Nephew in Marathi Short Stories by Na Sa Yeotikar books and stories PDF | भाऊबीज

Featured Books
Categories
Share

भाऊबीज


भाऊबीज

आज जिल्हाधिकारी राधाचे डोळे भरून आले होते. कारण आज भाऊबीजेचा दिवस मात्र भाऊ सुरज या जगात नाही. हे ह्या दिवाळीतील पहिले सण होते तिचे , ती आपली भावाची वाट पाहत होती मात्र भाऊ काही केल्या येऊ शकत नव्हता. कारण नुकतेच झालेल्या बस अपघातात तिच्या एकुलत्या एक भावाचा मृत्यू झाला होता. हे आठवण करून करून तिच्या डोळ्यातून पाणी ओघळत होते. आज ती एका जिल्ह्याची जिल्हाधिकारी झाली होती मात्र हे सुखाचे क्षण पाहण्यासाठी तिचा भाऊ मात्र जिवंत नव्हता. याच विचारात ती वीस वर्षांपूर्वीच्या त्या जुन्या रामपूर गावाच्या झोपडीमधील दिवसांत गेली. घर कसले ते तर एक झोपडीच होती. घरात आई बाबा आणि एक जिवलग सुरज नावाचा भाऊ. सुरजचे तिच्या बहिणीवर जीवापाड प्रेम होते. त्यांची आई आणि बाबा दोघे ही शेतात किंवा मिळेल तिथे मजुरी करून आपला संसार चालवित असत. सुरज पाचव्या वर्गात आणि राधा पहिल्या वर्गात एकाच शाळेत शिकत होती. शाळेत राधेचे कौतुक होतांना पाहून सुरजला खूप आनंद व्हायचा. सुरज मनमिळाऊ स्वभावाचा तर राधा मुळात हुशार होती. त्याची चुणूक पहिल्या वर्गापासून दाखवायला सुरुवात केली. सारे काही सुरळीत चालू होते. अशात सुरज आणि राधाच्या डोक्यावर दुःखांचे डोंगर कोसळले. त्यांची आई शेतात काम करायला गेली असता तिला सापाने चावा घेतला. दवाखान्यात जाण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाचा आधार गेला होता. सुरजच्या वडिलांना देखील तो एक मोठा धक्का होता. आई गेल्यापासून सूरजचे बाबा रोज दारू पिऊन घरी येऊ लागले. लेकरांची काळजी करण्यापेक्षा लेकरांना बाबाची काळजी करावी लागत होती. सूरजला स्वतःच्या शिक्षणाची तेवढी काळजी नव्हती जेवढी काळजी त्याला बहिणीच्या शिक्षणाची होती. अति दारू प्यालामुळे सुरजच्या बाबांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. काम कमी आणि खर्च जास्त असा प्रकार चालू झाला होता. जे व्हायचे नव्हते तेच झाले. एके दिवशी सुरजचे बाबा खूप दारू पिऊन रस्त्यावर पडला आणि तेथेच जीव सोडला. आत्ता तर सुरज आणि राधाच्या डोक्यावर आकाश कोसळले. ते दोघे अनाथ झाले. दहावीची परीक्षा सुरू होणार होती की, असा अपघात झाला. सूरजने कसे बसे दहावीची परीक्षा दिली. अपेक्षेप्रमाणे त्याचे दोन विषय राहून गेले आणि तो नापास झाला. एका दृष्टीने नापास झालेले त्याला चांगलेच वाटत होते कारण त्याला ही आत्ता पुढे शिकावे असे वाटत नव्हते. मग त्याने पक्का निर्धार केला की काही करायचे पण बहिणीला शिकवायचे. अगदी सुरुवातीला गावातल्याच एका किराणा दुकानात काम करू लागला. आलेल्या पैश्यात दोघांची कशीबशी गुजराण होत होती. राधा आत्ता दहाव्या वर्गात शिकत होती. त्यासाठी शिकवणी आणि पुस्तके याचा खर्च वाढला होता. म्हणून सुरज रात्रीच्या कामाला देखील जाऊ लागला. बहिणीला काहीच कमी पडू द्यायचे नाही असा त्याचा निर्धार कायम होता. दहावीचा निकाल लागला. गरीब घरातील राधा नव्वद टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली. सुरजला खूप आनंद झाला. साऱ्या गावाने दोघा भावा-बहिणीचे खूप कौतुक केले. राधाला अकरावी शिकण्यासाठी गाव सोडावे लागते. आत्ता काय करावं ? यासाठी पैसे ही खूप लागतात . काय करावं या चिंतेत तो बसलेला असतांना गावातील एक दानशूर व्यक्ती त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, ' सुरज, कशाचा विचार करतोस ?';यावर सुरज म्हणाला, ' माझ्या बहिणीच्या शिक्षणाविषयी विचार करतोय, काय करू ? पैसे कसे मिळवू ?';यावर तो दानशूर व्यक्ती म्हणाला ' काही काळजी करू नकोस, मी करतो तुला मदत, तुझ्या बहिणीचे पूर्ण शिक्षण होईपर्यंत मी उचलतो सारा खर्च ' सुरजला जरा हायसे वाटले. सुरज वागणे त्या दानशूर व्यक्तीला अगोदर पासून माहीत होते. कदाचित सुरज ला आठवण नसेल पण त्या दानशूर व्यक्तीला सुरजची चांगली ओळख होती. रात्रीच्या वेळी सुरज काम करून परत येत असताना एक घटना घडली होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही चोरटे एका व्यक्तीला लुटण्याचा प्रयत्न करीत असताना सुरज तेथे आला आणि त्या चोरट्यांना पळवून लावला होता. चोरांच्या झटापटीत तो व्यक्ती जखमी झाला आणि बेशुद्ध पडला होता. सुरजने त्या अंधाऱ्या रात्री त्या बेशुद्ध व्यक्तीला दवाखान्यात पोहोचविला. डॉक्टरांनी तपासले आणि म्हणाले, बरे झाले ते लवकर आणलस अन्यथा अनर्थ झाला असता. डॉक्टरने सुरजची पूर्ण चौकशी केली, त्याचा पत्ता लिहून घेतला. सूरजने डॉक्टरशी बोलून निरोप घेतला. त्या बेशुद्ध व्यक्ती ला जाग आल्यावर डॉक्टरने सारी हकीगत सांगितली आणि सूरजची देखील माहिती सांगितली. ही घटना सुरज विसरून गेला होता. मात्र तो बेशुद्ध व्यक्ती म्हणजे तो दानशूर व्यक्ती विसरला नाही. सुरजची पूर्ण माहिती काढली आणि वेळ पडल्यावर मदत करण्याचे ठरवले. म्हणूनच त्या दानशूर व्यक्तीने सुरज ला काही ही न सांगता राधाच्या शिक्षणाचा खर्च उचलला. आत्ता राधा रामपूर गावापासून दूर राहत होती. महिना दर महिन्याला तो भेटायला जायचा. कधी कधी खूप काम निघाल्यास दोन दोन महिने जाता येत नसत. मात्र भाऊबीजेच्या दिवशी तो हमखास जायचा आणि तिच्या हातून ओवाळणी करून परत गावी यायचा. गावातील त्या दानशूर व्यक्तीमुळे राधाचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. राधाची एकच इच्छा होती ते म्हणजे जिल्हाधिकारी होणे. त्यासाठी पुण्यातल्या नामवंत क्लासेस मध्ये शिकवणी लावणे गरजेचे होते. पण आत्ता पुन्हा एकदा त्याच दानशूर व्यक्तीकडे हात पसरणे सूरजच्या स्वभावाला पटणारे नव्हते. पण आत्ता कोण मदत करणार ? या विचारात सुरजने स्वतःला एका सावकाराकडे गहाण ठेवला म्हणजे चोवीस तास त्याचेच काम करण्याची जबाबदारी घेतली आणि राधाची इच्छा पूर्ण केली. राधा आत्ता जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन पुण्याला गेली. पुण्याच्या क्लासेसमध्ये रात्रंदिवस अभ्यास करून पहिल्याच झटक्यात ती जिल्हाधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण झाली. ही गोड बातमी सूरजला कळताच त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू गळू लागले. त्याने केलेल्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले होते. जिल्हाधिकारी पदग्रहण कार्यक्रमासाठी राधाने सुरजला पुण्याला येण्यास कळविले म्हणून तो त्या रात्रीच खाजगी बसने पुण्याला जाण्यास निघाला होता. सकाळच्या साखर झोपेत पुण्याला पोहोचण्यापूर्वीच त्या खाजगी बसचा अपघात झाला आणि त्यात सर्व प्रवाश्यासोबत सुरजचा ही मृत्यू झाला. ही बातमी राधाच्या कानावर पडताक्षणी राधा बेशुद्ध झाली होती. ज्यावेळी शुद्धीवर आली होती त्यावेळी ती एका दवाखान्यात बेडवर होती. त्याच दवाखान्यात तिच्या भावाची डेडबॉडी होती. भावाचे मृतदेह पाहून तिला ते रामपूरचे जुने दिवस सारे आठवत होते. त्याच वेळी मोबाईलची बेल वाजली आणि क्षणात राधा शुद्धीवर आली. यावर्षी तिची ओवाळणीची ताट सुने सुने राहील असे वाटताना सूरजचा जिवलग मित्र ऑफिसात आला आणि म्हणाला, 'ताई, आज भाऊबीज आहे, मला ओवळणार नाही का ?' सुरजचा मित्र माधवला पाहून तिला आनंद झाला. लगेच तिने माधवची भाऊबीजेची ओवाळणी केली आणि डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

- नागोराव सा. येवतीकर
स्तंभलेखक
मु. येवती ता. धर्माबाद जि. नांदेड
9423625769