16. कोरोना व्हायरस;आला श्रावण गेला श्रावण
श्रावण महिना आला. सुखसमृद्धी आणेल असं वाटलं. कारण आधीच कोरोनानं जनता त्रस्त होती. त्यामुळं राहत मिळेल असं वाटत होतं. शाळा सुरु होऊन विद्यार्थ्यांचं नुकसान टळेल असंही वाटलं. पण लोकांचा भ्रमनिराश झाला. कारण लोकांना श्रावण उजळूनही राहत मिळाली नाही. विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु झाल्या नाही. त्यातच ब-याच विद्यार्थ्यांचं नुकसान होत असलेलं दिसत आहे.
विद्यार्थी वर्गाच्या अभ्यासाबाबत शिकविण्याचा विचार केल्यास असं जाणवत आहे की शिक्षकांनी ऑनलाइन शिकविणे सुरु केले आहे. त्यातच मोबाईलवर मुले शिकत आहेत. पण ज्यांच्याकडे मोबाईलच नाही त्यांची गोची होतांना दिसत आहे. त्यांच्या अभ्यासाचं होणारं नुकसान कसं भरुन निघेल यावर प्रश्नचिन्ह लागले आहे.
शिक्षक अभ्यास शिकवितांना अॉफलाईन शिकवायला तयार नाहीत. त्यामुळं अजून प्रश्न निर्माण झाले आहेत. कारण पालकांना दोन मुलं असल्यास व एकाच वेळेला दोन मुलांचे अभ्यास सुरु असल्यास एका मुलाचं या ऑनलाइन शिक्षणातून नुकसानच होत असते.
लॉकडाऊन मध्ये आधीच पैशानं तुटलेली मंडळी ऑनलाइन अभ्यासासाठी मोबाइल घेतील कुठून?जिथे पोट भरु शकत नाहीत. तिथे मोबाइलचा प्रश्न. अशातच लोकं कशीबशी कामाला लागलेली असताना दररोज सायंकाळी घरी कामावरुन आल्यावर मोबाइल साठी मुलांचे ओरडणे तसेच पत्नीची कटकट ऐकून माणसांचा तिळपापड होत आहे. त्यालाही कळत आहे की मुलाचे नुकसान होत आहे. ते टाळावे कसे?शिक्षकांना विचारणा केल्यास तेही हेकड बोलून अपमानच करतात. मग अशावेळी नुकसानाचं काय?तो नुकसान कोण भरुन काढेल हा प्रश्न पालक वर्गाला पडलेला आहे.
श्रावण जसा आला, तसाच आहे. यावर्षी तो दरवर्षीप्रमाणे आनंद घेवून आलेला नाही. या महिण्यात येणारी सण जशी येत होती. तशीच आताही येत आहेत. पण जी मजा पुर्वी यायची. ती यावेळी नाही.
श्रावणाचं एक वैशिष्ट्य आहे. एक दोन सरी आल्या की ऊन दिसणे. ते कोवळे ऊन असते. अंगाला चटका जाणवू देत नाही. ज्याला या उन्हाचा त्रास होतो. त्याच्यासारखा नाजूक नाही.
कधी कधी पाऊस जाताच कडेला लांब लचक इंद्रधनूही दिसतो. तो पाहतांना फार मजा वाटते. त्यातच या श्रावणात नागपंचमी तसेच राखीच्या यात्रा असतात. नागद्वारच्या यात्रेतून परत आल्यानंतर राखीपासून लोकांच्या कढया सुरु होतात. मग जोरजोरात महादेवाची गाणी म्हटली जातात. ते यावेळी दिसत नाही. नागरंचमीच्या दिवशी म्हटल्या जाणा-या बा-या यावेळी दिसल्या नाही. नव्हे तर राखीला राखी बांधायला फिरणा-या बहिणी आता दिसल्या नाहीत.
या महिण्यात मांस खाणं काही लोकं टाळतात. त्याचं कारणंही तसेच आहे. रिमझीम येणारा पाऊस. ह्या पावसानं नदी नाल्यांना पूर असतात. त्यामुळं लोकं मासे पकडायला जाऊ शकत नाहीत. वाहून जाण्याचा धोका असतो. म्हणून मासेमारी बंद असते. तसेच प्राण्यांना पायखु-या, तोंडखु-याच यासारखे आजारच नाहीत, तर वेगवेगळे जास्तीत जास्त आजार असतात. ज्या आजाराचे जंतू उष्णतेनंही मरु शकत नाहीत. नव्हे तर आजारी पाडणा-या सुक्ष्म जंतूनाही याच काळात सुगीचे दिवस असल्याने मांस या काळात वर्ज असते.
श्रावण महिण्यात होणारी दहीहंडी आता दिसणार नाही. कारण कोरोना गर्दीमध्ये जास्त वाढतो. नव्हे तर पोळा भरवला जाणार नाही. तसेच पोळ्याला निघणारी मारबत तसेच बडग्यावरही याच काळात संक्रात असेल.
ज्याप्रमाणे श्रावणातल्या सणांना या कोरोनानं अडथडा आणला आहे. त्याचप्रमाणे पावसाच्या उघडीपच्या प्रकारालाही या कोरोनानं ब्रेक लावला की काय असे वाटायला लागले आहे. कारण या महिण्यात येणारे संततधार पाणी बहुतेक ठिकाणी दिसले नाही. पुढे दिसतील काय?ते सांगता येत नाही. तसेच वातावरणात या झाडावरुन त्या झाडावर उडणारी फुलपाखरे व फुलचुख्या यावर्षी दिसले नाहीत. याच काळात कानात गुंजणारे ते बेडकाचे डराव डराव आवाज तसेच रस्त्यावरुन चालतांना अलगत आडवे जाणारे ते सापाचे पिल्लू दिसले नाही. बहुतःश प्राण्यांनीही कोरोनाचा धसका घेतला असावा असं वाटतं. नव्हे तर पोळ्याला निघणारी घाणमाकड आता दिसणार नाही. पुढे श्रावण संपल्यावर काजळतीज आणि गणपती उत्सव दिसतो की काय?ह्यावर ही प्रश्नच आहे.
नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ वाहिला की काय?ते ऐकायला आले नाही. बहिणींचे सामुहीक मेहंदी लावणे अदृश्यच झाले की काय?असे वाटत आहे.
एकंदरीत सांगायचं झाल्यास श्रावणाच्या ज्या विविध छटा असतात. ज्या छटांनी माणसांना तसेच जगातील वेगवेगळ्या सुक्ष्म जीवापासून अवाढव्य प्राण्यांपर्यंतच्या जीवांना आनंद प्राप्त होतो. तो आनंद या कोरोनानं लुटून नेला आहे. साहजिकच लोकांचे फिरणे बंद असल्यानं घर एके घर व घर दुणे नुकसान हेच गणित लोकांना कळायला लागले आहे. तेही या श्रावण महिण्यात. आषाढ गेलेला आहे हिरमुसले करुन. आता श्रावण उजळला होता नव्या आशा पल्लवीत करुन. पण हा श्रावण ही निराश करीत जात आहे. कदाचित भाद्रपद कसा उजळतो ते माहित नाही. त्यामुळ लोकांना या कोरोनामुळं आला श्रावण गेला श्रावण म्हणण्याची वेळ आली आहे.