आज मुग्धाला शाळेत जायला थोडा उशीरच झाला. तिच्या सगळ्या मैत्रिणी पुढे निघून गेल्या. ती घरातून बाहेर पडली आणि एकटीच शाळेच्या दिशेने निघाली. थोड्याच अंतरावर पोहचताच नेमका हर्ष त्याच्या बिल्डिंग मधून बाहेर आला. मुग्धाचे अचानक लक्ष गेले आणि दोघांची नजरानजर झाली. दोघांमध्ये फक्त एक - दोन फुटाचे अंतर असल्यामुळे एकमेकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्ट दिसत होते. त्याला पाहताच मुग्धाच्या तोंडावर बारा वाजले तर तिला इतक्या जवळून पाहता आले म्हणून हर्षचा चेहरा खुलला होता. तिला न्याहाळून हर्ष मान खाली घालून शाळेच्या दिशेने निघून गेला. पण मुग्धा मात्र तिथेच स्तब्ध उभी राहिली. काही अंतरावर तो पुढे गेल्याची खात्री झाल्यावर मुग्धा पुन्हा चालू लागली. चालताना तिच्या मनात अनेक विचार येऊ लागले, " या मुलाचा स्वभाव किती शांत आहे. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव किती निरागस होते." तिला सुरुवातीपासूनच सगळे दिवस आठवू लागले. आणि ती स्वतःशीच मनातल्या मनात बडबड करू लागली, "हर्षने आतापर्यंत मला त्रास होईल असे काहीच केले नाही. त्याने कधी माझ्याशी बोलण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही. मी उगाच त्या दिवशी त्याला नको ते वाईट बोलले. खरंतर त्यात त्याची काहीच चूक नव्हती. त्याचे मित्र मुद्दाम करत असणार. कदाचित ते त्याला चिडवत असतील. तो खरंच वाईट मुलगा नाही आहे. मी त्याच्याबद्दल जरा जास्तच गैरसमज करून घेतला आहे असे वाटते आहे. " विचारांचे चक्र इतक्या जलदगतीने सुरु होते की मुग्धा शाळेत कधी पोहचली तिला कळलेच नाही.
जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे मुग्धाच्या मनात असलेला हर्षबद्दलचा राग कुठेतरी दूर पळून गेला. एकाच शाळेत एकाच चौकात राहत असल्यामुळे अधून मधून ते एकमेकांना दिसत असे. हर्षने आधीसारखा मुग्धाचा सतत पाठलाग करणे सोडून दिले होते. दहावीची परीक्षा असल्यामुळे तो अभ्यासाला लागला होता. पण तो दुरून चोरून चोरून आपल्याला बघत असतो हे मुग्धाला समजले होते. याचा अर्थ हर्षच्या मनात अजूनही माझ्याबद्दल भावना आहेत हे तिने अचूक जाणले होते. फक्त हे सर्व तिला माहित आहे असे तिने हर्षला कधी दाखवले नाही. कारण तिला या सगळ्यापासून जितके दूर राहता येईल तेवढे राहायचे होते.
कुठेतरी दूर उभे राहून हर्ष सतत मुग्धाला न्याहाळत असे. मुग्धालाही आता सवय झाली असावी . कारण कधीकधी तिचे डोळे हर्षला शोधण्यासाठी भिरभिरत असे. ती तिच्या मनातले भाव लपवत असली तरी तीसुद्धा आपल्याला शोधत असते हे हर्षला कळले होते. तिलाही आपण आवडायला लागले आहोत असे त्याला वाटू लागले. कधीकधी हर्ष समोर आला की मुग्धा चक्क त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसायची. हर्षच्या मित्रांनी मात्र हे अचूक हेरले. आता ते अगदी बिनधास्तपणे मुग्धाच्या आजूबाजूला फिरू लागले होते.
बघता बघता फेब्रुवारी महिना उजाडला. दहावीची परीक्षा अगदी तोंडावर आली होती. सगळे विद्यार्थी जोमाने अभ्यासाला लागले होते. पण शाळेतील हे शेवटचे वर्ष असल्यामुळे सगळे अगदी धम्माल करत होते. त्यात जोडप्यांसाठी फेब्रुवारी महिना म्हणजे अगदी खास असतो. त्यांचे डे सुरु होतात ना ! ऑफ तासाला हर्षचे मित्र असेच गप्पा मारत बसले होते. तेव्हा अचानक ग्रुप मधला एक मित्र हर्षला बोलला, "यार मित्रा हर्ष, रोझ डे जवळ येत आहे. मुग्धाला या रोझ डे ला फ्रेंडशिपसाठी विचार." हे ऐकताच सगळेच मित्र त्याच्या सुरात सूर मिळवू लागले. "हो यार हर्ष, मुग्धाला यावेळेस तू फ्रेंडशिपसाठी विचार आणि वॅलेंटाईन डे ला तिला प्रोपोस सुद्धा कर. अरे, असे रोजरोज तिला लांबून किती दिवस बघणार. सुरुवात तर करायलाच हवी ना !" सगळे मित्र त्याला आग्रह करू लागले. मित्रांचे बोलणे हर्षने मनावर घेतले. तसेही एकदा शाळा संपली की मग तिला सतत चोरून न्याहाळणे, तिच्यावर लपून लपून प्रेम करणे कदाचित शक्य नव्हते. त्यामुळे मुग्धाला यावेळेस काहीही झाले तरी विचारायचंच असा मनाशी निर्धार त्याने केला.
आज जोडप्यांच्या आवडत्या डेज् ला सुरुवात झाली. शाळा सुटल्यावर सगळी मुले रंगीबेरंगी गुलाबाचे फुले घेऊन मुलींना देत होते. अर्थातच हा सगळा कार्यक्रम शाळेच्या बाहेर सुरु होता. शाळेत असल्या फाजील गोष्टींना अजिबात परवानगी नव्हती. मुग्धा शाळा सुटल्यावर मैत्रिणींबरोबर घराच्या दिशेने निघाली. घर जवळ येताच ती मत्रिणींना निरोप देऊन बिल्डिंगमध्ये प्रवेश करणारच तेवढ्यात अचानक हर्ष तिच्या समोर आला. बहुदा तो तिचीच वाट बघत होता. हर्षला बिल्डिंगजवळ बघून मुग्धा गांगरून गेली. तिला खूप भीती वाटू लागली. ती घाबरून चोहीकडे नजर फिरवू लागली. आजूबाजूला कोणी पाहत नसल्याची तिने खात्री केली.
"तू इथे काय करत आहेस ?" मुग्धाने दबक्या आवाजात हर्षला विचारले.
मुग्धाने प्रश्न विचारताच हर्ष तिच्या जवळ येऊ लागला. आता मात्र मुग्धा खूप घाबरली होती. तिच्या हृदयाचे ठोके जलद गतीने वाढले. हृदयाची धडधड तिला स्पष्ट जाणवू लागली. आज अगदी पहिल्यांदाच तिच्यासोबत असे विचित्र घडत असल्याचे तिला जाणवले. हर्ष जसजसा जवळ येऊ लागला तसतशी धडधड अधिक जलद झाली. मुग्धाचे अंग थरथर कापू लागले. हर्ष मुग्धाच्या इतका जवळ होता की दोघांमध्ये फक्त एक - दोन पाऊलांचे अंतर होते.
"मुग्धा, प्लिज घाबरू नकोस. तुला त्रास होईल असे मी कधीच काहीच करणार नाही. माझी फक्त एकच इच्छा आहे की, तू माझ्या मैत्रीचा स्वीकार करावा. " हातात असलेले गुलाबाचे फुल मुग्धाला देत हर्ष अगदी प्रेमाने म्हणाला.
मुग्धाने हर्षकडे पाहिले. हर्षच्या चेहऱ्यावरील निरागसता, त्याच्या डोळ्यांमधील तिच्याबद्दल असलेला आदर आणि खूप सारे प्रेम बघून मुग्धा भारावून गेली. कोणत्याही क्षणाचा विलंब न करता तिने त्याच्या हातातील गुलाबाचे फुल आपल्या हातात घेऊन त्यांच्या मैत्रीचे नाते स्वीकारले. "आजपासून आपण दोघेही मित्र झालो." असे म्हणत मुग्धा त्याच्याकडे पाहून हसू लागली. हर्षच्या आनंदाला तर सीमाच उरली नव्हती.
आता मुग्धा आणि हर्ष दोघेही रोज एकमेकांशी बोलू लागले. सुरुवातीला दोघेही एकमेकांशी बोलायला फार लाजत होते. पण मुग्धाचा बोलका आणि मनमिळावू स्वभावाने ती सगळ्यांमध्ये खूप लवकर मिसळून जात असे. शिवाय ती अभ्यासातही हुशार असल्याने हर्षला अभ्यास करताना देखील मदत करू लागली. हर्ष तर आधीपासूनच तिच्या प्रेमात अखंड बुडाला होता. त्यामुळे तो तिच्याशी बोलण्याची एकही संधी सोडत नसे. त्या दोघांना एकमेकांसोबत मनमोकळेपणाने बोलायला फार वेळ लागला नाही. शाळेत जाताना , मधल्या सुट्टीत, शाळेतून घरी परतताना दोघेही मिळेल त्या वेळात एकमेकांशी गप्पा मारू लागले. खूप कमी वेळात त्या दोघांची छान गट्टी जमली होती.
दिवसेंदिवस हर्ष मुग्धामध्ये अधिकच गुंतत चालला होता. तर मुग्धा देखील हर्षच्या स्वभावामुळे इंप्रेस झाली होती. असे म्हणतात आनंदाचे दिवस भुर्रकन उडून जातात तसे कधी सात दिवस गेले कळले सुद्धा नाही. वॅलेंटाईन डे उजाडला. सकाळी शाळेत जाताना हर्षने मुग्धाला मधल्या सुट्टीत शाळेबाहेर भेटण्याचा आग्रह केला. महत्वाचे बोलायचे आहे. जेवून झालं की एकटीच शाळेबाहेर ये असे सांगून तो निघून गेला.
मधल्या सुट्टीत मुग्धा शाळेबाहेर हर्षला भेटते. "काय रे हर्ष, एवढं काय महत्वाचं काम आहे? आपण शाळेत सुद्धा बोलू शकलो असतो. तू मला असं बाहेर का बोलावले आहेस ? " मुग्धा प्रश्न विचारू लागली.
"मुग्धा, खरंतर खूप दिवसांपासून मला तुला काहीतरी सांगायचे आहे. पण मला ते सांगायला खूप भीती वाटत होती म्हणून आज मनाशी निर्धार केला आणि तुला सांगायचं ठरवलं आहे. " हर्ष उत्तरला.
"हर्ष, त्यात भीती कसली ? तुझ्या मनात जे काही असेल ते बिनधास्तपणे मला सांग. मला शक्य असेल ती मदत मी तुला नक्की करेन. " मुग्धा त्याला आपुलकीने म्हणाली.
हर्ष हळूहळू मुग्धाच्या जवळ येऊ लागला. दोघांचीही नजरानजर झाली. दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत नखशिकांत बुडून गेले. हर्ष कधी इतका जवळ आला हे तिला कळलेच नाही. ती त्याच्या डोळ्यांत बघत असताना स्वतःला कधी पूर्ण हरवून बसली हे तिला समजलंच नाही. दोघांमध्ये एकमेकांचा श्वास जाणवेल फक्त एवढेच अंतर होते.
"मुग्धा !!!" हर्षने आवाज देताच मुग्धा भानावर येते. "हं.. तू काही बोललास का ?" मुग्धाने गोंधळून त्याला विचारले.
हर्ष मुग्धा समोर एका गुढग्यावर बसून पुढे बोलू लागला, "मुग्धा, ज्या क्षणी मी तुला पहिल्यांदा पहिले अगदी त्या क्षणापासून ते आतापर्यंत माझ्या मनावर फक्त तुझेच राज्य सुरु आहे. माझ्या विचारांमध्ये, स्वप्नांमध्ये केवळ तू वर्चस्व केले आहेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्या प्रेमात अखंड बुडालो आहे. माझ्या प्रेमाची नाव किनाऱ्यावर आणशील का ? मला आयुष्यभर तुझी साथ हवी आहे. माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील का? "
हर्षने दिलेल्या प्रेमाची कबुली पाहून मुग्धाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्यासाठी हे सगळं खूप अनपेक्षित असल्यामुळे ती पूर्णतः गोंधळून गेली. हर्षला काय उत्तर द्यायचे हे तिला कळतच नव्हते. "मुग्धा माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील ? " हर्षने पुन्हा एकदा विचारले. मुग्धाला काय बोलावे सुचत नव्हते. तिने काही वेळ विचार केला आणि ती बोलू लागली, "हर्ष, तू मला तुझ्या प्रेमाच्या योग्य समजले आहेस. याबद्दल तुझे धन्यवाद कसे मानू मला खरंच शब्दांत व्यक्त करता येत नाही आहे. Thank you so much for loving me !! पण हर्ष , माझ्यासाठी आपलं नातं फक्त एक चांगली मैत्री म्हणून आहे. यापलीकडे मी आपल्या नात्याबद्दल असा कधी विचारच केला नाही. खरं सांगायचं तर प्रेम या शब्दाचा अर्थ मला माहीतच नाही रे. त्या भावना कशा असतात याचा मला कधी अनुभव आला नाही. तुझ्याबद्दल मी काय फील करते कदाचित हे मला नाही सांगता येणार. पण माझ्यासाठी आपले नाते केवळ एक निखळ मैत्री आहे. आणि ही मैत्री शेवटपर्यंत अशीच टिकून रहावी हीच माझी इच्छा आहे."
"मुग्धा, हवं तर तू काही दिवस विचार कर. मला खात्री आहे तुझ्या मनात सुद्धा माझ्या बद्दल प्रेम आहे पण कदाचित तुला आता त्याची जाणीव होत नसेल. तुला हवा तेवढा वेळ तू घे आणि मगच मला उत्तर दे. तोपर्यंत मी तुझी वाट पाहीन." हर्ष पुहा एकदा मुग्धाला समजवण्याच्या स्वरात म्हणाला.
"प्रेम या शब्दाची परिभाषा मला माहित नाही. पण प्रेम हे असं कोणी सांगून होत नाही मला फक्त एवढेच माहित आहे. मी फक्त तुला एकच सांगेन, की मला स्वतःला माहित नाही मी कधी कोणावर प्रेम करेन की नाही. त्यामुळे तू माझी वाट पाहू नकोस. माझ्यामुळे तुला त्रास झाला असेल तर प्लिज मला माफ कर. " असं बोलून मुग्धा तिथून निघून गेली.
मुग्धाने हर्षचे प्रेम नाकारले म्हणून हर्ष मनातून खूप दुःखी झाला. त्याच्या डोळ्यांत अश्रूंनी जागा घेतली होती. त्याला मोठमोठ्याने ओरडून मुग्धाला सांगावेसे वाटत होते ,"मुग्धा प्लिज थांब. मला सोडून जाऊ नकोस. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. प्लिज थांब ना गं. " मुग्धाच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहत हर्षने डोळ्यांतील अश्रूंना वाट दिली.
क्रमशः
(टिप : या कथेची संपूर्ण रचना, लेखनशैली तसेच कल्पनाशक्ती कु. प्रियांका कुंभार यांची असून , या कथेचे सर्व अधिकार फक्त कु. प्रियांका कुंभार यांच्याकडे आहेत. कोणीही परवानगीशिवाय ही कथा ऑनलाईन किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कॉपी, चोरी किंवा प्रकाशित करणार नाही याची सक्त नोंद घ्यावी. )