Half hearted love story in Marathi Love Stories by Sopandev Khambe books and stories PDF | अधुरी प्रेम कहाणी....

Featured Books
Categories
Share

अधुरी प्रेम कहाणी....

साधारण ९० व्या दशकाच्या उत्तराधातील ही कथा आहे, ज्या वेळी प्रेम म्हणजे लफडं असे सर्वसामान्य मानत,सुसंस्कृत घरांमधील मुलींना ह्या प्रकारणांपासून चार हात लांब राहण्याचे सल्ले दिले जात. साधारणतः तारुण्यात मुलगा किंवा मुलगी यांच्या बुद्धी क्षमतेचा विचार करून त्यांच्याकडून अशी काही चूक घडेल की संपूर्ण आयुष्यावर त्याचे पडसाद उमटतील ह्या भीतीपोटी पालक अशी बंधने आपल्या मुलांवर लादत असत, परंतू तारुण्याकडे झेप घेणारी ही पाखरे प्रेम या गोड अवस्थेकडे आपोआपच आकर्षित होतात त्यात कोणी तरतो तर कोणी बुडतो.
ही कथा त्याच काळातील अश्याच एका प्रेमी युगुलाची आहे, सर्वात आधी या कथेतील नायिकेविषयी जाणून घेऊ नमिता ही एका उच्च जातीतील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी, दिसायला देखणी, नाकी डोळी अगदी सिनेमातील नायिकेला तोडीस तोड घरची परिस्थिती तशी गरीबच कोकणातील खेड्यातील हे कुटुंब, परिस्थिती जरी बेताची असली तरी संस्कारी त्रिकोणी कुटुंब म्हणजेच कुटुंबात नवरा बायको आणि मुलगी. नामिताचे आई- वडील जेमतेम अक्षर ओळख होईल इतके शिकलेले पण मुलगी असली तरी तिला शिकवून सवरून मोठे करायचे ही जिद्द .शेती आणि प्राथमिक शाळेत वडील शिपाई हे उपजीविकेचे साधन. कथेची सुरुवात ही नमिता दहावी पास झाल्यावर कॉलेजमध्ये प्रवेश करते तेव्हा पासून होते, ती शालेय शिक्षणात हुशार विद्यार्थी म्हणून गणली जायची दहावीलाही पंच्याऐंशी टक्के मार्क्स मिळवून पास झाल्याने गावात चांगले नाव होते, गुणाची पोर म्हणून सर्वत्र कौतुक त्यात कोणाच्या अध्यात ना मध्यात, मितभाषी आजच्या भाषेत गुड गर्ल म्हणावी अशी.
दहावीच्या शिक्षणा नंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तालुक्याला जावे लागणार त्यासाठी आई वडिलांनी आधीच पैशाची तरतूद करून ठेवली एस.टी. बसने साधारण तासाच्या अंतरावर तालुक्यातील कॉलेज. ऍडमिशन झाले दोन दिवसांनी कॉलेज सुरु होणार तोवरच आईने काही गोष्टी नामिताच्या कानावर घातल्या कारण कॉलेजमध्ये गेल्यावर मुलांमध्ये बदल होतात मित्र मैत्रिणी जोडल्या जातात त्यात कोण कसे असेल ह्याचा काही नेम नाही म्हणून आधीच मुलीला त्याबाबत सावध करावे ह्या हेतूने जास्त कोणाजवळ मैत्री करू नको अभ्यासाला महत्त्व दे वैगेरे असे बरेच काही नामीताला आईने सांगितले.
कॉलेजचा पहिला दिवस देवाला आणि आई वडिलांना नमस्कार करून आपल्या महाविद्यालयाच्या शिक्षणासाठी ती तयार झाली एस. टी. स्टँड पर्येंत वडील सोडायला गेले गावातील दोन मुले आणि साधना नावाची नामिताची एक वर्ग मैत्रीणदेखील तिच्याबरोबर त्याच कॉलेजमध्ये होती बस आली दोघीही एकत्र बसमध्ये चढल्या आणि एकाच सीटवर बसल्या मनातून दोघीही खूप घाबरल्या होत्या कॉलेज कसे असेल, शिक्षक कसे असतील, इतर मुले-मुली, कॉलेजचे नियम ह्या विषयांवर त्यांची चर्चा सुरू असताना तासभर वेळ कसा गेला आणि तालुक्याला कधी पोहचल्या त्यांनाच कळले नाही. दोघीही उतरल्या आणि कॉलेजच्या दिशेने जाऊ लागल्या पाच मिनिटाच्या अंतरावर कॉलेज, धडधडत्या हृदयाने कॉलेजमध्ये प्रवेश केला दोघीही एकाच वर्गात होत्या वर्गात जाऊन मुलींच्या रांगेत मध्यभागी एक बेंच त्यांनी पकडला एकामागे एक विद्यार्थी येत राहिले ह्या दोघीही खाली मान घालून शांत बसल्या होत्या, शिक्षक आले तासाला सुरुवात झाली, आपापली ओळख, शिक्षकांची ओळख असे तीन तास कधी गेले समजले नाही मधली सुट्टी झाली जेवणाचा डब्बा घेऊन त्या वर्गाबाहेर आल्या,इतर मुलं जेवणासाठी कुठे जातात ते पहिले आणि कॅन्टीनमध्ये त्या गेल्या आता त्यांच्या मनातील भीती थोडी कमी झाली होती, पण अजून इतर कोणाशी ओळख झाली नव्हती, जेवण संपवून त्या वर्गात येऊन बसल्या पुढच्या तासाल थोडा अवधी होता तेवढया वेळात पुढच्या व मागच्या बेंचवर बसणाऱ्या मुलींबरोबर त्यांची ओळख झाली, नमिता मितभाषी असल्याने फार काही बोलली नाही साधनाने तिच्याबद्दल त्या मुलींना माहिती दिली. शेवटचा तास संपला आणि सगळे घरी जाण्यास निघाले नमिता आणि साधना देखील स्टँडच्या दिशेने निघाल्या. गाडीसाठी अजून अर्धा तास होता त्या दोघी आजच्या दिवसाबद्दल चर्चा करत बसल्या होत्या गाडी आल्यावर दोघीही घरी गेल्या, आई-बाबांनी पहिल्या दिवसाबद्दल विचारपूस केली, नामिताने कॉलेजचे शिक्षक आणि इतर सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या दिनक्रम संपवून सर्वजण झोपले.
आजचा कॉलेजचा दिवस कथेसाठी महत्वाचा कारण आज कथेच्या हिरोची एन्ट्री, बसमधून उतरून नमिता आणि साधना वर्गापासून काही अंतरावर असताना साधनाला स्वछतागृहात जायचे म्हणूंन तिची बॅग नमिता जवळ देऊन ती स्वछतागृहाच्या दिशेने गेली नमिता दोन बॅग सांभाळत वर्गाच्या दिशेने जात असताना दोन तीन मुले तिच्यामागून पळत येतात आणि एकाचा तिच्या बॅगला धक्का लागतो आणि बॅग पुढे जाऊन पडते तीला खूप राग येतो तो मुलगा मात्र शांतपणे बॅग उचलून सॉरी बोलत तिला बॅग देतो. दिसायला तसा हँडसम हिरोसारखे केस मागे फिरवलेले, उंचापुरा थोडासा हसत माफी मागून तिच्या हातात पडलेली बॅग देऊन क्षणार्धात वर्गात गेला. साधना येईपर्येंत सर येऊन तास सुरू झाला त्यामुळे तिच्याशी झालेल्या घटनेबद्दल नामीताला बोलता आले नाही पण ती काहीशी चिडली होती हे साधनांच्या लक्षात आले होते. सरांनी उपस्थिती नोंदवायला सुरुवात केली अजय गायकवाड नावावर येऊन थांबले तोच धक्का देणारा मुलगा येस सर म्हणून उभा राहिला त्याला सर म्हणाले "काय रे काल पहिल्याच दिवशी दांडी" त्यावर तो म्हणाला "सर तब्बेत ठीक न्हवती" सर "ठणठणीत तर दिसतोयस, ह्या कॉलेजमध्ये अशी थातूर मातूर कारणे देऊन कोण गैरहजर राहिला तर कॉलेज मधून दाखला काढून टाकेन" अजय "सॉरी सर, पुन्हा असे नाही होणार" सर "ठीक आहे बस खाली" अजय सुटकेचा निश्वास टाकून बसतो.
अजय गायकवाड एका सधन कुटुंबातील मुलगा, गायकवाडांचा देवडे गावात दोन मजली प्रशस्थ बांगला, दोन चार चाकी गाड्या, दोन टेम्पो, ट्रक्टर, तीन दुचाकी आणि गडगंज संपत्ती, अजयचे वडील आणि दोन काका अशी जॉइन्ट फॅमिली, अजयच्या वडिलांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय, एक काका मिलेट्री मध्ये मोठ्या पदावर कामाला, दुसरे काका हाय कोर्टात जज, घरची शेती अशी भरपूर संपत्ती. कुटुंब खालच्या जातीतील असूनही गायकवाड कुटूंबाला गावात मानाचे स्थान.
मधली सुट्टी झाली, साधना आणि नमिता कॅन्टीन मध्ये डब्बा उघडून जेवणास सुरुवात करणार इतक्यात अजय कॅन्टीन मध्ये येताना नामिताला दिसला तिला सकाळचा प्रसंग आठवला आणि राग आला तीचे हे भाव साधनाने टिपले आणि काय झाले त्याची चौकशी केली तेव्हा नामिताने घडला प्रकार सांगितला. त्यांचे दोघींचे जेवण आटोपताच अजय जेवण संपवून त्यांच्याजवळ आला "तुझा सकाळचा राग आजून गेलेला नाही सॉरी पण मी मुद्दाम नाही धक्का मारला" अजय माफीच्या सुरात म्हणाला, त्यावर नमिता चिडक्या सुरात म्हणाली
" ठीक आहे, मी काय बोलले का? की उगाच ओळख काढायला आलास" अजय "नाही तसे काही नाही" प्रकरण थोडं बिघडतंय पाहून साधनाने मध्यस्थी केली " नाही रे तू जा तिला जास्त बोलायला आवडत नाही" अजय निघून जातो.
अजय तसा शांत स्वभावाचा खूप मित्र, खेळाची आवड आणि खास करून क्रिकेटचे फार वेड. श्रीमंतीचा गर्व वैगेरे नाही सगळ्यांजवळ मिळून मिसळून राहणारा. अभ्यासातही तसा बरा फार हुशार नाही पण ठीक ठाक.
तिमाही चाचणी परीक्षा जवळ आली सगळे अभ्यासाला लागले नामिताला तीन महिन्यात फार कोणी मैत्रीण झाली नाही ते तिच्या सहज कोणताही न मिसळण्याच्या स्वभावामुळे तशी साधना सर्वांशी चांगली बोलायची आणि तिच्यामुळे नामिताला सगळे ओळखायचे. आतापर्येंत नमिता अभ्यासात किती हुशार आहे हे शिक्षकांना कळले होते. परीक्षा सुरू झाल्या कॉलेजच्या नियमाप्रमाणे ओळ्खपत्राशिवाय कोणालाही कॉलेज आवारात प्रवेश दिला जात नसे आणि नमिताचे ओळखपत्र नेमके परीक्षेच्या आदल्या दिवशी घरी येताना हरवले ते तिला समजलेही नाही, सकाळी जायला निघाली तेव्हा तिची शोधा शोध सुरू झाली, आई देखील शोधत होती बसची वेळ झाली ही बस सुटली तर दुपारशिवाय बस नाही साधना ही नामिताला उशीर झाला म्हणून घरी बघायला आली घडला प्रकार तिला नामिताने तिला सांगितला आणि मी येते तू पुढे जायला सांगितले साधना जाते आता मात्र नमिता खूप घाबरते आणि वडिलांच्या शाळेत निघून जाते त्यांना सर्व प्रकार सांगते वडील धीर देत तिच्या सोबत कॉलेजला यायला निघतात पण बस थोडक्यात निघून जाते शेवटी एक सीटर त्यांना भेटते कॉलेजच्या गेटवर पोहचतात तर गेटवर अजय नामिताची वाट पाहत उभा असतो त्याच्या हातात तिचे ओळखपत्र असते ते पाहून नामिताला हायसे वाटते "मला काल स्टँड बाहेर सापडले" अजय म्हणतो त्यावर नमिता पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला थँक्स म्हणते आणि बाबांना मिठी मारते अजय म्हणतो "आता लवकर चल उशीर झालाय" आणि निघून जातो बाबाही तिला समजावत निरोप देतात आणि जायला सांगतात बाबांना निरोप देऊन ती जाते.पेपर संपतो सगळे बाहेर येतात साधनाला नमिता सर्व प्रकार सांगते आणि त्या दिवसाच्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करते इतक्यात अजय शेजारून जाताना नमिता पहाते आणि ती त्याला हाक मारते पुन्हा आभार मानून त्या दिवशी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागते आणि गप्पा मारत ते स्टँडच्या दिशेने जातात जास्त न बोलणारी नमिता अजय जवळ चांगल्याच गप्पा मारत होती आणि ह्या गोष्टीचे साधनाही आश्चर्य वाटले स्टँड मध्ये आल्यावर अजयला बाय करून दोघीही स्टँडमध्ये जाऊन बसतात आणि अजय मित्र उभे असतात त्या दिशेने जातो. अजयला मित्र नामितावरून चिडवायला लागतात तो आपला खोटा राग मित्रांना दाखवतो. साधनाला नामितामध्ये आज काहीसे वेगळे बदल पाहायला मिळाले तिच्या चेहऱ्यावर आज वेगळेच तेज तिने पाहिले पण तिच्या स्वभावविषयी साधना चांगलीच परिचित होती म्हणून त्या विषयाबद्दल तिने बोलायचे टाळले आणि आजच्या पेपर विषयी चर्चा सुरू केली.
परीक्षा संपली आता नियमित अजय साधना आणि नमितासोबत स्टँडपर्येंत येऊ लागला. परीक्षेनंतर नियमित कॉलेज सुरू झाल्यावर मधल्या सुट्टीत तो त्यांच्यासोबत डब्बा खायला येऊ लागला त्यांच्यासोबत असताना साधना मात्र एकटी पडू लागली करण त्या दोघांच्या गप्पा संपतच नसत. आता साधनाने एकदा त्याबाबत धीर धरून नामिताला विचारायचे ठरवले.
त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर अजयला निरोप देऊन त्या दोघींनी बस पकडली त्यावेळी थोडयाशा दबक्या आवाजात साधना नामिताला म्हणाली, "तुला राग येणार नसेल तर एक विचारू पण तस काही नसेल तर तुला इथेच सर्व विसरावे लागेल माझ्याबद्दल मनात राग धरणार नाहीस." नमिता " नाही ग बिनदास्त बोल" साधना " अजयचे आणि तुझे काय चाललंय का?" नमिता "छे ग काहीतरीच काय आपण काय हे करायला कॉलेजला आलोय फक्त चांगला मुलगा आहे म्हणून मी बोलते तू म्हणत असशील तर नाही बोलणार" साधना "नाही ग सहजच संशय म्हणून विचारले पण खरंच चांगला मुलगा आहे इतक्या श्रीमंत घरातला पण अजिबात गर्व नाही." त्या दिवशी तो विषय तिथेच संपला.
एका मागून एक दिवस चालले होते सहामाही झाली आणि वार्षिक परीक्षा जवळ आली शाळेप्रमाणे इथेही नमिता हुशार विद्यार्थी म्हणून गणली जात होती आणि दुसरीकडे नमिता आणि अजय अधिकच जवळ येत होते पण केवळ चांगले मित्र म्हणून. वार्षिक परीक्षा जवळ आल्यामुळे सगळे जोमाने अभ्यासाला लागले होते नमिता अजयला अभ्यासात खूप मदत करत असे, वार्षिक परीक्षा संपून सुट्टी पडली. पुढील बारावीचे वर्ष बोर्डाचे असल्याकारणाने कॉलेज पंधरा दिवसाच्या सुट्टीनंतर लगेचच सुरू होणार होते. शेवटचा पेपर देऊन नमिता घरी आली आता पंधरा दिवस आई बाबांना शक्य तितकी कामात मदत करायची असे तिने ठरवले पण या उलट पुढचं वर्ष बोर्डाचे म्हणून सुट्टीच्या दिवसात नामिताला विश्रांती द्यायची असे आई बाबा ठरवतात, ती काही काम करायला लागली तर आई तिला नको म्हणायची. सुट्टी सुरू होऊन दोन दिवस झाले असतील अजय तिच्या गावी आला कॉलेजमधल्या गावातील इतर मुलांबरोबर तो तिच्या घराकडे येताना तिला दिसला आणि ती गोंधळली पुढे होऊन अंगणातच ती त्यांना सामोरे गेली आणि " तू इकडे कसा?" असा प्रश्न विचारला तो काही बोलणार इतक्यात आईचा आवाज आला " नमे कोण ग?" "कोण नाही आमच्या वर्गातली मुले" असे म्हणत त्यांना तिथून जाण्याचा इशारा केला इतक्यात आई बाहेर येत म्हणाली "अग, मग त्यांना आता बोलावं उन्हात कुठे उभं केलंस" आणि बाहेर आल्यावर "या रे मुलांनो" असे म्हणत त्यांना आत बोलावले मुले गोंधळलेल्या मनस्थितीत नमिताकडे पाहत राहिले नमिता पुढे होत "या" इतकंच म्हणते आत जाऊन त्यांना बसायला सांगते सगळे पलंगावर बसतातआई "तुम्ही गप्पा मारा मी तुमच्यासाठी चहा करते" अजय संकोचाने नको म्हणतो त्याच्याबरोबर इतर दोघेही नको म्हणतात त्यावर आई म्हणते " घ्या रे थोडा थोडा तुम्ही रोज थोडे येता आमच्याकडे आता नामिताच्या कॉलेजच्या निमित्ताने आलात पण हा तिसरा मुलगा कोण मी याला ओळखले नाही" नमिता " हा अजय देवड्याचा आमच्याच वर्गात आहे" त्यातला आणखी एक म्हणाला "हो आमच्याकडे आला होता त्याला म्हणालो चल तुला नमिता आणि साधनाच घर दाखवतो पण साधना मामाकडे गेली" आई "हो काल आली होती सांगायला" चहा झाला तोपर्यंत चौघांनी परीक्षा आणि पुढच्या आढवड्यातील निकाला विषयी चर्चा केली आणि ते निघून गेले.
निकालाचा दिवस नमिता आणि साधना निकाल आणायला कॉलेजला निघाले कॉलेजच्या आवारात अजय त्यांना भेटतो, नमिता "काय रे त्या दिवशी आमच्याकडे का आला होतास" त्यावर तो म्हणाला "सहजच" ती काहीच बोलली नाही एकमेकांना निकालासाठी शुभेच्छा देऊन वर्गात जाऊन ते आपापल्या जागेवर बसले. निकाल मिळाला नमिता वर्गात दुसरी आली होती साधना आणि अजयला देखील बऱ्यापैकी मार्क्स मिळाले होते. नेहमीप्रमाणे स्टँड पर्येंत अजय सोबत आला नमिता आणि त्याच्या गप्पा झाल्या, साधनाला मात्र राहून राहून हे दोघे एकमेकात गुंतत असल्याची खात्री पटत होती.
कॉलेज सुरू होतो बारावीचे वर्ष म्हणून जो तो अभ्यासाच्या बाबतीत खूप सिरीयस होत होते, पण दुसरीकडे अजय आणि नमिता एकमेकांच्या खूप जवळ येतायत असे चित्र होते. मित्र मैत्रिणींमध्ये त्यांच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. एकत्र जेवणे, सोबत हॉटेल मध्ये जाणे, वेळ मिळेल तेव्हा गप्पा मारत बसणे, अजय तिच्या प्रत्येक अडचणीत मदतीला धावत येत असे आणि ती देखील त्याला अभ्यासात सर्वोतोपरी मदत करत असे. एकदा वर्गातील सुनंदा साधनाला सहज बोलून गेली "काय ग तुझी मैत्रीण नमिता पक्की खाली मुंडी पातळ धुंडी आहे आमच्याशी बोलायला तिच्या तोंडून मोजून शब्द निघतात आणि त्या अजय बरोबर भरभरून बोलते काय चाललंय काय तीच?" साधना "गप्प बस तसे काहीच नाही ते फक्त चांगले मित्र आहेत" सुनंदा फिल्मी स्टाईलमध्ये "एक लाडका और एक लाडकी कभी दोस्त नहीं हो सकते" आणी हसून निघून जाते. साधनाला आपल्या मैत्रिणीबद्दल वाईट वाटते पण ऐकून परिस्थिती पाहता कोणालाही असे वाटेल असे दिसत होते.
इकडे अजयची मनःस्थिती खूप बदलत चालली होती तो मनाने नामीताकडे आकर्षिला जात होता दिवसेंदिवस तिची सोबत त्याला हवीहवीशी वाटत होती, तिच्या बद्दल प्रेमाचे अंकुर त्याच्या मनात फुटू लागले होते, तो तिच्यात आपली प्रेयसी पाहू लागला होता तिच्या सोबत नसताना तिच्यासोबतचे क्षण आठवत असे मधेच हसत असे. निकितालाही त्याची सोबत आवडायची, त्याच्यासोबत गप्पा मारणे, त्याने केलेली थट्टा मस्करी आवडायची पण अद्याप ती त्या नात्याकडे केवळ बेस्ट फ्रेंड म्हणूनच पहायची. पण आपल्या अडचणी त्याला हक्काने सांगायची आणि मदतही घ्यायची.
एकदा साधना कॉलेजला आली नव्हती त्यात मधल्या सुट्टी आधीचा एक लेक्चर ऑफ होता सगळेजण कोण कॅन्टीनमध्ये, कोण कॉलेजच्या आवारात जाऊन टाईम पास करायला गेले, कोणी वर्गात बसून, तर कोणी लायब्ररी मध्ये अभ्यासाला गेले नामितानेही वर्गात बसून अभ्यास करायचे ठरवले पण इतक्यात अजय आला आणि म्हणाला " चल बाहेर फिरून येऊ" ती आधी नको म्हणाली पण त्याने खूपच आग्रह केल्यावर ती तयार झाली. कॉलेजच्या समोरच्या मैदानात जायचे ठरले, अजय आज मनात काहीतरी ठरवून आला होता आणि मनातली गोष्ट तिला सांगायचे धेर्य आज दाखवायचे त्याने ठरवले. हळू हळू गप्पा मारत कॉलेज मधल्या प्रेम प्रकरणांबद्दल चर्चा सुरू झाल्या, आणि योग्य वेळ पाहून तो तिला म्हणाला " तू मला आवडतेस" हे शब्द कानावर पडताच ती सुन्न झाली काय बोलावे तिला सुचेना ती सुसाट तिथून निघून गेली तिच्या मनात विचारांचे काहूर माजले. तिने अजयबद्दल हा विचार कधीच केला नव्हता, ती तशीच बेंचवर बसून राहिली आज जेवायला सुद्धा गेली नाही. पुढचे तीन लेक्चर काय झाले काय शिकवले तिला काहीच समजलं नव्हते, तिला रडावेसे देखील वाटत होते पण स्वतःला सांभाळले कारण ती जर रडली असती तर खूप गोंधळ झाला असता, तिला साधनाची गरज भासू लागली कॉलेज सुटताच ती झपाझप स्टँडच्या दिशेने गेली. अजय देखील मनातून खूप घाबरला काय करावे त्याचे त्याला सुचेना बाकी मित्रांनी काय झाले विचारले तो काहीच बोलला नाही, काही करून कॉलेज सुटल्यावर निकीताला गाठून माफी मागायची असे तो ठरवतो, आपण खूपच घाई केली योग्य वेळेची वाट पाहायला हवी होती असे त्याला वाटू लागले. कॉलेज सुटल्यावर तो तिच्या मागोमाग गेला आणि स्टँडच्या गेटवर तिला गाठला सामोरे जायचे धेर्य होत नव्हते पण केलेली चूक सुधारायची म्हणून पुढे गेला आणि "सॉरी नमिता" इतकेच बोलू शकला. नमिता त्याच्याकडे न पाहता तशीच पुढे गेली बसला अजून अर्धा तास होता अजयही फार वेळ तिच्यासमोर थांबला नाही दूर आडोशाला उभे राहुन तिच्यावर लक्ष ठेऊन होता. गाडी आल्यावर ती गाडीत बसून घरी गेली घरीही जितकं नॉर्मल राहता येईल तितके नॉर्मल राहण्याचा तिने प्रयत्न केला तरीही आईने आज हिचे काहीतरी बिनसलय हे ओळखले आणि चौकशी केली त्यावर ती "काही नाही डोकं दुखतंय" एवढंच म्हणाली. त्या दिवशी रात्री तिला झोप लागली नाही अजय असे काही बोलेल याची कल्पनाही तिने केली नव्हती. पण दुसरीकडे कॉलेजमध्ये अश्या गोष्टी घडतात आणि आपल्याला आवडले नाही म्हणून तो सॉरी पण म्हणाला ह्या गोष्टीमुळे तिला थोडेसे हायसे वाटत होते, पण तो तिला मित्र म्हणून नक्की हवा होता चुकला असेल तो एकदा माफ करावे पण त्याआधी साधनजवळ ह्या घटनेबद्दल चर्चा करावी असे ती ठरवते, झोप येत नव्हती सकाळ कधी होते आणि साधना कधी भेटते असे तिला झाले होते.
सकाळी तयारी करून लवकरात लवकर ती एस.टी. स्टँडच्या दिशेने निघाली दुसऱ्या बाजूने साधना येताना तिला दिसली तिच्याकडे पाहताच साधना समजून गेली काहीतरी गोंधळ आहे. आजूबाजूला कोण नाही अशा ठिकाणी ती उभी राहिली साधना "काय ग तब्बेत ठीक नाही का?" तब्बेत वैगेरे ठीक आहे पण एक गोष्ट काल घडली त्याने डोकं सुन्न झालंय" नमिता उत्तरली, साधना, "काय झालं?" इतक्यात गाडी आली " चल बस आधी मग बोलू" दोघीही गाडीत एका सीटवर बसतात नमिता झाला प्रकार तिला सांगते साधना "मला वाटलेच होते ज्या प्रकारे तो तुझ्यात गुंतत होता त्या प्रकारे हे होणारच होते, मग काय बोललीस त्याला", तिने नकारात्मक मान हलवत "साधना मला आताच असे काही करायचे नाही कदाचित ह्या बाबतीत आई बाबा निर्णय घेतील पण मित्र म्हणून मला त्याला गमवायचे नाही तो चांगला मुलगा आहे पण कॉलेज म्हटलं की प्रपोज करणे सर्वसाधारण गोष्ट आहे ना? पण त्याच्या डोक्यात जे चाललंय ते बाहेर काढून एक मित्र म्हणून तू त्याला पुन्हा जवळ आणशील?" साधना " ठीक आहे प्रयत्न करते". त्यांचे बोलणे संपेपर्यंत गाडी एस. टी. स्टँड मध्ये आली दोघी उतरून कॉलेजमध्ये वर्गात जाऊन बसल्या. मधली सुट्टी झाली दोघीही कॅन्टीनमध्ये गेल्या पण त्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही जागा नव्हती, आज तो त्यांच्यासोबत जेवायला आला नाही नामिताला काहीसे चुकल्यासारखे वाटत होते. जेवण झाल्यावर साधनाने त्याला गाठले आणि कॉलेज सुटल्यावर स्टँडवर भेटायला सांगितले. ठरल्याप्रमाणे ते स्टँडवर कोणी नव्हते आशा ठिकाणी उभे राहिले, जे काही ह्या दोघी बोलतील ते ऐकायचे आणि विषय संपून टाकायचा असे तो ठरवतो. साधना " अजय, काल काय झाले ते नामिताने सांगितले असे व्हायला नको होते पण कॉलेज म्हटलं की ह्या गोष्टी घडतात पण आम्हाला तुझी मैत्री तोडायची नाही म्हणून ती कालच दिवस विसरायला तयार आहे" अजयने ऐकून सुटकेचा निःस्वास टाकला आणि पुन्हा फक्त सॉरी म्हणाला, त्यावर नमिता म्हणाली, "आता बस झालं सॉरी, तू ही मला आवडतोस चांगला मित्र म्हणून" इतके बोलून ती हसली, तो पण हसला इतक्यात बस आली त्याचा निरोप घेऊन त्या दोघीही निघून गेल्या.
दुसऱ्या दिवसापासून पूर्ववत दिनक्रम सुरू झाला. पण अजयच्या मनात नमिता बद्दल अजूनही एक प्रियसीची छबी होती. त्याने ठरवले एक ना एक दिवस मी तिचे प्रेम जिंकणार. दिवस चालले होते बोर्डाची परीक्षा जवळ आल्या महिनाभराने परीक्षा जुनीयर कॉलेजचा आज निरोप समारंभ सर्वजण छान नटून सजून आले होते नामिताला पाहून अजय क्लीन बोल्ड झाला, सारखा तिची नजर चुकवून तिच्याकडे एक टक बघत होता. तिच्या हे लक्षात आले आणि खोडकरपणे हळूच त्याला विचारले "ये कशी दिसते सांग ना?" अजय " एक नंबर शब्दच नाही" नमिता, "काय?" अजय "काही नाही छान" ती स्वतःशीच हसली. तो मात्र आज वेडा झाला होता कसे वागत होता त्याचे त्याला कळेना. आज संपूर्ण दिवस तो तिच्या मागे पुढेच फिरत होता.आज घरी गेल्यावरही तिचे ते रूप त्याच्या पुढून जात नव्हते.
परीक्षा सुरू झाल्या आणि हा हा म्हणता संपल्या, आज परीक्षेचा शेवटचा दिवस पेपर संपल्यावर तिघेही नेहमीप्रमाणे एकत्र आले आणि सुट्टीत काय करणार ह्यावर चर्चा करत होते अजयने सुट्टीत कॉलेजच्या बाजूला असलेल्या कॉम्पुटर क्लासला ऍडमिशन घ्यायचे ठरवले होते. नामिताला देखील कॉम्पुटर शिकायची इच्छा होती पण ती काहीच बोलली नाही कारण आई बाबांना ते परवडेल का याची तिला शंका होती. साधना सुट्टीत काकांकडे मुंबईला जाणार होती. एकमेकांचा निरोप घेऊन घरी जायला निघाले अजयचा पाय निघता निघेना कसा बसा निरोप देऊन तो निघाला.
जवळ जवळ दीड दोन महिन्यांची सुट्टी ह्या सुट्टीत काय करायचे ह्या विचारात नमिता होती. साधना दोन दिवसांनी मुंबईला जाणार होती, तिच्याशिवाय तिला जवळची अशी कोण मैत्रीण नव्हती. दुपारी बाबांनी जेवता जेवता विषय काढला " नमे सुट्टीत काय करणार?" नमिता " काही नाही एखादा छोट मोठ काम कुठे मिळतंय का बघते" बाबा "कॉम्पुटर कोर्स वैगेरे केलेस तर" तिच्या मनातली गोष्ट बाबा बोलले पण फीचे पैसे कसे येणार हा विचार तिच्या मनात आला, बाबा "मी थोडेफार पैसे जमा केलेत उद्या तालुक्याला जाऊन चौकशी करू या?" नमिता " हो चालेल". दुसऱ्या दिवशी दोघे जाऊन कॉलेजच्या बाजूच्या कॉम्पुटर क्लासमध्ये चौकशी केली बाबांनी जमवलेले पैसे कोर्ससाठी पुरेसे होते म्हणून ऍडमिशन कन्फर्म केले दोन दिवसांनी क्लास सुरू होणार होते. नामिताच्या मनात आले मला क्लासमध्ये बघून अजयला आश्चर्य वाटेल.
कॉम्पुटर क्लासचा पहिला दिवस नमिता क्लासमध्ये जाऊन बसली होती शिक्षक अजून आले नव्हते ती अजयची वाट पाहत होती इतक्यात तो तिथे आला येता येता तो तिचाच विचार करत होता आणि अचानक तिला तिथे पाहून त्याला विश्वासच बसला नाही क्षणभर आपल्याला भास होतोय असेच त्याला वाटले तो तिच्याकडे बघतच बसला थोड्या वेळात भानावर येत तिच्या जवळ गेला म्हणाला "तू इथे" ती हसत म्हणाली "का तुला प्रॉब्लेम आहे?" तो "नाही मग मला बोलली नाहीस" ती "तू काय क्लासचा प्रिन्सिपॉल आहेस?" तो शांतपणे तिच्या बाजूला बसला त्याच्या मनात आनंदाचे तुषार उडायला लागले. क्लासमध्ये दहा विद्यार्थी होते काही त्यांच्या कॉलेजचे काही इतर कॉलेजचे. क्लास सुटला दोघे बाहेर आले आता तिने सांगितले "अरे मी आधी काहीच ठरवले नव्हते घरी गेल्यावर बाबा म्हणाले आणि मग आम्ही येऊन ऍडमिशन घेतले, "छान झाले नाहीतर मला तर फार कंटाळा आला होता" नामिताच्या गाडीला वेळ होता अजून तो तिला हॉटेल मध्ये घेऊन गेला चहा नास्ता करत दोघांनी मनमुराद गप्पा मारल्या "तू आज भेटली नसती तर उद्या मी तुझ्या गावी आलो असतो" तो म्हणाला त्यावर ती "का?" तो "सवय लागली" ती "काय?" तो काहीसा घाबरत "काही नाही सहजच." तो खूप आनंदात होता गाडीची वेळ झाल्यावर तो तिला बसपर्येंत सोडून निरोप देऊन निघाला.
एक एक दिवस चालले होते तिलाही आता त्याची खूपच सवय होत चालली होती त्याच्यासोबतचे क्षण घरी गेल्यावरही तिला आठवत असत आणि दुसऱ्या दिवशी कधी एकदा क्लासला जाते असे तिला होत असे, त्याच्या सोबतीत वेळ पटकन निघून जाई आणि गाडीची वेळ झाल्यावर दोघेही हिरमुसले होऊ लागते आणि जड अंतकरणाने निरोप देऊन घरी जात. एकदा तर ती रविवारी सुट्टीच्या दिवासीदेखील क्लासची तयारी करू लागली आईने आठवण करून दिल्यावर स्वतःशीच हसली आणि तो किस्सा त्याला सांगून दोघेही खूप हसले आणि गाडीची वेळ कधी झाली त्यांनाही समजले नाही आणि दोघेही घाईने गाडी पकडायला निघाले असता तिला ठेच लागून ती पडणार इतक्यात त्याने तिला हात धरून सावरले त्याने स्पर्श करताच तिला लाजल्यासारखे झाले आणि त्याच क्षणापासून ती त्याच्याकडे आकर्षली जाऊ लागली तिची मनःस्थिती गोंधळलेल्या सारखी झाली होती आणि मन मोकळे करायला साधनाही नव्हती ती समजून गेली ती त्याच्या प्रेमात अडकत आहे आणि तिची ही मनःस्थिती त्यानेही जाणली. तिने त्याच्या प्रेमाला आधी नाकारले असल्याने आता काय करावे तिला कळत नव्हते शेवटी एक दिवस तिने एक चिट्ठी लिहली आणि आपल्या मनस्थिती बद्दल सर्व भावना व्यक्त केल्या त्याने तिच्यासमोरच चिट्ठी वाचली तो वाचत असताना ती गोरी मोरी झाली होती तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हते त्याला मात्र जग जिंकल्यासारखे वाटत होते, क्षणांत तिला घट्ट मिठी मारावी तिचे हात हातात घेऊन आपल्या भावना व्यक्त कराव्या असे वाटत होते पण ते त्या ठिकाणी श्यक्य नव्हते चिट्ठी वाचून तो एवढेच म्हणाला " आज माझा आत्मविश्वास खरा ठरला, तू माझ्या भावनांची कदर केलीस आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप लकी आहे" तिला तर अजून काय बोलावे सुचेना ती केवळ त्याच्याकडे बघत होती, गाडीची वेळ झाली तरी एकमेकांना सोडून जाण्याची इच्छा त्यांना होत नव्हती पण शेवटी जावे लागणार होते तो तर गाडी नजरेआड होईपर्येंत तिथेच उभा होता ती सुद्धा तो नजरेआड होईपर्येंत मागे वळून बघत होती. घरी आली तेव्हा ती जास्तीत जास्त नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होती पण तिचा स्वतःवर ताबा राहिला नसल्याकारणाने मध्येच विचित्र वागत होती, सगळ्यांच्या नकळत एकटीच हसत होती, त्याने तिला पडताना सवरल्याचा क्षण आठवून लाजत होती. त्या रात्री ती झोपू शकली नाही सतत त्याचा चेहरा तिच्या डोळ्या समोरून हटत नव्हता. कधी एकदा सकाळ होते आणि त्याला भेटते असे तिला होत होते. इकडे अजयचेही तेच हाल होते फरक फक्त इतकाच तिची बैचेन होण्याची पहिलीच रात्र होते तर त्याने आशा कितीतरी रात्री जागून काढल्या होत्या.
दोघांचे प्रेम असेच दिवसेंदिवस खुलत चालले होते अशातच निकालाचा दिवस जवळ आला दोन दिवसांनी निकाल म्हणून साधनाही मुंबईहून परत आली होती. तिला कधी एकदा भेटून सर्व काही सांगते असे नामिताला झाले होते ती आल्यावर मुंबईची मिठाई घेऊन नामिताला भेटायला आली आईशी गप्पा मारून झाल्यावर दोघी स्टँडकडे निवांत बोलायचं म्हणून गेल्या, आज ही गप्पा मारायला इतक्या लांब का घेऊन आली हे साधनाला कळेना स्टँडवर कोणीही नव्हते तेव्हा नामिताने घडलेला सर्व प्रकार तिला सांगितला आता साधनाला ह्या घटनेवर काय बोलावे तिला कळेना कारण पहिली शंका तिच्या मनात आली ती म्हणजे अजय पैशाने जरी श्रीमंत असला चारचौघात नावाजलेल्या घराण्यातील असला तरी तो खालच्या जातीतील होता आणि ही त्या दोघांच्या प्रेमात मोठी अडचण होती. एक तर त्या काळात गावच्या ठिकाणी प्रेम विवाह दुर्मिळ बाब होती आणि त्यातही आंतरजातीय म्हणजे महाकठीण उच्चवर्णीय समाजात हे कधीच मान्य झाले नसते ह्याची तिला कल्पना होती. थोडासा धीराने ती नामिताला म्हणाली, "तू सर्व बाजूने विचार करून निर्णय घेतलास ना? आपल्यात जाती पातीचा विचार खूप केला जातो" तिच्या ह्या बोलण्यावरून ती थोडावेळ सुन्न पडली कारण हा विचारच तिने केला नव्हता तरीपण म्हणाली " जाऊ दे आता तळ्यात उडी घेतलीच तर पोहायला लागणारच नाही जमल तर बुडून मरू" ह्या उत्तराने साधना समजून गेली पाणी डोक्यावरून गेलय आता काय फायदा नाही पुढे नामिताने विचारले, "तू मला साथ देशील ना" ती उत्तरली "देईन पण माहीत नाही कुठपर्येंत" नंतर इकडं तिकडच्या गप्पा मारून त्या निरोप घेऊन आपापल्या घराकडे गेल्या.
दुसऱ्या दिवशी थोडसं टेन्शन मधेच ती क्लासला गेली नंतर सुटल्यावर दोघे मैदानाकडे गेले तो म्हणाला," काय झाले टेन्शन मध्ये दिसतेस" तीने साधना बरोबर झालेल्या चर्चेचा सर्व वृत्तांत सांगितला त्यावर ती म्हणाला, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना? तुला जाती पातीचा काही फरक तर पडत नाही ना?" ती " वेडा आहेस का मग मी इथपर्येंत निर्णय घेतला नसता पण माझे आई बाबा?" तो "मग तू तो विचार करणे सोडून दे मी काय ते बघेन तुझ्या आई बाबांना पण त्रास होऊ देणार नाही." त्याचे हे ठामपणे उत्तर ऐकून ती निर्धास्त झाली.
बारावीचा निकाल लागला नमिता ब्यानव टक्के मार्कसने कॉलेजमध्ये पहिली आणि तालुक्यात दुसरी आली अजय पंच्यात्तर आणि साधनाला बहात्तर टक्के गुण मिळाले आता लवकरच सिनिअर कॉलेज सुरू होणार होते. नामिताचा कॉलेजमध्ये सत्कार करण्यात आला. अजयने सर्व मित्रांना हॉटेलमध्ये पार्टी देखील दिली आणि नामिताबरोबरच्या प्रेम संबंधा बाबत खास मित्रांना बातमी सांगितली. तो तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडाला होता, उठता बसता केवळ नमिता त्याला दिसत असे.
कॉलेज सुरू झाले अजय कॉलेजला आता बाईक घेऊन येत असे नवी कोरी मोटार सायकल त्याच्या मिलेट्रीवाल्या काकांनी त्याला बारावीच्या यशाबद्दल गिफ्ट दिली होती. कॉलेजमध्ये त्याचा वेगळाच थाट होता.एकदा त्याने नामिताला बाईकवर सोबत बसवून फिरवायचा प्लॅन केला ती नको म्हणत असताना तिला बसायला लावले आणि जवळच असलेल्या माळरानावर घेऊन गेला पावसाळा असल्याने माळरान चांगलेच फुलले होते सगळीकडे हिरवळ पसरली होती रिमझिम पाऊस सुरू होता, ते दृश्य पाहून दोघांचेही उर प्रेमाने दाटून आले, नामिताच्या बसची वेळ झाली होती तिच्या लक्षात येताच तिने अजयला परत फिरायला लावले.
नमिता आणि अजयचे प्रेम आता कॉलेजमध्ये चांगलेच फेमस होत चालले होते, ते दोघेही आता बऱ्याच प्रमाणात बिनधास्त झाले होते, इतरांचा विचार न करता मनमोकळे वागत असत. माळावर एकांतात फिरायला जात असत. त्या दिवशी साधना कॉलेजमध्ये आली नव्हती नेहमीप्रमाणे सकाळीच बाईक घेऊन एस. टी. स्टँडच्या गेटवर वाट पहात होता, त्या दिवशी पाऊसपण खूप होता छत्री घेऊन येताना तिला त्याने पाहिले पण आज साधना सोबत नव्हती, ती आजारी असल्याने आली नसल्याचे नामिताने त्याला सांगितले, तेव्हाच त्याने आज कॉलेजला दांडी मारून माळरानावर फिरायला जायचे त्याने स्वतःशीच ठरवले तो तिला काहिही बोलला नाही कारण ती तयार होणार नाही याची त्याला खात्री होती तिला त्याने बाईकवर बसायला सांगितले तिने नकार दिला कारण ती भिजली असती, तो बाईकवरून उतरला आपले जॅकेट काढून तिला देऊ लागला त्यावर ती, "अरे कशाला तू भिजशील दोन मिनिटांसाठी" तो ऐकला नाही तिने जॅकेट घातले तसेच त्याने बाईकला किक मारून सुसाट माळरानाच्या दिशेने वळवली तेव्हा ती गोंधळून म्हणाली, "अजय कुठे कॉलेज तिकडे राहिले" तो थट्टेचा सुरात, "आज कॉलेजला सुट्टी" आणि गाडीचा वेग वाढवला आणि गाडी थेट माळरानाशी न्हेउन थांबवली. ती त्याच्या पाठीवर हळुवार बुक्की मारत आणि लटका राग आणत, "काय हे मला अजिबात आवडत नाही" तो "आता आपण मोठे झालो कॉलेजला दांडी मारणे कॉमन गोष्ट आहे आणि आपण काय नेहमी असे करतो का?" ती काहीच बोलली नाही तो संपूर्णपणे भिजला होता, बाईक एका बाजूला लावून तो माळरानाकडे चालू लागला, तिथे कोणीही नव्हते, ती त्याच्यामागे गेली. थोडा वेळ चालल्यावर तिथे एका दगडावर दोघे बसले त्याने तिचा हात हातात घेतला आणि फिल्मी स्टाईलमध्ये " I love you" म्हणाला ती लाजली त्याने हाताचे चुंबन घेण्यासाठी तिचे हात स्वतःच्या चेहऱ्याकडे ओढले असता तिने हाताला झटका देत त्याच्या हातातून हात सोडवून स्वतःच्या चेहऱ्यावर दोन्ही हात दाबून धरले त्याने तिच्या चेहऱ्यावरचे हात हळुवार बाजूला करत तिच्या ओठांवर एक चुंबन घेतले तिने हलकेसे धक्का देऊन त्याला दूर लोटण्याच प्रयत्न केला पण त्याने पुन्हा तिच्या ओठांवर दीर्घ चुंबन घेतले थोड्या वेळाने तिने त्याला मागे ढकलले "नको बस पुरे, एवढ्या वरच थांब हे सगळे करायला वेळ आहे" तो देखील तिचे ऐकला आणि थांबला. खूप वेळ ते दोघे एकमेकांशी काहीच बोलले नाही, काही वेळ रिलॅक्स होऊन तोच बोलायला लागला " छान पाऊस पडला ना आज, माळ रान फुलून निघायला, वेड लावणार वातावरण आहे" ती अजून त्या प्रसंगातून सावरली नव्हती ती काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने ती म्हणाली "निघू या आता" तो "का ?थांबू ना छान वाटत" ती स्मितहास्य करत " तू ज्या कामासाठी आला होतास ते झाले ना?" तो सुद्धा हसला आणि म्हणाला "का तुला नाही आवडले" ती हळुवार लाडीकपणे "तसे काही नाही अजून आपण शिकतोय संयम राखला पाहिजे." तो "इतक्या लवकर जाऊन काय करायचे?" ती "मी दुपारच्या गाडीने घरी जाते" तो "ठीक आहे की मी बाईकवर सोडू?" ती घाबरल्या सुरात "नको गावात बोंब होईल." ते तिथुन निघाले स्टँडवर पोहचले ती गाडीत बसली एकमेकांना एकटक पहात असताना गाडी सुटली. तिच्या डोळ्यासमोर माळरानावरील ते दृश्य तरळत होते आणि अंगावर शहारे येत होते.
ती घरी आली भिजली होती, आईने लवकर येण्याचे कारण विचारले तेव्हा सकाळीच भिजल्याने थंडी वाजत होती म्हणून मधल्या सुट्टीत आले असे सांगितले. आईने पाणी गरम करून तिला आंघोळ दिली, ती आज आईच्या नजरेला नजर मिळवत न्हवती, आईसमोर तिला अपराध्या सारखे वाटत होते. आंघोळ झाल्यावर आईने तिला खायला दिले पण आज काय तिचे खाण्या पिण्यात चित्त नव्हते आईला बरे वाटावे म्हणून चार घास खाऊन नावाला पुस्तके घेऊन झोपण्याच्या खोलीत जाऊन एकांतात पडली. आज घडलेला प्रसंग योग्य की अयोग्य ह्याचा ती विचार करत होती. शेवटी लग्न तर त्याच्याशीच करायचे मग त्यात गैर काय? ह्या तात्पऱ्यावर येउन थांबली.
तो प्रसंग वगळून कॉलेजला न जाता माळराणावर गेल्याचे साधनाला तिने सांगितले. पहात पहात डिग्री कॉलेजची तीन वर्षे संपतआली अजय-नमिता प्रेम प्रकरण जस जसे फुलत होते तितकेच फेमस होत होते गावापर्येंत ह्या प्रेमाची बातमी पोहचली. अजयच्या घरी आधीच कूण कूण सुरु झाली होती आणि कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाची परीक्षा सुरू असताना नामिताच्या आई वडिलांना कुठूनतरी ही बातमी समजली आणि त्यांच्या पायाखाली जमीन सरकली, पण खात्री झाल्याशिवाय बोलणे चुकीचे म्हणून परीक्षेच्या शेवटच्या दिवशी बाबा तिच्या नकळत कॉलेजजवळ पोहचले, स्टँड जवळ दोघांना पाहिले साधना तिथे नव्हती, बाबा सरळ त्यांना सामोरे गेले त्यांना तिथे पाहताच ती अतिशय घाबरली त्यालाही काय करावे सुचेना चार चौघात तमाशा नको म्हणून "चल घरी" इतकेच म्हणाले. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या रागाची तीव्रता तिला जाणवली. घरी गेल्यावर घडला प्रकार बाबांनी आईला सांगितला. आईलाही खूप राग आला, त्या क्षणी तिला कानाखाली मारून तिच्यासाठी आपण काय केले हे समजवावे असे आईला वाटले पण मुलगी मोठी झाली तिच्यावर हात उचलणे चुकीचे ह्या विचाराने शांत बसली आणि शिक्षणासाठी किती कष्ट केले, काटकसर करून शिक्षणासाठी पैसे कसे उभे केले हे तिला समजावले पण ती त्याच्याशी लग्न करायचे ह्या विचारावर ठाम होती. तो खालच्या जातीतील असल्याने कसा विरोध होईल आणि आम्हाला किती त्रास होईल हे आईने समजावले, आपल्या समाजातील प्रतिनिधी कशा प्रकारे आपल्याला त्रास देतील ह्याची पूर्व कल्पना दिली. शेवटी लग्नाचा विचार काही अंशी तिच्या डोक्यातून निघाला, पण ती बैचेन झाली होती, तिला राहून राहून रडू कोसळत होते पण जाती पातीचा विरोधपुढे आपले प्रेम हरल्यासारखे तिला वाटत होते.
इकडे अजयच्या घरातलं वतातवरणही बिघडले होते, त्याचे वडील राजकारणात सक्रिय असल्या कारणाने उचवर्णीय पुढाऱ्यांचा रोष ओढून घेणे त्यांना परवडणारे नव्हते म्हणून घरातून ह्या लग्नाला विरोध होता त्यात त्याचे करिअर अजून शून्य होते. परंतु तो हट्टाला पेटला होता, एक दोन नव्हे तर पाच वर्षांचे त्याचे प्रेम तो विसरू शकत नव्हता, तो जीवाचे बरे वाईट करण्याच्या धमक्या देऊ लागला पण त्याचाही फारसा परिणाम घरच्यांवर होत नव्हता, फक्त आई त्याला समजावत होती वडील आपल्या निर्णयावर ठाम होते. घरातील ऐकून परिस्थितीची माहिती मामा पर्येंत पोहचते, मामा नुकताच दुबईहून सुट्टीवर गावी आला होता तो त्यांच्या घरी आला अजयला एकट्याला बाजूला घेऊन चर्चा केली पण अजयच्या जिद्दीपुढे तो त्याला समजावू शकला नाही, शेवटी बहिणीला व भाऊजीना त्याने समजवण्यात त्याला यश आले, पण हे सहज श्यक्य न्हवते हे त्यांना माहीत होती. अजयचे वडील मुरलेले राजकारणी होते त्यांनी मुलाच्या लग्नासाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली.
सर्वप्रथम मामाला नामिताच्या घरी पाठवले तिच्या घरच्यांचा विचार घेण्यासाठी, मामा नामिताच्या घरी पोहचला तिच्या आई-वाडीलांजवल दीर्घकाळ चर्चा केली, ते दोघे एकमेकात किती गुंतलेत याची कल्पना दिली आज आपण विरोध केला तर जीवाचे बरे वाईट करतील किंवा संधी मिळाल्यास पळून जातील असे उदहरणासह पटवून दिले. नामिताच्या वडिलांनी त्यांच्या समाजाचे नीती नियम किती कठोर आहेत आणि दोन समाजात काशी तेढ निर्माण होईल हे मामासमोर मांडले. मामानेही अजयच्या वडिलांचा प्लॅन त्यांना सांगितला, लग्नाचा गाजावाजा न करता अजयच्या गावी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत कायद्याच्या मार्गाने लग्न उरकायचे, राहिला प्रश्न तुमच्या समाजाचा त्यासाठी वरिष्ठ मंडळींच्या भेटी गाठी घेऊन तुम्हाला त्रास होणार नाही अशी व्यवस्था ते करतील ह्याची ग्वाही त्यांना दिली तेव्हा नामिताचे आई वडील सकारात्मक झाले, परंतु खात्री झाल्याशिवाय निर्णय घेणार नाही असे म्हणाले.
अजयच्या वडिलांनी नामिताच्या समाजातील वरिष्ठांच्या गाठी भेटी घेऊन त्यांची समजूत काढली काही अंशी त्यांना यश देखील आले पण कधी कोण गडबड करेल याची खात्री नव्हती. नामिताचे वडील देखील त्यांच्या समाजातील पुढार्यांना भेटले त्यांनी नामिताच्या वडिलांना आधी उलट सुलट सुनावले आर्जव विनंती करत कसाबसा होकार मिळवला पण समाजातील कोणीही व्यक्ती लग्नाला येणार न्हवते. लग्नाची तारीख ठरली अजय नमिता खुश होते सुखी संसाराची स्वप्न पाहत होते कसे का होईना पण लग्न होणार ह्या कल्पनेने त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता, पण नामिताच्या घरी गावकी भावकितील लोकांचे येणे जाणे बंद झाले होते. हळू हळू परिस्थिती बदलेल ह्या विचाराने त्यांनी त्या गोष्टीला फार महत्व दिले नाही. साधना एकदा लपत छपत नामिताला भेटायला अली त्यांच्या प्रेमाची साक्ष असणारी, जिवा भावाची मैत्रीण मात्र तिच्या लग्नाला नसणार ह्यामुळे त्या दोघीही भावुक झाल्या आणि कितीतरी वेळ गळ्यात गळे घालून रडल्या, शेवटी साधनाने तिला समजावले लवकरच परिस्थिती सामान्य होईल तू काळजी करू नको मी नेहमीप्रमाणे तुझ्या सोबत आहे अशी समजूत काढून ती निघून गेली.
लग्नाच्या दिवशी आई बाबा आणि नमिता तयार झाल्या तिघेही थोड्या घाबरलेल्या मनस्थितीत होते कारण लग्नाची बातमी समजल्यापासून गावातील लोक त्यांच्याशी धड वागत नव्हते अपराध्याप्रमाणे वागणूक देत होते. अजयचे वडील त्यांना घ्यायला गाडी पाठवणार होते तिघेही तयार होऊन गाडीची वाट पाहत होते नवरीने कोणताही साज शृंगार केला नव्हता, सर्व काही देवड्याला अजयच्या गावी होणार होते गाडीच्या हॉर्नचा आवाज रोडवरून आला तसे मुलीला पुढे उभे करून तिघांनीही देवाला नमस्कार केला सर्व काही सुरळीत होऊ दे असे मागणे मागितले आणि दरवाजाला कुलूप लावून पुढे आई वडील आणि मागून नमिता निघाले तिचे डोळे पाणावले होते. गाडीत नामिताला मध्यभागी बसवून आई बाबा बाजूला बसले कोणी निरोप द्यायला पण बाहेर आले नाही. आई बाबांचे मुलीचे थाटामाटात रितिरिवाजा प्रमाणे लग्न लावून द्यायचे स्वप्न विरले होते असे चोरासारखे मुलीचे लग्न लावणे त्यांना पटत न्हवते, पण शेवटी मुलीच्या आनंदापुढे सर्व व्यर्थ होते. गाडी गावातल्या रस्त्यावरून मेन हायवेला आली नामिताच्या काळजात काहीसे धस्स झाले आणि समोर लक्ष जाताच त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली समोरुन येणाऱ्या सुसाट येणाऱ्या मोठ्या ढम्परने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली आणि गाडीचा चेंद्धामेंधा केला ड्राईवरसह ते तिघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले, ढम्परचा ड्राइवर तिथून निसटला, काही वेळात पोलीस आले चारही जणांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण काहीच फायदा न्हवता सर्व काही संपले होते, चौघांनाही मयत घोषित करण्यात आले, हा हा म्हणता बातमी सर्वत्र पसरली अजय नवऱ्याच्या वेशात नामिताची वाट पाहत बसला होता इतक्यात अपघाताची बातमी येऊन धडकली त्याने त्याच वेषात बाईकला किक मारली आणि हॉस्पिटलमध्ये येऊन पोहचला आणि पांढरा कपडा बाजूला करून नामिताचे रक्ताने माखलेले मृत शरीर पाहून चक्कर येऊन पडला पाठोपाठ त्याचे आई वडील आणि मामा आले त्याला सवरण्याचा प्रयत्न केला पण तो जमिनीवर कोसळला त्याला तिथेच ऍडमिट केले गेले.
इकडे नामिताच्या गावात शोककळा पसरली होती, साधनाला मैत्रिणीची बातमी समजताच रडायला कोसळले आणि एकदा मध्येच रडक्या सुरात म्हणाली, "त्यांनी शेवटी डाव साधला जे करायचे ते केलेच" ते ऐकून तिच्या आईने तिचे तोंड दाबले आणि ओरडली "गप्प बस त्यांचा बळी गेला आता त्यांच्यामुळे आपलं जगणे अवघड करशील."
अर्थात हा घातपात होता अपघात न्हवता साधनाला याची माहिती मिळाली होती पण तिला धमकावून शांत बसवण्यात आले होते. समाजाची प्रतिष्ठा राखण्यासाठी काही उच्चवर्णीय समाज प्रमुखांनी हे लग्न होऊ नये म्हणून हा घातपात घडवुन आणला होता ही बाब साधनाला नामिताची गाडी तिथून गेल्यावर समजली पण तिच्या घरच्यांना तिला गप्प ठेवण्याची धमकी दिली होती. पोलिसात अपघाती निधन म्हणून नोंद करण्यात आली, ज्या ढम्परने अपघात घडला त्यावर ना नंबर प्लेट ना इतर कुठले पुरावे.अजय सहा ते सात तासांनी शुद्धीवर आला तो शुद्धीवर येताना 'नमिता' इतकेच म्हणाला आणि नंतर विचित्र वागू लागला,कोणाला ओळखत न्हवता डॉक्टरने त्याला काही दिवसांनी त्याला मनोरुग्ण घोषित केले, काहीही विचारले तरी आता तो फक्त 'नमिता' इतकेच बोलतो.
आणि जाती-पातीच्या वादात मनुष्य हत्येसोबतच एका निरागस प्रेमाचा बळी गेला आणि ही प्रेम कहाणी अधुरी राहिली......