भाग - २
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याला २ प्रश्न नक्की पडलेले असतात, “माझा जन्म कशासाठी झाला ?” आणि “माझा मृत्यू केंव्हा होईल ?” पहिल्या प्रश्नाचे उत्तर शोधण हे आपल्याला गरजेच वाटत नसत. दुसऱ्या प्रश्नाच उत्तर शोधण्यासंदर्भात आपण काहीच विचार करत नाही. परंतु जीवनातील त्या एका क्षणाला आकाश ला त्याची उत्तर शोधण गरजेच बनल; कारण जीवन आणि मृत्यू याच्या संघर्षामध्ये त्याचे काउंट डाऊन सुरु झाले होते. त्याच्याकडे आता दोनच पर्याय होते एक म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूशी लढा देणे आणि दुसरा हसत हसत मृत्यूला सामोरा जाणे अगदी निर्भयी कर्णाप्रमाणे. त्याला कुणाला तरी दिलेले वचन पाळायचे होते. त्याच्या हातात खूपच कमी वेळ राहिला होता. कुठल्याही क्षणी इहलोकावरून त्याचा परतीचा प्रवास सुरु करण्यास मृत्यू आसुसलेला होता. प्रत्येक गोष्टीत कुणी ना कुणी हिरो असतोच तर कुणी व्हिलन असतो. कुणी चांगला असतो तर कुणी वाईट. पण खरा हिरो तोच जो समोर असलेल्या कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यास सदैव तत्पर असतो.
शुध्द हरपल्यामुळे आकाशचे मन वर्तमानाशी संपर्क ठेऊ शकत नसल्याने आपोआप भूतकाळाचा माग घेत काळचक्र भेदून त्याला घेऊन मागे जात होते.अंदाजे एक वर्षापूर्वी त्याचे मन पोहोचले....
साधारण ४ ते ५ हजार माणसे एका अलिशान हॉल मध्ये बसली होती. काही महिला मंडळी आपापले घोळके करून गप्पा मारत होते, तिची साडी बघितलीत का किती महाग वाटतेय, तिने कसला नेकलेस घातलाय तुम्ही बघितलात ? अय्या कालच पार्लर ला जाऊन आलात वाटत ? तुम्हाला माहितीय का आधी जुळतच नव्हत पण आमचे हे मध्ये पडले म्हणून नाहीतर कुठल काय हो ? आणि बघा मला एक चांगली साडी पण नाही नेसवली त्यांनी, तुमच्या सुमीच मनावर घेतलाय कि नाही ओ वाहिनी ? एव्हाना नातवंड खेळली असती मांडीवर.... असा तिशी – चाळीशीतल्या बायकांचा संवाद कानावर पडत होता. तर कुठे, यार मी कित्ती मेहनत घेतलेली हि हेयरस्टाईल करायला पण आत्ता बघ ना कसे झालेत, बघतेय बघ कशी स्वतःला मोठी ब्युटी क्वीनच समजते वाटत; माझ्या पुढे फिकीच पडली ना शेवटी, अग उद्या मला माझ्या शोना न बोलावलंय डेट साठी तुझा तो परवा स्टेट्स टाकलेलास तो टॉप दे ना प्लीज तुला परवा फुल डे माझ्याकडून ट्रिट, अग तो मघापासून तुझ्याकडेच बघतोय म्हणजे मामला सेट दिसतोय.... अशी काहीशी तरुण मुलींची कुजबुज सुरु होती. तर कुठे काही तरुण मुले चल ना भाई, ये ना भाई सेल्फी सोडू झक्कास करत उगाच स्टाईल मारत फिरत होते, तर काही महाशय सेल्फी “सोडणारींच्या” मागे फिरत होते. काही मात्र कपाळावर घामाचे थेंब जमा करून तेलकट चेहऱ्यांनी संपूर्ण हॉल मध्ये काही हव नको ते बघत पडेल ती कामे करत होते तर वडिलधारे राजकारण ते समाजकारण, दिल्ली ते गल्ली, संस्कार ते संस्कृती आणि शेवटी सगळ्यांच्यातली उणी दुणी काढत बसले होते. काही जण बरोबर जेवणाच्या पंक्तीवर डोळा लावून बसलेले तर लहान मुले खेळण्यात रमलेली होती. असे ते एक टिपिकल लग्नाचं वातावरण हळू हळू आकार घेत होतं. मुहूर्ताची वेळ जवळ आली तस तशी या हॉल मधली लगबग सगळ्यांनाच जाणवू लागली होती. वाजंत्री लोक आपापले वाद्य तयार करत होते, तर हॉल मधील स्पीकर वरून प्रत्येक लग्नात असते तसे सनईचे संगीत मंद आवाजात वाजत होते. अखेर सर्वांना ज्याची प्रतीक्षा होती, ज्यासाठी एवढे लोक एकत्र आले होते तो मुहूर्ताचा क्षण आला ! “शुभमंगल सावधान !” असे ते पर्वणीचे भटजींच्या उच्च रवाच्या आवाजातील वाक्य सर्वांच्या कानी पडले तसे यंत्रवत सर्वांनी हातातील असणाऱ्या अक्षता वधू वरच्या दिशेने नेम लावून फेकल्या ! वधू “सानिका” स्त्रीसुलभ लज्जेने मान किंचित तुकवून वर “आकाश” कडून फुलांचा हार घालून घेत होती. नंतर सानिकाने आकाशला हार घातला. दोघांचाही आनंद ओसंडून वाहत होता. सर्व थोरामोठ्यांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिले, मित्र – आप्तेष्टांनी त्यांचे शुभचिंतन योजले. चि. सौ. का. सानिका आणि चि. आकाश यांचा विवाह सोहळा अखेर संपन्न झाला !
सर्व जण समाधानी झाले. कार्यात कसलीही कसर बाकी राहिली नव्हती. सर्वांना यथोचित मान-सन्मान लाभला होता. दोन्हीकडचे पाहुणे खूष होऊन आपापल्या गावी निघून गेले. त्या रात्री लग्नघरात आवरा आवरी सुरु होती. आकाश त्याचे आई – बाबा, सानिका आतल्या खोलीत आलेला सगळा आहेर ठरलेल्या वर्गवारी प्रमाणे लावत होते. “आकाश तुझी हि अहेराची कल्पना आमच्या प्रधान सरांना भलतीच आवडली हो ! अगदी भरभरून दिलाय त्यांनी !” आकाश चे बाबा म्हणाले. “तर आहेच माझा बाळ गुणी, अशी कल्पना माझ्या मते अजून कुणाला सुचली नसावी !” अयेयची आई त्याच कौतुक करत म्हणाली. आलेल्या अहेराकडे पाहत आकाश समाधानाने हसत होता तर त्याच्याकडे सानिका अभिमानाने बघत होती. आकाश ने त्याच्या पत्रिकेवर एक भन्नाट गोष्ट छापली होती, “कृपया अहेर आणू नये, आपला आशीर्वाद हाच आमचा अहेर !” अशी नेहमी असते ती ओळ होतीच शिवाय त्या खाली असे लिहिले होते कि, “तरी सुद्धा आपण अहेर आणणारच असाल तर शक्य तेवढा भरभरून आणावा; तो सार्थकी लागल्याचे दुप्पट समाधान आपण जाताना खात्रीपूर्वक न्याल !” ज्यांनी ज्यांनी म्हणून हे वाचल होत त्यांना तर मोठ अजबच वाटल होत. काही माणस जी फक्त रिकामा लिफाफा घेऊन कुणी हटकल तर स्टेज वर लिफाफा देऊन येतो म्हणून कल्टी मारतात अशा लोकांनी सुद्धा आयत्या वेळी आपले मत बदलून शक्य त्या कुवतीप्रमाणे अहेर केला. तर ज्यांनी कुतूहल म्हणून अहेर आणलेला त्यांनी तर अजून होईल तेवढा आयत्या वेळी वाढवला. आकाश ने आलेला अहेर हा चार भागात वर्गीकृत केला होता. पहिला भाग कपड्यांचा, दुसरा भाग भांड्यांचा – गृहपयोगी सामानांचा, तिसरा भाग पैशांचा - अलंकार तसेच दागिन्यांचा तर चौथा भाग हा खाद्यपदार्थांचा होता.
पहिल्या कपड्यांच्या भागात आणखी वर्गीकरण होते.. साड्यांचे वेगळे, साड्यांमध्ये सुद्धा भारीतल्या वेगळ्या, साध्या वेगळ्या, काठापदराच्या वेगळ्या असे भाग होते. दुसरे खण – पीस वेगळे काढले होते, पुरुषांचे कपडे शर्टपीस - पँटपीस वेगळे होते. यातील कपडे हे अनाथआश्रम, वृद्धाश्रम, महिलांचे वस्तीगृह येथे वाटण्यात येणार होते. राहिलेले काही गरीब लोकांना देण्यात येणार होते. दुसऱ्या भागामध्ये जी भांडी, इतर सामान होती ती ज्या कुटुंबाला आवश्यकता असेल त्यांना देण्याकरिता काही सेवाभावी संस्थांच्या स्वाधीन करण्यात येणार होती. तिसऱ्या भागात सुद्धा वर्गीकरण होते.. पैसे वेगळे, दागिने वेगळे.. त्यातील काही पैसे हे गरीब मुलांच्या शिक्षणाकरिता, काही पैसे सैनिकांना देणगीच्या स्वरुपात देण्याकरिता, काही गरीब होतकरू शेतकरी बांधवांकरिता, काही गोशाळेला तर आलेले दागिने देवाला अर्पण करण्यात येणार होते. चौथा खाद्यपदार्थांचा भाग सुद्धा वर्गीकरण केलेला.. खूप काळ टिकणारे पदार्थ हे विविध भागातील सैनिकांकरिता पाठवण्यात येणार होते. तर लगेच खराब होणारे पदार्थ हे अनाथ आश्रमातून मुलांना वाटणात येणार होते.
असा तो अहेराचा अनोखा विनियोग पाहून आलेले सर्व लोक चकित झाले होते. खर तर अशा कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळेस कोणीही कितीही जवळचा असला तरी स्वतःच्या खिशाचा विचार करतो. पण या वेळेस मात्र हीच लोक इतरांचा विचार करत होते. त्या रात्री उशीरा सर्वजण दमून झोपले. दुसऱ्या दिवशी चहा पिताना सर्वांची गप्पांची मैफिल रंगली. कुणालाही कसलीही गडबड नव्हती त्यामुळे सगळे अगदी निवांत बसले होते. थोडेच पाहुणे उरले होते मात्र तरीसुद्धा गप्पांना ऊत येत होता. सर्वांच्या चर्चेचे एकच केंद्र होते ते म्हणजे हे लग्नकार्य !
क्रमशः
सदर कथानक हे पूर्णतः काल्पनिक असून वास्तवाशी त्याचा काहीही संबंध नाही. जर आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
- ©डॉ. प्रथमेश कोटगी
(सदर कथेचे पूर्ण हक्क हे लेखकास्वाधीन असून यातील अंशतः किंवा पूर्ण भागाचे पुनः प्रकाशन करायचे असल्यास वा चित्रीकरण करायचे असल्यास लेखकाची तशी पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.)