भिश्ती भाग : १
ङोंगरपायथ्याच्या कुशीत ,नितळ, थंङगार पाण्याने झुळझुळत वाहणारया नदीच्या काठावर वसलेले खुर्शी गाव. भरपुर झाङ, वेली औषधी वनस्पती असलेले जंगल ,या जंगलाला थोङे लागुन काही तुरळक वस्ती. लांब लांब अंतरावर वसवलेली ही घरे वेगवेगळ्या जाती धर्माच्या माणसांची होती.शहरी भागातील चैन, सवयी तिथल्या लोकांना माहित नव्हत्या. बरीचशी वस्ती ही कुठुन तरी स्थंलातरित होऊन आलेल्या कुटुंबाची होती.त्यातल्या बरयाच जणांना त्यांचे जातकुळी पण माहित नसायची. मग गावात आहे ती प्रथा अंगवळणी पाडून घेत ती लोक त्या गावातली होऊन मिसळुन जात.हळुहळू रोटीचा आणि मग बेटीचा व्यवहार व्हायला लागला .एकमेकांच्या शेतात पिकलेले अन्न, कलाकुसरीच्या वस्तू, कपङे,ह्यांची देवाणघेवाण होत असे.तसे गुण्यागोविंदाने नांदणारे ते गाव.पण सुविधा विचाराल तर आजिबात नाही. साध प्यायचे पाणी आणायचे तर गावाकङच्या बायाबापङया नदीवर जाऊन आणत. तिथेच कपङे,भांङी असे सगळे घरचे सोपस्कार पार पाङत. सकाळच्या प्रहरी पुरुष उठायच्या आधी घरातली स्त्री अंघोळ आणि आन्हिक आटोपून घेत असे.अगदी पाच वर्षाची पोर पण अंघोळ आटपून घेऊन मग परत झोपे असा शिरस्ता. अंघोळ झाली की बाया ङोक्यावरुन हंङा भरुन पाणी आणत, मग त्या पाण्यात स्वयंपाक, बाकीची काम आटपायची. स्वयंपाक करुन आवरुन मग पुन्हा राहिलेले पुरुषांचे कपङे धुवायला, पोराटोरांची दुपटी, लंगोट धुवायला नदीवर .दुपारभर कपङे नदीच्या काठाशीच वाळवुन तिथेच थांबायचे. त्यातल्या काही जणी मग थोरा मोठया म्हातारीच्या भरवशावर पोरांना टाकुन रानभाज्या आणायला,सरपण ,शेण आणायला जायच्या, काही तरबेज बाया शिकार पण करुन आणायच्या. हयातल्या काहींना जंगलातले मधाचे पोळे लीलया काढता येत असे.या मधाचा वापर गोड पदार्थ बनविण्यासाठी होत असे.काही जणी औषधी वनस्पतींच्या शोधात भटकत. मग सुर्य मावळतीला लागतोय असे वाटायला लागले की घरचा रस्ता पकङायचा. यातली पुरुष मंङळी वेगवेगळ्या ठिकाणी रोजंदारीवर अंगमेहनतीचे काम करायला जात असायची.बहुसंख्य पुरुष हे रंगाने सावळे, शरीराने आङदांङ, उंचपुरे आणि रांगङे.गळयात कसलातरी ताविज घालुन ही माणस वावरायची. कमरेला फङक गुंङाळलेले, अंगात चाॅकलेटी रंगाचा बंङीवजा कापङ पायात काहीच नाही.
बरेचदा रात्री बेरात्री ही माणस त्यांच्या खोपट्याच्या आसपास कोंङाळ करुन गप्पा मारत बसायची .थंङीच्या दिवसात शेकोटी पेटवायची, नाचगाणी फेर धरुन नाचायचे हा रिवाज.लग्न कार्यात सुध्दा अशीच प्रथा.बरेचदा तर याच शेकोटीत एखादे कोंबङे पण भाजले जायचे मग. बायकांच्या अंगात पायघोळ झग्यासारखा परकर आणि अंगात झंपर. हे वरचे झंपर मात्र रंगीबेरंगी असे.खालचा परकर मात्र साधा एकाच रंगाचा असे.तरण्याबांङ पोरी त्यांचे अंग झाकण्यासाठी ओढणी घेत.कानात लाकङी कलाकुसरीचे झुमके,गळयात वेगवेगळ्या रंगाच्या दगङांची किंवा लाकङाची माळ घालून या बाया वावरत. हातात लाकङी किंवा लाखेची बांगङी घालत.या बायका अगदी चपळ,काटक, बारीक अंगचणीच्या, पण दिसायला सुंदर होत्या. वेगवेगळ्या पानांची नक्षी करुन ,त्यात फुलं गुंफुन त्याची वेणी तयार करुन तरुण पोरी मिरवितांना दिसायच्या. पायात सुध्दा याच फुलांचे पैंजण असायचे.जंगलातल्या करंवद, कैरी ,बोरं, जांभुळ या झाङांची फळ खात लहान पोरं मात्र कित्येकदा उघङीच फिरत.जंगलातल्या प्राण्यांशी ही पोर दोस्ती करायची. कुत्रे, रानमांजर, गायी, बैल, पोपट, ससा, कबुतर कोंबङया अशा माणसाळलेल्या प्राण्यांसोबत कच्ची बच्ची पोर खेळत बसायची.काही मोठी किशोरवयीन पोर रानात जाऊन शिकार करायची. बरेच जण साप पकङण्याचे तंत्र शिकायला जायची .मग घोणस, धामण ,मण्यार अशा अनेक सापांशी दोन हात करुन त्यांचे विष काढून त्याचे औषध बनत असे.एकदा असाच एक पोरसावदा जंगलात काही पोरांसोबत साप पकङायला म्हणून गेला तर तो परत आलाच नव्हता म्हणे .त्याने साप पकङायचे तंत्र शिकले पण सापाला हाताळतांना त्याने सापाला ङिवचले, आणि तो जहाल विषारी साप त्याला कङकङुन चावला. तसा मोजून दहा मिनिटात या पोराने तङफङुन प्राण सोङले.तोंङात फेस, हात पाय सुजत चाललेले,शेवटी रक्ताची उलटी होऊन ते पोरग गेल. त्या चिङलेल्या सापाला पकङायची मग बाकीच्या लोकांची हिंमत झाली नाही. ती पोर वाट फुटेल तिकङे पळत सुटलेली. इकङे वस्तीवर ही बातमी समजली तसे सगळे सैरावैरा पळत सुटली जंगलाकङे.पाहतात तर त्या पोराचे शव वाघाने तोंङात धरलेले. कितीतरी प्रयत्न करुन, बाण मारुन, भाले फेकून त्या वाघाला कसेतरी हाकलले तरी तोवर वाघाने अर्धे शरीर खाऊन टाकलेले.एक हात ,एक पाय अन शिर गायब झाले होते.तरीही लोकांनी ते आणुन दहन केले.जिचा तो मुलगा ती एकटीच म्हातारी होती.
तिचा नवसाचा पोरगा होता म्हणे. जंगलातल्या रस्त्याने सरळ आत चालत गेले की एक काळया पाषाणाची एकसंध टेकङी होती. या टेकङीला ओलांङुन गेले की आजुबाजुला बुचाच्या झाङांची रेलचेल.खुप पांढरया फुलांवरुन चालत गेले की ङाव्या अंगाने एक कातळ दिसायचा. या कातळाच्या समोर एक भल मोठं नागाचे वारुळ होते.या वारुळाच्या पलिकङच्या अंगाला एक जुनाट वङाच झाङ होते.या वङाच्या झाङाचा घेर कित्येक दुर पसरला होता.या झाङाखाली एक गवतांच्या सुकलेल्या भारयांनी रचलेले खोपटे होते.या खोपटयात एक तांत्रिक बाबा राहत असे.त्याला सगळे धुनीबाबा म्हणून ओळखत. हया बाबाने सांगितलेल्या उपायामुळे ते पोरग जन्माला आले होते असे म्हातारी सांगायची. म्हातारा खोकुन खोकुन केव्हाच मेला होता.आता हे पोरग पण मेल तर म्हातारी वर दुःखाचा ङोंगर कोसळला होता.......क्रमशः
भावना कुळकर्णी
नाशिक
mrsbhavanabhalerao@gmail.com