21. कोरोना व्हायरस;डॉक्टरांची चांदी, सामान्यांचे हाल
भारत स्वावलंबी देश आहे. या देशात राहणारी बरीचशी मंडळी ही देखील स्वावलंबी आहेत. त्यामुळं नक्कीच ते शक्यतोवर कोणाची मदत घेत नाहीत. आजारांच्या बाबतीतही तेच आहे.
भारतातील बरीचशी मंडळी ही गरीब असून दारिद्र्यात जीवन जगतात. त्यांच्याजवळ गाठीला जास्त पैसा राहात नाही. पण कधी कधी पोटातही अन्न कोंबायला पैसे नसतात. मग उपाशी पोटीच पाणी पिवून दिवसं काढावे लागतात. त्यातच हा कोरोना व्हायरस आलाय.
कोरोना व्हायरस येण्यापुर्वीही ही भारतीय मंडळी आजारी पडत असत. कोणाला किरकोळ सर्दी खोकला व्हायचा. तर कोणाला तापही यायचा. त्यातच अशा सर्दी खोकल्यावर उपाय म्हणून ही मंडळी थेट डॉक्टरकडे न जाता औषधालयात जायची व तेथून दोन रुपयाच्या गोळ्या घेवून आपली प्रकृती सुधारायची. अशातच यावर्षी कोरोना आजार आलाय.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी लोकांना सर्दी, खोकला होतोच, तापही येतोच. हा सर्दी खोकला आणि ताप कोरोनाचाच असतो असे नाही. हा आजार इतरही आजाराचा असू शकतो. त्यावर औषधालयातून काही जेनेरीक औषधी घेवून लोकं कमी पैशात आपला आजार सुधरवू शकतात. पण आता औषधालयांनी संभाव्यतः कोणताही आजार झाल्यास डॉक्टरांची चिठ्ठी आणा, मगच औषधी देतो. हे बंधन घातलय. त्यामुळं सामान्यांची गोची होत आहे.
एकीकडे लाकडाऊन मुळं खायला पैसा नसतांना साध्या सर्दी खोकल्या साठी डॉक्टर कडे जाणं परवडत नसतांना नाईलाजानं लोकांना डॉक्टरांकडे जावंच लागत आहे. त्यातच डॉक्टरांची चांदी झालेली असून काही काही डॉक्टर हे मनमानी शुल्क वसूल करीत आहेत. ती औषधाची रक्कम सामान्यांना परवडत नाही.
महत्वाचं म्हणजे जिथे चार दोन रुपयात काम होत होतं. तिथे शंभर रुपये मोजावे लागत असल्याने ह्या कोरोनाच्या दहशतीत जगण्यापेक्षा मेलेलं बरं. असं लोकांना वाटत आहे.
कोरोनानं एवढी दहशत निर्माण केली आहे की संभाव्य परीस्थिती सांभाळणे कठीण आहे. घरात किंवा घराशेजारी कोणालाही साधा सर्दी खोकला ताप आला आणि तो कोरोनाचा नसला तरी मंडळी धास्तावून जात आहेत. त्यांना कोरोनाच झाला असेल असे सांगून आजुबाजूची मंडळी त्या घराशी संपर्क तोडत आहेत. नव्हे तर त्याला भरती करा. डॉक्टरकडे न्या. असे सल्ले देत आहेत. त्यातच जर डॉक्टरकडे नेलंच तर तो बंदूकीच्या सहाय्यानं ताप मोजून सरळ त्याची रवानगी मोठ्या इस्पितळाकडे करीत आहेत. मोठे इस्पितळवालेही अशा रुग्नाला कोरोना होवो अगर न होवो. परीवारालाही भेटू देत नाहीत. त्यातच काही इस्पीतळातील डॉक्टरांनी जीवंत माणसांचेच यकृत आणि किडन्या डॉक्टरांनी काढल्या, असे व्हिडीओ व्हाट्सअपवरुन फिरत आहेत. यावर काय उपाय करावा हे कोणालाही समजेनासे झाले आहे.
कोरोना माणूस जर असता, तर त्याला रोक लावता आली असती. तर कोरोना काही माणूस नाही की ज्याच्यावर रोक लावता येईल. सध्या इंजेक्शन बरोबर निघालेले नाही. लस यायला बराच उशीर आहे. यावर उपाय एकच की गर्दी टाळणे. शक्यतोवर बाहेर फिरायला न जाणे. पण हे तरी कोण लक्षात घेतो! लोकं कोरोनाच्या छत्रछायेत कोरोना वाढत जरी असला तरी बिनधास्त फिरत आहेत. कोरोनाची भीती बाळगतांना दिसत नाहीत.
महत्वाचं म्हणजे डॉक्टरांची चांदी जरी असली तरी सामान्य माणसांना आता डॉक्टरकडे जाणं भागच आहे. नाहीतर ह्या कोरोनाच्या दहशतीत कोरोना बाजूला राहिल, आम्ही दुस-याच आजाराचे बळी पडू व कोरोना नाही, तर दुसराच आजार आपल्याला नेस्तनाबूत करेल ही शक्यता नाकारता येत नाही. कोरोनामुळे काही काही डॉक्टरांची चांदी जरी असली काही काही डॉक्टरं खरंच चांगले आहेत. ते रुग्णांची काळजी घेत आहेत. तसेच सामान्यांना दिलासा देत आहेत.
मुख्यतः कोरोनाची दहशत जरी असली तरी खरं तर औषधालयातून लोकांना दिलासा मिळायला हवा. कधीकधी जो आजार दोन रुपयात संपतो, तो आजार डॉक्टरकडे जावून व जास्त पैसे मोजूनही संपत नाही. तेव्हा औषधे देतांना औषधालयांनी डॉक्टरच्या चिठ्ठीचं प्रावधान ठेवू नये. सरकारनेही तशी बंदी आणू नये. जेणेकरुन सामान्यांवर आर्थीक भुर्दंड पडणार नाही. डॉक्टरांनीही लोकांना कोरोनाचा फायदा घेवून लुटू नये. नव्हे तर कोरोना निकष लावून लोकांची दिशाभूल करु नये. जेणेकरुन लोकांच्या मनात डॉक्टरांबद्दल अविश्वास निर्माण होईल.