दारावे रायगड जिल्ह्यातील खाडी पट्यातील एक खेडेगाव, समुद्राच्या खाडीच्या किनारी असणाऱ्या गावांना खाडी पट्यातील गावे असे कोकणात म्हटले जाते,तीनशे-साडेतीनशे उंबरठ्याचे हे गाव, शेती आणि काहीसा समुद्र किनारा असल्याने मासेमारी हे इतकेच उदरनिर्वाहाचे साधन त्यामुळे बरेचसे लोक गाव सोडून मुंबईसारख्या शहरात तर कोणी तालुक्यात नोकरी-धंद्यानिमित्त स्थायिक झालेले. याच गावात गणपत नाचणे हा रहिवासी आपली वृद्ध आई, पत्नी आणि दोन मुले यांच्यासह राहत असे, लहान भाऊ सदानंद कुटुंबासह मुंबईत स्थायिक झालेला. गणपतचे शिक्षण नसल्याने त्याने गावी राहून कुटुंबाचे पालन पोषण करण्याचा पर्याय निवडलेला, कुटुंबाचे भागेल इतकी शेती आणि आठवडी बाजारात तालुक्याला सुकी मच्छी विकण्याचे काम करायचा.
मोठा मुलगा रम्या(खरे नाव रमेश पण कोकणात कोणालाच सरळ नावाने हाक मारण्याची प्रथा नसल्याने "रम्या") आठवीत शिकत होता तर लहान मुलगा राक्या (अर्थात राकेश) पाचवीत शिकत होता. आपल्या कथेचा नायक रम्या विषयी सर्वप्रथम जाणून घेऊ, रम्या तसा अभ्यासात जेमतेमच, पण निर्भीड आणि अतिशय बडबड्या, एखादी गोष्ट रंगवून सांगायची कला त्याच्यात उपजतच म्हणावी लागेल, त्यामुळे एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न त्याला सोडवायला कधी जमलंच नाही. निबंध लेखन,कथाकथन आणि विशेषतः भाषण हे आवडीचे विषय,ह्या सर्व गुणांमुळे तो शाळेत आणि गावात प्रसिद्ध होता. इतरांप्रमाणे कोणाशी बोलायला,ओळख पडायला कधीच लाजत बुजत नसे म्हणून शाळेत हुशार नसूनसुद्धा शिक्षकांचा आवडता. या व्यतिरिक्त त्याला आत्तापासूनच राजकारणाची आवड, राजकीय पक्षांचे मोठमोठे बॅनर पाहिल्यावर ते वाचल्याशिवाय पुढे जात नसे, पुढाऱ्यांच्या वाढदिवसाचे बॅनर हे त्याचे विशेष आकर्षण. आपल्याही वाढदिवसाच्या शुभेच्छाचे बॅनर सगळीकडे लागणार हे स्वप्न, ज्या वयात मुले सिनेमातल्या हिरोसारखी फायटिंग करायची, क्रिकेटसारखी बॅटिंग करायची स्वप्न बघतात त्या वयात हा पांढरे शुभ्र कपडे घालून लाल बत्तीच्या गाडीत ऐटीत फिरायचे, भर सभेत लोकांना हात दाखवत स्टेजवर एन्ट्री मारत लोकांकडून हार तुरे स्वीकारत पहाडी आवाजात भाषण करत त्यांच्या टाळ्या स्वीकारायचा अशी स्वप्ने तो पाहत असे.
असेच दिवस चालले होते, एकदा रम्या दहावीला असताना बाबांबरोबर तालुक्याला बाजाराला गेला होता सुकी मच्छी विकायला बऱ्याचदा त्याला तालुक्याहुन काय आणायचे असले की त्यांच्यासोबत जात असे, गाडीतून उतरल्यावर बाबांना काही काम असल्याने जवळच्या एका ओळखीच्या चहावल्याच्या दुकानाजवळ मच्छीचे बोचके ठेवले आणि रम्याला चटई आणि एक छोटं बोचके घेऊन बाजाराच्या ठिकाणी जाउन नेहमीची मच्छी विकण्याची जागा पाकडायल सांगितले,चहावाल्याला बाकी बोचक्यावर थोडा वेळ लक्ष ठेवायला सांगितले आणि आपले काम करायला निघून गेले. रम्याही बाजाराच्या ठिकाणी गेला आपल्या नेहमीच्या जागेवर जात असताना समोरच एक मोकळी मोक्याची जागा त्याला दिसली त्याने विचार केला आत कोपऱ्यातल्या जागेपेक्षा ही जागा एकदम भारी आहे इथे गिराईक पण खूप मिळतील म्हणून त्याने आपले बोचके तिथे ठेवले आणि चटई अंथरायला लागला इतक्यात बाजूला भाजीचा ठेला लावलेल्या माणसाने त्याला टोकले, "ये पोऱ्या तिथं नको पसरू ती शिरपाशेठची जागा हाय" रम्या "कोण शिरपाशेठ मी पहिला आलोय, माझी जागा झाली" भाजीवाला "आर तू त्याला वळखत नाय ग्राम पंचायत सदस्य हाय तो" रम्या "मंग काय जागा विकत घेतल्याय" तितक्यात पांढऱ्या कपड्यात शिरपाशेठचे आगमन होते तो रांगड्या आवाजात बोलतो "काय रे मच्छीवाल्या इथं काय तुझं, पळ इथंन" पाठोपाठ दोघेजण काहीतरी माल घेऊन आणि खुर्ची घेऊन तिथे येतात ती शिरपाची माणसे असतात, रम्या तसा घाबरणारा न्हवताच तो सुद्धा त्याच पट्टीचा आवाज काढत "मी आधी आलोय मी जागा पकडल्याय" शिरपा "कोणाचं कार्ट हाय हे, मला नडतय" मागून आवाज आला " दाराव्याच्या गणपत नाचण्याचा" शिरपा "कुठं गेला तुझा बाप" इतक्यात मागून बोचके सांभाळत गणपत ओरडत येतो " शेठ काय झालं काय केलं पोरानं" शिरपा "गणप्या कुठं गेला होतास पोराला इथं सोडुन, ज्याम टारगट हाय तुझं कार्ट घेऊन जा त्याला" गणपत अपराधी सुरात "चुकी झाली शेठ, रम्या हित काय करतो आपली जागा तिकडं हाय इसरलास की काय" रम्या "पण बाबा मी ही जागा आधी पकडली" गणपत " चल हितन तुला काय समजत" शिरपाला हात जोडत गणपत पोराला ओढत न्हेतो. ह्या प्रकरणात आपली काय चूक रम्याला काहीच समजले नाही. आपल्या जागेवर जाऊन ते दुकान लावतात. काही वेळाने गणपत मुलाला समजावतो "आर बाबा ती मोठी लोक आहेत त्यांच्या शेपटावर पाय नाय द्यायचा" रम्या मनातच विचार करतो ग्राम पंचायत सदस्य काय एवढं मोठं पद असत व्हय, पण आपल्या गावातले ते पक्षाचे कार्यकर्ते ते पण अशाच उड्या मारत असतात, राजकारणात भारी इज्जत असते राव, आपण पण असेच मोठे कार्यकर्ते नायतर ग्रामपंचायत सदस्य व्हायचे आणि लोकांना दम भरायचा.
बाजार संपतो खरेदी करून रम्या बापासोबत घरी येतो पण त्याच्या डोक्यातन मात्र तो ग्राम पंचायत सदस्य जात नव्हता. त्याने तर मनात असच काहीतरी व्हायचं असे ठरवले. परीक्षा संपली तशी बोर्डाची वैगेरे म्हणून रम्याने काही विशेष अभ्यास केला असे नाही जेमतेम पास होऊन त्याने तालुक्यातील कॉलेजला कला शाखेत प्रवेश घेतला. मुंबईच्या काकाने कॉमर्स घ्यायला सांगितले होते पण अकाऊंटमध्ये आकडे मोड करण्यात त्याला रस नव्हता. शाळेतल्या शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे कला शाखेत राज्यशास्त्र-समाजशास्त्र इत्यादी विषय असतात आणि रम्याला त्याची आवड जास्त होती त्याचा तोच कल पाहून राणे सरांनी त्याला कला शाखेत जाण्याचा सल्ला दिला होता.
कॉलेजमध्ये जायला लागल्यावरसुद्धा इतर मुलांप्रमाणे स्टाईल मारत फिरण्यापेक्षा त्याला राज्यशास्त्र, समाजशास्त्र समजावून घेण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरीच्या काळात त्याला त्याच्याच गावातील भाऊसाहेब भेटला तसे त्याचे नाव सदाभाऊ पण एका मोठ्या पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता म्हणून त्याला सगळे त्याला भाऊसाहेब म्हणत, कॉलेजमधून घरी जाण्यासाठी रम्या स्टँडकडे जात असताना तो त्याला रस्त्यावर बाईकने येताना भेटला. भाऊसाहेब साधारण तीस बत्तीस वयाचा असेल राजकारणात गेल्यापासून त्याला गावात खूप मान मिळत असे, गावातल्या लोकांची छोटी मोठी कामे करणे,आडीनडीला लोकांना उपयोगी पडून त्याबदल्यात पक्षाला जेव्हा लोकांची गरज असेल तेव्हा तो त्यांना घेऊन जात असे. नेहमी पांढरे कपडे आणि त्याची बाईक आणि त्याच्या बाईकचे वेगळेपण म्हणजे पक्षाचे चिन्ह त्यावर छापलेले, हँडलला पक्षाचा झेंडा त्यावर त्याची वेगळीच शान असे. रम्या स्टँडकडे जाताना भाऊसाहेबने बाईक त्याच्यापुढे थांबवली, "काय रम्या, कुणिकडं" रम्या "भाऊ, घरी निघालोय कॉलेजहुन" भाऊ "येतो का फिरायला" रम्या "कुठं भाऊ "तुला काय करायचं चलायचं काम कर फक्त" रम्याला पण त्याच्यासोबत आवडलं असत पण घरी उशीर होईल म्हणून त्याने सांगितले, भाऊ,"स्टँड वर जाऊन कोणाजवळ तरी निरोप दे घरी" ही आईडया चांगली होती "थांब आलोच"म्हणून रम्या धावत स्टँडमध्ये गेला आणि तिथे बसलेल्या सत्याजवळ त्याने आपल्या घरी उशीर होईल असा निरोप दिला. भाऊसाहेबाला नेहमीच पक्ष्याच्या कामासाठी तरुण मुलांची गरज असे आणि त्याला रम्याबद्दल माहिती होती, रम्या बिनधास्त स्वभावाचा, कोनामध्येही सहज मिसळणारा पक्ष्याच्या कामासाठी योग्य कार्यकर्ता होता म्हणून त्याला हेरायचे ह्या हिशेबाने रम्याशी त्याने जवळीक साधायचे ठरवले.रम्या आला भाऊने त्याला बाईकवर डबल शीट बसवले आणि थेट जनहित पक्षाच्या कार्यालयात गाडी थांबवली, रम्या थोडा गोंधळला भाऊने सांगितले "आज इथं कार्यकर्त्यांची मीटिंग आहे, खाय प्यायची चंगळ आहे मजा कर." रम्या शांत होता आपली स्वप्न पूर्तीचा हा एक भाग असल्याचे त्याला वाटले, तो भाऊच्या मागोमाग चालत होता पुढे गावातील पिंट्यादादा भाऊला हात करत त्यांना सामोरा आला, पिंट्यादादा अर्थात शंकर बिऱ्हाडे पातळ अंग काठीचा उंचीने काहीसा ठेंगणा म्हणून पिंट्या नावाने गावात प्रसिद्ध आणि "पिंट्या दादा" तसा शांत स्वभावाचा, उद्योग धंदा नसल्याने राजकारणाकडे वळलेला. तो समोर येताच भाऊने त्याला सांगितले "पिंट्या रम्याची आपल्या कार्यकर्त्यांशी ओळख करून दे मी स्टेजवर जातो" इतकेच बोलून तो निघून जातो पिंट्या रम्याला सोबत येण्याचा इशारा करत म्हणाला " रमेश " ह्या नावाने शाळा कॉलेजातल्या शिक्षकांशिवाय कोणी हाक मारत नसे त्यामुळे थोडा दचकतो "कस हाय आपल्या गावातली गोष्ट वेगळी असते हित चार गावची वेगवेगळी लोक येतात आपली हिकडं थोडी इज्जत हाय त्यामुळं" त्याचे बोलणे अर्धवट कापत "बस का दादा तुम्ही हे सांगायला पाहिजे?" डायरेक्ट आव-जावं ऐकून पिंट्याची छाती जरा दोन इंच फुगली तो समजून गेला पोरग हुशार हाय.
पक्षाच्या हॉलमध्ये दोघे प्रवेश करतात, साधारणपणे शंभर एक माणसे बसतील इतका हॉल आणि चार पाच जनांपुरता स्टेज पुढे माईक लावलेला तीन खुर्च्या टाकलेल्या अशी एकूण व्यवस्था, आत गेल्यावर पिंट्याने रम्याची "रमेश नाचणे" नावाने ओळख करून दिली आणि स्टेजपासून पाचव्या रांगेत ते बसले, हॉल तसा बऱ्यापैकी भरला होता साधारण सत्तर - ऐंशी पब्लिक असेल. थोड्याच वेळात स्टेजवर हालचाली सुरू झाल्या सगळीकडे शांतता पसरली इतक्यात दोघेजण स्टेजवर येतात त्यातला एकजण माईकपाशी येतो एकजण एका बाजूला उभा राहून स्टेजच्या व्यवस्थेवर लक्ष टाकतो आणि माईकपाशी आलेला तरुण माईकवर बोटाने टिचक्या मारत,"हॅलो हॅलो जनहित पक्षाचे तालुका प्रमुख मनोहर राजेसाहेब मंचावर येत आहेत त्यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत" आणि स्टेजवर पाच सहाजनांचा प्रवेश होतो त्यात भाऊसाहेबदेखील असतो त्यातले तिघेजण प्रमुख मंडळी खुर्चीवर बसतात बाकीचे बाजूला उभे राहतात त्यात भाऊसाहेब सुद्धा उभा राहतो, हार तुरे देऊन त्यांचे स्वागत केले जाते नंतर भाषणे सुरू होतात आजचा विषय असतो चार महिन्यांनी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा आणि नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत. राजे साहेबांचे भाषण सुरू झाले दमदार आवाज आणि ठेक्यात बोलणे ह्यामुळे त्यांचे भाषण खूप लोकांना आवडायचे, आपल्या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी योग्य मार्गदर्शन केले आणि नवीन कार्यकर्त्यांना स्टेजवर निमंत्रित केले पिंट्या दादाने रम्याला स्टेजवर जायला सांगितले तो स्टेजच्या दिशेने जातो त्याच्यापुढे दोघेजण मागे तिघेजण असे सहाजण स्टेजकडे जातात त्यात रम्या सगळ्यात लहान असतो.स्टेजवर त्यांच्या गळ्यात जनहित पक्षाचे नाव आणि चिन्ह असलेली पट्टी राजेसाहेबांच्या हस्ते घातली जाते आणि ते त्यांना हात मिळवून स्वागत करतात, रम्याला लय भारी वाटत पक्षाची माळ गळ्यात पडल्यावर तो वेगळ्याच दुनियेत जातो. मीटिंग संपते त्यानंतर त्याच ठिकाणी खाण्या-पिण्याची व्यवस्था असते. मोठे टोप भरून चिकन बिर्याणी आणि शाकाहारी लोकांसाठी व्हेज बिर्याणी अशी व्यवस्था होती. रम्याने चिकन बिर्याणी मजबूत हाणली. त्यानंतर ते घरी जायला निघाले भाऊसाहेबाच्या गाडीवर रम्या डबल शीट आणि पिंट्या गावातल्या एका व्यक्तीसोबत असे रस्त्याला लागले रस्त्यात भाऊसाहेबाने त्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या, राजकारणाचे धडे मिळायला सुरुवात झाली आणि भाऊसाहेब राजकारणातला पहिला गुरू ठरला, काही वेळात ते गावात पोहचले रम्याच्या घराजवळ सोडून भाऊ पुढे गेला. अंगणात उभा असलेल्या राक्याने रम्याला पाहिले आणि जोराने ओरडला, "आये दादा आला बघ" त्याचा आवाज ऐकून बाबा आणि आई लगबगीने बाहेर आले आज्जी बाहेरच बसली होती, त्याला पाहून आई "आर पोरा कुठं होतास इतका वेळ?" बाबा "अग हो आत येऊ दे त्याला" रम्या "सत्याने निरोप सांगितला नाय" आई "अरे हो पण इतका वेळ कुठं, घोर लागला होता नुसता जीवाला" बाबा "कुठं होता इतका येळ?" रम्या कपडे बदलत " भाऊसाहेबा सोबत जनहिताच्या कार्यालयात गेलो होतो सभेला" बाबा "अरे कुठं नादाला लागतो त्याचा काम करून घेईल आणि देईल सोडून काय फायदा नाय" इतक्यात आज्जी "लेकरु भुकेला असलं त्याला चार घास द्या आधी" रम्या "नाय ग आज्जी पॉटभर चिकन बिर्याणी हाणून आलोय" राक्या "अरे व्वा दादा मज्जाच हाय मी पण येणार" रम्या "आता तुला पण न्हेणार मी आता भाऊ सारखा जनहितचा कार्यकर्ता झालोय" खिशातून जनहितची पट्टी काढून राक्याच्या गळ्यात घातली. झोपेपर्येंत सभेत झालेला सर्व प्रसंग घरातल्याना रंगवून सांगत होता.
आता रम्या नेहमीच भाऊसोबत असे गावात जनहीतचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाऊ लागला, कधी कधी आजूबाजूच्या गावांमध्ये पक्षाच्या कामासाठी, कार्यक्रमांसाठी जात असे, ग्रामपंचायत निवडणुकीत खाडीपट्यातल्या जवळ जवळ सर्वच गावांमध्ये जनहीतचे सरपंच निवडले गेले कारण मागील वीस वर्षे तालुक्यात जनहीतचे आमदार-खासदार निवडून येत होते. तीन चार महिन्यात रम्याची पक्षातल्या मोठं मोठ्या लोकांबरोबर ओळख झाली होती, पक्षातील सर्व कामांसाठी तो पुढे असायचा वयाने लहान म्हणून तो सगळ्यांच्या लक्षात राहायचा. काही दिवसानंतर त्याच्या बापाला थोडी भीती वाटू लागली करण दिवसेंदिवस तो राजकारणात अतिशय गुंतत चालला होता, तेव्हा बाप त्याला विरोध करायला लागला.ह्यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी बापाला खुश करायचं त्याने ठरवलं, बापाचं खूप दिवस तालुक्याला सुक्या मच्छीचे दुकान टाकण्याचे स्वप्न होते त्याबद्दल त्याने भाऊजवळ विषय काढला भाऊने देखील त्यावर लगेच अंमलबजावणी केली पक्षातील एका कार्यकर्त्याचे स्टँडच्या बाजूला झोपडी वजा टपरी होती ती त्याच्याशी बोलून भाड्याने घेऊन दिली काय जमेल तसे भाडे द्या ह्या तत्वावर धंदा सुरू करण्याचे ठरले, रम्याचा बाप खुश झाला चार चांगले पत्रे ठोकून व्यवस्थित सफाई करून दुकान उभे राहिले रम्याने त्यावर "भाईचे दुकान" नावाची पाटी ठोकून घेतली आणि तालुका प्रमुख राजे साहेबांच्या हस्ते नारळ वाढवून दुकानाला सुरुवात झाली. दुकान बऱयापैकी चालले होते त्यामुळे बाप खुश होता पैसे पाण्याचा प्रश्न मिटला होता, आता बाप त्याच्या राजकारणामध्ये येत नव्हता.
दुकानाच्या नावामुळे रम्या हळूहळु भाई नावाने ओळखला जाऊ लागला.राजेसाहेबांचा रम्या खास माणूस बनत चालला होता, दुसरीकडे मात्र भाऊसाहेबने पक्षाचे कामाकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली होती कारण होते सरपंच निवडणूक ह्या निवडणुकीत त्याला सरपंच व्हायची इच्छा होती पण पक्षाने संधी दिली नाही याचा त्याला राग होता. इकडे रम्याने मात्र स्वतःला झोकून पक्ष कार्यात दिले होते. खूप दिवस निघून गेले भाऊसाहेब दुसऱ्या पक्षात गेला रम्यालाही त्याने सोबत बोलावले पण रम्याने नकार दिला पिंट्या मात्र भाऊसोबत गेला. ही खरे पाहता चांगली संधी होती गट प्रमुखाचे रिकामे पद त्याला मिळण्याची संधी होती कारण त्याला सोडून गावातील इतर कोणी पक्षात जास्त कार्यरत नव्हते, पण तो अजून लहान होता त्यामुळे पक्ष त्याच्यावर कितपत विश्वास टाकेल हा प्रश्न होता.ह्या सगळ्यात त्याची बारावीची परीक्षा झाली. सुट्टीच्या काळात त्याने संपूर्ण वेळ पक्षाच्या कामासाठी दिला, कॉलेजच्या दोन वर्षांच्या कालावधीत ज्या मुलांबरोबर ओळखी झाल्या होत्या त्यांनासुद्धा त्याने पक्षात आणायला सुरुवात केली जवळ जवळ पन्नास साठ तरुण मुलांची फळी त्याने उभी केली. त्यामुळे त्याचे नाव आमदारापर्येंत पोचले आणि एकदा आमदार तालुक्याला असताना त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी त्याला मिळाली, आमदार राजेश झेंडेसाहेब यांच्या कार्यालयात तो गेला सोबत पाच सहा मित्रदेखील होते. आमदारांनी त्याला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेतले त्याचे कौतुक केले आणि असेच काम करत राहा काही अडचण आली तर मला फोन कर किंवा तालुक्यात असलो तर भेटायला ये तुला परवानगी घ्यायची गरज नाही, तसेच विद्यार्थी संघटना बनवण्याचा सल्ला दिला ह्या कामात राजेसाहेबांची मदत घे त्यांच्याशी मी बोलतो, चर्चा झाल्यावर साहेबांचा निरोप घेऊन जात असताना त्यांच्या सेक्रेटरीने बाजूला न्हेउन त्याला काही पैसे दिले आणि सगळ्यांना होटेलमध्ये न्यायला सांगितले. तिथून निघाल्यावर सगळ्यांना हॉटेलवर खायला-प्यायला दिले,पोर खुश झाली नंतर आपापल्या घरी गेले. आमदार साहेबानी सांगितलेली गोष्ट त्याच्या डोक्यात घुमत होती विद्यार्थी संघटना बनवायची त्याने कामाला सुरुवात केली रिझल्ट येईपर्येंत त्याने एकमेकांच्या ओळखीने अनेक मुलांच्या गाठी भेटी घेतल्या आणि संघटन करण्यास सुरवात केली शंभर दीडशे विद्यार्थ्यांची यादी बनवली जुनीयर आणि सिनियर कॉलेजची मुले मुली अशी ती यादी होती प्रत्येक्षात त्यांना भेटून संघटनेचे महत्व समजावून सांगितले. त्यानंतर राजेसाहेबांजवळ चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडून वेळ घेतली दहा बारा प्रमुख मुलांना घेऊन तो राजेसाहेबांना भेटला, साहेबानी संघटना कशी चालवायची आणि संघटन कसे राखायचे याविषयी सगळ्यांना समजावले आणि रमेश नाचणे याला संघटना प्रमुख जाहीर केले तसेच कॉलेज सुरू झाल्यावर एक कार्यक्रम करण्याचे जाहीर केले त्यानंतर मीटिंग संपली. आज रम्याला लय भारी वाटत होते राजकारणात पहिली पायरी सर केल्यासारखे त्याला वाटले. बारावीचे रिझल्ट आले नेहमीप्रमाणे रम्या जेमतेम पास झाला कॉलेज सुरू झाले, विद्यार्थी संघटनेचे काम करता करता तो खाडी पट्टयातील गावांमध्येही फिरत असे लोकांच्या समस्या जाणून घेत असे आणि त्या वरिष्ठानपर्येंत पोचवत असे त्यात छोटी मोठी कामे होत असत.त्याला आता एक दुचाकी वाहनाची गरज भासू लागली किती दिवस इतर मित्रांच्या भरवसावर राहणार कधी येन वेळी वांदे होत असत.ही समस्या त्याने राजेसाहेबांना सांगितली त्यांनीही गरज ओळखून एक सेकंड हँड गाडीची व्यवस्था करून दिली,गाडी भेटल्यापासून त्याच्या कामाला गती आली. कॉलेज सुरू होऊन दोन तीन महिने उलटले पावसाळा संपत आला आता विद्यार्थी संघटनेचा ठरलेल्या कार्यक्रमाबाबत राजेसाहेबांना आठवण करून दिली आणि एक दिवस ठरवला गेला. आठवडा होता पक्षाचे काही अनुभवी कार्यकर्ते सोबत देऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पत्रके, बिल्ले(बॅच) आणि बॅनर छापण्यात आले त्यावर पक्ष प्रमुख-जेष्ठ नेते -आमदार -खासदार -तालुका प्रमुख व इतर प्रमुख मंडळींच्या खालोखाल विध्यार्थी संघटना प्रमुख म्हणून रमेश नाचणे यांचा फोटो नावासह झळकला. कार्यक्रमाला आमदार झेंडेसाहेब स्वतः उपस्थित राहणार होते, कार्यक्रम तालुक्यातल्या गोल मैदानात आयोजित करण्यात आला होता,कार्यक्रम जोरदार करण्यासाठी सगळ्यांनी खूप मेहनत घेतली होती, कार्यक्रमाला सुरुवात झाली होती कार्यकर्ते, विद्यार्थी मिळून जवळ जवळ पाचशे ते सहाशे पब्लिक मैदानावर होते रम्याने कार्यक्रमासाठी खास पांढरा सदरा शिवला होता, स्टेजवर एक एक करून प्रमुख मंडळी येत होती आमदार आणि तालुका प्रमुखांसोबत रम्याही स्टेजवर येतो कार्यक्रमाला सुरुवात होते काही सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यावर भाषणांना सुरुवात होते, रमेश नाचणे विद्यार्थी संघटना प्रमुख याला भाषणासाठी स्टेजवर निमंत्रित करण्यात येते, टाळ्यांचा कडकडाट होतो तेव्हा रम्या अंगात वीज संचारल्याप्रमाणे माईकसमोर जातो आणि निडरपणे सराईत वक्त्याप्रमाणे दहा ते पंधरा मिनिटे भाषण ठोकतो, भाषण सुरू असताना सगळीकडे शांतता प्रत्येक्षात आमदारसाहेबसुद्धा पाहत बसतात आणि आपल्या भाषणाच्यावेळी रम्याची तारीफ करायला विसरत नाहीत.कार्यक्रम जोरदार झाला रम्याची कॉलेज पासून गावापर्येंत चर्चा सुरू झाली आणि तेव्हापासून दिवसेंदिवस राजकारणात त्याचे कार्य वाढत गेले लहान असून शब्दाला मान मिळू लागला, वरचेवर आमदारांशी भेटीगाठी असल्यामुळे एक वजन निर्माण झाले होते. खाडी पट्यात प्रत्येक कार्यक्रमात तो हजर असे आणि त्याचे भाषण होत असे. आमदारांनी त्याला सांगितले होते खाडी पट्टा ज्याच्या ताब्यात तो तालुक्याचा राजा हे कधीच विसरू नको करण खाडी पट्यात तालुक्याची चौतीस गावे होती. त्यामुळे त्याने तिथे जनसंपर्क वाढवला होता,आपल्या बोलण्याच्या लकबीमुळे लोकांमध्ये फेमस होत होता. दुसरीकडे विद्यार्थी संघटनेचीही कामे जोरात सुरू होती त्या कामांसाठी त्याने खास मार्जितल्या मुलांची टीम बनवली होती, क्रिकेट सामने भरवणे, विविध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, कोणाचे वैयक्तिक समस्येमध्ये मदत करणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे तो कॅलेंजमध्ये सगळ्याच्या गळ्यातील ताईत बनत चालला होता, आता तो त्यांच्यासाठी रम्या नाही तर भाई बनला होता,त्यात आमदार साहेबांचा डोक्यावर हात, पण त्या गोष्टीचा कधीही वैयक्तिक फायदा करून घेतला नाही.
क्रमशः
(संपूर्ण कथा, कथेतील पात्र काल्पनिक असून त्याचा कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी साधर्म्य आढळल्यास केवळ योगा योग समजावा, कथा केवळ वाचकांच्या मनोरंजनाच्या हेतूने लिहली आहे)