Old age love - 7 in Marathi Love Stories by Shubham Patil books and stories PDF | वृद्धाश्रमातलं प्रेम - 7

Featured Books
Categories
Share

वृद्धाश्रमातलं प्रेम - 7

भाग – ७

“तुमची जागा रिझर्व्ह करून ठेवली होती.” माझ्या या वाक्यानंतर ती जास्तच हसू लागली. मग आम्ही अभ्यासाला सुरुवात केली. त्या दिवशी तिने माला भरपूर अडचणी विचारल्या. माला शक्य तेवढ्या सोडवल्या. त्या दिवशी माझा बर्‍यापैकी अभ्यास झाला आणि तिचा भरपूर. मी खोलीवर येईपर्यंत, आल्यावर, झोपताना आणि झोपेतसुद्धा माझ्या मनात सुधाचेच विचार सुरू होते. तो रुमाल मी सांभाळून पेटीत ठेऊन दिला.

असाच अभ्यास होत राहिला. परीक्षा झाली. दोघं उत्तम गुणांनी पास झालो. रिझल्ट लागला तेव्हा ती खूप आनंदात माझ्याकडे आली आणि म्हणाली, “अभिनंदन.”

मीसुद्धा तिला तेवढ्याच आनंदात म्हणालो, “तुमचंसुद्धा.”

“तुमचीच कृपा. तुम्ही लायब्ररीत मदत केली नसती तर काही खरं नव्हतं माझं. खरंच धन्यवाद!!!” ती खूप अत्यानंदात होती.

“नाही, तसं काही नाही. उलट जर तुम्ही मला लायब्ररी दाखवली नसती तर मी कर्ज काढून पुस्तकं घेतली असती आणि मग हप्तेच भरत बसलो असतो.” माझ्या ह्या बोलण्यावर ती खूप हसायला लागली. भरपूर हसून झाल्यावर ती म्हणाली, “चला तुम्हाला धन्यवाद म्हणून कॉफी घेऊ.”

आम्ही मस्तपैकी कॉफी घेतली. असेच दिवस जात होते. हळूहळू दुसरं वर्ष संपलं. मग तिसरं. या तीन वर्षांत आमची जवळीक खूप वाढली.

एकमेकांना बघितल्याशिवाय आमचा दिवस जात नसे. त्यामुळे आजारी असतांनासुद्धा ती कॉलेजला यायची. खरंतर आम्ही एकमेकांवर प्रेम करायला लागलो होतो. आमच्या नकळत. पण आम्ही तसं कधी बोललोच नाही एकमेकांना. पेपराआधी लायब्ररीत अभ्यास करण्याचं सत्र आम्ही शेवटपर्यन्त सुरू ठेवलं. बी. ए. चा शेवटचा पेपर होता. अपेक्षेप्रमाणे चांगला गेला. पेपर झाल्यावर ती मला भेटली. म्हटली, “चला कॉफीला.”

त्या दिवशी ती शांतच होती. मला ती शांतता अस्वस्थ करत होती. आज तिला मनातलं सांगू असा विचार केला होता. कॉफीच्या निमित्ताने आयतीच संधी चालून आली होती. त्यामुळे बोलावं की नाही या विचारात मी होतो. बोलल्यानंतर जर तिला वाईट वाटलं असतं तर मात्र मी तिच्या नजरेतून कायमचा उतरलो असतो. तिसुद्धा तसाच काहीसा विचार करत असावी बहुतेक. मी तिच्या डोळ्यांत पहिलं. ती लगेच मान फिरवून उगाचच इकडे तिकडे पाहायला लागली. कॅन्टीनमध्ये नेहमीप्रमाणे वर्दळ होती पण आमच्यातली शांतता मला क्षणाक्षणाला अजून जास्त अस्वस्थ करत होती. शेवटी न राहवून मीच म्हटलं, “काय मग आता एम. ए. करणार की संसार?”

माझ्या ह्या वाक्याने ती दचकलीच. मी असं काही विचारेल याची तिला कल्पना नसावी बहुतेक. कपातून वर येणार्‍या कॉफीच्या वाफंकडे बघत ती म्हणाली, “ठरलं नाही अजून. एम. ए. चं आणि संसाराचं पण. पण संसार करेल तर शक्यतो वागण्या-बोलण्यात आणि दिसण्यात तुमच्यासारख्या माणसासोबतच.” शेवटचं वाक्य ती इतकं हळू बोलली की तीच तिलाच ऐकू गेलं नसेल. पण मी मात्र ऐकलं. मी आतापर्यन्त तिच्यासोबत घालवलेले सर्व क्षण आठवून म्हणालो, “माझ्यासारख्या माणसासोबत की माझ्यासोबत?”

हे ऐकून मात्र ती लाजून चूर झाली. गालातल्या गालात अतिशय लघवी हास्य करत ती वर बघत म्हणाली, “विचार करावा लागेल.”

“करा मग लवकर. मी उद्या निघतोय.” माझ्या ह्या गुगलीने ती भानावर आली आणि म्हणाली, “खरंच?”

“हो, घरी जातोय.” मी तिच्याकडे बघत म्हटलं. माझ्या ह्या वाक्याने तिचा चेहरा पडला. ती माझ्याकडे न पाहताच म्हणाली, “जायचंच होतं तर मग आलात कशाला?”

मला काय बोलावं ते सुचत नव्हतं. ती भावुक झाली होती हे मी ओळखलं होतं. माझी परिस्थितीसुद्धा काही वेगळी नव्हती. मग काही वेळ असाच शांततेत गेला. मग तिच्याकडे बघत मी म्हणालो, “माझा प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही?”

“मला थोडा वेळ द्या विचार करायला.” ती माझ्याकडे बघत म्हणाली.

“ठीक आहे, मजा करा सुट्ट्यांमध्ये.” असं म्हणून मी उठतोय हे बघून ती म्हणाली, “काय घाई आहे? बसलो असतो अजून थोडं.”

“माझीसुद्धा इच्छा आहे हो बसण्याची, पण खोलीत खूप पसारा झालाय शिवाय उद्याची तयारी करायची आहे. माफ करा. मनात असून थांबता येत नाहीये.” माझ्या ह्या बोलण्यावर ती निरुत्तर झाली. शेवटी मी निघालो. मागे वळून बघितलं तर ती बसलेलीच होती. मला खरंच अजून काही वेळ घालवायचा होता पण वेळ मर्यादित होती. मी थोड्या खिन्न मनाने खोलीवर आलो. आवरायला घेतलं. कशातच मन लागत नव्हतं. पण करणं भाग होतं.

दुसर्‍या दिवशी लवकर तयार होऊन पुणे स्टेशनला गेलो. तीन वर्षांपूर्वी आलो तेव्हा कसा होतो मी? काय गमावलं, काय कमावलं? याचा विचार करत मी माझ्या जागेवर बसलो. गाडी सुटायला अजून अवकाश होता. मी समान वगैरे ठेवत होतो. भरपूर समान आणलं होतं घरून. पण फक्त आणलंच होतं, आता सर्व एकाच वेळी घेऊन जात होतो. मी पेट्या वगैरे नीट ठेवत असताना माझ्यासमोर एक सावली दिसली. वर बघून पाहतो तर ती सुधा होती. माला आश्चर्याचा धक्का बसला. मी तिला बघून क्षणभर थबकलोच.

मला काही बोलू न देताच ती म्हणाली, “मी विचार केलाय. अरुण, मला आवडेल तुझ्यासोबत संसार करायला.” असं म्हणून तो लाजेने लाल झाली आणि लघवी हसू लागली. नजर मात्र खालीच होती आणि उगाचच केसांच्या बटेशी चाळा करत होती. तिने मला एकामागून एक दोन अनपेक्षित धक्के दिले होते. एक म्हणजे मी विचारसुद्धा केला नव्हता, ती मला थेट पुणे स्टेशन वर भेटायला येईल असा आणि दुसरं म्हणजे तिला माझ्याशी संसार वगैरे करण्याची इच्छा होईल. तिचं बोलणं ऐकून मी सीटवर बसलो. माझ्यासमोर ती बसली. नेहमीप्रमाणे गहन प्रश्न, काय बोलावं?

तिची खेचवी या उद्देशाने मी म्हणालो, “ठीक आहे, तुझा विचार झाला. पण माझं काय? मला वेळ हवा विचार करायला.” माझ्या ह्या वाक्याने ती बुचकळ्यात पडली. मी मजा घेतोय की खरं बोलतोय हे तिला कळत नव्हतं. माझ्या चेहर्‍यावरचे भाव मी अगदी निर्विकार ठेवले होते. आतून कितीही गुलाबी गुदगुल्या होत असल्या तरीही. मग ती म्हणाली, “गाडी सुटेपर्यंत वेळ आहे.”

यावेळी मी खळखळून हसलो. मी तिची मजा घेत होतो हे लक्षात येताच दोघं हसायला लागलो आणि हसता हसता केव्हा हातात हात घेतले तेच कळलं नाही. मग भानावर आल्यावर तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी म्हटलो, “राहू देत आता. कायमचेच.” ती परत लाजली.

मी हात सोडत म्हणालो, “तू घरी सांगितलं का?”

“वेडा आहेस का? कशाला इतक्यात. वेळ आल्यावर सांगेन. अजून तीन वर्ष काढायचे आहेत तुझ्यासोबत आणि नंतर संपूर्ण आयुष्य.” तिचं हे बोलणं ऐकून मी लाजलो. गाडी सुचण्याची सूचना झाली तशी ती उठून गाडीच्या बाहेर आली आणि खिडकीपाशी येऊन थांबली. मी तिला म्हणालो, “मी परत येईपर्यंत काहीतरी आठवण म्हणून दे.” तिने लगेच तिचा रुमाल दिला. मी तो पेटीत ठेवायला लागलो तेव्हा ती म्हणाली, “आणि मला काय?” तेव्हा मला त्या माझ्या रुमालाची आठवण झाली, ज्याच्यावर ती बसली होती. मी पेटीच्या एका कोपर्‍यातून काढून तो दिला. मीसुद्धा रुमाल दिला हे पाहून ती हसली तेव्हा मी म्हणालो, “ह्या रुमालाला लायब्ररीत तुझा स्पर्श झाला म्हणून मी जपून ठेवला होता. आपल्या सोबतच्या पहिल्या अभ्यासाचा साक्षीदार आहे तो.” माझं बोलणं ऐकून ती खली बघत स्मितहास्य वगैरे करू लागली. गाडी सुटण्याची शेवटची सूचना झाली, भोंगा वाजला आणि गाडी सुटली. मी तिला बघितलं तेव्हा ती डोळे टिपत होती. तिने हात हलवून मला निरोप दिला. मीसुद्धा हात हलवला. प्रवास तिच्या आठवणीत कसा गेला हे कळलंसुद्धा नाही. मग कशाबशा सुट्ट्या ढकलल्या आणि मास्टर्ससाठी म्हणून परत एकदा पुण्यनगरीत आलो.

†††