Prarambh - 15 in Marathi Fiction Stories by Vrishali Gotkhindikar books and stories PDF | प्रारब्ध भाग १५

Featured Books
Categories
Share

प्रारब्ध भाग १५

प्रारब्ध भाग १५

“अहो थांबा, थांबा एकटे कुठे चालला ..मी आहे न सोबत तुमच्या ..
असे सुमनचे बोलणे ऐकताच तो गडबडीने थांबला .
“कशी वाटली माझी मैत्रीण ..आहे न छान ..?
असे विचारताच परेश फक्त हो म्हणाला .
त्याच्या मनात बरेच काही विचार येत होते पण तो काहीच बोलला नाही .
मग त्या रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त मायाचाच विषय होता .
ती आनंदात असल्याने परेशची रात्र मात्र छान गेली .
सोमवार पासुन परत परेशचे रूटीन सुरु झाले .
आता एक दोन आठवडे तो खुप गडबडीत होता ,कारण मुंबईतल्या सगळ्या युनिटसना
इन्स्पेक्शन साठी त्याला भेट द्यायची होती .
आता त्याचे संध्याकाळचे जेवण पण बाहेरच असणार होते .
घरी परतायला उशीर पण होणार होता .
तशी कल्पना त्याने सुमनला देवून ठेवली होती .
जर उशीर झाला तर वाट न पाहता झोपून जा मी माझ्या किल्लीने दरवाजा
उघडुन येईन असेही सांगितले होते .
त्यामुळे आता सुमन एकदमच निवांत होती .
वाटस अपवर तिने ही गोष्ट मायाला सांगितली तेव्हा मायाने तिला घरीच जेवायला बोलावले .
अद्याप कधी मायाच्या घरी ती गेली नव्हती .
त्यांच्या गप्पा कधी बाहेर हिरवळीवर किंवा हॉटेल मधुनच झाल्या होत्या .
सुमन एकदम “एक्साईट” झाली मायाचे घर पाहायला ..
ताबडतोब तयार होऊन ती मायाकडे जायला निघाली .
आता हौसिंग सोसायटीचा गार्डपण तिला ओळखत असल्याने ती डायरेक्ट आत गेली .
सोसायटी मध्ये तिला आता मायाची मैत्रीण म्हणून ओळखत होते .
सातव्या मजल्यावर मायाचा ब्लॉक होता .
सुंदर प्रशस्त परिसर ,चकचकीत पार्किंग ,त्यात लावलेल्या अनेक रंगाच्या आणि “मेकच्या” अनेक गाड्या .आजूबाजूला फिरणारी अद्ययावत कपड्यातील स्त्रीया ,पुरुष ,मुले .
सुमन लिफ्ट मध्ये शिरली ..लिफ्ट पण प्रशस्त होती .
आतमध्ये थंड पाणी, फोन, म्युझिक याची सोय होती
चारी बाजूला आरसे होते आणि सगळीकडे सुगंध पसरला होता ..
सुमन “थक्क” झाली अशी लिफ्ट पाहून .
बघता बघता सातवा मजला आला आणि लिफ्ट थांबल्याचा मेसेज पण आला .
बाहेर प्रशस्त क्यारीडॉर असणारे बरेच ब्लॉक आजूबाजूला होते .
ब्लॉक्समधुन मुलांचे, टीव्हीचे, संगीताचे,स्वयंपाक घरातील मिक्सरचे,भांड्यांचे
आवाज येत होते .
मायाच्या ब्लॉकची बेल एकदम सुमधुर संगीताची होती .
मायाच्या मोलकरणीने दरवाजा उघडला .
सुमनला आत घेऊन ती म्हणाली ,”बसा मेमसाब आंघोळ करतात .
तुम्हाला चहा कॉफी किंवा थंड काय आणु..?”
सुमन नको म्हणाली
तरीही आतून ती एक नक्षीदार ग्लास ट्रेमध्ये घेऊन आली .
त्यात थंडगार संत्रा ज्यूस होता .
थोड्या वेळात नाजूक हलका फुलाफुलांचा फ्रॉक घातलेली माया बाहेर आली .
“हाय ....आलीस का खुप बरे वाटले मला असे म्हणाली .
मग सुमनला तिने तिचे पुर्ण घर फिरुन दाखवले ..
घरात तब्बल तीन टोयलेट ब्लॉक होते .
एक एक बाथरूम सुमनच्या संपूर्ण घराएवढी होती
पाच प्रशस्त खोल्या ,तीन प्रशस्त बाल्कनी असलेला तो ब्लॉक अतिशय महागड्या
सामानाने सजलेला होता .
उच्च अभिरुचीचे फर्निचर सगळ्या खोल्यात होते .
एक पुर्ण खोली फक्त होम थीएटर होती .
सुमनचे डोळेच दिपले तिचे घर पाहुन..
“अग तु तर एकटीच असतेस मग इतके मोठे घर कशाला तुला ?
असे विचारताच माया हसु लागली व म्हणाली
“मला लहान घराची अजिबात सवय नाहीये ..
आणि माझे फ्रेंड्स अधून मधुन येत असतात राहायला माझ्याकडे .”
थोड्या गप्पा झाल्यावर दोघी एक सिनेमा पहात बसल्या .
जेवायची वेळ झाल्यावर दोघी जेवायला बसल्या ,मोलकरीण स्वयंपाक करून गेली होती .
जेवायला बरेच पदार्थ आणि बरीच मिठाई होती .
सुमन पोट भरून जेवली ..
“तुला मिठाई आवडते न म्हणुन ही वेगवेगळ्या प्रकारची मागवली होती बघ ..”
असे मायाने म्हणल्यावर सुमन हसली आणि तिने मायाचा हात प्रेमाने दाबला .
थोडा वेळ अशाच दोघी गप्पा टप्पा करीत बेडरूम मध्ये पडल्या .
बेडरूम मधल्या मऊ मऊ गाद्या ,उशा ,महागडी बेडशीट पाहुन सुमन हरखून गेली .
आता संध्याकाळ होत आली ,सुमन घरी निघाली .
“आता उद्या काही मला वेळ नाही होणार म्हणुन तुला आज बोलावले .
उद्या मला बंगल्यावर जायचे आहे “माया म्हणाली .
“कोणाच्या बंगल्यावर जातेस तु ?
असे सुमनने विचारल्यावर ती म्हणाली ,
“इथुन काही अंतरावर मावशींचा बंगला आहे तिथे मला तिला भेटायला रोज जावे लागते .
“तु रोज सकाळी रिक्षाने तिकडेच जात असतेस का ?
काय करतेस रोज तिकडे ?
असे विचारल्यावर माया म्हणाली ,तिकडे खुप मैत्रिणी आहेत .आम्ही खुप धमाल करतो .
एकदा तुला पण घेऊन जाईन ..येशील ना ?
असे विचारल्यावर सुमन आनंदाने हो म्हणाली .
रात्री उशिरा परेश घरी आला तेव्हा सुमन मजेत टीव्ही पाहत होती .
तो जेवला आहे का नाही? ..इतका उशीर का झाला? याची काहीही चौकशी तिने केली नाही .
उलट आपण दिवसभर मायाकडे कशी धमाल केली ,मायाचे मोठे घर ,तिची श्रीमंती
याविषयीच फक्त ती बोलत होती .
ती फक्त स्वतःच्याच नादात दंग होती .
परेश फक्त हो हो करीत होता .
खुप दमला होता तो ..
रात्री ती आपण होऊन त्याच्या जवळ आली आणि त्याच्यासोबत रममाण झाली .
एक दोन दिवसांनी मायाचा मेसेज आला बाहेर जाऊया असा ..
मग दोघी मनसोक्त शॉपिंग ,हॉटेलिंग करीत फिरल्या .
तिच्याबरोबर गेल्यावर सुमनला कधीतरी स्वतः पैसे खर्च करावे वाटत होते .
पण तिच्याकडे फक्त पाचसहाशे रुपये होते त्यात हॉटेल बिलसुद्धा भागले नसते .
यावेळी पण सुमनसाठी मायाने एक महागडा ड्रेस घेतला सुमनच्या नकाराला न जुमानता .
सुमनला खुप संकोच वाटला ..
आज मात्र परेशकडे थोडे पैसे मागायचे असे तिने ठरवले .
रात्री परेशच्या गळ्यात हात घालून तिने विषय काढला
“अहो मला थोडे पैसे हवे आहेत खर्चाला ..
किती हवेत असे विचारल्यावर ..पाच हजार तरी द्या ...
“पाच हजार .?.एवढे कशाला हवेत असे म्हणताच .
सुमनने सांगितले माया तिच्यासाठी किती खर्च करते ..तिच्यासाठी गिफ्ट घेते वगैरे .
मग आपण पण नको का कधी खर्च करायला .
“सुमन तिच्याकडून सारखे गिफ्ट घेत जाऊ नकोस
आणि हॉटेलला पण सारखे नको जाऊ..कधीतरी ठीक आहे .
आणि तुला सारखे इतके पैसे द्यायला मला कसे जमेल ?
ते श्रीमंत लोक आहेत ,आपल्याला त्यांच्यासारखे वागायला नाही जमणार .”
हे ऐकल्यावर सुमन चिडुन म्हणाली ,”का नाही जमणार त्यांच्यासारखे वागायला?
आपण काय सारखे गरीबच राहायचे की काय ?”
असे बोलुन त्याच्याकडे पाठ करून झोपुन गेली .
मग दोन दिवस मात्र कडक अबोला होता तिचा .
परेशला समजले आता पैसे दिल्याशिवाय तिचा अबोला सुटणार नाही .
आपला हट्ट ती पुरा करणार म्हणजे करणार .
मग तिसरे दिवशी त्याने सुमनला आपल्याजवळचे पाच हजार रुपये दिले
आणि म्हणाला ,”सुमन हे घे पैसे ,जपुन वापर बर का .
सारखे सारखे इतके पैसे नाही देऊ शकणार मी .
मला माझ्या पगारात आपल्या घरचे सगळे खर्च भागवावे लागतात .”
सुमनने त्याच्या हातातले पैसे पटकन घेतले आणि वळून आत निघुन गेली .
परेशने हताशपणे पाठमोऱ्या तिच्याकडे पाहिले
आणि मनात म्हणाला काय करावे आता हिच्या हट्टी स्वभावाला
काहीही समजुन घ्यायची हिची तयारीच नाही मुळी...!!

क्रमशः