Santshrestha Mahila Part 7 in Marathi Spiritual Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | संतश्रेष्ठ महिला भाग ७

Featured Books
Categories
Share

संतश्रेष्ठ महिला भाग ७

संतश्रेष्ठ महिला भाग ७

या परंपरेतील तिसरे नाव आहे संत कान्होपात्रा

नको देवराया अंत आता पाहु। प्राण हा सर्वथा जावू पाहे।।
हरिणीचे पाडस व्याघे्र धरियेले। मजलागी जाहले तैसे देवा।।
तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी। धावे वो जननी विठाबाई।।
मोकलूनी आस झाले मी उदास। घेई कान्होपात्रेस हृदयास।।”

ही संत कान्होपात्रा यांची ही रचना फार प्रसिध्द आणि “सर्वश्रृत” आहे.
कान्होपात्रा या वारकरी संप्रदायातील इ.स. 15 व्या शतकातील एक प्रमुख संत कवयित्री होउन गेल्या.

संत कान्होपात्रा यांचा जन्म पंढरपुर पासून २२ किमी वर असलेल्या मंगळवेढा या गावी एका गणिकेच्या पोटी झाला.
शामा या नाचगाणं करणाऱ्या गणिकेकडे अनेक प्रतिष्ठीतांचे येणे जाणे होते.

अनेक धनदांडग्यांना मुस्लिम सरदारांना, अमिर उमरावांना खुश करण्याचे काम ही शामा नायकीण करीत असे. तीची ही किर्ती दुरवर पसरल्यामुळे लांबुन लांबुन श्रीमंत धनवान मंगळवेढयास या शामा गणिकेच्या घरी भेटी देत असत.

अश्या या शामा नर्तिकेच्या पोटी सुरेख अशी कन्या जन्माला आली.
जणु चिखलात कमळ उमलले.
ती अतिशय देखणी होती .
तीचे नाव कान्होपात्रा असे ठेवले.
चंद्राच्या कलेप्रमाणे कान्होपात्रा हळुहळु मोठी होत होती तसेच तिचे रूपही खुलत होते .
कान्होपात्रेला नृत्य गायन शिकवण्या साठी शामा ने एक गुरुजी नेमले होते .
विठ्ठलाच्या परम कृपेने व योगायोगाने ते गुरुजी विठ्ठलाचे परम भक्त होते .
वारकरी संप्रदायाचे असल्यामुळे त्यांनी कान्होपात्रेला गाण्यासोबत भजने पण शिकवली होती .
ते नेहेमी म्हणत तुझ्या गळ्यातून ही भजने अधिक गोड वाटतात
पण तुझा जन्म गणिकेच्या कुळात झाला आहे .
मनुष्य जन्म एकदाच मिळतो त्यामुळे तु भक्ती मार्गाचा स्वीकार करून याच जन्मी
आपला उद्धार करून घ्यायला हवास .
तु विठठलाला देव मानून भक्ती भावाने त्याचे भजन कीर्तन करायला हवेस .
तेव्हा कान्होपात्रेने गुरुजीना वचन दिले की
यानंतर जर मी कोणते गायन करेन तर ते विठ्ठल भजन असेल .
आता मी इतर कोणासाठी गाणार अथवा नाचणार नाही .
मी माझ्या विठ्ठलाशी एकनिष्ठ असेन .
हळूहळू कान्होपात्रा आणखी सुंदर दिसू लागली .
तिला गावातील अनेक सावकारांच्या मागण्या येऊ लागल्या .
अप्रतीम लावण्य आणि गोड गळा यामुळे कान्होपात्राने आपल्याप्रमाणे व्यवसाय करून श्रीमंत आणि धनवान मंडळींना खुष ठेवावे अशी तिची आई शामाची ईच्छा होती.

पुर्वपुण्याईमुळे कान्होपात्रेला या गायन वादना मध्ये रुची नव्हती .

तिचा पिंड “परमार्थाचा” होता .
लहानपणापासुनच विठ्ठलाच्या भक्तीची तिला ओढ होती.
गावातील वारकऱ्यासमवेत ती पंढरपुरी जात असे .
त्यामुळे आईचा व्यवसाय पुढे चालवावा असे विचार तिच्या मनाला कधी शिवले देखील नाहीत.
ती वारीत समील होऊन पंढरीला जात असे .
या वारीत कान्होपात्रेला संतसंग लाभला होता .

मंगळवेढ्यात ज्ञानेश्वरांच्या दर्शनाने आपलं 'मी' पण विसरून गेली .

'या ओढीचं रुपांतर विठ्ठलभक्तीत कधी झालं, आणि पंढरपूरी जाऊन विठोबाला पाहिल्यानंतर हेच आपल्या जगण्याचं कारण असल्याचं तिला कसं उमगलं हे गूढ तिलाही समजले नाही.

पण एकदा ते समजल्यावर मात्र ती कोणत्याही परिस्थितीत माघारी फिरली नाही.

या संत संगतीमुळे ती पुरती बदलली आणि तिच्या आयुष्यात सुध्दा आमुलाग्र बदल घडला.

सतत हरिनामात दंग राहाणे आणि किर्तन करणे या तिच्या अत्यंत आवडीच्या गोष्टी झाल्या.

“योगिया माजी मुगुट मणी। त्रिंबक पाहावा नयनी।।

माझी पुरवावी वासना। तू तो उध्दराच राणा।।

करूनिया गंगा स्नान। घ्यावे ब्रम्हगिरीचे दर्शन।।

कान्होपात्रा म्हणे पंढरीराव। विठ्ठल चरणी मागे ठाव।।”

अशी भजने ती तयार करून गाऊ लागली .
हे सर्व घडल्यावर तिच्या आईला तिच्या अशा वागण्याचा खुप राग येऊ लागला .
“अग हाच आपला व्यवसाय हाच आहे तो तुला पुढे चालू ठेवावा लागेल “
असे ती कान्होपात्रेला बजावू लागली लागली .
पण कान्होपात्रा तिच्या कह्यात राहणारी नव्हती .
कान्होपात्रेने तिलाच उलट विचारले की,
“ तु शेजारच्या बायका प्रमाणे देवळात का जात नाहीस ?
आणि भजन कीर्तन का करीत नाहीस ?
शिवाय कान्होपात्रेने तिला स्पष्ट सांगितले की मी आता विठ्ठल भक्तीत “लीन” झाले आहे .
मी हे असले काम कदापि करणार नाही .
आता मात्र शामा गणिकेचा राग अनावर होऊ लागला .
कान्होपात्रेने धनिकांना होकार देऊन व्यवसाय चालू ठेवावा यासाठी आता शामा तिला मारहाण करू लागली.
पण कान्होपात्रेने तिला निक्षून नकार दिला .

गावातील प्रत्येकाला कान्होपात्रेने नकार दिल्यामुळे गावातील लोक चिडून तिचा छळ करू लागले .
पण कान्होपात्रा विठ्ठल भक्तीत दंग होती ..
कान्होपात्रा विठ्ठलाला विनवत होती देवा माझा भक्तीभाव कमी होऊ देऊ नकोस .
तुझ्या भक्ती शिवाय मला कशातच रस नाहीये .
तो काळ चारशे वर्षापूर्वीचा होता .
महाराष्ट्रावर आदिलशहाचे राज्य होते . .बिदरचा राजा होता तो!!
विजापूर तख्त ही.सुलतानी रियासत होती
आदिलशहा अत्यंत क्रूर ,विषयासक्त व मग्रूर राजा होता .
त्याचे सैन्य ही असेच होते .
त्यातील काही मंगळवेढा गावात ठाणेदार होते .
गावातील लोकांनी ठाणेदाराच्या मनात कान्होपात्रे विषयी वीष ओकले .
ठाणेदाराने कान्होपात्रेला ओढत आणले ..
पण कान्होपात्रेने ना नृत्य सादर केले ना गायन ..!!
ठाणेदार खुप संतापला .
ही आपले ऐकणार नाही हे त्याला समजले .
त्याच्या अपमानामुळे त्याने रागाने ठरवले की हीला गावातून बाहेर काढायचे .
त्यासाठी त्याने बिदरच्या आदिलाशहाला भले मोठ्ठे पत्र लीहीले .
त्यात कान्होपात्रेच्या सौंदर्याचे वर्णन करून अशी रूपसुंदर कळी फक्त आपल्याच दरबारात शोभून दिसेल .
ठाणेदाराला वाटले बादशहाच्या बोलावण्याला कान्होपात्रा नकार देऊ शकणार नाही .


इकडे कान्होपात्रा काहीच ऐकत नाही म्हणाल्यावर तिच्या आईने रागारागाने तिला एका खोलीत कोंडून ठेवले आणि बजावले की इथुन बाहेर पडायचे नाही
बाहेरून तिने कुलूप लावुन घेतले .
कान्होपात्रेने विठ्ठलाचे नामस्मरण चालूच ठेवले व देवाला म्हणाली ,
“बरे झाले आता तुझे नामस्मरण मी अखंड घेऊ शकते .
मला कोणाचाही व्यत्यय येणार नाही .”
काही दिवस असेच गेले आणि आषाढी एकादशी आली .
कान्होपात्रेला बाहेर वारकरी वारीतून पंढरपूरला चालले आहेत हे जाणवले .
पालख्या ,पताका घेऊन निघालेली संत मंडळी हरिनामाचा घोष करीत होती
त्यांच्या भजनाचा टाळ मृदुंगाचा आवाज येऊ लागला .
ती मनात म्हणाली पांडुरंगदर्शनाचा “योग” आलेला दिसतो .
तिला राहवले नाही आणि तिने त्या वारीत सामील होण्यासाठी खिडकीतुन बाहेर उडी मारली .
देवाच्या कृपेने तिला खरचटले सुद्धा नाही .
तिने धावत वारकर्यांना गाठले ..आणि त्यांच्या पाया पडून म्हणाली
मला विठ्ठलाकडे यायचे आहे मला तुमच्यात सामील करून घ्या .
वारकरी म्हणाले तु श्रीमंताची मुलगी ,सुखात वाढलेली .
पंचपक्वान्ने खाणारी ,आम्ही चटणी भाकर खाणारी साधी माणसे .
तु कशाला आमच्या नदी लागतेस ?तुला हे झेपणार नाही .
कान्होपात्रा म्हणाली अतिशय भाग्याने मला तुमचे दर्शन झाले आहे .
मी तुमच्याबरोबर वारीत येणारच .
माझ्या रुपाकडे कपड्याकडे पाहु नका असे म्हणुन तिने आपले भरजरी वस्त्र फेकून दिले .
माझ्या मनात पांडुरंगा विषयी भक्तीभाव आहे .
माझे मन पवित्र व शुद्ध आहे मला पंढरीला घेऊन चला .
वारकरी म्हणाले तुझी इच्छाच असेल तर तुला अडवणारे आम्ही कोण ..
चल आमच्यासोबत ..
साक्षात देवाचीच इच्छा असेल तर तोच तुला नेणार .
कान्होपात्रा त्यांच्या पाया पडली वीणा खांद्यावर घेतली आणि पायी चालत नामगजर करीत
पंढरीला निघाली .
विठ्ठल विठ्ठल करीत ते पंढरपुरास पोचले .

क्रमशः