प्रकरण २
ज्ञानूच्या बापूचे मयत झाल्यावर ज्ञानूची माय आणि ज्ञानू लाकडे तोडायला जात असे आणि मी माझ्या माय बरोबर आपल्या डोक्यावर छोटीशी चुंबळ ठेवून त्यावर दगडी खल ठेवून विकायला जात असे. संध्याकाळी मात्र आम्ही झोपड्पट्टीची सर्व मुले एकत्र येऊन खेळ खेळत असत . दिवसभर उन्हा-तान्हाचं वण-वण फिरून पाय खूप दुखायचे. तेव्हा माय आमचे पाय दाबून देत असे. आता मात्र ज्ञानूची आणि माय-बापूची लई आठवण येति---आता ते जिवंत सुद्धा नसतील.----" अशा आठवणी काढून आजी मधेच रडत होती तर मधेच सुखावत होती.
" बरं चल आता जास्त विचार करू नको, आता आराम कर---" असे म्हणून सर उठून नर्स कडे गेले आणि तिला विचारले कि डॉक्टर येऊन गेले कां---? यायचे असतील तर त्यांना आजीला तपासायला सांगा---कारण आजी नवीनच आहेत नं---" असे म्हणून ते सकाळच्या प्रभात फेरीला निघून गेले. सरांच्या मनात असंख्य विचार येत होते. तिची जीवन कहाणी जाणून घ्यायला हवी. सर मनातच विचार करत करत वॊकिंग करत होते. काही वृद्ध सकाळच्या मोकळ्या ताज्या हवेचा आस्वाद घेत होते. तर मुलांना शाळेचे सर व्यायाम शिकवत होते. तेवढ्यात शेखर डॉक्टर वृद्ध विभागाकडे जाताना दिसले. डॉक्टर आजीविषयी काय म्हणतात हे बघायला सर डॉक्टरांच्या पाटोपाठ गेले. " गुड मॉर्निंग डॉक्टर, काल एक आजी आपल्या आश्रमात नवीनच आल्या आहेत. खोकला फार आहे. तरी त्यांना तपासून मला तिची काय परिस्थिती आहे हे सांगितले तर बरे होईल---"
" हो हो , सगळ्यांच्या आधी आपण त्यांनाच तापासूया. चला मला दाखवा---"
सर डॉक्टरांना घेऊन आजीजवळ गेले. आजी झोपलेली होती. डॉक्टरांनी आजीच्या कपाळाला हात लावून बघितले आणि म्हणाले " सर, थोडा ताप आहे दिसतो---" असे म्हणून नर्सकडून किती ताप आहे हे जाणून घेतले. " काळजी करू नका, मी तात्पुरती औषधं लिहून देतो. उद्या आपण रक्ताची तपासणी करून घेऊया---" असे म्हणून डॉक्टर निघून गेले.
आजी आपले डोळे पुसत होती. हे बघून सर म्हणाले " आजी, आता काय झाले---? अशी सारखी रडत बसू नकोस---तुला कोणाची आठवण येते कां---? "" हो रे बाबा, मला माझ्या ज्ञानूची आठवण येते. माझ्या माय-बापूची आठवण येते. पण आता माझ्या माय-बापू जीवनातही नसतील.परंतु ज्ञानू तर कुठे न कुठे असेल. तो कुठे असेल---कसा असेल---? असे विचार मनाला व्याकुळ करून टाकतात. त्याला एकदा बघायची इच्छा हाय---त्याला एकदा बघितलं कि मी शांतपणे डोळे मिटेन---त्याच्यासाठीच हा जीव घुटमळतो हाय---हे ऐकून सरांनी आजीला जवळ घेऊन तिचे सांत्वन केले.
" हा ज्ञानू आता कुठे असेल याची तुला कल्पना आहे कां---मला सांग, मी त्याला शोधून आणतो---" सर म्हणाले.
" नाही नं---मला एवढंच ठाव हाय कि एक दिस आमच्या झोपडपट्टीत एक छगन मामा आला होता. त्याने आठ-दहा दिस येऊन आम्हा मुलांना खाऊ देत असे. त्यामुळे आमची त्याच्याशी खूप गट्टी झाली होती. एक दिस आमची परिस्थिती बघून आमच्या माय-बापूला सांगितले कि मैं तुम्हारे बच्चनको बम्बई लेके जाऊंगा और उधर उनको काम दिलाऊंगा---बम्बई बहुत पैसा कामानेका शहर है---उधर बच्चे बहुत पैसा कमायेंगे और पढाईभी पढेंगे---" हे ऐकून माय-बापू खुश झाले. लगेच त्याच्याबरोबर आम्हाला मुंबईला पाठवून दिले. आम्ही मुलं छोट्या गावातली राहणारी आणि अडाणी असल्याने मुंबईचे नाव ऐकून आम्ही सर्व मुलं खुश झालो होतो. तशाच फाटक्या कपड्यांनी आम्ही मुंबईला आलो होतो. एका पडक्या इमारतीत एका रूममध्ये आम्हाला राहायला जागा दिली होती. तिथे लाईटही नव्हता. परंतु दोन-तीन दिस आम्हाला खूप खायला-प्यायला मिळत होते. छगन मामाने आम्हाला मुंबई दाखवली. आम्हाला खूप गम्मत वाटत होती. नंतर हळू हळू आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कामाला लावले. कोणी दारूच्या अड्यावर तर कोणी हॉटेलमध्ये साफसफाई करायला तर कोणी ढाब्यावर तर कोणी माल उचलायला तर कोणी विटा उचलायला असे काम करू लागले. सुरवातीला आठ तास काम होते तर नंतर हळू हळू कामाचे तास वाढले. बारा बारा तास मान मोडून काम करून घ्यायचे. पाठ मोडून यायची, तर कधी मान मोडून यायची. त्यामानाने खायलाही मिळत नव्हते. हातात एकही पैसा मिळत नव्हता. पैसे विचारले कि " तुमच्या माय कडे पैसे पाठवणार---" असे सांगून आम्हाला चूप करायचा. परंतु हळू हळू आम्हाला समजले कि आम्ही फसले गेलो आहोत. तिथून पळूनही जात येत नव्हते. कारण आमच्यावर पाहराही खूप असायचा. पळूनही जायचे तरी कुठे जायचे हा आम्हाला प्रश्न होता. आमच्या गावाचे नावही आम्हाला माहित नव्हते, तर आमचे पूर्ण नावही सांगता येत नव्हते, आमच्या झोपडपट्टीचे नावही माहित नव्हते. आपल्या माय-बापूकडे कसे जाणार---? कोणाला सांगणार---? सकाळी उठायचे आणि पाणी पिऊन कामाला जायचे. कामावर सकाळी एक वडापाव मिळत होता. दुपारी दोन चपात्या आणि थोडी भाजी आणि संध्याकाळी एक कप चहा. रात्री रूमवर डाळ-भात तो सुद्धा अंधारातच खायला लागत असे. बारा तास काम केल्याने शरीर थकून जात असे. म्हणून रात्री फेकून दिलेले बिडी-सिगारेटचे तुकडे वेचून ते फुकून झुरके घेऊन झोपी जात असे. तरी आम्ही सात-आठ महिने काम केले. नंतर ज्ञानू व मला या कामाचा त्रास होऊ लागला. पण सांगणार कोणाला---? रडून रडून आमचे डोळे सुजून जात असे. एक दिवस ज्ञानू झोपेतून उठला आणि मला म्हणाला " ए काशी ऊठ, आपण पळून जाऊया कां---वोचमन झोपलेला आहे. मी सुद्धा तयार झाले. परंतु दाराला बाहेरून काडी घातलेली होती.पळता येण्यासारखे नव्हते म्हणून आम्ही पुन्हा चटईवर जाऊन झोपून गेलो. तरी ज्ञानू पाळायची वाट शोधत होता. शेवटी कामावर असताना जेवायच्या सुट्टीत चपाती-भाजी खाऊन आम्ही दोघे हात धुवायला गेलो असे करून तिथून पळ काढला. तिथून धावता धावता मी दगडाला अडकून खाली पडले. तेव्हा माझ्या गळ्यातील ताईत तुटून चिखलात पडला. मी रडू लागले. तेव्हा ज्ञानूने मला शांत करण्यासाठी आपल्या गळ्यातील ताईत मला दिला आणि चिखलात पडलेला ताईत तसाच उचलून आपल्या खिशात ठेवला. पुन्हा ज्ञानूने माझा हात पकडून धावायला सांगितले. धावून धावून मी तर थकून गेले होते. म्हणून आम्ही एका साईडला उभे राहिलो. थोड्या वेळातच एक गाडी आली आणि आम्हाला पकडून गाडीत टाकू लागली. तेव्हा मी मात्र त्या बाप्याच्या हाताला जोराचा चावा घेतला. तेव्हा मी सुटले गेले. परंतु ज्ञानू ला तो बाप्या घेऊन गेला. मी घाबरून ज्ञानू---ज्ञानू करत रडत रडत ओरडू लागले. तेवढ्यात एक बाई आली आणि म्हणाली कि " बेटा, काय झाले---? कां रडतेस---? "
" ज्ञानूला घेऊन गेले---" असे म्हणून मी पुन्हा जोराने रडू लागले.
"हा ज्ञानू कोण आहे---? चल आपण त्याला शोधून आणूया---तुझे डोळे पूस बघू. तुला काही खायला हवे कां---? असे म्हणून त्या बाईने दुकानातून एक बिस्किटाचा पुडा आणून दिला आणि पाणी प्यायला एक पाण्याची बॉटल दिली. तेव्हा माझे समाधान झाले. मी लहान असल्याने मला काहीच कळत नव्हते. आपली माय समजून मी तिच्याबरोबर चालू लागले. तिने रिक्षा करून मला त्यात बसविले. ज्ञानूला शोधायला आपण जात आहोत असे समजून मी रडायची थांबले होते. रिक्षामध्ये मी कधी झोपले मला कळलेच नाही.