेच घडणार याविषयी तिच्या मनात तिळमात्र शंका नव्हती. हा क्षण तिच्यासाठी फार फार शांततेचा, स्तब्धतेचा होता.

खाशा स्वाऱ्या विलायती मोटरगाड्यातून पधारल्या. दिवाणजींनी स्वत: पुढे होऊन राजे शेषनाग आणि राणीसाहेबांच्या गाडीचे दरवाजे उघडले. दुसरी गाडी स्वत: चंद्रनागच चालवित आले होते. सेवकांनी पुढे होऊन दरवाजा उघडेपर्यंत, चंद्रनाग बाहेर पडलेदेखील. पाठोपाठ सूर्यनागही उतरले. चौघेही पायउतार झाले. राजे स्वत: स्वागतास पुढे सरसावले. पाठोपाठ राणीसरकार होत्याच. जमलेल्या प्रजाजनांनी दोन्ही राजांच्या जयजयकारास सुरुवात केली. सैनिकांनी बंदुकीचे बार काढून सलामी दिली आणि हत्तीनी माहुतांच्या हुकुमाबरोबर सोंडा वर उचलून चित्कारासह सलामी दिली. घोडेस्वारांनी चुचकारताच घोड्यांनीही जागच्या जागी दुडक्या चालीची करामत करत सलामी दिली. खाशा स्वाऱ्या या खेळाने मनापासून प्रसन्न झाल्या.

दोन्ही राजांनी आणि राण्यांनी एकमेकांना आलिंगन दिले. राजकुवरांनी अदबीने वाकून आदर दर्शविला तेव्हा सुरजप्रतापांनी प्रसन्नपणे दोघांनाही एकदमच आलिंगन दिले. सर्व मुख्य प्रवेशद्वाराकडे निघाले. चंद्रनाग दुरूनही उठून दिसत होता.

चंद्रनागास आपल्या मर्दानी सौंदर्याची पुरेपूर जाण आणि अभिमान होता. तो त्याच्या चालीतूनही स्पष्ट दिसत होता. सूर्यनागास या असल्या बाह्यदर्शी बाबतीत कधी रसच नव्हता आणि त्याकडे लक्ष देण्यास वेळही. तो अत्यंत सहजगतीने चालत, राजमहालाचे, आसपासच्या परिसराचे निरीक्षण करत होता. सूर्यनाग, मुद्दामच, चंद्रनागाच्या काही पावले मागे चालत होता. त्याने ठरविलेला निर्णय घडवून आणणे अत्यंत महत्वाचे होते आणि तो हा खेळ व्यवस्थितच रचवणार होता.

प्रजेचा जयजयकार सुरूच होता. पायघड्यांवरून स्वाऱ्या निघाल्या तसे वादकांनी मंजुळ वाद्ये वाजवण्यास सुरवात केली. गायकांनी मंद स्वरात आलाप आळवायला सुरवात केली. वरून गुलाबजल आणि पुष्पवृष्टी सुरूच राहिली. मंडळी खास महालात पोहोचली. सुवर्णमती आधीच जवळच्या दालनात येऊन थांबली होती. तिच्या सख्या क्षणाक्षणाचा वृतांत तिला येऊन सांगत होत्या. त्यांच्या बोलण्यात सतत देखण्या राजकुंवराचा विषय येत होता. त्याचे गौरवर्णीय देखणे रूप, अत्यन्त दिमाखदार चाल, याचीच वर्णने त्या राजकुंवारीला सांगत होत्या. तिने गवाक्षातून पाहिले तेव्हा तिची नजर मात्र तीक्ष्ण नजरेने सर्व गोष्टींचे निरीक्षण करणाऱ्या सूर्यनागावर स्थिरावली. त्याची योद्ध्यासारखी शरीरयष्टी, सतत सावध पवित्रा, तिच्य नजरेत ठसला.

मंडळी पोहोचल्याबरोबर, सेवक, सेविकांनी चौघांसमोर पाय धुण्यासाठी चौरंग मांडले. पायातील भरजरी जोडे काढण्यासाठी हळूवारपणे पाय उचलून चौरंगी ठेवले. जोडे बाजूला घेऊन छोटे घंगाळ चौरंगी मांडण्यात आले. सेवक, सेविका गरम सुगंधी पाण्याने तळपायांस हळूवार मर्दन करू लागले. मग घंगाळी उचलून पायांखाली चौरंगावर मखमल पसरून तळपाय कोरडे करण्यात आले. हळूवारपणे मखमली जोड्यात तळपाय सरकवून सेवक सेविका तिथून सामान उचलून बाहेर निघाले. याचवेळेस दुसरे सेवक सेविका हस्तप्रक्षालनासाठी दुसऱ्या बाजूस सज्ज होतेच. हस्तप्रक्षालन झाल्यावर सुवर्णमतीस निरोप गेला. ती अधोवदना हलकेच कक्षात दाखल झाली.