Chahul - First Love... - 5 in Marathi Love Stories by Priyanka Kumbhar-Wagh books and stories PDF | चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ५)

Featured Books
Categories
Share

चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची... (भाग - ५)

(नमस्कार रसिक वाचकहो!!! सर्वप्रथम माझ्या कथेला छान प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. तसेच ज्या वाचकांनी वेळात वेळ काढून प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद. अशीच साथ कायम असु द्या. काही तांत्रिक कारणामुळे गेल्या शनिवारी कथेचा भाग प्रकाशित करू शकले नाही त्यामुळे क्षमस्व.)


बघता बघता दहावीची परीक्षा दोन दिवसांवर आली. हर्षने स्वतःला अभ्यासात पूर्ण झोकून दिले. दिवसरात्र तो फक्त आणि फक्त अभ्यास करू लागला. केवळ विरंगुळा म्हणून पाच - दहा मिनिटांसाठी तो बाहेर फेर फटका मारून यायचा. तर इकडे मुग्धाची स्तिथी फार बैचेन होऊ लागली. तिला केवळ एकच प्रश्न सतावत होता "हर्षने मला बघूनही न बघितल्यासारखे का केले ?" शाळेत जाताना, घरी परत येताना ती सतत हर्षची वाट पाहू लागली. तो कधीतरी बाहेर दिसेलच या आशेने ती त्याच्या घरासमोरून फेऱ्या मारू लागली. तिचे कशातही मन रमत नव्हते. अभ्यासातही अजिबात लक्ष नव्हते. आधी सारखी हसत - खेळत वागणारी मुग्धा आजकाल खूपच गंभीर आणि शांत झाली होती. नेहमी स्वतःच्या विचारांमध्ये हरवून जायची.

मुग्धामध्ये झालेला हा बदल तिच्या आईच्या लक्षात यायला फार उशीर लागला नव्हता. मुग्धा कोणत्यातरी कारणाने अस्वस्थ आहे, हे आईच्या लक्षात आले होते. परंतु आईने मुग्धाला कधीही विचारण्याचा प्रयत्न केला नाही. तिने मुग्धाला तिचा स्वतःचा वेळ देण्याचा निर्णय घेतला. शिवाय आईला माहित होते, कि योग्य वेळ आली कि मुग्धा स्वतः तिच्याजवळ येऊन तिच्या मनातील सगळ्या शंकांचे निरसरण करेल आणि मनही मोकळे करेल. खरंतर माणसाच्या जीवनामध्ये चांगल्या क्षणांसोबतच असे काही दुःखद क्षण येणे ही तेवढेच महत्वाचे असते. कारण जोपर्यंत आपण दुःख भोगत नाही तोपर्यंत सुखाची चव कळत नाही. तसेच चांगल्या अनुभवांसोबतच वाईट अनुभव माणसाला जीवनाचे अमूल्य धडे शिकवून जातात. प्रत्येकाने सुख, दुःख, चांगले, वाईट, प्रेम, तिरस्कार, राग, लोभ, मान, अपमान या सगळ्या भावनांचा अनुभव घेणे आणि त्या जगणे अत्यंत गरजेचे असते. त्यातूनच व्यक्तीची मानसिक दृष्टी प्रगल्भ होते.

मुग्धा नेहमीप्रमाणे शाळेतून घरी यायला निघाली असताना वाटेत तिला तिच्या मैत्रिणींचा ग्रुप दिसला. आज दहावीचा पहिला पेपर असल्यामुळे त्या सगळ्याजणी त्यांच्या काही दहावीतल्या मित्र - मैत्रिणींना 'ऑल द बेस्ट' देण्यासाठी थांबल्या होत्या. मैत्रिणींना बघून मुग्धाच्या मनात लगेच विचार आला, "आज हर्षचा पहिला पेपर आहे. मलाही त्याला 'ऑल द बेस्ट' विश करता आले असते तर किती बरे झाले असते." आणि अचानक हर्ष समोरून येताना तिला दिसला. ती धावतच हर्ष जवळ गेली आणि धापा टाकत म्हणाली,"हर्ष, दहावीच्या परीक्षेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा! खूप छान पेपर लिही." तिने त्याला शेक हॅन्ड करण्यासाठी हात पुढे केला. पण हर्ष एक शब्दही न बोलता तिथून निघून गेला. एका क्षणातच मुग्धाच्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद कुठेतरी दूर पळून गेला. हर्षच्या वागण्याने तिच्या डोळ्यांत अश्रू आले. क्षणाचाही विलंब न करता ती थेट घरी गेली. घरी गेल्या गेल्या तिने स्टडीरूमचा दरवाजा आतून लावून घेतला आणि अखेर दाटून आलेल्या कंठाची वाट तिने मोकळी केली. हुंदक्यांचा आवाज बाहेर कोणाला जाऊ नये म्हणून तिने स्वतःला चादरीमध्ये गुंडाळून घेतले होते. सलग दोन तास रडल्यानंतर तिने स्वतःला सावरले. तिच्या मनात अनेक प्रश्न येऊ लागले,"हर्षच्या अशा वागण्याने मला इतका त्रास का होत आहे? मी स्वतःहून त्याला सांगितले होते कि मला विसर मग आता तो मला ओळख दाखवत नाही तर मला का फरक पडतोय? त्याच्यासाठी मी का एवढी रडतेय? तो एकदातरी दिसावा यासाठी का मी त्याच्या घराजवळ फेऱ्या मारते? त्याच्याशी बोलण्यासाठी मी का झुरतेय? हे सगळं माझ्यसोबतच का घडतंय?" प्रश्न अनेक पण एकाचेही उत्तर तिला मिळत नव्हते. तिला आईशी बोलावेसे वाटत होते परंतु हर्ष बद्दल तिने अद्याप घरी सांगितले नव्हते. तिला काहीच सुचत नव्हते म्हणून ती सरळ स्नेहलकडे गेली.

स्नेहलला घडलेलं सगळं मुग्धाने सांगितले. अजूनही तिचे डोळे पाण्याने भरले होते. मुग्धाचे सगळं ऐकून घेतल्यावर स्नेहलला सारा प्रकार लक्षात आला. ती एकदम गांभीर्याने मुग्धाकडे बघू लागली. मुग्धा ही अगदी केविलवाण्या नजरेने तिच्याकडे पाहत होती. तिला वाटत होते स्नेहल तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल आणि तिला या सगळ्यातून बाहेर काढेन. म्हणून ती फार आशेने तिच्याकडे बघत बसली. तेवढ्यात स्नेहल अचानक मोठमोठ्याने हसायला लागली. मुग्धा स्नेहलकडे आश्चर्याने पाहू लागली. तिला काहीच कळत नव्हते कि स्नेहल अशी अचानक का हसत आहे . स्नेहलला हसू आवरताच येत नव्हते. ती मुग्धाकडे पाहून अजून जोरात हसू लागली. आता मात्र मुग्धाला तिचा खूप राग येऊ लागला. काहीही न बोलता ती तिथून घरी जायला निघाली . तितक्यात स्नेहलने मुग्धाचा हात धरून तिला थांबवले.

"अगं ए वेडाबाई, किती तो नाकावर राग! लगेच रागवून चाललीस कुठे ?" स्नेहल मुग्धाला लाडीगोडी लावत म्हणाली.

"मला तुझ्याशी बोलायचे नाही. सोड बघू माझा हात!" मुग्धा रागात हात सोडवत म्हणाली.

"अगं, मी तर तुझी थोडी मस्करी करत होते." स्नेहल म्हणाली.

"इथे मी एवढी रडतेय आणि तुला हसू येतंय ना! मला मुळात बोलायचंच नाही." मुग्धा पुन्हा रागात म्हणाली.

"बरं बाई! माफ कर मला. आता पुन्हा नाही हो हसणार. चल ये. इथे बस. " स्नेहल मुग्धाला समजावण्याच्या स्वरात म्हणाली .

"पुन्हा जर असं वागलीस ना... तर बघच. तुझ्याशी कधीच मी बोलणार नाही." मुग्धा लटक्या आवाजात म्हणाली.

"बरं, आधी पाणी घे. शांत हो. आता मी काय सांगतेय ते नीट ऐक." पाण्याचा ग्लास मुग्धाला देत स्नेहल म्हणाली.

पाणी पिऊन झाल्यावर मुग्धा म्हणाली. "हम्म. आता बोल."

"मुग्धा, एकंदरीत हा सगळा प्रकार लक्षात घेत असं दिसून येतंय, कि तुला ही हर्ष आवडायला लागला आहे." असे म्हणत स्नेहल मुग्धाच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपू लागली.

"काय!!!! काहीही काय म्हणतेस. असं काहीच नाही आहे. " मुग्धा आश्चर्याने बोलू लागली.

"खरं तेच बोलतेय मी. एवढंच नाही तर तू हर्षवर प्रेम ही करायला लागली आहेस." स्नेहल म्हणाली.

"तुला काय वेड लागलंय का ? तू काहीही बडबड करत आहेस. खरंच असं काहीच नाही आहे गं. " मुग्धा एकदम त्रासून म्हणाली.

"हे बघ मुग्धा, मी काही फालतू बडबड करत नाही आहे. तुझ्या वागण्यावरून, बोलण्यावरून मी जे काही अनुभवले आहे मी तेच तुला सांगत आहे. " स्नेहल म्हणाली.

"हो. पण मला असं नाही वाटत कि माझं हर्षवर प्रेम आहे. कदाचित त्याने अचानक माझ्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे म्हणून मला त्रास होत आहे. आणि प्रेम म्हणजे नक्की काय असतं मुळात हेच मला माहित नाही. मग त्याच्यावर प्रेम कसं करेन मी? " मुग्धा म्हणाली.

"तू आधी ऐकून घे बरं माझं." स्नेहल म्हणाली.

"बरं! बोल. " मुग्धा म्हणाली.

"सुरुवातीला हर्ष तुझा पाठलाग करायचा तेव्हा तुला त्याचा खूप राग यायचा. तुला असं वाटायचं कि तो चांगला मुलगा नाही. टपोरीगिरी करून मुलींना त्रास देणारा मुलगा आहे. पण त्यानंतर तुला समजलं कि त्याचा तुला त्रास देण्याचा कोणताही हेतू नाही. म्हणून तुझ्या मनात त्याच्याबद्दल असलेला राग कमी झाला. मग एकदा अचानक त्याने तुला मैत्री करण्यासाठी विचारले आणि तू ही ते सहज स्वीकारलेस कारण तुलाही त्याची मैत्री हवी होती. तुम्ही दोघेही खूप चांगले मित्र झाले. तुला असं नेहमी वाटायचं कि तुमची मैत्री कधीच तुटू नये. पण त्याने अनपेक्षितपणे तुझ्यासमोर येऊन त्याच्या प्रेमाची कबुली दिली आणि तुला तो धक्का सहन झाला नाही. त्यामुळे तू सरळ त्याच्या प्रेमाचा अस्वीकार केला. तू स्वतः त्याला तुझ्यापासून दूर जाण्यास सांगितले. मला विसरून जा असे तू त्याला बजावले. आणि आता तो तुझ्यापासून दूर जात आहे, तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहे तर मग तुला एवढा त्रास का होत आहे? याचा कधी विचार केलास का? एखादी व्यक्ती आपल्या जवळ असते तेव्हा कदाचित आपल्याला त्या व्यक्तीची किंमत कळत नाही. पण जेव्हा ती व्यक्ती आपल्यापासून दूर जाते तेव्हा तिची खरी किंमत आपल्याला कळते. मला असं वाटतंय कि तुझ्या बाबतीतही असंच झालं आहे. हर्ष जवळ असताना तुला त्याचे प्रेम समजले नाही. आता तो दुर्लक्ष करत आहे, तर तुला त्याची सतत आठवण येत आहे. तुला त्याच्याशी बोलावेसे वाटत आहे. तो तुला दिसत नाही म्हणून तुझे मन झुरत आहे. हे प्रेम नाही तर काय आहे मुग्धा ?" स्नेहलने मुग्धाला विचारले.

स्नेहलचे बोलणे ऐकून मुग्धाचं डोकं पूर्णपणे जड झाले. तिला काय बोलावे काहीच कळत नव्हते. थोडावेळ शांत बसून ती पुन्हा बोलू लागली,"स्नेहल, एखादया व्यक्तीची आपल्याला सवय लागली असेल आणि अचानक ती व्यक्ती आपल्यापासून दूर गेली तर साहजिकच आहे कि असा त्रास होणारच. मग याला प्रेम कसे म्हणता येईल?"

"अगदी बरोबर. जर तुला हर्षची सवय झाली असेल तर कदाचित त्यामुळे तुला आता त्रास होत असेल. पण मुग्धा, मला सांग, सतत हर्षचा विचार करणे, त्याच्या घराबाहेरून फेऱ्या मारणे, त्याला बघण्यासाठी सतत तुझी धावपळ करणे आणि त्याने तुझ्याकडे दुर्लक्ष केले कि तुझे असे ढसाढसा रडणे या सगळ्या गोष्टी तुला फक्त त्याची सवय झाली आहे म्हणून घडत आहे असं वाटतंय का? " स्नेहलने पुन्हा प्रश्न विचारला.

मुग्धा पुन्हा बुचकळ्यात पडली. आता काय उत्तर द्यावे तिला खरंच सुचत नव्हते. खरंतर दोघीही फक्त नववीत असल्यामुळे त्यांच्या वयाच्या हिशोबाने त्या प्रेमच्या बाबतीत त्यांची गणिते मांडत बसल्या होत्या. अचानक मुग्धाला काहीतरी सुचले आणि ती बोलू लागली,"स्नेहल, अंग हे आकर्षण तर नसेल ना? म्हणजे मला हर्षचे आकर्षण तर झाले नसेल ना?"

"आकर्षण!!!" हाहाहाहाहा.... स्नेहल मोठमोठ्याने हसू लागली.

"इथे माझा एवढा गोंधळ उडालाय आणि तुला हसायला येतंय ना." मुग्धा रागात म्हणाली.

"लोग केहते है, आकर्षण ही प्यार कि पेहली निशाणी होती है।" स्नेहल मुग्धाला चिडवत म्हणाली.

"ए गप्प बस गं! पुरे आता थट्टा. मी चालली घरी . आई वाट बघत असेल. बाय. " मुग्धा म्हणाली.

"हो. पण नक्की विचार कर हा... हे आकर्षण आहे कि प्रेम???" स्नेहल म्हणाली.

मुग्धाच्या डोक्यात विचारांचे चक्र पुन्हा सुरु झाले. हे खरंच प्रेम आहे कि फक्त आकर्षण?


क्रमशः


(नमस्कार रसिक वाचकहो!!! साहित्य क्षेत्रातील "चाहूल - पहिल्या वहिल्या प्रेमाची" ही माझी पहिलीच प्रेमकथा आहे. अगदी पहिल्यांदाच कथा लिहीत असल्यामुळे मनात भीती, खूप साऱ्या शंका आहेतच शिवाय तुम्हा सगळ्यांना कथा आवडेल कि नाही, याचा ही थोडाफार ताण आहे. काही चूक भूल झाली असल्यास क्षमा करावी. आणि तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया आणि रेटिंग्सने माझा उत्साह वाढवावा ही नम्रविनंती. धन्यवाद!!!)


(टिप : या कथेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती कु. प्रियांका कुंभार यांची असून , या कथेचे सर्व अधिकार फक्त कु. प्रियांका कुंभार यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कथा ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )