Gets swayed ... - 3 in Marathi Fiction Stories by parashuram mali books and stories PDF | दुभंगून जाता जाता... - 3

Featured Books
Categories
Share

दुभंगून जाता जाता... - 3

3

घडलेल्या घटनेने आणि झालेल्या प्रकाराने आजी – आजोबा व्यथित झाले होते. मामाच्या या अशा वर्तणूकीने ते त्रस्त झाले होते. मामापुढे आजी - आजोबांचा नाईलाज झाला होता. वृद्धत्व आणि आजारपण यामुळे ते असहाय्य झाले होते. एकुलता एक मुलगा आणि मुलावर असलेल्या प्रेमापायी ते कोणतेही कठोर पाऊल उचलू शकत नव्हते.

निरोप देण्याची वेळ झाली तशी आजोबांचे डोळे भरून आले. जाधव सरांना हात जोडून आजोबा म्हणाले...

सर, पोराकडे लक्ष असू दे... आता तुम्हीच याचे आई – वडील. आता आम्ही किती दिवस जगणार... असं म्हणता म्हणता आजोबांचा आवाज कापरा झाला. आजोबांनी सरांच्या पायावर डोके ठेवले. आजही तो प्रसंग मला अस्वस्थ करतो.

सरांनी आजोबांना जवळ घेतले.... आजोबांना धीर देत सर म्हणाले...

सुधाकरराव अजिबात काळजी करू नका. राजू आता आमचा आहे. आता त्याची जबाबदारी आमच्याकडे आहे... तुम्ही निश्चिंत रहा.

आजी – आजोबा अधूनमधून मला भेटायला यायचे. कुठंलाही सणवार चुकवायचे नाहीत. सणावाराला घरामध्ये केलेलं गोडधोड मला जाधव सरांकडून पाठवून द्यायचे. किंवा आजोबा स्वतः यायचे.

आता माझे मन रमले होते. मित्रपरिवारही झाला होता. चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्राविण्य मिळवत होतो. त्याचदरम्यान आंतरशालेय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत माझा प्रथम क्रमांक आला. तेव्हापासून शाळेत सर्वजण मला ओळखायला लागले. शिक्षकांनी सोपविलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने पूर्ण करू लागलो. सर्वांची माझ्यावर मर्जी बसली.

उषा मଁडम , देसाई सर, चौगुले सर, सुनिता मଁडम, मुख्याध्यापक पाटील सर आणि आमच्या बालसंकुलमधील अधिक्षक बापट सर या सर्वांनी मला खूप प्रेम दिले. एकूणच सर्व शिक्षकांच्या प्रेमाच्या – आधाराच्या छायेत मी वाढू लागलो. कदम शिपाई मामा, माने वाଁचमन मामा पोटच्या मुलाप्रमाणे माझी काळजी घ्यायचे.

आमच्या बालसंकुलच अगोदरचं नाव रिमांड होम होतं. नंतर रिमांड होम हे नाव बदलून बालकल्याण संकुल असं नाव देण्यात आलं. आम्हां मुलांना दुपारचं जेवण मिळायचं नाही. शाळेच्या मधल्या सुट्टीत आम्ही इकडे – तिकडे भटकत रहायचो. आमच्या बालसंकूल मधील मुलांव्यतिरिक्त घरातून शाळेत येणाऱ्या – जाणाऱ्या मुलांचीही संख्या भरपूर होती. त्यातील काही मुलं आम्हां मुलांना दुपारच्या डब्यातली भाकरी – भाजी द्यायची. आम्ही जे मिळलं ते खाऊन घटाघटा पाणी प्यायचो. पोटाला थोडा आधार व्हायचा. कधीकधी आम्ही सकाळच्या जेवणात मिळणारी भाकरी चड्डीच्या खिशातून शाळेत आणायचो आणि ती दुपारी खायचो.

अनेकवेळेला आम्ही बालसंकुलमध्ये राहणारी मुलं आहे, असं समजल्यावर लोकं आमच्याकडे तिरस्काराच्या नजरेने बघायची. काही पालक आपल्या मुलांना आमच्याबरोबर खेळण्यास, बोलण्यास मनाई करायचे. शाळेच्या आजूबाजूला राहणारी आणि घरातून येऊन – जाऊन करणारी काही मुलं आम्हां बालसंकुल मधील मुलांना सामावून घेत नव्हती. आमचा तिटकारा करायची. वर्गात्त माझ्याबाबतीत अनेकवेळेला असं घडायचं की, काही मुलं मला जवळ घ्यायची नाहीत. आम्हांला शिवू नको असं म्हणायची. त्यावेळेला मला याचं कारण समजायचं नाही. काही दिवसांनी या गोष्टीचा शोध घेतल्यानंतर मला खरं कारण कळालं.

आमचा बालसंकूलचा परिवार फक्त मुला – मुलींचा परिवार नव्हता तर तिथे विधवा, परितक्त्या, वेश्या व्यवसायात फसलेल्या महीला , मुली, बाल विवाह झालेल्या आणि नंतर नवऱ्याने सोडून दिलेल्या मुली, विधवा विवाह झालेल्या पण समाजाने न स्विकारलेल्या अशा अनेक महीला सुद्धा इथं राहत होत्या. त्यांचा महीला सुधारगृह हा विभाग होता. इथे राहणारे आम्ही मुलं – मुली अशाचं मातेच्या पोटी जन्माला आलो होतो. जिथे अनेकांना आपला बाप आणि आई माहीत नव्हती. अनेकांचे आई – वडीलही होते पण ते मुलांना स्विकारायला तयार नव्हते. आई – वडील दोघेही एकमेकांपासून विभक्त राहणारे आणि दुसरे लग्न केलेले असेही अनेक मुलांचे आई – वडील होते. जे पहिल्या पत्नीपासून किंवा पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाचा किंवा मुलीचा स्विकार करायला तयार नसायचे. पती – पत्नीच्या वादाची शिक्षा आम्हां निरागस – कोवळ्या वयातील मुलां – मुलींना भोगावी लागायची.

समाज आम्हांला का स्विकारत नाही. समाज आमचा का तिरस्कार करतो हे त्यावेळी मला समजलं. आमचं जग खूप वेगळं आहे याची पहिल्यांदा मला जाणीव झाली. पांढरपेशा,स्वतःला विद्वान समजणारा हा समाज कोणत्या विटाळचं ढोंग आणतोय...? हा प्रश्न आजही मला पडतोय. यामध्ये ना त्या पाय घसरलेल्या स्त्रियांचा दोष आहे ना या निरागस मुलांचा दोष आहे. खरा दोष आहे तो आपल्या पोखरलेल्या व्यवस्थेचा – समाजाचा आणि पुरुषी मानसिकतेचा. आम्हां अनाथांना, पाय घसरलेल्या, चुकलेल्या स्त्रियांना, वंचितांना जगण्याचा अधिकार का नाही...? आम्ही पशु आहोत...? का आमचा पावलोपावली तिरस्कार केला जातो...? आजच्या या २१ व्या शतकातही आम्हांला हक्क – अधिकारापासून वंचित का ठेवलं गेलंय...? आजही आमची हेळसांड होते... अनेकवेळेला सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिली जाते आणि अशाचं लोकांची समाज पाठराखण करतो. या आणि अशा अनेक प्रश्नांनी मी अस्वस्थ झालो होतो. मला हे सगळं बदलायचं होतं. या वंचित – नाकारलेल्या समाजातील प्रत्येक घटकाला मला स्वाभिमानानं जगताना पहायचं होतं. आणि हा बदल करण्यासाठी मला शिक्षण घेणं गरजेचं आहे. ही जाणीव माझ्या मनात खोलवर रुजली.

एकापाठोपाठ एक शैक्षणिक वर्षे पुढे जाऊ लागली. त्याकाळात मला वाचनाची प्रचंड आवड निर्माण झाली. कुसुमाग्रज, वि.स.खांडेकर, राजन गवस, डॉ.सुनीलकुमार लवटे, व.पू.काळे, पु.ल. देशपांडे, व्यंकटेश माडगुळकर, ना.धों. महानोर अशा अनेक साहित्यिक – लेखकांचे साहीत्य मी झपाटल्यासारखं वाचून काढलं. माझ्या या वाचनामुळे मला लिहिण्याची प्रेरणा मिळत गेली. मी वेगवेगळ्या विषयावर कविता, कथा, लेख लिहू लागलो. आमच्या मराठी विषयाच्या जोशी सरांनी मला लिहिण्यासाठी आणि वाचनासाठी मला प्रोत्साहन दिले. मी लिहिलेल्या अनेक कविता त्यांनी शाळेच्या वार्षिक अंकात आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्या.

आम्हां मुलांचा राहण्या – जेवणाचा, कपड्याचा आणि शैक्षणिक खर्च जरी सरकारच्या समाज कल्याण खात्यामार्फत होत असला तरी तो पुरेसा नव्हता. तीच अवस्था महीला सुधारगृहाचीसुद्धा होती. त्यामुळे संस्थेला समाजातील मोठे उद्योजक, व्यावसायिक लोकांकडे हात पसरावे लागत असत. अनेक लोक स्वतःहून सढळ हाताने मदत करण्यासाठी धावून येत असतं. कुणी वह्या, पुस्तके देणगीच्या रूपाने दान करत तर कुणी कपडे किंवा धान्य देत असत. अधूनमधून समाजातील पुढारी, नेते मंडळी यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हांला गोडधोड जेवण मिळायचं. त्या जेवणाची आम्हांला खूप उत्सुकता आणि गोडी वाटायची. सरकारच्या अनुदानाची अपेक्षा न करता अनेक लोक सेवाभावी वृत्तीने काम करायचे. अनेकांचे पगार वेळेवर होत नव्हते. संसारिक जबाबदारी पेलत असताना संस्थेतील कर्मचाऱ्यांची खूप ओढाताण व्हायची. पण हे लोक कुणाकडेही लाचारपणे हात न पसरता आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत, लढत, झगडत राहायचे.

शिक्षणाचा माझा प्रवास निरंतर चालू होता. वाढलेल्या आजारपणामुळे आजोबांचं येणं – जाणं कमी झालं होतं. त्यामुळे आजोबा मला पत्र पाठवत राहायचे आणि मी त्यांच्या पत्राला उत्तर देत रहायचो. माझं वाढतं वय होतं... फुलपाखरासारखं भरारी घेण्याचं आणि गुलाबी स्वप्न बघण्याचं... शाळेत जसे माझे मित्र होते तशा मैत्रिणीही होत्या. अनेकवेळेला घरातल्यांचा विरोध डावलून मित्र – मैत्रिणींचा विरोध डावलून ती माझ्यासाठी नेहमी दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन यायची तिचं नाव होतं अवनी. ती माझी खूप काळजी घ्यायची. शाळेत, वर्गात मला कुणी काही बोललं, माझ्याशी कुणी भांडलं तर त्यांच्याशी वाद घालायला आणि त्यांना उत्तर द्यायला ती नेहमी समर्थ असायची. तसा शाळेत तिचा दबदबा होता. होती थोडी फटकळ, रागीट पण मनानं खूप मोकळी आणि समंजस. प्रत्येकाच्या भावना, दु:ख समजून घेणारी तितकीच संवेदनशील. वर्गात आणि वर्गाबाहेरही एक प्रकारचा तिचा वचक होता. तिच्या शब्दाला मान होता म्हणूनच ती आमच्या वर्गाची वर्गप्रमुख होती. अवनीचे वडील जिल्ह्याच्या राजकारणात परिचित, प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. स्थानिक राजकारणात त्यांचा दबदबा होता.

आमच्या सुसंस्कार विद्यामंदिराचे आणि बालसंकुलाचे मुलांसाठी संयुक्त असे विविध कार्यक्रम असायचे. लोक बिरादरी, स्वच्छता अभियान, राष्ट्रीय सेवा योजना , व्यसनमुक्ती जनजागरण, अंधश्रद्धा निर्मुलन अशा विविध प्रबोधनात्मक आणि सामाजिक उपक्रम व कार्यक्रमात आम्ही मुले हिरीरीने भाग घ्यायचो.