मी मानसीला पुन्हा घेऊन आलो, ईशांत हेडफोन्स लावून काही तरी पाहत होता. नेहमीसारखं मी त्याला झाकले आणि मग मानसीला आत घेतले. मानसी जास्तच दमलेली दिसत होती,
मी तिला विचारलं “खूप जास्त दमली का आज तू ?”
ती “आज खूप जास्त फिरलो ना म्हणून थकवा जाणवतो आहे आणि रात्री पण पूर्ण झोप झाली नाही. आज झोपेल मी पूर्ण नाहीतर लगेच तब्येत बिघडेल.”
मी तिच्या हातात टॉवेल देत, “ठीक आहे, झोप पण आधी फ्रेश हो, आणि तू जेवण केलं का ?”
ती “हो, बाहेर फिरत असताना खूप काही चरत होते”
त्यानंतर ती फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेली, मी पण कपडे बदलण्यासाठी कपाटातून नाईट ड्रेस काढला. तो बेड वर ठेऊन कपडे बदलणार तोच मानसी ने आवाज दिला. मी बाथरूम च्या बाहेर उभा राहून “काही हवंय का ?”
ती “अरे तुझ्याबरोबर बोलण्यात मी कपडे नाही घेतले, तू देतोस का? माझ्या बॅग मध्ये आहेत.”
मी “ठीक आहे कुठला देऊ ?”
ती “त्यात एकच आहे”
मी “ठीक आहे”
तिच्या बॅग मध्ये तिने म्हटल्याप्रमाणे एकच ड्रेस होता, मी तो घेतला पण काढत असताना काही तरी त्यातून पडलं. ड्रेस देण्यासाठी मी बाथरूमला गेलो, कारण ते मला जास्त महत्वाचं वाटलं. मी ड्रेस देऊन पुन्हा रूममध्ये आलो, काय पडलं ते शोधायला लागलो तर खाली एक पेन पडला. तो पेन मी उचलला, काहीतरी ओळखीचं होत त्या पेन मध्ये, त्याच विचारात मी तो पेन पुन्हा बॅगेत ठेवला आणि कपडे बदलण्यासाठी म्हणून शर्ट काढला. मी आरश्यात पाहत होतो, तितक्यात मानसी तोंड पुसत आत आली. मला त्या अवस्थेत बघून ती दचकली, पण ती मागे फिरली.
ती “सॉरी सॉरी माझं लक्ष नव्हतं, मी दरवाजा वाजून आत यायला हवं होत.”
तीच सॉरी संपायच्या आधी मी टी शर्ट घातला होता.
मी “झाले कपडे घालून ये आत”
त्या वेळेस मला ते थोड फिल्मी वाटलं होत, पण सिनेमात हिरोईन माझ्या जागी असते आणि मानसी च्या जागी हिरो.
मानसी आत आली होती, ती पुन्हा एकदा सॉरी म्हणाली. पण मी पण माझी चूक मान्य केली की ती परत आल्यावर मी बाथरूम मध्ये जाऊन पण कपडे बदलू शकत होतो. त्या घटनेनंतर रूम मध्ये नंतर आम्ही दोघेही थोडे ऑकवर्ड झाले होतो. पुढचा अर्धा ते एक तास मी एका बेड वर आणि ती दुसऱ्या बेड वर पडून, फोन मध्ये बिझी झालो होतो. मात्र दोघंही काहीच महत्वाचं करत नव्हतो, त्या घटनेने दोघं शांत झालो होतो. मी शांततेचा भंग करत तिला बोललो, “तू झोप इथे मी जातो बाहेर झोपायला”
ती “का झोप की इथेच, काय होत. तू काही पहिल्यांदा मुलींबरोबर रूम शेअर करतो आहे का?”
आधीपेक्षा आता दोघं अजुन जास्त ऑकवर्ड झालो होतो. तिने पटकन काही शब्द आतल्या आता गिळले.
मी तिने बोललेल काहीच ऐकलं नाही असा आव आणून बाहेर पडत होतो. तितक्यात तिने मागून आवाज दिला, “श्रेयस, मला झोप येत नाही. आली की मग तू जा, तो पर्यंत बस”
मी मागे वळून ,”पण तुला तर झोप येत होती ना ?”
ती, “नाही आता गेली”
मी पुन्हा बेड वर जाऊन बसलो, तो पर्यंत तिने तिचा फोन ठेऊन दिला होता. आता ती माझ्या बेड वर येऊन बसली होती. ती डोकं करतो त्या बाजूने हातात उशी घेऊन बसली आणि मी पाय ठेवतात त्या बाजूने बसलो.
ती, “तू मला विचारतो पण तू जेवला का ?”
मी, “नाही, संध्याकाळी उशिरा नाष्टा केला, भूक नाही आता.”
ती, “तुला प्रश्न विचारू एक?”
वातावरण आता निवळत चाललं होत. तिने पुढाकार घेत , चर्चा सुरू केली.
मी, “विचार ना ?”
ती, “तुझ्या पाठीवर जे वळ आहेत, ते खरंच नखांचे आहेत का ?”
मी, “आता त्याने काय सिद्ध होणार आहे ?”
ती, “मला काही घेण देण नाही की खरंच जे मी ऐकलं ते खर आहे की खोटं पण तुझ्या खांद्यावर जी जखम आहे ती माझ्यामुळे झाली आहे. फक्त त्या जखमेसाठी तू चुकला नसणार तर मला माफी मागायची होती.”
मी, “तुला माफी मागायची काही एक गरज नाही, जे काही घडलं ते खूप घाईत घडलं”
ती, “मला माहिती नाही कोण बरोबर कोण चूक पण तुझ्या पाठीवर चे ओरखडे आणि खांद्यावरच्या दागाकडे पाहून भूतकाळ आठवला म्हणून बोलले मी”
माझ्या डोळ्यात तेव्हा नकळत पाणी येत होते. मी डोळे पुसायला लागलो होतो,
ती, “ये वेडा आहेस का तु, रडतो काय असा, तू नाही काही चूक केली तर रडतो का.?”
ती इतके बोलून पुढे आली. आता तिच्या आणि माझ्यात एक मीटर पेक्षा कमी अंतर होत. ती माझे डोळे पुसत होती. तिचे ओले झालेले हात पुन्हा तिच्या टॉप ला पुसत होती. काय नशीब आहे माझ्या असवांच, जी जागा मला नाही मिळवता आली ती जागा त्यांनी नकळत मिळवली होती.
ती माझ्या जवळ आली, मी तिच्या जवळ गेलो. आता अंतर काही मिलिमीटर च उरलं होत. जे नको घडायला तेच घडत होत.
माया, “काय झालं, मला का बोलावलं ?”
तिने आत्ता पर्यंत माझ्याकडे पाहिलं नव्हतं, ती मानसी कडे बघून बोलत होती. मानसी माझ्याकडे बघत होती, ते पाहून मायाच्या प्रश्नार्थक चेहऱ्यावर हसू उमटले.
माया, “गोलू, तू आहे इथे असं बोलला असता तर तुझ्यासाठी मी चॉकलेट घेऊन येणार होते, ते आणले नसते का ?”
मानसी, “त्याला कुठे चॉकलेट आवडतात, मुळात त्याला गोडच आवडत नाही”
मी, “हो, मी जास्त गोड खातच नाही.”
माया, “कसला गम्मत करतो गोलू”
मानसी, “गोलू ??”
माया, “हो, श्रेयस ल लहान असताना गोलू म्हणायचे”
मानसी माझ्याकडे रागाने पाहून, “अच्छा गोलू ?”
मी, “अरे, पण तुला कोण बोललं हे, मला लहान असताना बोलायचे, आणि इथे कुणाला नाही माहिती गोलू नावाचं तुला कोण बोललं.”
माया, “तूच सांगितले होते.”
मी, “नाही, शक्यच नाही”
माया, “अरे, हो रे माझ्या राजा, मानसी समोर नाही आवडत का तुला ठीक आहे नाही बोलणार , पण तू मला कुठेही माऊ म्हणू शकतो मला नाही वाईट वाटणार.”
मानसी मोठ्याने, “बस, बस झाल गोलू, माऊ पुराण.”
मायाकडे बघून,”तुला माहिती आहे ना, मला श्रेयस आवडतो आणि श्रेयस ला मी, तू का त्याच्या जवळ जवळ जाते आहे.”
माया, “पण त्याला कुठे तू आवडते”
माया माझ्याकडे पाहून, “तूच तर बोलला होता मागे मी रात्री २ ला कॉल केला तेव्हा की तुला मानसी नाही आवडत, मी आवडते ते, म्हणून तर आपण दोघं रिलेशशिपमध्ये आहोत ना.?”
मी, “हे कधी घडलं ?”
मानसी, “हे बघ माया, तुला आवडत असेल तो तर तसे सांग, श्रेयस आहे तसा तो आवडू शकतो कुणालाही, पण त्याला तू आवडते हे मला मान्य नाही.”
मी, “मला तू आवडतच नाही तर रिलेशन मध्ये असण्याचा प्रश्न च येत नाही. काय बोलते आहे अशी तू ?”
माया, “तू का खोटा बोलतो आहे, तुला आमच्या दोघांचा यूज करायचा आहे का ?”
मानसी, “तुझ्याकडे काय पुरावा आहे, तो तुझ्याबरोबर रिलेशन मध्ये आहे त्याचा.”
माया माझ्याकडे पाहून, “मला वाटलं नव्हतं की आपल्या खाजगी आठवणी तू मला पुरावे म्हणून दाखवायला भाग पाडणार”
असे बोलून माया ने तिचा फोन मानसी कडे दिला, मानसी च्या चेहऱ्यावरचा राग कमी होत होता. नंतरच्या काही सेकंदात तिच्या डोळ्यात पाणी आले. मी विचारलं, “काय झालं ?”
मानसी ने तिच्या हातातला फोन मला दाखवला. त्यात एक फोटो होता. तो फोटो पाहून मला धक्काच बसला. त्यात मी एका हाताने सेल्फी घेतला होता आणि दुसऱ्या हातात माझ्या मिठीत माया होती. मला काहीच आठवत नव्हते की हा फोटो कधीचा आहे.
मी, “मला नाही विश्वास या फोटो वर, मानसी हे सर्व खोटं आहे.”
मानसी रडत रडत तिच्या डेस्क ला चालली होती,
माया, “हो सर्व खोटं आहे ना, मग तू मला त्या रात्री माझं बोलून झाल्यावर पुन्हा कॉल करून प्रपोज केला ते पण खोटं असणार, आपण खूप सारे मुवी बरोबर पाहिले ते पण खोटं असणार. तेच काय तू आणि मी थिएटर मध्ये पहिल्यांदा किस केलं ते पन खोटं असणार”
माझ्या पायाखालची जमीन निघून गेली होती, हे जे काही माया बोलत होती, ते सर्व खोटं बोलत होती. पण ती ते बोलत असताना तिच्या हातात असलेल्या फोन मधून एक एक फोटो दाखवत होती आणि जे ती बोलत होती, ते सर्व त्यात दिसत होत. मी एक नजर मानसी वर टाकली ती रडत रडत तिची बॅग भरत होती, तिने सर्व बॅग भरली. ती वर्गाच्या बाहेर चालली होती. माया बोलतच होती.
माया, “तू माझा उपयोग करून घेतला का?”
मी, “नाही, तुला काहीतरी गैरसमज होतो आहे”
मानसी रडत होतीच पण माया सुध्दा आता रडायला लागली होती. ती रडत रडत बोलत होती
माया, “मग तुझ्या पाठीवर असलेल्या माझ्या नखांच्या जखमा पण खोट्या असतील, आपल्यात झालेले शारीरिक संबंध पण खोटे असतील”
हे शब्द ऐकताच मानसी माझ्याकडे धावत आली आणि तिच्या हातातल्या पेनाने मला इजा करायच्या आधीच माया ने मानसी ला पकडले, पण तो पर्यंत पेन माझ्या खांद्याला पार आत पर्यंत जखम करून गेला.
त्या दोघीही रडत होत्या, आतापर्यंत मी चक्कर येऊन खाली पडलो होतो. मला हलकं हलकं दिसत होत, माया मानसी ला सावरत बाहेर घेऊन जात होती. तेव्हा मी माया ला शेवटचं पाहिलं. माझे डोळे लागायच्या आधी मला मानसीचा एक मोठा टाहो फोडायचा आवाज आला आणि मी शुद्ध हरपलो.
– क्रमशः