5
जोमाने आणि नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात केली. पण आयुष्यचं पूर्ण खाचखळग्यांनी आणि संघर्षानी भरलेलं असेल तर नियतीच्या पुढे कुणाचं काय चालणार आहे. ते वय आकर्षणाचं, आपल्या जवळच्या कुणाजवळ तरी मन मोकळं करावसं वाटणार. धुंध – बेधुंद होऊन स्वप्नात भरारी घेण्याचं. या धोक्याच्या वयातून मार्गक्रमण करत असताना... या मार्गावरती कुणीतरी जिवाभावाचं भेटलं तर मग जणू आपल्या मोकळ्या भावनांना पंखच फुटू लागतात. मलाही तसे पंख फुटले हे खरं पण भरारी घेण्याअगोदरच कुणीतरी छाटल्यामुळे परिस्थितीने मेलेल्या माणसाला मन, भावना नसतात. त्याला प्रेम करायचा अधिकार नसतो याची जाणीव झाली.
तसं ते प्रेम नव्हतंच बालवयातलं आकर्षण होतं आणि आमच्या दृष्टीने त्याचं दुसरं नाव मैत्री होतं. अशी मैत्री जी समाजातील काही प्रवृत्तींना मान्य नव्हती.
एकदा शाळा सुटल्यानंतर बालसंकुलकडे परतत असताना आमच्याच शाळेतली माझ्या वरच्या वर्गात शिकणारी दोन मुलांनी माझी वाट अडवली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे मला काहीच समजलं नाही. त्यांनी मला एका जवळच असलेल्या मैदानावर आणलं. काही समजायच्या आतच एकाने पाठीमागून माझ्या पाठीत लाथ घातली.
साला बेवारस औलाद कहीं की...
धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का... लावारिस... कुत्ता असं म्हणून ती मुले शिवीगाळ
करून मला मारहाण करू लागली....
पुन्हा अवनीशी बोलण्याचा किंवा तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केलास तर तुझा जीव घेईन. लक्षात ठेव.
अवनी मेरी जान है जान. असे म्हणत ते तरुण निघून गेले...
मी रक्तबंबाळ होऊन विव्हळत पडलो होतो. रात्रीचे साधारण ७.०० वाजले होते. त्या खुल्या मैदानात ओली पार्टी करत बसलेले काही लोक माझ्याजवळ आले. मला मारहाण झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
त्यांनी मला दवाखान्यात दाखल केलं. माझी ओळख झाल्यानंतर बालसंकुलला कळविण्यात आले. या सगळ्या प्रकरणाबद्दल सगळ्यांनी मला चांगलचं सुनावलं. घरी आजोबांना कळविण्यात येऊ नये अशी मी जाधव सरांकडे विनंती केली. या प्रकाराबद्दल शाळेतील सर्वच शिक्षक आणि बालसंकुलमधील अधिक्षक, काळजीवाहक माझ्यावर खूपच नाराज झाले.
अचानक एकदा जोशी सरांनी मला भर वर्गात चांगलंचं सुनावलं. ते म्हणाले...
राजू, तुला तुझ्या परिस्थितीची अजिबात जाणीव नाही. आपली परीस्थिती गरिबीची असूनदेखील आणि आपल्याला कुणाचा आधार नसतानाही तू इतका बेफिकीर वागतोस. तुझ्या या वागण्याबद्दल मला तुझी कीव येते. इथूनपुढं तुझ्यासारख्या मुलावर विश्वास ठेवण्याअगोदर आम्हांला हजारवेळा विचार करायला हवा.
या सगळ्या प्रकरणामध्ये मला एक गोष्ट मात्र समजत नव्हती आणि ती म्हणजे मला कुणी मारलं...? का मारलं...? असे प्रश्न विचारण्याऐवजी प्रत्येकजण मला दोष देवून सुधारण्याचा, चांगलं वागण्याचा सल्ला देत होते. त्यांच्या दृष्टीने ती गोष्ट बरोबर होती कारण बाबाराव इंगळेच्या लोकांनी शाळेत आणि बालसंकुलमध्ये येवून माझ्याबद्दल उलटसुलट सांगितलं होतं. हे नंतर माझ्या लक्षात आलं होतं.
मी भरकट चाललो होतो याची जाणीव झाली. १० वी चं महत्वाचं वर्ष असूनही आपण याबाबत गांभीर्याने घेत नाही याबद्दल मनाला खेद वाटू लागला. १० वी नंतर बालसंकुल मध्ये राहण्याची मुदत वाढवून घेण्याचा मनात विचार सुरु असताना माझ्याबद्दल अशी घटना घडावी हे कुणालाही अपेक्षित नव्हतं. माझे हे प्रताप पाहून मला मुदत वाढवून मिळेल असे वाटत नव्हते. पण अजून माझ्या हातात सहा महिने होते. स्वतःमध्ये चांगला बदल घडवून दाखवायचा. खूप मेहनत घ्यायची ठरवलं. त्यादृष्टीने अभ्यासाचं नियोजन करून अभ्यासाला लागलो.
एकदा आजोबांचं पत्र आलं. पत्रात आजोबांनी लिहिलेलं होतं. १० वी नंतरची चिंता करू नको. तुझी कोल्हापुरातील मावशी परवाच घरी आली होती. तुझ्या पुढच्या शिक्षणाबाबत आमची चर्चा झाली. तुझी मावशी तुझ्या पुढच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेणार आहे. तू चिंता करू नकोस... फक्त मन लावून अभ्यास कर.
पत्र वाचून मनाला धीर आला. पण एका बाजूला वाटत होतं की, बालसंकुल मधीलचं आपलं आयुष्य बरं आहे. खरं तर १० वी नंतर मला मुदत वाढविण्याची विनंती करणार होतो. पण हे सगळं माझ्या निकालावर आणि बालसंकुल प्रशासनाच्या निर्णयावर अवलंबून होतं. आता दुसरा कोणताच विचार न करता फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे आणि मन लावून अभ्यास करणे हेच फक्त डोक्यात होते.
एकदा पहाटेचं अचानक बालसंकूलच्या बाहेर गदारोळ उडाल्याचा आवाज आला. बालसंकुलमधील कर्मचारी आणि आम्ही सर्व मुले एकत्र गोळा झालो. पाहतो तर काय एक नवजात लहान बाळ थंडीन टाहो फोडत होतं. मध्यरात्रीचं कुणीतरी त्याला बाहेर आणून ठेवले होते. हा प्रकार मी पहिल्यांदा पाहत होतो. पण आमच्या बालसंकुल मधील दामू काकांनी मला सांगितले की, असे प्रकार याच्याअगोदरही झालेले आहेत. हे ऐकून माझे मन सुन्न झाले. जन्म देणारी आई आणि जन्म देणारा बाबा इतका क्रूर कसा असू शकतो...? आई कोण आणि बाबा कोण हे समजायच्या अगोदरच ते निरागस कोवळं बाळ पोरकं व्हावा. हा कोणता न्याय...? त्या विधात्यान या निष्पाप बालकाला इतकी क्रूर शिक्षा का द्यावी... ? या आणि अशा अनेक प्रश्नांचं माझ्या मनात थैमान माजलं.
कधीकधी हे सगळं निराळ जग पाहताना आणि अनुभवताना मी खूप अस्वस्थ व्हायचो. मी ही त्यांच्यातलाच एक असलो तरी माझ्या दु:खापेक्षाही या बाल संकुल मधील अनेक मुला-मुलींचे आणि बालसुधारगृहातील मुली – महिलांचे दु:ख हे खूप मोठे होते. अनेक मुलींचं ऐन तारुण्य नासवून पलायन करणारे क्रूर राक्षसी प्रवृत्तीचे पुरुष मी पाहिलेत. लग्नाचं आमिष दाखवून एखाद्या गरीब महिलेच्या परिस्थितीचा आणि तिच्या मजबुरीचा फायदा घेऊन तिचा भोग घेऊन तिला फसवून पळून जाणारे आणि स्वतःला पुरुष म्हणवून घेणारे निर्दयी राक्षस मी पाहिलेले आहेत. आणि मग समाज अशाच निष्पाप जीवांना दोषी ठरविण्यासाठी सज्ज होतो. या लोकांना कुणाकडूनच न्याय मिळत नाही. समाजाने बहिष्कृत केलेला घटक बनून उभं आयुष्य जगणारे असे अनेक निर्दोष महीला,पुरुष आजही अपमानास्पद आयुष्य जगताना मी पाहतोय त्यावेळी मनाला वाटायला लागतं की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून ७० वर्षे झाली तरीही आपण या समाजाने बहिष्कृत घटकासाठी अपेक्षित असं काहीचं करू शकलेलो नाही याची कुठेतरी खंत वाटायला लागते.
पदरात दोन पोरं असताना मंगल मावशीचा नवरा शेजारच्या बाईला घेऊन पसार झाला. लहान दोन पोरांना घेऊन मंगल मावशी महिलागृहात दाखल झाल्या. मंगल मावशींना बालसंकुल मध्ये जेवण बनविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. दोन मुलं बालसंकुल मध्ये मोठी होऊ लागली. मंगला मावशी मात्र नवऱ्याच्या आठवणीने रडत बसायच्या. पोटी असलेल्या दोन मुलांची काळजी त्यांना सतावत रहायची. कधीकधी वेड्यासारख्या ओरडायच्या, रडायच्या अंगावरची कपडे फाडून फेकून द्यायच्या . त्यांचा तो अवतार पाहून आपण पुरुष असल्याची मनाला लाज वाटायची. हे सगळे पाहत असताना आपण खूप शिकून मोठं होऊन यांच्यासाठी काहीतरी करण्याची उर्मी मनात जागी व्हायची आणि मी जोमाने अभ्यासाला लागायचो.
एकदाचा १० वी चा निकाल लागला. ८७.२१ % टक्के गुण मिळवून दहावी बोर्डाच्या परीक्षेत शाळेमध्ये दुसरा आलो होतो. प्रथम तीनमध्ये येणे तर खूपच दूरची गोष्ट. आजवर मी कधीही ६० % च्या पुढे गुण न मिळविलेला मी. आज चक्क ८७.२१ % गुण मिळविले होते. माझाचं माझ्यावर विश्वास बसत नव्हता. सर्वच स्थरातून माझं भरभरून कौतुक होत होते. आजवर बालसंकुलची मुलं म्हणून तिरस्कार करणारे, अपमानास्पद वागणूक देणारे आज मात्र पाठीवर कौतुकाची थाप देत होते. पण तो तिरस्कार, अपमान माझ्या या छोट्याशा कर्तुत्वाने संपणार नव्हता. याची मला जाणीव होती. नाडकर्णी सर, जोशी सर उषा मଁडम, पाटील सर, जाधव सर यांच्यासह बाल संकुल आणि सुसंस्कार विद्यालयातील सर्वांनी तोंड भरून खूप कौतुक केले. पाठीवर शाबासकीची थाप दिली. यामुळे माझा आत्मविश्वास वाढायला मदत झाली.
मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याचा आनंद आणि समाधान आजी – आजोबांच्या चेहऱ्यावर दिसत होते. ते मला भेटायला बालसंकुल मध्ये आले होते.