संतश्रेष्ठ महिला भाग १
माणूस देवाला प्रत्यक्ष भेटू शकत नाही .
देवाची महती जाणुन घेणे अथवा त्याचा कृपा प्रसाद घेणे यासाठी कोणी मध्यस्थ आवश्यक असतो .
हे काम संत करीत असतात .
समाजाला भक्ती मार्गाला लावणे जेणे करून समाजमन बळकट होईल .
आयुष्यातील संकटांचा सामना करू शकेल
यासाठी संत पुढाकार घेत असतात .
संत हे समाजातच असतात पण आपल्या कामगिरीमुळे ते सामान्यातून संतपदी विराजमान झालेले असतात .
भारत भूमी संतांची भुमी म्हणुन ओळखली जाते.
येथे देशोदेशी संत परंपरा आहे .
ज्ञानेश्वर ते तुकाराम यासह अनेक संत या मातीत जन्मले .
परंतु या पुरुष संतांच्या तुलनेत महिलांची संख्या खूपच कमी होती.
याचे कारण त्या वेळची संस्कृती पुरुषप्रधान होती .
या संतामध्ये ज्याप्रमाणे पुरूषांनी मोठया प्रमाणात समाज घडविण्याचे कार्य हाती घेतले
त्याचप्रमाणे जरी कमी संख्या असली तरीही यात मोलाची भर घालण्यात महिला संत देखील मागे नव्हत्या. अनेक महिला संतांनी देखील समाजाची विस्कळीत घडी नीट बसविण्यात आपले मोलाचे योगदान दिले.
कोणताही अधिकार नसल्यामुळे आत्मसन्मान हरवलेल्या, बहुजन समाजाला, शूद्रांना, स्त्रियांना, संतांनी केवळ नामजपाच्या आधारे परमेश्वराजवळ जाण्याचा मार्ग दाखवला.
वर्णश्रेष्ठत्वाच्या रांगेतील दोन्ही टोकांना एकत्र आणण्याचे काम भक्तीपुरते या संतांनी केले.
ते काम किती मोठे होते याची जाणीव वेळोवेळी अनेक अभ्यासकांनी सुद्धा करून दिली आहे.
महाराष्ट्रातील पुरोगामीपणाचे बरेचसे श्रेय राज्यात फोफावलेल्या आणि लोकांनी आपल्याशा केलेल्या या संतचळवळीला दिले जाते.
कोणताही समाज पुरोगामी म्हणून ओळखला जाण्यासाठी एक महत्त्वाचा निकष म्हणजे त्या समाजातील स्त्रियांची स्थिती.
महाराष्ट्रात आजही स्त्रियांची परिस्थिती तुलनेने चांगली आहे
आणि त्याला कारणीभूत आहे आठशे वर्षापूर्वी सुरू झालेली संतपरंपरा .
ज्ञानापासूनच नव्हे तर भक्तिभावापासूनही सामान्यांना दूर ठेवण्याच्या त्या काळात
विविध संतांनी भक्तिचळवळीच्या मार्गाने बंड केले आणि त्यातच कुठेतरी स्त्रियांनाही समानता देण्याचे बीज पेरले गेले.
महाराष्ट्राइतकाच समृद्ध वारसा तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान,
बंगाल, उत्तर प्रदेश व गुजरात या राज्यांनाही लाभला आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्राप्रमाणेच तिथेही
देवधर्माच्या कर्मकांडांतून देवाची आणि भक्तांची सुटका करण्याचे प्रयत्न झालेले दिसतात.
बारावे शतक ते सतरावे शतक असा साधारण पाच-सहाशे वर्षाचा कालखंड विविध संतांच्या कामगिरीने समृद्ध झाल्याचे आढळतो .त्यावेळच्या परंपरेप्रमाणे स्त्रियांना फारसे स्वातंत्र्य नव्हतेच.
समाजातील स्त्रीचे स्थान ‘शूद्रांहूनही शूद्र’ असे होते.
अशा काळातही महाराष्ट्रात महदंबा, मुक्ताबाई, जनाबाई, सखुबाई,
कान्होपात्रा, नागी, बहिणाबाई, सोयराबाई, निर्मळा, विठाबाई, वेणाबाई, गोदामाई, लक्ष्मीबाई
अक्कासाहेब महाराज अशा अनेक स्त्रिया संतपदी पोहोचलेल्या आढळतात.
यांच्या समकालीन, आधीच्या आणि क्वचित नंतरच्या काळात इतर राज्यांमध्येही भक्तीचा उच्च दर्जा प्राप्त केलेल्या स्त्री-संत होऊन गेल्या.
मातृसत्ताक पद्धत असलेल्या दक्षिणेमध्ये त्यांचे प्रमाण तुलनेने अधिक आढळते.
त्याचा संदर्भ लक्षात न घेता पाहिले तर ही आकडेवारी कमी वाटू शकते, पण तत्कालीन समाजव्यवस्था, कुटुंबपद्धती या सर्वाचा विचार करता हेही प्रमाण लक्षणीय म्हटले पाहिजे.
महाराष्ट्रातील मुक्ताबाई , जनाबाई , कोन्हापात्रा असे काही अपवाद वगळता
बहुतेक सगळ्या संतस्त्रिया विवाहित होत्या.
भक्तीमार्गात , अध्यात्मामध्ये देह नश्वर मानून आत्म्याला विशेष महत्त्व दिले जात असले तरी स्त्रियांच्या बाबतीत अवघ्या समाजाने या गोष्टीला अपवाद केला होता.
त्या काळात स्त्री म्हणजे केवळ तिचा देह असे मानले जाई
आणि त्या देहावर फक्त तिच्या पतीचीच सत्ता असे .
त्यामुळे पतीच्या परवानगीशिवाय भक्ती करणे शक्य नाही अशीच रीत समाजमान्य होती .
कधी त्यावर मात करून, कधी त्याला शरण जाऊन तर कधी मध्यममार्ग शोधत या स्त्रियांनी परमेश्वराला साद घातल्याचे दिसते.
‘चमत्काराशिवाय नमस्कार नाही’ या उक्तीवर समाजमनाचा गाढ विश्वास असल्यामुळे असेल कदाचित
पण सर्व संतांच्या चरित्रांमध्ये चमत्कारांची रेलचेल आढळून येते.
याला स्त्री-संतही त्याला अपवाद ठरलेल्या नाहीत.
कृष्णप्रेमापोटी विषप्राशन केलेल्या मीरेला खुद्द कृष्णानेच वाचवले, ही दंतकथा सगळ्यांनाच माहीत आहे.
अशाच दंतकथा याही स्त्री-संतांच्या बाबतीत आढळून येतात.
या कथा प्रत्येक प्रांतातील स्त्री संतांसंबंधी असलेल्या वाचनात येतात .
पंढरीचा विठ्ठल जनीला दळण दळण्यात, धुणी धुण्यात, शेणसारवणी करण्यात मदत करत असे किंवा कान्होपात्राला लंपटांपासून वाचवण्यासाठी परमेश्वराने तिला स्वत:मध्ये विलीन करून घेतली.
आणखीही काही इतर संत स्त्रियांच्याही दंतकथा आहेत.
जसे की ब्रह्मवादिनीसारखे आयुष्य व्यतित करण्याचा ध्यास घेतलेल्या
व रूपसुंदर असलेल्या अघैयारच्या माता-पित्यांनी तिची मर्जी न ऐकता राजाशी तिचा विवाह ठरवला.
त्यामुळे अघैयारची प्रार्थना ऐकून विघ्नेश्वराने तिचे देहसौंदर्य आणि तारुण्य नष्ट केले व तिला विरूप वृद्धेची अवकळा आली.
अशाच पद्धतीने कारइक्कल अम्मयारने शिवाच्या उपासनेत अडथळा येऊ नये म्हणून
त्याला आपले सौंदर्य काढून घेण्याची आणि पिशाच्चरूप देण्याची मागणी केली.
तिची ही मागणी पूर्णही झाली होती .
या संत महिलांनी भक्तिमार्गात अडथळा आणणा-या आपल्या सौंदर्याचा व तारुण्याचा त्याग केल्याच्या कथा आहेत.
रंगनायकी आंदाळ हीदेखील मीरेप्रमाणे कृष्णाच्या प्रेमात पडली होती. तिला कृष्णाशी विवाह करायचा होता, इतकेच नव्हे तर कृष्णाबरोबर मीलनाचीही आस होती.
तिने विवाह केला नाही, श्रीरंगाने तिला आपल्यामध्ये एकरूप करून घेतले, अशी दंतकथा आहे.
कर्नाटकातील अक्कमहादेवीची गोष्ट तर अधिक तीव्र वाटावी अशी आहे.
राजा असलेल्या तिच्या पतीने शिवोपासनेत अडथळा आणला म्हणून तिने अंगावरील वस्त्रांचाही त्याग करून राजप्रासाद सोडला आणि केवळ केशकलापाने लज्जारक्षण केले.
अशा प्रकारे केवळ स्त्रीदेहाच्याच नव्हे तर मनुष्यदेहाच्याही पलीकडे जाऊन तिने शाश्वत चैतन्याचा अनुभव घेतला.
विषयासक्त पतीचा अत्याचार तर अनेक स्त्रियांनी सहन केलेला दिसतो.
बहिणाबाई, विठाबाई, अक्कमहादेवी, कारइक्कल अम्मइयार या नावाने प्रसिद्ध पावलेली पुनीदवती या सर्व विवाहितांना पतीचा जाच सहन करावा लागला.
बहिणाबाई आणि अक्कमहादेवीला तर खूपच जाच होता .
पुनीदवतीचा पतीही तिच्या भक्तितेजाने दिपून जाऊन पळून गेला.
पण त्यांच्या दृष्टीने परमेश्वराची भक्ती, त्याच्या चिंतनातून मिळणारे धैर्य आणि त्याच्यामध्ये एकरूप होण्याची ओढ थोडय़ाफार फरकाने सर्वामध्ये सारखीच आढळून येते.
त्याला जोड मिळाली ती त्यांच्या उत्तम बुद्धीची.
यातील जवळपास सगळ्यांनीच उत्तम कवने सुद्धा रचली.
या संत कवयीत्री म्हणून ओळखल्या गेल्या .
अघैयार असो की लल्लेश्वरी, गौरीबाई किंवा चंद्रावती किंवा मीरा, यापैकी सर्व संतांनी साहित्यरचना केलेली आढळते.
त्यांनी रचलेली कवने अथवा भजने ही आजही त्या-त्या समाजात लोकसाहित्याचा भाग आहेत .
महाराष्ट्रातील एखादी आजी बोलताबोलता तुकोबाच्या अभंगांचे दाखले देते.
तसेच कर्नाटक, बंगाल, काश्मीर, तामिळनाडू आणि केरळमधील
सर्वसामान्य या स्त्री-संतांच्या ‘वचनां’ची उदाहरण देत असतात.
त्यांच्या शिकवणीला रोजच्या संभाषणांमध्ये स्थान मिळाले आहे.
‘खुपेल असे बोलू नका’,
‘आत्मशेखी मिरवू नका’,
अशा रोजच्या जगण्यात उपयुक्त ठरणाऱ्या वचनांपासून
मुक्ताबाईच्या ‘अखंड जयाला शेजार, का रे अहंकार नाही गेला?’
अशा तत्त्वज्ञानात्मक ओव्यांची असंख्य उदाहरणे बघायला मिळतात.
स्त्रिया, शूद्र यांचा विटाळ मानणा-या अहंकारी ब्राह्मणांना खडसावणारी सोयराबाई,
‘देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा ते निर्मळ शुद्ध बुद्ध,
देहीचा विटाळ देहीच जन्मला, सोवळा तो झाला कवण धर्म,
विटाळावाचोनी उत्पत्तीचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी’
अशा शब्दांमध्ये भावना व्यक्त करते.
या सर्व स्त्री-संतांमध्ये भक्ती आणि बुद्धीचा अपूर्व संगम आढळून येतो.
परमेश्वराच्या जवळ जायचे त्याचबरोबर भोवतालच्या समाजालाही ‘शहाणे करून सोडण्याचे’ व्रत त्यांनी अंगीकारलेले दिसते.
बंगालमधल्या चंद्रावतीने तर त्या काळातही
रामायणात सीतेची बाजू अधिक मांडून तिच्यावर झालेल्या अन्यायाचे आपल्या मार्गाने परिमार्जन करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
या व्यतिरिक्त, आपल्या महानतेसह, जगाच्या शहाणपणाच्या डोळ्यांसह, संत असलेल्या महाराष्ट्राच्या मातीत
जीचा जन्म झाला. महदंबासारखी एक संत्री स्त्री आपल्या डोळ्यांतील शहाणपणासाठी प्रसिद्ध होती (म्हणूनच त्यांना चक्रधर स्वामींनी 'चौरचक म्हातारी' ही पदवी दिली होती).
मुक्ताबाई योगिनी-एकविज्ञानी म्हणून प्रसिद्ध होत्या.
या सर्व संत महिला अनेक जातीच्या आणि पंथाच्या होत्या .
यातील काही वैशिष्ट्यपूर्ण संतांचा आपण परिचय घेणार आहोत .
क्रमशः