Nabhantar - 5 in Marathi Fiction Stories by Dr. Prathamesh Kotagi books and stories PDF | नभांतर : भाग - ५

Featured Books
Categories
Share

नभांतर : भाग - ५

भाग – ५

प्रत्यक्ष बोलून तोडगा काढलेला बरा म्हणून त्याने “मला महत्वाच बोलायचं आहे तुझ्याशी, उद्या कॉलेज संपल्यावर थांब लगेच जाऊ नकोस.” असा मेसेज पाठवला...

डिटेकटिव्ह सिनेमे आणि मालिका बघून, तशी पुस्तके वाचून तयार झालेलं याच गुप्तहेर डोक यातील खोच शोधात होता.. नेमक काय झाल आहे हे शोध घेण्याचा प्रयत्न करत होता आणि हे केवळ सानिकाच सांगू शकत होती आणि म्हणून तिच्या उत्तराची वाट बघत बसला.....

थोड्या वेळाने मेसेज आल्याची रिंग वाजली. आकाश च लक्ष नव्हत सुरवातीला तो त्याच्याच तंद्रीत होता, मग अचानक त्याला मेसेज आल्याचे कळले तसा तो पटकन उठला आणि चार्गिंग ला लावलेला मोबाईल घेण्यासाठी धावला, त्याचे लॉक उघडेपर्यंत पण दम नव्हता त्याला.. काय असेल, उत्सुकता..

शेवटी लॉक उघडल आणि त्याने कोणाचा काय मेसेज आला हे पहायला लागला, बघतो तर अनुचा मेसेज होता, काय रे झोपला नाहीस अजून ? ऑनलाईन दिसतोयस अजून... मिनिटभर निराश झाला तो, त्याला वाटलेलं सानिकाचा मेसेज असेल पण तो नव्हता. त्याने बघितलं तर फक्त सानिकाने मेसेज वाचला अशी खूण त्याला दिसली. मेसेज वाचून पण अजून उत्तर का दिल नसेल ? असू दे जाऊ दे, खूप विचार करतोय मी, आजच्यासाठी डोस खूप झाला, अस मनाशी म्हणत त्याने अनुला प्रतिउत्तर पाठवले, काही नाही, झोपतोय आता. शुभरात्री, उद्या भेटू कॉलेज मध्ये.

अनु, म्हणजे अनुराधा... आकाश ची बेस्ट फ्रेंड.. हो पहिलीच मुलगी जी त्याची नुसती मैत्रीणच नाही तर खास मैत्रीण झाली ! स्वभावाने साधी, सरळ, मायाळू, मदत करण्यास सदैव तत्पर अशी. पण एखादी गोष्ट डोक्यात गेली कि मग समोरच्याची काय खैर नसते मग तिच्यापुढे... मनाने फार संवेदनशील अशी होती ती. लहानपणापासून तिनेसुद्धा खूप कमी मित्र बनवले होते, मात्र ते तिच्या स्वभावामुळे.. एखादी गोष्ट मनाला लागली कि मग चिडचिड व्हायची तिची आणि त्या क्रोधाच्या भरात ती मैत्री देखील तुटून जायची. अर्थात आकाशशी तिची मैत्री जुळली, दोघेही एकमेकांचा आदर करत आणि एकमेकांच्या मताला मान देत, त्यामुळे दोघांनाही एकमेकांच्या स्वभावाची कल्पना होती. एकमेकांना सांभाळून घेत असत. आकाशने तिला सांगितलं होत कि, आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी तुझ्याशी मैत्री करून ती वरकारणी स्वभावाची पारख करून तोडली आहे, ते तुझे खरे मित्र कधीच झाले नसते त्यामुळे जे होत आणि झाल ते चांगल्यासाठीच. खरे मित्र तुझी साथ कधीच नाही सोडणार. त्याप्रमाणे एक मित्र होता तिचा शालेय जीवनापासूनचा मंदार, ज्याने तिची साथ कधीच सोडली नव्हती, आणि तो आयुष्यभराची तिला साथ देणार होता. तशी आकाश आणि मंदारची सुद्धा चांगली मैत्री होती अर्थात ती अनुमुळेच झाली. आकाश कायम मंदार ला दाजीच म्हणायचा, त्याने मोबाईल मध्ये नाव सेव्ह करतानासुद्धा तसेच केले होते.

आकाश सकाळी गडबडीने उठला, घड्याळात बघितलं ८ वाजले, बापरे कसं आवरणार आता ? अशा चिंतेत भरभर आवरायला लागला. रात्री कितीला झोप लागली हे त्याला आठवेनाच, २,३... छे काहीच आठवत नाहीय.. जाऊ दे आता अंघोळ झाली कि निघू असे म्हणत त्याने घड्याळ पहिले, ८:४६ अशी वेळ त्याने दाखवली. भराभर आवरून आकाश बाहेर पडला, आणि त्याच्या नेहमीच्या दिवसाच्या पहिल्या कामाकडे वळला, ते म्हणजे गाडीला किक मारणे.. जवळ जवळ सकाळी १५ -२० मिनिटे त्याची यातच जायची.. आज प्लीज लवकर चालू हो, तुला जे हवे असेल ते देईन असे गाडीशी बोलत आकाश गाडीला किक मारू लागला.. आणि आश्चर्य म्हणजे एरवीला २० - ३० किक नंतर सुरु होणारी गाडी आज पहिल्याच किक मध्ये चालू झाली होती. जणू काही तिलासुद्धा गडबड होती, आज काय घडतंय याची उत्सुकता होती.. तिलासुद्धा सानिका नवखी नव्हती, आकाश आणि सानिका कित्येकदा या गाडीवर बसून ठिकठिकाणी फिरायला जायचे. त्यामुळे कदाचित त्या गाडीला सुद्धा तिची ओढ असावी. गेट मधून गाडी बाहेर घेऊन आकाश ने गेट लावले आणि तो कॉलेजच्या दिशेने जाऊ लागला.

थोड्याच वेळात तो कॉलेज ला पोहोचला. दिवसभराचे लेक्चर्स, प्रॅक्टिक्ल्स आटपून तो नेहमीच्या जागी सानिकाची वाट बघत बसला. परंतु ती काही आली नाही. बहुतेक ती कॉलेजलाच आली नसावी असे त्याला वाटले. नंतर दोन दिवस असच झाल, त्याला खूप वाईट वाटल. अनुने सुद्धा खूप समजावण्याचा प्रयत्न केला कि “झालेल्या गोष्टी आता विसरून जा, इतक मनाला लावून नको घेऊस. आता फायनल्स आले आहेत जवळ, अभ्यास सुरु कर. तु आहेस हुशार फक्त गेले तीन वर्ष तुझी हुशारी तु वापरली नाहीस. हीच ती वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याची.”

तेंव्हा त्याच्या डोक्यात काही गेले नाही. फक्त तिला “बर” इतकच म्हणून तो घरी आला आणि विचार करत बसला. इतका कि त्याच डोक दुखू लागल. शेवटी त्याला अनुच म्हणण पटल. आता मात्र त्याने सगळ सोडून फक्त आई – बाबांच्या कष्टासाठी मेहनत घ्यायचे मनाशी ठरवले. एकदा का आकाशने मनाशी निश्चय केला कि मग मात्र त्यापासून कोणीही त्याला परावृत्त करू शकत नसे. त्याने सगळ्यापासून दूर जाण्याचा निश्चय केला, मित्र – मैत्रिणी - सानिका – सिनेमे – भटकंती – त्याचा आवडता कॅमेरा... आणि बरच काही. तीन महिने फक्त आणि फक्त अभ्यासच केला. आणि त्याच फळ त्याला मिळालंच, युनिव्हर्सिटीत गोल्ड मेडल मिळवून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला ! अनुला सुद्धा Distinction मिळाले होते. त्याला खूप आनंद झालेला. “अभिनंदन, खूप चं मार्क्स मिळालेत !” अनु हात पुढे करत म्हणाली. “धन्यवाद, खर तर सगळ्यासाठीच ! कारण तू जाणीव करून दिलीस, प्रेरणा दिलीस, मदत केलीस. खऱ्या मैत्रीचा अर्थ निभावलास !” आकाश तिच्याशी हात मिळवत म्हणाला. नंतर त्याला समजले कि सानिकाला फर्स्ट क्लास मिळाला होता, त्या दोघानांही आश्चर्य वाटले कि जी मुलगी पहिल्या तीन क्रमांकामध्ये असायची तिला इतके जेमतेम मार्क्स कसे ? नंतरची बातमी अजून धक्कादायक होती कि ती इंटर्नशिप तिच्या शहरात करणार होती. त्यामुळे आता त्यांची पुन्हा भेट होणार नव्हती.

खर तर आकाशला थोडे दुःख हे झालेच पण या सगळ्यात बाहेर पडायचे असल्याने त्याने हा विचार डोक्यातून काढून टाकला. पुढे MD साठी प्रवेश मिळवून पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण करून घेतले. एक छानसे क्लिनिक त्याने सुरु केले. चांगला हुशार असल्याने लोक सुद्धा भरभरून येऊ लागले. तसेच गरिबांसाठी दर शनिवारी मोफत उपचार असल्याने त्याचे विशेष नाव झाले. स्वतःचे करियर त्याने चांगल्या प्रकारे हाताळले. आपल्या मुलाने आपण केलेल्या कष्टांची जाणीव ठेऊन केलेला अभ्यास व आता त्याला मिळालेले यश पाहून त्यांच्या आई - बाबांचे सुद्धा स्वप्न साकार झाले. त्याच्या आई - बाबांच्या डोळ्यातील आनंद तो जेंव्हा जेंव्हा पाहायचा तेंव्हा त्याला जीवन सार्थकी लागले असे वाटायचे. त्यामुळे त्याने ठरवले कि आता सगळे विषय बस्स ! खूप झाली पारायणे, आठवणी.. आता जगायचे ते केवळ या दोघांसाठीच आणि रुग्ण-सेवेसाठी ! मनाशी एक निर्धार करत त्याने भूतकाळातील आपल्या अनुत्तरित प्रश्नांना मनाच्या एका खोल कोपऱ्यात कायमचे दफन केले; परंतु त्याला हे माहित नव्हते की या सर्व गोष्टींशी तो जोडला गेलेला असल्याने कधी ना कधी त्याला या गोष्टींना सामोरे जावे लागणार होतेच !
मग भले त्याचे सानिका ला विसरणे असो किंवा अनुशी सुद्धा अंतर ठेवलेले असो; त्याला हे माहित नव्हते कि नियती एके दिवशी याच अनुला त्याच्या समोर उभी करणार आहे; कारण शेवटी ती दोघांच्या मधला एक दुवा होती व त्या दोघांना एक करण्यासाठी तिलाच पुढाकार घ्यावा लागणार होता.

क्रमशः


सदर कथानक हे पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही. जर आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


- ©डॉ. प्रथमेश कोटगी

(सदर कथेचे पूर्ण हक्क हे लेखकास्वाधीन असून यातील अंशतः किंवा पूर्ण भागाचे पुनः प्रकाशन करायचे असल्यास वा चित्रीकरण करायचे असल्यास लेखकाची तशी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.)