Raj-ka-ran (Dhanya tiger in the creek belt) Part-2 in Marathi Motivational Stories by Sopandev Khambe books and stories PDF | राज-का-रण (खाडी पट्टयातील ढाण्या वाघ) भाग-२

Featured Books
  • जंगल - भाग 12

                                   ( 12)                       ...

  • इश्क दा मारा - 26

    MLA साहब की बाते सुन कर गीतिका के घर वालों को बहुत ही गुस्सा...

  • दरिंदा - भाग - 13

    अल्पा अपने भाई मौलिक को बुलाने का सुनकर डर रही थी। तब विनोद...

  • आखेट महल - 8

    आठ घण्टा भर बीतते-बीतते फिर गौरांबर की जेब में पच्चीस रुपये...

  • द्वारावती - 75

    75                                    “मैं मेरी पुस्तकें अभी...

Categories
Share

राज-का-रण (खाडी पट्टयातील ढाण्या वाघ) भाग-२

रम्या सिनियर कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली, झेंडे साहेबांनी पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या सभेला त्याला बोलावले, सभेत निवडणूक प्रचाराच्या कार्यक्रमसंबंधी चर्चा झाली खाडी पट्यात खूप कायकर्ते होते पण धडाडीने काम करणारा असा कोणी नव्हता तसा आमदार साहेब आणि तालुका प्रमुखांचे तिथे वर्चस्व होते पण गाफील राहून चालणार नव्हते कारण भाऊसाहेब विरुद्ध पक्षात गेल्यामुळे तिकडे गडबड करण्याची शक्यता होती. सभेत सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी घोषणा तालुका प्रमुख राजे साहेबांनी केली " झेंडे साहेब आणि मी मिळून एक निर्णय घेतलाय, खाडी पट्यात विशेष कार्यशील कार्यकर्ता सध्या तरी जुन्यापैकी नाही म्हणून तरुण कार्यकर्त्याला संधी म्हणून रमेश नाचणे याला निवडणूक प्रचार प्रमुख आणि पुढील काळात गट प्रमुख म्हणून नेमण्यात येतंय कोनाचा विरोध असल्यास आताच सांगावे" तसे रम्याचे सगळ्यांजवळ चांगले संबंध होते त्यामुळे वरिष्ठांच्या निर्णयाला सर्वांनी अनुमोदन दिले. रम्याला आकाश ठेंगणे झाले होते, एकूण राजकारण त्याला फलदायी ठरत होते. प्रचाराची लगबग सुरू होते रम्यादेखील तहान भूक विसरून प्रचाराला लागती खाडी पट्यातील सर्व कार्यकर्ते त्याला चांगले सहकार्य करतात तसेच विद्यार्थी संघटनेची मुले देखील जोरदार प्रचारात उतरतात.प्रचारासाठी मिळणारा पैसा योग्य मार्गाने खर्च करून कोणालाही नाराज न करता प्रचाराची रणधुमाळी सुरू होती, प्रचारसभा गाजत होत्या, रम्याचा खाडी पट्याचा अभ्यास दांडगा होता त्यामुळे आमदार साहेबांसोबत त्याचीही भाषणे गाजत होती. महिनाभरात अख्या खाडीपट्टा त्याने सर्वांच्या सोबत पिंजून काढला आणि आमदारसाहेबांचा विजय सुनिश्चित केला. प्रचाराच्या तोफा शांत झाल्या, निवडणुका संपल्या आमदार साहेब मागील टर्मपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आले, खाडीपाट्यातील पक्षाचा मतदानाचा टक्का वाढला होता त्याचे श्रेय रम्याला मिळाले आणि त्याचा उल्लेख आमदारानी "खाडी पट्यातील माझा ढाण्या वाघ" असा केला.रम्या आता आमदार आणि राजेसाहेबांचा खास माणूस बनला होता पण त्याला अजून राजकारणातले खूप काही शिकायचे होते.
कॉलेजचं तिसरे वर्ष संपत आले त्याचवेळी ग्रामपंचायत निवडणुका लागल्या दारावे आणि आटपाडी असे दोन गाव मिळून एक ग्रामपंचायत होती, सालाबादप्रमाणे ह्या वर्षीही शांततेत बिनविरोध सर्वानुमते सरपंच निवडायचा असे ठरले काही ठिकाणी विरोधी पक्षांना संधी दिली गेली पण पेच निर्माण झाला तो दारावे-आटपाडी मध्ये तसे पाहता भाऊसाहेबांनी जनहित पक्ष सोडल्यापासून खाडी पट्यात त्याचे वर्चस्व राहिले न्हवते त्यामुळे दारावे-आटपाडीमध्ये जनहीतचा सरपंच बसवायचे ठरले पण भाऊसाहेब जिद्दीला पेटला आणि निवडणूक घ्यायचे ठरले आणि विशेष म्हणजे जनहित कडून रमेश नाचणे याला उमेदवारी घोषित करण्यात आली.स्वतः आमदारांनी लक्ष घालून रम्याला सरपंच म्हणून निवडून आणले, विजयोत्सव साजरा करण्यात आला आणि इथेच रम्याचा पहिला राजकीय शत्रू निर्माण झाला तोही ज्याने त्याला राजकारण दाखवले आणि जो त्याचा राजकारणातील पहिला गुरू होता.
रम्या तालुक्यातील इतिहासात पहिला तरुण सरपंच बनला होता, सरपंचाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आता कॉलेजची शेवटच्या वर्षाची परीक्षा सुरू झाली, रम्या नेहमीप्रमाणे बी.ए.लासुद्धा जेमतेम पास झाला. आता पूर्ण वेळ राजकारण आणि समाजकारण करायचे असे त्याने ठरवले. झेंडे साहेबांनी त्याला आता तालुक्यातील राजकारनात सक्रिय होण्याचा सल्ला दिला अलीकडे राजेसाहेबांची तब्बेत वयोमानानुसार खालावली होती फार धावपळ होत नव्हती त्यामुळे रम्या त्यांना प्रत्येक ठिकाणी सहकार्य करू लागला होता. झेंडे साहेबांसोबत देखील बराच वेळ घालवत असे त्यांच्यासोबत दौऱ्यावर जाणे, मुंबईतही सोबत येत असे पक्षातील बऱ्याचश्या नामवंत वरिष्ठ नेत्यांसोबत त्याची ओळख होत असे, ग्रामपंचायतीपासून तालुक्यापर्येंत सर्व ठिकाणी आवश्यक वेळ देत होता. आता त्याला पैसापाण्यासाठी काहीतरी उद्योग करणे गरजेचे वाटू लागले होते, तोही प्रश्न झेंडेसाहेबांनी सोडवला अलिबागला त्यांचे एक हॉटेल होते ते त्याच्या ताब्यात दिले, सर्वकाही पाहायला मार्जितले कामगार होते पण अधून मधून लक्ष टाकायला जावे लागत असे,त्यामुळे पैशासाठी आता त्याला कोणावर फार अवलंबून राहावे लागत नसे, वडिलांनाही आता त्याने विश्रांती घ्यायला सांगितली आणि भाड्याने घेतलेले दुकान मालकाच्या ताब्यात दिले. मध्यंतरी आज्जीचे निधन झाले तेव्हा स्वतः झेंडेसाहेब सांत्वनासाठी त्याच्या घरी आले होते,त्यांना मुलगा नव्हता फक्त एक मुलगी होती त्यामुळे ते त्यालाच राजकारनाचे धडे देत होते त्याच्यात त्यांनी एक यशस्वी राजकारणी पहिला होता.
अलीकडे भाऊसाहेब रम्याच्या प्रत्येक कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असे पण त्याला यश येत नसे कारण लोकांचा रम्यावर विश्वास वाढला होता कित्येक रखडलेली कामे तो करून देत असे, रात्री अपरात्री लोकांच्या मदतीला धावत असे. रम्या हळूहळू आयुष्यात स्थिरस्थावर होत होता, त्याने दुमजली घरही गावात बांधले. आता तो तालुक्यातील राजकारणातही सक्षमपणे उतरला होता, सर्व सुरळीत चालले असतानाच राजेसाहेबांचे अल्पशा आजाराने निधन होते, त्यांच्या निधनाने त्याला खूप दुःख होते शेवटी त्याला राजकारणात एवढे मोठे नाव मिळवून द्यायला त्यांचा खूप मोठा वाटा असतो, त्यांच्या पहिल्या भेटीपासून ते सेकंड हँड मोटार सायकल दिल्यापासूनच्या सर्व घटना त्याच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात, आता जरी त्याने नवीन बाईक घेतली असली तरी ती गाडी त्याने अजून जपून ठेवली होती आणि त्याचे सर्व दुःख त्यांच्या शोक सभेत व्यक्त झाले तो ढसा ढसा रडला आणि मन हेलावून टाकणारे भाषण त्याने केले, त्यांच्या जाण्याने पक्षाला खूप मोठे नुकसान झाले त्यांची रिकामी खुर्ची भरण्यासाठी सक्षम माणसाची गरज होती त्यांच्या मुलांना पक्ष श्रेष्ठीनकडून विचारणा करण्यात आली पण राजकारणात रस नव्हता ते आपल्या व्यवसायात व्यस्त होते. शेवटी कार्यकर्त्यांमध्ये कोणीतरी सक्षम व्यक्ती म्हणून एकच नाव पुढे होते रमेश नाचणे, शेवटी पक्षश्रेष्ठींच्या विचारांमधूनच त्या जागेसाठी रम्याची निवड करण्यात आली, आशा प्रकारे रमेश नाचणे जनहित पक्षात एक प्रस्थ बनत चालले होते.एक एक करून त्याची सर्व स्वप्ने चुटकीसरशी पूर्ण होत होती. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना इतक्या कमी वयात रम्याचे पक्षाच्या एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहचणे म्हणजे खूप मोठी बाब होती त्याच्या ह्या यशाचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत होते.पदभार संभाळल्यावर पहिल्याच दिवशी एका घटनेतून रम्याने सगळ्यांची मने जिंकली, त्याने रजेसाहेबांचा मोठा फोटो कार्यालयात तालुका प्रमुखांच्या खुर्चीमागे भिंतीवर लावला त्या फोटोला हार घालून नमस्कार केला आणि पदभार सांभाळला, त्याच्या ह्या कृतीमुळे सर्वांच्या मनात त्याने एक सन्मान प्राप्त केला. पदभार सांभाल्यापासून तो सर्व कार्यकर्त्यांना व्यवस्थित सांभाळत असे त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक तिथे सल्ला मसलत करणे एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काम करत होता. जिल्ह्यातील वरिष्ठांच्या गाठी भेटी घेणे, त्यांच्या सूचनांचे पालन करणे कधीही यशाची हवा त्याने डोक्यात जाऊ दिली नाही. खासदारांना देखील तो नियमित भेटत असे आणि सल्ला मसलत करत असे.
त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी संपूर्ण तालुक्यात कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर पाहून त्याला लहानपणीचे स्वप्न आठवले. आमदार साहेबांनी रम्याच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना जंगी पार्टी दिली. असेच दिवस चालले होते रम्या आपली जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडत होता पण दुसरीकडे पक्षाच्या कामामध्ये त्याचे शत्रुत्वही वाढत होते मग ते विरोधी पक्षात असो किंवा पक्षा अंतर्गत. झेंडे साहेब आता थकत चालले होते त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न ठरवले होते सोयरीक पुण्यातील होती जनहित पक्षाचेच मावळ तालुक्यातील नेते काका साहेब मराठे यांचा मुलगा अतुल ह्याच्याशी रसिकाचे (झेंडे साहेबांची एकुलती एक मुलगी) लग्न ठरले होते. मराठे हे मावळ तालुक्यातील नामवंत व्यक्तिमत्त्व, मोठा मुलगा अनिल आमदार आणि अतुल हा लहान मुलगा, पण स्वार्थी नेता म्हणून पक्षात ओळखले जायचे, धूमधड्याक्यात लग्नाचा बार उडवला रम्याने आमदारांच्या घरच्या सदस्याप्रमाणे लग्नाची व्यवस्था पहिली,कुठेही गडबड होऊ नये म्हणून स्वतः जातीने सर्व कामात लक्ष घालत होता पुणे आणि रायगड जिल्यातील मोठमोठी मंडळी लग्नाला उपस्थित होती, लग्नाचा सोहळा नीट पार पडला. रसिकांच्या लग्नाला पाच सहा महिने होईपर्येंत झेंडेसाहेबाना हृदयविकाराचा झटका आला त्यांची बायपास सर्जरी झाली. महिनाभरात थोडे बरे वाटायला लागल्यावर एकदा रम्याला घरी भेटायला बोलावले त्या रूममध्ये कोणीही न्हवते आधीच गुप्त चर्चा करायची म्हणून मुद्दामहून त्यांनी सगळ्यांना तिथे न थांबण्याचे आदेश दिले होते आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली "रमेश, मी आता थकलो फार काळ जगेन असे वाटत नाही" रम्या त्यांचे बोलणे कापत "साहेब असे काही बोलू नका राजे साहेबांच्या जाण्याने आधीच आम्ही पोरके झालोय आणि आता तुम्ही असे हरलात तर आम्ही कोणाकडे बघायचं?" त्यावर झेंडेसाहेब " बघ हाडा मांसाचा माणूस आज आहे उद्या नाही त्यात शरीराने संकेत दिले, त्यामुळे आजची चर्चा महत्वाची राजेंनी आणि मी पक्ष वाढवला यशाच्या उत्तुंग शिखरावर न्हेउन ठेवला ही आमदारकीची चौथी टर्म आता बस झाले विश्रांती करायची असे ठरवले पण इतक्या मेहतीने बनवलेल्या साम्राज्यावर कोणी बाहेरचा येऊन सत्ता उपभोग घेऊ नये ही ईच्छा, राजेंच्या दोन्ही मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांच्या बिझनेसमध्ये समाधानी आहेत, आम्ही जे आजपर्येंत सर्व कामे पक्षाच्या नावाला साजेशी जनहितार्थ केली, लोकांच्या विकास कामांना प्राधान्य दिले,तालुक्याचा जितका विकास करता येईल तितका केला, स्वार्थी लोकांना दूर ठेवले आणि तुझ्यासारख्या इमानदार लोकांना जवळ करून पक्षात महत्वाचे स्थान मिळवून दिले, तुझी समाजकार्याची आवड आणि योगदान पाहून यापुढेही तुझ्यावर जबाबदारी वाढवायची असे ठरवले आहे कारण त्यासाठी तू अगदी परिपूर्ण आहेस हे तू तुझ्या लहान वयातच दाखवून दिलेस, आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तुला तिकीट देण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन माझा मानस पुत्र म्हणुन" हे ऐकून रम्याच्या पायाखालची जमीन सरकली तो भांबावला त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, झेंडे साहेब त्याचा हात हातात घेत "तू स्वतःला कमी लेखू नको तू आमदार झेंडेचा मानस पुत्र आहेस, जन सेवा हीच ईश्वर सेवा ह्या तत्वाला अंगीकार, लोकांची मनोभावे सेवा कर धन दौलत आपोआप पायाशी येते हे लक्षात ठेव" त्याच्याकडे बोलायला शब्दच न्हवते हे सारे स्वप्नमय वाटत होते "उद्यापासून तू तालुक्याचा भावी आमदार आहेस हे लक्षात ठेव" त्याने फक्त होकारार्थी मान हलवली. "तुझ्या आजपर्यंतच्या यशाचे कारण एकच तू निस्वार्थीपणे आमच्यावर विश्वास ठेवून केलेले काम" जवळजवळ तासभर चर्चा चालली त्यानंतर साहेबांचा आणि घरच्यांचा निरोप घेऊन निघून गेला. तो ह्या निर्णयाने बैचेन झाला होता रात्री नीट झोपू शकला नाही सकाळी लवकर उठून कार्यालयात जाण्याची तयारी करू लागला त्याने आजूनपर्येंत झेंडेसाहेबांसोबत झालेल्या चर्चेची वाच्यता कुठेच केली न्हवती. मध्यंतरी दोन तीन दिवस गेले तो कोणाशीच काही त्या विषयावर बोलला नाही आणि त्या दिवशी तो कार्यालयात बसला असता अचानक एका कार्यकर्त्याने झेंडेसाहेब आल्याची बातमी सांगितली हातातले काम तसेच सोडून टचकन उठला आणि कार्यालयाबाहेर त्यांच्या गाडीजवळ आला त्यांना घेऊन ऑफिसमध्ये आला, तसे ते कधी अचानक येत नसत पण आज काय इतके महत्वाचे काम ते त्यालाच समजले नाही थोडा वेळ बसल्यावर पाणी प्यायले तेव्हा रम्या बोलला "काय अर्जेंट होते तर मला सांगायचे मी आलो असतो, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे" झेंडेसाहेब "मुलाला आमदार बनवायचे तर विश्रांती घेऊन कसे चालेल?" तिथे उपस्थित कार्यकर्ते गोंधळतात त्यावर त्यांना स्पष्टीकरण देत ते पुढे म्हणतात, "रामेशभाई माझा मानसपुत्र आणि त्याला आता आमदार बनवायचं ठरवलंय चालेल ना?" सर्वांमध्ये एक उत्साह निर्माण झाला. त्यांच्या निर्णयाबाबत ते खूप गंभीर होते निवडणुकीला सहा महिने होते पुढे रम्याला म्हणाले,"खुप कमी दिवस राहिलेत मोर्चेबांधणी केली पाहिजे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची सभा बोलावं मी येतो सर्व काही समजावून सांगतो" तो हो म्हणाला त्यानंतर काही वेळाने ते जायला निघाले त्याने त्यांना गाडीपर्यत सोडले. सगळीकडे रमेश नाचणेला आमदारकीची तिकीट मिळणार ही बातमी कार्यकर्त्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरली.
दुसऱ्या दिवशी येत्या रविवारी सभा असल्याचे त्याने सगळ्या प्रमुखांना कळविण्यास सुरुवात केली आणि संध्याकाळी झेंडेसाहेबांना पुन्हा हॉस्पिटल मध्ये दाखल केल्याची बातमी मिळाली तो तडक हॉस्पिटलमध्ये पोहचला परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरने कोणालाही भेटण्यास मनाई केली तो रात्री उशिरापर्यंत थांबला नंतर काकूंनी (झेंडेसाहेबांची पत्नी) त्याला घरी जाण्यास सांगितले. तो घरी गेला पण खूप टेन्शनमध्ये होता त्याला राहुन राहून त्यांचे संभाषण आठवत होते.
सकाळी लवकर उठून हॉस्पिटलमध्ये गेला पुण्याहून त्यांची मुलगी आणि जावई आले होते सकाळी दहाच्या सुमारास त्यांची गाठ पडली फार काही बोलले नाही विचारपूस केल्यावर त्याला थोडे समाधान वाटले तो कार्यालयात गेला. कार्यालयात आल्यावर त्याने साहेबांची प्रकृती ठीक नसल्याने रविवारची सभा बरखास्त केली.आठवडाभर झेंडे साहेबांना कोणालाही भेटून दिले जात नव्हते रम्या वरचेवर फोनवरून त्यांच्या तब्बेतीविषयी चौकशी करत असे काकुंजवळ बोलणे होत असे पुण्याहून आलेले जावई आणि मुलगी अजून गेले नव्हते, एक दिवस झेंडे साहेबांच्या सेक्रेटरीचा फोन येतो दोन दिवसात निवडणुकी बाबत चर्चा करण्यासाठी पक्षाच्या कार्यकारिणीची सभा आयोजित करण्याच्या सूचना रम्याला दिल्या जातात रम्या सूचनेप्रमाणे दोन दिवसात सभा ठरवतो, पक्ष कार्यालयाच्या सभागृहात पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते रम्या सभागृहाबाहेर साहेबांच्या गाडीची वाट पाहत उभा होता इतक्यात साहेबांची गाडी आली पाठोपाठ आणखी एक गाडी होती साहेब गाडीतून उतरले आणि दुसऱ्या गाडीतून साहेबांचा जावई आणि व्याही उतरले. रम्याला काही समजेना कार्यकारणी बैठकीला हे कसे? रम्याने त्यांना नमस्कार केला आणि पुढे होऊन सभागृहात घेऊन गेला. झेंडे साहेबांच्या स्वभावात बदल जाणवत होता ते फार काही बोलत न्हवते आणि गोंधळलेल्या मनस्थितीत होते. सभेला सुरुवात झाली साहेब बोलू लागले सर्वप्रथम व्याही आणि जावयाची ओळख करून दिली पुण्यातील त्यांच्या कामगिरीबद्दल बोलले आणि पुढे मुद्द्यावर येत म्हणाले "विधानसभा निवडणूक जवळ आहे त्यामुळे उमेदवार निवडीबाबत घोषणा करण्यासाठी आजची सभा बोलावली आहे तर मी आता आमदारकीच्या जबाबदारीतून मुक्त होत तरुण पिढीकडे नेतृत्व द्यायचे ठरवले आहे आणि त्यासाठी येत्या निवडणुकीत आमदारकीच्या उमेदवारासाठी आमचे जावई पुण्याचे जनहित पक्षाचे नामवंत नेते काकासाहेब मराठे यांचे सुपुत्र अतुल मराठे यांना संधी द्यायचे ठरवले आहे" हे ऐकताच सगळीकडे स्तब्धता पसरते रम्याचा चेहरा पार उतरतो पण धीर एकवटून तो टाळ्या वाजवतो व त्याच्यामागून इतर काही लोक टाळ्या वाजवतात. कोणालाही काही समजेनासे झाले आठवड्याभरपूर्वी जे ऐकले बोलले जात होते त्यात आता इतका फरक का पडला, काहीतरी चुकीचे घडत आहे अशी सर्वांची भावना होती, प्रथेप्रमाणे आता अनुमोदन घेतले जाईल असे वाटले परंतु तसे काही घडले नाही काकासाहेब आणि अतुल यांनी आभार व्यक्त केले आणि सभा संपली.सभा संपताच झेंडे साहेब आणि पाहुणे तडक गाडीकडे निघाले राम्याशी काहीही संवाद न साधता आणि ते त्याच्या नजरेला नजर देखील मिळवत न्हवते त्यांच्या पाठोपाठ तो गाडीपर्येंत सोडायला गेला पण निरोप न घेताच ते गाडीत बसले आणि दोन्ही गाड्या निघाल्या. सभागृहात कार्यकर्त्यांच्या चर्चा सुरू झाल्या होत्या त्यांना सामोरे जाण्याची हिम्मत रम्यामध्ये न्हवती म्हणून तो बाहेरूनच घरी जायला निघाला.
रस्त्यात त्याच्या डोक्यात विचाराचे काहूर माजले होते झेंडेसाहेबांनी असे का केले असावे? आणि मग त्यादिवशी जी चर्चा झाली त्याचा अर्थ काय?खरे झेंडेसाहेब कोणते त्यादिवशी मानसपुत्र म्हणणारे की आज जावयाला संधी देणारे? त्याला काहीच कळत नव्हते,कसाबसा घरी गेला घरात कोणाशी काही बोलला नाही आई-बाबांच्या लक्षात आले काहीतरी बिनसलय, त्याच्या राजकारणातील त्यांना काही कळत नसे पण आज काहीतरी जास्त घडलंय म्हणून त्यांनी चौकशी केली त्याने विषय टाळला आणि मी येताना खाऊन आलोय त्यामुळे भूक नाही सांगितले आणि त्याच्या खोलीत गेला आणि पलंगावर विचार करत बसला, त्याला दुःख आमदारकीच्या तिकिटाचे नव्हते तर झेंडेसाहेबांनी केलेल्या विश्वासघाताचे होते. तो विचारात असतानाच राक्या तिथे येतो तो आता बी.एस.च्या शेवटच्या वर्षाला असतो त्याला राजकारणात रस नसतो पण बाहेर जनहिताच्या कार्यकर्त्यांची जी चर्चा झाली ती ऐकून तो दादाला भावनिक आधार देण्यासाठी येतो, थोडा वेळ त्यांच्यात चर्चा होते राक्या त्याला समजावतो "दादा मला तुझ्यासारख फार राजकारण नाही कळत पण ह्या राजकारणात असेच असते स्वकीयांना संधी देण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा बळी दिला जातो" यावर रम्या फक्त मान हलवतो राकेश निघून जातो पण अजूनही रम्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजलेले असते, झेंडेसाहेब असे नाहीत याची त्याला खात्री असते पण असे का घडले हा प्रश्न मात्र निरुत्तर राहते.
सकाळी उठून तो कार्यालयात जायची तयारी करू लागला नेहमीप्रमाणे उत्साह नव्हता,पण जबाबदारी म्हणून जात होता, कार्यालयातही काहीसा निरुत्साह होता कार्यकर्ते नाराज होते. त्याने कार्यकर्त्यांची समजूत काढली वरिष्ठांच्या निर्णयाचे स्वागत करून पक्षाच्या भवितव्यासाठी आपण आपले काम इमाने इतबारे सुरू ठेवायचे ही बाब कार्यकर्त्यांना समजावून सांगितली आणि निवडणूक प्रचाराच्या कामाला सुरुवात करायला सांगितली. दोन तीन दिवस उलटून गेले झेंडेसाहेबांनी ना फोन केला ना भेटायला बोलावले त्यांच्याजवळ एकदा बोलायची त्याची फार इच्छा होती,विचारात असताना खासदार राजन सुरडकर साहेबांच्या कार्यालयातून फोन येतो, उद्या तातडीने भेटण्यास साहेबांनी बोलावले, कदाचित निवडणुकीसंबंधी चर्चा करायची असावी.
दुसऱ्या दिवशी तो सुरडकर साहेबांच्या कार्यालयात हजर झाला, साहेबांच्या केबिनमध्ये गेला तिथे दोघांशिवाय कोणीही नव्हते, साहेबानी पक्षाच्या कामाविषयी आढावा घेतला आणि पुढे म्हणाले "रमेश ह्या वर्षी आमदारकीचे तिकीट तुला मिळावे अशी मी शिफारस करत आहे" आता मात्र हे फारच होतंय असे त्याला वाटले, काय चाललंय कळायला मार्ग न्हवता, "साहेब, या संदर्भात दोन दिवसांपूर्वी सभा झाली आणि निर्णयसुद्धा जाहीर करण्यात आला ह्या वेळेस झेंडेसाहेबांच्या जावयाना संधी द्यायचे ठरले आहे" साहेब "सभेत काहीही ठरले असेल पण माझे मते ह्या वर्षी तालुक्यात तू एकमेव योग्य कार्यकर्ता आहेस ज्याला ही संधी मिळालीच पाहिजे" रम्या, "वरिष्ठांच्या निर्णयाचा आदर करणे माझे प्रथम कर्तव्य, संधी कोणाला का मिळेना मी पक्षाच्या माध्यमातून माझे समाज कार्य सुरू ठेवेन त्यासाठी आमदारकीच पाहिजे असे नाही साहेब, झेंडेसाहेबांचा आदेश माझ्यासाठी वंदनीय आहे आमदार आपलाच असेल ह्यात शंका नाही" साहेब "तुझ्या मेहनतीवर आणि कर्तृत्वावर शंका नाही, पण बाहेरन कोणालातरी आणून उभे करून पक्षाचे वातावरण बिघडावे हे मला कदापि मान्य नाही म्हणून हा निर्णय घेतलाय" पण " झेंडेसाहेबांनी योग्य निर्णय घेतला असेल ह्याची मला खात्री आहे" साहेब "झेंडेसाहेबांनी त्यांचा निर्णय तुला आधीच सांगितलाय ना?" आता मात्र त्याला धक्का बसला " आता नीट येक झेंडेसाहेबांना मुलीच्या सासरहून प्रेशर आहे ती मंडळी म्हणजे पक्षातील मोठी मंडळी आहेत पण त्यांना आपल्याकडे आणून झेंडेसाहेबांना आपले राजकीय वातावरण बिघडवायच नाही म्हणून ही जबाबदारी माझ्यावर आहे, कार्यकारणी सभेच्या दोन दिवस अगोदर मी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी गेलो असता ते द्विधा मनस्थितीत होते त्यामुळेच त्यांची तब्बेत आणखी खालावली होती, मी त्यांच्याशी चर्चा करून त्याना धिर दिला आणि त्यांच्या इच्छेनुसार आमदार तालुक्यात निवडला जाईल हे वचन मी त्यांना दिलय त्यानुसार मोर्चेबांधणी केली आता फक्त तुझी मानसिक तयारी आणि समाज गैर समाज दूर करण्यासाठी इथे बोलावलं" त्याला विश्वासच बसेना पुढे ते म्हणाले त्यांना तुझ्याशी बोलायचं पण ते तिकडे शक्य नव्हते कारण मराठे तिकडे ठाण मांडून बसलेत म्हणून तुला आज फोनवर त्यांच्याशी बोलणे देतो करून साहेबांनी फोन लावला काकूंनी उचलला साहेब, "वहिनी नमस्कार सुरडकर बोलतोय आहेत का साहेब" त्यानंतर झेंडेसाहेबांचा आवाज " साहेब बोला" "एकटेच आहात" तिकडून "हो" "बोला तुमच्या मानस पुत्राजवळ" रम्या जवळ फोन देतात रम्या, " साहेब कसे आहात" साहेब "मी ठीक आहे, माझी काळजी करू नको सुरडकर साहेब जे संगतायेत त्याप्रमाणे कर, बाकी सर्व कर्म कहाणी साहेबांनी सांगितली असेलच, लक्षात ठेव मी तुझ्यासोबतच आहे पण आता परिस्थिती अशी आहे मी इथे नजरकैदेत असल्यासारखे आहे हे लोक तुला माझ्यापर्यंत पोहचू देणार नाहीत, तुला माझ्याबद्दल उलट सुलट सांगण्यात येईल पण कोणावर विश्वास ठेवू नको, सुरडकर साहेब योग्य मार्गदर्शन करतील, माझे आशीर्वाद अखंड तुझ्यासोबत आहेत, चल फोन ठेवतो" आणि ते फोन कट करतात. सुरडकर साहेब "आता खात्री पटली ना?" रम्याने होकारार्थी मान हलवली "रमेश हे राजकारण आहे सत्तेच्या लालसेपोटी कोण कोणाचा गळा चिरेल त्याचा भरोसा नाही, साहेबांची मुलगी सासरी जाऊन सहा महिने झालेत, हे मराठे म्हणजे अतिशय स्वार्थी माणूस, स्वार्थासाठी हा माणूस केसाने गळा कापेल, त्यात पक्षात त्यांच्या शब्दाला किंमत आहे, झेंडेसाहेब तसे निडर पण आजाराने खचलेत आणि मुलीचा संसार म्हणजे नाजूक प्रश्न पण स्वहितासाठी जनतेचं नुकसान ते होऊ देणार नाही म्हणून गनिमी काव्याने आपल्याला हा निर्णय घ्यायचाय, म्हणून जे आपण करतोय त्याची गुप्तता पाळणे आवश्यक आहे" सर्व गोष्टी नीट समजावून ते त्याला रजा देतात आणि तो निघतो. त्याच्या मनात झेंडेसाहेबांविषयी गैरसमज दूर झाले होते, त्याला खात्री होती झेंडेसाहेब कधीही चुकीचा निर्णय घेणार नाही. आजपर्यंत त्याने समाजकारण म्हणजे राजकारण हा एकच पैलू पहिला, स्वार्थासाठी राजकारण आणि त्यासाठी एक सद्गृहस्थाला वेठीस धरण्याचा हा भयंकर प्रकार त्याने आज पहिला आणि क्षणभर नको ते राजकारण असे त्याला वाटले पण आपण असा विचार करून मागे हटलो तर ह्या स्वार्थी लोकांना मोकळे मैदान मिळेल आणि सर्वसामान्य त्यात भरडले जातील त्यामुळे ह्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आपल्याला लढा दिलाच पाहिजे हा विचार त्याच्या मनात आला.
काही दिवस गेले झेंडेसाहेबांची गाठ भेट न्हवती, आणि एक दिवस सुरडकर साहेबांचा फोन आला ते म्हणाले "उद्या मुंबईला निघ तुझी सगळे कागदपत्रे सोबत घे माझा सेक्रेटरी तुला पक्षाच्या मुख्यालया बाहेर भेटेल तो उमेदवारीचे काही अर्ज देईल ते घे तुझी कागदपत्रं जोड आणि मुख्यालयात जमा कर" तो "ठीक आहे साहेब" म्हणाला साहेबांनी शुभेच्छा देऊन फोन ठेवला.
सुरडकर साहेबांच्या सांगण्यानुसार तो मुंबईत पक्षाच्या मुख्यालयाबाहेर ठरल्याप्रमाणे त्यांच्या सेक्रेटरीला भेटला त्याने रम्याच्या आवश्यक तिथे साह्य घेतल्या आणि कागदपत्रे जमा कुठे करायची सांगून निघून गेला,रम्याने कागदपत्रे जमा केली आणि गावी परतला. मुख्यालयात दोन मोठ्या नेत्यांच्या शिफारशीने दोन वेगवेगळे उमेदवार देण्यात आल्याने पेच निर्माण झाला, मराठेंनी मुलाला तिकीट मिळावी म्हणून जोर लावायला सुरुवात केले पण ते त्यांचे मतदारसंघ नसल्याने त्यांना फारसे महत्त्व दिले गेले नाही पण आमदार झेंडे यांच्या शिफारसीकडे दुर्लक्ष करणे योग्य नव्हते त्यामुळे पक्ष श्रेष्ठीच्या कार्यालयातून त्यांना फोन जातो त्यावर खासदार सुरडकर यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा मी त्यांच्या विरोधात नसेन असे उत्तर कळवले. सुरडकरांनी पक्षश्रेष्ठीची गाठ घेऊन परिस्थिती कानावर घातली आणि पक्षांतर्गत मतभेद नको म्हणून काही गोष्टी गुप्त ठेवण्याची विनंती केली. सर्व काही सुरळीत पार पडले आणि रम्याला मुख्यालयात हजर राहण्यास सांगितले गेले सांगितल्याप्रमाणे तो हजर झाला आणि तिथे त्याला पक्षश्रेष्ठीच्या हस्ते आमदारकीचे तिकीट देण्यात आले, त्याला क्षणभर विश्वास बसला नाही, पक्षातील वजनदार नेत्याच्या शब्दाला डावलून एका प्रामाणिक कार्यकर्त्याचा विचार करण्यात आला, झेंडेसाहेब आणि सुरडकर साहेबांच्या प्रयत्नांना यश आले होते, त्याने मनोमन देवाचे आभार मानले, त्याचे अभिनंदन करण्यात आले आणि तो मुख्यालयाबाहेर आला गेटवर सुरडकर साहेबांची गाडी उभी होती तो पुढे गेला त्यांनी त्याचे अभिनंदन केले त्यानेही त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्याच गाडीत बसून तो गावाकडे निघाले.
गावी कार्यकर्त्यापर्येंत बातमी पोचली त्यांनी जल्लोषाची पूर्ण तयारी केली होती, त्यांच्यामध्ये उत्साह भरला होता, रात्री नऊ वाजता गाडी कार्यालयासमोर येताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, गाडीतून उतरल्यावर त्याचे हार तुऱ्याने अभिनंदन करण्यात आले, घोषणाबाजी करण्यात आली, पेढे वाटण्यात आले जवळ जवळ तासभर जल्लोष सुरू होता त्यानंतर सुरडकर साहेब निघून गेले कायकर्त्यांचा उत्साह कमी होत नव्हता, कोणीतरी उपरा येऊन आपल्यावर सत्ता चालवणार ह्या संकटातून ते वाचले होते. रम्याला एकसारखी झेंडेसाहेबांची कमी जाणवत होती,त्यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घ्यावे असे राहून राहून वाटत होते पण सध्या त्यांना भेटण्यास सुरडकर साहेबांनी मनाई केली होती. घरी गेला गावात देखील जल्लोष करण्यात आले आईने त्याचे औक्षण केले त्यानेही आई वडिलांचे आणि गावातील वाडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतल.
दुसऱ्या दिवशी संपूर्ण उत्साहात उठला, आजपासून लढाई सुरू झाली होती, रणशिंग फुंकले होते तयारी झाली घराबाहेर पडला तर कार्यकर्ते बाहेर वाट पहात होते आजपासून तो उमेदवार होता त्यामुळे तो जाईल तिथे कार्यकर्ते सोबत येणार होते. तालुका कार्यालयात पोचले, प्रचार व इतर कामांची योजना बनवण्यात आली हे सर्व करत असताना कसे दिवस गेले ते समजले नाही, दोन दिवसांनी प्रचाराचा नारळ फोडायचा होता. रम्या कार्यालयात संध्याकाळी थोडे एकांतात चहा घेत बसला होता इतक्यात टेबलवरचा फोन वाजला त्याने उचलला समोर झेंडेसाहेब होते त्यांचा आवाज ऐकून त्याला थोडे समाधान वाटले त्यांनी त्याचे अभिनंदन केले आणि पैशाची काळजी करू नको सांगितले वेळोवेळी पैसे पोचतील एक फोन नंबर दिला आणि जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा इथे फोन कर तू असशील तिथे पैसे पोहचतील. पैशाच्या बाबतीत आखडता हात ठेऊ नको आवश्यक तिथे खर्च कर,संकोच करू नको.योग्य वेळी तुझी भेट घेईन आवश्यक सूचना देऊन त्यांनीं फोन ठेवला. त्यांच्या फोनमुळे त्याच्या अंगात एक ऊर्जा निर्माण झाली.
विरोधी पक्षाने देखील तगडा उमेदवार दिला होता, तो अनुभवी राजकारणी होता. त्याच्यासमोर रम्या खूपच नावेदीत आणि राजकारणात नवखा होता,पण त्यामुळे खचून न जाता सर्वजण उत्साहात होते. प्रचार सुरू झाला,ठीक ठिकाणी बॅनर लावण्यात आले,पत्रके वाटली जात होती, प्रचार फेऱ्या निघत होत्या, गावभेटी होत होत्या, सभांना सुरुवात झाली, रमेश नाचनेची भाषणे गाजत होती, विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते.त्यात विरोधकांना एक महत्वपूर्ण मुद्दा मिळाला तो असा की विध्यमान आमदार प्रचार प्रक्रियेत सहभागी नाहीत त्यावरून उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आणि जनहित पक्ष प्रचारात कुठेतरी मागे पडू लागला, शक्य तिथे त्यांच्या तब्बेतीचे करण दिले जात असे पण त्यांच्या जावयाच्या उमेदवारी बद्दल बातमी लोकांमध्ये पसरवण्यात आली,त्यावर झेंडेसाहेबांनी लगेच तोडगा काढला तातडीने दोन दिवसात तालुक्यात जंगी सभा लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या ही सभा निवडणुकीचे भवितव्य ठरवणारी होती, तयारी झाली सभेच्या दिवशी गावागावातून टेम्पो भरून गोल मैदानावर आले हेच ते मैदान जिथे रम्याच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती आणि आज त्याच्या भविष्यातील यशावर शिक्कामोर्तब होणार होते. सभेची वेळ झाली सगळेजण साहेबांची वाट पाहत होते आणि समोरून साहेबांची गाडी येताना रम्याच्या नजरेस पडली त्याच्या जिवात जीव आला कारण इथपर्येंत पोचणे साहेबांसाठीं सोपे नव्हते मुलीच्या सासरहून त्यांना प्रचारात जाण्यास विरोध होता पण सर्व विरोध झुगारून ते रम्या साठी आणि पक्षाच्या भविष्यासाठी तिथे पोहचले, रम्या धावत पळत गाडीपर्येंत पोहचला साहेब बाहेर येताच त्यांच्या पायावर डोके ठेऊन आशीर्वाद घेतले,त्यांनीही त्याला घट्ट मिठी मारत पाठीवर थाप मारत यशस्वी भव असे आशीर्वाद दिले, ते स्टेजवर जाताच त्यांच्या अंगात वीज संचारली आजार विसरून गेले भाषणाला सुरुवात केली, विरोधकांचे सगळे मनसुबे उधळवून लावले आणि भर सभेत रमेश माझा मानसपुत्र असल्याचे जाहीर केले. साहेबांच्या भाषणाने रम्या भावनिक झाला होता आणि जेव्हा भाषणाला उठला त्यावेळी संपूर्ण भावना एकवटून आपली राजकारणातली कथा जनतेसमोर मांडली, लोकही रम्याच्या बाबतीत भावनिक झाले, ज्याने गरिबी पहिली तोच गरिबाला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकेल ही भावना लोकांमध्ये दृढ झाली आणि ह्या सभेने रम्याच्या आमदारकीवर शिक्का मोर्तब केले.
प्रचाराच्या रणधुमाळीत महिना कधी संपला समजले नाही, प्रचाराच्या तोफा शांत झाल्या आता केवळ भेटीगाठी शिल्लक राहिल्या,संपूर्ण तालुक्यात जोरदार प्रचार झाला,कोणीही कुठेही कमी पडले नाही की पैशाची अडचण आली नाही. निवडणुकीचा दिवस उजाडला ठीक ठिकाणी बूथ लावून कार्यकर्ते मतदारांना योग्य मार्गदर्शन करत होते, कुठे गडबड होऊ नये म्हणून काळजी घेत होते संपूर्ण निवडणूक शांततेत पार पडली, संध्याकाळी सर्व आटोपून सर्व घरी गेले रामेशलाही कार्यकर्त्यांनी घरी सोडले आता दोन दिवसांनी मतमोजणी होती तोपर्येंत विश्रांती.
रम्याचे सामाजिक क्षेत्रात कार्य, तळागाळातील जनतेशी असलेले नाते, कार्यकर्त्यांशी असलेले सलोख्याचे संबंध, वरिष्ठांची मर्जी, कोणतीही राजकीय पश्वभूमी नसताना राजकारणात मिळालेले यश,सर्वसामान्य लोकांच्या काळजात छेद करतील अशी भाषणे इत्यादी अनेक कारणे त्याच्या निवडणुकीसाठी यशासाठी जमेची बाजू होती.तरीही विरोधी पक्षाने तोडीस तोड केलेला प्रचार आणि पैशाचा खेळ त्यामुळे थोडी धाकधूक होती.
निकालाचा दिवस आला त्यावेळी निवडणूक ब्यलेट पेपरवर होत असत, त्यामुळे निकाल उशिरा येणार होता, सर्वजण मतमोजणी केंद्रबाहेर जमा होते पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर साधारण सकाळी दहा वाजता जाहीर झाला विरोधी पक्षाच्या उमेदवार साडे अकराशे मताने आघाडीवर होता, जनहित पक्षाच्या गोटात नाराजी होती पण त्यात दिलासा देणारी एकच म्हणजे विरोधी पक्षाचे ज्या गावांमध्ये वर्चस्व होते त्या पट्यातील सात गावांच्या त्या मतपेट्या होत्या, त्यामुळे कार्यकर्त्यांनी धीर सोडला नव्हता. रम्या खूप चिंतेत होता, मतमोजणी केंद्रापासून पक्ष कार्यालय काही अंतरावर होते केंद्रात एक फेरी मारून आणि कार्यकर्त्याना धीर देऊन तो कार्यालयात गेला सोबत काही कार्यकर्तेही गेले. पुढच्या फेरीच्या निकालाची सगळे वाट पाहत होते, पुढील फेरीत तालुका शहरच्या मतपेट्या फोडल्याची बातमी आली. रम्याच्या जितका डोक्यावर तितकाच मनावर ताण होता जर अपयश आले तर झेंडेसाहेब आणि सुरडकर साहेबांची विश्वासहर्ता गमवल्यासारखे होणार होते, झेंडेसाहेबांनी मेहनतीचा लावलेला पैसा,मराठेनसारख्या दिग्गजांसोबत घेतलेले वैर, नुकतेच लग्न झालेल्या मुलीच्या संसाराचा विचार न करता त्याच्या पाठीशी उभे राहिले होते, कार्यकर्त्यांनी जीवाची पर्वा न करता रात्रीचा दिवस करून प्रचारासाठी केलेली मेहनत ह्या सर्व गोष्टी आठवल्या की त्याच्या काळजात धस्स होत होते.
दुसऱ्या फेरीची वेळ झाली होती साडेबारा वाजता दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर झाला सगळ्यांचे कान टवकारले शांतता पसरली रमेश नाचणे दीडशे मताने आघाडीवर जनहितच्या गोटात उत्साह निर्माण झाला दीडशे म्हणजे खूप कमी फरक होता काही का होईना पण आघाडी मिळाली होती हे महत्वाचे, अजूनही टांगती तलवार होती, रम्याचा जीव भांड्यात पडला पण अजूनही धाकधूक सुरूच होती, तीन वाजले रम्याने दुपारचे जेवणही घेतले नाही, कार्यकर्ते जेवले रम्याला खुप आग्रह केला पण त्याला अन्नाचे कणही घशाखाली उतरणार नव्हते होते,कसातरी त्याने एक कप चहा घेतला. चार वाजले तिसऱ्या फेरीची वेळ झाली ही महत्वाची फेरी होती कारण एकूण पाच फेऱ्या होणार होत्या आणि आता जो कोणी मोठी आघाडी घेईल त्याला ही आघाडी टिकवायला फार अवघड नव्हते. तिसऱ्या फेरीत जनहित पक्ष साडेसातशे मतांनी आघाडी फार मोठा फरक नसला प्रथम क्रमांक कायम होता हे समाधानकारक होते, अपेक्षेप्रमाणे फेरी निर्णायक ठरली नाही. साडे नऊ वाजता चौथ्या फेरीचा निकालाची श्यक्यता होती, वेळ जाता जात नव्हता निकालाकडे लक्ष लागले होते वातावरण गंभीर बनले होते, ह्या फेरीत खाडी पट्टीतिल निकाल येणार होता म्हणजेच रम्याच्या बलेकिल्ल्यातला, हाच निकाल त्याच्या यश अपयश ठरवणार होता,पावणे दहाला निकाल आला रम्या केंद्रासमोर गेला जनहीतला तब्बल चार हजार सहाशे पंचे चाळीस मतांची आघाडी, उत्साह ओसंडून वहायला लागला रम्याच्या विजयावर जवळ जवळ शिक्का मोर्तब झाले होते, ढोल तासे वाजायला लागले, रम्याला उचलून घेऊन कार्यकर्ते नाचायला लागले सगळा क्षीण विरला होता, झेंडेसाहेबांची आणि सुरडकर साहेबांची गाडी कार्यालयाच्या दिशेने रवाना झाली. पाचवी फेरी केवळ औपचारिक राहिली होती, ते पोहचताच रम्याने त्यांचा आशीर्वाद घेतला,दोन ते तीन तास जल्लोष सुरू होता, साडेबारा वाजले असतील शेवटच्या फेरीचा निकाल आला आणि सात हजार मतांच्या फरकाने रमेश नाचणे विजयी, त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले, मनावरचे मोठे ओझे हलके झाले, गळ्यात हार घालून तालुक्यात मिरवणुकीची तयारी झाली राक्या आई बाबांना घेऊन आला होता, त्यांना त्याने घट्ट मिठी मारली.
दुसऱ्या दिवशी खाडी पट्यातील ढाण्या वाघ तरुण तडफदार आमदार रमेश नाचणे यांच्या अभिनंदनाचे संपूर्ण तालुक्यात मोठ मोठे बॅनर लावण्यात आले, मिरवणुका काढण्यात आल्या. मच्छिवाल्याचा मुलगा ते आमदार ह्या त्याच्या प्रवासाची प्रेरणादायी गोष्ट संपूर्ण तालुक्यात आजही सांगितली जाते.

(संपूर्ण कथा, कथेतील पात्र काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास केवळ योगा योग समजावा, कथा केवळ वाचकांच्या मनोरंजनाच्या हेतूने लिहली आहे)