It happens sometime .. in Marathi Science-Fiction by Sujaata Siddha books and stories PDF | होतं असं कधी कधी !...

Featured Books
  • You Are My Choice - 40

    आकाश श्रेया के बेड के पास एक डेस्क पे बैठा। "यू शुड रेस्ट। ह...

  • True Love

    Hello everyone this is a short story so, please give me rati...

  • मुक्त - भाग 3

    --------मुक्त -----(3)        खुशक हवा का चलना शुरू था... आज...

  • Krick और Nakchadi - 1

    ये एक ऐसी प्रेम कहानी है जो साथ, समर्पण और त्याग की मसाल काय...

  • आई कैन सी यू - 51

    कहानी में अब तक हम ने देखा के रोवन लूसी को अस्पताल ले गया था...

Categories
Share

होतं असं कधी कधी !...


होतं असं कधी कधी !...

ती सायंकाळची वेळ होती , उन्हाळ्यातले दिवस असल्यामुळे सूर्य अजून पश्चिमेला रेंगाळत होता ,आसपास पसरलेला त्याचा संधिप्रकाश मनाला एक अनामिक हुरहूर लावत होता . शहरातली एक गजबजलेली बाग , लहान मुलं खेळतायत , पालक गप्पा मारतायत , कोणी जॉगिंग करतंय , कोणी हिरवळी वर बसून गप्पा मारतंय , दूर एका कोपऱ्यात २४-२५ वर्षांची एक युवती शांतपणे एका बाकावर बसलेली दिसली . साधारण मध्यमवर्गीय वेषभूषा , कुणाचंही लक्ष वेधून घेईल असा देखणा चेहेरा ,माझं कुतूहल चाळवलं , का अशी ही एकटी बसली असेल ? काही दुःख असेल का हिला ? कोणाची वाट बघत असेल का ?आणि ती व्यक्ती आली नसेल का ? ब्रेक अप झालं असेल का? अनेक शक्यता माझ्या डोक्यात उगाच भिरभिरत राहिल्या . मोबाईल चे इअर प्लग्स कानात लावून गाणी ऐकतोय असं दाखवत मी तिच्यावर उगाचच लक्ष ठेवून होतो . बराच वेळ झाला ,ती तशीच खिन्न चेहेऱ्याने बसून राहिली होती . तरुण पिढीतली असूनही हातात फोन नाही , पर्स नाही , उत्सुक नजर , सळसळता उत्साह नाही . माझ्याही नकळत माझ्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती दाटून आली .

बराच वेळ होत आला , अंधार आता भरून आला होता , लहान मुलांचं खेळणं संपून त्यांचा आणि त्यांच्या आईबाबाबांचा जाता जाता भेळ -पाणीपुरी खायचा प्रोग्रामही आता सुरू झाला होता , हळूहळू अंधार वाढला , दूर अंतरावर एकाकी बसलेली ती ,इकडे मी ,आणि शेंगदाणे -फुटाणे, बटाटे वडे वैगेरे विकणारी मोजकी काही माणसं , सोडली तर बाग रिकामी होत चालली.आणखी काही वेळाने गार्डच्या शिट्ट्या वाजायला लागल्या तसं मोबाइलवरची गाणी बंद करून , तो खिशात ठेऊन मी हिरवळीवरून उठलो , बाजूला काढून ठेवलेल्या चपला पायात अडकवल्या , आणि निघालो . ती अजूनही बसलेलीच होती , तिच्याच विचारात इतकी हरवली होती की गार्डच्या शिट्ट्या तिच्या कानांपर्यत पोहोचत नसाव्यात .

“एक्स्क्यूज मी !.. “ मी तिच्याजवळ जाऊन मोठ्याने म्हणालो तेव्हा तिने एकदम दचकून माझ्याकडे बघितलं .

“I am sorry !.. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की बाग आता बंद व्हायची वेळ झालीये . गार्ड केव्हाचा शिट्ट्या मारतोय . “

“अं , हो , हो ...actually माझ्या लक्षातच आलं नाही . “ ती ओशाळवाणं हसत उठली .

“Never Mind !.. एवढी बाग आवडली असेल तर उद्या पुन्हा या , ..हाहाहा .. “ मी उगाच तिला हसवायचा प्रयत्न केला , च्यायला मला असं कोणी एकाकी उदास बघवत नाही हो . पण माझ्या कोटीवर ती हसली नाही . उठून निघून गेली . मी पण घरी आलो . .तसा बागेत रोज जायचा माझा काही शिरस्ता नव्हता , कधी तरी कंटाळा आला की सहज म्हणून जायचो मी , आपल्याच नादात रमणारी लोकं बघत , लहान मुलं खेळताना बघत वेळ कसा निघून जातो ते कळतंच नाही , माझं म्हणाल तर मी आहे सडाफटींग , म्हणजे आई -बाबा आणि मी आमचं एवढंच छोटं आनंदी कुटुंब होतं ,मी बारा वर्षांचा असताना एका अपघातात ते दोघेही गेले आणि तेव्हापासून घरात मी एकटाच , सुरूवातीला खूप त्रास झाला ,नाही असं नाही ,राहतं घर आणि आईबाबांच्याच मिळालेल्या इन्शुरन्स आणि आजूबाजूच्या लोकांनी दाखवलेल्या दयेवर कसाबसा मोठा झालो , चार बिनकामाचे नातेवाईक गोळा झाले त्या घराकरीता म्हणून ,पण कुणाला दाद लागू दिली नाही , जेमतेम दहावी झालो आणि कामाला लागलो एका कंपनीत सुरूवातीला ऑफिसबॉय म्हणून , काम करत ग्रॅज्युएशन कम्प्लिट केलं आणि आता तिथेच ऑफिस ऍडमिनीस्ट्रेशन बघतो , हुशार होतो , पुढे शिकलो देखील असतो , काही दयावंत तयार होते माझ्या शिक्षणाचा खर्च करायला , लांब कशाला आमचा बॉस च मागे लागला होता , पुढे शिकवतो म्हणून ,पण काय करायचं पुढे शिक्षण घेऊन हो ? तसंही नियती नावाच्या शाळेत मी रोज तऱ्हे तऱ्हे चे धडे घेतच होतो की , प्रॅक्टिकल सहीत , मला काही पुढे त्या छापील शिक्षणात आणि मोठं होण्यात रस नव्हता ,आणि तसंही कुणाला खूष करायचं मोठं होऊन ? लोक म्हणायचे आई बाबांच्या आत्म्याला बरं वाटावं म्हणून तरी शिक वैगेरे , पण असं काही मला वाटलं नाही ,माणसं एकदा गेली कि परत येत नसतात . का SSS ही उरत नाही मागे .

तशी मी सवय करून घेतली एकटेपणाची , इतकी की लग्नाचं वय उलटून गेलं तरी लग्न करावंसं वाटलं नाही , देखणा आहेच मी , अजूनही मुली मागे लागतात की ,पण कोणाच्या प्रेमात पडावंसं कधी वाटलं नाही .पुढे ते ही वय सरलं आता जवळपास पस्तिशीला आलो , असेच दिवस जाता जाता काही वर्षांनी काठी घेऊन चालायला लागेन , आयुष्य आयुष्य ते काय आणि किती धडपडायचं त्याच्यासाठी ? पण आज माझ्या एकसुरी आयुष्याला ही मुलगी छेद देऊन गेली , कधी नव्हे ते ऑफिस सुटल्यावर परत तिच्या साठी बागेत आलो , आजही होतीच तिथे , त्याच जागेवर , तशीच दुखावलेल्या चेहेऱ्याने बसलेली . आज जरा धाडस करून ती बसलेल्या बेंच वर , तिच्या शेजारीच पण मध्ये बरंच अंतर ठेऊन बसलो . ती दगडी पुतळ्यासारखी स्तब्ध , काहीतरी बोलून सुरुवात करावी या हेतूने मी खाकरलो आणि तिच्याशी बोलायला जाणार तेवढ्यात मला जाणवलं की माझ्या छातीचे ठोके वाढले आहेत , का पण ? मी घाबरलो की काय तिला ? नाही , घाबरायचं काहीच कारण नाही , मी काही तीला पटवायच्या हेतूने तिथे बसलेलो नव्हतो , मग मला घाम का फुटतोय ? काहीतरी विचित्र संवेदना ? हो नक्कीच , कळालं नाही पण वेगळं काही तरी , काय ते मला एक्झॅक्ट्ली समजेना ,मग तिच्याशी बोलायचा नाद सोडून नुसता बसून राहिलो ,ती अजुनही तशीच एकटक नजर लावून कुठेतरी शून्यात बघत होती , तिचे सोनेरी छटा असेलेले केस वाऱ्याबरोबर हलकेच उडत होते , ते ती तसेच तिच्या नाजूक हातांनी कानामागे सारत होती , woww .. superb , natural beauty … अशी सोनेरी कांती , मी पहिल्यांदाच पाहत होतो . वाऱ्याचा आणि केसांचा तो लडिवाळ चाळा ,बघताना मी स्वतः:ला विसरलो ,किती वेळ गेला कोणास ठाऊक ? हळू हळू अंधार पडायला लागला आणि गार्ड ची शिट्टी ऐकून मी दचकलो , ती केव्हाच उठून गेली होती आणि मी मात्र संमोहन घातल्यासारखा तिथेच . उठलो , आणि निघालो , एक प्रकारच्या भारलेल्या अवस्थेत निघालो, एक वेगळीच जाणीव सर्व तनामनावर व्यापून राहिली होती , त्या जाणीवेशी माझा परिचय नव्हता , केवळ पायाखालचा रस्ता होता म्हणून अचूक चालत होतो इतकंच , तितक्यात अचानक तो माझ्या समोर येऊन उभा राहिला, ‘सर्व अंगावर भस्म लावलेलं , उघडाबंब ,कमरेला लंगोटी ,डोक्यावर जटांचं भलं मोठं गुंडाळ , डोळ्यात काजळ आणि नजरेत अंगार , त्याच्या ‘डमडम SSSSS डमडम SSSSS ‘ डमरू च्या खणखणीत आवाजाने मी भानावर आलो ,लालभडक डोळे माझ्यावर रोखून,जोरजोराने डमरू वाजवत तो म्हणाला “तिचा नाद सोड SSS “

“ कोण आहेस तू ? “ मी अगदी तिरस्कार युक्त स्वरात विचारलं या अशा ढोंगी , सोंग घेऊन फिरणाऱ्या लोकांची मला विलक्षण चीड आहे .

“त्याचाशी तुला काही घेणं नाही , तुला कळतंय मी कुणाबद्दल बोलतोय “ त्याच्या जाड्या भरड्या आवाजात जरब होती .

“ अरे जा रे जोगड्या SSSS तू कोण मला सांगणारा ,” मी माझा राग आवरू शकलो नाही .

“ मी सांगत नाहीये , सावध करतोय ,मूर्ख माणसा , ती सत्यानाश करेल तुझा “

“ ए SSS जातो का आता ? तुला काय ,माझा पुळका , ती काय करणार आहे माझं करून करून ? भल्या घरची पोर आहे , कसल्या तरी दु:खात आहे ,आणि तुमच्यासारख्या मगरी तिला गिळायला बसल्या आहेत , लक्षात ठेव मी असे पर्यंत कोणाच्या बापाची टाप नाही तिला त्रास द्यायची किंवा तिचा फायदा घ्यायची , जा चालता हो , माझ्या वाट्याला जाऊ नकोस , नाहीतर पोलिसात देईन “

“हाहाहा “ तो गडगडाटी हसला . “ तुला फसवायला बघतेय ती , जास्त आहारी जाऊ नकोस तिच्या , कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला की शेवटी वाईटच निपजतं त्यातून , मग ती चांगली असो अथवा वाईट , अति चांगुलपणा दाखवायला जाऊ नकोस , सर्प योनीतली आहे ती, त्या नागिणीपासून सावध रहा !.. “

“ अरे जा ...ढोंगी कुठला , येडा बिडा समजतोस की काय मला ? चल चालता हो ..” मी संतापून म्हटलं ,पण मी असं म्हणायच्या आधीच तो दिसेनासा झाला त्याच्या डमरूचा आवाज मात्र अजूनही कुठून तरी येत होता , त्याचा तो कर्णकर्कश स्वर माझ्या कानात घुमत राहिला .


तिरीमिरीत घरी आलो , रात्री अंथरुणावर पडल्यावर मला एकदम त्याच्या विधानाची गंमत वाटली ,मग एकटाच खो खो हसत सुटलो , रास्कल ; म्हणे सर्प योनीतली आहे , सावध रहा , हाहाहा … रात्रभर मला नागीन मधली रीना रॉय स्वप्नात नाचताना दिसत होती . सकाळी उठलो आवरलं आणि ऑफिसला आलो पण कामात लक्ष लागेना , तिची आठवण यायला लागली .आईशप्पथ असं कधीच झालं नव्हतं ,कालपासून तर जरा जास्तच आठवायला लागली , एरवी एवढा आजूबाजूला थवा असायचा किलबिलाट करत माझ्याभोवती कधी लक्ष गेलं नाही . पण हिचा अबोल गोडवा मनाला भावला आणि ईच्छा नसूनही मी तिच्या प्रेमात पडलो , काहीतरी मला तिच्याकडे ओढत होतं ते मला कळत होतं , ठरवूनच टाकलं की कधीतरी सरळ सांगायचं की मला तू खूप खूप आवडतेस ,आता रोज बागेत जाऊ लागलो , तिच्या शेजारी पण अंतर ठेऊन बसत राहिलो , वाट बघत होतो, ती आपण होऊन बोलेल याची , अखेर माझ्या तपश्चर्येला फळ आलं , एक दिवस कळी आपोआप उमलली , नाही हो मी काहीच केलं नाही , मला तर वाटलं की तिला जाणीव पण झाली नसेल मी तिच्या शेजारी बसतो याची , पण नाही, होतं तीच लक्ष , कळत होतं तिला , त्याचं असं झालं ,एक दिवस मला ऑफिस मधून निघायलाच उशीर झाला आणि मग बागेत रोजचा जायचा वेळेचा शिरस्ता चुकला ,अगदी बाग बंद व्हायला दहा मिनिटं कमी असताना धावपळ करत बागेत पोहोचलो तर काय ,सूर्यफूलाचा चेहेरा आज नेहेमीच्या दिशेने न दिसता माझ्या दिशेने वळलेला दिसला , मी दिसताच तिचा चेहेरा जो काही आनंदाने उजळला , महाराजा , काय सांगू ? त्यावर आपली हजार जाने कुर्बान !... मग मी पण हसलो तिच्या शेजारी बसता बसता , “आज जरा उशीर झाला , ऑफिसमध्ये काम होतं ,.... भेळ खाऊयात ?” उत्सहाच्या भरात मी एकदम खूप जुनी ओळख असल्यासारखं बोलून गेलो . तिनं मानेनेच नाही म्हटलं , “मला उशीर होईल घरी जायला , निघायला हवं . “ किती मंजूळ किणकिणता आवाज , कानाला इतका सुमधुर वाटला म्हणून सांगू ? खल्लास … त्या रात्री आनंदाने झोपच आली नाही , सकाळ होईपर्यंत तोच तोच सिन मनाच्या टेपरेकॉर्डर मध्ये रिवाईंड होत राहिला .टक्क जागा होतो रात्रभर तरीही उत्सहाने ऑफिसला गेलो, कमाल आहे ना ? सगळ्यांनाच माझ्यात झालेला बदल जाणवलाच , एक दोघांनी विचारलं देखील , मी त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून माझं काम करत राहिलो कधी एकदा संध्याकाळ होते आणि तिला भेटतो असं होऊन गेलं , हळू हळू आम्ही रोज गप्पा मारायला लागलो ,माझ्या विनंतीवरून ती माझ्या बरोबर बागेत राउंड देखील मारायला लागली , प्रेम हा आयुष्यातला सगळ्यात सुंदर टप्पा का असतो आत्ता कळायला लागलं होतं . काहीही विचारलं नाही मी तिला ना तिने मला , एकमेकांचा सहवास अनुभवण्यातच दिवस चालले होते , खूप सुखात ठेवायचं होतं मला तिला, बाकी काहीच विचार नव्हते माझ्या डोक्यात . तिचा पास्ट किंवा तिचं बॅकग्राउंड याची माहिती मला करून घ्यायची नव्हती , ती माझ्याचसाठी आहे एवढंच मला कळत होतं , तो जोगड्या म्हणाला तसं ती जर सर्प योनीची असेल तर माझ्याचसाठी मनुष्य देह धारण करून आली असं मी समजेन , कुणी काहीही सांगो ,मला आता पर्वा नाही , गोविंदाग्रजाना स्मरून सांगतो ,


, “ तो योग खरा ! हटयोग ! प्रीतीचा रोग !

लागला ज्याला !- लागते जगावे त्याला हे असे !! “

४ नोव्हेंबर आज माझा वाढदिवस , सकाळी लवकर उठून आवरलं , चौकात गणपती मंदिर होतं , आई मला तिथे दर वाढदिवसाला नेऊन माझ्या हस्ते अभिषेक घालायची , तो शिरस्ता मी कायम ठेवला होता , तसाच आजही गेलो , गणरायाला अभिषेक घालताना मनोमन प्रार्थना केली ,आणि म्हणालो आज मी तिला लग्नाचं विचारणार आहे ..काय वाटतं तुला ? हो म्हणेल ती ? बोलतात म्हणे देव आपल्याशी म्हणून मी पण बोलतो त्यांच्याशी पण आपल्याकडे इंटरप्रिटर पाहिजे ना राव त्यांची भाषा समजायला , मनोमन त्याचा होकारच घेतला , ते सोयीचं असतं , आपण आपल्या मनाने निगेटिव्हिटी ओतायची नाही कधी कशात , as usual , कधी एकदा बागेत जातो आणि तिला भेटतो असं झालेलं , संध्याकाळ झाली तसा निघालो ऑफिसमध्ये वाढदिवस साजरा केलेला त्यातला थोडा केक तिच्याकरता म्हणून बाजूला काढला , पॅन्ट्री मध्ये जरा शोधाशोध केल्यावर एक छोटा डबा सापडला त्याला चांगला घासून पुसून लख्ख केला आणि मग तो केक त्याच्यात भरत असतानाच खरे सर तिथे आले ,’अरे आशु काय इथे करतोयस? ‘

‘ काही नाही सर केक नेतोय घरी.’

“ घरी कोणाला? “

“सर लहान मुलं येतात आजूबाजूची त्यांना द्यायला नेतोय “ मी चक्क थाप मारली

“अच्छा ! मला वाटलं की एखाद्या मैत्रिणीला नेतोयस .. “ ते हसत हसत म्हणाले तसा मी देखील चोरी पकडल्यासारखा हसलो आणि निघालो .

दुरून तिला पाहिलं तसं जीवाला बरं वाटलं , मग भराभर गेलो तिच्याकडे , मला पाहून तिचा चेहेरा आनंदाने उजळला , मग तिच्या शेजारी बसता बसता मी हळूंच केक चा डबा उघडून तिला केक ऑफर केला , “ घे ना ..आज माझा वाढदिवस आहे “

ती एकदम गोरी मोरी झाली ,

“ आज मला खाता नाही येणार ,उपवास आहे मी घरी घेऊन जाईन चालेल ? “

“ दिला असता मी एरवी पण हा ऑफिसचा डबा आहे , मला देता नाही येणार “ मी हिरमुसून परत म्हणालो , “ घे ना माझ्या साठी एक बाईट , “ तिने नाही या अर्थाने मान हलवली , मग मी जास्त आग्रह नाही केला , थोडं वाईट पण वाटलं , एवढं तोंडाने सांगितलं वाढदिवस आहे म्हणून ,पण साधं विश पण नाही केलं , मग परत मनात आलं केक का नाही म्हणत असेल ही ? उपवास हे निमित्त असेल का ? ‘ गपचूप डबा ठेऊन दिला बाजूला , आणि मग तिच्याशी बोलावे म्हणून वळलो तर ती जागेवर नव्हती , मी एकदम चमकलो , एव्हढ्यात कुठे गायब झाली ?

बघतो तर समोर झाडाला टेकून माझ्या कडे पहात होती , एक क्षणभर तिच्याकडे बघताना वाटून गेलं एवढी कशी लांबलचक हि ? सापासारखी ? ...एकदम दचकलो.. हे काय भलतंच मनात आलं ? असते एखादी सडपातळ आणि उंच , लवचिक बांध्याची , पण नाही म्हटलं तरी मनात पाल चुकचुकली , वाटलं लग्नाचं विचारायच्या आधी निदान ती कोण आहे कुठून आली हे तरी विचारायला हवं . मी तिच्या जवळ गेलो , “अशी काय पहातेस ? “

ती हसली आणि मानेनेच काही नाही अशी मान हलवली , आणि मग एकदम अचानक म्हणाली , “ दे तुझा तो केक “

“अगं तुझा उपवास आहे म्हटलीस ना ?”

यावर ती अतिशय मनमोहक हसली , आणि माझ्या डब्याजवळ जाऊन तिने त्यातला एक तुकडा मला भरवला आणि उरलेला आपण खाता खाता सहज म्हणावं तसं ती म्हणून गेली ,

“ मी मानवी नाहीये “ मी उडालोच ,

“ म्हणजे ? “ माझ्या डोळ्यासमोरून ती सळसळ करत नागाच्या रूपात निघून गेली असं दृश्य आलं आणि मी पट्कन उठून उभा राहिलो .

“ घाबरू नकोस , खाली बस ,मी सर्प योनीतली नाहीये . “

तीने असं म्हटल्याबरोबर मी ओशाळून खाली बसलो .

“ आशुतोष , आम्हाला स्पंदनांची भाषा कळते , तुझ्या भाषेत vibes ..खरं तर निसर्गाची भाषा हीच आहे , त्यामुळे तुझ्या मनातले विचार मला वाचता येतात, जसे तुमच्या जगाचे अदृश्य नियम आहेत ज्याला तुम्ही पाप आणि पुण्य अशी नावं देता आणि कोणी ते मान्य करो अथवा अमान्य , निसर्गाच्या नियमानुसार ते फळ त्याच्याच वाट्याला येतं अन्य कोणाच्याही वाट्याला जात नाही, तसेच आमच्या जगाचेही काही नियम आहेत आणि आत्ता तुला मी तुझ्यासमोर मानव योनीत दिसते हि मला मिळालेली शिक्षा आहे , माझे आई बाबा हे मला जन्म देण्यापुरते या लोकात आले आणि त्यानंतर मी एका अनाथालयात वाढले , शिक्षण पूर्ण करून आपल्या पायावर उभी राहिले , माझ्या लोकांतून काही निरोप अथवा काही संदेश मिळतोय का हे बघण्यासाठी मी रोज बागेत या बेंचवर बसत असे , तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर या विशिष्ट ठिकाणी मला नेटवर्क मिळत होतं , काही संदेश मिळत नव्हता म्हणून मी उदास होते, असं वाटायचं आपल्याला इथेच कायमचं रहावं लागणार ,काही दिवसांपूर्वी तू इथे येऊन बसायला लागलास, त्यामुळे तुझ्या vibes माझयापर्यंत यायला लागल्या , तुझं माझ्यावरचं प्रेम बघून मी हळूहळू तुझ्यात गुंतायला लागले , तुझ्या निरागस निःस्वार्थी प्रेमाने मला इथेच या जड तत्वात गुरुत्वाकर्षणात बांधून ठेवलं , परत जावंस वाटेना , तुझं प्रेम जर असच राहिलं असतं तर मी इथेच राहिले असते, पण तुझ्या निष्कलंक मनात मनात शंका डोकावली आणि माझा जाण्याचा मार्ग मोकळा झाला. आत्ता काही वेळापूर्वीच मला तिकडे परत यायचा संदेशही मिळाला. मला निघावं लागेल आता ..”

“नको गं जाऊस !.. , एका छोट्याशा गोष्टीची एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस गं मला , तुझ्याशिवाय कोणी नाही मला ,एकटा आहे मी , तू गेलीस तर मरून जाईन गं मी , मी तुझ्यावर खरं प्रेम केलंय माझ्यासाठी थांब प्लिज !.. “

“ कालपर्यंत थांबायची तयारी होती माझी , पण आता नाही “

“ एवढं काय पण , तो जोगड्या मला असं म्हणाला म्हणून चुकलो मी गं ..याच्याआधी किती व्याकुळ झालो होतो तुझ्याचसाठी ते नाही दिसलं तुला ? तुला वाईब्ज कळतात म्हटलीस ना ? मग किती तडफडलो तुझ्याकरता ते नाही कळलं तुला? “

“ कळलं ना म्हणून तर चुक करत होते , तुझ्यामुळेच भानावर आले , आणि चूक छोटी काय मोठी काय ,सगळ्या गोष्टीना एका पारड्यात तोलायचं नसतं ,आशुतोष !..पाण्याने भरलेल्या भांड्यात मिठाचा खडा टाकलास तर पाण्याला काही फरक पडणार नाही कदाचित , पण तेच भांडं दुधाचं असेल तर दुधाचं आयुष्य नासतं रे. तो जोगी म्हणजे आमच्या लोकातला कोणी एक हितचिंतकही असेल , माझं अध:पतन होऊ नये असं त्याला वाटलं असेल म्हणून तुला मुद्दाम असं काही सांगून गेला . आणि त्याची ती मात्रा तुला बरोब्बर लागू पडली . आत्ता तू प्रेमात आहेस म्हणून मनात आलेली शंका तू दाबून टाकलीस , पण पुढे आपलं लग्न झालं असतं तर कालांतराने माझ्या प्रत्येक कृतीचा अर्थ तू तसाच लावला असतास , कदाचित त्यावरून पुढे त्रासही दिला असतास . . खरं सांगू का? तुम्ही पृथ्वीवासीय अतिप्रचंड स्वार्थी असता , फक्त स्वतः:चा विचार करता , तुझ्या जागी मी असते ना तर तुला आनंदाने आणि प्रेमाने जाऊ दिलं असतं कारण तू सुखी राहणं मला जास्त महत्वाचं वाटलं असतं “,

“असू दे कसंही असलं तरी प्रेम ते प्रेम असतं , जे मी तुझ्यावर केलं आहे , तुझ्या दृष्टीने स्वार्थी असू दे , क्षुद्र असू दे ,पण मला तू खूप हवी आहेस , अजूनही मी तेच म्हणीन ,” यावर ती फक्त हसली आणि तीच ते हास्य पुन्हा मला वेड लावून गेलं .ती थांबेल अशी आशा मनात ठेऊन मी तिला म्हणालो , “ सांग तरी तू कोण आहेस ? “

“ Can’t you love me ,irrespective of my identity ? “

या तिच्या प्रश्नावर मी निरुत्तर झालो , ती गेली, , मला अजूनही अगदी ती जाईपर्यंत वाटत होतं की ती माझी चेष्टा करतेय , पण नाही ,ती खरोखरच गेली, माझं आयुष्य पुन्हा एकाकी करून गेली , जगण्याचा हेतूच घेऊन गेली , आई बाबा लहानपणी गेले तेव्हापासून इतके दिवसात कधी असा विचार आला नाही , पण आता मलाही वाटू लागलंय की आपल्यालाही ही शिक्षा दिली आहे परमेश्वराने , कुठल्या तरी अपराधाची, ज्यायोगे आपल्यावर प्रेम करणारी माणसं आपल्या पासून लांब जातात .आता नाही झेपत एकटेपणा .. खूप miss करतो मी तिला , पण माणसं एकदा गेली कि परत येत नसतात . का SSS ही उरत नाही मागे .


समाप्त !..



.