corona virus shikshakdin in Marathi Magazine by Ankush Shingade books and stories PDF | कोरोना व्हायरस शिक्षकदिन व शिक्षकाचीच सत्वपरीक्षा

Featured Books
Categories
Share

कोरोना व्हायरस शिक्षकदिन व शिक्षकाचीच सत्वपरीक्षा

24. कोरोना व्हायरस;शिक्षकदिन व शिक्षकाचीच सत्वपरीक्षा

दि. ५ सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. दरवर्षी त्यांचा जन्मदिवस हा शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो. कारण ते आधी शिक्षक होते. पण ते पुढे देशाचे राष्ट्रपतीही बनले. त्यामुळे साहजिकच शिक्षकांचा सन्मान वाढला. म्हणून त्यांच्या जन्मदिवशी शिक्षकांचा सन्मान म्हणून हा दिवस सा-या भारतभर शिक्षकदिन म्हणून साजरा करतात.

शिक्षकदिन म्हणून हा दिवस साजरा करीत असतांना या दिवशी विद्यार्थी स्वतः शिक्षकांचा वेष परिधान करुन शाळेत येतात. शिक्षकांना आराम देतात. तसेच त्यांना एखादं पुष्प देवून वा एखादं बक्षीस देवून ते विद्यार्थी शिक्षकांचा सन्मान करतात. तसेच त्या शिक्षकांना एक दिवस का होईना आराम देवून स्वतः शिकवीत असतात.

सध्या जगात कोरोना आजार वाढतच चालला आहे. त्यानुसार राज्यातच नाही तर देशातही आजार वाढत अाहे. अशावेळी लहान मुलांना धोका होतो. म्हणून कोरोनाच्या या पाश्वभुमीवर शाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत. शाळा सुरु कशा कराव्यात हा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे.

या शाळा सुरु करण्यावर तोडगा म्हणून शासनानं उपाय शोधला व ऑनलाइन शिकवा असं सांगीतल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होवू नये म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविणे सुरु झालेले आहे. तेव्हा मुलं शिकत आहेत. पण यावर पालकांच्या तक्रारी आहेत आणि संभाव्य धोके आहेत. ते म्हणजे

१)काही मुलांजवळ मोबाइल नाहीत. त्यांचं अतोनात नुकसान होत आहे.

२)काही मुलांजवळ मोबाइल आहे. पण ते शिकण्याऐवजी खेळ खेळतात.

३)मोबाईलची व्यवस्था आहे. पण मुलं अभ्यास करीत नाहीत. ती पालकांना ऐकत नाहीत.

४)मुलांना कंटाळा येतो. म्हणून मुलं अभ्यास करीत नाहीत.

५)मोबाइल वापरामुळं मुलांच्या डोळ्यावर परिणाम होतो. तसेच आरोग्यावरही परिणाम होतो.

अनेक अडचणी...... ज्याप्रमाणे पालकांसमोर आहेत. त्याचप्रमाणे शिक्षकांसमोरही आहेत. शिक्षकांची या कोरोनाकाळात सत्वपरीक्षाच सुरु आहे. मोबाईल तंत्रज्ञानानं मुलं शिकविणं म्हणजे सत्वपरीक्षा नाही तर काय?

मोबाईलवर शिकविणं ही शिक्षकांसाठी तारेवरची कसरत आहे. त्यातच सर्व मुलं शिकली पाहिजे हा शिक्षकांचा मानस असतो. पण मोबाईलवर शिकवितांना मुलं दिलेल्या वेळेच्या वेळी उपस्थीत होतात का?हा पहिला प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहतो. मुलं जर उपस्थीत राहात नसतील, तर त्यांना उपस्थीत कसे करावे हाही प्रश्न शिक्षकांना सतावतोय. त्यातच काही मुलांजवळ चक्त मोबाईलच नाही तर त्यांच्यासाठी काय करावं?हाही प्रश्न शिक्षकांसमोर उभा आहे.

ज्या ठिकाणी विद्यार्थी साध्या ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहू शकत नाहीत. तिथे ते विद्यार्थी शिकू शकत असतील का? किंवा जे विद्यार्थी ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहतात. पण ते लक्ष देतात का?अन् ऑनलाइन वर्गात दिलेला अभ्यास घरी स्वतः सोडवतात का?की घरी कोणाकडून सोडवून घेतात. हे सगळे प्रश्न.

मोबाइल वापरुन ज्यांनी अभ्यास केला. त्यांचं ठीक आहे. पण ज्यांनी मोबाइल वापरुन मुळात अभ्यासच केला नाही किंवा ज्यांच्याजवळ मोबाइलच नाही. त्यांचं झालेलं नुकसान कसं भरुन काढायचं हा प्रश्न शिक्षकांसमोर उभा असतांना आता मोठा पेच शिक्षकांसमोर उभा आहे.

ही शिक्षकांची सत्वपरीक्षा जरी असली तरी यातून संभ्रमही निर्माण झाला आहे. कारण मुळात विद्यार्थी अभ्यासात किती मागे राहिले किती नाही. हे तपासण्याला मार्ग नाही. कारण शिक्षक प्रत्यक्ष त्याची परीक्षा घेवू शकत नाही.

येणारी पाच सप्टेंबर. शिक्षकदिन होवू घातलेला आहे. हा दिवस म्हणजे शिक्षकांच्या सन्मानाचा दिवस आहे. पण इथे शिक्षकांचेच हालहाल होत आहेत. ऑनलाइन शिक्षण........ त्यातच काही काही काँन्व्हेंटच्या शाळेत शिक्षकांच्या पगारातही कटूता केली आहे. कारण त्यांचं वेतनच मुळात पालकांवर अवलंबून आहे. लॉकडाऊन मुळं पालकांचीही स्थिती डबघाईला आली आहे. ते पैसे कुठून भरणार? त्यातच शाळेत पैसा न आल्यानं ते शिक्षक जरी शिकवीत असले मोबाइल द्वारे तरी त्यांना वेतन कसे द्यावे हा प्रश्न शाळा संचालकावर येवून पडलेला आहे. पालक त्यांना शाळेचं शुल्क कमी करायला लावत आहे. कारण मुलांचं नुकसान होवू नये म्हणून पालकांनी नवीन मोबाइल घेतलेला असून त्यासाठी अनाठायी खर्च झालेला आहे. शिवाय त्यात दरमहा टाकण्यात येणारा रिचार्जही पालकांचे कंबरडे मोडत आहे. सरकार यासाठी सोई करण्याकडे कल देत नाही. तेव्हा या शिक्षकदिनानिमित्याने शिक्षकांसमोर जे प्रश्न उपस्थीत झाले आहेत. त्यावरुन स्वतः शिक्षकालाच हा शिक्षकदिन दिन नाहीतर दीन वाटायला लागला आहे. कारण हा कोरोना व्हायरस कोणाची नाही तर शिक्षकांचीच सत्वपरीक्षा घेत असल्याचे दिसून येत आहे.