School in Marathi Short Stories by Mangal Katkar books and stories PDF | शाळा

Featured Books
Categories
Share

शाळा

“ बे एकं बे , बे दुनं चारं, बे तिरकं सहा...” असं पाढ्यांचं पालुपद राणी झोपडीच्या एका कोप-यात बसून करत होती. दुर्गीनं कौतुकानं आपल्या पोरीकडं बघीतलं आणि ती कपडे धुवायला दारात बसली. दुर्गीचा दोन वर्षाचा लहान मुलगा बाळू राणीच्या आजूबाजूला बागडत होता. अचानक राणीला काहीतरी आठवले व ती दारात कपडे धुणा-या दुर्गीला म्हणाली, ”आय ये आय, ऐक की गं ! माझी साळा कवा चालू व्हनार हाय ? ” दुर्गी म्हणाली , “आता व्हनार की चालू. मग माझी बाय साळत जाईल, अब्यास करीलं ! ” असं म्हणत दुर्गीनं मायेने राणीच्या चेह-यावरून हात फिरवला व आपल्या कानसुलाजवळ कडाकड बोटं मोडली. आईचं बोलणं ऐकून राणी आनंदाने नाचायला लागली. तिला खरचं वाटलं की आता आपली शाळा चालू होईल आणि मग मज्जाच मज्जा येईल. त्या सात वर्षाच्या चिमुरडीला करोनामुळे निर्माण झालेल्या वास्तव परिस्थितीची जाणीवचं नव्हती.
लॉकडाऊनची झळ सगळ्यांनाचं पोहचली होती. राणीचा बाबा भीवा आणि आई दुर्गी दोघंही रस्त्यावरचं प्लँस्टीक व भंगार विकून आपला उदरनिर्वाह चालवायचे. पण लॉकडाऊनमुळे त्यांना बाहेर जाता येत नव्हतं. सरकारकडून मिळणारी अन्नधान्याची मदत , स्वयंसेवी संस्थांकडून मिळणारी विविध प्रकारची मदत यांवर राणीचे आई-वडील संसार चालवत होते. दिवसा मागून दिवस जात होते. करोनामुळे निर्माण झालेली अस्थितरता सुरळीत करण्यासाठी सरकारने राज्यात अनलॉकची प्रक्रिया सगळीकडे हळू हळू सुरु केली. मुलांच्या आरोग्याचा विचारकरूनचं शासनाने शाळा मात्र सुरु केली नव्हती. सरकारने ऑनलाईन शिक्षणाची सोय केली होती खरी , पण ती सगळ्या मुलांपर्यंत पोहचत नव्हती. हातावरचं पोट असणारे मोबाईल, टी.व्ही., रेडियो आणणार तरी कुठून ?
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यावर भीवा एकटाच काम करायला जायला लागला. दुर्गीला तिस-यांदा दिवस गेले होते. तिचा सातवा महिना असल्याने ती भीवाबरोबर प्लॅस्टीक व भंगार वेचायला जात नव्हती. आपला बाबा कामासाठी घराबाहेर जातो आहे, हे बघितल्यापासून राणीला सारखे वाटत होते की आपली शाळासुद्धा आता सुरू होणार! राणी शाळेच्या ओढीने रोज सकाळी उठून आपलं स्वत:चं आवरून बसायची. भीवा बाहेर जायला लागला की ‘ शाळेत सोड ‘ म्हणून मागे लागायची. रोज नवनवी कारणं सांगून भीवा तिची समजूत घालत असायचा. राणीला शाळेतल्या गंमती-जमती आठवायच्या. शाळेत मिळणारी खिचडी, शिरा, इडली तिला आठवायचे. वर्गात उभं राहून म्हटलेलं राष्ट्रगीत आठवलं की ती झोपडीत उभी राहून राष्ट्रगीत म्हणायची. सुट्टीत मनसोक्त खेळणारी राणी अनलाँक सुरु झाल्यापासून शाळेच्या ओढीने बेचैन होत होती. तिचं खेळात मन रमेनासं झालं. फाटकं दप्तर घेऊन ती शाळेत बसतात तसे बसायची. मध्येच लहानग्या बाळूला कविता शिकवायची. कधी पाढे म्हणायची, कधी फाटक्या वहीवर चित्र काढायची. दुर्गी आपल्या मुलीची शाळेसाठी होणारी घालमेल बघून एका बाजूला सुखावत होती, तर दुस-या बाजूला आपण काही करू शकत नाही म्हणून दु:खी होत होती.
त्या दिवशी रोजच्या प्रमाणे भीवा सकाळीच घराबाहेर पडला. दुर्गीही आपल्या कामाला लागली. राणी मात्र शांत होती. तिने रोजच्या सारखे शाळेविषयी ना आईला विचारले, ना बाबाला. ती कसला तरी विचार करत शांत बसली होती. बाळू मधे-मधे जाऊन तिला बोलवत होता. ओढून बाहेर न्यायला सांगत होता. राणी काही बोलत नव्हती. शेवटी दुर्गी म्हणाली, “ अग ये रानी ! जा की जरा बाळूला घेऊन बाहिर. एकटंचं पोरगं कुठं गेलंबिलं तर काय करायचं सांग आपुन ? जा लेकी. ऐक माझं येवढं .“ आईचं बोलणं ऐकून राणी उठली. फाटकं दप्तर घेतलं व बाळूला उचलून कडेवर घेऊन बाहेर मोकळ्या जागेत गेली. आजूबाजूच्या झोपडीतली मुलं मोकळ्या जागेत खेळत होती. राणीने बाळूला त्या मुलांसोबत खेळायला सोडलं व ती एका झोपडीच्या आडोशाला बसली. थोड्या वेळाने नजमा खेळायला आली. तिने राणीला हाक मारली ,” ये रानी! खेलनेकु आ.” राणी म्हणाली, “ मला नाय खेळायचं तुमच्यासंग ? म्या इथ माझ्या दप्तरासोबत खेळते हाय.” नजमाने आश्चर्याने पाहिले व ती इतर मुलींबरोबर खेळायला लागली. राणी दप्तरातली फाटकी पुस्तकं, वह्या काढून बघत होती. काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करीत होती.
काही वेळाने बाळू रडायला लागला. राणीने आपली वह्या- पुस्तकं दप्तरात भरली. दप्तर पाठीला लावले व बाळूला उचलून घेऊन ती घरी आली. आईच्या हातात भावाला सोपवून राणी काही न बोलता शांतपणे झोपडीबाहेर पडली. राणीने दप्तरातला पाटी पुसायचा फडका काढला व मोठी माणसं तोंडाला बांधतात तसा बांधला. तोंडाला बांधायचा कपडा स्वच्छ असावा लागतो, हे ही त्या बिचारीला माहित नव्हते. दप्तर पाठीला अडकवलं व ती तरातरा चालत वस्तीच्या बाहेर निघाली. नजमाने हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण तिने लक्ष दिले नाही. तिला शाळेचा रस्ता माहित होता. कोणी आपल्याला अडवू नये म्हणून ती इकडेतिकडे बघत, लपत जात होती. नवी मुंबई महानगरपालिकेची शाळा थोडी आडबाजूला होती. रहदारी कमी असणा-या त्या भागात करोना आल्यापासून कोणी फिरकत नव्हतं. राणीला शाळेचा रस्ता माहित असल्याने ती अर्ध्या तासात शाळेच्या गेटजवळ आली. शाळा बघून राणीचा चेहरा खुलला. पण गेटला लावलेला टाळा बघून मात्र ती हिरमुसली. नेहमी शाळेच्या गणवेशात असलेली, दोन वेण्या बांधलेली राणी आज वेगळ्या अवतारात शाळेजवळ आली होती. केस पिंजारलेले, मळका झगा घातलेला, तोंडाला मळका कपडा बांधलेला अशा अवस्थेत ती शाळेच्या गेटसमोर उभी होती. शाळा खरचं बंद होती. ‘ आता काय करावे ‘ या विचारात असताना तिला शाळेचा मागचा रस्ता आठवला. ती धावत शाळेच्या मागच्या बाजूला गेली. मागच्या बाजूने ती शाळेच्या मैदानावर आली. ब-याच दिवसांनी दिसणारी शाळा, मैदान तिथले झोपाळे, घसरगुंडी सगळं बघून तर ती हरकूनचं गेली. ती हसायला लागली. पाठीवरचे दप्तर काढून तिने मातीत फेकून दिले व ती धावत जाऊन झोपाळ्यावर बसली . ‘ झू झू झोपाळा, नेऊ चला आभाळा ‘ असं म्हणत ती आनंदाने झोके घ्यायला लागली. खूप दिवसांनी असं खेळायला मिळाल्यामुळे ती पाठ असणा-या कविता येतील तशा म्हणत होती व मनसोक्त झोके घेत होती.
कविता, गाणी, पाढे म्हणून मन भरल्यावर ती झोपाळ्यावरून उतरली व घसरगुंडीवर घसरायला लागली. मैदानात लावलेल्या बारला लटकली. कधी इकडे पळ, कधी तिकडे पळ असं नुसतं तिचं चाललं होतं. इतके दिवस घरात तिला मुक्तपणे खेळता आले नव्हते. त्यामुळे ती मनमुराद खेळत होती. तीन-चार तास कसे उलटले तिला कळलेच नाहीत. तिच्या पोटात कावळे ओरडायला लागले. तिला आठवले की सकाळी आईने साखरलावून दिलेली चपाती न खाता आपण दप्तरात लपवून ठेवली आहे. तिने पटकन ती चपाती बाहेर काढली व गपागप खाऊन टाकली. मैदानात मुलांना पाणी पिण्यासाठी नळ होता. धावत जाऊन त्या नळावर पोटभर पाणी प्यायली. पोट भरल्यावर राणीला हुरूप आला. ती पुन्हा खेळण्यात दंग झाली.
खूप वेळ राणी घरी आली नाही म्हणून दुर्गीने हाका मारायला सुरूवात केली. एरवी एका हाकेत येणारी राणी काही आली नाही. दुर्गीचा पारा चढला. तिने बाळूला कडेवर घेतलं व “ रानी ये रानी s s “ अशा हाका मारत वस्तीभर फिरली. पण राणीचा ठावठिकाना काही समजला नाही. एवढ्यात तिला नजमा दिसली. तिनं नजमाला विचारले, “ अग ये नजमा ! रानी कुठं दिसली काय ? “
नजमा म्हणाली , “ चाची . रानी तो सुबही बस्ती के बाहर गयी.”
“ अरं देवा! आता काय करू ? मी पोटुशी बाई या पोराला घिऊन कुटं शोधु ? सकाळपासनं पोर घराच्या बाहिर हायं. काय झालं असलं माझ्या पोरीचं ?”, असं म्हणत दुर्गीनं हंबरडा फोडला. आजूबाजूच्या झोपड्यांतील लोक जमा झाले. एकमेकांना विचारू लागले. तिची समजूत काढू लागले. थोडा वेळ असाचं गलका चालू राहिला.
एवढ्यात एक पोरगं जोरात ओरडलं ,” रानी आली, रानी आली.”
दुर्गीच्याभोवती जमलेली गर्दी पांगली. सुलेमान चाचा हाताला धरून राणीला घेऊन येत होते. लाल मातीने माखलेली राणी सहीसलामत आलेली बघून दुर्गीचा जीव भांड्यात पडला. आपलं पोट सांभाळत ती उठली व राणीकडं झेपावली. राणीला आपल्या पोटाशी धरत म्हणाली, “कुटं सापडली माजी लेक दादा ? लयी उपकार जालं. तुम्ही नसता आनि कुन्या राक्षसाला घावली असती तर...” असं म्हणत दुर्गी जोरात रडायला लागली.
सुलेमान चाचा म्हणाले, “ ताई रडू नको. खुदा का शुक्र की मैं आज स्कूल के रास्ते गया. तिथं ही खेळताना दिसली. समंदी चौकशि केल्यावर कळलं की ही कुनालाभी सांगून आली नाय. ‘ माजं म्या घरला जातो, तुम्ही कामाला जावा, ‘ असं ती मला सांगित व्हती. पर अशा वातावरनात एकल्या पोरीला कसं सोडनार ? म्हनून म्या तिला सोबतचं आनली.” रानीकडं बघून चाचा म्हणाले, “ बेटा, असं कुनाला न सांगता जायचं नायं. सगळी मानसं चांगली नायीत. अल्लाची मेहरबानी म्हनून मला सापडलिस.“
दुर्गीने सुलेमान चाचाचे हात जोडून आभार मानले. सुलेमान चाचा आपल्या कामाला निघून गेले. गर्दी पांगली. दुर्गी राणीला व बाळूला घेऊन आपल्या झोपड्याकडे निघाली. ती विचार करत होती की राणीने एवढा वेळ शाळेजवळ काय केले असेल? पण तिने राणीला काहीही विचारले नाही. घरात आल्यानंतर तिने राणीला अगोदर आंघोळ घातली. दिवसभर पोरगी उपाशी म्हणून तिला पोटभर खायला दिले व ती आपले काम करत राहिली. राणी घाबरून स्वत:हून काही बोलत नव्हती. संध्याकाळी भीवा घरी आला. त्याला राणीविषयी सगळं कळलं होतं. पण तोही काही बोलला नाही.
राणीही आल्यापासून गप्प होती. रात्रीचं जेवणं झाल्यावर भीवा आपण आज दिवसभर काय काय केले ते दुर्गीला सांगू लागला. ते ऐकत असताना राणीलाही आपल्या दिवसभराच्या गंमती-जमती सांगाव्याशा वाटू लागल्या, पण सांगणार कुणाला? आई- बाबा रागावलेले. मग ती हळूच बाळूला म्हणाली, " बाळू, म्या कुटं गेलते माहित हाय ? आज म्या साळंत जाऊन आलो. साळा खरचं बंद हायं. पर म्या तिथं लई मज्जा केली. झोपाळ्यावर बसलो, घसरगुंडीवर चढलो, मैदानावर उड्या मारल्या, मातीत खेळलो. मला साळंची लई आटवन येत व्हती म्हनून म्या गेलती. मला वाटायचं आय मुददाम साळतं सोडत नाय, पर तित गेल्यावर दिसलं साळा बंद हाय. आता कदीभी म्या असं जानार न्हाय. आय लय रडली रं ! म्या आयचं ऐकायं पायजे व्हतं नव्हं? “ हे बोलताना राणीचे डोळे पाण्याने भरले. तिचं हे समजुतीचं बोलणं ऐकून भीवाचे व दुर्गीचेही डोळे भरून आले. भीवाने तिला पोटाशी धरले व हलक्या हाताने तो तिला मायेने थोपटू लागला. दुरून कुठून तरी हलकेचं गाण्याचे बोल ऐकू येऊ लागले, “ सुरमई अँखियों में नन्ना मुन्ना एक सपना दे जा रे....”
- मंगल कातकर