भाग – ३
सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी मॅनेजर आवर्जून उपस्थित होते. निवार्यात कुणी नवीन आलं की त्यांची ओळख करून द्यायला म्हणून ते सायंकाळी प्रार्थनेला हजर असत. प्रार्थनेची वेळ होत आली तशी सर्वांची पावले मंदिराकडे वळू लागली. या लोकांसाठी प्रार्थना म्हणजे मनाला समजूत घालण्याची एक तर्हा होती. प्रार्थना सुरू झाली. नेहमीच्या सवयीप्रमाणे सर्वजण एकामागून एक श्लोक म्हणत होते. या श्लोकांचा अर्थ मात्र सर्वांना माहिती नसावा बहुतेक. पण मनाला तेवढाच एक आधार म्हणून ते म्हणायचे. प्रार्थनेची मात्र एक गंमत असते, प्रार्थना केली की सर्वांना वाटतं आपलं काम संपलं आता चेंडू देवाच्या कोर्टात. पण तसं नसतं हो. असो, उगाच तत्वज्ञान वगैरे. प्रार्थना झाली. सर्वजण खाली बसले, अर्थात ज्यांना बसता येत होतं तेच. बाकीच्यांसाठी बाकं होतीच. सकाळी आलेल्या त्या बाई बर्वे काकूंसोबत बसल्या होत्या. प्रार्थनेच्या ध्वनीलहरी अजूनही धूप आणि आगरबत्तीच्या धूरासरख्या वायुमंडळात तरंगत होत्या. हिवाळा असल्यामुळे सायंकाळी सहा वाजताच काळोख पडायला सुरुवात झाली होती. ऑफिसमधल्या रेडिओ मधून येणार्या “हे राम”च्या भजनाने सात्विक वातावरणात अजून भर पडली होती.
मॅनेजर उठले आणि बोलू लागले, “नमस्कार, शुभसंध्या. आपल्याला माहितीच असेल आज सकाळी आपल्या परिवारात अजून एका जणाची भर पडली आहे. आपल्या नवीन सदस्यांचं नाव आहे सुधा कदम. त्यांना इथं रुळायला वेळ लागेल. सर्वांनी सहकार्य करा. आपल्या परिवरचा हिस्सा बनवा. सगळ्यांना माहितीये, आता आपल्याला एकमेकांशीवाय कुणी नाही. आयुष्याची सेकंड ईनिंग मस्त जागा. अडचणी कुणाला नसतात. प्रत्येकाला असतात. पण आपण सर्व भाग्यशाली आहोत. इथल्या प्रत्येकाला जगण्याचा प्रचंड अनुभव आहे. त्यामुळे एकही अडचण आली तर ती सोडवायला दहा जण आहेत. काहीही अडचण आली तर माला सांगा. चला, मी माझी बडबड थांबवतो. वेळेवर जेवायला या.”
“हा मॅनेजर किती गोड बोलतो रे. नुसती साखर खातो की काय दिवसभर? नुसतं चांगलंच बोलण्याची कला कुठून आली असेल रे याच्यात.” बर्वेकाका म्हणाले.
“हूं, भाग्यशाली आहात म्हणे. अश्वत्थामयासारखं जगणं आलंय नशिबी आणि भाग्यवान म्हणे.” जोशीकाकांनी मॅनेजरच्या भाषणावर अभिप्राय दिला.
“अरे जोशी, ते जाऊ दे. तो काय म्हणाला ते ऐकलं का? सुधा कदम.” बर्वेकाका जोशींचं बोलणं तोडत म्हणाले.
“हो. मग काय झालं त्यात. ती तर आपल्या इथली पद्धतच आहे ना, कुणीही नवीन आलं की त्याचा परिचय करून देण्याची. तपशिलात न बोलता.” जोशींना काही समजलं नाही.
“अरे, सुधा, सुधा कदम. सकाळी महाजन बोलला नाही का आपल्याला. त्याच आहेत वाटतं ह्या.” बर्वेनी जोशींच्या डोक्यात प्रकाश पाडण्याचा प्रयत्न केला.
“अरे हो की. माझ्या लक्षातच नाही आलं ते. महाजन कुठाय?” जोशी उत्साहाच्या भारत जोरात बोलले.
महाजन काका मंदिरातल्या कृष्णाची मूर्ती न्याहाळत बसले होते. कितीतरी वेळं ते एकटक मूर्ती बघत बसले होते. त्यांच्या मनात विचार येत होते, हा परमात्मा किती शिकवून गेला. पाच हजार वर्ष झाली या माणसाला अवतार समाप्त करून. तरीही त्याचंच चिंतन करावंस का वाटतं? तितक्यात जोशींच्या आरोळीने महाजन काका भानावर आले. त्यांची विचार समाधी भंग पावली. महाजन काका मागे वळत म्हणाले, “काय म्हणताय जोशी?”
“कुठं हरवलात महाजन? केव्हाच्या हाका मारतोय? जरा इकडे येता का? थोडं बसू बाहेर.” जोशींनी महाजनांना बोलावलं.
“चला, आलोच. हं देवा, तूच रे बाबा.” असं म्हणत महाजन काका बसल्या जागेवरून उठत म्हणाले.
तिघं हळूहळू मांदिराच्या बाहेर आले. तिथल्या त्यांच्या नेहमीच्या बाकावर बसले. तितक्यात तिथं बर्वे काकू आल्या. “आज तुमची तिघांची मदत लागणार आहे. गप्पा वगैरे झाल्या असतील तर या किचन मध्ये.” असं सांगून निघूनसुद्धा गेल्या. बर्वेकाका त्यांच्या पाठमोर्या आकृतीकडे बघतच राहिले.
“चला, जायचं का?” महाजन काका म्हणाले.
“लगेच काय आहे तिकडे? जाऊ थोड्या वेळाने. बायका करतील रे स्वैपाक.” जोशीकाका म्हणाले.
“जोशी तुला गरजच काय होती तुला भरीत आणि बाकीचं बनवता येतं असं सांगण्याची? तुझ्यामुळे प्रॉब्लेम झालाय सगळा. माणसांना बायकांची कामं करायला लागतात तुझ्यामुळे.” बर्वेकाका चिडून बोलले.
“अरे बाबा, आपल्या मुलांच्या हाताचं खायचं ही आपली लायकी नाही किंबहुना आपल्या नशिबात नाही. स्वतःच्या हाताने करून खाल्लं तर काय फरक पडतो. या वयात सर्वांसोबत काहीतरी करायला मिळतं. त्यामुळे टाईमपास तरी होतो. एरवी आपल्या मनात काय चाललेलं असतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मग थोडं केलं तर काय फरक पडतो.” महाजन काका गंभीर होत बोलले.
“अरे एवढं सीरियस का होतोय महाजन? मी बोलायचं म्हणून बोललो रे.” बर्वेकाका महाजन काकांकडे थोड्या अपारधिपणाने पाहत म्हणाले.
“हं, मला का बोलावलं ते सांग आता?” महाजन काकांनी मुळ मुद्द्याला हात घातला.
“हत्तीच्या, ज्याच्यासाठी बोलावलं तेच सांगायचं राहून गेलं. अरे, प्रार्थना झाल्यावर तो मॅनेजर काय म्हणत होता ऐकलं का?” जोशिकाकांनी विचारलं.
“हो, चांगलं बोलला मुलगा. थोड्या वेळासाठी पॉसिटीव्ह वाटलं रे त्याचं बोलणं. का? काही चुकीचं बोलला का?” महाजन काका दोघांकडे आळीपाळीने प्रश्नार्थक मुद्रेने बघत बोलले.
“महाजन, त्या आधी काय बोलला ते आठव. जाऊ दे. तू तुझ्या वेगळ्याच तंद्रीत असतोस. मीच सांगतो, त्या नवीन बाईचं नाव काय म्हणला तो, सुधा कदम म्हणे. सकाळी तू म्हणत होतास तीच तर नाही ही बाई?” हे सांगताना जोशींचा उत्साह ओसंडून वाहत होता आणि बर्वेकाका त्याला दुजोरा देत होते.
“हां, बोलला खरं तो. पण ती तीच सुधा असेल का याबद्दल मला शंका आहे आणि असलीही तरी आता काय फरक पडतो. म्हणजे मला म्हणायचं होतं की आपल्याला काय करायचं आहे?” महाजन काका आकाशाकडे बघत म्हणाले. ते दोघांपासून नजर चुकवत होते.
चाणाक्ष बर्वे काकांच्या लक्षात आलं. ते म्हणाले, “आता काय फरक पडतो म्हणजे काय? तू काहीतरी लपवतोयस का आमच्यापासून?”
“मी? छे रे. मी कशाला काही लपवू?” महाजन काका सारवासारव करत म्हणाले. अजूनही ते इकडे तिकडेचं पाहत होते.
“बरं, आता चालायचं का?” जोशीकाका किचनकडे बोट दाखवत म्हणले.
महाजन काकांनी होकारर्थक मन हलवत बर्वे काकांकडे बघितलं. त्यांनी मानेने होकार देताच तिघं उठले आणि ती तीन डब्यांची पासेंजर गाडी किचनच्या दिशेनं चालू लागली. किचनच्या दारावरच जोशीकाकू उभ्या होत्या. त्यांच्यासोबत नवीन सदस्या होत्या. जोशीकाकू त्यांना काहीतरी समजावत होत्या बहुतेक. आज वृद्धाश्रमात पहिलाच दिवस असल्याने थोड्या गोंधळलेल्या वाटत होत्या. माणूस एक दिवस कुठं परक्या गावी जातो तेव्हा गोंधळून जातो आणि आता तर त्यांना त्यांचं उरलेलं आयुष्य या जागेत काढायचं होतं, कितीही मानसिक तयारी झालेली असली तरीही नेमकी परिस्थिती मात्र वेगळी असते. बावरलेल्या नजरेने सर्वदूर बघत होत्या. त्यांची स्थिती त्या भित्र्या आणि घाबरलेल्या सशासारखी झाली होती, ज्याला वाटलं होतं की आपल्या अंगावर आभाळ पडलं आहे. महाजन काकांनी सुधा कदमांकडे पहिलं आणि ते परत विचारात पडले. इतक्यात बर्वेकाकू आल्या आणि त्यांना एक परात भरून बटाटे आणून दिले. आज तिघांना बटाट्याची साल काढण्याचं काम दिलेलं होतं. आजचं काम तसं कठीण नव्हतं फक्त थोडसं वेळखाऊ होतं. कारण हे तिघं सोबत असले की यांच्या विविध विषयांवरील गप्पा काही आटोपण्याचं नाव घेत नसत.
बटाट्यांची साल काढण्याचं काम सुरू होतं. पण महाजन काकांचं लक्ष मात्र तिकडे सुधा कदमांकडेच होतं. “पहिल्या दिवशीसुद्धा अशीच गोंधळली होती ती, वर्ग सापडत नव्हता तिला.” असं काहीसं ते पुटपुटले आणि कुणी ऐकलं की काय अशी शंका येऊन काहीच न बोलल्याचा आव आणून उगाचच काहीतरी गुणगुणू लागले आणि चोरट्या नजरेने दोघांकडे बघू लागले. दोघं काकांनी त्यांचं हे वर्तन हेरलं पण जाणूनबुजून त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.
†††