प्रारब्ध भाग ११
सकाळी नाश्ता करताना परेश सुमनला म्हणाला ..
“सुमन तु का नाही गेलीस स्मिता सोबत पार्लर कोर्सला ?
तुला नवीन काहीतरी शिकायला मिळाले असते ,आणि तुझा वेळही चांगला गेला असता .”
“छे मला नाही तसले काही शिकायचे ..मला नाही आवडत
आणि तसला कोर्स करून मला कुठे काम करायला पार्लरला जायचेय ..
मी तर फक्त कस्टमर म्हणुन जाईन तिथे ...”
अचानक बाहेरच्या खोलीत निघुन जात सुमनने विषय संपवला ..
परेशला तिच्या या तुटकपणे बोलण्याचे नवल वाटले .
पुढील आठवड्यात सुमन घरीच होती .
आता स्मिता नव्हती त्यामुळे आपल्या घरीच टीव्ही पाहणे क्रमप्राप्त होते .
खरेतर तिला त्या लहान टीव्हीवर सिनेमा पाहायला नाही आवडायचे पण काही इलाज नव्हता .
त्यातल्यात्यात सध्या मोबाईलवर सोशल साईटवर ती बिझी राहू लागली.
फेसबुक वाटसअप ,त्यावरचे ग्रुप ,नवीन होणारे मित्र मैत्रिणी हे सारे तिला आवडू लागले .
फेसबुक वरचे पुरुष मित्र ,त्यांच्यासोबत असणारे चाट ,काहीवेळा व्हिडीओ कॉल
हे सारे आता नियमित सुरु झाले .
परेश ऑफिसला गेला की अख्खा दिवस तिला रिकामाच असे .
कॉलेजला असताना कधी मुलांसोबत बोलणे सुद्धा व्हायचे नाही .
इथे मात्र भरपूर पुरुष मित्र ,तिच्या रुपाची ,तिची ,कपड्यांची तारीफ करणारे ..
हे आयुष्य तिला आता अंगवळणी पडू लागले .
इंटरनेट,गुगल यात आता ती चांगली पारंगत झाली होती .
तिच्या वागण्यातला अस्वस्थपणा परेशच्या लक्षात आला होता .
पण तसे ती आपल्या वागण्यात जाणवून न द्यायचा प्रयत्न करीत असे .
बाकी रात्रीचे तिचे वागणे अगदी पुर्वीसारखेच होते .
तिच्या इतर कर्तव्यात ती कुठे कमी पडत नव्हती.
नंतरच्या आठवड्यात स्मिता संतोषने दोघांना गप्पा मारायला जेवायला बोलावले ,
पण तब्येतीचे कारण सांगून दोन तीन वेळा सुमनने नकार दिला .
स्मिताच्या लक्षात आले की ती आपल्याला टाळते आहे .
पण ती सुद्धा सध्या इतकी बिझी होती की याकडे ती फार लक्ष देऊ शकली नाही .
यामुळे परेश आणि संतोषचे पण भेटणे कमी झाले .
नंतर एक दिवस सुमन परेशला म्हणाली ,
“अहो आपल्याला एक मोठा टीव्ही घेऊया ना ..
“का ह्या टीव्हीला काय झालेय ?,चांगला दिसतो आहे की ..
“केवढा लहान आहे हा ..मला कंटाळा येतो ह्याचा .सुमन नाराजीने बोलली
आता नवीन टीव्ही घ्यायचा म्हणजे पन्नास साठ हजार हवेत .
आत्ता कुठून आणणार इतके पैसे ..
अजुन लग्नाच्या कर्जांचे हप्ते चालु आहेत माझे ...
हे ऐकून सुमन काहीच बोलली नाही पण तिच्या वागण्यात आखडूपणा आला .
नंतर आठवडाभर ती परेशशी बोलेनाशी झाली .
नुसते हु हा जेवायला वाढणे इतकेच ..
रात्री कंटाळा आलाय किंवा असे काही कारण सांगुन त्याच्या जवळ येईना झाली .
परेशला काय करावे समजेना .
त्याला तसा पन्नास हजारच्या आसपास पगार होता ,पण घरकर्जाचे हप्ते,इतर हप्ते कापून त्याच्या हातात
तीस एकतीस हजार येत असत, ही सुद्धा तशी बरी रक्कम होती .
नुकतेच लग्नाच्या वेळी इतके दिवस साठवलेल्या पैशातील दीड लाख रुपये संपले होते .
त्याच्या वडिलांनी पण सोसायटीचे काढुन त्याला पन्नास हजार रुपये दिले होते .
लग्नाचा खर्च ,सुमनचे दागिने यासाठी ही सर्व रक्कम संपून गेली होती .
शिवाय मामांनी मदत केली होती ती वेगळीच .
लग्न तर त्यांच्याच घरात झाले होते .
मामा तालेवार असल्याने भाच्याला त्यांनी किती खर्च केला हे सांगितले पण नव्हते
आणि पैसे पण मागितले नव्हते.
लग्न झाल्यापासून हौस म्हणून बराच खर्च रोज चालु होताच .
बँकेत आता अजुन लाखभर शिल्लक होते .
अडीअडचणीसाठी मुंबईसारख्या ठिकाणी इतके पैसे तर जवळ असायलाच हवे होते .
पण सुमनला काही समजुन सांगावे तर तिची समजून घ्यायची इच्छा नव्हती .
त्याच्या लक्षात आले की ,लग्न झाल्यापसून गेल्या महिन्याभरात तिने परेशला त्याचा पगार किती आहे
किंवा आपली आर्थिक परिस्थिती काय याविषयी एका शब्दाने विचारले नव्हते .
दोन आठवडे सुमनचा असा असहकार चालुच होता .
शेवटी कंपनीतुन सणासाठी उचल घेतली जी त्याने पुढे कधीतरी घ्यायचे ठरवले होते .
पन्नास हजाराचा मोठा टीव्ही तोही सुमनच्या पसंतीचा घेतला ..
तेव्हा सुमनचा अबोला सुटला .
जुना टीव्ही देऊन त्याला पस्तीस हजार घालायला लागले .
आता मात्र ती अगदी पुर्वीसारखी त्याच्याशी वागू लागली .
तेव्हा परेशला तिच्या हट्टी स्वभावाची जाणीव झाली .
यानंतर एके दिवशी सहज बोलता बोलता परेशने तिला विचारले .
‘तुला कंटाळा येत असेल न आजकाल एकटीच असतेस घरी ..
“नाही तसे काही नाही आता टीव्ही आहेच की बघायला ...
‘तरी पण तुला पुढे काही शिकायची इच्छा आहे का ?
नोकरी वगैरे करायची आहे का तुला ..
एखाद्या आवडीच्या विषयात तुला काही करायचे असेल तर करू शकतेस ..
किंवा आजूबाजूच्या मुलांच्या शिकवण्या सुद्धा घेऊ शकतोस
तुझाही वेळ चांगला जाईल आणि काही आर्थिक प्राप्ती पण होईल ...
हे बोलणे ऐकल्यावर वर सुमनने नजर उचलुन त्याच्याकडे पाहिले
आणि आपले मोठे डोळे आणखी मोठे करीत म्हणाली ..
“हे बघा मला शिक्षण वगैरे काही घ्यायचे नाहीये
मला तसली काही आवड नाही ..घरातून बाहेर पडायला आणि तालुक्याच्या गावी जायला
मिळत होते म्हणून मी इतके तरी शिकले .
उगाच धडपड करीत नोकरी वगैरे करायची माझी अजिबात इच्छा नाहीये
आणि शिकवण्या घेणे असल्या “फालतू” गोष्टी मला नाही आवडत .
तुम्ही मुंबईचे असल्यामुळे मी तुम्हाला होकार दिला होता .
कारण मुंबईच्या आयुष्याचे मला खुप आकर्षण होते ..
मला आरामशीर आयुष्य माझ्या मनासारखे जगायचे आहे
आणि हो सारखे मला असले काही विचारत जाऊ नका ..समजले न ?
तिचे हे बोलणे ऐकल्यावर तर परेश एकदम चकित झाला .
तिचा बोलण्याचा आवेश बघुन चक्रावला
सुमन सारख्या सध्या वाटणाऱ्या मुलीचे हे विचार ...
आणि आपण मुंबईचे आहोत यासाठी फक्त तिने आपल्याला पसंत केलेय ?
सुमनच्या विषयी रोज त्याला नवीन नवीन माहिती होऊ लागली होती .
पण तो त्यावर काहीच बोलला नाही ,शांत राहिला .
मुळात त्याचा स्वभाव शांत होता .
सुमन आवडली होती म्हणून तिच्याशी त्याने लग्न केले होते .
आता तिचा स्वभाव असेल थोडा वेगळा ..
बदलेल हळू हळू कदाचित .
लहान गावात राहिले की विचार पण तसेच संकुचित राहतात
आता इथे तिचे विचार भविष्यात बदलतील .
नको शिकुदे तिला किंवा नको करूदे तिला नोकरी.
नाही आवडत तिला तर आपली काही जबरदस्ती नाही
इतके दिवस खेड्यातल्या कामाचे आयुष्य जगल्यावर आता तिला आराम करावा
वाटणे पण साहजिक आहे
तिला आरामशीर आयुष्य जगू देत ,आपला पगार आपल्या संसारासाठी पुरेसा आहे.
आणखीन पैसे तिने मिळवावे अशी आपली पण अपेक्षा नाही
असा विचार करून त्याने त्या दिवशी तो विषय तिथेच संपवला .
रात्री नेहेमीप्रमाणे तिला त्याने अगदी प्रेमाने कुशीत घेतले .
क्रमशः