आज प्रणिताच्या घरात सर्वांची खूपच लगबग चालू होती. प्रत्येकजण आपापल्या घाईत होते आणि प्रणिता मात्र अगदी शांत बसून स्वतःला आरश्यात न्याहाळत होती. ती दिसायला सुंदर जरी नसली तरी नाकी डोळी छान, मध्यम बांधा आणि उंची सर्वसाधारण होतं. प्रणिताने लग्न करण्यास होकार दिला म्हणून घरच्यांची स्थळ पाहण्याची एकच घाई चालली होती. आज बाजूच्याच गावचे रामराव प्रणिताला पाहायला येणार होते. त्यामुळे घरातल्या सर्व मंडळींची जुळवाजुळव करण्याची घाई चालू होती. शेजारच्या गावचा रामराव म्हणजे एक चांगली शेत जमीन असलेला जमीनदार माणूस आणि त्याचा एकुलता एक मुलगा प्रसाद जो की पदवी पर्यंत शिक्षण घेतलं पण पुढील शिक्षण थांबवून आपल्या शेतीकडे लक्ष द्यायला लागला. नोकरीची कसलीही आशा न बाळगता आपल्या शेतीकडे लक्ष देऊन चांगले उत्पन्न काढत होता. स्वतः कष्टाळू आणि मेहनती असल्यामुळे शेतातील उत्पन्न दरवर्षी बऱ्यापैकी निघत होतं. बघता बघता प्रसाद चांगला पंचवीस वर्षाचा झाला होता. रामराव ला तीन मुली, पण मुलगा हवा या हट्टापायी कुलदेवताजवळ नवस बोलले अन चौथ्या वेळेस त्यांना मुलगा झाला आणि त्याचं नाव ठेवलं प्रसाद. लाडात वाढलेला प्रसाद चंद्रकलेप्रमाणे मोठा होत गेला. आज त्याला मुलगी पाहण्यासाठी जाताना सर्वाना आनंद वाटत होतं. मोठ्या गाडीत आई-वडील, तीन बहिणी, त्यांचे नवरे आणि लेकरंबाळ असे सर्वजण मिळून गाडी एकदम पॅक झाली. गाडी धुरळा उडवित प्रणिताच्या घराच्या दिशेने निघाली. तासाभराच्या प्रवासानंतर गाडी प्राणिताच्या अंगणासमोर येऊन थांबली. सर्वजण गाडीतून उतरले. सर्वांचे घरात आवभगत स्वागत करण्यात आले. प्रसादचे डोळे मुलीला शोधत होते. काही वेळानंतर कांदा पोहे आले. सर्वांनी कांदे पोहेचा आस्वाद घेतले. प्रणिता आपल्या हातात चहाचा ट्रे घेऊन हळूहळू पावलाने बैठकीत आली. तिने आज तिच्या आवडत्या बदामी रंगाची साडी नेसली होती. त्यात ती पूर्वीपेक्षा ही सुंदर दिसत होती. सर्वांना चहा दिली आणि एका खुर्चीवर येऊन बसली. चहा पीत पीत रामराव प्रणिताला प्रश्न विचारले. ती देखील सर्व प्रश्नांची योग्य उत्तरे दिली. रामरावांच्या पत्नींने प्राणिताला कुंकू लावून हातात पाचशे रुपयांची नोट दिली आणि घरात जाण्याची परवानगी दिली. थोड्याच वेळांत सर्व पाहुणे आपल्या घरी जाण्यास निघाले. प्रणिताला पाहण्यास आलेले हे पहिलेच स्थळ होतं. प्राणिताच्या घरच्या सर्वाना हे स्थळ पसंद आले होते फक्त रामराव यांचा काय निरोप येतो ? याकडे लक्ष लागून होतं. प्रणिता देखील प्रसादला पाहून खुश होती. सायंकाळी निरोप मिळाला की, मुलगी पसंद आहे. प्राणिताच्या घरी सर्वाना खूप आनंद झाला. काही दिवसांनी साखरपुडाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसादने प्रणिताला रेडमी चा एक नवा स्मार्ट फोन भेट म्हणून दिला. रीतसर सर्व क्रिया पडत चालले होते. प्रसाद आणि प्रणिता यांचे तासनतास फोनवर बोलणे चालूच असायाचे. पाहता पाहता लग्नाची तिथी जवळ आली. प्राणिताच्या दोन्ही हाताला मेहंदी लागली होती. अंग हळदीने पिवळे करण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे प्रणिताच्या घरी लग्नाचा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. सगेसोयरे, नातलग, मित्रमंडळी यांनी या लग्नाचा पुरेपूर आनंद लुटला. सर्वांनी प्रसाद आणि प्रणिता यांचा जोडा छान शोभून दिसत असल्याचे बोलत होते. प्रणिता लग्न होऊन सासरी आली. तिच्या घरापेक्षा सासरचे घर जरासे मोठे होते. घरासमोर बगीचा होता. घरात एक मोठी चार चाकी गाडी, ट्रॅक्टर, दोन दुचाकी आणि एक स्कुटी असे वाहन होते. सर्व काही आलबेल होतं. तिच्या पदरी नशिबाने खूप सुख लिहून ठेवलं होतं. लग्न झाल्यानंतर प्रत्येक जोडपं कुलदैवताच्या दर्शनाला जातात तसं प्रसाद आणि प्रणिता आपल्या सर्व परिवारासह दर्शन करून घेतले. देवदर्शन झाल्यानंतर आज तिच्या जीवनातील एक अनमोल क्षण म्हणजे मधुचंद्राची तयारी चालू होती. प्राणिताच्या मनात थोडासा रोमांस तर थोडी भीती ही जाणवत होती. जशी जशी सायंकाळ जवळ येऊ लागली तशी तिच्या भावना बदलत जात होत्या. पाचच्या सुमारास प्रसाद प्रणिताला काही तरी गिफ्ट द्यावं म्हणून शहराकडे आपली दुचाकी घेऊन निघाला. गावापासून दहा किमी अंतरावर एक मोठे शहर होते ज्याठिकाणी हवी ती वस्तू मिळत असे. एका तासात येतो असे सांगून प्रसाद बाहेर पडला. सायंकाळचे सात वाजले तरी ही प्रसाद घरी आला नव्हता. एका तासात परत येणारा प्रसाद अजून का आला नाही म्हणून रामरावांनी आपला मोबाईल काढलं आणि प्रसादला फोन लावला. लगेच तिकडून फोन उचलल्या गेलं आणि हॅलो, पाच दहा मिनिटांत येत आहे, गाडीवर आहे, गाडी चालवत प्रसादने आपल्या वडिलांना बोलला. तेवढ्यात समोरून येणाऱ्या एका गाडीने प्रसाद च्या गाडीला जोराची धडक दिली. रामराव इकडे फोनवर हॅलो, हॅलो म्हणू लागला पण तिकडून काहीच उत्तर येत नव्हते. काही तरी घात झालंय असा संशय आला आणि रामराव लगेच ड्रायव्हरला घेऊन शहराच्या दिशेला निघाले. चार-पाच किमी जातात न जातात रस्त्यावर गाडी पडलेली दिसत होती. ड्रायव्हरने लगेच गाडी थांबवली, रामराव खाली उतरले. पाहतात तर काय ती प्रसादचीच गाडी होती. थोड्या दूर अंतरावर प्रसाद रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. ड्रायव्हर आणि रामराव लगेच त्याला उचलून गाडीत टाकले आणि शहराच्या दवाखान्यात ऍडमिट केले. प्रणिता इकडे फोनची।वाट पाहत होती. रामरावने प्रसादचा अपघात झाल्याची बातमी त्यांच्या बायकोला दिली मात्र प्रणिताला यातलं काही सांगू नको असं सांगितलं. प्रणिता घरात इकडून तिकडे येरझाऱ्या घालू लागली. प्रसादला लगेच अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तो मृत्यूशी झुंज देत होता. अपघातात प्रसादच्या डोक्याला जोराचा मार बसल्यामुळे तो शुद्धीवर नव्हता. डॉक्टरांनी चोवीस तास काही सांगता येत नाही असे सांगितले होते. प्रणिता इकडे वाट पाहून पाहून बैठकीतच झोपली होती. मधुचंद्र होता म्हणून तिचा बेडरूम फुलांनी सजविण्यात आला होता. सकाळ झाली. चिमण्यांच्या आवाजामुळे प्रणिता जागी झाली. प्रसाद आणि रामराव अजून ही घरी आले नव्हते, तिला त्यांची काळजी वाटू लागली. काय झाले असेल ? असे विचार करत असतानाच अंब्युलन्स आपले सायरन वाजवत घरासमोर येऊन थांबली. प्रसादची डेडबॉडी बाहेर काढण्यात येत होतं. प्रणिताला काही सुचत नव्हते. मागोमाग रामराव आपल्या गाडीत आले. हे सर्व पाहिल्यावर प्रणिताने " प्रसाद " म्हणून एकच हंबरडा फोडला. प्रवादच्या डेडबॉडीला धरून प्रणिता जोरजोरात रडू लागली. लग्नाची हळद अजून निघाली नव्हती, हातावरील मेहंदी नुकतेच रंगात येऊ लागली होती. तोच तिचा मधुचंद्राच्या दिवशीच संसार स्वप्नभंग पावला होता. रामरावने फोन केला नसता किंवा प्रसादने गाडी चालविताना फोन उचलला नसता तर कदाचित हा अपघात घडला नसता आणि प्रणिताचा संसार वाचला असता.
- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक तथा प्राथमिक शिक्षक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769